मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “काळ जुना होता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “काळ जुना होता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

काळ जुना होता.

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे. आज कपड्यांचे भंडार आहेत. तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरू आहेत.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

रहदारीची साधने कमी होती. तरीही कुटुंबातील लोक भेटत असत.

आज रहदारीची साधने भरपूर आहेत.पण प्रत्येक जण  लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती. आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

लोकं गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे. आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

खेळण्यांचा तुटवडा होता. तरी शेजारची मुलं एकत्र खेळायची .

आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

रस्त्यावरील प्राण्यांनासुध्दा भाकरी दिली जायची. आज शेजारची मुलंही भुकेली झोपी जातात.

समाज सुसंस्कृत झाला आहे

 

काळ जुना होता.

शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, आता परिचय विचारला तर आज मला शेजाऱ्याचे नावही माहीत नाही.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त ‘मी’ ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.

हो. हेसुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो.एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं, आतल्या आत.पद्धत चुकली की आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.

संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. सॉक्रेटीसच्या बायकोने एकदा चिडून त्याच्यावर पाणी फेकलं. यावर तो म्हणाला,

“जरा जास्त तरी फेकायचेस. अंघोळीचं काम झालं असतं.”

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतीचित्रे’  वाचलं तर लक्षात येईल की तापट व्यक्तीसोबत भांडण टाळणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे,कौशल्य आहे.हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो.

भांडण करताना काही नियम पाळले, तर आपलं जगणं सोपं होऊ शकेल.मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा.कुठेतरी लिहून ठेवा पण काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचे, हे आधी पक्कं करा.

सर्वात पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही.आज, आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच, विधाने करायची नाहीत. म्हणजे ‘तू नेहमी …, तू … ने सुरु होणारी वाक्ये टाळायची.नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा.आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही, हा विचार केला तरी संयम येईल.

प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी.सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच भांडायचं. पुन्हा कधीच नाही,वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही हे मनात पक्के हवं.

आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो तो याच परीक्षेत.त्यामुळे हे शिकलंच पाहिजे.यशस्वी व्यक्ती,आपले आदर्श हे टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात, याचं खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं. यासाठी चरित्रे,आत्मचरित्रे वाचता येतील.

आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचे, मोठ्यांचे, समाजाचे.सतत जिंकणारे,शब्दात पकडणारे काही  हुन्नरी कलाकार या क्षेत्रात पहायला मिळतात.यांची स्मरणशक्ती दांडगी असते. शब्दांचे अचूक अर्थ यांना माहीत असतात.नवखे तर गोंधळून जातात यांच्या समोर.हे मात्र जिंकूनसुद्धा आतल्या आत हरलेले असतात. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेले असते तेच मौल्यवान सिद्ध होते.

एकदा एका नवरा बायकोचं भांडण झाले.दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला.आणि नव-याने तिच्या हातात कागद दिला त्यावर फक्त लिहिलं होतं,

… But I like you.

कधी कधी ‘हारके जितनेवाले बाजीगर’ असतात ते असे.

जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम,

फिर नहीं आते … हेच खरं !

असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो. ते तो गेला म्हणून नाही तर तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो, ते आठवून! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास.

लेखक :श्री. विकास शहा

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद…’ ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

काहीच पुरेसं नसूनही

हसतखेळत आनंदात राहणारे बघितले आहेत.

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

बाल्कनीतून किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे.

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंबही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत  बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं. पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात, आता त्याला कोण काय करणार. प्रत्येकाला कधी, कुठे, कशात आनंद, सुख, समाधान मिळेल ते सांगता नाही येत. पण त्यांना ज्यात आनंद मिळेल ते त्याने करावे. कोणाला निसर्गात फिरण्यात आनंद मिळतो, तर कोणाला फक्त डोंगर दऱ्या चढण्यात आनंद मिळतो, कोणाला फक्त घरात लोळत राहण्यात तर कोणी कायम हसत खेळत मजेत राहण्यात आनंद मानतात.

आनंदी असण्याचे प्रत्येकाचे मोजमाप वेगवेगळे आहे.

कोणी वस्तू खरेदी करून आनंदी होतं. कोणी भटकंती करून आनंद मिळवतं . कोणाला नवनवीन पदार्थ करण्यात आनंद मिळतो तर कोणाला खाऊ घालण्यात आनंद वाटतो.

जितक्या व्यक्ती तितक्या प्रत्येकाच्या तऱ्हा असतात.

या सगळ्या आनंद व्यक्त करण्याच्या वाटा झाल्या.

मी आनंदी आहे. कसल्याही प्रकारच्या त्रासाशिवाय निरोगी आयुष्य जगतेय म्हणून. आई बाबा प्रत्येक निर्णयात सोबत असतात म्हणून. जीव लावणारी भावंडं आहेत म्हणून. ते प्रेम करणारे निस्वार्थ प्रेम करतात म्हणून. थोडाही चेहरा उतरला तर “तू ठीक तर आहेस ना” विचारणारी मित्र आहेत म्हणून. आणखी काय हवं?

अडचणी कुणाच्या आयुष्यात नसतात? आणि सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टी मला तरी नकोत! सतत आनंद वा मनाला समाधान देणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी, ज्या कधी लक्षात सुद्धा आलेल्या नसतात, त्यांची किंमत अशावेळीच तर कळते.

एक निरोगी शरीर, जे लढण्यासाठी समर्थ असेल. बास्स. जास्त काहीच नको. माझ्यासाठी तोच आनंद आणि तेच समाधान!

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फटाके आणि फाटके… – लेखक : श्री. बापूसाहेब शिंदे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ फटाके आणि फाटके… – लेखक : श्री. बापूसाहेब शिंदे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

परवा सहज बाहेर पडलो. दिवाळी तशी म्हटली तर संपत आली होती.तसंही हल्ली दिवाळी पाचवरून दोन दिवसावर आली आहे.

म्हटलं,जरा सकाळी सकाळी फेरफटका मारून येऊ.

असाच रस्त्याने एकटा चालत होतो. अचानक माझी नजर रस्त्याचा दुसऱ्या बाजूला गेली. 

४-५ पोरं-पोरी.  जेमतेम  ७-१० वयोगटातील असतील…

पोरं तशी फक्त चड्ड्या घालूनच होती आणि त्या पण बऱ्याच ठिकाणी फाटलेल्या, नायतर  ठिगळं जोडलेल्या.पोरींचे कपडे पण तसेच ठिगळंच जास्त होती.

प्रत्येकाच्या हातात झाडू होता आणि ते रस्त्याला पडलेले फटाक्यांचे कागद झाडून  काढत होते.

जेवढा आनंद आमच्या पोरांच्या चेहऱ्यावर फटाके फोडताना दिसत असतो, त्यापेक्षा दुप्पट त्यांच्या चेहऱ्यावर होता.

जणू त्यांच्यातच शर्यत लागली होती, जास्त कचरा कोण साफ करतोय.

मला कुतुहल वाटलं त्यांचा उत्साह आणि ती धावपळ पाहून .

मी सहज रस्ता पार करून त्यांचेकडे गेलो.

सर्वांना बोलावले आणि विचारले,

“का रे,एव्हढी का गडबड सुरू आहे तुमची..?”

हे ऐकून त्यातला एक पोरगा म्हंटला,

”आमचे आई- बाप रस्त्याची साफ सफाई करतात. आम्हाला दिवाळीची सुट्टी आहे,

म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलंय, जो जास्त झाडलोट करेल त्याला भरपूर दिवाळी फराळ आणि नवीन कपडे मिळतील आणि प्रत्येकानं आपल्या आपल्या कचऱ्याचे वेगळे वेगळे ढीग  करायचे.मंग आमचे आय – बाप त्यात काय  फटाके असतील तर ते आम्हाला शोधून वाजवायला देणार…”

हे ऐकून मी सुन्न झालो. त्यातून मी सावरून सहज विचारले,”अरे, तुम्हाला तर फटाके ह्यातले शोधून देणार. मग तुम्हाला नवीन कपडे  आणि फराळ कसा काय देऊ शकतात ते..?” त्यांच्यातली सगळ्यात मोठी पोरगी बोलली,

”काका ते आमचे आई बाप झाडू मारत मारत जे बी घर रस्त्यात येतं,त्यांना विचारतात काय  फराळ उरले असेल तर आमच्या पोरासनी द्या.  कुणी देतो,कुणी असूनही हाकलून देतं.

काही लोक लय चांगली असतेत. ते न इचारता देतात.कपड्याचं पण तसंच. कुणी चांगली  कापड देतं, कुणी फाटलेली मग आमची आई त्याला जमत असल तर शिवते नायतर ठिगळ लावून देते आणि मंग आम्ही ती आमची  दिवाळीची कापडं म्हणून वरीस भर घालून फिरतो…”

हे माझ्यासाठी खूप भयानक होते,

असंही असू शकतं ह्यावर माझं विश्वास बसेना. माझ्या पायाखालची जमीनच सरकली….

सुख – समाधान कशात असतं,हे मला ह्या १० वर्षांच्या पोरांनी दोन मिनिटात शिकवलं होतं.

नाहीतर आम्ही १०० ची माळ आणली तरी त्या मोजत बसतो आणि १-२ फटाके जरी उडले नाही किंवा आवाज जरी कमी वाटला तरी सणासुदीला पण त्या दुकानदाराचा उद्धार करत बसतो…

कपडे तर आम्ही AC शोरूम शिवाय घालतच नाही. त्याशिवाय दिवाळी होतंच नाही, असा  आमचा गैरसमज असतो.

कुठं ती AC त गारठलेले कपडे आणि कुठं ती  ठिगळांची कपडे ज्यातून गारठापण रोखला जात नाही.

पण त्यासाठी त्या छोट्या जिवांची चाललेली धडपड .त्यांची धडपड आणि आमची धडपड पाहून एकच फरक जाणवला, ते आनंदानं समाधानाने मिळेल तेच सुख मानणारी वाटत होते , पण आमची धडपड ही कधीच आनंदी वाटली नाही.कधी चेहऱ्यावर समाधान दिसलेच नाही.

पण धडपडत राहत जायचे हेच आम्हाला माहिती. कारण आम्हाला सुख कशात आहे,

हेच समजत नाही .मी तसाच मागे फिरलो …घरातले सारे डब्बे शोधू लागलो. मिळेल तो फराळ पिशवीत घातला, पोरांचे मिळतील ते ५-६ कपड्याचे जोड, बायकोच्या कपाटातल्या ढीगभर साड्यातल्या ३-४  साड्या, माझी काही कपडे एका पिशवीत भरले आणि थेट त्या  पोरांकडे निघालो.

इकडे माझं काय सुरु आहे, हे माझ्या बायको पोरांना समजत नव्हते .त्यांचा तिकडे दंगा सुरु होता. आमचे कपडे ,खाऊ घेऊन गेले.

मी ते सारं त्या पोरांना दिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं.

मी परत फिरलो आणि जाता जाता त्यांना  सांगितलं, इथून पुढं कोणत्याही सणाला माझ्या  घरी यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दिवाळीचे नवीन कपडे ,फराळ आणि फटाके दरवर्षी मी  देत जाईन …माझे डोळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पाण्याने डबडबले.

स्वतःला सावरत घरी आलो.

आता माझी बारी होती. मला घरी उत्तर द्यायचे होते …मी घरी पोहचणार तोच दारात सारी मंडळी उभी होती. मी तसाच पायरीवर बसलो. दोन्ही मुलांना जवळ घेतलं.बायको फुगून दाराला टेकूनच उभी होती. मी मुलांना जे काय पाहिलं ते सगळं सांगितलं.

आपण आपल्या ऐपतीप्रमाणे भारीत भारी कपडे, दागिने, सुगंधी साबण आणि सुगंधी उटणं लावले तरच दिवाळी होते, असं समजून आपण विनाकारण किती वायफळ खर्च करतो आणि समाजात असे किती तरी लोक आहेत  ज्यांना साधं साबण , तेल अशा साध्या साध्या  त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत.

हे समजावू लागलो. तुम्ही २ फुलबाजे कमी घेतले तरी रुसून बसता पण ती मुलं तुमच्या उडवलेल्या फटक्याच्या ढिगातून एकादी न उडलेली फटाकी मिळेल ह्या आशेने मन लावून तुम्ही केलेला कचरा साफ करत आहेत.

हे समजावण्याचा प्रयत्न करत होतो.

ती पोरं रस्ता झाडत झाडत आमच्या घराजवळ आली होती.आमच्या घरचे सारे टक लावून त्यांचेकडे पाहत होते.

साऱ्यांचे चेहरे पडले होते.

तोच माझा छोटा मुलगा माझ्या जवळून उठला,  थेट घरात गेला आणि लपवून ठेवलेले  एक टिकल्याचे पॅकेट आणि बंदूक घेऊन बाहेर  आला नि सरळ त्या पोरांकडे गेला आणि  त्यांना दिले.

हे पाहून त्या पोरांनी काम सोडलं आणि जणू काय आपल्या हातात हजाराची माळ  पडल्यासारखे एक-एकजण ते टिकल्या  बंदुकीत घालून वाजवत नाचू लागले.

माझा मुलगा तसाच पळत आला नि माझ्या  कुशीत बसून रडायला लागला. त्याला काय समजलं मला माहिती नाही आणि मीही त्याला विचारणं मुद्दाम टाळलं,काहीही असेल…

तरी एक वात पेटली होती याची मला जाणीव झाली होती. ह्या साऱ्यातून एक गोष्ट मला  आणि माझ्या कुटुंबाला समजली. ती म्हणजे  “फटाके”आणि “फाटके”  ह्यात फक्त एका “कान्याचा” फरक असतो आणि तो “काना” एकाद्या “काठी” सारखा असतो योग्य ठिकाणी  लागला तर साऱ्या गोष्टींचा आनंद देणारा  आधार बनतो. नाहीतर ते आयुष्याचं ओझं होतो ….

म्हणून ठरवलं आता कोणताही सण आला की अशा २ का होईना,पण ह्या पोरांच्या चेहऱ्यावर आनंद देण्याचं काम करायचं.

फटाके एकदा पेटले की एकदा मोठा आवाज  करून कागदच होतात पण कोणाच्यातरी  चेहऱ्यावर एकदा पेटवलेले आनंदरुपी समाधान आवाज न करता पण एखाद्या रंगीत फुलबाज्याप्रमाणे फुलत राहतं.

लेखक :श्री.बापूसाहेब शिंदे.

संग्राहिका :सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ परतीचा फराळ – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ परतीचा फराळ – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

परतीचा पाऊस असतो, तसा परतीचा फराळही असतो. आठवणी देऊन जाणारा आणि जाताजाता हुरहूर लावणारा …!

घराघरात कुशल गृहिणी आता डब्यांची अदलाबदल करुन संपूर्ण घराला कन्फ्युज करायला सुरुवात करतात. मोठ्या डब्यांमधला फराळ लहान डब्यात शिफ्ट होतो. निवडणुका संपल्यावर नेतेमंडळी दिसत नाहीत, तसा कालपर्यंत समोर असलेला फराळ आता शोधावा लागतो.

ओल्या नारळाच्या करंज्या एखाद्या सौंदर्यसाम्राज्ञीने आलिशान कारमधे बसून नीट दर्शनही न देता वेगानं निघून जावं, तशा केल्या आणि संपल्यासुध्दा अशा गायब होतात.

चकलीच्या डब्यावर सगळयांचाच डोळा असतो. पण शेवटची चकली खाताना होणारा आनंद प्रचंड असतो. ती खाल्ल्यावर डबा घासायला न टाकता झाकण लावून तो तसाच ठेवणाऱ्याला, फसवणे आणि अपेक्षाभंग करणे या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी, असं माझं मत आहे.

पाहुण्यांसाठी मागच्या रांगेत लाडवाचा डबा लपवला जातो. कारण लहानपणापासून दिवाळी झाल्यानंतर महत्त्वाचे फराळाचे पदार्थ संपल्याचे कळताच येणारे पाहुणे हा एक खास वर्ग आहे हे पटलंय.

प्रत्येक फराळाच्या पदार्थाची एक एक्सपायरी डेट असते ती गृहिणींना अचूक माहीत असते. इतके दिवस विचारावे लागणारे चकलीच्या डब्यासारखे मौल्यवान डबे सहज उपलब्ध होत समोर दिसू लागले की भोळीभाबडी जनता उगाच आनंदून जाते. पण त्यामागे एक्सपायरी डेटचं राजकारण असतं.

डब्यात तळाला गेलेल्या शंकरपाळयांचा डबा चहा केल्यावर मुद्दाम समोर ठेवला जातो. कारण त्याचीही एक्सपायरी डेट जवळ येत असते.

जास्त मीठ मसाला तळाशी असलेला दाणे संपत चाललेला चिवडा कांदा- टाॅमेटो -कोथिंबीरीचा मेकअप करुन समोर येतो. मिसळीचा बेत आखला जातो.

शेव हा प्रकार कधी संपवावा लागत नाही. तो संपतो. पोहे उपमा करुन त्यावर सजावटीसाठी वापरली जात ती संपते.

असा हा ‘परतीचा फराळ’ दिवाळीच्या आठवणींचा… रिकाम्या कुपीतल्या अत्तराच्या सुगंधासारखा…जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचा… जाताजाता पुढच्या वर्षी पुन्हा एकत्र धमाल करु म्हणत एकमेकांचा निरोप घेत डब्यातून बाहेर पडणारा… गृहिणीला केल्याचं समाधान- कौतुक देणारा…आणि शेवटी शेवटी संपत जाताना आणखी चविष्ट होत जाणारा … परतीचा फराळ.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “महिषासुरमर्दन : ५ अलक…” – लेखिका : श्रीमती भारती डुमरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “महिषासुरमर्दन : ५ अलक…” – लेखिका : श्रीमती भारती डुमरे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अलक – 1

स्वतःला ढिगभर साड्या असूनही दसऱ्यासाठी खास घेतलेली 3000₹ची साडी कपाटात ठेवताना, मनाशीच म्हटलं- या अष्टमीला नको आता एखाद्या कुमारिकेला ड्रेस घेत बसायला.त्यापेक्षा घरात आहेत, आपण वापरणार नाही,असे रुमाल त्यातच ओटी भरू. नाहीतरी भांडेवालीच्या पोरीला तर घेणार होतो. पण आता खर्च पण खूप झालाय घरातल्यांच्या कपड्यावर.

तेवढ्यात आवाज भांडेवालीचाच

“ताई आज भांड्याचे पैसे द्या बरं का मला.निदान दोनशे तरी द्या.अहो, गल्लीत एक लै गरीब कुटूंब आलंय त्यांच्या पोरीची वटी भरते. एक फ्रॉक घेऊन देते तिला. 200 रु  द्या लगेच.”

हिने दिले पण हिला जाणवलं-

मनातल्या स्वार्थाचा महिषासुर मारून गेली ती.

अलक – 2

राजगिऱ्याचे लाडू अगदी घरच्यासारखे आहेत ना,.. बघू made कुठलं आहे.अरे वा! आपल्याच शहरातलं आहे. अगदी घरगुती दिसतंय. पत्ता पण दिला आहे.चला. नाहीतरी 200 लाडू उद्या दुकानातून घेणार होते,अनाथाश्रमात द्यायला.आता ह्या पत्त्यावर जाऊन बघू.

बेल दाबताच थरथरता आवाज आला ‘थांबा’,… गोऱ्यापान आजी आल्या . “या, इथेच तयार होतात लाडू. तशी सधन आहे मी.पण नवरा वारला. लेकी सुना त्यांच्या संसारात मग मनातला एकटेपणाचा महिषासुर त्रास देत होता. रिकाम्या डोक्यात छळ मांडायचा विचारांचे. एक दिवस एक गरजू बाई आली दारात काम मागायला. आणि हे लाडू येतच होते.फक्त बळ नव्हतं. मग सगळंच जुळून आलं.लोकांच्या खाण्यात आणि माझ्या विचारात पौष्टिकता आली आणि एकटेपणाच्या महिषासुराचा बिझी वेळेने वध केला नाही का!

अलक – ३

ती नवीनच हजर झाली नोकरीवर. अतिशय बदमाश मुलांचा वर्ग तिला मिळाला. वर्गातल्या भिंतीवरच्या गुटख्याच्या पिचकाऱ्या तिला बरंच काही सांगून गेल्या. ती दोन पोरंच सगळ्या वर्गाला त्रास देतात हे कळलं  तिला. तिने जाहीर केलं- उद्या एक दिवसाची सहल जाणार. कुठे ते सस्पेन्स आहे. ह्या पोरांना तर उधानच आलं. सगळी जय्यत तयारी. फुल गुटखा पुड्यासोबत खिशे भरून. सगळे उत्साहात गाडी थांबली कॅन्सर हॉस्पिटलला. घशाचा, तोंडाचा, व्यसनी कॅन्सर पेशंटला ह्यांनाच प्रश्न विचारायला लावले.सहल संपली. दुसऱ्या दिवशी भिंती स्वच्छ झालेल्या. आजही 20 वर्षानंतरही दोघे येऊन भेटतात. आपल्या व्यसनमुक्ती कार्यक्रमाची रूपरेषा मॅडमला सांगतात. तिला मनोमन वाटतं,पुस्तकी ज्ञान तर देणं कर्तव्यच होतं माझं,पण तरुण पिढीतील हा व्यसनी महिषासुर मारणं जास्त गरजेच होतं नाही का!

अलक – 4

“आई ग, तेंव्हा जुन्या काळी असतील राक्षस. म्हणून देवीने मारलं त्याला. आता कुठे गं राक्षस? मग कशाला हे सगळं करतो आपण?” ” अगदी खरं, मनु, तुझं म्हणणं. पण रोज आपण देवीला तुझ्या आवडीचे पेढे आणले. ते तुला लगेच खायला मिळत होते का?नाही ना? त्यावेळी तुझ्यातला हावरट राक्षस मारला जात होता. तू धिटाईने, सुरात आरती म्हणत होतीस मग तुझ्यातला स्टेजवर भीती निर्माण करणारा राक्षस देखील मारला गेला. तिची पूजा,तिला हार,फुलं, रांगोळी, सगळं उत्साहाने करताना आपल्यातला आळशी राक्षस पण मारलाच गेला ना? “

मनु म्हणाली, “अग बाई आई,बाबाला पण रोज एक तास आरतीला द्यावा लागला मग त्याचाही मोबाईलबाबा हा राक्षस थोडे दिवस तरी पळाला ना?”आई हसत म्हणाली,” अग बाई, खरंच की!”

अलक – 5

“माझ्याशिवाय घरात काही नीट होणार नाही.बघा तुम्ही,”असं म्हणणाऱ्या छायाताई पडल्या पाय घसरून.ऐन दुसऱ्या माळेला.सगळं सूनबाईवर आलं. निमूटपणे, आरडा ओरडा न करता तिने सगळं नवरात्र व्यवस्थित केलं. छायाताई नवऱ्याला म्हणाल्या,” आपला उगाच भ्रम असतो नाही का, माझ्या शिवाय काही होत नाही.खरंतर आपण निमित्त. करता करविता तोच ना!”नवऱ्याला एवढ्या वर्षांनी तिच्यातील अहंकाराचा महिषासुर मेलेला दिसला.

असे अनेक महिषासुर स्वभावातून, सवयीतुन दिसत असतात जे वाईट असतात . त्यांना संपवणे हेच नवरात्रीचं नव्हे तर अहोरात्री प्रयत्न व्हायला पाहिजेत.

लेखिका – सुश्री भारती डुमरे

संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ – सगळं मला कळतं बाबा… – कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ – सगळं मला कळतं बाबा… – कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सगळं मला कळतं बाबा 

खूप खूप दमलास तू 

जिद्द पुरी करता करता 

 प्रमाणाबाहेर थकलास तू. 

‘पेक्षा’जास्त ही अपेक्षा 

नकोच आता काही काळ 

तू मी,… मी तू…

आणि आपली संध्याकाळ !

कातरवेळी सांगीन गोष्ट 

उतरून जाईल सारा शीण 

मांडीवरती डोकं ठेऊन 

विसरुन सारं गाssढ नीज. 

गोष्टी मधल्या सात पर्‍या

आणतील खाऊ तुझ्यासाठी 

तुला जवळ घेऊन होईन 

तुझ्यापेक्षा थोsडी मोठी. 

 टेकीन माझे ओठ अलगद 

तुला झोप लागल्यावर

विश्वामधल्या सर्वात सुंदर 

 सर्वश्रेष्ठ चषकावर !

कवयित्री – सुश्री प्रणिता कुलकर्णी

पुणे

२२/११/२०२३

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पॉझिटिव्ह थॉट्स… मूळ इंग्रजी लेखक : श्री मायकल क्रॉसलँड — मराठी अनुवाद : अज्ञात ☆ प्रस्तुती:श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

पॉझिटिव्ह थॉट्समूळ इंग्रजी लेखक : श्री मायकल क्रॉसलँड — मराठी अनुवाद : अज्ञात ☆ प्रस्तुती:श्रीमती प्रफुल्ला शेणॉय 

मला कधीही बरा न होऊ शकणारा कॅन्सर झाला होता. डॉक्टर म्हणाले, “या मुलाला घरी घेऊन जा. स्पेन्ड टाइम विथ हिम. आम्ही आता काहीही करू शकत नाही.”

ह्या जगात निर्णय घेण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. पण जो आपलं, आपल्या माणसांचं अन् या जगाचं भवितव्य बदलू शकतो, असा निर्णय फार कमी लोक घेऊ शकतात.

असाच एक निर्णय माझ्या आईने घेतला. माझ्या आईने डॉक्टरांना विचारले, “माझ्या मुलाच्या जगण्याचे किती चान्सेस आहेत?”

डॉक्टरांनी ९६% माझा मृत्यूच होईल असे सांगितले.

माझ्या आईने त्या ९६% कडे न पाहता उरलेल्या ४% कडे पाहिले आणि मला घरी घेऊन आली.

अमेरिकेतून आलेल्या एका डॉक्टरांनी माझ्या आईची भेट घेतली.

त्यांनी माझ्या आजारावर एक औषध टेस्ट करतो आहे, असे सांगितले. अजून ते औषध माणसांवर ट्राय केलेले नव्हते, फक्त प्राण्यांवर ट्राय झाले होते. ते डॉक्टर केवळ २५ मुलांवर ते औषध ट्राय करणार होते. एकही क्षण न घालवता आईने डॉक्टरांना तत्काळ होकार दिला.

पहिल्या महिन्यात २५ पैकी २० मुले दगावली. काही दिवसात अजून ४ गेली. मी एकटा उरलो होतो. रोज डॉक्टर येत आणि त्यांची बॅग उघडून औषध काढून देत असत.

इंग्लिश डिक्शनरीतल्या Love या शब्दापेक्षा Hope हा शब्द जास्त पॉवरफुल आहे, असे मला नेहमी वाटते.

लोकांना वाटते, मी वाचलो कारण मी लकी होतो. पण मी लकी नव्हतो मित्रांनो, माझ्या आईने मला लकी बनवले.

ज्या औषधाने २४ मुलांचे प्राण वाचू शकले नाहीत, ते औषध हृदयावर दगड ठेवून ती रोज मला टोचत होती.

मग तो दिवस उजाडला आणि डॉक्टरांनी मला, मी बरा झालोय अशी बातमी दिली.

पण मला सोडताना ते माझ्या आईला म्हणाले, “हा मुलगा कधीही खेळू शकणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही. याने आपले टीन एज पाहिले तरी तो एक चमत्कार असेल.”

पण आपण चमत्कारांवर विश्वास ठेवतोच.

मी दवाखान्यात असतांना आईने मला एक वेलक्रो ग्लोव्ह आणि बॉल आणून दिला होता. तो मी तिच्याकडे फेकायचो. हळूहळू आईने अंतर वाढवले आणि माझ्यासमोर आव्हान उभे केले. मला त्या आव्हानांना चेस करून जिंकणे आवडू लागले.

मग एक दिवस मी आईला म्हणालो, “आई माझे एक स्वप्न आहे, मी अमेरिकेत बेसबॉल खेळणार!”

मित्रांनो, तुम्ही आयुष्यात काय करू शकता हे कोणीच सांगत नाही. पण तुम्ही काय करू शकणार नाही, हे मात्र सगळेच सांगत सुटतात.

माझ्या स्वप्नात अनेक अडथळे आले. मला ताप यायचा.मला मेंदूज्वर झाला. माझ्या आयुष्यात मला पहिला हार्टअटॅक आला, तेव्हा मी फक्त १२ वर्षांचा होतो.

लोक म्हणत होते, मी हे करू शकणार नाही, मी मात्र तेच करण्यासाठी झटत होतो.

वयाच्या १७ व्या वर्षी मी अमेरिकेत बेसबॉल खेळायला गेलो.

एक स्वप्न सत्यात उतरले. पण आयुष्य हे रोलर कोस्टर सारखे असते. क्षणार्धात तुम्ही करिअरच्या उत्तुंग शिखरावर असता आणि दुसऱ्या क्षणाला आयुष्य तुम्हाला जमिनीवर आणून आपटतं .

ज्या बेसबॉलसाठी मी झटलो, त्याच बेसबॉल ग्राउंडवर मला वयाच्या १८व्या वर्षी माझे करियर संपवणारा दुसरा हार्टअटॅक आला. मला घरी परत पाठवण्यात आले. नियती माझ्याशी अत्यंत ‘अनफेअर’ वागते आहे, असे मला वाटायला लागले.

मी डिप्रेशनमध्ये गेलो. रोज झोपतांना मी प्रार्थना करायचो, देवा मला उचलून घे. पण दुसऱ्या दिवशी मला जाग येत असे. तो परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकत नव्हता आणि मला मृत्यू येत नव्हता.

पण परत एकदा मला माझा परमेश्वर इथेच भेटला आईच्या रुपात. तिने मला या नैराश्यातून बाहेर काढले.

नंतर मी बँकेची नोकरी जॉईन केली.

एक दिवस एक उंचापुरा माणूस, जो आमच्या बँकेचा सीइओ होता, त्याचे मला बोलावणे आले. आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये बसलो. त्याने प्रश्न विचारला, “डाऊन द लाईन पाच वर्षे तू कुठे असशील?”

मी विचार केला आणि मला आईचे शब्द आठवले. दगड मारायचाच असेल तर चंद्राला मार. चंद्राला नाही लागला, तर किमान कुठल्यातरी ताऱ्याला तरी लागेल. मी बॉसला म्हणालो, “तुमच्या खुर्चीत!”

मित्रांनो, असे बॉसला म्हणू नये, कारण ते कोणत्याही बॉसला आवडत नाही. माझ्या बॉसला पण आवडले नाही. त्याने माझा द्वेष करायला सुरुवात केली. तो मला त्रास द्यायला लागला.

पण मित्रांनो, हा द्वेष आणि होणारा त्रासच माझ्या महत्त्वाकांक्षेचे फ्युएल ठरले. मी बेदम काम करायला लागलो.

वर्षभरात मी ऑस्ट्रेलियाचा यंगेस्ट बँक मॅनेजर झालो, दोन वर्षात यंगेस्ट एरिया मॅनेजर, तीन वर्षांत यंगेस्ट स्टेट मॅनेजर, चार वर्षात यंगेस्ट नॅशनल मॅनेजर झालो.

वयाच्या २३ व्या वर्षी माझ्या हाताखाली ६०० माणसे काम करत होती आणि मी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड मिळून आमच्या बँकेच्या १२० ब्रांचेस सांभाळत होतो.

माझ्याकडे मिलियन डॉलरचे घर होते, अरमानीचे सुट्स होते, रोलेक्सचे घड्याळ होते, लाखभर डॉलरची कार होती.

पण हे यश मटेरियलास्टिक होते. आपण ज्या जगात राहतो त्या जगाने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण त्या जगाला काय दिले याचा विचार करणे जास्त महत्वाचे नाही का?

हे जग माणसांसाठी राहण्यासाठी जास्त चांगली जागा कशी होऊ शकेल, याचा विचार करणे जास्त महत्वाचे आहे. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य वेचले त्यांना आपण काहीतरी द्यायला हवे.

मागील १६ जूनला असा एक क्षण माझ्या आयुष्यात आला.

जी माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे, अशा qमाझ्या आईसाठी मी एक आलिशान घर घेतले.

मी आईपासून एक गोष्ट लपवली होती. मी ७ वर्षाचा असतांना डॉक्टरांनी आईला जे सांगितले होते, ते मी ऐकले होते. पण मला काहीही माहीत नाही अशा आविर्भावात मी आईला विचारले होते, ” आई डॉक्टर काय म्हणाले?” त्यावर आई म्हणाली होती, “काही नाही, सर्व ठीक होईल.”

मला पहिला हार्टअटॅक आला, तेव्हाही आई म्हणाली होती,” सर्व ठीक होईल”. “सर्व काही ठीक होईल” हे तिचं वाक्य माझ्यावर ऋण होते. पण दैव बघा, यावर्षी मला तिचे हे ऋण फेडण्याची संधी मला मिळाली.

आईच्या घश्यात ४ ट्युमर डिटेक्ट झाले. आईने विचारले, “डॉक्टर काय म्हणाले?” मी म्हणालो, “सर्व काही ठीक होईल.”

तुम्ही किती वेळ या पृथ्वीतलावर जगलात, याला महत्व नाही.इथे असताना तुम्ही काय केले याला सर्वात जास्त महत्त्व आहे.

तुमचे आयुष्य तुम्ही रिमार्केबल जगता की नाही हे महत्त्वाचे आहे.

आपण घेतलेला एकूण एक श्वास, एकूण एक संधी महत्वाची आहे. आपल्याला मिळालेले हे आशीर्वाद आहेत. आपण या आशीर्वादांचे सोने करू शकतो की नाही हे महत्वाचे.

आज इथे मी तुम्हाला आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्याचे सोने करा, किमान माणसासारखे जगा. तुमच्या जगण्यावर, तुम्हाला आणि तुमच्या येणाऱ्या पिढीला गर्व वाटेल असे काही करा.

मित्रांनो, मी आहे मायकल क्रॉसलँड !!!

Michael Crossland is an Author of the best seller book, everything will be Ok: A story of Hope, Love and Perspective.

मूळ इंग्रजी लेखक :श्री. मायकल क्रॉसलँड

संग्राहिका : श्रीमती प्रफुल्ला  शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गरज… — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

एका मैत्रिणीच्या आईचे परवा 95 व्या वर्षी निधन झाले. वडील आधीच निवर्तले होते. 65 वर्षांच्या त्यांचा सहजीवनातला संसार आणि विस्तार म्हणजे तीन लेकी, दोन लेक, आठदहा खोल्यांचा प्रशस्त बंगला, प्रत्येकाचे स्वतंत्र शयनकक्ष, कपाटे, तेवढे कपडे, कार्यप्रसंगी 100 माणसे जेवू शकतील एवढी भांडी, फर्निचर, बाग, हौसेमौजेने तीर्थयात्रा, पर्यटन करून आणलेल्या शोभेच्या वस्तू, प्रचंड माळे, आधीच्या दोन पिढ्यांचे ऐवज, वस्तू, सामान…पण आता सर्व मुलेबाळे स्वतंत्र व स्वतःच्या कार्यक्षेत्रांत मग्न, यशस्वी व अत्यंत व्यस्त जीवनक्रम असलेली !

आईपश्चात वर्षभर रिकामे, प्रचंड घर आवरायला कुठून सुरुवात करावी हा यक्षप्रश्नच !!

कपाटातल्या पाचशेच्या वर साड्या आता कुणीही घेऊ इच्छित नाही, 100 माणसांच्या स्वयंपाकाची घरात कुणीही उस्तवार आता करणार नाही, जुने अवाढव्य फर्निचर आता कुणाच्याच घरात मावणार नाही, शोभेच्या वस्तूंकडे निगराणी करण्यास वेळ नाही, मोठाले खरे दागिने बाळगून किंवा घालून मिरवणे सुरक्षित नाही, बाग मेंटेन करायला मनुष्यबळ नाही, अडगळी साफ करायला कष्टांची शारीरिक क्षमता नाही…असे अनेक नकार व फुल्या मारल्यावर मग जेवढे चांगले व शक्य तेवढे गरजू संस्था व संसार असलेल्या लोकांना देण्यात आले, आठवण म्हणून आईची एक साडी घेण्यात आली. असे करता करता त्या घराची सात दशकांची घडी मिटवण्यात आली !

या उस्तवारीत प्रचंड मनस्ताप, कठोर निर्णय, नकार, उस्तवार आणि शारीरिक व मानसिक कष्ट तसेच थकवा आणि ताण मुलांना सोसावा लागला. या सगळ्यांपेक्षा सर्वाधिक मौल्यवान असा त्यांचा वैयक्तिक वेळ त्यांना वाया गेल्याची भावना निर्माण झाली. ज्या पिढीने हे सगळे जमवण्याचा अट्टाहास करण्यासाठी कष्ट झेलले ती पिढी काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सांगतांना ‘ती’ मैत्रीण खरेच दुःखी, खिन्न व अंतर्मुख झाली होती.

यातून काही बोध घ्यावा असे वाटले तो म्हणजे…

१) गरजा कमी हीच आनंदाची हमी.

२) घर हे माणसांचे वसतिस्थान आहे, वस्तूंची अडगळ नव्हे.

३) आपल्यासाठी वस्तू आहेत, वस्तूंसाठी आपण नाही… नाहीतर अवघे आयुष्य साफसफाई करण्यात आणि वस्तू राखण्यात जाते.

४) प्रवासात फक्त सुंदर क्षणांचा संचय करा, शोभेच्या वस्तूंचा नव्हे.

५) जितकी अडगळ कमी तेवढा तुमचा आत्मशोध सुलभ.

६) विकत घ्यायच्या आधी ‘का’, ‘कशाला’, ‘हवेच का ?’चा माप दंड लावावा.

७) साधेपणा, सुसंगतता आणि सुयोजकता हे नियम पाळावेत.

८) दान हे संचय करण्यापेक्षा कधीही श्रेष्ठच मानावे.

९) आजचा संचय उद्याची अडगळ.

१०) दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी स्वतःच्या कष्टाचे पैसे अजिबात खर्चू नयेत.

११) जेवढ्या वस्तू कमी तितके घर मोकळा श्वास घेते, माणसे शांत व समाधानी असतात, मानसिक विकार व नैराश्य येत नाही.

१२) सुटसुटीत, मोकळे घर म्हणजे पैशाची, मनुष्यबळ ऊर्जेची व वेळेची बचतच.

हा वेळ तुम्ही परस्पर मानवी संबंध, सुसंवाद, छंद जोपासणे, व्यायाम, आरोग्य सुधारणे यासाठी देऊ शकता.

१३) किमान गरजा ही lजीवनशैली काळानुसार अत्यावश्यक गरज ठरणार आहे.

१४) शाश्वत सुखाचा राजमार्ग हा ‘समाधान’ नावाच्या गावातूनच जात असतो.

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ न्यूट्रल थिंकिंग… लेखिका : डॉ. स्वाती गानू ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

‘There are always flowers who want to see them’ असं म्हणतात. आठ दिवसांपूर्वी जेव्हा बारा वर्षांचा सारंग खोली न आवरता, आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता.तो मात्र अनभिज्ञ होता यापासून. आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसूदपणे पटवून देत होता मित्रांना.ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती अगदी न्यूट्रल होऊन.जणू तो अनोळखी होता. तिला वाटलं आपल्या माणसाकडे असं न्यूट्रल होऊन पाहण्यात काही वेगळंच फीलिंग आहे.आपण नेहमी हक्काने ‘तुझं कसं चुकलंय,तू हे असं बोलायला हवं होतंस,अशा पद्धतीने करायला पाहिजे होतं,या प्रकारे वागायला हवं होतं,’ असं सहज बोलून जातो,अपेक्षा करतो.जजमेंटल होतो.लेबलिंग करुन मोकळं होतो.आज जेव्हा आईने आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला, तेव्हा तिला सारंगची चांगली बाजूही दिसली.असं न्यूट्रल होऊन बघण्यात एक वेगळीच मजा आली.ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला ‘काय केलंय आज भाजीचं, बघू या’ म्हणणारे सासरे त्यांच्या असिस्टंटला पत्राचा मसुदा सांगताना आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली. त्यांची कायद्यातील जाण,ज्ञान, त्यांचं ड्राफ्टिंग पाहून ती थक्कच झाली.मोठी मुलगी अरुणिमा, चहाचा मग तासनतास थंड करुन पिते आणि तो स्वयंपाकघरात आणायला विसरते,कधी कधीतर तो तिच्या कपाटात सापडतो.आईला भयंकर संताप येतो. संध्याकाळी ती जेव्हा चित्रा सिंगची गझल गात होती, तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला भिडून गेली.नवरोबा सलील त्याला ओपन डोअर सिन्ड्रोमच आहे.सगळ्या खोल्यांचे, कपाटाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो.याचं काय करावं?नुसती चिडचिड होते.त्याची ऑनलाईन काॅन्फरन्स सुरु होती.युरोपियन स्टुडंट्ससमोर बिहेवियरल थेरपीचं त्याचं विश्लेषण कमाल होतं.पुन्हा ती न्यूट्रल झाली. तिला ओपन डोअर सिन्ड्रोमचं हसू आलं.तिने आणलेल्या भाजीला नावं ठेवणा-या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल, या विचाराने ती वैतागून जायची. पण गीतेचा भावार्थ समजावताना तिला त्या गार्गी,मैत्रेयीच वाटायच्या.आज हा नवाच खेळ ती आपल्या मनाशी खेळली.

आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र, चोवीस तास असतो,मित्रमैत्रिणींबरोबर ,नातेवाईकांबरोबर कधीकधी वेळ घालवतो.लक्ष बहुतेकवेळा निगेटिव्ह गोष्टी दोष,वीक एरियांजवर चटकन जातं.’घर की मुर्गी दाल बराबर ‘ या उक्ती प्रमाणे आपण घरच्यांबद्दल विचार करताना प्रेज्युडाईज अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहत असतो.ते अगदी ऑबव्हियस आहे. कारण तुम्हाला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं.पण न्यूट्रल होऊन या नात्यांकडे पाहिलं, तर नवं असं काही सापडायला लागतं.प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच. फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं.ही विजन जाणीवपूर्वक तयार करावी लागते.एखादी व्यक्ती आपल्याला खटकते, ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो, तर त्या व्यक्तीच्या सवयी,वृत्ती,स्वभावाचा तो राग येत असतो. पण हे आपल्या लक्षात येत नाही.म्हणूनच न्यूट्रल होऊन माणसांकडे अधूनमधून पाहिलं, की ‘दूध का दूध और पानी का पानी ‘ दिसायला लागतं.हे परस्पेक्टिव्ह एक आणखी गोष्ट तयार करते ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन.तुम्हाला वाटतं की मी सर्वगुणसंपन्न. माझं कधी काही चुकतच नाही.पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपले आपणच सापडायला लागतो.ते ॲक्सेप्ट करणं, स्वतःकडे असं पाहता येणं हे जमायला हवं.स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे विवेकाचं लक्षण आहे.

नाती गुंतागुंतीची असतात.ती सांभाळणं तारेवरची कसरत असते.अशावेळेस न्यूट्रल गेम  खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती, वस्तू,नाती,

परिस्थिती,प्रसंग यांच्याकडे पाहणं यातून आपलीच माणसं आपल्याला कळायला लागतात.शिवाय आपला दृष्टिकोनही बदलायला लागतो.आपण मॅच्युअर्ड होतो.माणूूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढे जात असते.पॅाझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग यासारखाच तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग. जे असतं जजमेंटल फ्री, रॅशनल, चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारं .कोच हे प्लेअर्सकरता, बिझिनेसमन हे एम्प्लॉईजकरता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॅार्मन्स सुधारत असेल तर आपण हा प्रयत्न जरूर करुन पहायला मुळीच हरकत नाही.

I think one can enjoy this Neutral Thinking Game and understand other persons better!

लेखिका:डॉ. स्वाती गानू

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print