श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ कणिका… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कणिका

वणवा पेटला पेटला

पळसफुलांनी

पाकळ्यांवर झेलला.

*

हे वितळणारं ऊन

गच्च ठेवलय धरून

झाडाझाडांनी पानापानांतून

*

रंग फुलांचे चोरले

फुलपाखरांनी

पंखांवर मिरवले

*

सूर्य तापतो तापतो आहे.

तरीही खुळा गुलाब

गालात हसतोच आहे.

*

काही क्षणिका

ग्रिष्माचा अंगार झेलीत

पाकळी पाकळी मातीत मिळते.

नको खंत त्याचा

मनी मी ठसविते.

फळाफळातील अमृत प्राशीत

बीज नवे जीवन धरते

मरणात खरोखर जग जगते.

*

वाट

त्या जंगली वाटेला

राजरस्त्याचे रूप देण्याची

स्वप्ने पहात

तो निघाला तिथून

उद्दाम ईर्षेने……

पण सावल्या बुडायच्या आत

त्यालाच गिळून टाकले तिने

*

व्रतोत्सव

सारं रान वणवलं, तेव्हा

आभाळही बघत राहिलं

शून्य काचेरी डोळ्यांनी

कुणा शापित वृक्षांच्या

दहनाचा व्रतोत्सव

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments