? इंद्रधनुष्य ?

☆ स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी… लेखक – श्री अजित दांडेकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथे  एका मंदिराचे उदघाटन केले आणि ही बातमी स्मृती पटलाच्या एका उंच जागेवर कुठेतरी जाऊन पडून राहिली होती … 

मागील एका शनिवारी हैदराबाद येथे अचानक जाण्याचा योग आला आणि वरील बातमीची आठवण झाली व लगेच गूगल काकांची मदत घेण्यात आली .. त्यांनी असे सांगितले की ‘ स्टॅच्यु ऑफ इक्वालिटी ‘ असे त्याचे नाव असून ते हैदराबाद पासून फक्त  ३७ कि मी अंतरावर आहे. 

स्टॅच्यु  ऑफ इक्वालिटी असे वाचल्यावर प्रथम वाटले की हे सर्व धर्म सद्भावना वगैरे पैकी ठिकाण असावे … पण मला चांगलीच उत्सुकता होती बघायची कारण श्री नरेंद्र मोदी यांनी त्याचे उदघाटन केले होते… 

तर कामात वेळ काढून मी रविवार दिनांक १२ फेब्रुवारी या दिवशी पुन्हा: एकदा गूगल काकांना विचारून येथे जायला निघालो . यावेळी मॅप वर अंतर दाखवले गेले ३७ किमी, आणि अंतर कापण्यास लागणार वेळ ३४ मिनिटे .. हे कसे शक्य आहे अशा  विचारात असतानाच लक्षात आले की मार्ग हा आऊटर रिंग एक्सप्रेस रोड येथून पोहोचतो पुढे …  आणि खरोखरीच हा एक्सप्रेस हायवे प्रत्येक बाजूने सहा लेनमध्ये 

विभागलेला असून त्यातील दोन लेन या अनुक्रमे ८० व १०० एव्हढ्या किमान वेगासाठी राखीव आहेत.  अशी मोकळीक मिळाल्यावर काय मग गाडी आपोआपच सुस्साट निघाली. आणि ठरलेल्या वेळात पोचलो देखील ..

मुख्य गेट समोरचे गणवेशातील सुरक्षा अधिकारी तत्परटेने पुढे आले आणि बाजूतील रस्त्याने मार्गक्रमण करण्यास सांगितले . मी थोडा साशंक झालो, कारण हा रस्ता मागील बाजूला जात असून गाडी लावून खूप अंतर चालले जाऊ शकले असते.. इतक्यात अजून एक चेक पोस्ट व अधिकारी समोर आला आणि सांगितले की पार्किंग चे ३० रु द्यावे लागून ते मी कुठल्या प्रकारे भरणार आहे अथवा फास्ट टॅग असल्यास मी त्यातून घेऊ शकतो असे तो म्हणाला. आता मला फास्ट टॅग फक्त रस्त्यावर चालतो एव्हढेच माहित होते तरी पण मी त्याला हो म्हटले… त्याने लगेचच एक छोटे गॅजेट काढून फास्ट टॅग ट्रॅन्झॅक्शन पूर्ण केले देखील. 

पुढे साधारण अर्धा किलोमीटरवर गाडीतळ असून एका दर्शिकेवर स्वागत करून येथे थांबण्यास सांगितले गेले. काही मिनिटातच दोन इलेक्ट्रिक व एक डिझेल बस या गाड्या हजर झाल्या आणि त्यांनी तत्पर मुख्य दरवाज्याकडे सोडले. येथे असे कळले की आत जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल २०० रुपयांचे … 

तिकीट काढताच सांगण्यात आले की मोबाइल फोन हे जमा करावे लागतील व त्याची व्यवस्था लगेच करण्यात आली… 

पुढे अतिशय शिस्तबद्ध अशी रांग असून आत जाणाऱ्यांना हातावर टॅटू काढण्यात आला … फरक एवढाच की टॅटू हा ओम ह्या चिन्हाचा असून प्रत्येक व्यक्तीच्या हातावर ऐच्छिक स्वरूपात फुकट नोंदवला जातो. पुढे अश्याच प्रकारे कपाळावर पण गंध लावण्यात आले …. आणि येथूनच सुरु झाली १०८ मंदिरांची परिक्रमा . ही मंदिरे भगवान विष्णू यांचे  १०८  अवतार असून यापुढील प्रत्येक मंदिरामध्ये एक पुजारी आणि एक स्वयंसेवक / सेविका आपल्यासाठी त्या मंदिराचे महत्व आणि त्या अवतारासंबंधी मंत्र घोष आपल्याकडून म्हणून घेतात … प्रत्येक मंदिर हे विशिष्ठ आकारात असून त्या त्या अवतारासंबंधित बांधणी ह्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ वन अवतार दाखविताना मंदिर हे एका झाडातून कोरण्यात आले आहे असे वाटते. अतिशय अद्भुत अशी ही योजना वाटते … 

पुढे सर्व १०८ मंदिरांचे दर्शन संपल्यावर वेळ येते ती रामानुजाचार्य यांची भव्य प्रतिमा जवळून पाहण्याची … अनेक पायऱ्या चढून गेल्यावर एक मजला हा त्यांच्या सुवर्ण प्रतिमेसाठी  राखण्यात आलेला आहे… ही प्रतिमा जवळपास सहा फूट इतकी मोठी असून संपूर्ण सोन्याची आहे…  या पुतळ्यासाठी 120 किलो सोनं वापरण्यात आलं असून त्याची निर्मिती भद्रपीठम इथे झाली. रामानुजाचार्य 120 वर्षं जगले, त्यामुळे 120 किलो सोनं या पुतळ्यासाठी वापरण्यात आलं असे सांगितले जाते ….  अर्थातच येथे सुरक्षा कडक असून उगाचच जास्त वेळ थांबू दिले जात नाही.. पण दर्शन व्यवस्थित करू दिले गेले आणि प्रत्येकाच्या डोक्यावर चांदीचा मुकुट हा आशीर्वादाच्या स्वरूपात पुजारी ठेवतात …  

दर्शन झाल्यावर पुढील मजला हा भव्य पुतळ्यास्वरूपात आहे, याची उंची २१६ फूट असून हा सुवर्ण रंगात ल्यालेला आहे. येथूनच आजूबाजूला सुंदर परिसर दृश्य होतो … अतिशय सुंदर रस्ते, आजूबाजूला उभारू पाहिलेल्या अनेक मजली इमारती, हवा थंड ठेवणारी झाडे असा हा परिसर आहे… 

खाली उतरल्यावर लगेचच एग्झिट गेट असून मोबाइल फोन परत मिळण्याचे ठिकाण होते.. हाताळण्याची अतिशय शिस्तबद्ध पद्धत आणि वागणूकही विनयशील असे हे सर्व कर्मचारी निमूटपणे आपले काम करीत होते. 

योगायोग असा होता की रविवारचा तो दिवस ब्रम्होत्सव सुरु होता आणि एक मोठा यज्ञ श्री चिन्न जियरस्वामी ह्यांच्या हस्ते सुरु होता …. मंत्र घोषांनी भारावलेला तो परिसर एका वेगळ्या सृष्टीत घेऊन गेला … 

विविध वनस्पतींच्या त्या समिधा, शुद्ध तुपातील अर्घ्य, मंत्रांचा जयघोष एखाद्या पौराणिक कथेप्रमाणे वाटत होते …   स्वतः स्वामीजी अनेक मंत्र घोष करीत असून माईकवर त्या संबंधी विवरण हे स्थानिक भाषा आणि इंग्रजीमधेही सांगत होते… 

येथे हे नक्की सांगावे लागेल की श्री रामानुजाचार्य हे आद्य संत होते, ज्यांनी सर्व जाती समावेशक मंदिर प्रवेशाची द्वारे उघडली होती, आणि ती ही तब्बल एक हजार वर्षांपूर्वी … 

पुढे बाहेर  आल्यावर अतिशय निगुतीने तेथील स्वयंसेवक पुढे आला आणि म्हणाला की त्वरित प्रसाद-लाभ घ्यावा कारण तो संपण्याच्या मार्गावर आहे… मग काय पाय लगेच तिथे वळले, कारण या सर्व उलाढालीत भूक लागलेली कळलीच नव्हती, दुपारचे चार वाजूनही प्रसाद अजूनही दिला जात होता  … 

पोटभर भात, भाजी, रसम, ताक आणि लोणचे ह्याच्यावर  चांगलाच ताव मारून तृप्त मनाने बाहेर पडलो ते पार्किंगला जाईपर्यंत …. पुनः इलेक्ट्रिक गाडीत बसण्यासाठी … 

लेखक : श्री अजित दांडेकर

पुणे

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments