सुश्री त्रिशला शहा
कवितेचा उत्सव
☆ बारा महिने… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆
☆
वसंतातला मोहर सांगे,चैत्र पहा आला
कडूनिंबासह साखरमाळ,गुढी उभी ती दारा
☆
तप्त उन्हाळा वैशाखाचा,सण साजरा अक्षय्य तृतीयेचा
डोंगरची काळी मैना,सोबत गोडवा आंब्याचा
☆
भरभर वारे सरसर धारा,ज्येष्ठ घेऊनी आला
सजूनी त्या ललना निघाल्या वटपूजा करण्याला.
☆
गुरुपूजनी वंदन करण्या,आषाढ उभा ठाकला
पुरणपोळी अन् कर तळण्या बेंदूर सण हा आला
☆
कधी ऊन तर कधी पाऊस,गंमत न्यारी श्रावणाची
नागपंचमी,गोकुळाष्टमी, रक्षाबंधन रेलचेल सणांची
☆
ढमढम ढमढम ढोल वाजले,गणरायाचे आगमन झाले
भादव्यातली माहेरवाशीण गौरीपुजन थाटात झाले
☆
घरोघरी ती घटस्थापना, दुर्गामाता बसली पाटा
रास-गरबा नाद घुमवित,अश्विनातला दसरा आला
☆
दिव्यादिव्यांच्या ज्योति उजळीत,कार्तिकाचे आगमन झाले
लाडू,चकली,करंजीने पाडवा भाऊबीज गोड झाले
☆
मार्गशीर्षी दत्तजयंती,दत्तचरणी मन हे लागे
आल्हाददायक वातावरण,थंडीची ती चाहूल लागे.
☆
‘तिळगुळ घ्या गोड बोला ‘,पौष मास अवचित आला
बाजरी,गुळपोळी,मिसळभाजीचा थाटच आगळा,हलव्याचा काटा फुलला.
☆
नविन धान्याची रास पडली,पूजन करा नव्याच्या पूनवी
माघ महिना थंडी भारी,उबदार वाटते शेकोटी
☆
आता आला फाल्गुन महिना,होळीचे करा पूजन
नविनची लागे चाहुल,जुने पुराणे होता विलीन.
☆
वर्षाचे हे महिने बारा , रंग वेगळे प्रत्येकाचे
जीवन त्यामध्ये रंगून जाते,जरी रिवाज वेगळे सा-यांचे
☆
तीन वर्षांनी अवचित येई,अधिक मास त्याला म्हणती
तेहतीस अनारसे ताट भरुनी,जावयास दान देती
☆
© सुश्री त्रिशला शहा
मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/ सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈