चित्रकाव्य
अनवाणी वार्धक्य चालले … – चित्र एक काव्ये दोन ☆ सुश्री नीलांबरी शिर्के आणि सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी ☆
सुश्री नीलांबरी शिर्के
( १ )
डोई पाणीभरला थंडावा
चटचटणारे भवती ऊन
अनवाणी वार्धक्य चालले
आधारा काठी घेऊन
*
चित्र पाहताच वाटे
आजीला आधार द्यावा
तिच्या डोईचा हंडा घेऊन
आपल्या माथी भार घ्यावा
*
उन्हात पोळत्या पायाखाली
पुढे होऊन सावली द्यावी
हात धरून घरी सुखरूप
पोहचवण्याची हमी घ्यावी
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के
मो 8149144177
☆ ☆ ☆ ☆
कवयित्री : सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी
( २ )
जीवन..
हाती काठी, डोई हंडा
कशी चालली म्हातारी
पाणी तर हवेच ना?
चाले एकटी बिचारी
*
साडी चोळी साधीसुधी
केस थोडे पिकलेले
देहयष्टी सांगतसे
वृद्धपण हो आलेले
*
रस्ता आहे खडकाळ
ऊन सावलीचा खेळ
अनवाणी ती चालली
असे उन्हाचीच वेळ
*
हात हंड्याला आधार
काठी देह सावरते
जीव जगवण्यासाठी
वणवण चाले पाठी
*
निसर्गाचे चक्र चाले
अन्न, पाणी, हवा देतो
राखू समतोल त्याचा
हाच बोध यात घेतो
☆ ☆ ☆ ☆
कवयित्री : सुश्री सुरेखा सुरेश कुलकर्णी
सातारा
☆ ☆ ☆ ☆
श्री आशिष बिवलकर
(३)
डोईवर हंडा,
हातामध्ये काठी |
दाही दिशा वणवण,
हंडाभर पाण्यासाठी |
*
दर पाच वर्षांनी,
देऊन त्यांना ती संधी |
पाण्यासाठी भोग,
सरता सरले नाही कधी |
*
डोळ्यात साचले पाणी,
पाणी नाही आले दारी |
पाण्यासाठी करावी लागते,
रणरणत्या उन्हात वारी |
*
स्वातंत्र्य मिळून आता,
संपूर्ण आयुष्य लोटलं |
गोरे गेले काळे आले,
सूलतानागत सारं लुटलं |
*
करोडोच्या योजना येई,
कागदी घोडे नाचवतात |
वरून आलेला निधी,
ढेकर देऊन पचवतात |
*
सामान्य माणूस जगो की मरो,
त्याची राज्यकर्त्यांना नसते तमा |
लोकशाहीत जो बसतो खुर्चीवर,
भ्रष्टाचाराने धन करत राहतो जमा |
*
© श्री आशिष बिवलकर
बदलापूर
मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈