सूचना/Information
(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)
श्री अशोक श्रीपाद भांबुरे
💐 अ भि नं द न 💐
ललित कला फाऊंडेशन ठाणे. आयोजित साहित्य पुरस्कार सोहळा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी के. आ. बांठीया विद्यालय सिडको सेक्टर १८ नवीन पनवेल येथे संपन्न झाला. रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी, ज्येष्ठ साहित्यिक माननीय अशोक श्रीपाद भांबुरे यांना त्यांच्या प्रदीर्घ साहित्यिक सेवेच्या सन्मानार्थ, ललित कला साहित्य पुष्प पुरस्कार, मा. ए. के. शेख व मा. तुकाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
ई अभिव्यक्ती परिवारातर्फे श्री अशोक श्रीपाद भांबुरे यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.! .💐
आज त्यांची कविता “फसली आशा” प्रकाशित करीत आहोत.
संपादक मंडळ
ई अभिव्यक्ती मराठी
☆ ☆ ☆ ☆ ☆
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 283
☆ फसली आशा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
आज जीवनी उरली नाही कसली आशा
वाट पाहुनी किती उशीरा निजली आशा
*
तिला वाटले उद्या सुखाचा दिसेल तारा
दिव्यत्वाचे स्वप्न पाहुनी चुकली आशा
*
बरेच काही बोलायाचे होते बाकी
कुठे बोलली मुकाट होती बसली आशा
*
बोली होती तिची लागली या बाजारी
अर्ध्या किमती मधेच गेली विकली आशा
*
हिरवी झाली कधीच नाही शेतीवाडी
सुकून गेले स्वप्न बावरे सुकली आशा
*
मृगजळ दिसले धावत गेली त्याच्या मागे
आभासाच्या जलाशयाला फसली आशा
*
तारुण्याचा बहर तसा तर शिल्लक होता
तारुण्यातच अशी कशी ही खचली आशा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈