मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अनवाणी वार्धक्य चालले… – चित्र एक काव्ये तीन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के, सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी आणि श्री आशिष  बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अनवाणी वार्धक्य चालले … – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी 

सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

डोई पाणीभरला थंडावा

चटचटणारे भवती ऊन

अनवाणी वार्धक्य चालले

आधारा काठी घेऊन

*

चित्र पाहताच वाटे

आजीला आधार द्यावा

तिच्या डोईचा हंडा घेऊन

आपल्या माथी भार घ्यावा

*
उन्हात पोळत्या पायाखाली

पुढे होऊन सावली द्यावी

हात धरून घरी सुखरूप

पोहचवण्याची हमी घ्यावी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

कवयित्री : सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी

( २ ) 

जीवन..

हाती काठी, डोई हंडा

कशी चालली म्हातारी

पाणी तर हवेच ना?

चाले एकटी बिचारी

*
साडी चोळी साधीसुधी

केस थोडे पिकलेले

देहयष्टी सांगतसे

वृद्धपण हो आलेले

*
रस्ता आहे खडकाळ

ऊन सावलीचा खेळ

अनवाणी ती चालली

असे उन्हाचीच वेळ

*
हात हंड्याला आधार

काठी देह सावरते

जीव जगवण्यासाठी

वणवण चाले पाठी

*
निसर्गाचे चक्र चाले

अन्न, पाणी, हवा देतो

राखू समतोल त्याचा

हाच बोध यात घेतो

☆ ☆ ☆ ☆

कवयित्री : सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी

सातारा

☆ ☆ ☆ ☆

श्री आशिष  बिवलकर

(३)

डोईवर हंडा,

हातामध्ये काठी |

दाही दिशा वणवण,

हंडाभर पाण्यासाठी |

दर पाच वर्षांनी,

देऊन त्यांना ती संधी |

पाण्यासाठी भोग,

सरता सरले नाही कधी |

 *

डोळ्यात साचले पाणी,

पाणी नाही आले दारी |

पाण्यासाठी करावी लागते,

रणरणत्या उन्हात वारी |

 *

स्वातंत्र्य मिळून आता,

संपूर्ण आयुष्य लोटलं |

गोरे गेले काळे आले,

सूलतानागत सारं लुटलं |

 *

करोडोच्या योजना येई,

कागदी घोडे नाचवतात |

वरून आलेला निधी,

ढेकर देऊन पचवतात |

 *

सामान्य माणूस जगो की मरो,

त्याची राज्यकर्त्यांना नसते तमा |

लोकशाहीत जो बसतो खुर्चीवर,

भ्रष्टाचाराने धन करत राहतो जमा |

 *

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शेती माती… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “शेती माती…” ☆  डॉ. शैलजा करोडे

बरसल्या मृगसरी

शेती माती भिजविली

तळी विहीरी भरल्या

कळी मनाची खुलली

*

आनंदली वसुंधरा

अंगोपांगी बहरली

प्रिया मिलनाने सखी

रोम रोमी रोमांचली

*

दान उदरी झेलूनी

लेणे हिरवे ल्यायली

नवांकुर डोकावले

वसा सृजन वसली

*

लेक धरतीचा बळी

सेवा रात्रंदिन करी

पीक मोत्यांचे डोलता

हास्य त्याचे मुखावरी

*

गाडा विश्वाचा चालतो

धरतीच्या कुशीतून

शेती माती जीवजंतू

सारे जाती आनंदून

© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोगरा फुलला…☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ मोगरा फुलला☆ सौ. सुचित्रा पवर ☆

आसमंती आज । गंध उधळला

मोगरा फुलला। अंगणात

*

पर्णसंभारात ।हळूच हसतो

नाचतो खेळतो।वेलीवर

*

टपोऱ्या कळ्या।लाजऱ्या बावऱ्या

साजिऱ्या गोजिऱ्या। अलवार

*

अवचित येतो।मंद गोड गंध

जीव होतो धुंद। वेडापिसा

*

रुक्मिणीमातेचा।सजता देव्हारा

कावरा बावरा। विठुराया

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शौर्य-श्रीमंत सैनिक” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“शौर्य-श्रीमंत सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके 

डोईवर अक्षता पडल्या आणि अवघ्या पंचवीस-तीस दिवसांत कुंकू सीमेवर लढायला गेलं…. त्यावेळी ती सतरा वर्षांची असेल नसेल! त्यानंतर त्याला नऊ महिन्यांनीच पाहण्याचा योग आला! तिच्या यजमानांच्या नावाचा अर्थ चमकता तारा… अगदी चुनचुनीत मुलगा! वाढत्या वयासोबत या ता-याची चमक वाढतच होती.

इतरांचे धनी नोकरीवरून सुट्टीवर आले की, बायकोसाठी सोन्याचे दागिने आणत असत… हिचा नवरा मात्र पहिल्याच सुट्टीत चांदी घेऊन आला! पण ही चांदी हि-यापेक्षाही मौल्यवान आणि चमचमती. या चांदीच्या दागिन्याच्या एका बाजूला हाती बंदूक घेऊन ताठ उभा असलेला सैनिक दिसत होता तर दुस-या बाजूला बंदुकीची संगीन… टोकदार… आभाळाकडे उंचावलेली… शत्रूच्या नरडीचा वेध घेऊ पाहणारी. तो चांदीचा दागिना म्हणजे एक पदक होतं…. सेना मेडल म्हणतात याला. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हे पदक आपल्या छातीवर अभिमानाने मिरवण्याचे भाग्य लाभले होते तिच्या कुंकवाला….. होय… शिपाई चुन्नीलाल तिच्या घरधन्याचं नाव. जम्मू येथील रहिवासी. सहा मार्च १९६८ रोजी जन्मलेले चुन्नीलाल वयाच्या सोळाव्या वर्षी सेनेत भरती झाले दोन वर्षांच्या कठीण प्रशिक्षणापश्चात त्यांना 8, Jammu And Kashmir Light Infantry नेमणूक मिळाली. आणि पहिल्याच वर्षी म्हणजे १९८७ मध्ये त्यांना फार मोठ्या लष्करी कारवाईत सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभली…. होय… सैनिकासाठी लढाई करायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधीच असते. पण या लढाईसाठी त्यांना काही महिन्यांचे खूप कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले… कारण त्यांची नेमणूक होणार होती सियाचीनच्या पर्वतांचे रक्षण करण्यासाठी.

१९८७ हे वर्ष होते… पाकिस्तानी घुसखोर सेनेने हजारो फूट उंचीवर असलेले एक शिखर बेकायदा ताब्यात घेतले होते… आणि त्याला त्यांच्या कायद-ए-आजम (कायदेआजम) अर्थात मोहम्मद अली जिनाचं नावही देऊन टाकलं होतं! भारत-पाक-चीन या सीमा त्रिकोण भागात ही शत्रूची चौकी असणं म्हणजे भारतासाठी मोठाच धोका होता. शत्रूला तिथून हुसकावून लावण्याची नितांत गरज लक्षात घेऊन लढाऊ बाणा असलेले सैनिक या कामगिरीवर पाठवण्यात आले! ही कामगिरी जीवघेणी होती. प्रचंड अंगावर येणारे शिखर, थंडी, बर्फ आणि वरून पाकिस्तानी अचूक गोळीबार यांतून त्या चौकीपर्यंत पोहोचायचे होते…. नायब सुबेदार बाणासिंग स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सामील झाले… तसेच आपले तरुण वीर चुन्नीलाल सुद्धा… त्यांच्या सोबत तसेच नीडर इतरही काही जवान होतेच. बाणा सिंग साहेबांचे मार्गदर्शन होते…. चुन्नीलाल इंच इंच पर्वत चढत चढत अंधार, थंडी, बर्फ याची पर्वा न करता मोठ्या कौशल्याने त्या बर्फाळ पर्वतावर चढले…. यातील एक सुळका ४५७ मीटर्स उंचीचा आणि एकदम खडा म्हणजे जवळजवळ ९० अंशाचा होता… बर्फाचे वादळ सुरु होते… समोरचे नीट काही दिसत नव्हते…. पण तरीही चुन्नीलाल यांनी शत्रूच्या बंकरवर तुफान हल्ला चढवला…. सहका-यांना सोबत घेऊन त्या बंकरमधील सर्व पाकिस्तानी यमसदनी पोहोचवले…. त्यांना वाटलं ही भूताटकीच की काय? इतक्या उंचीवर असे कोणी येईल आणि हल्ला करेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नसेल! या मोहिमेतील कामगिरी बद्दल त्यांचे म्होरके बाणा सिंग साहेबांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले! या मोहिमेला ‘राजीव’ असे नाव दिले गेले होते आणि ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल या चौकीला बाणा सिंग यांचे नाव देण्यात आले! आणि चुन्नीलाल यांना याच मोहिमीतील यशस्वी सहभागासाठी त्यांच्या कारकीर्दीतील पहिले मोठे मेडल मिळाले होते…. सेना मेडल! ही तर फक्त सुरुवात होती…. पुढे १९९९ मध्ये त्यांनी पूंच सेक्टर मध्ये थोडेथोडके नव्हे तर १२ पाकिस्तानी घुसखोर ठार मारण्यात मोठी भूमिका बजावली! या मोहिमेत त्यांचे दुसरे पदक आले… वीर चक्र!.. पाच टोके असलेला तारा असतो या चांदीच्या चक्रावर! चुन्नीलाल नावाच्या ता-याच्या छातीवर हे दुसरे पदक मोठ्या डौलाने विराजमान झाले. एका साध्या सैनिकाने कमावलेली हे मोठी दौलत होती.

चुन्नीलाल पुढे आफ्रिकी देशात आपल्या भारतातर्फे संयुक्त राष्ट्र सैन्यातही कामगिरीवर गेले… त्यांच्या पलटणला तिथेही उत्तम शाबासकी प्राप्त झाली! 

२१ जून २००७… या दिवशी चुन्नीलाल हे नायब सुबेदार या पदावर पदोन्नत झाले…. सामान्य सैनिक म्हणून भरती झालेले सैनिक अंगभूत गुणांच्या जोरावर उच्च पदावर पोहोचू शकतात… त्यातलेच नायब सुबेदार हे पद. यांच्याकडे सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व दिले जाते… आणि इतर महत्त्वाची कामे तर असतातच! चुन्नीलाल यांना बढती मिळून केवळ तीनच दिवस उलटले होते. नायब सुबेदार साहेब कुपवाडा मधील एका सैन्य चौकीचे प्रमुख होते… उंची होती १४ हजार फूट. रात्र मोठी अंधारी होती…. आकाशात ढगांनी दाटी केलेली. दोन हातापलीकडचे काही दिसत नव्हते…. पारा वजा ५ इतका खाली गेलेला… जीवघेणी थंडी. पहाटेचे साडे तीन वाजलेले… चुन्नीलाल साहेब पहा-यावर मौजूद होते… त्यांना सीमेजवळ काही हालचाल जाणवली…. त्या स्थितीत ते स्वत: शोध घेण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात तेथून जोरदार गोळीबार झाला… चुन्नीलाल साहेबांनी आपल्या सहका-यांना सावध केले होतेच. प्रत्युत्तर तर दिले गेलेच… दोन अतिरेकी ठार मारले गेले! पण या गदारोळात आपले दोन सैनिक जखमी झाले… आणि जिथे अतिरेकी लपले होते नेमके त्याच्याजवळच कोसळले होते… लपलेल्या अतिरेक्याकडून या सैनिकांच्या जीवाला शंभर टक्के धोका होता… चुन्नीलाल साहेब निर्धाराने पुढे गेले… आणि त्या दोघांना ओढत सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले… पण तिथे एक अतिरेकी लपून बसला होता आणि तिथून पळून जायच्या बेतात होता… चुन्नीलाल साहेबांनी त्याचा माग काढला… त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला… आणि त्याला वर पाठवला! पण त्याची एक गोळी साहेबांच्या पोटात घुसली… प्रचंड रक्तस्राव सुरु झाला! 

रुग्णालयात पोहचेपर्यंत नायब सुबेदार चुन्नीलाल साहेब स्वर्गस्थ झाले होते… ही कामगिरी त्यांना त्यांचे तिसरे पदक देऊन गेली… अशोक चक्र! शांतता काळात सैनिकांना प्रदान केले जाणारे सर्वोच्च सैन्य पदक! 

नायब सुबेदार या तिस-या पदकाने आणखी श्रीमंत ठरले होते… तिन्ही महत्त्वाची, सन्मानाची पदके मिळवणारे एकमेव सैनिक ठरले चुन्नीलाल साहेब! त्यांच्या धर्मपत्नी चिन्तादेवी यांनी २६ जानेवारी २००८ रोजी आपल्या पतीचं हे पदक मोठ्या अभिमानाने स्वीकारले… चुन्नीलाल साहेबांनी एवढी मोठी श्रीमंती प्राप्त केली होती… जिचे मोल करणे अशक्य! चुन्नीलाल साहेब हे इतर सैनिकांसाठी आदर्श बनले आहेत! त्यांच्या अलौकिक जीवनावर आणि शौर्याबद्दल Bravest of the Brave : The Inspiring Story of Naib Subedar Chunni Lal, AC()अशोक चक्र), VrC, (वीर चक्र) SM(सेना मेडल) हे Lt General Satish Dua (Retd) यांनी लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. एका सैनिकाच्या कामगिरीची एका मोठ्या अधिका-याने घेतलेली ही नोंद अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे.

जय हिंद.. जय भारत.. जय हिंद की सेना ! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हिशोब काय ठेवायचा ?… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ हिशोब काय ठेवायचा ?… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

काळाच्या निरंतर वाहत्या प्रवाहामध्ये..

आपल्या थोड्या वर्षांचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
आयुष्याने भर भरून दिले असताना..

जे नाही मिळाले त्याचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
मित्रांनी दिले आहे, अलोट प्रेम इथे…

तर शत्रूंच्या बोलण्याचा,

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
येणारा प्रत्येक दिवस,

आहे प्रकाशमान इथे..

तर रात्रीच्या अंधाराचा,

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
आनंदाचे दोन क्षण ही,

पुरेसे आहेत जगण्याला..

तर मग उदासिनतेच्या क्षणांचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
मधुर आठवणींचे क्षण,

इतके आहेत आयुष्यात..

तर थोड्या दु:खदायक गोष्टींचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
मिळाली आहेत फुले इथे,

कित्येक सहृदा कडुन..

मग काट्यांच्या टोचणीचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
चंद्राचा प्रकाश आहे,

जर इतका आल्हाददायक..

तर त्यावरील डागाचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
जर आठवणीनेच होत असेल,

मन प्रफुल्लित..

तर भेटण्या न भेटण्याचा..

हिशोब काय ठेवायचा.. !!

*
काही तरी नक्कीच..

खुप चांगलं आहे सगळ्यांमधे..

मग थोड्याशा वाईटपणाचा,

हिशोब काय ठेवायचा.. !! 🙏

कवी : अज्ञात 

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 248 – जय, जय महाराष्ट्र देशा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 248 – विजय साहित्य ?

🚩 जय, जय महाराष्ट्र देशा… 🚩

 महाराष्ट्र हा  गौरव शाली, आहे संस्कारांची रुपरेषा

 सह्य गिरीचे‌ खडे पहारे, जय जय महाराष्ट्र देशा !धृ!!

 *

नरवीरांचे, नररत्नांचे, आम्हांस लाभले, दैवी देणे

शौर्य कथांचे, पराक्रमाचे, आहे ह्रदयी, अभंग लेणे

मावळतीचा, वसा घेऊनी, ल्यालो सारे, प्रगतीच्या वेषा !१!

 *

माय जिजाई, माय रमाई, जगण्याची, फुलबाग नवी

दिशा दाविली, ऐक्य साधले, स्वराज्य रक्षक, माय हवी

सावित्रीची क्रांतीज्योती तर, अजून नेई, नव्या प्रदेशा!२!

 *

इथे निसर्गा, येई बाळसे, चैतन्याचे, त्यात कवडसे

परंपरेचे, कलागुणांचे, मती गतीचे, सुबक ठसे

किसान आणि, सैन्य दलाच्या, जाणून घेऊया, गणवेषा!३!

 *

महाराष्ट्राची, गौरव गाथा, सदैव ओठी, घेईन नाम

रक्त वाहिले, या देशास्तव, थोर विभूती, मनात राम

कला, क्रिडा, नी, विकास क्षेत्री, यशदायी ही, प्रकाशरेषा !४!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्र अमृताचा… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

? कवितेचा उत्सव ?

☆ चंद्र अमृताचा… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

आज येथे मी पहारा देत आहे

अमृताचा चंद्र या जागेत आहे

*

संपले नाहीच आता युद्ध माझे

हा लढाईचा जरी संकेत आहे

*

तू तिथे गातेस माझे स्वप्न गाणे?

बासरीचा सूर येथे येत आहे

*

मी सुगंधाने फुलांच्या दर्वळावे

वाटले माझाच तू बागेत आहे

*

मी कशाला हाक मारु आसवांना

हा तुझ्या डोळ्यातला संकेत आहे

*

राख झाली आज सा- या या घरांची

आग माझी माझिया हाकेत आहे

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ येईन म्हणते, जरा थांब… ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ येईन म्हणते, जरा थांब ☆ सौ. मंजिरी येडूरकर

गोळा करीन प्रभातीचे रंग

पक्षांच्या गाण्यातील सारे सूर

फुलांनी उधळलेले रंग, गंध

एखादं इंद्रधनुष्य पण घेऊन येते

*

हवाय मला पहाट वारा, दवबिंदूंचे मोती

दिनकराचे तेज, चंद्राची शीतलता

आकाशाची निळाई, धरतीची हिरवाई

चमचमणाऱ्या तारा, चांदणंही घेऊन येते

*

घेऊन येते ती वात्सल्याची पखरण

बालपणी आपण अनुभवायची असते

आणि मग ती ओट्यात गोळा करून

आपल्या पिलांवर उधळायची असते

*

घेऊन येते सहचराचे प्रणय रंग

सहवासाचे रेशीम बंध, घेऊन येते

सख्यांचं मैत्र, नात्यातला हळुवारपणा,

इतकं सारं घेऊन कशी येणार मी? तूच ये

*

दाखवेन तू निर्मिलेली सारी सृष्टी, ये!

धरतीच्या स्वर्गसुखात आकंठ डुंबायला!

कळेल तुला, मी कां येऊ शकत नाही ते!

येशील ना मग! वाट पाहते, तुझीच!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – विसावा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ – विसावा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ

थांबला तो संपला असं जरी असलं

तरी त्या थांब्यावर थोडं विसावून

स्वतःला वेगळ्या चश्म्यातून पहावे

*

आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेची

अद्ययावत करून उत्तरपत्रिका

व्हावे खुश स्वतः वरच बेफाम

सैल सोडावा कधीतरी स्वतःचा लगाम

*

आयुष्याच्या गणिताची

नसतात साचेबद्ध उत्तरे

इथे लयलूट करती

आशेची विविध सुगंधी अत्तरे

*

काय कमावले काय गमवले

ह्या काथ्याकूटात न रमावे

*

अगदी किरकोळ सुखालाही

बंदीस्त करून मनाच्या कुपीत

आपल्या जिवन गाण्याला द्यावे

आपल्याच मनाचे संगीत🎤🎶

🥰दEurek(h)a 😍

🥰दयुरेखा😍

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कणिका… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कणिका… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कणिका

वणवा पेटला पेटला

पळसफुलांनी

पाकळ्यांवर झेलला.

*

हे वितळणारं ऊन

गच्च ठेवलय धरून

झाडाझाडांनी पानापानांतून

*

रंग फुलांचे चोरले

फुलपाखरांनी

पंखांवर मिरवले

*

सूर्य तापतो तापतो आहे.

तरीही खुळा गुलाब

गालात हसतोच आहे.

*

काही क्षणिका

ग्रिष्माचा अंगार झेलीत

पाकळी पाकळी मातीत मिळते.

नको खंत त्याचा

मनी मी ठसविते.

फळाफळातील अमृत प्राशीत

बीज नवे जीवन धरते

मरणात खरोखर जग जगते.

*

वाट

त्या जंगली वाटेला

राजरस्त्याचे रूप देण्याची

स्वप्ने पहात

तो निघाला तिथून

उद्दाम ईर्षेने……

पण सावल्या बुडायच्या आत

त्यालाच गिळून टाकले तिने

*

व्रतोत्सव

सारं रान वणवलं, तेव्हा

आभाळही बघत राहिलं

शून्य काचेरी डोळ्यांनी

कुणा शापित वृक्षांच्या

दहनाचा व्रतोत्सव

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares