सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कधी ही दाद ‘ अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..’ अशी खानदानी असते. कधी ‘असा बालगंधर्व आता न होणे..’ अशी काव्यात्म असते ,कधी ‘ आपके पाँव देखे, बहुत हसीन हैं , इन्हें जमींपर मत उतारिए,मैले हो जाएंगे,’ अशी रूमानी असते, तर कधी ‘ इक रात में दो-दो चाँद खिले’ अशी अस्मानी असते.

परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात  थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती. ‘बिच्चारी,’ अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच, लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले,”Your attire is so beautiful!! I like it! ” मला अशी चकित, आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास  करून गेली.

मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. ‘कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान’ असंच  म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढराशुभ्र ,चमकदारदाट बॉबकट आणि      

चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव!  बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं,”Excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. ” तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि  मला म्हणाली,” good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!” आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!

त्या दिवशी कोल्हापूरच्या ‘ ओपेल’ होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये ‘दहीबुत्ती’ हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार  कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला  🙂 )मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- ‘शेफसाहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! ‘तेरे हात मुझे  दे दे ठाकुर!’ असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ‘ टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले,”कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला,” तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?” मी म्हटलं,” त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!”

माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं, “वैष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल, असं नाही वाटत मला.” वैष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,

मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का, अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या, “मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,

वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला,” एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही.” त्या पुढे म्हणाल्या,” मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील.” मी चकित! वैष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण….! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!

बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची.

कोण प्राध्यापिका असतील,कशा   शिकवणा-या असतील अशा विचारात असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, “मी—. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे.”

माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या, खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकौशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं,” बाई,तुम्ही किती छान शिकवलंत…” आणि मला पुढे बोलवेच ना !  माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत…!!

लेखिका : सुश्री संजीवनी बोकील

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments