मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणून मोबाईल काढला…. बघतो तो हँग झालेला… बापरे..  बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना …. 

काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, ‘ कोण हाय …? ‘ मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी…. 

आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं , “ काय बाई ही काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस … घाबरलो ना मी…! “

तशी म्हणाली, “ आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती. या टायमाला मी हितंच बसून भाकर खाती… मापी करा, मी जाती दुसरीकडं … “ मी ओशाळलो, म्हटलं, “ नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे… “

तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो “ डोळे कशानं गेले?”  म्हणाली,” लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं. लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली. नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, १७ वर्साची व्हते मी तवा…. “

“ अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली… बेअक्कल असतात लोकं…”  मी सहज बोलुन गेलो. 

यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल. पण नाही..  ती म्हणाली, “ नाय वो, कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया … “ ती हसत म्हणाली…

…. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई ?

तरी मी म्हणालो, “ मग भगताचं काय … ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? “

म्हणाली, “ आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त … माज्या नशीबाचे भोग हुते ते … त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई… ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात… आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?” 

‘ Intention is important behind every action ‘ .. 

.. या वाक्याचं सार या बाईने किती सहज सांगितले …!!!

“ पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला? “

म्हणाली, “ न बघता? काय बघायचं राहिलंय … आवो सगळं बगुन मनात साटवलंय …. वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय …. तुमी काय बगीतलं ह्यातलं …? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? “

…… तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 

“ आज्जी तुमचं लग्न ….? “ मी चाचरत विचारलं… आज्जी म्हणाली, “ झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला …. पदरात एक पोरगी टाकली. त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती … म्हणलं चला चांगलं दिवस आलं … पन त्योबी दोन वर्षातच गेला…… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला…. ! “  

“ आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? “  आज्जी भकास हसली, म्हणाली,” तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला … आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील …. स्वर्गात म्हणं नाच-गाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा…..”  असं म्हणून आज्जी हसायला लागली… 

…. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना…. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार ! 

“ आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा पण ? “

“ कुणाचाच न्हाई. परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… भाकर मिळाली तर म्हणायचं .. आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु….दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही…” 

“ ते कसं आज्जी ? मला नाही समजलं …”

“ ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन… आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? “

.. .. काय बोलावं मलाच कळेना. या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? ‘वयामुळं हा पोक्तपणा आला असेल, की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?’ …. 

…… कारण काहीही असो ..  एवढ्या सुंदर विचारांची, वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी ती आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आमची सरोजखान… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

 

? मनमंजुषेतून ?

☆ आमची सरोजखान…! ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

 

Is fat really the worst thing a human being can be ? लठ्ठ असणं हाच माणसाचा सगळ्यात मोठा दोष असू शकतो का ? हॅरी पॉटर पुस्तकमालेच्या प्रख्यात लेखिका जे के राऊलिंग यांना पडलेला प्रश्न.

आणि या प्रश्नाची आठवण होण्याचं कारण होती शाळेतली आमच्या नववीच्या वर्गात असलेली मोहिनी. ती शब्दशः खात्यापित्या घरची होती, मस्त गुबगुबीत, गोलू गोलू होती. आम्ही सगळे तिला मोहिनी नव्हे तर गोलिनीच म्हणायचो.

वर्गातली, शाळेतली सगळीच मुलं तिला वेगवेगळ्या टोपणनावांनी चिडवायची. एवढंच काय, कधी कधी तर वर्गात शिक्षकही तिच्या वाढत्या वजनाची टिंगल करायचे. 

या सगळ्याचा परिणाम म्हणून ती कोशात जात गेली, कोणाशी मिसळत नसे, कोणत्या ॲक्टिविटीत सहभागी होत नसे, ना स्पर्धक म्हणून ना प्रेक्षक म्हणून. 

पण यंदा नववीचे वर्ष होते, बहुधा पुढच्या वर्षी मान मोडून अभ्यास करायचा म्हणून असेल, या वर्षी स्नेहसंमेलनात तिनं चक्क वैयक्तिक नृत्य (सोलो डान्स) सादर करणार म्हणून नाव नोंदवलं.

मी स्वतः निवेदक असणार होतो, त्यामुळे सरावापासून ते प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवसापर्यंत मला सगळ्याच गोष्टी जवळून न्याहाळता येणार होत्या. 

ज्यांना ज्यांना मोहिनी डान्स करणार आहे हे कळलं ते सगळेच तिने सरावासाठी नोंदवलेल्या वेळी, सगळं कामधाम टाकून तिथे उपस्थित होते. 

स्टेजवर लाईट होता, बाकी प्रेक्षागृहात अंधार होता. स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारेच प्रेक्षागृहात आपल्या सरावाची पाळी येण्याची वाट पाहत बसले होते.

मोहिनी स्टेजवर आली, त्या प्रखर प्रकाशाला ती adjust होत होती तोवरच अंधारातून आवाज आला, “स्टेजचा विमा उतरवला आहे ना रे ? आज तुटणार ते.”

ती गोरीमोरी झाली. 

“नाही रे, त्याच्या आधी ही जाडी अम्माच फुटेल.”

मोहिनीला या कुचेष्टा सहन झाल्या नाहीत, ओक्साबोक्शी रडत, चेहरा ओंजळीत लपवत ती तिथून जी पळून गेली ती परत सरावाला आलीच नाही. 

माझ्या दृष्टीने तिच्या सहभागाचा तो the end होता. 

प्रत्यक्ष स्नेहसंमेलन आमच्या शहरातील प्रख्यात नाट्यगृहात होते. अगदी बाल्कनीसुद्धा खचाखच भरली होती. विद्यार्थी – पालक सगळेच आले होते. कार्यक्रम सुरू झाले. हशा, टाळ्या, हुर्रे, हुर्यो – सगळं पूर्ण जोशात होतं. आणि माझं लक्ष कार्यक्रम पत्रिकेतील पुढच्या नावाकडे गेलं. चक्क मोहिनीचं नाव होतं. मी चक्रावलो, सरांना म्हटलं, ” सर, ती नंतर कधीच सरावाला आली नाही. ती आज तयारी न करता स्टेजवर आली, तर फार फजिती होईल तिची, सर.”

सर काही उत्तर देणार एवढ्यात चालू असलेला कार्यक्रम संपला आणि दुसऱ्या निवेदकानं मोहिनीचं नाव घोषितसुद्धा केलं.

आणि सरावाच्या वेळचीच पुनरावृत्ती झाली. मोहिनी स्टेजवर येताच प्रेक्षकांत एकच खसखस पिकली. काहींनी उपहासाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली, हुर्यो उडवायला सुरुवात केली. 

मी बारकाईने मोहिनीचं निरीक्षण करत होतो. हे सगळं सुरू झाल्यावर, आजही सुरुवातीला क्षणभर तिचा चेहरा पडला. पण आज ती बावरली नाही, ठामपणे जागेवर उभी राहिली. 

लोकांना जेव्हा हे लक्षात आलं की ही पळ काढत नाहीये, तेव्हा आश्चर्याने – अचंब्याने क्षणभर शांतता पसरली, आणि मोहिनीने तोच क्षण नेमका पकडला आणि तिच्या नृत्याला सुरुवात केली. 

उडत्या चालीचं एक लोकप्रिय हिंदी गाणं होतं ते, लोकांनी त्यांच्याही नकळत ठेका धरला. मोहिनी लयबद्ध नृत्य करत होती. तिच्या शरीरयष्टीमुळे तो डान्स ती वेगळ्या प्रकारे सादर करत होती पण अतिशय आत्मविश्वासाने पेश होत होती. 

सुरुवातीला टर उडवण्यासाठी वाजवल्या गेलेल्या टाळ्यांचं रुपांतर कौतुकाच्या टाळ्यांमध्ये कधी झालं हे प्रेक्षकांनाही कळलं नाही. 

Veni, Vidi,Vici – मोठ्ठे युद्ध जिंकल्यावर ज्युलियस सीझर म्हणाला होता, तेच आज मोहिनी म्हणू शकत होती. 

ती आली, तिनं पाहिलं आणि ती जिंकली.

आणि हे सोपं नव्हतं. सगळे तिची टर उडवायला टपून बसले आहेत हे तिला ठाऊक होतं. तिलाही आतून भीती वाटत असेलच. तिनं कसून मेहनत घेतली होती आणि खमकेपणाने, खंबीरपणाने सगळ्यांच्या समोर उभी राहिली होती.

तिला इतरांच्या प्रशस्तीपत्रकांची, प्रमाणपत्रांची गरज नव्हती, पण तिचं तिलाच सिद्ध करायचं होतं की आपण हे करू शकतो. 

आपल्याच प्रश्नाचं उत्तर देताना जे. के. राऊलिंग म्हणतात, ‘ Is fat worse than being vindictive, jealous, shallow, vain, evil or cruel?’ ..  सूडवृत्ती, मत्सर, उथळपणा, गर्विष्ठपणा, दुष्टपणा, क्रूरता – हे सगळे तर लठ्ठपणापेक्षा कितीतरी वाईट आहेत. 

आता आमच्या मोहिनीला कोणी गोलिनी म्हणत नाही. आम्ही आता तिला आमची सरोज खान म्हणतो. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – माझी दंत कथा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

सौ. रेखा दयानंद हिरेमठ

अल्प परिचय 

सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे  23 वर्षापासून कार्यरत. वाचन,संगीत, विविध कला जोपासणे कविता, ललित लेखन यात विशेष रस. हसणे आणि हसवणे मनापासून आवडत असल्याने विनोदी लेखनाची आवड.

? मनमंजुषेतून ?

☆ – माझी दंत कथा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

आता तुम्ही म्हणाल ही कसली कथा? दंतकथा म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या कथा ना ! मग तुझी कसली ही कथा ?….  अहो दंतकथा म्हणजे माझ्या दाताची – मी गमावलेल्या अक्कलदाढेची कथा.

तर काय सांगत होते मी ….  आटपाट नगरामध्ये एका स्त्रीचे आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. पण अशा या सुरळीत आयुष्यात या स्त्रीच्या म्हणजे माझ्याच हो, दातामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला आणि ही दंतकथा उदयास आली. तर झालं असं, रात्री अपरात्री माझ्या दाताने त्याचे अस्तित्व अधोरेखित करायचा चंगच बांधला. एकदा ठणका सुरु झाला की झोपेचं खोबरंच. स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करत असून देखील इन जनरल कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढायची नाही अशा गैरसमजुतीमुळे मी घरीच दुखऱ्या दाता जवळ मीठ- हळद दाबुन ठेवणे, लंवग धरणे, असे काही-बाही घरगुती उपाय केले. त्याने थोडे दिवस बरे वाटले. पण हे दुखणे काही हटेना. शेवटी खूप सारं मानसिक बळ एकवटून आमची स्वारी दाताच्या दवाखान्याकडे वळली. थोडे दिवस औषधांचा मारा करून मग अक्कलदाढ काढायची असे डॉक्टरांनी सांगितले.

ठरलेल्या दिवशी उसने अवसान आणून मी दवाखान्यात जाऊन बसले. आणि माझा नंबर येण्यासाठी वाट पाहू लागले. हल्ली पूर्वीसारखं वाट पाहणं फार काही बोरिंग असे होत नाही ते मोबाईलबाबांच्या कृपेमुळे. थोडा वेळ मोबाइल चेक केला. पर्समध्ये सुधा मुर्तींचे वाइज अँड अदरवाइज पुस्तक होते. ते थोडे वाचले. पण चैन काही पडेना. शेजारी एक बाई त्यांच्या लहान मुलाला घेऊन बसल्या होता. ते बाळ देखिल एका ठिकाणी बसून कंटाळलं होतं. दिसेल ती वस्तू- गाडीची चावी, आईची ओढणी सर्व काही ते बाळ तोंडात घालत होते आणि त्याची आई शीsss हे तोंडात घालू नको ते तोंडात घालू नको असे उपदेश देत होती. मधूनच ते बाळ माझ्याकडे प्राणीसंग्रहालयामध्ये असलेल्या एखाद्या प्राण्याकडे पहावे तसे पाहत होते. मग मी पण त्याला चुटकी वाजवून खेळवायचा प्रयत्न करू लागले. त्याचे आईच्या अंगावर, सोफ्यावर उड्या मारणे सतत चालू होते. थोड्या वेळाने त्या गोंडस बाळाला झोप आली. म्हणून त्याच्या आईने त्याला झोपवण्यासाठी  थोपटणे सुरू केले. आणि आपण लहान मुलांना झोपवताना गुणगुणतो तसे आsss आss गाणे  सुरू केले. तसे ते बाळ सुध्दा जोरजोरात आsss आsss असा सूर लावू लागले. नेमके त्याच वेळी माझे लक्ष दुसरीकडे असल्याने त्याच्या त्या मोठ-मोठ्याने आsss आsssकरण्यामुळे मी एकदम दचकून पाहिले. त्या माय-लेकराचं दोघांचं आsss आsss सुरु होते. खरेतर हे पाहून मला खूप हसू फुटले. मी विचारात पडले. नक्की कोण कोणाला झोपवत आहे. मी त्या बापड्या आईला तसे विचारले देखिल. ती पण खुप हसत होती. शेवटी एकदा त्या बाळाला निद्रादेवी प्रसन्न झाली. आणि लेकरू झोपी गेलं. आणि त्याच्या आईने मोठा सुस्कारा सोडला. त्याला झोप आल्यावर तो असेच मोठ-मोठ्याने आsss  आsss असं गाणं म्हणतोअसे सांगू लागली.असो काही का असेना त्यामुळे माझा वेळ कसा गेला मला कळालंच नाही.

थोड्या वेळाने त्या बाळाची मोठी बहीण म्हणजे ७-८ वर्षाची गोड मुलगी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली. तेव्हा मीच मनाला समजावलं बघ एवढीशी मुलगी देखिल हसत हसत बाहेर आली आहे, मग तू कशाला घाबरतेस. मग झाशीच्या राणीप्रमाणे उत्साहाची वीज अंगात सळसळली आणि मी डॉक्टरांच्या केबिनकडे प्रस्थान केले. डॉक्टर दूरचे का असेनात पण  नात्यातीलच असल्यामुळे एक दिलासा होता. थोडफार बोलणे झाल्यानंतर मदतनीसांनी मला त्या खुर्चीत बसायला सांगितले. खरेतर ती खुर्ची इतकी सुंदर आणि आरामदायी होती की त्यावर क्षणात झोप लागावी. पण दुखणाऱ्या दाढेमळे ते आसन म्हणजे अदृश्य काट्याकुट्यांनी व्यापलेलं एखाद्या राज्याचे सिंहासन असल्याचा भास झाला. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी  माझ्या दाढेवर लक्ष केंद्रीत केले आणि माझ्या दाढेजवळ स्प्रे, इंजेक्शन वगैरे उपाय योजना सुरू केल्या. इंजेक्शन देताना मात्र कसा कुणास ठाउक मी एकदम हात हलवला. डॉक्टरांनी त्यावेळी मला सौम्य भाषेतच पण सुई टोचेल तुम्ही हलू नका असे सांगीतले. डॉक्टर म्हणाले “ तुम्हाला जेव्हा जडपणा, बधिरपणा जाणवतो तेव्हा सांगा. काही गडबड नाही मात्र आजिबात हलू नका.” मी तशातच मान डोलावली आणि थोड्या वेळाने मी तयार आहे असे सांगीतले. आता मात्र मी माझे दोन्ही हात त्या चेअरच्या आर्म रेस्टवर असे काही घट्ट पकडले की मला घोरपडीची कथाच आठवली.

माझ्याकडून अनुमोदन मिळताच डॉक्टर त्यांच्या चेअरमधून अशा  आविर्भावात उठले की आता आर या पार. पांढरी वस्त्र धारण केलेला योध्दा आक्रमणsss म्हणून आता लढायला सज्ज झाल्याचा भास झाला. आतून पुरती भेदरलेली मी माझी हाताची पकड आर्मरेस्टवर आणखीनच घट्ट केली. डॉक्टर म्हणाले,’ शांत रहा आणि उलट्या क्रमाने मनात आकडे मोजा.’ मी आपली मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ चा जप सुरू केला. आणि माझ्या तोंडात तुंबळ युद्ध सुरू झाले, पण खरी कमाल तर मला भूलीच्या इंजेक्शनची वाटली. हा सारा प्रकार त्या भूलीच्या इंजेक्शनमुळे आपल्याच तोंडात सुरू आहे. असे वाटतच नव्हते. जणू काही माझ्या शेजारी जे बसलेत त्यांचीच दाढ काढणे सुरू आहे.आणि मी ते बघत आहे. मनोमन मी त्या भूलीच्या इंजेक्शनचा शोध लावणाऱ्या  थोर विभूतीला साष्टांग दंडवतच घातलं. आणि ति-हाईताप्रमाणे डोळे झाकून या  युध्दाची साक्षीदार व्हायचा प्रयत्न करू लागले.

एवढ्यावेळ चुळबुळ करणारी मी शांत आहे त्यामुळे मला झोप लागली की काय असे डॉक्टरांना वाटले असावे. म्हणून की काय, डोळे उघडा- डोळे उघडा असे ते म्हणून लागले. म्हणून डोळे उघडून पाहते तो काय डॉक्टरांनी विजयी मुद्रेने युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली व सांगितले.. ‘ झालं. झालं,काढला दात.’ आणि असे म्हणून त्यांनी दाढ काढलेल्या पोकळीमध्ये औषधात भिजवलेला बोळा दाबला आणि तोंड बंद करून बसायला सांगितले. तो कापसाचा बोळा तासभर तसाच तिथे राहू दे आणि तासभर अजिबात बोलू नका असे सांगितले. खरेतर तो कापसाचा बोळा हलू नये म्हणून त्यांनी मला तासभर बोलू नका असा सल्ला दिला हे समजले. पण आज दिवसभर जास्त बोलू नका असे म्हणाल्यावर स्त्री स्वभावधर्मानुसार मी डॉक्टरांबरोबर खूप बोलत होते आणि त्यातून डॉक्टर माझ्या मिस्टरांच्याकडून नात्यातले असल्यामुळे यांनीच डॉक्टरांना हिला दोन दिवस गप्प बसायला सांगा असे सांगितले असावे असा दाट संशय आला. मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मनातले एसीपी प्रद्युम्न म्हणाले ‘ कुछ तो गडबड है दया..’

जरी आतून किडीने पोखरली होती  तरी ती बाहेरून पूर्ण गोलमटोल दिसत होती. माझीच दाढ ती माझ्यासारखीच चांगली बाळसेदार होती. हल्ली काय करतील याचा नेम नाही. आठवण म्हणून नेत असावेत दाढ घरी. म्हणूनच की काय डॉक्टरांनी मला विचारले. ती दाढ हवी आहे का? एवढी दुखरी आठवण कशाला जपा ..  म्हणून मी नको म्हणून सांगितले.

मग बऱ्याच सूचनांचं सत्र झाल्यावर मी जाण्यासाठी उठले. त्या दाढेचा एखादा फोटोतरी घ्यावा का म्हणून त्या मदतनीसाना मोबाइल दाखवला आणि विचारले दाठ कुठे आहे? फोटो काढून घेते  पण तोपर्यंत त्या निर्विकार चेहऱ्याच्या मदतनिसांनी त्या दाढेला केराची टोपली दाखवली होती.

— अशा रितीने माझी दंत कथा समाप्त झाली.

शेवटी काय कितीही कोपऱ्यात, हिरड्यांच्या कुंपणात लपून का  बसलेले असेनात,  प्रत्येक दातावर आणि दाढेवर व्यवस्थितपणे दोन वेळा ब्रश फिरवायलाच पाहीजे ही अक्कल मला आली…

अक्कल आली हो पण अक्कलदाढ मात्र गेली…

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– फिट्ट जीन्स… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – फिट्ट जीन्स– ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

आमच्या लग्नानंतर अनेकदा, सुनीलला माझ्यासाठी जीन्सची पँट घ्यावीशी वाटे. मला लांब कुर्ता आणि जीन्समधे पहायला सुनीलला मनापासून आवडे. मला खरेदीला सवड नसल्याने वा, या ना त्या कारणाने ‘जीन्स’ची खरेदी राहून जाई. आमचे ‘मंगलदीप’ चे कार्यक्रम शक्यतो शनिवारी-रविवारी असल्याने, त्यावेळी खरेदीची इच्छाही होत नसे. एरव्ही थोरली बहीण उषाताई अमेरिकेहून आली, की ती माझ्यासाठी बॅगा भरभरून वेगवेगळ्या फॅशनचे, सुंदर सुंदर कपडेच कपडे आणायची. तिला, मला त्या कपड्यांत सजवून पाहताना किती सार्थकता वाटे! मला मात्र क्षणाक्षणाला कपडे बदलून फॅशन परेड करायचा खूप कंटाळा येई! तरी बहिणीचे प्रेम पाहून आनंदही होई!

आमच्या लग्नाच्या एका वाढदिवशी मात्र, सुनीलची ही मनापासूनची इच्छा मी पूर्ण करायची असं ठरवलं. याचं खरं कारणही तसंच होतं. मला दूरदर्शनच्या एका दिवाळी स्पेशल कार्यक्रमात, एका मोठ्या मॉलची गिफ्ट कुपन्स मिळाली होती. तिचा योग्य वेळेत वापर करायचा होता. बऱ्याच वर्षांनी दोघांना वेळ होता आणि खरेदीचा योग आणि मूडही होता.

एरव्ही स्लीम ट्रीम दिसणाऱ्या तरुण मुलींची फिगर पाहून मला हुरहूर वाटे. आपल्याला लग्नापूर्वीसारखं असं होणं, आता अशक्यच वाटे! त्यांच्यासारखी, जणू काही अंगालाच घट्ट शिवल्यासारखी टाईट फिटिंग्सची जीन्स आपण कधीच घालू शकणार नाही. त्यातून व्यायामही करायचा आळस! आणि भरीला तासन् तास संगीताच्या रियाजाचं तसंच शिकवण्याचं बैठं काम ! म्हणजे सर्व आनंदी आनंदच ! असो.

आज त्या मॉलमधे मी आणि सुनील अगदी नवपरिणित दांपत्यासारखे आनंदाने बऱ्याच वर्षांनी, हौसे-मौजेने बागडत खरेदीला गेलो. चार पाच मजले फिर फिर फिरून दागिने, घड्याळं, हिऱ्याच्या अंगठ्या, सर्व काही पाहिलं, पण काही पसंतीस पडेना. बरंच फिरल्यावरही माझ्या आणि सुनीलच्या मापाचे कपडेही काही इथं मिळेनात. तेव्हा म्हटलं, “बहुतेक ह्या मॉलमधे आपल्यापेक्षा बारीक व्यक्तींसाठीच कपडे ठेवले असावेत, किंवा आपण ‘स्पेशल एक्स्ट्रा लार्ज’ या कॅटेगरीत मोडत असू. आपल्याला हवी ती ‘जीन्स’ इथं काही मिळणार नाही.

इतक्यात जीन्स दाखवणाऱ्या सेल्सगर्लने मला ओळखलं, “मॅडम, तुम्ही टीव्हीवर गाता का?” मी होकारार्थी मान हलवल्यावर तिला खूप आनंद झाला. म्हणाली, “माझी आई तुमची खूप मोठी फॅन आहे!” तिनं इतर सहकाऱ्यांना सांगून सगळीकडून भराभर उत्खनन करून, पटापट माझ्या मापाच्या जीन्स शोधून आणवल्या. अजूनही काही बारामतीची फॅन मंडळी भेटली. “अय्या, प्रत्यक्षात कित्ती बारीक दिसताय तुम्ही!” असा प्रत्येक स्त्रीला (उगाच!) भुलवणारा आणि सुखावणारा डायलॉग त्यांनी उच्चारला! 

मीही आधीच्या सगळ्या भानगडी विसरून (ट्रायलरूमच्या आरशात पाहिलेलं आपलं अजस्र रूप विसरून!) काही क्षण मनोमन सुखावले…आणि त्यातली एक जीन्स आम्ही पसंत करून घेतलीही! 

एवढ्यात एक ठेंगणी-ठुसकी, सामान्य तोंडवळ्याची, सावळ्या वर्णाची स्त्री मला भेटली आणि म्हणाली, “आप पद्मजाजी हैं ना? आप तो मेरी शादी में आयी थीं, मैं धीरज धानकजी की बहू हूँ।”… (धीरजजी माझ्या ‘गीत नया गाता हूँ’, ‘घर नाचले नाचले’ अशा अनेक गाण्यांच्या CD चे संगीत संयोजक. तसेच आर.डी. बर्मन, एस. डी. बर्मन , मदनमोहन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल अशा अनेक दिग्गजांबरोबर अफलातून संगीत संयोजन करणारे प्रतिभावंत कलाकार! त्यांनीच सर्वप्रथम माझं संगीत ऐकून मला सुरुवातीलाच प्रोत्साहन दिलं होतं. स्वतः नवोन्मेषाचा, चैतन्याचा धबधबा असलेले, आजूबाजूचं वातावरण क्षणात तणावमुक्त करणारे धीरजभाई, जे गाणं हातात घेतल्यावर, त्या गाण्याला सजवून कुठच्या कुठे उंचीवर नेऊन ठेवत! उदा… दिवे लागले रे, आओ फिरसे दिया जलायें… ई.) 

इथे धीरजजींच्या सुनेच्या दोन्ही बाजूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन सुंदर पिल्लं लगडलेली! “चलो बेटा, नमस्ते करो अंकल आँटी कोऽऽऽ।”  असं म्हटल्यावर, नमस्कार करत त्या मुलीनं सुंदर स्मित केलं अन्…. माझ्या डोक्यात अक्षरशः लख्खकन् वीज चमकली! 

काय ही दैवाची करणी! साक्षात् धीरजभाईंचं जस्संच्या तस्सं तेजस्वी रूप, कोरल्यासारखं तिच्यात उतरलं होतं ! ‘परमेश्वर’ नावाच्या कोण्या एकाने हे ‘जीन्स’ मात्र अगदी ‘फिट्ट’ बसवले होते! तेच डोळे, तोच वर्ण, तेच हास्य…. परमेश्वराच्या  अदाकरीचा – कलाकृतीचा हा नमुना पाहून मात्र, माझ्या डोळ्यांतली आसवं मी थांबवून ठेवली होती. 

खरंतर जन्म मरणाचं चक्र भारतीय तत्त्वज्ञानाने अपरिहार्य मानलं आहे. जीव कुडी सोडून जातो. नष्ट होत नाही. पण एका पिंजर्‍यातून प्राणपक्षी दुसर्‍या पिंजर्‍यात जातो. चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधे प्रवेश करून पुन्हा धरतीवर सजीव प्राण्यांमध्ये येतो. जीन्सच्या रुपाने आज धीरजभाई यांना त्यांच्या या नातीमधे वास करताना मी पाहिलं.  प्रत्यक्ष धीरजभाईंचं रूप पाहून आनंद आणि ते या जगात नसल्याची खंत!.. अशी संमिश्र भावना डोळ्यांत दाटून आली होती. मात्र ही मंडळी नजरेआड झाल्यावर माझा बांध मी मोकळा करून दिला…!  

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –5 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –5 ☆ श्री सदानंद आंबेकर

२७ जून :: झाला जन्म सुफळ– झाले विठ्ठलाचे दर्शन – पंढरपुर : अंतर २२.३१ कि. मी. 

आता तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा मला होती। खूप वर्ष आधी विद्यार्थी जीवनांत पंढरपुरला आलो होतो. पण आजची वेळ एकदम विशिष्ट होती। वारीचा अर्थ आम्हाला पहिल्या दिवशी सांगितला गेला होता, तो म्हणजे ‘ प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधणे।’ आध्यात्म क्षेत्रात यालाच तितिक्षा, (तपस्या नाही बरं का) असे पण म्हणतात। तर इतके श्रम करून आज देवदर्शन होणार हे खास होते। आज आम्ही भंडीशेगाववरून काल जसे आलो तो मार्ग न धरता, गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे थेट पंढरपुर येईल असा  रस्ता धरला। इथे गर्दी पण अजिबात नव्हती अन् सडक पण खूप छान पक्की होती। आसपास उसाची शेते, द्राक्षांचे बगीचे, टयूबवेलची स्वच्छ जलधार हे सगळं बघत सुमारे अकरा वाजता पांडुरंगाच्या नगरीत आलो। 

आमच्या वेळापत्रकाप्रमाणे २७ते ३० ता.पर्यंत पंढरपुरला राहता येणार होतं. पण एक दिवसानंतर एकादशी होती. तेव्हा येथे लक्षावधी लोक असतील तर देवाचे दर्शन तर नाहीच, पण कळस  दर्शनसुध्दा कठीण होणार होते. म्हणून आम्ही आजच देवळात जायचे ठरवले। यात्रा सूचनांप्रमाणे मला माहिती होते की वारकरी फक्त कळस – दर्शन करतात.  पण आज तर कमी गर्दी असल्यामुळे देवळात जाणं शक्य होतं।

शहरात खूप आत जाऊन जेव्हा पहिल्यांदा देवळाच्या नावाचा बोर्ड लांबूनच दिसला तेव्हा माझी जी मनःस्थिति झाली ती शब्दात सांगू नाही शकणार। मला असे वाटले की मी काय करू शकलो। पुण्याहून पंढरपूरपर्यंत पायी – हे सत्य आहे ?????? असं वाटलं की मी काय प्राप्त केलं, काय मी एवरेस्टवर पोहोचलो ?  मी हे करू शकलो तर ते कसं इत्यादि !! नंतर आम्ही लांबून जे मुखदर्शन होते ते करायचं ठरवलं कारण प्रत्यक्ष दर्शनाकरिता खूप तास लागतील अशी सूचना मिळाली। सुमारे दीड किमी लांब रांगेत उभे राहिलो. पण हे चांगलं होतं की ती रांग सतत चालत होती. त्यामुळे ठीक एक तासात आम्ही देवळाच्या आत होतो। प्रचंड गर्दीचा दाब असल्यामुळे क्षणार्धात आम्ही तिघांनी दर्शन घेतलं. पण विठ्ठलाच्या देवळात मला शिपायानी जो धक्का मारून बाहेत केलं त्यामुळे पहिल्यांदा मी देव प्रतिमा बघूच शकलो नाही. मग बाहेर आल्यावर माझ्या ताईनी पुन्हा आत जायला सांगितले। दारातून उलटं जाणं फार कठीण होतं. पण देवकृपा झाली, एका सेकंदाकरिता गर्दी एकदम थांबल्यासारखी झाली, दार मोकळे होते.  मी पटकन् आत शिरलो आणि देवाचे अगदी मन भरून दर्शन घेतले आणि नंतर रखुमाईच्या देवळांत दर्शन घेतले।

बाहेर आल्यावर प्रसादाच्या वस्तू, आणि लोकांना आठवण म्हणून द्यायला देवप्रतिमा इत्यादि घेतल्या। देवळात आत काहीच नेणं शक्य नाही म्हणून हे सगळं नंतर घ्यावं लागलं। आता मन एकदम तृप्त होते। एक फार मोठं लक्ष्य प्राप्त केलं असा भाव मनात होता।

या नंतर आम्ही आमच्या आजच्या ठिकाणावर गेलो। ही पण एक भली मोठी शाळा होती.  तेथे आमच्याशिवाय इतर अनेक दिंडया आल्या होत्या। संध्याकाळ व्हायला लागली होती नि काही वारकरी परतीच्या प्रवासावर निघत होते। आम्ही पण आपलं सामान व्यवस्थित एकत्र जमवून घेतलं, कारण आज रात्री आमची पण मुंबईकरिता गाडी होती। वेळ होती हरिपाठाची, त्याप्रमाणे सौ माईनी हरिपाठ घेतला आणि आता वेळ होती सगळयांशी बिदाई घ्यायची। किती तरी उच्चशिक्षित, उच्च पदस्थ वारकरी आले होते पण त्यांचं दोन हप्त्यांचं हे प्रेम, ती चोवीस तासांची साथ, आता कसं वेगळं व्हायचं ?? भरलेल्या मनानी मी सर्वाना भेटलो, वाटलं आपल्या आप्तजनांपासून लांब होतो आहे। सौ माईसाहेबांनी प्रसाद दिला, दिंडी प्रमुखांचा निरोप घेतला। आमच्या दिंडीत एक गृहस्थ सिडनीहून आले होते. त्यांना भेटलो तर त्यांनी सिडनी ला यावे आणि त्यांच्या घरीच थांबायचं असा प्रेमळ आग्रह केला। इतरांनीसुध्दा आपापल्या गावी यायचे आमंत्रण दिले। दिंडी व्यवस्थापन टीमच्या सर्व बंधुंना भेटून सर्वात शेवटी त्या शाळेला नमस्कार करून आम्ही स्टेशनकडे प्रस्थान केले।

शेवटी :: माझे मनोगत :

या यात्रेत काही गोष्टी मला आढळल्या, त्यांचा उल्लेख येथे करणे म्हणजे निंदा किंवा दोषदर्शन करणे नव्हेच.पण वारीसारख्या पवित्र कार्याच्याबाबतीत यात सुधारणा झाली तर उत्तम। रस्त्यात जिथे-जिथे गावात अन्न-जल आदिचे मोफत वाटप व्हायचे, तिथे दिसणारा प्रचंड कचरा, लोकांनी एक घास खाऊन फेकून दिलेल्या भरलेल्या पत्रावळींची घाण, हा अन्नाचा अनादर, जागोजागी रिकाम्या, अर्ध रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा कचरा, केळाची सालं, हे पाहून वाटायचं की हे सगळं आपण व्यवस्थित नाही करू शकत का ? दुसरे असे की तीर्थयात्रेमधे चालत असतांनासुध्दा तंबाखू आणि बीडी सिगरेटचा प्रचंड वापर… तो टाळू शकत नाही का ? 

ज्या मार्गावरून माऊलींची पालखी येत आहे त्यावर सगळीकडे तंबाखूची पिचकारी असावी का? आमच्या दिंडीत सुध्दा मी एका वारकऱ्याला सिगरेटचा वापर करतांना बघितले। निदान दोन हप्ते तरी हे बंद ठेवावे, हे विचारणीय नाही का ? पुढे असे की पूर्ण प्रवासात प्रत्येक गावात मांसाहार आणि परमिट रूम ची सोया असणारी खूप हॉटेल्स दिसली। देवकृपेने मी भारतात खूप यात्रा केल्यात. पण ज्या प्रमाणात इथे ही  सामिष हॉटेल दिसली तितकी इतर कुठे नाही दिसली. असं नाही की तिथं मांसाहार किंवा मद्यपान मुळीच होत नाही, पण इथे प्रमाण जास्त दिसलं। आपली संस्कृति तर देवदर्शनाच्या वेळी कांदा लसूण सुध्दा वर्ज्य करते- पण असो, ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे। मी नुसते जे पाहिले ते व्यक्त केले. आलोचना करण्याचा माझा हेतु अजिबात नाही। क्षमस्व !!

पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे तीर्थयात्रा, पुण्याईची संधी, सेवा-साधना करायची वेळ, असे मला वाटले। आता पुढल्या वर्षी मला जायला मिळते की नाही हे आज सांगणे कठीण आहे.  पण या वेळेचा मधुर स्मृतींचा सुवास जीवनात दरवळत राहणार हे मात्र नक्की। दिंडीमधला तरुण वय ते सत्तर अधिक वर्षाच्या वारकऱ्यांचा स्नेह सतत मला जाणवत राहणार। ज्याला जमेल त्याने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असा माझा विचार।

मी हे जे लेखन केले ते फक्त यात्रेची विस्तृत माहिती इतरांना मिळावी, आणि आठवणींचा संग्रह असावा याकरिता। लेखन किंचित मोठे झाले आहे, पण हा मोठ्ठा अनुभव कमी शब्दात तरी कसा लिहून होऊ शकणार? माझी मराठी येवढी उत्कृष्ट नाही, कारण मी मराठी असलो तरी, तीन पिढ्यांपासून हिंदी प्रांतातच माझे वास्तव्य झालेले आहे. तरी एक छोटासा प्रयत्न केला आहे तो गोड मानून घ्यावा ही विनंती। वर दिलेले रस्त्यांचे अंतर माझ्या गूगल एप चे आहेत, ते फक्त सांकेतिक मानावे।

वारीच्या पहिल्या दिवशी आळंदीत सौ माईंनी म्हटलेच होते की ‘ही यात्रा म्हणजे ईश्वराची, गुरुची कृपा, आई वडिलांची पुण्याई‘… म्हणून परमपिता विठ्ठल-रखुमाई, सर्व सहवारकरी बंधु भगिनी आणि ‘ संत विचार प्रबोधिनी दिंडी ‘ चे खूप आभार। ईश्वर आपणा सर्वांना खूप प्रसन्न, स्वस्थ आणि सुखी ठेवो ही प्रार्थना।

पुन्हां भेट होईल या आशेसोबत—नमस्कार।

जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरि।

इति——

– समाप्त – 

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –4 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –4 ☆ श्री सदानंद आंबेकर

२२ जून :: धर्माच्या मार्गावर धर्मपुरी गाव : अंतर २७.७८ कि.मी. 

आज बरड गावात पालखीचा मुक्काम होता पण आमची सोय सुमारे पाच किमी लांब धर्मपुरी या गावात होती। बरड गावापर्यंत तर सहज चालत आलो, आता थकवा वगैरेची जाणीव नव्हती होत. त्या नंतर तिथून किंचित अंतरावर राजुरा गावात पुढे जाण्याकरिता दिंडीतर्फे मिनी ट्रक आला. त्यातून काही लोक गेले नि आपल्या ठिकाणी आलो। आज मी पण या वाहनाने आलो। इथे ग्रामपंचायत भवनात सोय होती आणि मुख्य म्हणजे नळ आणि हैंडपंप दोन्ही असल्यामुळे सगळयांनी मनसोक्त कपडे धुतले, त्यात मी सुध्दा सामील होतो। आज संध्याकाळी येथे हरिपाठ आटोपल्यावर दिंडी संचालिका सौ माईसाहेब आणि दिंडी प्रमुख डॉ भावार्थ यांनी भारूड प्रस्तुत केले। भारूड म्हणजे सहज रीतिने धर्मशिक्षण। त्यात विशेष होती ती संत एकनाथांची रचना — ‘‘विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा  हे भारूड !! श्री शंतनु गटणे यांच्यासोबत डॉ भावार्थ यांनी प्रस्तुत केलेलं हे भारूड खूप काही सांगून गेलं। खरोखर दिव्य होता तो अनुभव। याशिवाय आमच्यातल्या काही माउलीताईनी पण भारूड प्रस्तुत केले। अनेक लोकांनी आज पावली खेळली – तेही खूप छान प्रकारे। इथे लाइटनी खूप त्रास दिला पण नंतर सर्व ठीक झाले। आज रात्री  तर जेवणात वेगळाच स्वाद होता अन् तो होता आम्रखंडाचा। दिंडीमधे काही बंधुंनी आपल्यातर्फे ही मेजवानी सादर केली होती। पुन्हा उद्याची तयारी करायला हवी म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर खूप थंड हवेत झोपी गेलो. 

येथे मी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करू इच्छितो, मी एकटा असल्यामुळे मला बरेच वेळा जागा शोधावी लागायची. पण आमच्या गटातल्या अनेक माउलींनी बहुदा स्वतः बोलावून ज्या आपुलकीने आपल्या शेजारी जागा दिली त्याची आठवण मला नेहमी राहील।

२३ जून :: गाव नातेपुते : अंतर १२.५६ कि.मी. 

बरड गाव सोडून नातेपुते करिता निघालो। गावातून बाहेर येता येता एक भली मोठी नहर अर्थात् कैनाल दिसली। किंचित वेळ थांबून पुढे निघालो। आज बारा दिवस झाले होते. आता मी आसपासच्या वारकरी लोकांना पाहत चालत होतो। श्रध्देचं प्रमाण इतकं होतं की कोणालाही आपण कपडे काय घातलेत, पायांत जोडे़ चपला आहेत की नाही, बाहेर ऊन आहे की सावली आहे, जेवण मिळते की नाही,  ही काळजी नव्हतीच। खांद्यावर झोळी, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मुखाने हरिनाम आणि मनात विठ्ठल ठेवून चालणे हेच त्यांचं उद्दिष्ट। नातेपुते पण एक गांव आहे अन् आमची शाळा गावात एकदम आत होती। आज पण संध्याकाळी हरिपाठ होत असतांना बरेच वारकरी पावली खेळायला आले अन् खूप आनंद घेतला। फुगडीवर त्याची पूर्णता होते ती पण आम्ही बघितली। आज पण जेवणात खूप स्वाद होता नि आज एका बंधूंची विवाह वर्षगाठ होती, म्हणून त्यांच्यातर्फे आम्हाला मेजवानी होती। आता उद्या पुन्हा लांब चालायचे आहे म्हणून इथे विश्रांति घेऊया।

२४ जून :: माळशिरस : अंतर २१.९८ कि.मी. 

आज पण आम्हाला सदाशिवनगर या ठिकाणी रिंगण बघायला मिळणार होतं। आजचे गोल रिंगण। मोठ्या शेतांत जागा करून त्यात चुन्याच्या रेघांनी मैदान तैयार केले होते। पोलिसांची सक्त व्यवस्था होती पण लोक ऐकत नव्हते। थोडयाच वेळात पालखीचे आगमन झाले अन् मागोमाग दोन अश्व आले। पहिल्यांदा  पूर्ण मैदानाचा एक फेरा लावला नि नंतर रिंगण सुरू झाले। वर ड्रोन सतत रेकॉर्डिंग करत होते। लोकांचा जल्लोष, उत्साह आणि आकाशातून पावसाची भुरभुर चालू होती। रिंगण पूर्ण होताच गर्दी व्हायच्या  आत आम्ही आपला मार्ग धरला। आधी पाऊस होऊन गेल्यामुळे आज गावात खूप चिखल होता. तरी आम्ही शोधत-शोधत आपलं ठिकाण मिळवलं। जागा मिळाल्यावर थोड्या वेळाने खूप जोरात पाऊस सुरू झाला नि शाळेच्या संपूर्ण मैदानात जणू तलाव निर्माण झाला। संध्याकाळी रोजच्याप्रमाणे हरिपाठ व रात्रीचे जेवण आटोपलं।

२५ जून :: आले वेळापुरः अंतर २३.४५ कि.मी. 

जसे-जसे पंढरपूरचे अंतर कमी होत होते तसतसा उत्साह वाढत जात होता। आजही त्या उत्साहात पाणी चिखल असतांनासुध्दा कमी वेळात वेळापुरला आलो. मात्र गावात आमची शाळा शोधायला खूप विचारावे आणि चालावे लागले। शाळा पण एकीकडे होती जिची वाट पूर्णपणे पाणी आणि चिखलानी भरून गेली होती। इथे खडूसफाटा येथे गोल रिंगण होते पण आम्ही ते नाही पाहिले। या गावात एक अर्धनारी नटेश्वर मंदिर दिसले जे प्राचीन वाटत होते. पण दर्शनासाठी खूप रांग लागली होती, त्यामुळे बाहेरून दर्शन करून आपल्या ठिकाणावर पोचलो। येथे मात्र संध्याकाळी खूप पाऊस आला, त्यामुळे रोजचा हरिपाठ, प्रवचन लहानशा जागेत करावे लागले। शाळेच्या समोर एक मंच आणि मोठ्ठे अंगण होते,  पण पाऊसामुळे तिथे झोपणे शक्य झाले नाही।

इथे सकाळी नित्यक्रियेकरिता जागा शोधावी लागली, कारण आसपास सगळी रहाती वस्ती होती, तरी प्रश्न कसाबसा सोडवला। रोजचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण घेऊन निघालो आपल्या शेवटच्या टप्प्या करिता। हा प्रवास पण फार लांबचा असणार होता.             

२६ जून :: यात्रेची शेवटची पायरी – शेळवे गावः अंतर २८.८१ कि.मी. 

सकाळी चालणे सुरू केल्यावर आज पावलं लवकर पडत होती। आज पण एका ठिकाणी गोल रिंगण होते. पण बहुतेक लोक सरळ चालत राहिले। दुपारी १२ वाजता मी भंडीशेगाव गावात आलो जिथून शेळवे गावाचा सहा किमी.चा रस्ता होता। फाटा येताच आमच्या वारीचे काही बंधु दिसले जे शेयर टेंपोत बाकी यात्रेकरूंची वाट बघत होते। आम्ही तीन लोक आल्यावर गाडी फुल झाली व तीस मिनिटांत आम्ही गावात उतरलो। इथे पण दोन दिशेला शाळा व एक बाजूस एक मंदिर आणि समोर काही टिनाचे वर्ग होते।  आधी झाडाखाली विसावा घेतला नि चार वाजता जवळच असलेल्या भीमा नदीत आम्ही सात आठ लोकांनी मनसोक्त आंघोळ केली। आमच्या सोबत एक तरुण वारकरी होते त्यांनी पूर्ण तन्मय होऊन – ‘बाप रखुमादेवी वरू, विठ्ठलाची भेटी, जाईन गे माये तया पंढरपुरा‘—- या ओळी गायल्या, आम्ही पण त्याच स्वरात त्यांची साथ दिली। शाळाभवनांत परत आल्यावर कळले की या दिंडीची एक विशिष्ट परंपरा आहे, दिंडीप्रमुख स्वतः आपल्या हातानी सर्वांना भीमा नदीवर आंघोळ घालतात. त्याप्रमाणे आम्ही पुन्हा नदीवर जाऊन या परंपरेचा आनंद लुटला। नंतर आम्ही सर्वांनी त्यांना पण तसेच स्नान घातले। हीच भीमा पंढरपुरात चंद्रभागा म्हटली जाते असे सांगण्यात आले। पुढील दिवशी पहाटे स्त्रियांकरिता सौ माईसाहेब यांनी स्नानाची सोय केली होती। सूर्यास्त व्हायच्या आधी आज सर्व माऊलीभगिनींनी सौ माईंच्या गाण्यांवर मन भरून नाच केला, फुगड्या घातल्या। खूप ‘आनंदी आनंद गडे होता। आज संध्याकाळचा हरिपाठ विशेष होता। आधी, आज जे एक विशिष्ट पाहुणे आमच्या दिंडीत आले होते, त्यांनी खूप सुरेख स्वरात अभंग ऐकविले अन् त्यानंतर विशेष उल्लेख म्हणजे, डॉ भावार्थ यांनी आपल्या पूर्ण टीमचा परिचय त्यांच्या कामा- -सकट करवून दिला। त्यात, आचारी भगिनी, चालक बंधू, साउंड लाइटवाले, इतर व्यवस्था करणारे हे सर्व होते, ज्यांच्या सहकार्याने ही यात्रा खूपच सोयीची झाली होती। आजचे जेवण पण विशिष्ट होते। आता सर्वांना उद्याची प्रतीक्षा होती जेव्हा श्रीहरिविठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते। उद्या कोण केव्हा परत निघून जाणार हे माहिती नसल्याने आजपासूनच एकमेकांचे संपर्क सूत्र फोन नंबर घेण्यास सुरुवात झाली होती।

– क्रमशः भाग चौथा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –3 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –3 ☆ श्री सदानंद आंबेकर

१७ जून :: नदी तटावर – नीरा गाव : अंतर ७.४४ कि. मी. 

रोजच्यापेक्षा आज आम्हांला थोडी सवलत मिळाली कारण आजचे आमचे अंतर फार कमी होते। येथे वाल्हे नावाच्या गावांत माऊलींची पालखी विश्राम घेते. पण आमचा मुक्काम नीरा गावात एका  खूप मोठया शाळेत होता। फार मोठे भवन आणि अतिशय मोठं पटांगण। आत्तापर्यत आपापसांत ओळखी झाल्या होत्या त्याचा फायदा आम्हाला आज झाला। आमच्या दिंडीतील एका वारकरीताईचे माहेरघर त्या गावात होते, दिंडीची परवानगी घेऊन आम्ही काही जण तिथे राहिलो. आज विशेष थकवा नव्हता। संध्याकाळी प्रथेनुसार हरिपाठ व जेवण झाले। आज तर मोठयाश्या अंगणात झोपायची छान सोय होती। दुसरे दिवशी गावातल्या नीरा नदीत माउलींचे स्नान होते. त्यामुळे पालखीचे दर्शन, त्यांच्या अश्वांचे दर्शन आणि स्नानाचा सोहळा पहायला मिळाला।

१८ जून :: पुढील टप्पा लोणंद : अंतर ६.३१ कि.मी. 

आजपण लोणंदपर्यंतचे अंतर अगदी कमी होते। आता चालण्याची इतकी सवय झाली होती की दहा बारा किलोमीटर अगदी सोपं वाटायचं। तिथे रेल्वे स्थानकाजवळ कांदेबाजारामधे सर्व दिंडयांचे मुकाम होते। येथे आज विशेष जेवण होते। स्वादिष्ट पुरण पोळी आणि सोबत आमटी। मन भरून जेवण झाले. मग मुंबईचे प्रसिध्द अभंग गायक श्री शंतनु हिर्लेकर यांचे, तबला संगतकार श्री प्रशांत पाध्ये यांच्या साथीने गायन झाले, यांनी शेवटी ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ‘ आणि महालक्ष्मीची कानडी स्तुती –  भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ही अत्यंत सुरेख गायली, त्या नंतर हरिपाठ व प्रवचन सेवा। येथे आम्हाला माउलींच्या रथाचे चोपदार यांचे पण दर्शन झाले। त्यांच्या श्रीमुखातून वारीबद्दल ज्ञान मिळाले। येथे एक विशेष सोय पहायला मिळाली– पाणी बॉटलवाले लोक भरलेले खोके घेऊन आमच्या जवळ पाणी विकायला येत होते। गर्मी खूप असल्यामुळे त्यांची विक्री पण भरपूर झाली। १९ जूनला येथे विश्राम होता।

२०जून :: आता  तरडगांव  : अंतर २०.45  कि.मी. 

इथपासून चालायचे अंतर पुन्हा वाढले होते. पण आता कसे झाले होते की १५-२० किमी ऐकलं की असं वाटायचं ‘ बस….. इतकंच अंतर ? ‘ आज मागच्या गावातून चालून आल्यावर मधेच एक नवीन अनुभव येणार होता। आज चांदोबाचा लिंब नावाच्या ठिकाणी रिंगण होणार होतं। मी पण वेळापत्रकात हे वाचले होते पण अर्थ काही समजला नव्हता. ते आज प्रत्यक्ष पहायचा मौका आला होता। त्या ठिकाणी आम्ही सकाळी साडेदहा वाजताच पोहोचलो. पण जिथे हे रिंगण होणार होतं तिथे खूप गर्दी होऊन गेली होती। आम्ही पण वाट पहात बसलो। अखेरीस, साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकदम गर्दी वाढली अन् त्यानंतर हा सोहळा सुरू झाला। यात दोन अश्व सरळ मार्गावर धावतात. त्यात एकावर स्वार असतो नि दुसरा अश्व एकटाच असतो. असे मानतात की त्यावर स्वतः माऊली असतात। दोघे अश्व खूप जोरात धावतात, दोन चकरा मारतात अन् माउलींचा अश्व पुढे निघून जातो। हा सोहळा पाहिल्यावर पालखी  पुढे निघाली नि आम्हीपण पुढील मार्गावर चालू लागलो। तरडगांव हे लहान खेडयासारखं गाव, तिथे थांबायची शाळा मेनरोड वर होती। शाळेची वास्तु अगदी जुनाट होती अन त्याचं बांधकाम चालू होतं। या वेळी इथे पुरुषांकरिता राहुटी म्हणजे टेंटमधे राहायची सोय होती. पण नंतर जागा कमी पडल्याने समोर एका डॉक्टरकडे त्याच्या गैरेजमधे सोय झाली। आज रात्री जेवणांत एकदम नवीन पदार्थ होता तो म्हणजे पाव भाजी।

उद्या खूप चालायचं होतं म्हणून गैरेजसमोर अंगणात सगळयांनी आपले बिछाने लावले व झोपी गेलो। हेच ते पहिलं ठिकाण जिथे पुढल्या दिवशी जीवनांत पहिल्यांदा प्लास्टिकच्या मोबाइल शौचालयांत जावं लागलं। पण हे पूर्वीच्या तांब्या नाहीतर बाटली घेऊन शेतांत किंवा रस्त्याच्या काठी अंधारात जाण्यापेक्षा सोईचं होतं। असो, हा ही एक नवा अनुभव। बस भीती ही वाटायची की 

कुठं स्वच्छ भारतवाले कार्यकर्ते आम्हाला पकडू नयेत. 

२१ जून :: ऐतिहासिक स्थळ फलटण : अंतर २५ .६४ कि.मी. 

आज सकाळी का कुणास ठाऊक, पण सगळे दिंडी-यात्री अंधार असतांनाच म्हणजे सूर्योदय होण्याआधीच मार्गी लागले। आम्ही पण चालताचालता सूर्योदय पाहिला। फलटणपर्यंत उन्हाचे चटके तर सहन केले, पण आजची विश्रांतीची जागा म्हणजे मुथोजी महाविद्यालय शोधता शोधता फार थकवा आला। प्रत्येक माणूस त्याला विचारलं की वेगळाच रस्ता सांगायचा। त्यातच पालखी येत असल्या- -मुळे रस्ताभर खूप गर्दी होती। कसेतरी आपल्या स्थळावर पोहोचलो। हेही खूप मोठे संस्थान होते। फलटण शहरसुद्धा मोठं ठिकाण आहे। तिथे शिवरायांचे सासरघर आहे। एक मोठ्ठा महाल, अनेक प्राचीन देवळं आदि असल्याचे कळले, पण वेळ कुठे होता। इथे एक दोन इतर दिंड्या अन् एन सी सी चे कैडेट्स थांबले असल्यामुळे कॉलेजच्या पटांगणातसुध्दा भरपूर लोक झोपले होते। सकाळी पुन्हा पी वी सी चे पोर्टेबल शौचालय–ते पण चांगले लांब लावले होते,अन् नंतर टैंकरखाली पाण्याच्या बॉटलने आंघोळ, कारण  आपली बादली अजून कुठे तरी असायची ! नंतर स्वल्पाहार घेऊन पुढची यात्रा सुरू केली। आज पण खूप लांब चालायचे होते, अन् आता अर्धी यात्रा झाल्यामुळे लोकांनी उरलेल्या वेळेचा हिशेब करायला सुरवात केली होती।

– क्रमशः भाग तिसरा… 

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर

वारीचा पहिला दिवस – पहिला अनुभव – पहिली परीक्षा

एका ओळीत चालत मुखाने हरिनाम स्मरण करीत हळू-हळू शहरातील रस्त्यांवरून वारी चालली। पुढे जाता जाता अजूनही काही दिंड्या येऊन सहभागी होऊ लागल्या …. जसे गावागावातून वहात येणाऱ्या लहान नद्या पुढे एका नदीत येऊन मिसळतात नि एक मोठी नदी निर्माण होते … तसेच काहीसे वाटून गेले. वारीचा खरा उत्साह आता दिसू लागला होता। चहुकडे नुसता नामाचा गजर, भारी गर्दी, त्यांत आता आमच्या दिंडीचे वारकरी वेगळे होऊन गेले। रांग वगैरे सगळी संपली। आता आपण फक्त एका गावचे नाही …  आता संपूर्ण विश्व आपला परिवार आहे असा भाव निर्माण झाला। वारकरी आपसांत एकमेकांना माऊली हे असे संबोधतात । भक्तीची ही असाधारण भावना बघून माझे मन भारावून गेले, आणि त्याच क्षणी मी निर्णय केला की  घरी गेल्यावर हे सर्व विस्ताराने लिहायचे,  ज्याने श्रध्देचा हा अनुभव इतरांना घेता येईल। 

आता थोडे त्यांचे वर्णन, जे स्वतः प्रत्यक्ष वारीत नव्हते पण ज्यांची भावना वारकऱ्यांपेक्षा कुठेही कमी नव्हती। शहरांत चालत असतांना पदोपदी पाण्याची बॉटल, त्या दिवशी एकादशी असल्यामुळे, राजगिरा पापडी, लाडू, केळी, चहा, शेंगदाण्याचे लाडू, साबूदाणा, असे बरेच काही घेऊन अनेक श्रध्दाळू रस्त्याच्या कडेला उभे राहून विनवणी करून वारकऱ्यांना देत होते। काही काही ठिकाणी तर एक दोन वर्षाच्या पोरांना छान धोतर किंवा छोटंस नउवारी घालून सजवून कडेवर घेऊन त्यांच्या हातून वस्तू देत होते- काका याच्याहातून एक तरी घ्या। असा प्रेमळ आग्रह करत होते. एके ठिकाणी तर एक मध्यम वयाचे गृहस्थ हातात एक दोन रुपयांची नाणी घेऊन वारकऱ्यांना एक एक देत होते, त्यामागे भावना ही असावी की वस्तु नाही तरी अशी काही सेवा आपल्या हातून व्हावी। धन्य तेची जन, जयांचे संत चरणी मन !! पुढे मिलिट्री, डॉक्टर हे सर्वपण सेवेत हजर होते। याच ठिकाणी माऊलींच्या रथाचे पहिले दर्शन मला झाले। खूप जवळून पाहता आले।

पुणे सोडल्यावर माझी पहिली परीक्षा सुरू झाली, जेव्हा समोर दिवेघाट दिसायला लागला। याक्षणी यात्रेवर निघायच्या आधीचे सर्वांचे बोलणे मला आठवू लागले। सात महिन्यापूर्वी हृदयाघात कारणाने दोन स्टेंट घालावे लागले असल्यामुळे सगळयांनी खूप शंका व्यक्त केल्या होत्या की आता काय ही परीक्षा पास होणार का? देवाचे नाव घेतले नि सर्वांच्यासोबत घाटाच्या रस्त्यावर पहिले पाऊल ठेवले। वर सूर्यनारायण पूर्ण तेज घेऊन हजर होते। आता या मार्गी खाण्या-पिण्याची सोय जवळपास संपली होती.  वर तळतळतं ऊन नि खाली ज्ञानबा-तुकाराम-एकनाथ-मुक्ताबाई चा सतत गजर। येथे मी विशेष उल्लेख करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचे पाण्याचे भरपूर टैंकर सोबत होते. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होत होती। घाटात एकीकडून पायी चालणारे नि अर्ध्या भागात दिंडीची वाहनं, रुग्ण्वाहिका चालत होत्या। दर एक दीड तासांनी रस्त्याच्या काठावर थांबायचे, दोन घोट पाणी घेऊन पुढे चालायचे। एका उत्साहात बिना काही त्रासाचा आठ कि.मी. चा हा घाट अखेरी संपला आणि पुढे समतल मैदानांत डाव्या बाजूला  ठेवूनिया कर कटेवरी उभा तो विठोबा–  अशी भली मोठी मूर्ति दिसली. एकदा वाटले – आलो का काय पंढरपुराला !!! पुढे पुष्कळ चालून सायंकाळी सुमारे पाच वाजता सासवडला आमच्या ठरलेल्या ठिकाणी- दादा जाधवराव मंगल कार्यालय येथे आलो।

तिथे अजून ही दिंड्या थांबल्या असल्याचे दिसून आले। संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ आणि प्रवचनाचा पहिला कार्यक्रम झाला। त्या वेळी दिंडी प्रमुख डॉ भावार्थ देखणे आणि त्यांच्या भार्या सौ पूजा देखणे यांस व्यासपीठावर ऐकायची संधी मिळाली। वारकरी संप्रदायाशी पूर्वीचा काही परिचय नसल्यामुळे माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता। या अगोदर कधीच मी हरिपाठ ऐकला नव्हता। आतापर्यत काही बंधु भगिनींशी प्राथमिक ओळख झाली होती। वारीबद्दल माहिती साठी इंटरनेटवर बरंच काही वाचलं होतं.  पण माझा अनुभव त्यापेक्षा बराच वेगळा होता। प्रवचन आणि हरिपाठ अत्यंत सुरेख झाला, इथे मी देखणे दंपतिचे अभिनंदन करू इच्छितो की या तरुण वयात आणि स्वतः उच्चशिक्षित नि कॉर्पारेट क्षेत्रात उच्च पदी असूनही देवाच्या कामात येवढे कौशल्य !! मला स्तुत्य वाटले। त्यांच्या संगतीला टाळवादकांची ती एकसम पदचालना-पावली, जसे काही नृत्यच आणि पखावजाची ती उत्तम साथ, सर्व तरुण वयाचे, आनंद वाटला। आजचा दिवस सर्वात जास्त चालणे झाल्यामुळे पुढे १५ जूनला सासवडला विश्राम होता। इथे माझ्या पायाला झालेल्या छाल्यांकरिता मी औषध घेतले।

१६ जून :: येळकोट येळकोट जय मल्हार : जेजुरी तीर्थक्षेत्र अंतर २०.९४ कि.मी. 

सासवडच्या विश्रांतीनंतर नवीन उत्साह घेऊन आम्ही निघालो जेजूरीला। हे मल्हारी मार्तण्ड किंवा खंडोबाचे जागृत तीर्थस्थान आहे। एका उंच गडावर पायऱ्या चढून दर्शनाला जावे लागते। अतिशय गर्दी आणि थकवा असल्यामुळे मी दर्शनाला जाऊ शकलो नाही, किंवा खण्डोबाची मला आज्ञा नसावी असेही म्हणता येईल। येथे गावाच्या सुरुवातीला उजव्या हाताला एक प्राचीन देऊळ पाहिले, ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी ‘लवथवती विक्राळा‘— ही शंकराची आरती लिहिली असा तिथे उल्लेख केला होता। देवळाला लागून एक तलाव दिसला जो अत्यंत घाण होता। आजच्या रस्त्यात पुन्हा चहा-कॉफी, वडापाव, उसाचा रस, सोडा आणि खूप काही खाय-प्यायची दुकानं होतीच. त्याशिवाय अनेक संस्थांतर्फे अन्न, पाणी, चहा याची मोफत वाटप केले जात होते। उसाच्या रसाच्या सगळया स्टॉलवर आधीच रेकॉर्ड केलेली कमेंटरी फार मजेदार होती। चंद्रभागेच्या पाण्याने जोपासलेल्या उसाचा अमृतासारखा गोड रस ‘ विठाई रसवंती ‘च्या नावाने फक्त पाच रुपयांत एक ग्लास मिळत होता, तो यात्रेत मी एक दोनदा घेतला सुध्दा। वारीला जातांना रस्ता कसा असेल याची शंका आता मिटली होती, कारण पूर्ण रस्ता रुंद हायवे होता, कुठेच उतार चढाव आणि वळण नव्हते। येथे आमचे मुक्कामाचे ठिकाण शोधायला खूप विचारावे लागले। आजचा मुक्काम श्री.आगलावे यांच्या धर्मशाळेत होता। रात्री दररोजप्रमाणे हरिपाठ ज्या ठिकाणी झाला ते एक अतिशय सुंदर राम मंदिराचे आंगण। छान गार वारा होता आणि सोबत सरस हरिपाठ। याच सत्संगात सौ.  माईंची अभंग प्रस्तुति – ‘ खंडेराया तुज करिते नवसू-मरू दे रे सासू- खंडेराया ‘, आणि सोबत डॉ. भावार्थचे संबळ वादन हे मी पहिल्यांदा ऐकले। खरं तर हे वाद्य पण पहिल्यांदाच पाहिले। त्या वास्तुचे मालक पण तिथे उपस्थित होते। रात्री नऊ वाजता जेवण नि नंतर विश्रांति।

– क्रमशः भाग दुसरा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –1 ☆ श्री सदानंद आंबेकर

भारत – अध्यात्माची मायभूमी – जिथे सजीव आणि निर्जीव दोन्हींमधे देव बघितला जातो। श्रध्दा हा जीवनाचा आधार – त्या पार्श्वभूमीवर अनेक देवस्थानं आणि त्यांच्या विविध परंपरा। अशीच एक सुमारे ७०० वर्षांपासून चालत आलेली उच्चस्तरीय परंपरा आहे —’आषाढ आणि कार्तिक महिन्यात होणारी पंढरीची वारी।’

विठ्ठल-रखुमाईचा जागृत वास असलेली पुण्यनगरी पंढरपूर… येथे फक्त महाराष्ट्रच नाही तर इतर प्रांतातून आणि परदेशातूनसुध्दा भाविकगण वारी करायला मुख्यतः आषाढ महिन्यात येतात। ईश्वर कृपेने ही पायी वारी करण्याची संधी यंदा मला मिळाली।

सुरुवातीला या यात्रेबद्दल काहीच माहित नसल्यामुळे मनात अनेक प्रश्न काहूर माजले होते। बरेच प्रश्न – कुठं जाऊ, किती अंतर असणार, रस्ता कसा असेल, लोकं कोण नि कसे असतील, जेवणाचं, थांबायचं कसं नि कुठे, इत्यादि होते. पण यांची माहिती मिळवली नि माझ्या गृहनगर भोपाळ येथून देवाचं नाव घेऊन घराबाहेर पाऊल  टाकलं।

पुण्यात माझी आतेबहिण नि भाची यांची भेट आमच्या दिंडीने ठरविलेल्या ठिकाणी – ‘गुप्ते मंगल कार्यालय, शनिवार पेठ पुणे‘ येथे झाली। खरं तर माझी यात्रा ताईंच्यामुळे शक्य झाली कारण त्यांनी कार्यक्रमाची महिती मला दिली नि मी त्यांच्यासोबत यात्रेची तयारी केली।

आमची यात्रा ‘संत विचार प्रबोधिनी’ या दिंडीसोबत होणार होती। त्याच्या संचालिका हभप सौ माईसाहेब गटणे यांनी कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आधीच सर्वांना व्हाटस्एपच्या माध्यमातून दिली होती। त्या सूचनापत्रकाप्रमाणे पायी वारीसोहळा हा ११ जून ते ३० जून २०२३ पर्यंत चालणार होता।

११ जून :: पहिले पाऊल

गुप्ते मंगल कार्यालयात आमचे आवश्यक सामान, जे पुढे यात्रेत लागणार होते ते ठेवून, एका लहान बॅगमधे रस्त्यात लागणारे लहान-सहान सामान घेऊन आम्ही श्रीक्षेत्र आळंदीला निघालो। अद्याप आपल्या सह-वारकरी मंडळीशी आपसांत ओळखी झाल्या नव्हत्या।

माझी आळंदीला ही दुसरी यात्रा होती, पण या वेळेस उद्देश् वेगळा होता, त्यामुळे मनात एक वेगळा उत्साह आणि उत्सुकता होती। पुणे नगरात चहूकडे वारकरी दिसत होते. त्यात शहरापेक्षा गावची मंडळी जास्त आहेत असे वाटले, पण नंतर हे दृश्य बदललं। पायी चालत तिथे ठरलेल्या ठिकाणी- विठ्ठल कृपा मंगल कार्यालयात आम्ही सुमारे चार वाजता पोहोचलो। त्याच वास्तूत अजून एक दिंडी आली असल्यामुळे थोडा गोंधळ झाला, पण लगेच आपले ठिकाण पहिल्या माळयावर आहे हे कळले।

त्या रात्री तिथेच मुक्काम असल्यामुळे बऱ्याच लोकांनी आपली जागा ठरवून सामान लावून घेतले होते। येथे जुने वारकरी पूर्वओळख असल्याने एकत्र आले नि नवे पण हळूहळू त्यांच्यात मिसळू लागले। आमची एकूण संख्या १५० आहे हे कळविण्यात आले।

उन्हाळा खूप असल्याने पाण्याची गरज खूप जास्त भासत होती. तेव्हा वारंवार बाहेर जाऊन पाणी आणावे लागत होते। थोडयाच वेळात दिंडीच्या संचालिका सौ माईसाहेब आल्या नि मंचावर त्यांनी स्थान ग्रहण केले। सुरुवातीला वारीच्या फीचा हिशेब, पावती देणे ही किरकोळ कामं आटोपून नंतर संपूर्ण यात्रेची माहिती आणि वारीचे अनुशासन सांगितले। या मधेच सर्वांना या दिंडीचा १९८६ पासूनचा पूर्व इतिहास नि पूर्व वारीप्रमुख वै.ह.भ.प.डॉ रामचंद्र देखणे यांचा जीवन परिचय देण्यात आला। हे पूर्ण झाल्यावर त्यांची प्रवचन सेवा झाली जी सर्वांनी मनापासून ऐकली।

आजच्या दिवशी म्हणजे ११ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून संध्याकाळी निघणार होती अन् त्या दिवशी परंपरेप्रमाणे तिचा मुकाम तिथेच असल्यामुळे दिंडीच्या व्यवस्थे- -प्रमाणे पुण्यात स्वतःची सोय असणारे वारकरी पुण्याला परत जाऊ शकत होते। रात्री सुमारे आठ वाजता वाजत-गाजत भक्तजनांच्या गजरासोबत पालखीची यात्रा सुरू झाली। गर्दी खूप जास्त असल्याने मला दर्शन काही होऊ शकले नाही। पोलिसांना गर्दी सांभाळायला खूप मेहनत करावी लागत होती। नंतर रात्री नगर बस सेवेत बसून पुण्याला परत आलो।

१२ जून :: माऊली आलेत पुण्याला .. 

दुसरे दिवशी १२ जूनला पालखीचे पुण्यात आगमन झाले अन् तिथे पालखीचा एक दिवस मुक्काम होता. त्यामुळे दिंडी पण १३ जूनला पुण्याला गुप्ते मंगल कार्यालयात थांबली। पुण्यातील स्थानीय वारकरी यांना आज इथे हजर होण्याबद्दल सूचना होती।

१४ जून :: वारी निघाली पंढरपुराला : पुणे – सासवड अंतर ३८.३४ कि.मी. 

शेवटी १४ जूनला तो सूर्यादय झाला ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती। सकाळी पाच वाजल्या- -पासून सर्व वारकरी पूर्ण उत्साहात तयार झाले। तेव्हाच सूचना झाली की सर्वांनी आपले सामान लगेजच्या ट्रकवर ठेवावे। पहिला दिवस असल्यामुळे थोडी घाई गर्दी होत होती पण अखेरीस सर्वांचे सामान चढले। इथे सांगण्यात आले की जवळच एका ठिकाणी सर्वांचा चहा इत्यादि होईल नि मग पुढे वाटचाल होईल। त्या प्रमाण तिथे चहा-नाश्ता नि दिवसाकरिता खाण्याचे पैकेट वाटप सुरू झाले। चहा-कॉफी, नाश्ता घेऊन आता पाठीवर आवश्यक तेवढे सामान, मनांत प्रचंड उत्साह, उत्सुकता घेऊन आणि मुखाने जय हरि विठ्ठल घोष करीत सर्व ओळीत लागले नि ‘ ज्ञानोबा-तुकाराम माउली ‘ असा नाद करीत आमची ‘ संत विचार प्रबोधिनी ‘ची दिंडी वारीच्या मार्गाला निघाली। येथेच ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महारांजाच्या पालख्या एकत्र येतात नि नंतर वेगळया मार्गावर चालू लागतात।

– क्रमशः भाग पहिला…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ग्रीन टाय…’ – भाग – २ ☆ श्री सुनील काळे 

(आयझॅक खूप गमतीशीर पण विनोदी माणूस होता)…   इथून पुढे. 

मी सुसाईड करणार असल्याचे सांगितल्यावर त्याने माझे प्रथम खूप मनापासून अभिनंदन केले… आणि मला म्हणाला, “ इतक्या प्रचंड संघर्षाने चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेस, पाचगणी परिसरातील असंख्य चित्रे रेखाटलीस, चित्रप्रदर्शने केलीस, पण जागेअभावी तुला खूप त्रास झाला त्याचा मी साक्षीदार आहे. चित्रे पावसात भिजली, तुझे खूप नुकसान झाले याचीही मला जाणीव आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, तुला यश का मिळाले नाही ? हे मी सांगू शकत नाही. तू खूप कष्ट घेतले आहेस त्यामुळे तू आत्महत्या करू नकोस असेही मी तुला सांगणार नाही. पण मी एक तुला विनंती करतो की तुझी जी कला हातामध्ये जिवंत आहे ही तुझ्याबरोबरच संपणार… 

…. तर काही दिवस तू बिलिमोरिया स्कूलमध्ये मुलांना चित्रकला शिकव, तेथे कोणीही कलाशिक्षक नाही.  त्या मुलांना एलिमेंटरी व इंटरमिजिएट या चित्रकला विषयाच्या परीक्षा द्यायच्या आहेत, आणि त्यांना गुरुची (कलाशिक्षकाची ) फार आवश्यकता आहे.  जर तू सुसाईड करून मरून गेलास तर तुझी कलाही तुझ्याबरोबर मरणार… जर तू ही कला कोणाला शिकवली नाहीस तर या चर्चमधला येशु तुला कधीही माफ करणार नाही … फक्त एक महिना तू या मुलांना शिकव व नंतर निवांतपणे आत्महत्या कर. तुला मी अडवणार नाही …. “ 

“पण मी चित्रकला कधी शिकवली नाही, ही शाळा इंग्रजी माध्यमाची आहे.  माझे अे. टी. डी किंवा ए .एम झालेले नाही. ते शाळेतील लोक मला कसे स्वीकारतील ? हे मला जमणार नाही …. मी कमर्शियल आर्ट शिकलेलो आहे..  शिक्षण क्षेत्राशी माझा कधी संबंध आला नाही,”  अशी विनंती मी त्याला केली.

आयझॅक जिद्दी होता. त्याने त्याच्या गळ्यातील ग्रीन रंगाची टाय काढली आणि माझ्या गळ्यात घातली. आणि म्हणाला, “ मिस्टर आर्टीस्ट सुनील काळे.. नाऊ यु आर लुकिंग व्हेरी स्मार्ट आर्टटीचर… तुला मी वचन देतो की तुला कसलाही त्रास होणार नाही, कसलाही इंटरव्यू घेतला जाणार नाही, कसल्याही अटी टाकल्या जाणार नाहीत.  सकाळचा नाष्टा , दोन्ही वेळचे जेवण, संध्याकाळचा चहा आणि राहण्यासाठी तुला एक  खोली मिळेल. माणसाला जगायला आणखी काय लागते ? अन्न ,वस्त्र निवारा व जॉब …

तुला जर या सगळ्या गोष्टी मिळत असतील तर हे चॅलेंज तू का स्वीकारू नये ? एक महिन्याचा तर फक्त प्रश्न आहे . शिवाय तू जी आत्महत्या करणार आहेस त्याला मी विरोधही करत नाही. मग प्रश्न येतो कुठे ? या जगातून जाण्यापूर्वी अनुभवलेले, शिकलेले सर्वोत्तम ज्ञान तू त्या मुलांना दे एवढीच माझी मागणी आहे .” 

थोडा शांतपणे विचार केल्यानंतर मलाही त्याचे म्हणणे पटले. आपले सर्वोत्तम ज्ञान मुलांना द्यायचे मगच मरायचे…असे मी ठरवले.

दुसऱ्या दिवशी बिलिमोरिया स्कूलमध्ये सकाळी हजर झालो .

प्राचार्य सायमन सरांनी मला अपॉइंटमेंट लेटर दिले आणि एका छोट्या मुलांच्या वर्गात शिकवण्यासाठी पाठवले. वर्गात प्रवेश केल्यानंतर मला पाहून ती छोटी मुले फार आनंदित झाली. त्यांना खूप वर्षांनी आर्ट टीचर मिळाल्यामुळे उत्साह आला होता. ती सगळी मुले आणि मुली माझ्याभोवती जमा झाली. त्यांची स्वतःची चित्रे, चित्रकलेच्या वह्या, क्रेयॉन कलरचे बॉक्स दाखवू लागली. मुलांचा उत्साह पाहून मीही खुष झालो आणि त्यांना चित्रकला शिकवू लागलो, जणू मी माझ्या स्वतःच्या छोट्या मुलीला शिकवत आहे असा भास मला होत होता…

शिकवता शिकवता दोन तास कसे संपले हे मलाही कळले नाही. सायली पिसाळ, आकाश दुबे, उत्सव पटेल, ताहीर अली, अशी अनेक  नावे आजही मला आठवत आहेत. नंतर दुसरा वर्ग ,नवीन तास, नव्या ओळखी, नवी उत्सुकता असलेली मुले, त्यांच्या निरागस भावना मला हेलावून गेल्या. नव्याने ओळखीची होत असलेली छोटी मुले व मुली शाळा सुटल्यानंतरही माझ्या खोलीभोवती घिरट्या घालत राहिली त्यांना त्यांची नवीन चित्रे दाखवायचा खूप उत्साह असायचा. मग मीही त्यांना क्राफ्ट, अरोगामी. चित्रांचे वेगवेगळे विषय उत्साहाने शिकवू लागलो. मीही नियमित त्यांची व्यक्तिचित्रे, स्केचिंग करु लागलो. शशी सारस्वत, संजय अपार सर, दुबे मॅडम, छाया व संजय उपाध्याय, मोहीते सर, नॅथलीन मिस, सुनील जोशी सर, असे नवीन मित्रही या बिलिमोरिया शाळेत भेटले. अशा रीतीने एक महिना, दुसरा महिना, तिसरा महिना कसा संपला हे कळलेच नाही…

शाळेचे एक नवे वेगळे विश्व मी अनुभवत होतो …

हे माझ्यासाठी फार वेगळे जगणे होते. शाळेत मी जरी रोज नवीन शर्ट घालत असलो तरी माझी टाय मात्र एकच होती… 

…. आयझॅकने दिलेली ग्रीन टाय. 

अशा रीतीने एक वर्ष संपले आणि मी सेंट पीटर्स या ब्रिटिश स्कूलमध्ये गेलो आणि माझी पत्नी स्वाती बिलिमोरिया स्कूलमध्ये जॉईंट झाली.

सेंट पीटर्स मध्ये चित्रकला विषयाला खूप प्रोत्साहन मिळत होते. मुलं देखील नवनवीन गोष्टी शिकत होती त्याचबरोबर माझी चित्रकला ही नव्याने बहरून येत होती. या नव्या शाळेच्या परिसरातील अनेक निसर्ग चित्रे मी नव्याने रेखाटू लागलो. त्या काळात माझे चित्रकलेचे प्रदर्शन नेहरू सेंटर, नंतर ओबेराय टॉवर हॉटेल व 2002 मध्ये जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. याठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला .

माझी आर्थिक स्थितीही सुधारली 2003 साली मी नवीन रो हाऊस घेतले. नवा स्टुडिओ बांधला .

सेंट पीटर्स येथे ड्रेस कोड असल्यामुळे भरपूर कपडे घेतले. त्यावेळी माझ्याकडे रंगीबेरंगी ८० टाय झाल्या होत्या. आजही त्या आठवण म्हणून माझ्याकडे आहेत . पण एक टाय मात्र मी प्रेमाने जिव्हाळ्याने कायमची जपून ठेवलेली आहे ….. 

…. ती म्हणजे आयझॅक सरांची ग्रीन टाय. 

मी कधीही दुःखी आणि निराशेच्या गर्तेमध्ये असलो की मला आयझॅकची आठवण येते. आता आयझॅक अमेरिकेत असतो. त्याने आता लग्नही केलेले आहे .फेसबुकवर अधून मधून भेटत असतो. मी कितीही श्रीमंत झालो, माझी परिस्थिती सुधारली ,बिघडली तरी एक गोष्ट मी त्याला कधीही परत करणार नाही ती म्हणजे ग्रीन  टाय …. कारण ती टाय मला स्वतःला कधीकधी आयझॅक बनवते. माझ्याकडे कितीतरी कलाकार मित्र येत असतात . काही नवीन शिकणारी असतात, काही निराश झालेले असतात , काही उमेद हरवलेले कलाशिक्षक असतात, अनेक गोष्टींच्या तक्रारी करत असतात, त्यांना मार्ग सापडत नसतो …  अशावेळी मी काळे सरांच्या ऐवजी आयझॅक होतो ..  नव्हे आयझॅक सर संचारतो माझ्यात…

ज्या ज्या वेळी अशी निराशेने ग्रासलेली , व्यथित, दुःखी माणसे मला भेटतात त्यावेळी आपण प्रत्येकाने आयझॅक झाले पाहीजे असे माझे आंतरमन मला नेहमी सांगत असते, कारण त्याची ग्रीन टाय सतत मला आठवण करून देते.

जीवन हे आत्महत्या करून संपवण्यासाठी नसते तर आपल्यातील सर्वोत्तम देण्यासाठी, सर्वोत्तम जगण्यासाठी ,सर्वोत्तम शिकण्यासाठी, सर्वोत्तम पाहण्यासाठी, सर्वोत्तम शिकवण्यासाठी , सर्वोत्तम ऐकण्यासाठी असते.

….. असे अनेक आयझॅक मला वेळोवेळी भेटत गेले. आणि माझे आयुष्य समृद्ध करत गेले. एकवीस वर्ष झाली आता या घटनेला, आत्महत्या करायचे तर मी कधीच विसरून गेलो आहे. असे अनेक आयझॅक आपल्याला वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रुपात भेटत असतात. कधी भेटले नसले तर तुम्हालाही असा आयझॅक भेटावा व एक ग्रीन टाय मिळावी किंवा…

…. तुम्हीच कोणाचे तरी आयझॅक व्हावे आणि त्या निराश माणसाला एक ग्रीन टायसारखी वस्तू द्यावी म्हणजे निराशेचा अंधार कायमचा दूर व्हावा….

म्हणून खूप खूप शुभेच्छा !

तर अशी आहे माझी ‘ग्रीन टाय’ ची आठवण…..  मला सतत प्रेरणा देणारी……..

– समाप्त – 

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print