कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 248 – विजय साहित्य
🚩 जय, जय महाराष्ट्र देशा… 🚩
☆
महाराष्ट्र हा गौरव शाली, आहे संस्कारांची रुपरेषा
सह्य गिरीचे खडे पहारे, जय जय महाराष्ट्र देशा !धृ!!
*
नरवीरांचे, नररत्नांचे, आम्हांस लाभले, दैवी देणे
शौर्य कथांचे, पराक्रमाचे, आहे ह्रदयी, अभंग लेणे
मावळतीचा, वसा घेऊनी, ल्यालो सारे, प्रगतीच्या वेषा !१!
*
माय जिजाई, माय रमाई, जगण्याची, फुलबाग नवी
दिशा दाविली, ऐक्य साधले, स्वराज्य रक्षक, माय हवी
सावित्रीची क्रांतीज्योती तर, अजून नेई, नव्या प्रदेशा!२!
*
इथे निसर्गा, येई बाळसे, चैतन्याचे, त्यात कवडसे
परंपरेचे, कलागुणांचे, मती गतीचे, सुबक ठसे
किसान आणि, सैन्य दलाच्या, जाणून घेऊया, गणवेषा!३!
*
महाराष्ट्राची, गौरव गाथा, सदैव ओठी, घेईन नाम
रक्त वाहिले, या देशास्तव, थोर विभूती, मनात राम
कला, क्रिडा, नी, विकास क्षेत्री, यशदायी ही, प्रकाशरेषा !४!
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈