सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – फिट्ट जीन्स– ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

आमच्या लग्नानंतर अनेकदा, सुनीलला माझ्यासाठी जीन्सची पँट घ्यावीशी वाटे. मला लांब कुर्ता आणि जीन्समधे पहायला सुनीलला मनापासून आवडे. मला खरेदीला सवड नसल्याने वा, या ना त्या कारणाने ‘जीन्स’ची खरेदी राहून जाई. आमचे ‘मंगलदीप’ चे कार्यक्रम शक्यतो शनिवारी-रविवारी असल्याने, त्यावेळी खरेदीची इच्छाही होत नसे. एरव्ही थोरली बहीण उषाताई अमेरिकेहून आली, की ती माझ्यासाठी बॅगा भरभरून वेगवेगळ्या फॅशनचे, सुंदर सुंदर कपडेच कपडे आणायची. तिला, मला त्या कपड्यांत सजवून पाहताना किती सार्थकता वाटे! मला मात्र क्षणाक्षणाला कपडे बदलून फॅशन परेड करायचा खूप कंटाळा येई! तरी बहिणीचे प्रेम पाहून आनंदही होई!

आमच्या लग्नाच्या एका वाढदिवशी मात्र, सुनीलची ही मनापासूनची इच्छा मी पूर्ण करायची असं ठरवलं. याचं खरं कारणही तसंच होतं. मला दूरदर्शनच्या एका दिवाळी स्पेशल कार्यक्रमात, एका मोठ्या मॉलची गिफ्ट कुपन्स मिळाली होती. तिचा योग्य वेळेत वापर करायचा होता. बऱ्याच वर्षांनी दोघांना वेळ होता आणि खरेदीचा योग आणि मूडही होता.

एरव्ही स्लीम ट्रीम दिसणाऱ्या तरुण मुलींची फिगर पाहून मला हुरहूर वाटे. आपल्याला लग्नापूर्वीसारखं असं होणं, आता अशक्यच वाटे! त्यांच्यासारखी, जणू काही अंगालाच घट्ट शिवल्यासारखी टाईट फिटिंग्सची जीन्स आपण कधीच घालू शकणार नाही. त्यातून व्यायामही करायचा आळस! आणि भरीला तासन् तास संगीताच्या रियाजाचं तसंच शिकवण्याचं बैठं काम ! म्हणजे सर्व आनंदी आनंदच ! असो.

आज त्या मॉलमधे मी आणि सुनील अगदी नवपरिणित दांपत्यासारखे आनंदाने बऱ्याच वर्षांनी, हौसे-मौजेने बागडत खरेदीला गेलो. चार पाच मजले फिर फिर फिरून दागिने, घड्याळं, हिऱ्याच्या अंगठ्या, सर्व काही पाहिलं, पण काही पसंतीस पडेना. बरंच फिरल्यावरही माझ्या आणि सुनीलच्या मापाचे कपडेही काही इथं मिळेनात. तेव्हा म्हटलं, “बहुतेक ह्या मॉलमधे आपल्यापेक्षा बारीक व्यक्तींसाठीच कपडे ठेवले असावेत, किंवा आपण ‘स्पेशल एक्स्ट्रा लार्ज’ या कॅटेगरीत मोडत असू. आपल्याला हवी ती ‘जीन्स’ इथं काही मिळणार नाही.

इतक्यात जीन्स दाखवणाऱ्या सेल्सगर्लने मला ओळखलं, “मॅडम, तुम्ही टीव्हीवर गाता का?” मी होकारार्थी मान हलवल्यावर तिला खूप आनंद झाला. म्हणाली, “माझी आई तुमची खूप मोठी फॅन आहे!” तिनं इतर सहकाऱ्यांना सांगून सगळीकडून भराभर उत्खनन करून, पटापट माझ्या मापाच्या जीन्स शोधून आणवल्या. अजूनही काही बारामतीची फॅन मंडळी भेटली. “अय्या, प्रत्यक्षात कित्ती बारीक दिसताय तुम्ही!” असा प्रत्येक स्त्रीला (उगाच!) भुलवणारा आणि सुखावणारा डायलॉग त्यांनी उच्चारला! 

मीही आधीच्या सगळ्या भानगडी विसरून (ट्रायलरूमच्या आरशात पाहिलेलं आपलं अजस्र रूप विसरून!) काही क्षण मनोमन सुखावले…आणि त्यातली एक जीन्स आम्ही पसंत करून घेतलीही! 

एवढ्यात एक ठेंगणी-ठुसकी, सामान्य तोंडवळ्याची, सावळ्या वर्णाची स्त्री मला भेटली आणि म्हणाली, “आप पद्मजाजी हैं ना? आप तो मेरी शादी में आयी थीं, मैं धीरज धानकजी की बहू हूँ।”… (धीरजजी माझ्या ‘गीत नया गाता हूँ’, ‘घर नाचले नाचले’ अशा अनेक गाण्यांच्या CD चे संगीत संयोजक. तसेच आर.डी. बर्मन, एस. डी. बर्मन , मदनमोहन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल अशा अनेक दिग्गजांबरोबर अफलातून संगीत संयोजन करणारे प्रतिभावंत कलाकार! त्यांनीच सर्वप्रथम माझं संगीत ऐकून मला सुरुवातीलाच प्रोत्साहन दिलं होतं. स्वतः नवोन्मेषाचा, चैतन्याचा धबधबा असलेले, आजूबाजूचं वातावरण क्षणात तणावमुक्त करणारे धीरजभाई, जे गाणं हातात घेतल्यावर, त्या गाण्याला सजवून कुठच्या कुठे उंचीवर नेऊन ठेवत! उदा… दिवे लागले रे, आओ फिरसे दिया जलायें… ई.) 

इथे धीरजजींच्या सुनेच्या दोन्ही बाजूला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन सुंदर पिल्लं लगडलेली! “चलो बेटा, नमस्ते करो अंकल आँटी कोऽऽऽ।”  असं म्हटल्यावर, नमस्कार करत त्या मुलीनं सुंदर स्मित केलं अन्…. माझ्या डोक्यात अक्षरशः लख्खकन् वीज चमकली! 

काय ही दैवाची करणी! साक्षात् धीरजभाईंचं जस्संच्या तस्सं तेजस्वी रूप, कोरल्यासारखं तिच्यात उतरलं होतं ! ‘परमेश्वर’ नावाच्या कोण्या एकाने हे ‘जीन्स’ मात्र अगदी ‘फिट्ट’ बसवले होते! तेच डोळे, तोच वर्ण, तेच हास्य…. परमेश्वराच्या  अदाकरीचा – कलाकृतीचा हा नमुना पाहून मात्र, माझ्या डोळ्यांतली आसवं मी थांबवून ठेवली होती. 

खरंतर जन्म मरणाचं चक्र भारतीय तत्त्वज्ञानाने अपरिहार्य मानलं आहे. जीव कुडी सोडून जातो. नष्ट होत नाही. पण एका पिंजर्‍यातून प्राणपक्षी दुसर्‍या पिंजर्‍यात जातो. चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधे प्रवेश करून पुन्हा धरतीवर सजीव प्राण्यांमध्ये येतो. जीन्सच्या रुपाने आज धीरजभाई यांना त्यांच्या या नातीमधे वास करताना मी पाहिलं.  प्रत्यक्ष धीरजभाईंचं रूप पाहून आनंद आणि ते या जगात नसल्याची खंत!.. अशी संमिश्र भावना डोळ्यांत दाटून आली होती. मात्र ही मंडळी नजरेआड झाल्यावर माझा बांध मी मोकळा करून दिला…!  

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments