मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ “दीपावली” लेखक :श्री अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

दसरा संपला होता. दीपावली जवळ आली होती. तेवढ्यात एके दिवशी काही तरुण-तरुणींचा NGO छाप कंपू आमच्या महाविद्यालयात  शिरला.

त्यांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; परंतु त्यांच्या एका प्रश्नावर सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. अवघ्या कॉलेजमध्ये शांतता पसरली!

त्यांनी विचारलं, “जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी  ‘लक्ष्मी पूजन’ का केलं जातं ? श्रीरामाची पूजा का नाही केली जात?”

या प्रश्नावर कॉलेजमध्ये अचानक शांतता पसरली. कारण त्या काळामध्ये न कुठला सोशल मीडिया उपलब्ध होता, न कुठले स्मार्टफोन्स उपलब्ध होते! कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! तेवढ्यात, शांततेचा भंग करत आमच्याच विद्यार्थ्यांमधील एक हात या प्रश्नाचं उत्तर द्यायला वर झाला!

त्याला बोलायला सांगितल्यावर त्या विद्यार्थ्यानं उत्तर दिलं, “दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजेच ‘सत्ययुग’ आणि ‘त्रेतायुग’ यांच्याशी जोडलेला आहे!

सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती! म्हणून ‘लक्ष्मी पूजन’ केलं जातं!

भगवान श्री रामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्येला परतले होते! त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं! म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे!

म्हणूनच या पर्वाची दोन  नावे आहेत, ‘लक्ष्मी पूजन’ हे सत्ययुगाशी संबंधित आहे, आणि दुसरं “दीपावली” हे त्रेता युगातील प्रभु श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे!

हे उत्तर मिळाल्यानंतर थोडावेळ पुन्हा सगळीकडे शांतता पसरली, कारण कुणालाच या उत्तराला खोडून काढता येत नव्हतं! अगदी आम्हाला हा प्रश्न विचारणाऱ्या त्या तरुण-तरुणीच्या चमूलादेखील यावर काय बोलावं हे कळेना!

आणि मग आम्हा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला!

एका वृत्तपत्राने माझी मुलाखत देखील घेतली!

त्या काळामध्ये वृत्तपत्रांमध्ये मुलाखत द्यायला मिळणं हेच मोठं अप्रूप होतं!

पुढे कित्येक वर्षानंतर समजलं की तो जो तरुण तरुणींचा कंपू आमच्या कॉलेजमध्ये प्रश्न विचारायला आला होता तो, ज्यांना आजच्या आधुनिक शब्दावलीत  “लिबरर्ल्स” (वामपंथी) म्हटलं जातं,त्यांनी पाठवलेला होता. ही वामपंथियांची चमू प्रत्येक कॉलेजात जाऊन कॉलेज तरुणांच्या डोक्यात ही गोष्ट भरवत असे की “जर दीपावली ही श्रीरामाशी संबंधित आहे तर मग दीपावलीच्या सणात ‘लक्ष्मीपूजना’चं औचित्य काय आहे?” एकूणच ही वामपंथी चमू विद्यार्थ्यांचं ब्रेनवॉश करीत होती !

परंतु आमचं उत्तर मिळाल्यानंतर ती चमू गायबच झाली!

एक आणखीन प्रश्न विचारण्यात आला होता आणि आजही विचारण्यात येऊ शकतो. तो म्हणजे लक्ष्मी आणि श्री गणपती यांचं आपसात काय नातं आहे ? आणि दीपावली मध्ये या दोघांचं पूजन का केलं जातं?

याचं खरं उत्तर पुढीलप्रमाणे :

लक्ष्मी जेव्हा सागरमंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी बनली! तेव्हा माता लक्ष्मीने धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धनाच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं.

कुबेराची वृत्ती कंजूषपणाची होती. तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण तेवढं करू लागला!

इकडे माता लक्ष्मी त्रासून गेली! तिच्या भक्तांना लक्ष्मीचं धन प्राप्त होत नव्हतं. धनाच्या रूपानं त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा होत नव्हती!

लक्ष्मीनं आपलं गाऱ्हाणं भगवान श्री विष्णूंसमोर मांडलं! भगवान विष्णु लक्ष्मीला म्हणाले, “तू कुबेराच्या जागी रक्षक म्हणून दुसऱ्या कुणाचीतरी नेमणूक कर!”

लक्ष्मी म्हणाली, “यक्षराज कुबेर माझा परम भक्त आहे! त्याला वाईट वाटेल!”

तेव्हा भगवान विष्णुंनी लक्ष्मीला सांगितलं तू श्री गणपतीच्या दीर्घ आणि विशाल बुद्धीचा त्यासाठी वापर कर!

मग लक्ष्मीनं श्री गणपतीला सांगितलं की “कुबेर धनभांडारातील धनाच्या रक्षणाचं कार्य करील आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम करावंस!”

श्री गणपती तर महा बुद्धिमान! तो म्हणाला, “देवी, मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर! त्यासाठी तू मला विरोध करायचा नाहीस!”

लक्ष्मीनं गणपतीची ही मागणी मान्य केली!

तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न / अडचणी यांचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभंडाराचे दार उघडू लागले! कुबेराकडे केवळ धन-भंडारावर पहारा करण्याचंच काम शिल्लक राहिलं.

गणपतीची उदार बुद्धी बघून, लक्ष्मीनं आपला मानसपुत्र असलेला गणेश याला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपला पती श्री विष्णू यांचेसोबत नसेल तेव्हा पुत्रवत असलेला श्री गणेश तिच्या सोबत असेल!

दीपावलीत लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला! भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात! या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून जागे होतात!

लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं. आणि या काळात श्रीविष्णू सोबत नसल्यानं ती गणेशाला आपल्या सोबत घेऊन येते. म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी-गणेश यांची पूजा केली जाते!

(पहा कसा विरोधाभास आहे की या देशातला आणि हिंदूंचा सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळी ह्या सणाबद्दल पाठ्यपुस्तकात कुठलीही विस्तृत माहिती आढळून येत नाही आणि जी काही माहिती आहे तीही अत्यंत त्रोटक स्वरूपात आहे!)

व्हाट्स ॲप साभार –

लेखक : श्री.अप्पा पाध्ये गोळवलकर

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ पावसाचे स्वरविश्व ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? क्षण सृजनाचे ?

💦 भाऊबीज 💦 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

    कुठे गेला अवचित

   भाऊ राया दूरवर…

    राहिली ना भाऊबीज

   असे मनी हुरहुर…|

 

     कसे आता सांगू कुणा

  दुःख मनातले माझ्या…

    विस्कटल्या वाटा साऱ्या

   माहेरच्या तुझ्याविना…|

 

    परतीच्या तुझ्या वाटा

     अशा – कशा हरवल्या….

     आशेच्या साऱ्याच लाटा

      विरुनिया आता गेल्या…|

 

     नको जाऊ विसरून

     बहिण -भावाचे नाते….

      तुझे – माझे बालपण

       अजूनही खुणावते…|

– शुभदा भास्कर कुलकर्णी

माझा पाठचा भाऊ शशिधर माझ्यापेक्षा आठवर्षाने लहान असल्याने त्याला लहानपणी सांभाळून घेणं ही मला माझी जबाबदारी वाटायची. आम्ही मोठे होत गेलो तसा तो माझा मित्र, खेळातला सवंगडी होत गेला. आम्हा दोघांच नात दृढ, घट्ट होत गेलं. माझ्या लग्नानंतर, त्याच्याही लग्नानंतर आमच नातं थोडही सैल झालं नाही. आमची सुख-दु:ख आम्ही वाटून घेतली. आधार दिला. मी त्यावेळी भाऊबीजेला इथे नव्हते. दुसरे दिवशी येणार,असल्याने  सर्व भावंडानी माझ्याकडे नंतर भाऊबीज करायची ठरले. पण… शशीच्या अचानक जाण्याने मनं सुन्न, बधिरस झालं. भाऊबीज राहून गेल्याची हुरहूर आजही आहे. ते माझं दु:ख मी त्यावेळी नकळत कागदावर मोकळ करायचा प्रयत्न केला. अन् थोडं हलकं वाटलं. आज भाऊबीज, माझ्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचल्या असतील का?.. 😢

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ आठवणीतला क्षण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

तो फेब्रुवारी महिना होता. बाहेर उन मी मी म्हणत होते. आम्ही गावी चाललो होतो. अन्शीच्या घाटातून गाडी वळणे घेत जात होती. शिशिराचे आगमण झाल्यामुळे पानगळ चालू होती. झाडांची पाने गळून झाडे नुसत्याच फांद्याबरोबर झुलत होती. येरवी गर्दहिरव्या घनदाट झाडीतून न दिसणारी घरे तुरळक दिसत होती. भोवताली गर्द झाडी आणि कुठेतरी ओहळातून शेतीसाठी तयार केलेले वाफे नजरेस पडत होते.  पहावे तिकडे घनदाट जंगल ,उंच डोंगर ,  कुठेतरी उतारावर दिसणारे चार घरांचे खेडे. उदरनिर्वाहासाठी केलेली भातशेतीची छोटी छोटी

वाफाडी .मुख्य रस्त्यावरून आत जंगलात  पायवाट जाताना दिसली की, लक्षात येते तिथे लोकवस्ती असेल. मनात विचार आला इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेऊन कसे रहात असतील इथले लोक ?

गायींचे कळप रस्त्याच्या कडेने धुळ हुंगताना दिसत होते. त्यांच्या मागे कुणी राखणदार दिसत नव्हता.घनदाट झाडीतून पाखरांचे विविध आवाज कानावर पडत होते. आमची गाडी घाटातून वर आली तेंव्हा रस्त्याच्या कडेला एक चौदा-पंधरा वर्षाची मुलगी हातात रानफुलांचा हार घेऊन उभी दिसली.आम्ही गाडी थांबवताच तिचा चेहरा आनंदानी खुलला .तीने गाडी जवळ येऊन हातातील हार घेण्यास आम्हाला विनवू लागली. इतक्या रखरख उन्हात ती हार विकण्यास उभी होती. मला तिचे कौतुक वाटले. म्हणावे असे चांगले कपडे अंगावर नव्हतेच. तिच्या कपड्यावरून तिची गरिबी जाणवत होती.

हार पुढे करून ती आम्हाला विनवू लागली,” दहा रूपयाला हाय!घ्या यकच राहिलाया “.

मी तिला विचारले ,” इथे घर तर दिसत नाही. तू कुठे रहातेस?”.

तिने झाडीतून दुर बोट दाखवत एक घर दाखविले आणि स्मितहास्य करत म्हणाली  “तिथं “.

नंतर मी विचारले, “हा हार कुणी गुंफला “.

तीने लगेच सांगितले  ,मी फुलं आणून दिली. आणि आजीनं हार बनवला. मी शाळेत जायाच्या आधी फुलं आणून ठेवती.आजी हार बनवून देती . शाळेतनं आल्यावर रोजच मी हार इकायला इथं उभी रहाती .आईला तेवढीच मदत ह्युती खर्चाला “

ती मोठ्या धैर्याने बोलत होती. ती पुन्हा कविलवाणी होऊन आम्हाला आम्हाला हार घेण्यास विनवू लागली.मी तिला विस रूपये देवून  तिच्या कडून हार घेतला.  लगेच ती दहा रूपये परत करू लागते मी म्हटले  “राहुंदे ठेव तूला”.

पैसे पाहून तिचा चेहरा आनंदात उजळतो. ती खूप आनंदी होते.

आम्ही पुढे निघून गेलो. पण त्या मुलीचा गोड, आनंदी चेहरा कितीतरी वेळ नजरेत रेंगाळत राहिला. लोक रोज हजारानी पैसे कमावतात पण समाधानी नसतात. तो हार विकून विस रूपये मिळताच तिचा चेहरा आनंदानी फुलून गेला.  उन्हातान्हाचे ,घनदाट जंगलातून गेलेल्या रस्त्यावर हार विकून मिळालेल्या दहा-विस रूपयांचे पण केवढे  ते समाधान ! केवढा आनंद! .आपण किती पैसे कमावले तरी आपला हव्यास संपत नाही. त्या निरागस , गरीब ,  कोवळ्या वयातील  मुलीला आपली आजची गरज भागली या कल्पनेनेच किती आनंद झाला.  खरा आनंद हाच असेल का ?आपल्या मुलांना आपण किती  खाऊ   महागाची खेळणी आणून दिले , तरीपण त्यांच्या मागण्या बंद होत नाहीत . वाढत्या वयासोबत त्यांच्या मागण्या सुध्दा वाढत जातात. पण प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले दहा-विस रूपये पण किती आनंद देतात हे त्या मूलीकडे पाहून कळले.

आम्ही घरी पोहचेपर्यंत तो  रान फुलांचा हार सुकून गेला . पण त्या मुलीच्या चेहर्‍यावरचा आनंद तसाच ताजाटवटवीत राहून कितीतरी दिवस मनात रेंगाळत

राहीला आणि त्या रानफुलांचा गंध मनाला सुखावत राहिला.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ असेही एक देवीपूजन… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

ऑक्टोबर महिना…. ! अर्थात भाद्रपद अश्विन…,,!! 

या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली…. ! 

तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते…. ! 

आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी…. ! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता…. !!!  

यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा…. असं नाही…. ! 

या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तिची पुजा…. !!! 

आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तिच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तिच्यापुढे  जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे ही त्या आईची पूजा….! 

काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं… ही त्या आजीची पूजा… ! 

येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे…. ! मी कशासाठी आहे… ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा…. !!

अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू….  तिथं आभाळात जाऊन झेप घे…  तिथं काय अडचण आली तर मला हाक मार… मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा…. !!!

आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत… पण अक्षरशः आम्ही “नव रात्री” जगलो…. ! 

पहिला दिवा –  

अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्याकडेला पडलेल्या “निराधार” आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं… … यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत…. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही….! 

बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ? 

आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ?? 

…. असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत… खत पाणी घालत आहोत….

…. आम्हाला फळं नकोच आहेत. एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे….! 

दुसरा दिवा –

फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या… एक? दोन ?? तीन??? नाही… तब्बल १३४१ …!!! 

पूर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनींनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून…  पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत. 

या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल… त्यांचे समाजात कौतुक होईल आणि भीक मागणाऱ्या इतर माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे.

या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे …. ज्यांच्या दहा फुटावर सुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले…

… कुठुन येतं हे…? कसं येतं…?? आणि का ??? काय मिळत असेल यांना…????

या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले…! 

तिसरा दिवा –

भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या “कुमारिकांचे” या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता. 

सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती…!

आम्ही या सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य देऊन सरस्वती पूजन केले.

संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले. 

…… मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो…! 

आई आणि बापाला अजून काय हवं ? 

माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले…. आणि काय सांगू राव…. हे “ड्राय” फ्रूट अश्रुंनी “ओले” होवून गेले… !!! 

चौथा दिवा –

ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले… ! 

गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत…!!! 

घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत. 

हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत, आणि आमच्यासाठी त्यादिवशीच विजयादशमी होती!!! 

— क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे ☆

श्री सतीश खाडे

 

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ “चौदा लांडग्यांनी केली नदी जिवंत…” ☆ श्री सतीश खाडे

अमेरिकेतील येलो स्टोन नॅशनल पार्कमधली ही नदी गेल्या शंभर वर्षांत हळूहळू आटत गेली आणि आता ती फक्त पावसाळ्यातच वाहू लागली. पावसाळ्यानंतर अल्पावधीतच नदी कोरडी पडू लागली. भरपूर पाऊस पडूनही ती फक्त पावसाळ्यात वाहत होती. शतकभरापूर्वी ती बारमाही वाहत होती.

बऱ्याच अभ्यासानंतर बारमाही वाहणारी ही नदी आटण्याची कारणे आणि तिला पुन्हा वाहते करण्यासाठीच्या उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा झाल्या. त्यातून नदी आटण्याचा संबंध लांडग्यांशी आहे आणि लांडग्यांचा संबंध माणसांशी असल्याचे लक्षात आले.

येलो स्टोन नॅशनल पार्क हे अमेरिकेतील पश्‍चिम युनायटेड स्टेटमधील वायव्य कोपऱ्यात विस्तारलेले एक राष्ट्रीय उद्यान आहे. हे अमेरिकाच नव्हे, तर जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून मानले जाते. तेथील वन्यजीव आणि अनेक भूऔष्णिक वैशिष्ट्यांसाठी हे उद्यान ओळखले जाते. गेल्या शतकाअखेर म्हणजे सन १९०० पर्यंत या जंगलातील लांडगे तेथील स्थानिक लोकांनी शिकार करून संपवले होते.

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क नदी आटली होती. पण तुम्ही म्हणाल ‘हे कसं शक्य आहे?’ तर हे रहस्य पुढे उलगडत जाईल…. 

…अन् नदी जीवंत झाली. 

ही नदी बारमाही वाहती करण्यासाठी पर्यावरण अभ्यासकांच्या सूचनेनुसार १९९५ मध्ये येलो स्टोन पार्कच्या जंगलात फक्त १४ लांडगे आणून सोडण्यात आले. आणि पुढच्या पंचवीस वर्षांत परिस्थिती हळूहळू चमत्कार व्हावा तशी बदलत गेली. २०१९ मध्ये नदी केवळ वाहू लागली नाही तर असंख्य जीव तिच्या आश्रयाला देखील आले. तिथे एक समृद्ध जैवविविधतेचा मोठा खजिनाच तयार झाला.

…. तर त्याचं झालं असं, की लांडग्यांची शिकार झाल्यामुळे जंगलातील हरणांची संख्या हळूहळू वाढत गेली. अनेक वर्षे जंगलात हरणांचेच राज्य होते. हरणांना कुणीही भक्षक नसल्याने वर्षानुवर्षे त्यांची संख्या बेसुमार वाढत होती. याच हरणांनी नदीच्या पाणलोट क्षेत्रातील झाडे, गवत फस्त करण्याचेच काम केले होते.

गवताबरोबरच जंगली झाडे, त्यांना आलेली कोवळी पाने खाण्याचा सपाटाच लावला होता. थोडे थोडे करून पाणलोटातील सगळं जंगल त्यांनी बोडखं केलं होतं आणि हेच नदी आटण्याचं कारण होतं. कारण झाडे व गवत नसल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत व पुढे खडकात मुरण्याचे प्रमाण जवळपास शून्यच झाले होते.

पुढे अभ्यासकांच्या सूचनेनुसार जंगलात लांडगे सोडल्यानंतर त्यांनी हरणांची शिकार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे हरणांची संख्या फार कमी झाली नाही. परंतु या लांडग्यांना घाबरून हरणे जंगलाच्या काही मर्यादित भागात राहू लागली. हळूहळू लांडग्यांच्या शिकारीमुळे आणि भीतीमुळे हरणांची पैदासही कमी होऊ लागली.

जंगलातील ठराविक मर्यादित परिसरात हरणे राहू लागल्याने त्यांचं इतरत्र भागातील गवत आणि झाडं खाणं थांबलं. त्यामुळे हरणे राहत असलेला जंगलाचा भाग सोडून उर्वरित जंगलातील गवताची आणि झाडांची वाढ व्यवस्थित सुरू झाली. अगदी सहा-सात वर्षांतच जंगल उत्तम फोफावलं. जंगलामुळे आणि गवतामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. मातीची धूपही थांबली. धूप थांबल्यामुळे नदीत गाळ येण्याचे प्रमाण कमी झाले.

मुरलेल्या पाण्याने जमिनीखालचे खडक पाण्याने भरू लागले. पावसाळ्यानंतर याच खडकातले पाणी ओसंडून झऱ्याद्वारे नदीत येऊ लागले. हळूहळू चार महिन्यांवरून सहा महिने नदी वाहू लागली. पुढे हळूहळू सहा महिन्यांवरून आठ महिने आणि नंतर बारमाही वाहू लागली. नदी खळखळू लागली… आता नदीच्या काठावरच्या वाढलेल्या झाडांमुळे काठांची झीज अन् पडझडही थांबली.

अन्नसाखळीचे महत्त्व…

आता जंगलातील वाढलेल्या गवतात विविध किडे आले. त्यांना खाण्यासाठी बेडूक, सरडे आले. त्यांना खाण्यासाठी साप आणि इतर सरपटणारे प्राणी आले. सरडे अन् सापांमुळे शिकारी पक्षीदेखील येण्यास सुरुवात झाली. अगदी सुवर्ण गरुडही तेथे आला. जंगलात फळे आणि गवतात किडे भरपूर प्रमाणात मिळू लागल्यामुळे स्थलांतरित पक्षीदेखील येऊ लागले. हजारो पक्षी इथे एकेका ऋतूत येऊन राहू लागले.

या सर्व पक्ष्यांनी त्यांच्या विष्ठेतून बिया टाकल्या आणि त्याची झाडं उगवली. या झाडांचे मोठे वृक्ष होण्याकडे वाटचाल सुरू झाली. नदीत शेवाळ आले, कायम पाणी असल्याने सूक्ष्मजीव आले, त्यांना खाणाऱ्या कीटकांच्या प्रजाती आल्या. हळूहळू मासे आले. मासे आल्यामुळे मुंगसासारखा बिवरेज वा पाणमांजरासारखे सस्तन प्राणी आले.

हे प्राणी मासे पकडण्यासाठी नदीत लाकडं, फांद्या टाकून बांध करू लागली. त्यांनी केलेल्या या सापळ्यांमध्ये मासे अडकून त्यांना मेजवानी मिळू लागली. अशातही अनुकूल परिस्थिती असल्याने नदीत माशांची पैदास वाढतच गेली. त्यामुळे बदकं आली, हेरॉन, बगळ्यांसारखे पक्षी आले. जंगलात बेरीची झाडं आणि माशांची संख्या वाढल्याने अस्वलेदेखील आली. बेरीची फळे आणि नदीतील मासे म्हणजे अस्वलांचं आवडतं खाद्य.

तिथे असलेल्या क्वायटीज या लांडग्यासारख्या दिसणाऱ्या रानकुत्र्यांना लांडग्यांनी मारलं. त्यामुळे या रानकुत्र्यांचे भक्ष्य असलेले ससे आणि चिचुंदऱ्या यांची संख्या वाढत गेली. त्यांची संख्या वाढल्यामुळे तिथे गरुड, बहिरी ससाण्यासारखे पक्षी आले. तसेच लांडग्यांनी खाऊन शिल्लक राहिलेल्या मांसावर ताव मारायला गिधाड वर्गातील आणि मांस खाणारे पक्षी आले. हे झाले फक्त मोठे ठळक दिसणारे प्राणी.

याशिवाय इतरही बऱ्याच वनस्पती अन् प्राणी सृष्टी पुनर्प्रस्थापित झाली. झाडं, गवतं, नदी आणि सर्व प्रकारचे जंगलातले प्राणी यांची एक समृद्ध अन्नसाखळी तयार झाली. ती केवळ चौदा लांडग्यांमुळेच. हीच तर खरी गंमत आहे. म्हणजेच अन्न साखळीतील एक दुवा तुटल्यावर अगदी नदीसुद्धा आटू शकते. हे या लांडग्यांच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल.

ही गंमत जैवविविधता, निसर्ग आणि पाणी या सगळ्यांचा संबंध किती दृढ आहे हे सांगणारी सत्यकथा आहे. नदीमुळे ही अन्नसाखळी की या अन्नसाखळीमुळे नदी, याचं उत्तर कोंबडी आधी की अंडे याच्या उत्तरासारखंच आहे, नाही का? निसर्गातल्या सगळ्यांच अन्नसाखळ्या अद्वैत म्हणता येतील अशाच आहेत. माणसाच्या बेफाम अन् बेफिकीर वागण्याने पाणी प्रदूषणासोबतच विविध जल स्रोतांतील पाणी आटले आहे.

यामुळे आपण अन्नसाखळीतील कोणकोणते दुवे नष्ट केलेत, किंबहुना अन्नसाखळीचे अनेक मनोरे (Food chain pyramid) नष्ट केलेत याची यादी मोठी आहे. यात आपल्याबरोबर सृष्टीचा नाश ही ओढवून घेतला जात आहे. त्यातून वाचायचे असेल तर जैवविविधता, अन्नसाखळ्या यांचे आकलन आवश्यकच आहे.

© श्री सतीश खाडे.

मो. 9823030218

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “जीभ…” – लेखक : श्री चंद्रकांत जोशी काका ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

जेणे जिंकीली रसना ।

तृप्त जयाची वासना ।

जयास नाही कामना ।

तो सत्वगुण ।

…समर्थ रामदास

ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ ! रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय ! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची ! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ.

एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ.

सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ ! तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.

प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ. भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ !

सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकून मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ !

बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ ! दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर.थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ ! काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव जीभ !

दाताशी युती करत तथदध, ओठाशी युती करत पफबभ, दंतमूलाशी युती करत चछजझ, टाळूशी युती करत टठडढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ !

पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डॉक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणु काही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!

ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ !

ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ !

आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यांनी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ !

तिला जर भगवंताच्या नामात अडकवले तर नराचा नारायण करण्याची ताकद असणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ.

उगाच नाही म्हटलंय, जेणे जिंकिली रसना……

त्याची जिरोनी गेली वासना….

लेखक :श्री.चंद्रकांत जोशी काका, ठाणे

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

श्री मेघःशाम सोनवणे

? विविधा ? 

☆ फटाक्यांमागील भयानक वास्तव लेखक – पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक ☆ प्रस्तुती – श्री मेघःशाम सोनवणे ☆

सातवीत असतांना मी फटाक्याचा उद्योग सुरू केला. एवढासा मुलगा आणि एकदम लिस्ट वगैरे बनवून ‘श्री इंडस्ट्रीज’ या नावाने एकदम प्रोफेशनल पध्दतीने फटाक्यांचा व्यवसाय करतोय म्हटल्यावर ओळखीच्या लोकांनी माझ्याकडून फटाके घेऊन मला या व्यवसायात घट्ट उभं केलं. आज या फेसबूकवरही हे जाणणारे व मला मदत करणारे उपस्थित आहेत. माझा वैयक्तिक पातळीवरील हा पहिला “उद्योग-व्यवसाय”. याच व्यवसायाने मला खरतंर उद्योजक बनवलं.

सन १९९२ ते सन २००४ असं एक तप मी हा व्यवसाय केला. फटाक्याच्या या व्यवसायात पहिल्या वर्षी मला १८९२/- रूपये निव्वळ फायदा व उरलेले फटाके असा भरपूर फायदा झाला होता. सन २००४ साली शेवटच्या वर्षी याच धंद्यात मी ९, २०, ०००/- रूपयांचा निव्वळ नफा कमावला होता. झटपट फायदा मिळवून देणारा हा सिझनल धंदा खुप भारी वाटायचा. घरातील आर्थिक परिस्थिती मजबूत असल्यामुळे या फायद्यातील एकही रूपया कधीही आईबाबांनी घेतला नाही. करतोय धंदा तर करू दे फक्त हा विचार त्यांचा असायचा. त्यामुळे फटाका व्यवसाय याबाबत सर्व अधिकार माझेच होते.

सुरवातीला डंकन रोड (मुंबई), उल्हासनगर व शहापूर (ठाणे जिल्हा) येथील होलसेल दुकानातून फटाके घेता घेता सन २००४ सालापर्यंत मी फटाक्यांची पंढरी असलेल्या शिवकाशीहून (तामिळनाडू राज्य) थेट आयात करू लागलो होतो. वय वर्षे बारा ते वय वर्षे चोवीस या बारा वर्षात या धंद्यात इतकी भलीमोठी प्रगती झाली होती. असे असतानाही मी सन २००४ साली हा धंदा कायमस्वरूपी बंद केला.

गल्ली ते थेट तामिळनाडू राज्य असा प्रवास करत असताना व इतका फायदेशीर धंदा बंद करण्यामागचं कारण काय असावं?? काय घडलं असेल असं?? सर्वांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे.

फटाका इंडस्ट्री – दक्षिणेत गृह उद्योग ते मोठ्या कार्पोरेट लेव्हलवर फटाक्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालू आहे. आपल्याकडे जसे स्त्रिया दोन पैसे मिळवण्यासाठी पापड लाटतात त्याच धर्तीवर तिथे फटाके वळले जातात. आपल्या येथील स्त्रियांच्या सुदैवाने पापड व्यवसायात कोणताही ज्वालाग्रही – केमिकल वा विषारी धोका नाही. फटाक्यांच्या व्यवसायात नेमकं उलट आहे.

तांबे, कॅडीनियम, शिसे, मॅग्नेशियम, जस्त, सोडीयम, सल्फर असे सर्वच विषारी घटक या उद्योगातील संबधित व्यक्तीला उघड्या हातांनी हाताळावे लागतात. त्याचे फार मोठे दुष्परिणाम होतात.

सगळ्यात भयानक बाब म्हणजे या उद्योगात ‘चाईल्ड ट्रॅफिकींग’ या गुन्हेगारी पध्दतीने देशभरातून लहान मुलं पळवून आणून जुंपली जातात. त्यांच्यावर काम करण्यासाठी अनन्वीत अत्याचार केले जातात. बहुतांश वेळा यातील मुली मोठ्या झाल्या की त्यांना वेश्याव्यवसायात विकले जाते. एकूणच फार मोठ्या प्रमाणावर चिमुकल्या जीवांचे आयुष्य बरबाद केले जाते.

हे झालं एक कारण..

दुसरं कारण म्हणजे या आधीच ज्वलनशील असलेल्या उद्योगाला मानवी हयगयीने व नैसर्गिक उष्णतेमुळे वारंवार लागत असलेल्या आगी व त्यात होरपळून मरणारे आपलेच निष्पाप बांधव.. कोणत्याही प्रकारची ॲन्टी फायर सिस्टम संबधित उद्योगात वापरली जात नाही. मोठे उद्योग केवळ शो म्हणून व कायद्यास दाखविण्यासाठी फायर इक्विमेंट ठेवतात. एखादा उद्योजक वगळता सर्वत्र ही सत्य परिस्थिती आहे. दरवर्षी या फटाक्यांच्या कंपन्यांना लागलेल्या आगीत अनेक जीव जातात. . काही होरपळून निघतात.

हे झालं दृष्य.. अर्थात दिसणारं.. तर न दिसणारं म्हणजे वर उल्लेख केलेल्या विषारी धातू व केमिकल्स नी हजारोंना विविध भयंकर आजार जडले आहेत. दुर्दैवाने यात महिला व मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याची अधिकृत आकडेवारी कधीही उपलब्ध होत नाही. सगळा प्रकार सर्वसामान्य फटाक्यांचे समर्थन करणारा विचारही करू शकत नाही इतके भयानक आहे.

दोष समर्थन करणारे यांचा नाही कारण ही भयानक वस्तुस्थिती त्यांना ज्ञातच नाही. ज्या दिवशी ही बाब फटाके समर्थक प्रत्यक्षात पहातील, समजून घेतील त्या दिवशी ते फटाक्यांचे समर्थन बंद करतील हे निश्चित. कोणताही हिंदू कधीही मेलेल्याच्या वा मरणार्‍याच्या टाळूवरील लोणी गोड असतं असं म्हणू शकत नाही.

सन २००४ सालातील डिसेंबरात मी पुढील वर्षाची ऑर्डर देण्यासाठी शिवकाशीस गेलो होतो. तोपर्यंत पत्रकारीता करू लागल्याने दुनियादारी समजायला लागली होती. आतापर्यंत समोर असूनही न दिसणारे सामाजिक प्रश्न समोर दिसायला, कळायला लागले होते. शिवकाशीतल्या त्या चार दिवसांनी फटाका इंडस्ट्री च्या काळ्या बाजू बद्दल खुप काही दाखवलं – शिकवलं. सर्वच सहनशक्तीच्या पलिकडचं होतं.

“जे आपल्या मनाला पटत नाही ते कधीही करायचं नाही. . मग काय वाट्टेल ते होऊ दे” हे धोरण माझं पहिल्यापासून फिक्स आहे.

“कायद्याचं काय हो ठरवलं तर अनेक मार्ग कायदा न मोडता अगदी कायदेशीररित्या काढता येतात. ” पण करायचाच नाही हा प्रकार. . शक्यच नाही ते. . तर विचारच का करा??

हा सर्व फटाक्यांचा फाटका प्रकार पाहिल्यावर खरंतर ताबडतोब हा सर्व प्रकार बंद करावा असे वाटले. वय लहान होतं. तितकी समज नव्हती. काहीतरी करायला हवं याने भडकलो होतो. दोन चार लोकांना ‘हे बंद करा’ वगैरे उपदेश – धमकी – बिमकी देऊन अखेर ऑर्डर न देताच घरी परतलो.

घरी बाबांनी मला समजावल्यावर मग आपल्या पुरता मी निर्णय घेतला आणि फटाक्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद केला.

एकटा काय करू शकतो हा विचार न करता आपण वैयक्तिक दृष्ट्या खुप काही करू शकतो हेच खरं. तेच मी ही केलं.

जोवर सर्वंकष फटाक्यांच्या उत्पादनावर बंदी येत नाही तोवर हे असेच चालणार. दिवाळी हा आनंदाचा मोठा सण आहे हे निश्चित परंतु तो आनंद कोणाच्या जीवावर उठणारा नसावा इतकेच..

फटाकाबंदीला केवळ ध्वनी वा वायू प्रदूषण या बाबीवर नक्कीच समर्थन नाही. कारण असे प्रदूषण करणारे इतरही अनेक उद्योग व प्रकार आहेत. फटाकाबंदीच स्वागत आहे ते केवळ निष्पाप लहानमोठ्या जीवांच्या अकाली कोमजणार्‍या आयुष्यासाठी. . . . .

लेखक – श्री पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक

संग्राहक – मेघःशाम सोनवणे

मो 9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या प्रिय लेकरा – भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

☆ माझ्या प्रिय लेकरा — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

माझ्या प्रिय लेकरा,

(मुलांच्या मनाच्या तीन वेगवेगळ्या अवस्था असतील तर पालकांनी तिन्ही अवस्थेत एकच प्रतिक्रिया देऊन कसे चालेल?) – इथून पुढे..

बाहेरच्या निष्ठुर जगात आई-बापाप्रमाणे मुलांला समजून घेणारे वा समजावून सांगणारे फारसे कुणी नसते. मुलांच्या चुकांना बाह्य जगात केवळ शिक्षा मिळतात. अशा शिक्षेनंतर मायेने फुंकर घालायलाही कुणी नसते. या शिक्षांमध्ये मायेचा ओलावा नसल्याने मुलांच्या मनात त्या प्रसंगांविषयी कायमस्वरूपीची कटुता निर्माण होते. पण हेच वय सर्वात जास्त संस्कारक्षम असल्याने याच वयात चांगल्या वाईटाचे धडे दिले गेलेच पाहिजेत. समाजाकडून मुलांना रुक्षपणे जगण्याचे धडे शिकायला मिळण्याऐवजी आई-बापाने कठोरपणावर मायेचा मुलामा देऊन ते मुलांना शिकवावेत. त्यामुळे मुलांच्या मनात कटुता निर्माण होत नाही. कधी चांगल्या कामाचे बक्षिस देवून, कधी समजावून सांगून आणि वेळप्रसंगी शामच्या आईसारखी मायेच्या ओलाव्याने शिक्षा करावी लागते.

श्याम म्हणजे साने गुरुजी. त्यांना लहानपणी पाण्याची फार भीती वाटे. पोहणे शिकणे का गरजेचे आहे हे आईने श्यामला समजावून सांगितले. पोहायला जायचे ठरल्यावर ऐनवेळी श्याम लपून बसला. समजावून सांगूनही शाम पोहायला जात नाही म्हटल्यावर श्यामच्या आईने त्याला फोकाने बडवून काढले. श्यामला मारताना श्यामसोबत आईच्याही डोळ्यामधून पाणी वाहत होते. पुढे कधी चुकून लेकरू पाण्यात पडलं तर जीवाला मुकेल या धास्तीने तिने ते सर्व केले होते. तसेच पाण्याच्या भीतीने पोहायाला न शिकलेल्या आपल्या मुलाला समाजात कुणी भित्रा समजू नये म्हणून आईने अडून बसलेल्या श्यामला शिक्षा करून पोहायला धाडले. माराच्या भीतीने श्याम शेवटी पोहायला गेला. पोहून घरी आल्यावर पाठीवरील वळ दाखवत श्याम आईवर रुसून बसला. मुलाच्या पाठीवरील वळ पाहून आईच्या डोळ्यात पाणी आले. जेवत असलेली आई भरल्या ताटावरून उठली आणि हात धुवून त्याच्या पाठीवरील वळांना तेल लावू लागली. रडवेल्या स्वरात तिने श्यामला पोहण्याचे महत्व परत समजावून सांगितले. आपल्याला मारून स्वतः रडणा-या आईला पाहून श्यामलाही गहिवरून आले. आईचे आपल्याला मारणे हे आपल्या हिताचेच होते याची ठाम जाणीव श्यामला झाली. या प्रसंगामुळे श्यामच्या मनात कुणाविषयीही कटूता निर्माण झाली नाही. उलट या घटनेतून आईचे श्यामवर असलेले प्रेमच अधोरेखीत झाले. आई आणि श्यामचे नाते अजून घट्ट झाले. श्यामला शिक्षा झाली. पण श्यामच्या मनावर कटूपणाचा ओरखडाही ओढला गेला नाही. श्यामला आयुष्यभरासाठीचा एक धडा मिळाला. या घटनेला साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातील एक सकारात्मक घटना म्हणून लक्षात ठेवले. हे सर्व केवळ त्यांच्या आईच्या मायेमुळे शक्य झाले होते. आईच्या जागी बाहेरचे कोणी असते तर आपुलकीच्या आभावामुळे आणि भावनिक कोरडेपणामुळे हा प्रसंग साने गुरुजींच्या स्मृतीत दुःखदायक प्रसंग म्हणून नोंदला गेला असता.

पण अगदीच नाईलाज झाल्याशिवाय पालकांनी मुलांना शिक्षा करू नये. केवळ मुले कमजोर आहेत म्हणून त्यांना पालकांनी आपल्या आयुष्यातील फ्रस्ट्रेशन काढायची पंचींग बॕग करू नये. मुलांना शिक्षा केल्यावर पालकांना मुलांपेक्षा जास्त दुःख होत नसेल तर पालक त्या शिक्षेतून असुरी आनंद मिळवत आहेत असा अर्थ होतो. अशा पालकांना मानसिक समुपदेशनाची किंवा कदाचित मानसिक उपचारांची गरज आहे असे समजावे.

मुले पटकन मोठी होतात. मग ते ‘Teen’ या असुरक्षित वयात पोहचतात. आजवर अभ्यास, खेळ, कला इत्यादी क्षेत्रात त्यांनी काही ना काही यश मिळवलेले असते. आजवर केलेल्या कर्तुत्वाची एक ओळख मुलांच्या मनात निर्माण झालेली असते. मुलांच्या मनात स्वतःविषयीची प्रतिमा आकार घेत असते. मुलांच्या मनातील स्वतःच्या प्रतिमेच्या आकाराला अहं-आकार वा अहंकार असे म्हटले जाते. बारा-तेरा वर्षांपर्यंत मनात वेगवेगळे अहंकार तयार झालेले असतात. यशाच्या श्रेयावर पोसलेला अहंकार तसा मुलांसाठी आनंदाची जागा असतो. पण या अहंकाराचा एक प्रॉब्लेम असतो. अहंकारावर थोडीशी टीका झाली तरी अहंकार दुखावला जातो. एखाद्या चुकीसाठी बोल लागला वा  शिक्षा झाली तर त्या संदर्भातील अहंकार लगेच दुखावला जातो. अहंकार दुखावला की मनात राग उत्पन्न होतो. या त्रासदायक समस्येचे प्रामाणिक आत्मपरीक्षण केले तर स्वतःचा गाढवपणा स्वीकारावा लागतो. मग आत्मटीकेचे वाढीव दुःख पदरी पडते. आधीच अहंकार दुखावल्याने दुःखी झालेले मन हे नवीन दुःख स्वीकारायला तयार होत नाही. त्याऐवजी असे दुखावलेले मन अप्रामाणिकपणा स्विकारते आणि स्वतःच्या चुकांचे खापर जगावर फोडून मोकळे होते. त्याने मनाला तात्पुरता आराम मिळाला तरी अप्रामाणिक आत्मपरीक्षणामुळे समस्येची खरी  कारणे कधीही समोर येत नाहीत. त्यामुळे अशी समस्या कधीच सुटत नाही. अहंकारी मन एकाच चौकात, त्याच दगडाला वारंवार ठेचा खात राहते आणि त्याबाबत जगाला दोष देत राहते. या समस्येला मानसशास्त्रात “टिन एज आयडेंटिटी इशू” असे म्हणतात. या वयातील मुलांचा स्वभाव रगेल आणि विद्रोही झालेला असतो.

अशा वयात असलेल्या मुलांच्या पालकांनी त्यांच्या वागण्यावर टीका करून त्यांचा अहंकार दुखावला तर मुलांच्या वागण्यावर त्याचा विपरीत आणि बहुतेक वेळा विरुद्ध परिणाम होतो. मुलांना क्रिटीसाईज केले वा कधी शिक्षा केल्यास मुले पालकांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याऐवजी हट्टाला पेटून पालकांच्या सांगण्याविरुद्ध वागतात. या वयातील मुलांच्या वागण्याला खरंच वळण द्यावयाचे असल्यास आई-बापाने आपला “पालक” हा अहंकार टाकून मुलांचे “मित्र” व्हावे. आपल्याकडे आजवरच्या अनुभवांनी जमा झालेले ज्ञान फक्त मुलांसमोर मांडून, त्यांना त्यांच्या समस्येचे आकलन करून घ्यायला मदत करावी. शेवटी केवळ मित्रत्वाचा सल्ला द्यावा. तसेही १२-१३ वर्षापुढील मुले त्यांच्या बुद्धीला पटेल तेच करतात. काही पालक मुलांचा अहंकार दुखवून त्यांना वाईट मार्गावर अजून दृढपणे चालण्यास भाग पाडतात. यात कुठलेही शहाणपण नाही.

मुली, तू आता सहाव्या वर्षात पाय ठेवला आहेस. परवा तू सतत हट्ट करत होतीस. तीन-चार वेळा मी तुला समजावून सांगितले. पण तू काही केल्या ऐकेनास. मग नाईलाजास्तव तुला शिक्षा करावी लागली. तुला शिक्षा करत असतांना आणि नंतर माझ्या मनाची काय अवस्था झाली हे केवळ मलाच ठावूक आहे. कोण कुणाला शिक्षा करत होते देव जाणे ! त्या दिवशी तू जितकी रडलीस ना त्याच्यापेक्षा जास्त माझे मन रडले. पण बापाला उघडपणे आसवे गाळायचीही मुभा नसते. परत अशी वागू नकोस गं. तुझा बाबू बापाच्या कर्तव्याने बांधला गेला आहे. कर्तव्य आणि त्याच्यासोबत येणारा मानसिक त्रास मला चुकवता येणार नाही. डंब सेल्फिशसारखी कधीच वागू नकोस ग पोरी. तसाही चाळीशी ओलांडलेला पुरूष रडताना बरा दिसत नाही.

तेव्हा कुठल्याही चुका न करता लवकर मोठी हो पोरी !

तुम्हाला शिक्षा केल्यावर आमच्याच काळजाला डागण्या लागतात गं ! लेकाच्या वेळी ते मी कसंतरी सहन केलं. पण तुझ्याबाबतीत ते सहन होईल असं वाटत नाही.

लवकर शहाणी आणि मोठी हो पोरी !

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा..

. . . . तुझा गोपाल बाबू

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ चला मिळवून आणू या… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

“करंजीच्या सारणात थोडी कणीक भाजून घालावी. म्हणजे मग सारण नीट मिळून येतं. नाहीतर करंजीचा खुळखुळा होतो. ” लहानपणी आईकडून हमखास ही टीप मिळायची. “पण कणीकच का? तांदळाचे पीठ का नाही?” तर त्यावर “अग, गव्हाच्या पिठाच्या अंगी सगळ्यांना धरून ठेवण्याचा गुणधर्म असतो. तसं तांदळाच्या पीठाचे नाही. ते अगदी सरसरीत असतं. “

“मग आपण खव्याच्या किंवा मटारच्या करंजीत का नाही घालत हे गव्हाचे पीठ?” माझा अजून एक आगाऊ प्रश्न. तर त्यावर “अग, मटार किंवा खव्याच्या सारणात मूळचा ओलावा असतो. त्याला मिळून आणण्यासाठी दुसऱ्या घटकाची आवश्यकता नसते”  – तितकेच शांत, पण तत्पर उत्तर.

अगदी सहजपणे माझ्या आईने  जीवनातल्या दोन गोष्टी मला समजावल्या.

१. अंगी ओलावा असेल, तर गोष्टी मिळून येतात.

२. ओलावा कमी असेल, तर मिळून आणणारा घटक आवश्यक ठरतो.

नंतर लग्न झाल्यावर वडे, कटलेट इत्यादी रेसिपी करताना binding factor चे महत्व पटत गेले. आणि आता दिवाळीसाठी करंज्या करत असताना एक गोष्ट लख्ख जाणवली.

नात्यांचंही असंच आहे. प्रत्येक नातेवाइकांच्या गोतावळ्यात असा एखादा binding factor असतो, जो सर्वाना धरून ठेवतो. मग ते असे मित्र/ मैत्रीण असतील, जे बऱ्याच वर्षांनी कारणपरत्वे दुरावलेल्या सगळ्यांना एकत्र आणतात.

व्हॉट्सॲप ग्रुप बनवतात आणि “contact मध्ये रहायचं हं” अशी प्रेमळ दमदाटीही करतात. कधीकधी असा binding factor आपल्या नात्यातील एखादी बुजुर्ग व्यक्ती असते, तर कधी आपल्या शेजारी पाजारीही अशी व्यक्ती सापडून जाते.

आजच्या virtual जगात सुद्धा असे binding factors दिसतात. आपण त्याना अनेकदा भेटलेलोही नसतो… पण ते मात्र आपली चौकशी करतात. काळजीही करतात.

अशा सगळ्या binding factors ना माझा मानाचा मुजरा. ते आहेत, म्हणून समाजातील माणूसपण टिकून आहे, अन्यथा समाजाचाही खुळखुळा व्हायला वेळ लागणार नाही.

मंडळी, आपण वयाने मोठे झालो, मिळवते झालो, चला तर – आता मिळवून आणणारे होऊ या.

प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गो माय ऽऽ… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 “आई आज असं अचानक तुला मला प्रेमानं जवळ घेऊन थोपटत का आहेत सगळे?… ते ओवळणं, हिरवा चारा खाऊ घालणं, अंगावर भरजरी शाल टाकणं!.. अगदी आपण देव असल्यासारखे पुजन का करताहेत?… नमस्कार तर कितीजण करताहेत… आज कुठला विषेश दिवस आहे वाटतं… आज अचानक आपल्या बद्दल त्यांना प्रेमाचा पान्हा फुटावा!.. सांग ना गं आई!.. “

“.. वासरा त्यांच्या या प्रेमाच्या दिखाव्याला भुलू नको बरं… अरे वर्षानुवर्ष चालत आलेली ती वसुबारसाची परंपरा  चालवताहेत झालं.. त्यांची दिवाळी सुरु होतेय ना आजपासून म्हणुन पहिला मान गोधनला देतात… आपणं भरपूर दुधदुभतं कायम देत राहावं असा मतलबी डाव असतो त्यांचा… वासरा पूर्वीचे आपले वंशज  प्रत्येक घराघरात गोठ्यात राहतं होते.. मोठ्या संख्येने.. मोठ्या घरात अविभक्त कुटुबाचा काबिला तसं गोठ्यात पण मोठ्ठ कुटुंब गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या एकत्रित राहत होतो.. देखरेखीला चौविसतास माणसं असायची.. खाण्यापिण्याची तरतूद भरपूर, रानावनात भटकणे भरपूर, नदी तळ्यात मनसोक्त डुंबणं सारं सारं काही पाहिलं जात असे… मग ईतकी काळजी घेतल्याने आपणही संतत कासंड्या भरभरून फेसाळते दूध देत गेलो… वयोमानानुसार ज्यांची कास सुकत गेली, गाभण राहता येईना, दूध आटत गेले त्या भाकड गाईनां रेडा महणून पोसले गेले होते.. पण त्यांना कधीच गोठ्याबाहेर काढले गेले नाही.. दैववशात पंचत्त्व पावलेलीच घराचा गोठा कायमचा सोडून जात असे… अंगी धष्टपुष्टपणा आणि तजेलदारपणा असल्याने घरातली गोठ्यातले गोधनाची वाढती संख्या श्रीमंतीचं मापदंड ठरला जात असे… कडबा, वैरण, पेंड याने गोठ्यतला एक कोपरा कायम भरलेला असे… पाऊस भरपूर असल्याने कोरडा दुष्काळ कधी दिसलाच नाही… झाडं, डोंगर, कधी  छाटले नव्हते… आपल्यात देवत्त्वाचा अंश असल्याची त्यांची पुज्य भावना होती तेव्हा… पण पण हळूहळू  माणसांच्या प्रवृत्तीत बदल होत गेला.. आधुनिकतेचे वारे वाहू लागले.. गावात सुधारणेचा सोसट्याचे वादळ घुमले.. शिक्षणाचे फायदे दिसू लागले अन जुने संस्कार काटे होउन टोचू लागले.. भावकीत दरी पडली नि घरं दुभंगून मोडली.. शेताचा भार एकीकडे नि दुधाचा बाजार दुसरीकडे.. विभक्त कुटुंबाची घरचं टाचकी मग गोठ्यावर का न यावी टाच ती… हळूहळू एकेक गाई गुरं जनावरांच्या बाजारात गेली… दुधाच्या मिळकती पेक्षा वैरणीचा खर्च परवडेना, , माणसाच्या हातातलं घड्याळ देखभालीची वेळच दावेना.. काही गणित जुळेना म्हणून गाई गुरांना  ठेवले पांजरपोळच्या आश्रयाला.. तर काही हडखलेली, उताराला लागलेली कसायाने लाटली… शेण गोमुत्र सुद्धा आटले तिथे दुधाची काय कथा… मग आपल्याला पोसणार कोण?… कशाला बांधुन घेईल गळ्यात आपल्या फुकाची धोंड!… वासरा ! अरे हे माणसांचं जगचं मतलबी… इथे खायला कार नि भुईला भार होणारी त्यांना जड होतात ;अगदी वृद्ध असाह्य जन्मदात्या  माता पिता सुद्धा.. त्यांना देखिल त्या वयात वृद्धाश्रमाला पाठवतात तर तिथं तुमची आमची काय कथा… वर्षभर सांभाळताना, दुधाचा गल्ला वाढता राहताना, आखुडशिंगी, चारा कमी खाणारी नि शेणा गोमुत्राचा कमीत कमी उपद्रव देणारी गाई गुरं असतील तोवर आपला प्रतिपाळ करत राहणं फायद्याचं असतं.. यातलं एक जरी मागं हटलं कि लगेच त्याचं आपलं नातचं तुटलं… जोवरी हाती पैका तोवरी इथं बुड टैका हा जसा माणसाने माणसाला न्याय लावलेला असतो अगदी तसाच न्याय आपल्याला असतो… मग एक दिवस करतात आपली साग्रसंगीत  पुजा… वासरा आपल्यासाठी म्हणून ती काही पूजा नसतेच मुळी ती असते त्यांच्यासाठी… एक आदराची प्रेममय  कृतज्ञतेची दृष्टी असली आपल्यावर तरीही पुरेशी असते रे… कितीही झालं तरी ते माय लेकराचं नातं असते ते.. माय आपल्या लेकरावर माया लावणारी चिरतंन  असणारी.. मग ती माय कालची असो वा  आजची किंवा उद्याची असणारी… तिला कसही असलं तरी आपलं लेकरू कधी जड होत नसतं… पण हे लेकराला  कधीच कळत नसतं..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print