सौ. रेखा दयानंद हिरेमठ

अल्प परिचय 

सिव्हिल हॉस्पिटल, सांगली येथे  23 वर्षापासून कार्यरत. वाचन,संगीत, विविध कला जोपासणे कविता, ललित लेखन यात विशेष रस. हसणे आणि हसवणे मनापासून आवडत असल्याने विनोदी लेखनाची आवड.

? मनमंजुषेतून ?

☆ – माझी दंत कथा… – ☆ सौ. रेखा दयानंद हिरेमठ ☆

आता तुम्ही म्हणाल ही कसली कथा? दंतकथा म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या कथा ना ! मग तुझी कसली ही कथा ?….  अहो दंतकथा म्हणजे माझ्या दाताची – मी गमावलेल्या अक्कलदाढेची कथा.

तर काय सांगत होते मी ….  आटपाट नगरामध्ये एका स्त्रीचे आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. पण अशा या सुरळीत आयुष्यात या स्त्रीच्या म्हणजे माझ्याच हो, दातामध्ये किडीचा प्रादुर्भाव झाला आणि ही दंतकथा उदयास आली. तर झालं असं, रात्री अपरात्री माझ्या दाताने त्याचे अस्तित्व अधोरेखित करायचा चंगच बांधला. एकदा ठणका सुरु झाला की झोपेचं खोबरंच. स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करत असून देखील इन जनरल कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी चढायची नाही अशा गैरसमजुतीमुळे मी घरीच दुखऱ्या दाता जवळ मीठ- हळद दाबुन ठेवणे, लंवग धरणे, असे काही-बाही घरगुती उपाय केले. त्याने थोडे दिवस बरे वाटले. पण हे दुखणे काही हटेना. शेवटी खूप सारं मानसिक बळ एकवटून आमची स्वारी दाताच्या दवाखान्याकडे वळली. थोडे दिवस औषधांचा मारा करून मग अक्कलदाढ काढायची असे डॉक्टरांनी सांगितले.

ठरलेल्या दिवशी उसने अवसान आणून मी दवाखान्यात जाऊन बसले. आणि माझा नंबर येण्यासाठी वाट पाहू लागले. हल्ली पूर्वीसारखं वाट पाहणं फार काही बोरिंग असे होत नाही ते मोबाईलबाबांच्या कृपेमुळे. थोडा वेळ मोबाइल चेक केला. पर्समध्ये सुधा मुर्तींचे वाइज अँड अदरवाइज पुस्तक होते. ते थोडे वाचले. पण चैन काही पडेना. शेजारी एक बाई त्यांच्या लहान मुलाला घेऊन बसल्या होता. ते बाळ देखिल एका ठिकाणी बसून कंटाळलं होतं. दिसेल ती वस्तू- गाडीची चावी, आईची ओढणी सर्व काही ते बाळ तोंडात घालत होते आणि त्याची आई शीsss हे तोंडात घालू नको ते तोंडात घालू नको असे उपदेश देत होती. मधूनच ते बाळ माझ्याकडे प्राणीसंग्रहालयामध्ये असलेल्या एखाद्या प्राण्याकडे पहावे तसे पाहत होते. मग मी पण त्याला चुटकी वाजवून खेळवायचा प्रयत्न करू लागले. त्याचे आईच्या अंगावर, सोफ्यावर उड्या मारणे सतत चालू होते. थोड्या वेळाने त्या गोंडस बाळाला झोप आली. म्हणून त्याच्या आईने त्याला झोपवण्यासाठी  थोपटणे सुरू केले. आणि आपण लहान मुलांना झोपवताना गुणगुणतो तसे आsss आss गाणे  सुरू केले. तसे ते बाळ सुध्दा जोरजोरात आsss आsss असा सूर लावू लागले. नेमके त्याच वेळी माझे लक्ष दुसरीकडे असल्याने त्याच्या त्या मोठ-मोठ्याने आsss आsssकरण्यामुळे मी एकदम दचकून पाहिले. त्या माय-लेकराचं दोघांचं आsss आsss सुरु होते. खरेतर हे पाहून मला खूप हसू फुटले. मी विचारात पडले. नक्की कोण कोणाला झोपवत आहे. मी त्या बापड्या आईला तसे विचारले देखिल. ती पण खुप हसत होती. शेवटी एकदा त्या बाळाला निद्रादेवी प्रसन्न झाली. आणि लेकरू झोपी गेलं. आणि त्याच्या आईने मोठा सुस्कारा सोडला. त्याला झोप आल्यावर तो असेच मोठ-मोठ्याने आsss  आsss असं गाणं म्हणतोअसे सांगू लागली.असो काही का असेना त्यामुळे माझा वेळ कसा गेला मला कळालंच नाही.

थोड्या वेळाने त्या बाळाची मोठी बहीण म्हणजे ७-८ वर्षाची गोड मुलगी डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर आली. तेव्हा मीच मनाला समजावलं बघ एवढीशी मुलगी देखिल हसत हसत बाहेर आली आहे, मग तू कशाला घाबरतेस. मग झाशीच्या राणीप्रमाणे उत्साहाची वीज अंगात सळसळली आणि मी डॉक्टरांच्या केबिनकडे प्रस्थान केले. डॉक्टर दूरचे का असेनात पण  नात्यातीलच असल्यामुळे एक दिलासा होता. थोडफार बोलणे झाल्यानंतर मदतनीसांनी मला त्या खुर्चीत बसायला सांगितले. खरेतर ती खुर्ची इतकी सुंदर आणि आरामदायी होती की त्यावर क्षणात झोप लागावी. पण दुखणाऱ्या दाढेमळे ते आसन म्हणजे अदृश्य काट्याकुट्यांनी व्यापलेलं एखाद्या राज्याचे सिंहासन असल्याचा भास झाला. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी  माझ्या दाढेवर लक्ष केंद्रीत केले आणि माझ्या दाढेजवळ स्प्रे, इंजेक्शन वगैरे उपाय योजना सुरू केल्या. इंजेक्शन देताना मात्र कसा कुणास ठाउक मी एकदम हात हलवला. डॉक्टरांनी त्यावेळी मला सौम्य भाषेतच पण सुई टोचेल तुम्ही हलू नका असे सांगीतले. डॉक्टर म्हणाले “ तुम्हाला जेव्हा जडपणा, बधिरपणा जाणवतो तेव्हा सांगा. काही गडबड नाही मात्र आजिबात हलू नका.” मी तशातच मान डोलावली आणि थोड्या वेळाने मी तयार आहे असे सांगीतले. आता मात्र मी माझे दोन्ही हात त्या चेअरच्या आर्म रेस्टवर असे काही घट्ट पकडले की मला घोरपडीची कथाच आठवली.

माझ्याकडून अनुमोदन मिळताच डॉक्टर त्यांच्या चेअरमधून अशा  आविर्भावात उठले की आता आर या पार. पांढरी वस्त्र धारण केलेला योध्दा आक्रमणsss म्हणून आता लढायला सज्ज झाल्याचा भास झाला. आतून पुरती भेदरलेली मी माझी हाताची पकड आर्मरेस्टवर आणखीनच घट्ट केली. डॉक्टर म्हणाले,’ शांत रहा आणि उलट्या क्रमाने मनात आकडे मोजा.’ मी आपली मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ चा जप सुरू केला. आणि माझ्या तोंडात तुंबळ युद्ध सुरू झाले, पण खरी कमाल तर मला भूलीच्या इंजेक्शनची वाटली. हा सारा प्रकार त्या भूलीच्या इंजेक्शनमुळे आपल्याच तोंडात सुरू आहे. असे वाटतच नव्हते. जणू काही माझ्या शेजारी जे बसलेत त्यांचीच दाढ काढणे सुरू आहे.आणि मी ते बघत आहे. मनोमन मी त्या भूलीच्या इंजेक्शनचा शोध लावणाऱ्या  थोर विभूतीला साष्टांग दंडवतच घातलं. आणि ति-हाईताप्रमाणे डोळे झाकून या  युध्दाची साक्षीदार व्हायचा प्रयत्न करू लागले.

एवढ्यावेळ चुळबुळ करणारी मी शांत आहे त्यामुळे मला झोप लागली की काय असे डॉक्टरांना वाटले असावे. म्हणून की काय, डोळे उघडा- डोळे उघडा असे ते म्हणून लागले. म्हणून डोळे उघडून पाहते तो काय डॉक्टरांनी विजयी मुद्रेने युद्ध समाप्त झाल्याची घोषणा केली व सांगितले.. ‘ झालं. झालं,काढला दात.’ आणि असे म्हणून त्यांनी दाढ काढलेल्या पोकळीमध्ये औषधात भिजवलेला बोळा दाबला आणि तोंड बंद करून बसायला सांगितले. तो कापसाचा बोळा तासभर तसाच तिथे राहू दे आणि तासभर अजिबात बोलू नका असे सांगितले. खरेतर तो कापसाचा बोळा हलू नये म्हणून त्यांनी मला तासभर बोलू नका असा सल्ला दिला हे समजले. पण आज दिवसभर जास्त बोलू नका असे म्हणाल्यावर स्त्री स्वभावधर्मानुसार मी डॉक्टरांबरोबर खूप बोलत होते आणि त्यातून डॉक्टर माझ्या मिस्टरांच्याकडून नात्यातले असल्यामुळे यांनीच डॉक्टरांना हिला दोन दिवस गप्प बसायला सांगा असे सांगितले असावे असा दाट संशय आला. मनात शंकेची पाल चुकचुकली आणि मनातले एसीपी प्रद्युम्न म्हणाले ‘ कुछ तो गडबड है दया..’

जरी आतून किडीने पोखरली होती  तरी ती बाहेरून पूर्ण गोलमटोल दिसत होती. माझीच दाढ ती माझ्यासारखीच चांगली बाळसेदार होती. हल्ली काय करतील याचा नेम नाही. आठवण म्हणून नेत असावेत दाढ घरी. म्हणूनच की काय डॉक्टरांनी मला विचारले. ती दाढ हवी आहे का? एवढी दुखरी आठवण कशाला जपा ..  म्हणून मी नको म्हणून सांगितले.

मग बऱ्याच सूचनांचं सत्र झाल्यावर मी जाण्यासाठी उठले. त्या दाढेचा एखादा फोटोतरी घ्यावा का म्हणून त्या मदतनीसाना मोबाइल दाखवला आणि विचारले दाठ कुठे आहे? फोटो काढून घेते  पण तोपर्यंत त्या निर्विकार चेहऱ्याच्या मदतनिसांनी त्या दाढेला केराची टोपली दाखवली होती.

— अशा रितीने माझी दंत कथा समाप्त झाली.

शेवटी काय कितीही कोपऱ्यात, हिरड्यांच्या कुंपणात लपून का  बसलेले असेनात,  प्रत्येक दातावर आणि दाढेवर व्यवस्थितपणे दोन वेळा ब्रश फिरवायलाच पाहीजे ही अक्कल मला आली…

अक्कल आली हो पण अक्कलदाढ मात्र गेली…

© सौ. रेखा दयानंद हिरेमठ

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
3.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments