डॉ. शैलजा करोडे
कवितेचा उत्सव
☆ “शेती माती…” ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
☆
बरसल्या मृगसरी
शेती माती भिजविली
तळी विहीरी भरल्या
कळी मनाची खुलली
*
आनंदली वसुंधरा
अंगोपांगी बहरली
प्रिया मिलनाने सखी
रोम रोमी रोमांचली
*
दान उदरी झेलूनी
लेणे हिरवे ल्यायली
नवांकुर डोकावले
वसा सृजन वसली
*
लेक धरतीचा बळी
सेवा रात्रंदिन करी
पीक मोत्यांचे डोलता
हास्य त्याचे मुखावरी
*
गाडा विश्वाचा चालतो
धरतीच्या कुशीतून
शेती माती जीवजंतू
सारे जाती आनंदून
☆
© डॉ. शैलजा करोडे (काव्यशलाका)
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈