? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments