मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रामदासांची पत्नी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ रामदासांची पत्नी ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

समर्थ रामदासांना  आठवताना  त्यांच्याशी संबंधित अजून एका व्यक्तीला आठवणं ही क्रमप्राप्त ठरते, ती व्यक्ती म्हणजे त्यांची पत्नी ! होय मी समर्थांनी ज्या मुलीला लग्नमंडपात अर्धवट सोडलं होतं त्या मुलीला , त्यांची पत्नीच म्हणेन मी . आज तिला आठवणं हे संयुक्तिक ठरेल, कारण त्या स्त्रीने  समर्थांची आठवण आपल्या हृदयात शेवटपर्यंत जागृत ठेवली. त्या मुलीची बरीच लोक कीव  करतात. काही लोक तर समर्थांना हे शोभलं नाही असाही  समर्थांना उपदेश  करतात. आपल्या भारतीय लोकांना स्वत: पेक्षा इतरांच्या घरात काय चाललंय याचीच जास्त चिंता असते. एकाने आचार्य अत्रेंना हाच प्रश्न विचारला होता, “त्या मुलीचं पुढे काय झालं हो समर्थांनी लग्नमंडपात सोडलेल्या ?” – तेव्हा आचार्य अत्रेंनी मार्मिकपणे उत्तर दिलं, ” मला माहीत नाही, कारण मी त्यावेळी त्या लग्नाला हजर नव्हताे.” पण  पुढे जाऊन त्या मुलीचं काय झालं याचा शोध घेणे  हे खूपच कमी लोक करतात.  इतिहासाने काही व्यक्तींवर खूप अन्याय केला आहे, त्यातीलच रामदासस्वामींच्या पत्नी या एक होत. आज त्यांना आठवणं त्यामुळेच क्रमप्राप्त ठरते. 

रामदासस्वामी निघून गेल्यावर मुलीचे वडील मुलीला म्हणाले,” बाळ घरी चल.” तर ती मुलगी बाणेदारपणे म्हणाली,” बाबा तुम्ही कन्यादान केले आहे, आता मी त्या घरात येणार नाही.” गंगाधरपंत, समर्थांचे वडीलबंधू, मुलीला म्हणाले,” मुली तू आपल्या घरी चल, मुलीप्रमाणे तुला सांभाळेन.” त्या वेळी ती मुलगी म्हणाली, ” दादा पाणिग्रहण झालेले नाही, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही.” 

मग त्या मुलीने  काय केले? ती चालत राहिली. गावे मागे पडली, नगरं मागे पडली, आणि तिला एक जंगल  लागले. तिथे तिला झुडूपात एक मंदिर दिसलं. त्या मंदिरातच राहण्याचा तिने निश्चय केला. तिने आजूबाजूची झुडपं साफ केली. एक अंगण त्या मंदिराभोवती बनवलं आणि ती तिथेच राहू लागली. त्या अंगणात मुले खेळायला येत, त्यांच्यावर तिने संस्कार करायला सुरूवात केली. त्यांना तलवारबाजीचे, भालाफेकीचे, दांडपट्ट्याचे शिक्षण दिले आणि ती  फौजच्या फौज शिवाजी महाराजांच्या  सैन्याकडे पाठवू लागली… सैन्यात भरती होण्यासाठी. आणि शिवाजी महाराजांच्या सेनापतीलाही प्रश्न पडला की आपलीही  फौज इतकी निष्णात नाही, या लायकीची नाही…. कोण पाठवतंय ही फौज? त्याने ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या कानी घातली आणि शिवाजी महाराजांना चिंता वाटली. त्यांना वाटलं गनीम तर करत नसावा असं काही? आपल्या फौजेची गुपिते हस्तगत करण्यासाठी! त्यांनी आपल्या हेरखात्याला शोध घ्यायला सांगितलं.

हेरखात्याने बातमी आणली की इथून खूप लांब राहणारी एक बाई हे काम करते  आहे.  शिवाजी महाराज मग वेष पालटून त्या माऊलीस भेटायला गेले. त्या माऊलीने शिवाजी महाराजांना सतरंजी दिली बसायला , गुळपाणी दिलं. तेव्हा तशी रीत होती.आजकालसारखे लोक कुणी आलं की तोंड वेडेवाकडे करत नसत.  शिवाजी महाराजांनी मुद्दामच तिची परीक्षा घ्यायला, शिवाजी महाराजांना नावं ठेवण्यास सुरुवात केली…  “काय तुमचा तो राजा ! का करता त्याच्यासाठी  हे सगळं? ” असं खूप भलतेसलते शिवाजी महाराज बोलू लागले स्वत :विरुद्धच ! ते ऐकलं मात्र आणि  त्या माऊलीने एकदम तलवार काढली  आणि शिवाजी महाराजांच्या गळ्यावर टेकवली ,”खबरदार” ती गरजली, ” शिवाजी महाराज आमचे राजे आहेत, त्यांच्याबद्दल काही भलतंसलतं बोललात तर.” शिवाजी महाराजांनी ओळखलं ,काय पाणी आहे ते !आणि ते निघून गेले. दुसर्‍या दिवशी शिवाजी महाराज  पूर्ण इतमामात  त्या स्त्रीला भेटायला आले आणि आपला जिरेटोप काढून त्यांनी त्या माऊलीच्या पायावर ठेवला….  म्हणजे काय माहितीय का? तुम्ही गादीवर बसा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवतो असेच जणू  शिवरायांना सांगायचं होतं . पण त्या माऊलीने तो जिरेटोप परत एकदा शिवाजी महाराजांच्या डोक्यावर ठेवला आणि ती म्हणाली,” हा तुम्हालाच शोभतो.”   

समर्थांचे दर्शन तिला त्यानंतर फक्त एकदाच आणि तेही फक्त पाचच मिनिटं झालं. तिला खबर लागली की समर्थ कृष्णेच्या काठी येताहेत. ती बघायला गेली त्यांना. समर्थ कृष्णा नदीच्या एका काठावरून चालत गेले आणि ती त्यांना समांतर अशी दुसर्‍या काठावरून चालत गेली. एवढ्या लांबून फक्त पाच मिनिटं  तिने समर्थांचा चेहरा बघितला. काय पातिव्रत्य  होतं तिचं ! म्हणतो ना इतिहासाने  काही लोकांवर खूप अन्याय केले..  त्यातीलच ही एक ! 

आजकालच्या युगात जेव्हा मुलींच्या खूप  अपेक्षा वाढल्या आहेत आपल्या जोडीदाराबद्दल, मुंबईला तर चाळीत राहणार्‍या मुलांची लग्नच होत नाहीत कारण मुलींना फ्लॅट हवा असतो. कशाला फ्लॅट हवा असतो कुणास  ठावूक?   जीवनात फ्लॅट व्हायला ? मुंबई कोर्टात रोज शंभर विवाह रजिस्टर होतात, पण त्याच वेळी पन्नास अर्जही घटस्फोटासाठी आलेले असतात. म्हणजे कुटुंबव्यवस्था आपल्याकडेही पन्नास टक्के तुटत आहे.  अशावेळी असे आदर्श समाजात प्रस्तुत करणे उचित ठरेल.  रशिया तुटला, झेकोस्लोवाकिया तुटला. इतरही खूप  देशांचे तुकडे झाले. पण भारताला तोडणं शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे. कारण  इथली कुटुंबव्यवस्था ! इथला शेजारपाजार !! माणसामाणसात असलेले संबंध. बघा एखाद्या शेजार्‍याची बायको गावी गेली असेल तर त्याचा शेजारी त्याचं सगळं बघतो ,त्याला जेवण देतो ,सगळं काही पुरवतो. हे  अजूनही आपल्याकडे अस्तित्वात आहे म्हणून भारताला तोडणे शक्य नाही हे अमेरिकेला माहिती आहे.  हल्ली स्त्रीमुक्तीच्या वादळात जेव्हा अनेक घरे वाहून चालली आहेत तेव्हा असे आदर्श प्रस्तुत करणे हे उचितच ठरेल. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणतात त्याप्रमाणे, त्या काळात स्त्रीमुक्तीवादी संस्था नव्हत्या हे एका अर्थी बरं आहे . नाहीतर त्या….  त्या उर्मिलाला भेटल्या असत्या आणि नक्की सांगितलं असतं,’ घटस्फोट घे.’ लक्ष्मण आणि ऊर्मिलेचा चौदा वर्षांचा  वियोग आहे .चेहरासुद्धा पाहिला नाही चौदा वर्षात ! म्हणून त्यांनी नक्की सांगितलं असतं,” तुला त्यांनी टाकली चौदा वर्ष, घटस्फोट घे .” पातिव्रत्य ज्यांना कळत नाही, आदर्श जीवनमूल्यं काय आहेत हे ज्यांना कळत नाहीत ते असं काहीतरी बोलत असतात. पण असं झालं नाही . म्हणून तर रामायण, महाभारत अजूनही सगळीकडे वाचली जातात. तोच आदर्श आपल्याला रामदासस्वामींच्या पत्नीतही दिसतो.  त्यामुळे आज  रामदास स्वामींना आठवताना  त्या माऊलीला आठवणं ही उचित ठरेल.

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कथा शनिवारवाड्याच्या उजव्या चौकाची… श्री बाजीराव सुधाकर जांभेकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ कथा शनिवारवाड्याच्या उजव्या चौकाची… श्री बाजीराव सुधाकर जांभेकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याचे रुपांतर मराठ्यांनी साम्राज्यात केले…मराठ्यांच्या पराक्रमाचा दबदबा पुर्‍या हिंदोस्तानात गाजत होता.अशाच वेळी अहमदशाहा अब्दाली दिल्लीवर चालून आला .दिल्ली हादरली होती. मग मात्र दिल्ली रक्षणाची जबाबदारी घेतलेल्या मराठ्यांनी आव्हान स्विकारुन दिल्ली गाठली…नेतृत्व करीत होते सदाशिवराव भाऊ पेशवे….भाऊंच्या हाताखाली होळकर,  शिंदे,पटवर्धन, मेहेंदळे असे कसलेले आणि पराक्रमी सरदार होते…

दोन्ही सैन्य समोरासमोर उभी ठाकली होती.एकमेकांच्या सेना एकमेकांची ताकद अजमावत होते.याचवेळी भाऊची सेनाप्रमुखांशी खलबते चालू होती…अशाच एका खलबतात जनकोजी शिंदे या अठरा वर्षाच्या सरदाराच्या स्वाभिमानाला धक्का लागला…तसा जनकोजी पेटून उठला छावणीतून बाहेर पडला आणि सैन्यासहित गिलच्यांच्या सैन्यावर कोसळला…बघताबघता १००००सैन्य गारद केले.पण जनकोजी शिंदेच्या पाठराखणीला भाऊंनी पराक्रमी सरदार बळवंतराव मेहेंदळेना सैन्यासह पाठविले..पण अंतर्गत वादामुळे बळवंराव मात्र लढणार्‍या जनकोजीला लांबून पहात होते…शेवटी भीम पराक्रम करत जनकोजी सदाशीवभाऊंकडे परत आला.भाऊंनी त्याचा सत्कार केला.तसा जनकोजीनी भाऊंना प्रश्न विचारला माझ्या मागे बळवंतरावांना का पाठवला होता.?आणि बळवंतराव काय करत होते विचारा त्यांना..त्यावरुन शब्दाला शब्द झाला.दरबार संपला….सगळे सरदार आपआपल्या छावणीत पोहचले…पण बळवंतरावांच्या बायकोला घडला दरबारातील प्रसंग कोणीतरी लगबगीने कळवलाच….आणि त्या आर्यपत्नीचा स्वाभिमान दुखावला…तीने आरतीच्या तबकातील निरांजन पेटविले..आरती घेऊन ती छावणीच्या दरवाजातच उभी राहिली..एव्हढ्यात बळवंतराव जवळ आले…आर्यपत्नी म्हणाली ,”या पराक्रम करुन आलात ओवाळते पंचारतीने” आपण रक्ताचा थेंबही आपल्या अंगावर न उडविता गिलचे कापलात…..बळवंतरावांनी मान खाली घातली..तसा पत्नीच्या तोंडाचा सुटला…ती म्हणाली उद्या माझ्या पोराने लोकांना कोणाचा पोर म्हणून सांगाव?एका नामर्दाचा? की पळपुट्याचा?लाज कशी वाटली नाही तुम्हाला?

पत्नी ताडताड बोलत होती…आणि बोलता बोलता म्हणाली ,जा परत गिलच्यांना ठेचा त्याशिवाय तोंडही मला दाखवू नका..जिंकून आलात ओवाळीन आणि लढताना स्वर्गवाशी झालात तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्या शवासोबत स्वर्गात असेन….

गरम शिश्याचा रस कानात ओतावा तसे ते शब्द बळवंतरावांच्या कानात पेटले….सरदशी हात तलवारीवर निघाला..बळवंतरावांनी घोड्यावर मांड ठोकळी…बळवंतरावांचे बाहू स्पुरण पावले…हर हर महादेव ..जय भवानी..जय शिवाजी आरोळी घुमली….अफाट कापाकापी सूरु झाली….गिलचे पाठीला पाय लावून मागे हटत होते..बळवंराव त्वेशाने दांडपट्टे फिरवत होते…त्यांचे कान फक्त आकडे एकत होते…हजार…पाचहजार…आठहजार….एकच कापाकापी…रक्ताचा चिखल अन प्रेतांचा ढीग…दिसू लागला…एव्हढ्यात पाठीमागच्या बाजूने शिंगाचा हलगीचा नाद घुमला…फिरणारा दांडपट्याला स्वल्पविराम देत बळवंतरावांनी मागे पाहिल…साक्षात सदाशिवराव पेशवे लढण्यासाठी आणि बळवंतरावाच्या प्रेमासाठी रणांगणात….बळवंतरावांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले…प्रत्यक्ष स्वामी….फक्त माझ्यासाठी…खरच धन्य झालो मी आज…एव्हढ्यात बळवंतरावांवर काळाने झडप घातली…एक दोन तीन चार गोळ्या बळवंतरांवाच्या छातीची चाळण करुन मोकळ्या झाल्या…भीमाच्या ताकदीचा बळवंतरावाचा देह धरणीवर कोसळला….सदाशीवभाऊनी त्या  अचेतन देहाला मिठीच मारली…आदर्श प्रेमाच हे उदाहरण….

भाऊंनी तो देह मागे आणला.पानपताजवळ अग्नी देण्यासाठी चिता रचली..बळवंतरावांची पत्नी सती जायला निघाली…त्या सती जाणार्‍या पत्नीला सदाशीवराव भाऊ सांगत होते…बाई तुला दोन वर्षाचा मुलगा आहे किमान त्याच्यासाठी तरी सती जाऊ नको…पण बाई आपल्या निश्चयावर ठाम राहिली…तिने ते पोर उचलून भाऊंच्या पदरात घातले आणि भाऊंना म्हणाली की याचा सांभाळ आपण करा…आणि मोठा झाला की फक्त एव्हडच सांगा त्याला “”तुझे आई वडील का मेले”हीच आठवण द्या…बाकी करण्यास तो नक्कीच समर्थ होईल कारण तो वीराचा पुत्र आहे…..पुढे १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचा रणसंग्राम झाला….मराठे तळहातावर शीर घेऊन लढले…देशासाठी ..धर्मासाठी….महाराष्ट्राची एक तरुण पीढी एका दिवसात पराक्रम करीत मावळली …

पण, पानिपतात जय मिळवूनही अहमदशहा अब्दालीने हाय खाल्ली मराठ्यांची…अब्दालीने काही दिवसातच हिंदोस्तान सोडला….

पण महाराष्ट्राने मात्र पुन्हा यज्ञकुंड पेटवला आपल्या स्वाभिमानाचा….राष्ट्रभक्तीचा आणि १७७५-७६च्या वर्षात मराठ्या पुन्हा दिल्लीला धडक दिली…पार सिंधूपर्यत भगवा रोवला….यात एक १६/१७ वर्षाचा पोर भीमथडी पराक्रम करत होता…पानपतावरच्या युद्धाचे उट्टे फेडत होता…आपल्या तलवारीचे पाणी त्याने हजारोंना पाजले….तो पोर म्हणजेच…लढवय्या बळवंतराव मेहेंदळेचाच मुलगा…आप्पा बळवंत मेहेंदळे….आपल्या आई वडीलांच्या हौतात्म्याची आठवण जिवंत करणारा…..

त्याच्या पराक्रमावर बेहोत खूश होऊन पेशव्यांनी त्याची आपल्या शनिवारवाड्याजवळ राहण्याची हवेली उभी करुन दिली….आणि त्याची आठवण म्हणूनच शनिवारवाड्याच्या कडेच्या चौकाचे नाव ठेवले गेले “आप्पा बळवंत चौक (ABC)…”

या चौकाच्या नावाच्या निम्मित्ताने स्मरण त्या बळवंतराव आणि आर्यपत्नीचे, स्मरण त्या सैन्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम करणार्‍या सदाशिवरांवांचे आणि आई वडीलांचा शब्द साकार करणार्‍या त्या आप्पा बळवंतांचे….राष्ट्रासाठी स्वतःची आहूती देणार्‍या या सार्‍या वीरपुरुषांना दंडवत

शब्दांकन : श्री बाजीराव सुधाकर जांभेकर

मु.पो.पोंभुर्ले,ता.देवगड जि.सिंधुदुर्ग

9405829669/9075385256

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ५ ते ८ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ५ ते ८ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा ५ – ८

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता सवितृ

आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी सवितृ देवतेला  उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील  बाविसाव्या सूक्तातील पाच ते आठ या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद 

हिर॑ण्यपाणिमू॒तये॑ सवि॒तार॒मुप॑ ह्वये । सः चेत्ता॑ दे॒वता॑ प॒दम् ॥ ५ ॥

हिरण्यरश्मी कांतिमान कर भास्कर देवाचे

संरक्षण करण्यास्तव त्यांना आवाहन अमुचे

ज्ञाता तो तर परम पदाचा श्रेष्ठ दिव्य थोर

स्विकारुनिया निमंत्रणाला साक्ष होइ सत्वर ||५||

अ॒पां नपा॑त॒मव॑से सवि॒तार॒मुप॑ स्तुहि । तस्य॑ व्र॒तान्यु॑श्मसि ॥ ६ ॥

साक्ष जाहले उदकामधुनी सवितृ बलवान

स्तुती करावी त्यांची करण्या अपुले संरक्षण

प्राप्त कराया सहस्रकरांचे पावन वरदान

त्यांच्या आज्ञा आम्हास असती सर्वस्वी मान्य ||६||

वि॒भ॒क्तारं॑ हवामहे॒ वसो॑श्चि॒त्रस्य॒ राध॑सः । स॒वि॒तारं॑ नृ॒चक्ष॑सम् ॥ ७ ॥

समस्त मनुजांवरती असते कृपादृष्टी यांची

आल्हादादायी नवलाची संपत्ती यांची

अपुल्या सर्वस्वाचे दान देई भक्तांना

यावे सविता देवा मान देउनी आवाहना ||७||

सखा॑य॒ आ नि षी॑दत सवि॒ता स्तोम्यो॒ नु नः॑ । दाता॒ राधां॑सि शुम्भति ॥ ८ ॥

अति थोर दाता हा सविता सर्व पूज्य देवता

ऐश्वर्याला अमुच्या आणित शोभा संपन्नता

या स्नेह्यांनो या सखयांनो  समर्पीत व्हायला

भक्तीभावे सूर्यदेवतेच्या स्तोत्रा गायला  ||८||

(या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/7a5GVsOlB_c

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 5 to 8

Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 5 to 8

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘झपताल…’ – कविवर्य – विंदा करंदीकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

ज्या काळी, म्हणजे साठ सत्तर वर्षापूर्वी, ” महिला दिन ” साजरा करून त्या दिवशी खोटी … औपचारिक कणव दाखवून महिला वर्गाला शुभेच्छा देण्याची प्रथा नव्हती, त्या वेळी नामवंत कवी विंदा करंदीकर यांनी  ‘ झपताल ‘ या नावाची किती सुरेख कविता लिहून तत्कालीन  स्त्रीचे  जीवन  रेखाटले होते ते दर्शविण्यासाठी ती कविता  खाली देत आहे. आता सर्रास इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या तरुण पिढीला  हे  कोण विंदा ? असा प्रश्न पडणे साहजिकच  आहे . पण घरातील कोणा शिकलेल्या  आजी … आजोबा  , काका…काकू ,मामा… मावशी ,आई …बाबा  याजकडून ते माहीत करून घ्यावे … 

विंदांच्या या ‘झपताल’ कवितेचं वैशिष्ट्य हे की ती कविता कोणी स्त्रीने लिहिलेली तक्रारवजा कविता नाही, तर त्या जुन्या काळांतल्या एका पुरुषाने, एका संवेदनशील पतीने आपल्या पत्नीचं केलेलं कौतुक आहे. 

आपल्याकडे महाराष्ट्रातल्या साधारणपणे मध्यम आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात सत्तरऐंशी वर्षांपूर्वी घरी चोवीस तास ‘आई’ किंवा ‘पत्नी’ म्हणून कामाच्या रगाड्यात भरडल्या जाणा-या आणि चाळीतल्या सव्वा-दीड खोलीत आयुष्य काढीत उभं आयुष्य फक्त सहन, सहन आणि सहन करीत करीत काढलेल्या महिलांची काय स्थिती होती, ते विंदांनी त्यांच्या ‘झपताल’ या कवितेत समर्पकपणे मांडलेलं आहे. 

आमच्या मागच्या पिढीतल्या नऊवारी लुगड्यातल्या कोणाही आजी, आई, मावशी, आत्या, काकू, मामी…. यांना स्वत:ची ‘मतं’ तर दूरच राहिली, स्वत:ची ‘पर्स’ही त्यांना माहीत नव्हती. तरी घटस्फोट न घेता, (ब्रेक-अप न करता) आणि कोणतंही ‘लोन’ न घेता, भांडततंडत का असेना, पटलं न पटलं तरी, पन्नास पन्नास, साठ साठ वर्ष चार, पाच, सहा मुलं वाढवून, पुढे त्यांना मार्गी लावून, ‘त्याचसाठी अट्टाहास करीत  ‘शेवटच्या दिसापर्यंत’ टुकीने संसार निभावले.   

विंदांची ही कविता हल्लीच्या तरुणींना समजेलच असं नाही, त्यात त्यांची चूकही नाही. कारण त्यांना हे मुळातच काही माहीतच नाही. त्यातल्या काही अस्सल ‘मराठी’ शब्दांचा अर्थही समजणार नाही, उदा. ओचें,  उभे नेसून,  पोतेरें,  मुतेली, बाळसे, चूल लाल होणे, मंमं, आणि संसाराची दहा फुटी खोली.. वगैरे. घरी एखादी आजी असलीच तर तिला त्यांनी या शब्दांचे अर्थ विचारावे. ते दिवस आणि तो काळ  ज्यांनी पाहिला आहे, भोगला आहे, त्यांनाच ही कविता चांगली समजेल, घरोघरच्या साठी-सत्तरी उलटून गेलेल्या केवळ महिलांनाच नव्हे तर घरोघरच्या संवेदनशील असलेल्या पुरूषांनाही समजेल. 

☆  झपताल

ओचें बांधून पहांटे उठते तेव्हांपासून झपाझपा वावरत असतेस

कुरकुरणा-या पाळण्यामधून दोन डोळे उमलूं लागतात 

आणि मग इवल्या इवल्या मोदकमुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते …… 

 

उभे नेसून वावरत असतेस.. तुझ्या पोते-याने म्हातारी चूल पुन्हां एकदां लाल होते

आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील तीन मुतेली वाळवूं लागतो 

म्हणून तो तुला हवा असतो…… 

 

मधून मधून तुझ्या पायांमध्यें माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात 

त्यांची मान चिमटीत धरून तूं त्यांना बाजूला करतेस, 

तरी पण चिऊकाऊच्या मंमं मधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो …… 

 

तूं घरभर भिरभिरत असतेस, लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात 

स्वागतासाठी तूं ‘सुहासिनी’ असतेस..वाढतांना ‘यक्षिणी’ असतेस .. भरवतांना ‘पक्षिणी’ असतेस, 

सांठवतांना ‘संहिता’ असतेस .. भविष्याकरतां तूं ‘स्वप्नसती’ असतेस .. 

संसाराच्या दहा फुटी खोलीत दिवसाच्या चोवीस मात्रा चपखल बसवणारी …… 

 

… तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही.

कविवर्य – विंदा करंदीकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तार…लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

वैदिक मूर्तीकार श्रीमान अत्तारलेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

आज एक वेगळाच विषय मांडतोय!! जिथे जिथे म्हणून हिंदु संस्कृती विस्तारली, फोफावली, विकसित झाली, अशा जगाच्या एका मोठ्या भूभागावर आजही त्या संस्कृतीच्या खुणा ठळकपणे दिसतात! मग ते आंगकोरवाटचे मंदिर असो वा अफगाणिस्तान मधील भव्य बुद्ध मंदिर असो. त्या त्या ठिकाणी हिंदुंच्या पूजा पद्धतीतील अनिवार्य अशा विविध देवांच्या मूर्ती आढळतात! भारतात खूप ठिकाणी संगमरवराची मंदिरे असतात आहेत. पण या प्राचीन मंदिरात श्रीमूर्ती मात्र काळ्या पाषाणाचीच असते !!

आमच्या गावात पुरातन गणेश मंदिर आहे. ते अगदी हायवेला नजीकच आहे. पण त्यात मूर्ती नव्हती. खूप वर्षे ! आमची पिढी अगदी गद्धेपंचविशीत होती तेव्हा आम्ही त्या देवळाचा जीर्णोद्धार केला अन् पंढरपूरहून संगमरवरी गणेशाची मूर्ती आणली ! आमच्या बुद्धीप्रमाणे त्या मूर्तीकाराला, मूर्तीला रंग देऊ नको असे सांगितले.कारण जर का मूर्ती कुठे भंग पावली असेल तर ती जाणवावी ! यथावकाश विधीवत अर्चा वगैरे होऊन नित्यपूजा सुरु झाली ! पूजेत वापरण्यात येणाऱ्या दूध, दही, साखर, तुप, मध वगैरे बाबी अन हवामानामुळे त्या मूर्तीवर जो पावडरचा थर त्या ‘जाणत्या’ मूर्तीकाराने दिला होता, तो निघून गेला; अन् एक भयानक वास्तव सामोरे आले !! त्या मूर्तीला पोटापासून कंबरेपर्यंत तडा होता हो !असो.

मग जाणत्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मूर्तीचा शोध सुरु झाला. अन नांव समोर आले ते बेळगांवचे प्रसिद्ध मूर्तीकार श्रीयुत अत्तार यांचे !!लगेचच आम्ही बेळगांवला गेलो अन अत्तारजींकडे पोहोचलो !नमस्कार चमत्कार झाल्यावर त्यांनी येण्याचे प्रयोजन विचारले. आम्ही सारं घटीत अघटित सांगितले. त्यावर ते उत्तरले की माझ्याकडून मूर्ती हवी असेल, तर किमान एक वर्ष तरी लागेल. आम्ही कबूल झालो !

त्यांनी विचारले की मूर्ती कशी हवी ?क्षणांत आम्ही म्हटले की, दगडुशेठ सारखी हवी! मग ते विचारते झाले की तुम्हाला मूर्तीकलेतील कितपत ज्ञान आहे? मग आमची बोलती बंद! मग त्यांनीच मूर्तीकलेबाबत सखोल माहिती दिली. ते स्वत: कर्नाटक विद्यापीठात, आयकॉनॉलॉजी विभागाचे (निवृत्त) मुख्य होते. अन महत्वाचे हे की त्यांचे घराणे म्हैसूर नरेश वाडीयार यांचे पिढीजात राज शिल्पी आहेत! ते म्हणाले की तुम्ही कोणतीही पुरातन देवालये पहा, ती वस्तीत नव्हती. तर कुठे जंगलात, डोंगरावर आहेत. याचे कारण ज्या देवाचा वास ज्या स्थळी आहे तिथेच ते देवालय बांधायचे असते. उदाहरणार्थ देवीचे मंदिर जर बांधायचे असेल तर एक विशिष्ट विधी करुन ठरवावे लागते की देवीचा वास कुठे जास्त आहे ते! मग तिथे एक विहिरसदृष्य खड्डा खणण्यात येतो. ठराविक खोलीवर त्या विहिरीला जिवंत झरा मिळतो. त्या झऱ्यावर सहा ते आठ इंच जाडीचा तांब्याचा पत्रा ठेवायचा. अन त्या पत्र्यातून तीनचार इंच जाडीचा ताम्ररज्जु जमिनीवर आणायचा. त्या तांब्याच्या दोराला ‘एनर्जी थ्रेड’ असे म्हणतात. मग त्या दोऱ्यातून सप्त धातुंचे सप्त कलष ओवायचे. त्या सप्तकलशात सप्तधान्य, सप्तनद्यांचे पाणी वगैरे पवित्र वस्तू भरत भरत ती विहिर बुजवायची. आणि त्या दोराचे जे वर आलेले टोक आहे तिथे मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. आणि मूर्तीच्या मूलाधार चक्राजवळ तो दोरा जोडून द्यायचा. म्हणजे  मग ती देवालये निरंतर टिकतात. त्यांची ख्याती होते वगैरे!

आणि मूर्ती कोणत्या दगडाची असावी हे सांगताना ते म्हणतात की मूर्ती ही कृष्णशीळेतच हवी !

भारतात साधारण तीन प्रकारचे दगड आढळतात. ते म्हणजे काळा दगड, संगमरवर आणि ग्रॅनाइट! यातील ग्रॅनाइट हा नपुंसक दगड आहे. संगमरवर हा स्टोअरेज कॅपॅसीटी नसणारा दगड आहे. तर कृष्णशीळा हा दगड, तुम्ही जे जे संस्कार त्या मूर्तीवर कराल ते साठवून ठेवण्याची क्षमता अन् योग्य वेळी भक्तांना फळ देण्याची शक्ती, कृष्णशीळेच्या मूर्तीत असते ! नंतर ते म्हणाले की मी वेदात जसे वर्णन आहे, तशीच मूर्ती घडवतो ! जर वेदपाठशाला असेल तर तिथे विद्यागणेशाची मूर्ती आवश्यक. नांदत्या घरात कधीही नटराजाची मूर्ती स्थापू नये कारण ती नाट्यदेवता आहे. घराचं नाट्यमंदिर व्हायला वेळ लागणार नाही ! तसेच गणेशाच्या मूर्तीच्या हातात परशु, पाश, लाडु/मोदक ह्या बाबी अत्यावश्यकच. प्रभावलय(प्रभावळ) हवेच. त्याचा किरीटही विशिष्ट असा हवा! प्रत्येक देवतेच्या मूर्तीला एक ताल असतो. जसे विष्णूची मूर्ती नवतालात, देवीची सप्ततालात तर गणेशाची मूर्ती पंचतालातच असावी! आता म्हणाल ‘ताल’ म्हणजे काय? तर मूर्तीच्या चेहऱ्याच्या पांचपट मूर्तीचे शरीर; म्हणजे पंचताल!  बघा विष्णुच्या मूर्ती ह्या उंच असतात अन् गणपतीची बैठी असते !

एवंच आम्हाला अत्तारसाहेबांनी ज्ञानी केले. मूर्ती घडवून दिली ती अगदी सुबक!

आता हे ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी लिहिलेय. आपल्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी केव्हढे ज्ञानभांडार ठेवलंय याचीही कल्पना यावी. आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याची जाणीव असावी.

म्हणून हा लेखन प्रपंच!!

लेखक – अप्पा पाध्ये गोळवलकर

गोळवली, कोंकण, ९८९०८ ३९४९३

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप” लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “हुतात्मा मैनावती पेशवे : कर्तव्यकठोर लखलखीत रूप”… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

नानासाहेब पेशवे यांची एकुलती एक मुलगी मैनावती. चौदा वर्षांचे वय, परंतु धाडसी वृत्तीमुळेच नानांनी इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवली. त्याच दरम्यान ती इंग्रजांच्या तावडीत सापडली. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी त्यांनी तिचा खूप छळ केला. पण तिने तोंड उघडले नाही ते नाहीच. तिला झाडाला बांधून पेटवून देण्यात आले. आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्त्वात विलीन झाली.

आत्तापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या कर्तव्यकठोर स्त्रीचं, हे बहुआयामी लखलखीत रूप खास जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने.

१८५७ च्या बंडाचा काळ, बंडाचा वणवा उत्तर भारताइतक्या मोठय़ा प्रमाणात दक्षिण भारतात पेटला नव्हता. या बंडाचे नेतृत्व मात्र राणी लक्ष्मीबाई झाशीवाली, नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी केले. याच काळातील कर्तव्यकठोर, सहृदय मैनावतीची कथा.

मैनावतीबद्दल एक पानभर मजकूर एका हिंदी पुस्तकात वाचायला मिळाला होता. ते पुस्तक उत्तरेकडच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या माहितीचा कोश होता. त्यानंतर आणखी एका हिंदी भाषिक लेखिकेने तिच्याबद्दल थोडासा मजकूर लिहिलेला वाचनात आला. मराठय़ांच्या इतिहासाबद्दल अभ्यास असणाऱ्या अनेकांना मैनावतीबद्दल विचारले. पण कुणालाच अशी कुणी मुलगी/बाई १८५७ च्या वणव्यात विद्युल्लतेप्रमाणे कडाडून अमर झाल्याची माहिती मिळाली नाही. गेली ४/५ वर्षे माहिती मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या मानगुटीवर स्त्री अभ्यासाचे भूत बसलेले आहे व ते मी बाजूला करावे व उतारवयात नाही ती म्हणजे नसलेली मढी उकरू नयेत, असा उपदेशवजा सल्ला मला मिळत राहिला. पण मैनावतीला मी माझ्या मनातून बाहेर काढू शकले नाही आणि अचानक तात्या टोपे यांचे नातू विनायकराव टोपे मु. बिठूर यांनी संपादित केलेली ‘क्रांती का संक्षिप्त परिचय’ ही पुस्तिका हाती आली. या पुस्तिकेत मैनावतीची कथा आहे. आशालता व्होरा यांनी आपल्या पुस्तकात केलेले उल्लेख, उत्तर भारतीय स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोश व विनायकराव टोपे यांच्या पुस्तिकेतील मैनावतीची माहिती यांचे धागेदोरे विणत गेले व वाटले की टोपे कुटुंब हे पेशवे कुटुंबाशी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जवळचे कुटुंब होते. त्यांच्याबरोबरच टोपे कुटुंब उत्तरेकडे आले होते. त्यामुळे विनायकराव टोप्यांची माहिती दंतकथेवर आधारलेली असण्याची शक्यता कमी आहे. कोश व टोपे यांच्या मजकुरावरून स्पष्ट दिसते की मैनावतीची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर संशोधन करून भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात तिला तिचे मानाचे पान मिळायलाच हवे.

नानासाहेब पेशवे यांना एकुलती एक मुलगी होती. मुलीला आजीचे नाव मैनावती हे ठेवले. मैनावतीची आई लवकरच गेली व आजीतर त्यापूर्वीच गेली होती. मैनावतीला पेशवे घराण्याच्या रीतीप्रमाणे लिहिणे, वाचणे, पत्रे तयार करणे इत्यादी गोष्टी शिकवल्या असणारच. धार्मिक ग्रंथांची पारायणे ही गोष्ट त्यात आलीच. नानासाहेबांचे आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम होते. आईविना मुलगी म्हणून तसे ते शक्य होतेच तसेच आपल्याला परक्याच्या घरी जाणाऱ्या या मुलीला वेळ देता येत नाही या विचारामुळेही अधिक होते. नानासाहेब पेशवे व इंग्रज यांचे सुरुवातीचे संबंध बरे होते (इति टोपे). त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या बरोबर प्रसंगापरत्वे ऊठबस होत असावी. मैनावतीचेही इंग्रज मुलींच्या बरोबर संबंध होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात तिला कामचलाऊ इंग्रजी समजू लागले व बोलताही येऊ लागल्याचे टोप्यांच्या माहितीवरून कळते.

मैनावतीची कथा सुरू होते ती पेशव्यांच्या कानपूर विजयापासून. शिपायांनी कानपूर लुटले. बिबिका घर, सतीचौरा ही ठिकाणे जाळली. इंग्रज बायका व मुले यांना कैद केले. हे कैदी नानासाहेब पेशव्यांसमोर हजर करावे की कानपूरच्या इतर इंग्रजांप्रमाणे त्यांनाही येशूकडे पाठवावे, असे शिपायांनी नानासाहेबांना विचारले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे इंग्रज मुलाबायकांचा निकाल लावायचा असे ठरवून शिपाई  नानासाहेबांच्या आज्ञेची वाट पाहू लागले. शिपायांचा मानस कळल्यावर नानासाहेबांना वाईट वाटले. मराठय़ांच्या इतिहासात शत्रूच्या बायका-मुलांची कत्तल कधीच झाली नव्हती. शिपायांचे असे वर्तन हे मराठय़ांना शोभणारे नाही. त्यामुळे ‘इंग्रज मुला-बायकांना सन्मानाने बिठूरला पोहोचवावे व त्यांची व्यवस्था आपण जातीने करू’ असा उलटा खलिता नानासाहेब पेशव्यांनी पाठविला. इंग्रजांचा कुटुंबकबिला त्यांनी मैनावतीच्या स्वाधीन केला. त्या सर्वाचा दोन दिवस पाहुणचार करून त्यांना इंग्रजांच्या फौजेत परत पाठविण्याचा आपला बेत त्यांनी मैनावतीला सांगितला. इतकेच नाही तर ते सर्व सुरक्षित पोहोचण्याची जबाबदारीही मैनावतीवर सोपवली. त्या करता त्या कबिल्याबरोबर मैनावतीला जातीने सोबत करावयास सांगितले. मैनावतीबरोबर असल्यामुळे त्यांचा प्रवास निर्धोक पार पडेल याचा नानासाहेबांना विश्वास होता. या प्रवासात पहिला इंग्रज फौजेचा जथ्था जिथे भेटेल तिथे इंग्रज बायका-मुले त्यांच्या स्वाधीन करून मैनावतीने परत फिरावे, असा आदेश मैनावतीला होता. मैनावतीच्या सोबतीमुळे इंग्रज कुटुंबे सुखरूप प्रवास करू शकली. रस्त्यातील दंग्याधोप्यांचा त्यांना त्रास झाला नाही. आपल्याला सुखरूपपणे आपल्या लोकांच्या हवाली केल्याबद्दल त्यांना मैनावतीबद्दल कृतज्ञता वाटली तर नवल नाही. मैनावती ही नानासाहेबांची मुलगी आहे हे त्या इंग्रज बायकांना माहीत होते की नव्हते, की त्यांना ही मैनावती सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी तिचे नाव गुप्त ठेवणे योग्य वाटले असावे हे कळायला मार्ग नाही.

मैनावती बिठूरला पोहोचण्यापूर्वी नानासाहेबांनी बिठूर सोडले होते. कारण शिपायांनी जिंकलेले कानपूर परत इंग्रजांनी हिसकावून घेतले होते व ते बिठूरच्या दिशेने निघाले होते. बिठूरला येऊन इंग्रजांनी पेशव्यांचा किल्लेवजा वाडा लुटला. पेशवे कुटुंबातील फक्त मैनावती व नोकर चाकर व आश्रयदाते वाडय़ात होते. मैनावती सोडून सर्व पळून गेले. वाडा बेचिराख करण्याकरता त्यावर तोफा डागण्याचा हुकूम दिला. तोफांची हलवाहलव मैनावतीच्या कानी पडली. ती तडक वाडय़ाच्या बाहेर येऊन उभी राहिली. तिला तिथं उभी पाहताच इंग्रज सेनापती थॉमसला आश्चर्य वाटले. कारण वाडा लुटताना तिथे चिटपाखरूही आढळले नव्हते. तिला पाहता क्षणीच थॉमसने तिला ओळखले. मैनावतीने त्याला इंग्रजीत पण नम्रपणे विचारले. ‘‘ज्या वाडय़ाला आपण बेचिराख करायला निघाला आहात त्या वाडय़ाने आपले काय वाकडे केले आहे? तो तर आश्रयदाता आहे. त्याने आपला असा कोणता अपराध केला आहे? ’’ थॉमसने उत्तर दिले, की वाडा न जाळण्याची परवानगी मला व्हाईस रॉयकडून तार करून मागवावी लागेल. त्यांनी परवानगी दिली तर वाडा जाळणार नाही. तार लंडनला पोहोचली. लॉर्ड सभेत चर्चा झाली. काही लॉर्डानी एक विचित्रच सूर लावला. थॉमसचे मैनावतीवर प्रेम बसले असावे म्हणून तो वाडा तोफांच्या साहाय्याने उडवायला हिचकीच करतो आहे. वाडा तर उद्ध्वस्त झालाच पाहिजे पण थॉमसच्या समोरच (मैनावतीकडून नानासाहेबांचा पत्ता विचारून) मैनावतीला जिवंत जाळली पाहिजे. लॉर्ड सभेचा हा अजबच न्याय होता!

मैनावतीने विद्रोही सैनिकांच्या पासून इंग्रज अधिकाऱ्यांच्या बायका-मुलांना वाचवले होते. त्यांना प्रथम वाडय़ात ठेवून घेऊन सुरक्षितपणे इंग्रजांच्या गोटात पोहोचवले होते. अशा मैनावतीला ही शिक्षा इंग्रज लॉर्डाची सभ्य संस्कृती किती बेगडी होती हे लक्षात येते. आठव्या शतकात हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर आलेल्या रानवट मुसलमानांच्या टोळ्यांनी केलेल्या कृत्याइतकेच ते भीषण होते. थॉमसची मुलगी मैनावतीची मैत्रीण होती. मैनावतीचे मोठेपण व तिने इंग्रज कुटुंबांना विद्रोही सैनिकापासून वाचविले ही गोष्ट म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांवर असलेले उपकारच आहेत असे ती परत परत ओरडून सांगत होती. मैनावतीच्या देखतच तिचे राहते घर तोफांच्या भक्ष्यस्थानी पडले. तिला कैद्यासारखी वागणूक देत कानपूरला इंग्रज कमिशनरसमोर उभे केले. नानासाहेबांचा ठावठिकाणा विचारण्यासाठी तिचा खूप छळ केला. मैनावतीने छळ सहन केला पण काहीही बोलण्यासाठी तोंड उघडले नाही ते नाहीच. मैनावतीचे वय त्यावेळी १४/१५ वर्षांचे असावे. मैनावतीचा छळ करूनही ती काहीच माहिती देत नाही याचा कानपूर कमिशनरला खूप संताप आला. त्यांनी तिला झाडाला बांधून पेटवून देण्याची आज्ञा दिली. हा भीषण प्रसंग बघण्याकरता कानपूर शहरवासीयांस मुद्दाम हजर राहण्यास सांगितले होते. दहशत बसविण्याचा तो एक मार्ग होता. मैनावती जळत होती. लोक अश्रू ढाळत होते. पण मैनावतीने तोंडाने जराही आवाज केला नाही आणि या देशाच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात एक स्वातंत्र्यसैनिक म्हणून पंचत्वात विलीन झाली.

मैनावतीला नानासाहेबांचे नाव न सांगितल्यामुळे जाळून मारली यात टोपे व आशालता व्होरा यांचे एकमत आहे. तपशिलात थोडा फरक आहे. टोपे यांच्या म्हणण्याप्रमाणे कानपूर मधून प्रसिद्ध होणाऱ्या ‘बखर’ नावाच्या वर्तमानपत्रात तत्कालीन इतिहासकार महादेव चिटणीस यांनी  नानासाहेबांच्या एकुलत्या एक कन्येच्या जिवंत जाळण्याची व तिने शांतपणे मरणाला कवटाळण्याची बातमी दिली होती. तिला शांतपणे जळताना पाहून हिंदवासीयांना ती देवतास्वरूपी वाटत होती. मैनावती ही हिंदी स्वातंत्र्याच्या लढय़ात आहुती देऊन अमर झाली.

एका स्त्रीचं हे कर्तव्यकठोर रूप. त्यासाठी आगीचा दाह सहन करण्याची सोशिकता, इंग्रजांच्या बायका-मुलांना सुखरूप पोहोचण्यामागची ममता, त्यासाठी संरक्षक कवच म्हणून जाण्यातलं साहस, पत्ता गुप्त ठेवण्यासाठीची कणखरता, मृत्यू कवटाळण्यातलं धाडस, एका स्त्रीचं हे बहुआयामी लखलखीत रूप, एक स्त्री काय करू शकते हे दाखवणारं…

लेखक : अज्ञात   

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथे  एका मंदिराचे उदघाटन केले आणि ही बातमी स्मृती पटलाच्या एका उंच जागेवर कुठेतरी जाऊन पडून राहिली होती … 

मागील एका शनिवारी हैदराबाद येथे अचानक जाण्याचा योग आला आणि वरील बातमीची आठवण झाली व लगेच गूगल काकांची मदत घेण्यात आली .. त्यांनी असे सांगितले की ‘ स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी ‘ असे त्याचे नाव असून ते हैदराबाद पासून फक्त  ३७ कि मी अंतरावर आहे. 

स्टॅच्यु  ऑफ इक्वालिटी असे वाचल्यावर प्रथम वाटले की हे सर्व धर्म सद्भावना वगैरे पैकी ठिकाण असावे … पण मला चांगलीच उत्सुकता होती बघायची कारण श्री नरेंद्र मोदी यांनी त्याचे उदघाटन केले होते… 

तर कामात वेळ काढून मी रविवार दिनांक १२ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा: एकदा गूगल काकांना विचारून येथे जायला निघालो . यावेळी मॅप वर अंतर दाखवले गेले ३७ किमी, आणि अंतर कापण्यास लागणार वेळ ३४ मिनिटे .. हे कसे शक्य आहे अशा  विचारात असतानाच लक्षात आले की मार्ग हा आऊटर रिंग एक्सप्रेस रोड येथून पोहोचतो पुढे …  आणि खरोखरीच हा एक्सप्रेस हायवे प्रत्येक बाजूने सहा लेनमध्ये 

विभागलेला असून त्यातील दोन लेन या अनुक्रमे ८० व १०० एव्हढ्या किमान वेगासाठी राखीव आहेत.  अशी मोकळीक मिळाल्यावर काय मग गाडी आपोआपच सुस्साट निघाली. आणि ठरलेल्या वेळात पोचलो देखील ..

मुख्य गेट समोरचे गणवेशातील सुरक्षा अधिकारी तत्परटेने पुढे आले आणि बाजूतील रस्त्याने मार्गक्रमण करण्यास सांगितले . मी थोडा साशंक झालो, कारण हा रस्ता मागील बाजूला जात असून गाडी लावून खूप अंतर चालले जाऊ शकले असते.. इतक्यात अजून एक चेक पोस्ट व अधिकारी समोर आला आणि सांगितले की पार्किंग चे ३० रु द्यावे लागून ते मी कुठल्या प्रकारे भरणार आहे अथवा फास्ट टॅग असल्यास मी त्यातून घेऊ शकतो असे तो म्हणाला. आता मला फास्ट टॅग फक्त रस्त्यावर चालतो एव्हढेच माहित होते तरी पण मी त्याला हो म्हटले… त्याने लगेचच एक छोटे गॅजेट काढून फास्ट टॅग ट्रॅन्झॅक्शन पूर्ण केले देखील. 

पुढे साधारण अर्धा किलोमीटरवर गाडीतळ असून एका दर्शिकेवर स्वागत करून येथे थांबण्यास सांगितले गेले. काही मिनिटातच दोन इलेक्ट्रिक व एक डिझेल बस या गाड्या हजर झाल्या आणि त्यांनी तत्पर मुख्य दरवाज्याकडे सोडले. येथे असे कळले की आत जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल २०० रुपयांचे … 

तिकीट काढताच सांगण्यात आले की मोबाइल फोन हे जमा करावे लागतील व त्याची व्यवस्था लगेच करण्यात आली… 

पुढे अतिशय शिस्तबद्ध अशी रांग असून आत जाणाऱ्यांना हातावर टॅटू काढण्यात आला … फरक एवढाच की टॅटू हा ओम ह्या चिन्हाचा असून प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ऐच्छिक स्वरूपात फुकट नोंदवला जातो. पुढे अश्याच प्रकारे कपाळावर पण गंध लावण्यात आले …. आणि येथूनच सुरु झाली १०८ मंदिरांची परिक्रमा . ही मंदिरे भगवान विष्णू यांचे  १०८  अवतार असून यापुढील प्रत्येक मंदिरामध्ये एक पुजारी आणि एक स्वयंसेवक / सेविका आपल्यासाठी त्या मंदिराचे महत्व आणि त्या अवतारासंबंधी मंत्र घोष आपल्याकडून म्हणून घेतात … प्रत्येक मंदिर हे विशिष्ठ आकारात असून त्या त्या अवतारासंबंधित बांधणी ह्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ वन अवतार दाखविताना मंदिर हे एका झाडातून कोरण्यात आले आहे असे वाटते. अतिशय अद्भुत अशी ही योजना वाटते … 

पुढे सर्व १०८ मंदिरांचे दर्शन संपल्यावर वेळ येते ती रामानुजाचार्य यांची भव्य प्रतिमा जवळून पाहण्याची … अनेक पायऱ्या चढून गेल्यावर एक मजला हा त्यांच्या सुवर्ण प्रतिमेसाठी  राखण्यात आलेला आहे… ही प्रतिमा जवळपास सहा फूट इतकी मोठी असून संपूर्ण सोन्याची आहे…  या पुतळ्यासाठी 120 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्याची निर्मिती भद्रपीठम इथे झाली. रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आलं असे सांगितले जाते ….  अर्थातच येथे सुरक्षा कडक असून उगाचच जास्त वेळ थांबू दिले जात नाही.. पण दर्शन व्यवस्थित करू दिले गेले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट हा आशीर्वादाच्या स्वरूपात पुजारी ठेवतात …  

दर्शन झाल्यावर पुढील मजला हा भव्य पुतळ्यास्वरूपात आहे, याची उंची २१६ फूट असून हा सुवर्ण रंगात ल्यालेला आहे. येथूनच आजूबाजूला सुंदर परिसर दृश्य होतो … अतिशय सुंदर रस्ते, आजूबाजूला उभारू पाहिलेल्या अनेक मजली इमारती, हवा थंड ठेवणारी झाडे असा हा परिसर आहे… 

खाली उतरल्यावर लगेचच एग्झिट गेट असून मोबाइल फोन परत मिळण्याचे ठिकाण होते.. हाताळण्याची अतिशय शिस्तबद्ध पद्धत आणि वागणूकही विनयशील असे हे सर्व कर्मचारी निमूटपणे आपले काम करीत होते. 

योगायोग असा होता की रविवारचा तो दिवस ब्रम्होत्सव सुरु होता आणि एक मोठा यज्ञ श्री चिन्न जियरस्वामी ह्यांच्या हस्ते सुरु होता …. मंत्र घोषांनी भारावलेला तो परिसर एका वेगळ्या सृष्टीत घेऊन गेला … 

विविध वनस्पतींच्या त्या समिधा, शुद्ध तुपातील अर्घ्य, मंत्रांचा जयघोष एखाद्या पौराणिक कथेप्रमाणे वाटत होते …   स्वतः स्वामीजी अनेक मंत्र घोष करीत असून माईकवर त्या संबंधी विवरण हे स्थानिक भाषा आणि इंग्रजीमधेही सांगत होते… 

येथे हे नक्की सांगावे लागेल की श्री रामानुजाचार्य हे आद्य संत होते, ज्यांनी सर्व जाती समावेशक मंदिर प्रवेशाची द्वारे उघडली होती, आणि ती ही तब्बल एक हजार वर्षांपूर्वी … 

पुढे बाहेर  आल्यावर अतिशय निगुतीने तेथील स्वयंसेवक पुढे आला आणि म्हणाला की त्वरित प्रसाद-लाभ घ्यावा कारण तो संपण्याच्या मार्गावर आहे… मग काय पाय लगेच तिथे वळले, कारण या सर्व उलाढालीत भूक लागलेली कळलीच नव्हती, दुपारचे चार वाजूनही प्रसाद अजूनही दिला जात होता  … 

पोटभर भात, भाजी, रसम, ताक आणि लोणचे ह्याच्यावर  चांगलाच ताव मारून तृप्त मनाने बाहेर पडलो ते पार्किंगला जाईपर्यंत …. पुनः इलेक्ट्रिक गाडीत बसण्यासाठी … 

लेखक : श्री अजित दांडेकर

पुणे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच खरं ! २०१४ ते २०१९ या पाच वर्षात आमची चार वेळा इंग्लंड भेट झाली; पण शेक्सपिअरच्या गावाला भेट द्यायचा योग आला तो २०१९ सालीच ! प्रत्येक भेटीत माझ्या मुलाला, आशिषला स्ट्रॅटफोर्ड अपऑन ॲव्हॉनला नेण्याविषयी सांगायचो; पण काही ना काही कारणानं जमत नव्हतं. मात्र, या वर्षी त्या दोघांनी तिथं जाण्याचा चंगच बांधला आणि योग आणलाच.

ॲव्हॉन नावाच्या नदीवरील स्ट्रॅटफोर्ड हे शेक्सपिअरचं जन्मगाव…साउथ वार्विक शायरमधील हे गाव. इथं ज्या इमारतीत शेक्सपिअरचा जन्म झाला त्या वाड्यावजा इमारतीत ‘शेक्सपिअर जन्मस्थान ट्रस्ट’ नं उत्तमरित्या त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. मुळात इंग्रज हा परंपरावादी, त्यामुळेच त्यांनी या जगप्रसिध्द नट, लेखक आणि थिएटर मॅनेजरची १६/१७ व्या शतकातली, त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं अनुभवलेली जीवनविषयक माहिती जतन करून, प्रदर्शनाव्दारे त्याची आजच्या पिढीला ओळख करून दिली आहे. या संग्रहालयाने शेक्सपिअर आणि त्यांच्या कुटुंबानं अनुभवलेल्या प्रसंगावंर टाकलेल्या प्रकाशामुळे, हा एक मोठा माणूस आणि लेखक, म्हणून आपणास जास्त समजू शकतो.

शेक्सपिअरच्या वयाच्या ३७ व्या वर्षी, म्हणजे १६०१ मध्ये ही जन्मस्थानची जागा त्याला वडिलांकडून मिळाली. मुळात शेक्सपिसरला राहायला भरपूर जागा असल्यानं त्यानं वडिलांकडून मिळालेल्या जागेतून काही पैसे कमवावेत असा विचार केला आणि त्यानं ती जागा एलिझाबेथ फोर्ट नावाच्या बाईला हॉटेलसाठी भाड्यानं दिली. एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर १८४६ मध्ये इमारत विक्रीला काढली गेली. तेव्हा ‘शेक्सपिअर जन्मस्थळ ट्रस्ट’ नं ती विकत घेऊन हे संग्रहालय उभं केलं. आजही त्या जन्मस्थळाची देखभाल ते करत आहेत. हे संग्रहालय उभं करण्यात आणि असे राष्ट्रीय स्मारकामध्ये अंतर्भूत करण्यासाठी जी चळवळ उभारली गेली, त्यात डिकन्सचा सहभाग महत्त्वाचा होता. त्यानं १८३८ मध्ये या जन्मस्थळास भेट दिली होती आणि त्यापासूनच त्याला स्फूर्ती मिळाली. शेक्सपिअरच्या जन्माच्या खोलीत एका खिडकीच्या काचेवर प्रेक्षक आपली आठवण म्हणून नावं लिहून ठेवत. त्यात प्रसिध्द स्कॉटिश लेखक वॉल्टर स्कोंट, तत्त्ववेत्ता थॉमसर कार्लाईल, चार्ल्स डिकन्स, शेक्सपिअरच्या काळातील दोन महान नट एलन टेटी आणि हेन्नी आयर्विंग यांचा समावेश आहे. या संग्रहालयातील वस्तूंवर म्हणजे कपडे, बिछाने आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरून शेक्सपिअरची माहिती मिळते.

शेक्सपिअर ३७ नाटके, १५४ सुनीते (sonnets), ५ पदविधारी काव्यं (titled) लिहू शकला आणि आपल्यासाठी अक्षरशः लाखो शब्दांमधून विचारांचा अमूर्त ठेवा ठेवून गेला. त्याची नाटकं शाळा, विद्यापीठे, नाट्यगृहे, बागा आणि तुरुंगातही सादर केली जातात. शेक्सपिअरचा हा अमूल्य साहित्यिक ठेवा जतन करण्याचं कार्य ट्रस्टनं केलं असलं, तरी इंग्लंडमधील एका दैनिकात आलेली बातमी वाचून मन विषण्ण होतं. ती बातमी म्हणते, की ‘ विद्यार्थ्यांसाठी शेक्सपिअर खूप कठीण आहे! ‘डिजिटल टेक्नॉलॉजी ॲडॉब’ ने २००० साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २९ टक्के विद्यार्थ्यांना असं वाटतं, की शेक्सपिअरची नाटकं आधुनिक तंत्रात बसवली, तर ती चटकन समजतील. शेक्सपिअर चांगला समजायचा असेल, तर व्हिडिओ आणि ॲनिमेशनचा उपयोग करायला हवा असेही काहीजण म्हणतात.’  असो. मी मात्र माझं १९७० सालापासूनचं स्वप्नं पूर्ण झाल्यानं आनंदात होतो.

©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ कर्नाटकी कशिदा… डाॅ.निधी पटवर्धन ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

पुण्याहून आलेल्या माझ्या एका मैत्रिणीला मुद्दामून कारवारी जेवण खाऊ घालावे म्हणून कानडी मैत्रिणीकडे गेले. चित्रान्न (विशिष्ट प्रकारचा कानडी तिखट भात), केळय़ाच्या गोड पोळय़ा, तमळी (बेलाची कढी), कच्च्या पपईची मूगडाळ घातलेली कोशिंबीर, एकही थेंब तेल नसलेलं लोणचं असं बरंच काही तिने खाऊ घातलं आणि आपली व्यथा व्यक्त केली, ‘‘ मला स्वच्छ मराठी बोलता येत नाही याचं वाईट वाटतं ! मला लोक अजूनही मी ‘कानडी’ आहे म्हणून पाहतात. माझे मराठी हेल कानडी येतात. त्यांनी मला ओळखता कामा नये, मी मराठीच वाटले पाहिजे ’’.

आश्चर्याने केळय़ाच्या पोळीचा घास माझ्या हातातच राहिला. तुम्ही जन्माने कानडी आहात तर तसंच ओळखलं गेलात तर वैषम्य कसलं? तुमचे कानडी हेल ही तर श्रीमंती आहे. तसं तर संवादाच्या गरजेतून अनेकदा इतर भाषकांनी केलेले मराठी बोलण्याचे प्रयत्न हा मराठी भाषेचा एक आगळावेगळा साज आहे. त्या त्या भाषिकांच्या मातृभाषांचा गंध त्या त्या प्रदेशाचे हेल आणि उच्चार घेऊन आलेली मराठीची ही रूपं मला तरी श्रीमंत वाटतात!

कानडी घरात लग्न होऊन गेल्यावर मराठी स्त्रिया किती काळात कानडी शिकतील याचा अंदाज घेतला तर दोन-चार वर्षांत माझी बहीण, मैत्रीण शिकलेय असं पाच-सहा जणांनी सांगितले. महाराष्ट्रात लग्न होऊन आलेल्या, खेडय़ापाडय़ातल्या कानडी स्त्रिया मराठी हळूहळू शिकतात आणि सहज बोलू लागतात हा मात्र सर्वाचा अनुभव आहे. भाषेचा जन्म संवादाच्या गरजेतून झाला आहे. अशा इथं आलेल्या, या मातीशी एकरूप झालेल्या स्त्रिया हळूहळू का होईना मराठी शिकतात, हे किती अनमोल आहे. त्यांची मुलं दोन भाषा शिकतात, ही आणखी जमेची बाजू !

भले तुकाराम महाराजांनी ‘कानडीने केला मराठी भ्रतार एकाचे उत्तर एका न ये’ असा अभंग रचला असला तरी सुरुवातीचा हा काळ सरल्यावर ही कानडी स्त्री कर्माने मराठी होतेच की! गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमांचा सहवास मराठी भाषेला आहे. स्वाभाविकपणे त्या त्या सीमावर्ती महाराष्ट्रात जी मराठी बोलली जाते त्यात या भाषाभगिनींचा प्रभाव जाणवणारच.

जी. ए. कुलकर्णीच्या साहित्यातून कानडी शेजार डोकावतो. तसेच प्रकाश नारायण संत यांचा लंपन या भाषेतील अनेक शब्दांची ओळख आपल्याला करून देतो. ‘तो मी नव्हेच’मधील निपाणीचा व्यापारी लखोबा लोखंडे त्याच्या कानडी-मराठीने आपल्या लक्षात राहिलेला आहे. कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात ‘श्री चावुण्डराये करवियलें..’ हे वाक्य आढळलेले आहे.

मराठी भाषेला किमान सात-आठ शतकं झपाटून टाकणारी व्यक्तिरेखा कानडी आहे असं सांगितलं तर काय वाटेल? पण तसं खरंच आहे. मराठी संतकाव्याची सत्त्वधारा ज्या भक्तीपात्रातून वाहते तिच्या उगमस्थानी तर एक थेट ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु’ असा कानडी माणूस निघाला ! नुसता माणूस नव्हे तर थेट राजाच ! तोही पंढरीचा ! ‘भाषा ही माणसाचं जीवन सहज, सुलभ आणि सजग करण्याचे साधन आहे. जीवन असह्य करून मिळवणारे साध्य नाही. तुमच्या कानडी जेवणाइतकीच मधुरता तुमच्या बोलण्यात आहे.’ असे त्या कारवारी मैत्रिणीला सांगितल्यावर ‘मुद्दुली चिन्ना’ म्हणून तिने माझ्यावर जे प्रेम केले ते मला मराठीइतकेच गोड भासले.

लेखिका : डॉ. निधी पटवर्धन 

[email protected]

संकलक :  नितीन खंडाळे, चाळीसगाव

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १ ते ४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १ ते ४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ (अनेक देवता सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – १ ते ४ अश्विनीकुमार; ५ ते ८ सवितृ;

९ ते १० अग्नि; ११ – देवी; १२ – इंद्राणी; १३, १४ द्यावापृथिवी;

१६ ते २१ विष्णु; : छंद – गायत्री

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बावीसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या चार ऋचा अश्विनीकुमारांचे, पाच ते आठ या ऋचा सवितृ देवतेचे, नऊ आणि दहा ऋचा अग्नीचे आवाहन करतात. अकरावी ऋचा देवीचे, बारावी ऋचा इंद्राणीचे तर तेरा आणि चौदा या ऋचा द्यावापृथिवीचे आवाहन करतात. कण्व ऋषींनी या सूक्तातील सोळा ते एकवीस या ऋचा विष्णू देवतेच्या आवाहनासाठी रचलेल्या आहेत. 

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमारांना उद्देशून रचलेल्या पहिल्या चार ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद 

प्रा॒त॒र्युजा॒ वि बो॑धया॒श्विना॒वेह ग॑च्छताम् अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑

प्रातःकाळी शकट जोडुनी सिद्ध होत अश्विन

जागृत करि निद्रेतुनिया त्यांच्या जवळी जाउन

झणी घेउनी यावे त्यांना अमुच्या यज्ञाला

आम्हा हो ते प्राप्त कराया अर्पण सोमरसाला ||१||

या सु॒रथा॑ र॒थीत॑मो॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशा॑ अ॒श्विना॒ ता ह॑वामहे

महारथी ते चंडप्रतापी अजिंक्य असती रणी

दिव्य रथावर आरुढ होती सहजी रणांगणी

द्युलोकाप्रत जाऊन भिडती कुमार ते अश्विनी

उभय देवतांनो झणी यावे हो अमुच्या या यज्ञी ||२||

या वां॒ कशा॒ मधु॑म॒त्यश्वि॑ना सू॒नृता॑वती तया॑ य॒ज्ञं मि॑मिक्षतम्

ऐकुनिया रव अश्विनांच्या शकट प्रतोदाचा

सोमरसाला सिद्ध करूनी तुमच्या स्वागताला

आशा जागृत होइल सत्य तत्वांचा लाभ 

तुम्हा कृपेने वाहुदेत सुखसमृद्धीचे ओघ ||३||

न॒हि वा॒मस्ति॑ दूर॒के यत्रा॒ रथे॑न॒ गच्छ॑थः अश्वि॑ना सो॒मिनो॑ गृ॒हम्

आरूढ होउनि रथावरती तुम्ही अश्विन देवा

त्वरित धावता ज्या भक्ताने केला तुमचा धावा 

भक्ताचा त्या निवास आहे जवळी सन्निध

ज्याने तुमच्यासाठी केले सोमरसाला सिद्ध ||४||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. )

https://youtu.be/vYklP6fMug0

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 1 to 4

Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 1 to 4

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print