श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पाहुणा…” ☆ श्री मंगेश मधुकर 

कॉलेजच्या रियुनियनला सहकुटुंब गेलेलो. अनेक मित्र-मैत्रीणींची भेट झाली. जुन्या आठवणी, भरपूर खाणं अन पोटभर गप्पांमुळे संध्याकाळ संस्मरणीय झाली. मस्त मूड होता. कधी नव्हे ते गाणं गुणगुणायला लागलो. बायको आणि मुलीला आश्चर्य वाटलं. घरी पोचलो तर दार सताड उघड आणि हॉलमध्ये खुर्चीत मांडी घालून आई बसलेली.

“काय गं, दार उघड ठेवून अशी का बसलीयेस”

“बरं झाला आलास. किती वेळची वाट बघतेय. ”आई.

“काय झालं. अर्जंट होतं तर फोन करायचा ना”

“म्हटलं तर अर्जंट म्हटलं तर नाही. ”

“आई, मूड चांगलाय. नीट सांग. काय झालं”

“घरात पाहुणा आलाय. ”

“मग त्यात टेंशन कसलं”

“विशेष पाहुणा आहे”

“कोण?कुठयं?

“आत्ताच कपाटामागे गेलाय”

“पाहुणा कपाटामागे??आई, काय बोलतेस तुझं तुला तरी कळतयं का?” 

“अरे, उंदीर मामा घरात शिरलेत. तास झाला खुर्चीतून हलली नाहीये. ”आईचं ऐकून बायको आणि मुलगी “ईssईss”करत किंचाळत घराबाहेर गेल्या. पाठोपाठ आईसुद्धा. खरं सांगायचं तर मीसुद्धा जाम घाबरलो. उंदीर पाहिला की कसंतरीच होतं. शिसारी येते. खूप भीती वाटते.

“अहो, आधी त्याला बाहेर काढा”

“बाबा, लवकर”

“ही काठी घे आणि त्याच्या डोक्यात घाल. ईकडून तिकडं फिरून मेल्यानं वात आणलंय. ”

“ए, बायांनो!!जरा थांबता का?”.

“आता कशाला थांबायचं”आई.

“अगं हो, जरा बघू तर दे. ”

“ईss उंदराला काय पहायचं. ”मुलगी 

“मी बाहेर जातो. काय करायचं ते तुम्हीच ठरवा. ”  

“आधी त्याला घालवा मग कुठंही जा”बायको.

“मग एकदम गप्प बसायचं आणि आधी घरात या. उगीच आख्ख्या सोसायटीला कळायला नको”. आई खुर्चीवर तर मुलगी आणि बायको सोफ्यावर बसल्या. ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ न्यायानं मीच तो काय सोकॉल्ड धीट, शूर??भीती वाटत होती तरीही उसनं अवसान आणून भिरभिरत्या नजरेनं काठी कपाटाजवळ आपटायला सुरुवात केली.

“जास्त जवळ जाऊ नको रे”

“अहो, बेतानं नाहीतर एकदम अंगावर येईल. ”

“उंदीर चावतो का” आई, बायको, मुलगी पाठोपाठ बोलल्या.

“शांत बसा नाहीतर काठी घ्या त्याला हाकला. ”मी चिडलो.

“आमच्यावर रागवण्यापेक्षा उंदराला बाहेर काढा. बघू या जमतयं का?”बायकोचं बोलणं सहन न झाल्यानं रागाच्या भरात जोरात काठी जमिनीवर फेकली तेव्हा कपाटामागचा उंदीर भसकन बाहेर आला. अचानक समोर आल्यानं घाबरून मागे सरकलो तर उंदराला पाहून आई, बायको, मुलगी एकदम ओरडल्या त्या आवजानं उंदीर जागेवरच एक इंच उडाला आणि किचनमध्ये पळाला. पाठोपाठ अस्मादिक किचनमध्ये. नक्की कुठं लपलाय कळत नव्हतं त्यातच परडीला धक्का लागून एक कांदा पायावर पडला. घाबरून जोरात ओरडलो.

“अहो, आधी दोन्ही बेडरूमची दारं लावून घ्या. ”

“दारं बंदच आहे”आई.

“आता काय करायचं”मुलगी.

“फक्त वाट बघायची. ” भिंतीला टेकून उभा राहिलो. नजर शोधत होतीच. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल जाणवली नाही. पुन्हा ओटा, ट्रॉली, शेल्फवर काठी आपटायला लागलो.

“उंदराच्या नादात किचनमध्ये तोडफोड करू नका. सावकाश!!”बायकोचा अनाहूत सल्ला.

“मला कळतं. ऐकून घेतो म्हणून प्रत्येकवेळी नवऱ्याला सुनवायची गरज नाही. ”

“ते माहितीये पण स्वभाव धसमुसळायं ना म्हणून आधीच सांगितलं नंतर सॉरी म्हणून उपयोग होणार नाही. ” गरज नसताना बायकोनं टोमणा मारल्यानं संताप अनावर होऊन रॅकवर जोरात काठी मारली तर उंदीर एकदम अंगावर आला, हेलपाटलो कसंबसं सावरत काठी मारली पण नेम चुकला. घाबरलेला उंदीर आईच्या दिशेने गेला तर ती ओरडायला लागली. हातातली काठी फेकली तेव्हा तो कपाटामागे लपला. पुन्हा काहीवेळ शांतता आणि एकदम तो तुरुतुरु पळत सोफ्याच्या दिशेनं गेल्यावर बायको आणि मुलगी घाबरून सोफ्यावरच उभ्या राहिल्या. बायको जोरजोरात “हाड हाड” करायला लागली.

“ममा, तो कुत्रा नाहीये, ” 

“तू गप गं. आधी त्याला हाकल मग मला अक्कल शिकव” मायलेकी वाद घालायला लागल्या अन यागडबडीत उंदीर पुन्हा बेपत्ता. झालं पुन्हा शोधाशोध!!सगळेच बेचैन, अस्वस्थ. जरा कुठं खट्ट वाजलं तरी दचकत होते. उंदीर घरात असेपर्यंत कोणालाच शांत झोप लागली नसती त्यामुळे काहीही करून त्याला बाहेर घालवणं किवा मारणं गरजेचं होतं परंतु तो हाती लागत नव्हता. इकडून तिकडं नाचवत होता. खूप दमलो. भीतीची जागा संतापानं घेतली. रात्रीचे अकरा वाजून गेलेले अन आम्ही एवढ्याशा जीवाच्या दहशतीखाली होतो आणि कदाचित तो आमच्या………

“आता रे???, शेजारच्यांना बोलावू का?” आई म्हणाल्यावर मी भडकलो.

“जरा दम धरतेस. आल्यापासून तेच करतोय ना. कशाला उगीच गाव गोळा करायचाय”

“तुम्ही चिडू नका. मदतीसाठी म्हणून त्या म्हणाल्या. ”बायकोनं समजावलं.

“आता त्याला सोडायचा नाही. तू एक काम कर, किचनची वाट आडव. आई, तू खुर्चीवरून हलू नकोस. कार्टे, तो फोन बाजूला ठेव आणि शोकेसजवळ थांब. हातात काहीतरी ठेवा जर अंगावर आलाच तर उपयोगी पडेल. ” बोलत असतानाच तो दिसला जोरात काठी मारली पण परंतु परत नेम चुकला.

“बाबा, त्याला बाहेर घालवू. मारायला नको. छोटसं पिल्लूयं”

“बरं, रेडी. घाबरू नका. फक्त पाच मिनिटं लागतील”स्वतःसकट सर्वांचा उत्साह वाढवायचा प्रयत्न केला. हातात झाडू घेऊन आई खुर्चीत, फरशी पुसायचा मॉप घेऊन बायको किचनच्या दारात, प्लॅस्टिकचा ट्रे घेऊन मुलगी शोकेसच्या बाजूला उभी राहिली.

“सगळे तयार आहात. तुमच्या बाजूला येऊन द्यायचं नाही. दाराच्या दिशेने ढकलायचं. ओके”काठी आपटायला लागल्यावर काही वेळानं तो बाहेर आला अन किचनकडे गेला पण टिपॉय आडवा टाकून वाट बंद केल्यामुळे शोकेसच्या बाजूला गेला पण मुलीनं ट्रेनं ढकललं. लपायला जागा सापडत नसल्यानं त्याची पळपळी सुरु झाली अन गोंधळ वाढला. पळापळ करून थकलेला अन घाबरलेला उंदीर हॉलच्या कोपऱ्यात थांबला. दरवाजाच्या दिशेनं वळवण्यासाठी प्रयत्न केले तर एकदम तो किचन नंतर सोफ्याकडं मग शोकेसच्या दिशेनं गेला पण आवाजामुळं मागे फिरला. काही क्षण एका जागी थांबून अंदाज घेतल्यावर अचानक तो एकदम घराबाहेर गेला. अवघ्या काही सेकंदात हे सगळं घडलं. पटकन दार लावून घेतलं. आई जोरजोरात टाळ्या वाजवायला लागली तर मुलगी बायकोला बिलगली. मी मात्र  “हुssssश” करत मटकन खाली बसलो. खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तितक्यात बायकोनं विचारलं “सासूबाई, नक्की पाहुणा एकच आला होता की… ” ते ऐकून मी कोपरापासून हात जोडले. तिघीही जोरजोरात हसायला लागल्या. —-

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments