मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राजा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ राजा☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

धूळ चारण्या अन्यायाला

उभाठाकतो रणांगणावर

प्रिय मानतो सकल चराचर

बनतो राजा कधी कुणीतर

*

प्राणाहूनही प्रिय जयाला

असते वाटत माय धरोवर

जबाबदारी तिची शिरावर

घेतो राजा कधी कुणीतर

*

आदर्शाचा घेत सुगावा

मानवतेचा होतो चाकर

वावरणारा असा धुरंधर

बनतो राजा कधी कुणीतर

*

ठेवत असतो पुरा भरवसा

जनतेमधल्या सामर्थ्यावर

स्वबळाच्या  कर्तृत्वावर

बनतो राजा कधी कुणीतर

*

सेवाभावी समर्पणाचे

ध्येय जयाचे असते सुंदर

जनसेवेला मानत ईश्वर

बनतो राजा कधी कुणीतर

*

साधक बाधक हितोपदेशी

पण मायेचा करुणा सागर

ठेवत श्रद्धा संस्कारावर

बनतो राजा कधी कुणावर

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 169 ☆ शाहिद… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 169 ? 

☆ शाहिद… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

आई मला माफ करशील

आई मला समजून घेशील.!!

*

तुला माझी गरज असतांना

तुला माझी ओढ असतांना.!!

*

नाही मी तुझ्याजवळ राहिलो

तुझा असून तुझा नाही झालो.!!

*

तू रंगविले स्वप्न किती

तू रचले महाल किती.!!

*

आधार तुझा मला समजले

बुडतीचा सहारा मला पाहिले.!!

*

नाही आलो कामी तुझ्या माई

नाही पाजू शकत पाणी माई.!!

*

नऊ महिने वेदना झाल्या

यातना किती तू सोसल्या!!

*

पण झालो मी शाहिद जेव्हा

आली आठवण तुझीच तेव्हा.!!

*

मातृभूमीला करुनि नमन

तुझ्या फोटोचे घेतले चुंबन.!!

*

आला योग पुन्हा कधी जरी

येईल माघारी तुझ्याच उदरी.!!

*

अपूर्ण सेवा पूर्ण करेल मी

वार्धक्यात काठी होईल मी.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

हे साले मित्र सगळे असेच असतात… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हे साले मित्र सगळे असेच असतात,

चिडवून

सतावून

जीव 

नकोसा करतात,

तरीही नेहमी

हवेसेच

वाटतात….

 

लग्नापूर्वी प्रेयसीला पाहून

‘आयटम सही है’

म्हणून

चिडवतात,

लग्नानंतर

तिलाच

आदराने

‘वहिनी’

अशी हाक मारतात.

हे साले मित्र सगळे असेच असतात….

 

जेवताना एकमेकांच्या डब्यांवर

सगळ्यांचीच

नजर असते,

खास पदार्थ

सर्वांना पुरेल ,

याची मात्र

खात्री नसते.

पण…

एखाद्या दिवशी डबा नाही आणला,

तरी आपलंच ताट

इतरांपेक्षा जास्त भरतं .

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

नाक्यावरती गप्पा मारताना..

तीन में पाँच –

बिस्किट & चहाची अशी ऑर्डर सुटते,

बिल भरण्याची वेळ

आली की सर्वांचीच

पांगापांग

होते.

 

मात्र

अचानक

कधी बाबांना admit करावे

लागते,

“आहोत आम्ही पाठीशी,” म्हणत

advance

नकळत भरला जातो.

हे साले मित्र सगळे असेच असतात…

 

अवचित

एखादा प्रसंग ओढवला तर,

सख्खे

नातेवाईकही

पाठ

फिरवतात,

अशावेळी,

छळणारे हेच

मित्र

पाठीशी भक्कमपणे उभे राहतात,

रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते

श्रेष्ठ ठरवितात.

हे साले मित्र सगळे असेच असतात!

चिडवून

सतावून जीव

नकोसा करतात.

तरीही नेहमी हवेसेच

वाटतात…..

 

जी गोष्ट

आई वडिलांना

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

शिक्षकांना

माहीत नसते

ती मित्राला

 माहीत असते..

 

जी गोष्ट

 गर्ल फ्रेंडला

माहीत नसते

ती मित्राला

माहीत असते..

 

जी गोष्ट

बायकोला

माहीत नसते,

ती मित्राला

माहीत असते..

 

आई-वडिलांचं,

 एवढंच काय पण बायकोचंसुद्धा

 उष्टं खाताना

कधी कधी मन संकोच करतं

पण मित्राचं उष्टं मात्र बिनधास्त चालतं …

 

मित्रांवर जळलो असेल मनातून.

खरं आहे,

पण …

 

माझ्या पिंडीला

 कावळा कसा शिवेल,

 हे फक्त

मित्रालाच

 माहीत असतं.

 

 

शेवटी कोणी रडलं नाही तरी मित्र मात्र जिथे असेल तिथे

डोळ्यात पाणी काढेल,

 हे नक्की.

कवी :अज्ञात

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈



मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सप्तरंग इंद्रधनुचे ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

सप्तरंग इंद्रधनुचे ☆ सौ.मंजिरी येडूरकर

आई सांगे,

इंद्रधनूच्या कमानीवरूनी गवसते स्वर्गाचे दार

कशास हवे जर, इथेच आहे, सौंदर्य अपरंपार

*

चला पाहू या ,सातरंगांची किमया ही मजेदार

तांबडा रंग आकाश धरेच्या मीलनाचा साक्षीदार

*

नारिंगी तर निसर्गाच्या अचाट शक्तीची धार

पिवळा भंडारा भक्तीचा अन् आरोग्याचा मूलाधार

*

हिरवाईने नटली धरणी, देते समृद्धीचा हात उदार

निळा दावी अथांगता, सात्विकतेचा शिल्पकार

*

पारवा न्यायाचा, निष्ठेचा, नि रूढी, परंपरांचा तारणहार

जांभळा सळसळणाऱ्या रक्ताचा, कणखरतेचा दावेदार

*

सात रंगांच्या एकरूपतेने होतो, धवलतेचा साक्षात्कार

जसे,त्रिगुणाच्या प्रभावाने बनतो, निर्गुण,निराकार!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाहूल पावसाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ चाहूल पावसाची☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

मळभ दाटले आभाळी ,

   जसे ओथंबलेले मन!

कधी कोसळेल भूवरी,

   होईल पाण्याचे सिंचन!…१

*

उन्हाने झाली भुईची काहिली,

 सूर्य देवाने आग ओकली!

 वारीयाने रोष केला,

 अन् सारी सृष्टी होरपळली!…२

*

 होऊ दे विजेचा कडकडाट ,

  होऊ दे  नभी घनदाटी!

  ‌‌  वाटते येऊ दे पृथ्वीवर,

  धो धो  पावसाची वृष्टी !…३

*

 तन मन हे शांतवेल!

  पावसाची सर ती येता!

 भिजून घेईल मनसोक्त,

    ही अवघी सृष्टी माता !….४

*

 नूर पालटेल तिचा ,

  अंगोपांगी येईल झळाळी!

 एक पावसाची सर ,

   तिला देईल नव्हाळी !

   तिला  देईल नव्हाळी!….५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “सृष्टीची गुढी…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “सृष्टीची गुढी– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

गुढी उभारून  सृष्टीनेही

काल साजरा केला पाडवा

नैसर्गिक या गुढीमधे

वेगळाच भासते गोडवा ।। 

*

सायंपुजा करून कधी

ही गुढी उतरणार नाही

नवे  वर्ष  पुढे सरकता

गुढी आपसूक उंच होई ।।

*

फुले पाने  वेळू पूजन

निसर्गाचा वाढवी मान

हिंदू धर्म रितीरिवाजात

पंचमहाभूतांचा सन्मान ।।

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “वळीव —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

 

☆ “वळीव —” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

घन घनदाट की दाटे मळभची

धरित्रीच्या जे आर्त मनातील

वणवा वैशाखी जाळतसे

जाळे किंवा ग्रीष्म मनातील….

*

काहूर माजे मनात त्याला

एकलीच मी कशी शांतवू

तहानले मन पावसास त्या

त्याला परि कैसे बोलावू ?….

*

आले जणू पाडाला ढग हे

सुचवून जाई रेघ विजेची

घेऊन या हो कुणी आता ती

मस्त धुंद सय मृद् गंधाची….

*

सोसेना मुळी ताण आता हा

घन हे तांडव नाचू लागले

बघता बघता बेबंदपणे

आर्तताच नी बरसू लागले….

*

वाहून गेले मळभही सारे

झंकारे अन् तार तृप्तीची

मनमोरांना नवे पिसारे

टपटपतांना सर वळवाची……

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “गजलेची गजल…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “गजलेची गजल” ☆ श्री सुनील देशपांडे

 उला नि सानी मिसरा यांना घेऊन आली होती, मज गजल चावली होती‌.

रदिफ, काफिया यांना बिलगुन सुंदर हसली होती, मज गजल चावली होती.

*

सुंदर सुंदर शब्दांचा तो मतला माथ्यावरती घेऊन चालली होती,

शेर पांघरून अंगावर सामोरी आली होती, मज गजल चावली होती.

*

शब्दरूप ती फुले सुगंधित उधळित आली होती मन मोहुन टाकत होती,

तालावरती मनमोहक ती ठुमकत आली होती, मज गजल चावली होती.

*

धुंद धुंद बेभान होऊनी शुद्ध हरपली होती, तिज ‘बहर’ली पाहिली होती,

शुद्धीवरती आलो तेव्हा मनात भरली होती, मज गजल चावली होती.

*

हळुच सारुनी बुरखा मी तिज नीट पाहिली होती, जी कोण चावली होती,

सुंदर बुरखा ल्यालेली अति सुंदर कविता होती, मज गजल चावली होती.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 218 ☆ श्री स्वामी समर्थ… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆




मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुन्हा नव्याने… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ‘पुन्हा नव्याने…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

(वृत्त ~अनलज्वाला ८+८+८ मात्रा)

वेलीवरचे फूल अचानक गळून पडले

तसेच काही जीवनातही माझ्या घडले

*

ग्रहण लागले अकस्मात का आनंदाला

काळाने का हिरावले मम प्राणसख्याला

*

हताश वाटे उजाड झाले भरकटले मन

काय करावे सुचतच नव्हते कंपित हे तन

*

अंगणातल्या ताटव्यावरी नजर रोखली

गुलाबपुष्पे उमलत होती धरा बहरली

*

निघून गेला शिशीर आता वसंत आला

पुन्हा नव्याने सृष्टीला या बहार आला

*

जीवन सुंदर ध्यानी धरुनी उठले मी तर

शोक कोंडला अंतर्यामी जगायचे जर

*

मैत्री केली ताल स्वरांशी धुंद जाहले

नादब्रम्ही पूर्ण रंगले पुन्हा बहरले

*

नियतीचे हे विविध रंग मी असे पाहिले

दूर सारुनी दुःखाला या उभी राहिले

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈