मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अमिताभ…स्वामी संजयानंद ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

११ ऑक्टोबरला अमिताभ ८० वर्षांचा झाला . म्हणजे साधारण माझ्या वडिलांच्या वयाचा अमिताभ. तरी त्याला ‘अहो-जाहो’ करणं अशक्य आहे. जग एवढं बदललं. नेहरू गेले. मोदी आले. साधी थिएटर गेली. मल्टिप्लेक्स आली. आता तर सिनेमा मोबाइलवर आला. टांगेवाला मर्द गेला आणि ओलासह उबेरही आली. कारखाना मालक आणि कामगार यांच्यातल्या ‘नमक’चा संदर्भ बदलला. तरीही अमिताभ नावाचा ‘सिलसिला’ सुरूच आहे. या चमत्कारानं आपलंच डोकं जड होतं. तरी, नवरत्न तेलानं मसाज करायला हा आहेच हजर!

आज ऐंशीव्या वर्षीही अमिताभ पहाटे पाचला उठून सकाळी आठला सेटवर हजर असतो. आजही दिग्दर्शकांच्या सूचनांबरहुकूम काम करत असतो. अमिताभचे समकालीन काळाच्या पडद्याआड गेले. जे आहेत, ते उपकारापुरते उरले. पण अमिताभ आहेच. कोण्या पन्नाशीतल्या बाल्कीला अमिताभसाठीच ‘चिनीकम’ करावा वाटतो वा ‘पा’मध्ये अमिताभला लहान मूल करावे वाटते. ‘मी भूमिकेसाठी अमिताभची निवड नाही केली, तर अमिताभसाठी भूमिका निवडली’, असं बाल्की सांगतो. चाळीशीतल्या नागराज मंजुळेला, ऐंशी वर्षांच्या अमिताभनं आपल्या सिनेमात काम नाही केलं, तर आपल्याला ‘मोक्ष’ मिळणार नाही, असं वाटतं. शूजित सरकारलाही अमिताभ हवा असतो आणि करण जोहरलाही.

काय आहे हे?

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमिताभ संपला नाही. कारण, तो थांबला नाही. तो साचला नाही. “आमच्यावेळी असं होतं!”, असं, माणसं दिवसातला निम्मा वेळ म्हणू लागली, की ती संपतात. आपली मुलं-बाळं रांकेला लागली की आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता झाली, असं जे मानतात, ते अकाली म्हातारे होतात! सकाळी वॉक, दुपारी एक पोळी, रात्री ग्लासभर दूध एवढंच ज्यांचं आयुष्य होतं, ते त्या शेड्यूलचे गुलाम होतात. तेही ८० वर्षे फीट जगतात, पण केव्हाच संपून गेलेले असतात.

अमिताभ संपला नाही. कारण, त्याच्या त्या ‘ॲंग्री यंग मॅन’ रूपाप्रमाणेच तो सदैव कार्यरत राहिला. अपघात, आजारपणं, दुखणी त्याच्यामागे कमी नाहीत. कौटुंबिक ताण, पोराबाळांची चिंता नाही, असं नाही. उद्योगधंद्याचं तर पार दिवाळं निघालं. राजकारणात अपयशी ठरला. तरी तो उभा राहिला. धावत राहिला. अमिताभ हा अभिनेता वा माणूस म्हणून थोर आहे, असे माझे मत अजिबात नाही. पण, हे जे आहे ते का आहे? काय आहे? ते नाकारून कसे चालेल? अमिताभचा जादुई आवाज, अमिताभचा करिष्मा, कवीचा मुलगा असलेल्या अमिताभची साहित्याची समज, त्याचा आवाका, त्याची खोली हे कसं नाकारणार? रूढ अर्थानं अमिताभकडे ना चेहरा, ना ॲक्शन हीरोची शरीरसंपदा. पण, अमिताभ हा अमिताभच असतो. त्याचे डोळे, त्याचे नाक, त्याचा चेहरा, त्याची उंची, त्याचे शरीर असं सुटं सुटं करून चालत नाही. या सगळ्याचा म्हणून जो एकत्रित परिणाम आहे, तो अभूतपूर्व आहे. तो अमिताभ आहे!

परवा लॉ कॉलेज aरस्त्यावरच्या बरिस्तात कॉफी पित होतो. पलीकडच्या टेबलवर एक वयोवृद्ध जोडपं बसलं होतं. तर, दुस-या टेबलवर काही तरूण मुलं-मुली बसली होती. म्हातारा-म्हातारी पेन्शनपासून टेन्शन आणि मुलीच्या लग्नापासून ते फॉरेन टूरपर्यंत बरंच बोलत होते. तिकडं पोरं एक्झामपासून ते आयपीएलपर्यंत ब-याच गप्पा ठोकत होते. दोन्ही टेबलवरून दोन नावं मात्र सारखी ऐकू येत होती – अमिताभ बच्चन आणि शरद पवार. हे म्हातारे कॉलेजात होते, तेव्हा शरद पवार आमदार झाले, तर अमिताभच्या ‘आनंद’नं लक्ष वेधून घेतलं. किती उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हे दोघं आहेतच. पवारांचा पक्ष हरेल. अमिताभचा सिनेमा पडेल. पण, ते आहेत.

“सध्या काय करताय?” असं विचारल्यावर पवार परवा एका मुलाखतीत म्हणाले होते- “सेल्फी काढायला शिकतोय!”

हेच ते कारण आहे, ज्यामुळे माणसं ऐंशीव्या वर्षीही कार्यमग्न असतात. बाकी, तुम्हालाही नसतील, अशा व्याधी, अशी आजारपणं, अशा समस्या, असे ताण, असे प्रश्न त्यांच्या वाट्याला आहेत. पण, ‘ॲंग्री यंग मॅन’ला डोक्यावर घेणा-यांची नातवंडं कॉलेजात जाऊ लागली, तरीही हा ‘यंग मॅन’ अमिताभ आहेच. आणि, पवार ३८व्या वर्षी मुख्यमंत्री झाले, तेव्हा पवारांविषयी बोलणा-यांना आज त्यांची नातवंडं शरद पवारांविषयी सांगू लागली आहेत!

हे दोन्ही ‘बच्चन’ आजही कार्यरत आहेत, पण ते दोघेच नाहीत. तिकडे ८५ व्या वर्षी आमचे भालचंद्र नेमाडे नव्या प्रकल्पावर अहोरात्र काम करताहेत. त्यांच्या लिहिण्याने नव्या मुलांना आजही झपाटून टाकताहेत. त्याच वयाचे रतन टाटाही पहाटे पाचला उठून दिवस सुरू करताहेत.

शुभ्रा गुप्ता म्हणते ते खरंय. अमिताभच्या घरावर एकच पाटी आहे –

“Work in Progress!”

अमिताभला ‘हॅपी बड्डे’ म्हणणं म्हणजे अखंड, अविरत, अव्याहत अशा कार्यमग्नतेचं सेलेब्रेशन आहे! अमिताभ एका रात्रीत जन्माला येत नाही. तो अव्याहत कामातून, कार्यमग्नतेतून, अविचल निष्ठेतून ‘अमिताभ’ होत असतो.

हे ‘अमिताभ’पण लक्षात घ्यायला हवं.

(फक्त माहिती म्हणून सांगतो – अमिताभ हे महायान पंथातल्या बुद्धांचे एक नाव आहे.)

अविरत चालणं हा अमिताभचा ‘पासवर्ड’ आहे’. सो, चालत राहा. मुक्काम आणि मोक्षाच्या आशा करू नका.

पडद्यावर धावणारा अमिताभ आठवा आणि तसेच पॅशनेटली धावत राहा. चालत राहा. अविरत कार्यरत राहा.

तुम्हीही बच्चन व्हाल! माझी गॅरंटी.

लेखक – स्वामी संजयानंद

संग्राहिका -सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’, गाणे गात एक भिकारी जात होता. आजीने या गाण्यातील तत्त्वज्ञान छोट्या बंड्याला सांगितले आणि म्हटले, “अरे, असे भिक्षा मागून पोटाला भरणार्‍या, हातावर पोट असलेल्या , पोटाचा प्रश्न असणार्‍या , सगळ्यांना मदत करणे आपली संस्कृती आहे. आपल्या पोटासाठी केलेल्या अन्नातील काही अन्न भुकेल्यांना गरजूंना द्यावे म्हणजे मग त्यांचे समाधानाने भरलेले मन पाहून आपले पोट भरते.”

बंड्याला जरी सगळे समजले नाही तरी त्याने काही अन्न पोटात कावळे ओरडणार्‍या त्या भिक्षेकर्‍याला दिले.

नंतर त्याची पोटपूजा चालू झाली तशी आजी अजून त्याच्या पोटात शिरत म्हणाली, “तुला भूक का लागली?” बंडू म्हणाला, “काल पासून पोट उपाशी आहे म्हणून.” “बरोबर. म्हणूनच तुझे पोट खपाटीला गेले ना? अरे, आपल्या लेकरांच्या, आई वडिलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील पोटाला चिमटा घेऊन काम करत असतात बरं.

म्हणून घरात सुखशांती समृद्धी येण्यासाठी, तुला काय सांगते ते ऐक. पोट भरलेले असले ना , किंवा पोटात चारघास घातलेले असले ना की सगळे सुलभ होते. पण त्यासाठी आधी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत. आधी पोटोबा मग विठोबा करू नये. देवाने सगळ्यांना पोट दिले आहे ना? सगळ्यांचे जीवन हे कशासाठी? पोटासाठी असते. तरी सगळ्यांना सारखे मिळत नसल्याने कोणाला पोट मारावे लागते, कोणाला पाणी पिऊन पोट भरावे लागते याचेच भान ठेऊन पोट तडीला लागेल एवढे खाऊ नये. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणून आपल्या अन्नातील काही भाग कायम दान करावा. दुसरे असे की आपल्यापेक्षा दुसर्‍यांकडे जास्त आहे म्हणून आपले पोट दुखू देऊ नये. कोणाच्या पोटावर पाय देऊ नये. कोणाला शिक्षा करायची झालीच तर एक वेळ पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.

तुम्ही पोटची पोरं रे. तुम्हाला अशी जीवनसुत्रे लहानपणापासूनच समजलेली बरी,”असे सांगून तिने बंड्याला पोटाशी धरले. 

आजी पुढे म्हणाली,”जे सुखवस्तू कुटुंबातले असतात त्यांची पोटे सुटलेली असतात. पोटाचा नगारा झालेला असतो. त्यांना गरीबांची दु:खे समजत नाहीत. ते अप्पलपोटीपणा करतात . आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोटपोट लोक पोटात एक ओठात एक नितीने वागतात . स्वत: च्या फायद्यासाठी ते दुसर्‍यांची पोटे जाळतात मग त्यांना पोटा ( कायदा) लागतोच. “

आजीने पोटतिडकीने सांगितलेले सगळे बंड्याला पटले. एका अनामिक हुरहुरीने त्याच्या पोटात कालवले. त्याचे समाधान पोटात न राहता चर्येवरून ओसंडत होते.

तेवढ्यात बंड्याची १३-१४ वर्षाची बहीण सोनी पळत पळत आजीच्या कुशीत शिरली. तिच्या पोटात भीतीने गोळा आला आहे हे समजत होते.आजीने विचारले, “सोनी, काय झालं बाळा?” सोनी म्हणाली, “आजी, मला आताच लग्न नाही करायचे. मला शिकायचंय.”

आजी म्हणाली, “हो की. अगं, अजून तुझं वय पण नाही झालं.”

“पण तो लखूशेठ आहे ना त्याच्या पोटात काही काळंबेरं आहे. तो लग्नाची गोष्ट घेऊन अण्णांकडे आला आणि अण्णांनी पोटदुखीवाला औषधाला आला त्याच्या बेंबीवर आयोडिनचा बोळा सारखे लगेच ‘आमच्या सोनीशी करशील का लग्न?’ विचारले आन तो तयार झाला.”

आजीचाही भीतीने पोटशूळ उठला.उगाच पोट गुरगुरू लागले. आजी म्हणाली, “मी समजावीन हो अण्ण्याला. तू नको भिऊस.”

अण्णाला समजावून आजीने ते संकट दूर लोटले. तर सोनीची चुलत बहीण मोनी-सात महिन्याची  पोटूशी- ती आजीपाशी आली. आजी गमतीनं म्हणाली, “आता जे काय आहे,ते अजून दोन महिने पोटातच ठेव बाई. मग दोन महिन्यांनी ते पोटात मावेनासे झाले की येऊ दे पोटातले मांडीवर.”

सगळेच पोट धरून हसले.

आजी मोनीला म्हणाली, “अगं मोने, तुमचा तसा नवाच संसार आहे. त्यात आता खाणारे तोंड वाढणार. म्हणून तुला पण चार गोष्टी सांगते बाई.  नेहमीच गोगलगाय पोटात पाय, असं असू नये.  तसेच पाठी येईन पोटी येईन पण सूड घेईन असे विचारही पोटात ठेवू नकोस. त्या बाळावर असले संस्कार करू नकोस. पण नवर्‍याला पोटाला न खाता  खर्च करण्याच्या वृत्तीपासून पोटातले ओठावर आणत घडाघडा बोलून दूर करण्याचा प्रयत्न कर.

अगं,प्रेमाचा मार्ग पोटातूनच जातो. तर प्रेमाने पोटात शिरून हे तू सहज साध्य करशील.

बरं, चल. तुला काहीतरी खावंसं वाटत असेल ना? तुझ्या पोटाच्या नावाखाली सगळ्यांच्या पोटाच्या वळलेल्या दामट्या सरळ करू. सगळ्यांनाच पोट खळबळल्याची जाणीव झाली. पोटार्थी असलेले सगळे खाण्यासाठी सज्ज झाले.  खरं तर आजीचं वयाने पाठ पोट अगदी एक झालं होतं.पण काटक आजीने मस्त चमचमीत झणझणीत थालीपिठं केली. हे आजीचं प्रेम सगळ्यांनीच पोटात बांधलं. त्यावर आडवा हात मारताना पोटात जागा नव्हती, तरी चार घास जास्तच खाल्ले. पोट डम्म झालय, म्हणत दिलेल्या तृप्तीच्या ढेकराने आजीच्या पोटात आनंद मावेनासा झाला.

लेखिका: सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरी आई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆  दुसरी आई  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

 एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले-

“आपल्याला काय होईल?

काय अपेक्षा आहे तुमची,

 मुलगा की मुलगी?

तुम्हाला काय वाटतं ?”

 

 त्यावर पती म्हणाला:-

“जर आपल्याला मुलगा झाला तर,मी त्याचा अभ्यास घेईन,

त्याला गणितं शिकवीन,

त्याच्याबरोबर मी मैदानावर

खेळायला, पळायला पण जाईन,पोहायला शिकवीन अशाअनेक गोष्टी मी त्याला शिकवीन.”

 

हसत हसत बायकोने

यावर प्रतिप्रश्न केला:-

“आणि मुलगी झाली तर?”

 

यावर पतीने खूप छान उत्तर दिले-

 

“जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही.”

 

 पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले-

 “का?असे का.?”

 

पती म्हणाला,

” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल.

 

मी कसे आणि कोणते कपडे घालावेत,मी काय खायचं, काय नाही खायचं,कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे,

आणि काय नाही बोलायचं,हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.

थोडक्यात जणू माझी

‘दुसरी आई’होऊन ती माझी काळजी घेईल.

 

मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन.

 

एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही ती आनंदाने समजून घेईल.”

 

पति पुढे म्हणाला-

“तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे.

 मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं, की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे.माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

 

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले-

“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का,

की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल,

आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:-

“अगं तसं नव्हे गं,कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल,

 पण त्याला हे सगळं शिकावं लागेल ,मुलीचं तसं नाही,

 मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात.

एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल”

 

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली,

“पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?”

 

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणाला-

“हो.तू म्हणतीयेस ते खरंय.ती आपल्या सोबत नसेल,पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही.कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू.तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे!!

अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत.

 

 कारण,

 मुली ह्या परी सारख्या असतात,त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !

 

खरोखर मुली ह्या,

परी सारख्याच असतात!

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५२.

तुझ्या गळ्यातला गुलाबांचा हार

मागून घ्यावा असं वाटलं पण

मागायचं धाडस झालं नाही. सकाळ झाली.

तू निघून गेलास. बिछान्यावर काही पाकळ्या

राहिल्या होत्या आणि भिकाऱ्यासारखी मी

सकाळी एखाद- दुसरी पाकळी शोधीत राहिले.

 

अरे देवा! मला काय मिळालं?

तुझ्या प्रेमाची कोणती खूण?

फूल नाही, सुगंध नाही की गुलाबदाणी नाही.

विजेच्या आघातासारखी चमचमणारी

जडशीळ अशी तुझी तलवार!

 

चिवचिवाट करून पहाटपक्षी विचारत होता,

‘ बाई गं! तुला काय मिळालं?’

‘ नाही फूल, नाही अत्तराचा सुगंध,

 नाही गुलाबदाणी.फक्त तुझी भयानक तलवार!

 

मी विचार करीत बसले ‘ ही कसली तुझी भेट!’

ती मी कुठं लपवू? मी ती पेलू शकत नाही

याची शरम वाटते. कारण मी इतकी नाजूक!

मी ती पोटाशी धरते तेव्हा ती मला खुपते.

तरीसुद्धा तू दिलेल्या दु:खाच्या ओझ्याचा हा मान,

तुझी भेटवस्तू मी ऱ्हदयाशी धरते.

 

या जगात मला कसलीच भीती आता नाही.

माझ्या लढाईत तुझाच विजय होत राहील.

 

तू माझ्या सोबत्यासाठी मरण ठेवलंस.

मी त्याला आयुष्याचा शिरपेच चढवीन.

मला बंधनातून मोकळं करायला

तुझी ही तलवार आहे.

मला या जगात आता कशाचीच भीती नाही.

 

माझ्या ऱ्हदयस्वामी! क्षुद्र साजशृंगार मी

व्यर्ज केले आहेत.

आता कोपऱ्यात बसून मी रडणार नाही;

अवनत होणार नाही, उन्नत होईन व राहीन.

 

या तलवारीचा अलंकार तू मला बहाल केलास.

बाहुल्यांचा खेळ आता कशाला?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कधी ही दाद ‘ अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..’ अशी खानदानी असते. कधी ‘असा बालगंधर्व आता न होणे..’ अशी काव्यात्म असते ,कधी ‘ आपके पाँव देखे, बहुत हसीन हैं , इन्हें जमींपर मत उतारिए,मैले हो जाएंगे,’ अशी रूमानी असते, तर कधी ‘ इक रात में दो-दो चाँद खिले’ अशी अस्मानी असते.

परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात  थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती. ‘बिच्चारी,’ अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच, लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले,”Your attire is so beautiful!! I like it! ” मला अशी चकित, आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास  करून गेली.

मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. ‘कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान’ असंच  म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढराशुभ्र ,चमकदारदाट बॉबकट आणि      

चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव!  बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं,”Excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. ” तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि  मला म्हणाली,” good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!” आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!

त्या दिवशी कोल्हापूरच्या ‘ ओपेल’ होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये ‘दहीबुत्ती’ हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार  कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला  🙂 )मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- ‘शेफसाहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! ‘तेरे हात मुझे  दे दे ठाकुर!’ असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ‘ टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले,”कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला,” तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?” मी म्हटलं,” त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!”

माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं, “वैष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल, असं नाही वाटत मला.” वैष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,

मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का, अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या, “मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,

वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला,” एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही.” त्या पुढे म्हणाल्या,” मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील.” मी चकित! वैष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण….! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!

बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची.

कोण प्राध्यापिका असतील,कशा   शिकवणा-या असतील अशा विचारात असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, “मी—. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे.”

माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या, खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकौशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं,” बाई,तुम्ही किती छान शिकवलंत…” आणि मला पुढे बोलवेच ना !  माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत…!!

लेखिका : सुश्री संजीवनी बोकील

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जानकीसाठी… अनुवादक : समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ जानकीसाठी… अनुवादक : समीर गायकवाड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

(राजेश्वर वसिष्ठ यांच्या ‘जानकी के लिए’ या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद.)

देह गतप्राण झालाय रावणाचा

स्तब्ध झालीय लंका सारी

सुनसान झालीय किल्ल्याची तटबंदी  

कुठे कसला उत्साह नाही

नाही तेवला दिवा कुणाच्या घरी 

घर बिभिषणाचे वगळता!  

 

समुद्र किनारी बसलेले विजयी राम

बिभिषणास राज्य लंकेचे सोपवताहेत

जेणेकरून प्रातःकाळीच व्हावा त्याचा राज्याभिषेक

सातत्याने ते लक्ष्मणास पृच्छा करताहेत

आपल्या सहकाऱ्यांचे क्षेम कुशल जाणताहेत

चरणापाशी त्यांच्या बसुनी आहे हनुमान!

 

धुमसताहेत लक्ष्मण मनातूनच  

की, सीतेला आणण्यास का जात नाहीत राम            

अशोक वाटिकेत?

पण बोलू काही शकत नाहीत. 

 

हळू-हळू सारी कामं निपटतात

संपन्न होतो राज्याभिषेक बिभिषणाचा

आणि राम प्रवेश करतात लंकेमध्ये

मुक्कामी एका विशाल भुवनात.

 

अशोक वाटिकेस धाडतात हनुमाना

देण्यास ही खबर

की, मारला गेला आहे रावण       

आता लंकाधिपती आहे बिभिषण.

 

बातमी ती ऐकताच सीता

होऊन जाते दिग्मूढ   

बोलत काहीच नाही

बसते वाटेकडे लावूनि डोळे

रावणाचा वध करताच

वनवासी राम झालेत का सम्राट?   

 

लंकेत पोहोचून देखील दूत आपला पाठवताहेत

जाणू इच्छित नाहीत की, वर्षेक कुठे राहिली सीता

कशी राहिली सीता?

डोळ्यांना तिच्या अश्रुंच्या धारा लागतात

जयांना समजू शकत नाहीत हनुमान

बोलू शकत नाहीत वाल्मिकी.

 

राम आले असते तर मी भेटवलं असतं त्यांना

त्या परिचारिकांशी

ज्यांनी भयभीत करून देखील मला

स्त्रीचा सन्मान सारा प्रदान केला

रावणाच्या त्या अनुयायी तर होत्याच

परंतु माझ्यासाठी मातेसमान होत्या.          

 

राम जर आले असते तर मी भेटवलं असतं त्यांना

या अशोकाच्या वृक्षांशी

या माधवीच्या वेलींशी

ज्यांनी माझ्या अश्रुंना

जपलंय दवबिंदूसम आपल्या देहावर

पण राम तर राजा आहेत

ते कसे येतील सीतेला नेण्यास?

 

बिभिषण करवतात सीतेचा शृंगार

आणि पाठवतात पालखीत बसवूनी रामांच्या भुवनी.

पालखीत बसलेली सीता करते विचार,

जनकानेही तिला असाच तर निरोप दिला होता!

 

‘तिथेच थांबवा पालखी’,

गुंजती रामांचे स्वर

येऊ द्या पायी चालत सीतेला, मज समीप

जमिनीवरून चालताना थरकापते वैदेही

काय पाहू इच्छित होते

मर्यादा पुरुषोत्तम, कारावासात राहून देखील

चालणं विसरतात का स्त्रिया?

 

अपमान आणि उपेक्षेच्या ओझ्याखाली दबलेली सीता

विसरून जाते पतीमिलनाचा उत्साह

उभी राहते एखाद्या युद्धबंद्यासम!

 

कुठाराघात करतात राम – सीते, कोण असेल तो पुरुष

जो वर्षभर परपुरुषाच्या घरी राहिलेल्या स्त्रीचा

स्वीकार करेल?

मी तुला मुक्त करतोय, जिथे जायचेय तिथे तू जाऊ शकतेस.

 

त्याने तुला कवेत घेऊन उचललं

आणि मृत्यूपर्यंत तुला पाहत जगला.

माझं दायित्व होतं तुला मुक्त करण्याचं

मात्र आता स्वीकारु शकत नाही तुला पत्नीसारखं!       

 

वाल्मिकींचे नायक तर राम होते

ते का बरे लिहितील, सीतेचे रुदन

आणि तिची मनोवस्था?

त्या क्षणांत सीतेने काय नि किती विचार केले असतील

की, हे तेच पुरुष आहेत का

ज्यांना मी वरले होते स्वयंवरी,

हे तेच पुरुष आहेत का ज्यांच्या प्रेमाखातर

महाल अयोध्येचा त्यागला होता मी

आणि भटकले होते वनोवनी!

 

होय, रावणाने मला बाहूंत घेतलेले

होय, रावणाने मला प्रेमाचा प्रस्ताव दिलेला

तो राजा होता, इच्छा असती तर बलपूर्वक नेलं असतं आपल्या घरी

पण रावण पुरुष होता

त्याने केला नाही माझ्या स्त्रीत्वाचा अपमान कधी

भलेही मर्यादा पुरुषोत्तम म्हणून गौरवलं नसेल त्याला इतिहासात!                                           

 

हे सर्व वाल्मिकी सांगू शकले नसते

कारण त्यांना तर रामकथा सांगायची होती!

 

पुढची कथा तुम्ही जाणताच,

सीतेने दिली अग्निपरीक्षा. 

कवीला होती घाई लवकर कथा संपवण्याची

परतले अयोध्येस राम, सीता आणि लक्ष्मण

नगरवासियांनी केली साजरी दीपावली

ज्यात सामील झाले नाहीत नगरातले धोबी. 

 

आज दसऱ्याच्या या रात्रीस

मी उदास आहे त्या रावणासाठी,

ज्याची मर्यादा

कुण्या मर्यादापुरुषोत्तमाहून कमी नव्हती

 

मी उदास आहे कवी वाल्मिकींसाठी,

जे रामाच्या जोडीने सीतेचे मनोभाव लिहू शकले नाहीत

 

आज या दसऱ्याच्या रात्रीस

मी उदास आहे स्त्रीच्या अस्मितेसाठी

त्याचं शाश्वत प्रतीक असणाऱ्या जानकीसाठी!… 

 

– राजेश्वर वसिष्ठ यांच्या ‘जानकी के लिए’ या हिंदी कवितेचा स्वैर अनुवाद.

अनुवादक : समीर गायकवाड

संग्राहिका :मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्वर्गाची करन्सी….अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वर्गाची करन्सी….अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एक मोठे उद्योगपती होते. अतिशय धनाढ्य… भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या त्यांच्याकडे होत्या. काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं…

एक दिवस ते गाडीमधून कंपनीत जाताना, त्यांनी ड्रायव्हरला रेडिओ लावायला सांगितला.कुठलं तरी अधलं -मधलं चॅनेल लागलं.चॅनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं.तो प्रवचक बोलत होता, “मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमावतो, ते सर्व काही, मृत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं. तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही…”

या उद्योगपतींनी हे ऐकल्यावर ते एकदम अंतर्मुख झाले.एकदम सतर्क झाले.त्यांना एकाएकी जाणवलं,

डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला की, आपण जे काही प्रचंड वैभव उभारलं आहे, त्यातला एकही रुपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही. सर्व काही इथेच सोडून जावं लागणार आहे.

त्यांना एकदम कसंतरीच झालं.ते कमालीचे अस्वस्थ झाले…. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली… बैठकीला झाडून सगळे सहाय्यक, सचिव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की, “मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो. तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला तुम्ही नीटपणे, विचारपूर्वक सांगा”.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की, आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलताहेत!  मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही… हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढीगभर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलताहेत. हे जमणार कसं?

साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं. बक्षिसे जाहीर केली की, जो कुणी मला यासाठी १००% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन.

जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला. पण काही जमेना. प्रत्येकजण अथक प्रयत्न करत होता. पण उत्तर काही सापडत नव्हतं. 

बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होते.त्यांना हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की, मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही?म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं?  का? मला न्यायचंय हे सर्व.जे मी मेहनतीने मिळवलंय,ते मला का नेता येऊ नये?त्यांना काही  सुचेना.

मग त्यांनी यासाठी जाहिरात दिली. भलंमोठं बक्षीस ठेवलं. पण उत्तर सापडेना.

एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या ऑफिसमधे आला. ‘साहेबांना भेटायचंय’, म्हणाला.

बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं.तो माणूस म्हणाला, “माझं नाव श्याम. मला तुम्हांला काही  विचारायचंय. मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन.” 

बिझनेसमन म्हणाले, “विचार”.

याने विचारलं की, “साहेब, तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय?”

“हो,”बिझनेसमन म्हणाले.

“खरेदी केलीये तिथे?” श्यामने विचारले.

“हो”. बिझनेसमन म्हणाले. “पैसे कसे दिलेत?” श्यामने विचारले.

“कसे म्हणजे?आपले पैसे देऊन अमेरिकन डाॅलर्स विकत घेतले व दिले,” बिझनेसमन उत्तरले.

“बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात?. तिथे काय खरेदी केलीत आणि काय काय चलने वापरलीत?”

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिअन डाॅलर्स. सिंगापूरला सिंगापूर डाॅलर्स. मलेशियाला रिंगिट. जपानला येन. बांगलादेशला टका… सौदी अरेबियाला रियाल… दुबईला दिरहम्स…

थायलंडला बाथ… युरोपला युरो… म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून करन्सी चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते.” बिझनेसमन म्हणाले.

“म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत.तर ते तुम्हाला देशानुरूप, जागेनुरूप  बदलून घ्यावे लागतात.जिथे जिथे, जी जी करन्सी आहे, ती ती तुमच्याकडचे रुपये देऊन बदलून घ्यावी लागते.”

“बरोबर,” बिझनेसमन म्हणाले.

“मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल. तिथे तुमचे रुपये कसे चालतील?” श्याम म्हणाला.

“मग?” बिझनेसमनने कुतूहलाने विचारले.

“तिथे ही करन्सी चालणार नाही, कारण स्वर्गाची करन्सी आहे ‘पुण्य!’ आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल. मगच तुम्हाला ती वापरता येईल!

तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यावे लागतील. मगच ती बरोबर नेता येईल आणि तिथे वापरता येईल.”

बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख प्रकाश पडला की, शेवटी बरोबर न्यायला ‘पुण्यच’ कमवायला हवं!

इथली करन्सी अशीच  गोळा करावी लागेल की, जिचे पुण्यामध्ये रूपांतर होऊ शकेल. असा काही विचार, वर्तन, आचरण करावं लागेल की, जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल.

बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं.  ते श्यामच्या पायाच पडले. त्यांनी त्याला  यथोचित बक्षीस दिले आणि त्याचा सत्कार केला. मनोमन ठरवलं की, या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे, मिळवलं आहे,ते आता ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यायचं.आणि हे शेवटपर्यंत करतच राहायचं.वरती जाताना घेऊन जायला एवढे पुरेसे आहे.

लेखक :अज्ञात

संग्राहक : श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  पप्पाची मुलगी, मुलीचा पप्पा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पप्पाची मुलगी, मुलीचा पप्पा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी मोठी झाली.

एके दिवशी सहज म्हणाली,

‘पप्पा,मी तुम्हाला कधी रडवलंय का?’

मी म्हटलं,

‘का रे पिल्लू, असं का विचारतेस?’

ती : ‘काही नाही असंच.’

मी : ‘नीट आठवत नाही. पण एकदा…’

ती : ‘कधी?’ तिनं अधीरतेने विचारलं.

मी म्हणालो, ‘तू एक वर्षाची असताना मी तुझ्यासमोर पैसे, पेन आणि खेळणं ठेवलं.

कारण मला बघायचं होतं की, तू काय उचलतेस?

तुझी निवड ठरविणार होती की, मोठेपणी तू कशाला जास्त महत्व देतेस.

जसे

पैसे म्हणजे संपत्ती,

पेन म्हणजे बुद्धी

आणि

खेळणं म्हणजे आनंद.

मी हे सर्व सहजच पण उत्सुकतेने करत होतो.

मला बघायची होती तुझी निवड.

तू एकाच ठिकाणी बसून आळीपाळीने सर्व गोष्टींकडे बघत होतीस

आणि

मी तुझ्या पुढ्यातच बसून शांततेने तुझ्याकडे पहात होतो.

तू रांगत-रांगत पुढे आलीस.

मी श्वास रोखून पहात होतो

आणि

क्षणार्धात तू त्या सगळ्या वस्तू बाजूला सारून माझ्या मिठीत शिरलीस.

माझ्या लक्षातच नाही आलं की,

‘या सगळ्यांबरोबर मीसुद्धा एक निवड असू शकतो.’

ती पहिली वेळ होती जेव्हा तू मला रडवलंस.

 

खास मुलींच्या पप्पांसाठी:

खरंच मुलगी पाहिजेच.

 

लेखक :अज्ञात

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ पुन्हा प्रवाहात…अज्ञात ☆ सुश्री निलिमा ताटके ⭐

ऑस्ट्रेलियातील एका आजोबांची ही गोष्ट आहे.हे आजोबा रोज पहाटे समुद्रकिनारी फिरायला जात.जाताना हातात एक टोपली असे.किनाऱ्यावर हे काहीतरी वेचायचे आणि पुन्हा समुद्रात नेऊन टाकायचे.

अनेक दिवस हे त्यांचे काम पाहून जेनीने त्यांना विचारले, ” आजोबा, तुम्ही हे काय करता?”

आजोबा हसले आणि म्हणाले, “बेटा, मी किनाऱ्यावर आलेले स्टारफिश गोळा करतो आणि पुन्हा त्यांना प्रवाहात सोडतो.अगं, भरतीच्या लाटांबरोबर ते बाहेर तर फेकले जातात ; पण त्यांची चाल मंद असल्याने ते पुन्हा समुद्रात पोहोचू शकत नाहीत. अशांना मी पुन्हा प्रवाहात मिसळण्याची संधी देतो.”

 ही गोष्ट वाचल्यावर वाटले, की असे अनेक आजी-आजोबा समाजातून बाहेर फेकल्या गेलेल्या मुलां-मुलींना पुन्हा समाजाच्या प्रवाहात सोडायला मदत करतात.

लेखक :अज्ञात

संग्राहिका :  सुश्री निलिमा ताटके

ठाणे.

मोबाईल 9870048458

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ हेमलकशाचे देव… लेखक – श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ हेमलकशाचे देव… श्री विजय गावडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

देवा, या हेमलकशाच्या देवाला, आदिवासींच्या आधारवडाला, उदंड आयुरारोग्य दे!

बाबांचे चिरंजीव,डॉक्टर प्रकाश आमटे दुर्धर आजारावर उपचार घेऊन परतलेत, हे ऐकून त्यांच्या कार्याविषयी केवळ जुजबी माहिती असलेल्या माझ्यासारख्या मराठी माणसाचा देवावरचा विश्वास दृढ झालाय.  हेमलकशाचा माडिया आदिवासी तर अत्यंत सुखावला असेल, यात शंकाच नाही.

डॉक्टर आणि मंदाताई यांचा पर्लकोटा नदीच्या पुलावर फिरायला गेल्याचा फोटो वायरल झालेला पाहिला आणि देवाचे आभार मानण्यासाठी हात आपोआप जोडले गेले.

मित्रांनो, माडिया आदिवासी,डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे या दाम्पत्याला देव मानतात आणि म्हणून देवाने या वंचित, गरीब आदिवासींच्या देवाचे आयुरारोग्य सांभाळावे, यासाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया.

बाबा आमटेंच्या या सुपुत्राने, अत्यंत हलाखीत जगणाऱ्या माडिया आदिवासींचे जीवन जगण्यायोग्य करण्यासाठी केलेली अतिशय खडतर आणि जीवन झोकून देणारी  धडपड ‘प्रकाशवाटा’  हे त्यांचं पुस्तक वाचून कळते.

धड कपडेही अंगावर न घालणाऱ्या या माडिया आदिवासींना कपडे घालायला, अन्न म्हणून फक्त आंबिलावर विसंबून जीवन कंठणाऱ्या वा केवळ जनावर मारून खाणाऱ्या आदिवासींना भाज्या कशा बनवतात, कशा खातात आणि कशासाठी खातात हे माहीत नसणाऱ्या माडियांना त्या    पिकवायला  व खायला त्यांनी शिकवलं.  माडिया भाषेशिवाय कोणत्याही भाषेचा गंध नसलेल्या या अतिमागास जमातीला शिक्षण, आरोग्य या सुविधा त्यांच्या हेमलकशात अहोरात्र उपलब्ध करून देणाऱ्या या सिद्धहस्त डॉक्टर, इंजिनियर, आणि इतर व्यावसायिक एकाच ठिकाणी एकवटलेल्या अवलियाला,देवा,उदंड आयुरारोग्य दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

समाजसेवेचे भांडवल करून, छोट्या- मोठया कार्याचा सोस पुरा करतांना, सोशल मीडियामध्ये फोटो टाकून आपला उदोउदो करून घेणाऱ्या आजच्या तथाकथित समाजधुरीणांच्या डोळ्यात अंजन घालणारे त्यांचे छोटेखानी ‘प्रकाशवाटा’ हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचे काम हे दीपस्तंभ बनून समाजाचे मार्गदर्शन करतेय याची त्यांना ना जाणीव असेल, ना खंत.

आपल्या जन्मदात्यांच्या पावलावर पाऊल टाकून, किंबहुना त्यांच्याही पुढे जाऊन, वंचित आदिवासींच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारे त्यांचे आणि मंदाताईंचे हात असेच कार्यरत राहून, आपणा सर्वांना प्रेरणा देत राहोत ही श्रीचरणी प्रार्थना!

असंख्य पुरस्कारांनी गौरविलेले डॉक्टर प्रकाश आमटे आपल्या या पुस्तकात एका ठिकाणी लिहितात, “शाळेकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे.  इथे आदिवासींची होत असलेली फसवणूक थांबावी आणि आपल्या हक्कांबद्दल त्यांनी सजग व्हावं, हा शाळा सुरु करण्यामागचा आमचा हेतू होता.  आज जेव्हा तिकिटापेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या कंडक्टरला माझी मुलं पकडतात आणि जाब विचारतात, तेव्हा माझ्या दृष्टीने इथे शाळा सुरु केल्याचा उद्देश सफल झाल्यासारखा वाटतो.”  केवढा मोठा पुरस्कार!इतर कोणत्याही पुरस्कारांच्या पेक्षा मोठा!

असो.  बाबा आमटेंच्या या सुपुत्राला उदंड आयुरारोग्य मिळो ही पुन्हा एकदा विधात्या चरणी प्रार्थना.

लेखक :श्री.विजय लक्ष्मण गावडे

संग्राहिका : सौ. शशी नाडकर्णी- नाईक.

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print