डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मला भेटलेली एक सुंदर स्त्री !! ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणून मोबाईल काढला…. बघतो तो हँग झालेला… बापरे..  बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला… वैताग आला… मोबाईल काही सुरु होईना …. 

काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं, ‘ कोण हाय …? ‘ मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी…. 

आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं , “ काय बाई ही काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येऊन अशी अंगावर हात ठेवतेस … घाबरलो ना मी…! “

तशी म्हणाली, “ आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती. या टायमाला मी हितंच बसून भाकर खाती… मापी करा, मी जाती दुसरीकडं … “ मी ओशाळलो, म्हटलं, “ नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे… “

तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो “ डोळे कशानं गेले?”  म्हणाली,” लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं. लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली. नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, १७ वर्साची व्हते मी तवा…. “

“ अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे. आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली… बेअक्कल असतात लोकं…”  मी सहज बोलुन गेलो. 

यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल. पण नाही..  ती म्हणाली, “ नाय वो, कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं… खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माजा बाप गेला …त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं… डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्यापेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया … “ ती हसत म्हणाली…

…. वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई ?

तरी मी म्हणालो, “ मग भगताचं काय … ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? “

म्हणाली, “ आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त … माज्या नशीबाचे भोग हुते ते … त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई… कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई… ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणूनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात… आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल…?” 

‘ Intention is important behind every action ‘ .. 

.. या वाक्याचं सार या बाईने किती सहज सांगितले …!!!

“ पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला? “

म्हणाली, “ न बघता? काय बघायचं राहिलंय … आवो सगळं बगुन मनात साटवलंय …. वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय …. तुमी काय बगीतलं ह्यातलं …? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? “

…… तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 

“ आज्जी तुमचं लग्न ….? “ मी चाचरत विचारलं… आज्जी म्हणाली, “ झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला …. पदरात एक पोरगी टाकली. त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती … म्हणलं चला चांगलं दिवस आलं … पन त्योबी दोन वर्षातच गेला…… बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला…. ! “  

“ आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? “  आज्जी भकास हसली, म्हणाली,” तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला … आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील …. स्वर्गात म्हणं नाच-गाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा…..”  असं म्हणून आज्जी हसायला लागली… 

…. पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना…. इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार ! 

“ आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा पण ? “

“ कुणाचाच न्हाई. परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला… आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ… भाकर मिळाली तर म्हणायचं .. आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु….दोष कुनाला द्यायचा न्हाई… वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काही कारणच नाही…” 

“ ते कसं आज्जी ? मला नाही समजलं …”

“ ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन… आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? “

.. .. काय बोलावं मलाच कळेना. या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? ‘वयामुळं हा पोक्तपणा आला असेल, की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ?’ …. 

…… कारण काहीही असो ..  एवढ्या सुंदर विचारांची, वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी ती आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!!  

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments