श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’, गाणे गात एक भिकारी जात होता. आजीने या गाण्यातील तत्त्वज्ञान छोट्या बंड्याला सांगितले आणि म्हटले, “अरे, असे भिक्षा मागून पोटाला भरणार्‍या, हातावर पोट असलेल्या , पोटाचा प्रश्न असणार्‍या , सगळ्यांना मदत करणे आपली संस्कृती आहे. आपल्या पोटासाठी केलेल्या अन्नातील काही अन्न भुकेल्यांना गरजूंना द्यावे म्हणजे मग त्यांचे समाधानाने भरलेले मन पाहून आपले पोट भरते.”

बंड्याला जरी सगळे समजले नाही तरी त्याने काही अन्न पोटात कावळे ओरडणार्‍या त्या भिक्षेकर्‍याला दिले.

नंतर त्याची पोटपूजा चालू झाली तशी आजी अजून त्याच्या पोटात शिरत म्हणाली, “तुला भूक का लागली?” बंडू म्हणाला, “काल पासून पोट उपाशी आहे म्हणून.” “बरोबर. म्हणूनच तुझे पोट खपाटीला गेले ना? अरे, आपल्या लेकरांच्या, आई वडिलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील पोटाला चिमटा घेऊन काम करत असतात बरं.

म्हणून घरात सुखशांती समृद्धी येण्यासाठी, तुला काय सांगते ते ऐक. पोट भरलेले असले ना , किंवा पोटात चारघास घातलेले असले ना की सगळे सुलभ होते. पण त्यासाठी आधी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत. आधी पोटोबा मग विठोबा करू नये. देवाने सगळ्यांना पोट दिले आहे ना? सगळ्यांचे जीवन हे कशासाठी? पोटासाठी असते. तरी सगळ्यांना सारखे मिळत नसल्याने कोणाला पोट मारावे लागते, कोणाला पाणी पिऊन पोट भरावे लागते याचेच भान ठेऊन पोट तडीला लागेल एवढे खाऊ नये. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणून आपल्या अन्नातील काही भाग कायम दान करावा. दुसरे असे की आपल्यापेक्षा दुसर्‍यांकडे जास्त आहे म्हणून आपले पोट दुखू देऊ नये. कोणाच्या पोटावर पाय देऊ नये. कोणाला शिक्षा करायची झालीच तर एक वेळ पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.

तुम्ही पोटची पोरं रे. तुम्हाला अशी जीवनसुत्रे लहानपणापासूनच समजलेली बरी,”असे सांगून तिने बंड्याला पोटाशी धरले. 

आजी पुढे म्हणाली,”जे सुखवस्तू कुटुंबातले असतात त्यांची पोटे सुटलेली असतात. पोटाचा नगारा झालेला असतो. त्यांना गरीबांची दु:खे समजत नाहीत. ते अप्पलपोटीपणा करतात . आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोटपोट लोक पोटात एक ओठात एक नितीने वागतात . स्वत: च्या फायद्यासाठी ते दुसर्‍यांची पोटे जाळतात मग त्यांना पोटा ( कायदा) लागतोच. “

आजीने पोटतिडकीने सांगितलेले सगळे बंड्याला पटले. एका अनामिक हुरहुरीने त्याच्या पोटात कालवले. त्याचे समाधान पोटात न राहता चर्येवरून ओसंडत होते.

तेवढ्यात बंड्याची १३-१४ वर्षाची बहीण सोनी पळत पळत आजीच्या कुशीत शिरली. तिच्या पोटात भीतीने गोळा आला आहे हे समजत होते.आजीने विचारले, “सोनी, काय झालं बाळा?” सोनी म्हणाली, “आजी, मला आताच लग्न नाही करायचे. मला शिकायचंय.”

आजी म्हणाली, “हो की. अगं, अजून तुझं वय पण नाही झालं.”

“पण तो लखूशेठ आहे ना त्याच्या पोटात काही काळंबेरं आहे. तो लग्नाची गोष्ट घेऊन अण्णांकडे आला आणि अण्णांनी पोटदुखीवाला औषधाला आला त्याच्या बेंबीवर आयोडिनचा बोळा सारखे लगेच ‘आमच्या सोनीशी करशील का लग्न?’ विचारले आन तो तयार झाला.”

आजीचाही भीतीने पोटशूळ उठला.उगाच पोट गुरगुरू लागले. आजी म्हणाली, “मी समजावीन हो अण्ण्याला. तू नको भिऊस.”

अण्णाला समजावून आजीने ते संकट दूर लोटले. तर सोनीची चुलत बहीण मोनी-सात महिन्याची  पोटूशी- ती आजीपाशी आली. आजी गमतीनं म्हणाली, “आता जे काय आहे,ते अजून दोन महिने पोटातच ठेव बाई. मग दोन महिन्यांनी ते पोटात मावेनासे झाले की येऊ दे पोटातले मांडीवर.”

सगळेच पोट धरून हसले.

आजी मोनीला म्हणाली, “अगं मोने, तुमचा तसा नवाच संसार आहे. त्यात आता खाणारे तोंड वाढणार. म्हणून तुला पण चार गोष्टी सांगते बाई.  नेहमीच गोगलगाय पोटात पाय, असं असू नये.  तसेच पाठी येईन पोटी येईन पण सूड घेईन असे विचारही पोटात ठेवू नकोस. त्या बाळावर असले संस्कार करू नकोस. पण नवर्‍याला पोटाला न खाता  खर्च करण्याच्या वृत्तीपासून पोटातले ओठावर आणत घडाघडा बोलून दूर करण्याचा प्रयत्न कर.

अगं,प्रेमाचा मार्ग पोटातूनच जातो. तर प्रेमाने पोटात शिरून हे तू सहज साध्य करशील.

बरं, चल. तुला काहीतरी खावंसं वाटत असेल ना? तुझ्या पोटाच्या नावाखाली सगळ्यांच्या पोटाच्या वळलेल्या दामट्या सरळ करू. सगळ्यांनाच पोट खळबळल्याची जाणीव झाली. पोटार्थी असलेले सगळे खाण्यासाठी सज्ज झाले.  खरं तर आजीचं वयाने पाठ पोट अगदी एक झालं होतं.पण काटक आजीने मस्त चमचमीत झणझणीत थालीपिठं केली. हे आजीचं प्रेम सगळ्यांनीच पोटात बांधलं. त्यावर आडवा हात मारताना पोटात जागा नव्हती, तरी चार घास जास्तच खाल्ले. पोट डम्म झालय, म्हणत दिलेल्या तृप्तीच्या ढेकराने आजीच्या पोटात आनंद मावेनासा झाला.

लेखिका: सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments