मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

❤️ मनमंजुषेतून ❤️

☆ पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!  – लेखक – श्री प्रसाद शिरगांवकर☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  ☆

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते. पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटेड असतं !! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि ‘पुरेसाची’ व्याख्या पुन्हा बदलते ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं ! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो ! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? की खर्चल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे ! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युलर, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही !! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमवावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको, असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. ‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो. 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे . पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर’, आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो !! 

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.!

लेखक : – प्रसाद शिरगांवकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित. 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ टिकलीच्या_निमित्ताने…लेखिका : डॉ शरयू देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ टिकलीच्या_निमित्ताने…लेखिका : डॉ शरयू देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

तशी ती मी माझ्या मर्जीनेच लावते किंवा लावत नाही. पण मनात कैक वर्षं तिचं असणं /नसणं घोंगावत होतं.. सध्याच्या चर्चेत त्यालाच  वाट करून देण्याचा हा प्रयत्न ….

आई जुन्या मताची. त्यामुळे ‘टिकली न लावणं’ ही पद्धत तिच्या गावीही नव्हती. कुंकू /गंध/ टिकली न लावणं म्हणजे ‘आपल्या संस्कृतीला नाकारणं  आणि अमुक एका संस्कृतीला मूक पाठींबा दर्शविणं ‘ असं तिचं साधं सरळ गणित होतं. अर्थात मी लहानपणापासून बंडखोर, त्यामुळे इतर पुढारलेल्या विचारांच्या कुटुंबातील मुलींचं पाहून मीही गंध/ टिकली याला विरोध केला. आई म्हणायची, ” निदान बाहेर जाताना तरी लाव “.. ते थोडंसं पाळलं.

शाळेतल्या शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिका, मुलींना ज्युदो कराटे शिकवण्यासाठी प्रोत्साहन देत आणि  शाळा भरताना कपाळावर गंध /टिकली नसेल तर २५ उठाबशा काढायला लावत. या परस्परविरोधी क्रियांमागची कारणमीमांसा समजून घेण्याची  मानसिक कुवत तेव्हा नव्हती. पण टिकलीविषयीचं गूढ निर्माण झालं ते तेव्हापासून. 

कॉलेजमधे आल्यावर वयानुसार येणारी परिपक्वता म्हणा किंवा आजूबाजूच्या विश्वाची थोडी अधिक जाण म्हणा, आईची बाजू थोडीथोडी पटायला लागली होती किंवा मुद्दाम विरोध करून तिला दुखवावंसं वाटेना. त्यामुळे जिन्स /western outfits घातले की टिकली नाही,आणि पंजाबी ड्रेसवर मॅचिंग टिकली असा आपला मधला मार्ग निवडला. तरीही टिकली /गंध याभोवतीचं गूढ आकर्षितच करत राहिलं…… ‘ लाव ‘ कुणी म्हंटलं की राग यायचा, पण ती लावल्यावर चेहरा जरा उठावदार, फ्रेश दिसतो  हे उघड उघड मान्य करायलाही कठीण जात असे.

सुट्ट्यांमध्ये गावी जात असू. तिथेही घरात आम्हाला मुली म्हणून कुठलीही बंधनं नव्हती. खानपान पेहराव याबाबत बऱ्यापैकी मोकळीक होती. आम्हीदेखील मुद्दाम जेष्ठांच्या समोर त्यांना आवडणार नाही असं काही करत नसू. गावात, इतरत्र बाहेर जाताना मात्र स्लिव्हलेस, बॉयकट असणं आणि टिकली नसणं हा चर्चेचा विषय ठरत असे. Obligatory झाल्या गोष्टी की मग उगाचच त्याविषयी तिटकारा निर्माण होतो. पण वय वाढत गेलं तसतसं मात्र ही जाणीव बोथट होत गेली. गावी गेल्यावर थोड्याशा मर्यादा पाळल्या की बाकी चैन असते हे लक्षात येत गेलं आणि बंडखोरी कमी होत गेली.

कॉलेजला असताना एक मुस्लिम मैत्रीण आमच्या पर्समधल्या टिकल्यांची पाकीटं घेऊन लेडीज रूममध्ये लावून आरशात बघत असे. कदाचित पहाण्याची सवय नसल्यामुळे असेल, पण तरीही साधारणच दिसणारी ती, टिकलीमुळे विशेष दिसत असे. पाच दहा मिनिटं ठेवत असे. त्या ५-१० मिनिटांत इवलीशी टिकली तिचा चेहेराच नव्हे तर मनही उजळून टाकत असे. साधं नेहमीचं टिकलीचं पाकीट कुणासाठी आनंदाचा स्त्रोत असू शकतो हे प्रथमच जाणवलं..

 Western Wardrobe असेल तर टिकली नाही लावायची हा पायंडा कायम ठेवला. भारतीय पोषाख परिधान केला की छोटीशी का होईना, पण  टिकली आपोआपच लावली जायची…  

पुढे पेशा निवडला तोही टिकलीचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने दाखवून गेला. MA झाल्यावर लगेच हंगामी प्राध्यापिका म्हणून एका कॉलेजमधे जॉब मिळाला. माझे विद्यार्थी माझ्यापेक्षा मोठे दिसत. पंजाबी ड्रेसमधल्या, बारीक टिकलीच्या, लहानखुरी असलेल्या मला कुणी प्राध्यापिका समजेना. विशेषतः वर्गातील मागच्या बेंचवरची मुलं टिंगल टवाळी करतायत असं जाणवलं. या व्यवसायात थोडा पोक्तपणा दिसण्यातही हवा हे लक्षात आलं. मग साडी नेसून आणि ठळकपणे दिसून येणारी टिकली लावायला सुरुवात केली तशी आपसूकच विद्यार्थी आदरानं, अदबीनं बोलायला लागले. टवाळखोर पोरांपासून दूर ठेवायला टिकली अशी धावून आली. प्राध्यापक, निवेदिका या सगळ्याच भूमिकांमध्ये टिकलीचं असणं मान देत गेलं. किंबहुना ती लावली नाही तर विनाकारण गैरसमज आणि चर्चा होत रहातील या विचाराने  ती लावण्याचीच सवय लागली. संस्कृतीचा संदर्भ बाजूला ठेवला तरी ही टिकली कुठेतरी अनेक विचित्र नजरांपासून वाचवणारी ‘सहेली’ बनत गेली. …

लग्न झाल्यावर अमेरिकेत गेल्यावर, एरवी नाही तरी, महाराष्ट्र मंडळात जाताना आवर्जून टिकली लावून जाणं असे…परदेशात भारतीय संस्कृतीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न असा छोट्या टिकलीतूनही केला जाई.. 

सासुबाई सुरूवातीला एक दोन वेळा टिकलीची आठवण करून देत. पण कदाचित सवयीने त्याही काही बोलेनाशा झाल्या. आजेसासुबाई मात्र एकदा स्पष्ट म्हणाल्या, ” तुला एरवी काय करायचं ते कर हो.. पण माझ्यासमोर अशी बिना कुंकू गंधाची येत जाऊ नकोस ..” हे ऐकताना किंचित राग येतोय की काय असं होतानाच त्या म्हणाल्या, “आमच्या कपाळावर आहे टिकली, पण खरं अर्थ आहे का त्याला?!” ह्या प्रश्नानं मात्र गलबलून आलं. पुन्हा कधीही त्यांच्यासमोर बिना टिकलीची गेले नाही. इतकुशा गोल तुकड्यानं आज्जेसासुबाईंचं मन जिंकलं तेव्हा मात्र अट्टाहास बाजूला सारला.. 

एरवी सगळे लाड पुरवणारा, सगळ्या बाबतीत मुभा देणारा मोठा भाऊ, आजही, अजूनही, माहेरी गेल्यावर, बाहेर जाताना  कपाळावर टिकली नाही अशी आठवण करून देतो, तेव्हा याचा संबंध स्त्रीमुक्तीशी न जोडण्याइतकी परिपक्वता आता आलीये. यात मला फक्त जाणवते ती त्याची धाकटी बहीण म्हणून काळजी आणि चुकूनही आपल्या संस्कृतीशी फारकत न होण्यासाठीची तळमळ. 

सासुबाईंनी मला टिकली लावण्याची सक्ती करू नये असं मी त्यांना आडून सुचवत असे. पण सासरे गेल्यावर जेव्हा थोडा वेळ रिकाम्या कपाळाच्या सासुबाई पाहिल्या तेव्हा मात्र धस्स झालं . माझ्या टिकलीमागची त्यांची भूमिका वेगळ्या पद्धतीने समोर आली आणि आता टिकली लावण्याची सक्ती मीच त्यांना करत असते . 

टिकली, मंगळसूत्र,  साड्या यांना कडाडून विरोध करणारी एक जेष्ठ मैत्रिण, नवऱ्याच्या अकाली निधनानंतर मात्र टिकली लावायला लागली. मध्यंतरी भेटली, ” हल्ली  साड्या नेसाव्या वाटतात गं खूप .. किती भारी भारी साड्या आणायचा ‘तो’.. मी मात्र त्याला ‘टिपिकल नवरा’ म्हणून चिडवत होते.. आता त्याची आठवण झाली की नेसते साडी आणि वर मॅचिंग टिकली सुद्धा …तिथून सुद्धा मला डोळा मारत असेल बघ “.. मनात आलं, हिची टिकली अजून वेगळी..

हौसेनं वेगवेगळ्या प्रकारच्या  टिकल्या लावणारी एक मैत्रीण, वेगळ्या समाजात हट्टानं प्रेमविवाह करून गेली तेव्हा टिकली नसलेलं तिचं भकास कपाळ पाहून हळहळ वाटली .” आता या कपाळावर कधीही टिकली येणार नाही ” हे तिचं वाक्यं  का कोण जाणे खूप खोलवर रूतलं. साधी टिकलीच ती, पण तिच्या नसण्यानं मैत्रिणीचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदललं. 

हैदराबादमध्ये आल्यावर, जॉब करताना जाणवलं की टिकलीचा आणि मॉडर्न असण्याचा काही संबंध नाही. Kafka, Derrida अशा विचारवंतांच्या क्लिष्ट संकल्पना सहज उलगडून दाखवणाऱ्या प्राध्यापिका भलं मोठं कुंकू लावून येत असत. आपण एका विशिष्ट धर्माचे आहोत (किंवा नाही आहोत) हे ठळकपणे दर्शविणं हैदराबादसारख्या ठिकाणी आवश्यक वाटत असावं आणि कदाचित त्याच जाणिवेतून इथल्या लहानथोर सर्व महिला टिकली आवर्जून लावताना दिसतात.

सुषमा स्वराज, स्मृती इराणी, निर्मला सिताराम, सुधा मुर्ती … यांच्या टिकल्या मला तळपत्या तलवारींसारख्या भासतात. बुद्धिमत्ता आणि सौंदर्य यांचा अनवट संगम त्यांच्या कपाळावरच्या टिकलीने अधोरेखित होतो. त्यांचं कर्तृत्वच असं आहे की त्यांच्या कपाळावर धारण होऊन टिकलीचाच मान वाढलाय असं वाटत रहातं… 

टिकली अशी वेगवेगळी रूपं, अनेकविध संदर्भ घेऊन समोर येत राहिली. ती माझ्यातली बंडखोरी कमी करत गेली. अर्थात ती लावणं, न लावणं हा सर्वस्वी माझाच निर्णय. आधीही होता, आजही आहे आणि पुढेही राहील. पण आता प्रत्येक वेळी तिच्याभोवती स्त्रीमुक्तीचं वारूळ चढवायला नको वाटतं . घरात  ‘टिकली सुद्धा न लावणारी लंकेची पार्वती’ असा अवतार आजही कायम असतो. .सक्ती केली जात असेल तर आवडत्या गोष्टी देखील नावडत्या होतात. लावण्याची असू नये तशी न लावण्याची पण असू नये इतकंच.  चाळीशीत आता एक जाणवतंय की उगाच विरोधासाठी विरोध करायची गरज नसते , विनाकारण प्रसिद्धीसाठी टोकाची भूमिका घ्यायची गरज नाही. 

बाकी हा लेख लिहीत  मी लहानपणापासून पहात असलेला , माझ्या काकूंचा कुंकूविरहित चेहरा सतत समोर होता. भर तारुण्यात ते पुसलं गेलं. घरात कुणीही न लावण्यासाठी बळजबरी केली नव्हती. पण त्या काळच्या प्रथेनुसार काकूंनी स्वतःच ते लावण्याचं नाकारलं…साजशृंगाराची आवड असणाऱ्या माझ्या काकूला हा निर्णय घेताना किती जड गेलं असेल ! ……. जी टिकली ” माझ्या कपाळावर माझ्या मर्जीनेच लागेल ” असा हट्ट करते, त्याच इलुशा टिकलीसाठी एक कपाळ गेली चाळीस वर्षे किती आसुसलेलं, अतृप्त राहिलंय याचा विचार करून मात्र अंगावर काटा येतो… 

लेखिका :  डॉ शरयू देशपांडे, हैदराबाद

प्रस्तुती : स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ ज्याची जेवढी कुवत, तेवढा त्याचा विचार… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

आमच्याकडे त्यावेळी मारुती 800 ही गाडी होती. बहिणीच्या गावाहून येताना गाडीला खालून दगड लागला. ऑईलचेंबर फुटला आणि ऑइल गळायला लागलं. मी तशीच गाडी दामटली. घरी आलो आणि गाडी बंद पडली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी मेस्त्रीला बोलावलं. त्यानं इंजिन चेक केलं आणि विचारलं, “ऑइल गळल्यावरही गाडी पळवलीय काय? “

” होय. पाच सहा किलोमीटरच.” मी म्हटलं.

” गाडीचं इंजिन जाम झालंय… इंजिनचं काम करावं लागेल.”

“अहो, नवीन गाडी आहे आणि एवढ्यात इंजिनचं काम?”

“ऑइल नसताना गाडी पळवल्याचा परिणाम. इंजिन खोलावंच लागेल.”

” ठीक आहे. इथंच काम होईल की गाडी मिरजला घेऊन जावी लागेल? “

” मिरजलाच घेऊन जावी लागेल.”

त्यांनी मग माझी गाडी एका टेंपोला बांधून ओढून नेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी एक पुढारी माझ्या दारात— ” वकीलसाहेब, गाडी बँकेनं ओढून नेली होय?” त्यानं विचारलं.

” कोण म्हटलं?”

” नाही, गावात कोणीतरी म्हणत होतं.”

तासाभरात दुसरा मनुष्य— ” वकीलसाहेब, किती हप्ते तटले होते हो?…हप्ते भरता येत नव्हते तर गाडीच घ्यायची नव्हती ! “

असेच मग दिवसभर लोक येत राहिले आणि प्रश्न विचारत राहिले. पण दिवसभरात एकानंही,” गाडीला काय झालं?” किंवा ” गाडी कुठं गेली?” म्हणून विचारलं नाही. सगळे जण असे बोलत होते की जणू गाडी बँकेनंच ओढून नेलीय.

मला सकाळी सकाळी या प्रश्नांचा राग आला होता. पण नंतर नंतर लोकांच्या हलक्या कानाचं आणि सुमार बुद्धीचं हसू यायला लागलं.

दुपारनंतर तर आमचा संवाद असा होऊ लागला,—

” वकीलसाहेब, बँकेनं गाडी ओढून नेली होय ?”

“होय.”

” का? “

” इंजिनच्या कामासाठी आणि ऑइल बदलीसाठी.”

” पण गाडी बँकेनं का नेली ?…मेस्त्रीनं न्यायला पाहिजे होती नव्हं?”

“आजकाल असंच असतं,” मी गंभीरपणे म्हणायचो, ” बँकेच्या कर्जवसूलीची कामं मेस्त्री करतात आणि गाड्या दुरुस्तीची कामं बँकवाले करतात.”

“असं का म्हणे?”

” काय माहीत?….पण सध्या असंच चाललेलं असतं !” मी आणखी गंभीर होऊन बोलायचो.

—–माझं नाटक बघून बायको हसायची आणि मग समोरचा माणूस खजिल होऊन निघून जायचा.

त्या एका प्रसंगानं मला शिकवलं की लोक काय म्हणतात तिकडं कधीच लक्ष द्यायचं नाही. लोक काहीही बोलत असतात.

मध्यंतरी तर कमालच झाली. माझ्याकडे एक वकील मुलगी कामाला आली. तिला गाडीत बसलं की मळमळायचं. म्हणून ती पुढे माझ्याशेजारी बसायची.

लोक म्हणायचे, ‘ वकिलानं दुसरं लग्न केलं वाटतं ! ‘ एक जण माझ्या खऱ्या बायकोला म्हणालीही, ” स्नेहा,खरंच भाऊजींनी दुसरं लग्न केलं होय गं ?” माझी बायको हजरजबाबी, बोलली,

“अगो बाई, तुम्हाला लग्नाला सांगायचंच राहिलं की !” 

काही दिवसांनी ती मुलगी काम सोडून गेली.— लोक म्हणाले, ‘ वकीलाची दुसरी बायको वकीलाला सोडून गेली वाटतं !’

तोपर्यंत दुसरी मुलगी कामावर आली. 

लोक म्हणाले, ‘आयला, वकीलाचं काही खरं दिसत नाही. दुसरी बायको गेली नाही तोपर्यंत तिसरी आणली.’

माझ्या कानावर अशा बातम्या आल्या की मी पूर्वी खूप अस्वस्थ व्हायचो.. पण आता हे सगळं एन्जॉय करत असतो….

लोक काय, काहीही बोलत असतात पण आपण आपलं काम करत जायचं….. कुणावरही न रागावता न चिडता.

कारण— “ ज्याची जेवढी कुवत तेवढा त्याचा विचार….!!”

आपण खूप हसत रहा आनंदी रहा—–

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 2  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 2  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

(ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..) इथून पुढे —–

सगळ्या डॉक्टरांनी खोऱ्यानं पैसा ओढण्याचा जमाना गेलाय.. खोऱ्या घेऊन बसलेले फक्त पाच-दहा टक्के डॉक्टर उरलेत, आणि समाजाला तेवढेच दिसतात..  अलीकडं नवीन बाहेर पडलेल्या बहुतांश डॉक्टर्ससाठी खोऱ्या तर नाहीच आहे, उलट पेशंट्स मिळणं मुश्किल झालंय.. त्यात तुम्ही स्पेशालिस्ट / सुपर स्पेशालिस्ट असाल तर आणखी अवघड आहे.  पिताजींचा पैसा असेल तरच निभावून नेता येतं, नाहीतर मग कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन होण्याशिवाय पर्याय नाही.. 

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सना तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन व्हावंच लागतं, कारण त्यांना लागणाऱ्या मशिनरीज ची कोटीतली इन्व्हेस्टमेंट ते सुरुवातीला करूच शकत नाहीत..  मग हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन खोऱ्यानं ओढताहेत..  खोऱ्या आता तिकडे शिफ्ट झालाय, असं आपण म्हणू शकतो.. म्हणून तर बडे उद्योगपती आणि उद्योगसमूह आता हेल्थकेअर सेक्टर मध्ये उतरू लागलेत. फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांची चलती सुरू आहे..  गेल्या दहा वर्षात हा बदल इतक्या झपाट्यानं झालाय की पुढच्या दहा वर्षात परिस्थिती काय असू शकते हे आपण इमॅजिनच नाही करू शकत !!

ह्या व्यवसायातून मिळणाऱ्या Job satisfaction चं गणित देखील बिघडलंय..  ‘डॉक्टर तुमच्या हातात आमचा पेशन्ट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा, बाकीचं आमचं नशीब ‘ असं म्हणणारे नातेवाईक आता उरले नाहीत..  एखादी केस हँडल करत असताना तुम्हाला होणारा स्ट्रेस, आणि तो पेशन्ट बरा झाल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान, याचं गुणोत्तर व्यस्त झालंय.  त्यातच  ‘ मग डॉक्टरनं काय फुकट केलं काय? ‘ अशा पद्धतीची सर्टिफिकेटस् तुमचा सगळा उत्साह पहिल्या एक दोन वर्षातच घालवतात..

आता, जरी वैद्यकीय तपासण्या आणि उपकरणं अद्ययावत झाली असली तरी प्रत्येक केसमधली “सोशल रिस्क” खूपच वाढलीये.. त्यामुळं कितीतरी डॉक्टर्सना कमी वयातच ब्लड प्रेशर , डायबेटीस, हृदयरोग, arthritis, spondylosis अशा आजारांचा सामना करावा लागतोय. Quality of life आणि सरासरी आयुर्मान घटतेय.. क्रिटिकल केअर मधल्या डॉक्टर्सचं morbidity आणि mortality चं प्रमाण तर लक्षणीयरित्या वाढलंय..  हे इमर्जन्सी हँडल करणारे डॉक्टर्स तर रोज खूप मानसिक थकतात.. किंवा मग लवकर त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, किंवा काही दिवसांनी क्रिटिकल पेशंट्स घेणे बंद करतात, किंवा खूप साऱ्या व्याधी स्वतःला घेऊन लवकर मरतात.. “प्रोफेशनल हझार्ड” आहे हा.. सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येणं शक्यच नाही..  खूप प्रयत्न चालू असलेल्या पेशंटच्या साधं लॅब टेस्टस जरी आपल्या मनासारख्या आल्या नाहीत तरी मन बेचैन होतं..  बेडवर शांत झोपलेल्या पेशंटची दोन सेकंद पल्स जरी लागली नाही , तर अंगात जी भयाची वीज चमकून जाते त्याची काय किंमत पैशात होईल का? साईडरूम मध्ये गाढ झोपलेलं असतानाही मॉनिटरच्या अगदी छोट्याश्या अलार्मने पण जाग येते, आणि दिवसभरात जो थोडा थोडा “ऍड्रेनॅलीन सर्ज” होत राहतो, आणि शरीरावर विपरीत परिणाम करत राहतो, त्याची भरपाई पैशांत होऊच शकत नाही..

डॉक्टर स्त्रिया तर जास्तच भावनिक असतात. नवरा पण डॉक्टर असेल तर तो तिचे ताण समजू तरी शकतो, पण नॉनमेडीको व्यक्तीला तिचे ऑन-कॉल त्रास देतात, इमर्जन्सीज नकोसे वाटतात, मूड स्विंगज् टॉलरेट होत नाहीत.. हॉस्पिटल मधून एक फोन आला अन हिचा मूड एवढा का गेला, हे सांगितलं तरी कळू शकत नाही.. आपली जवळची नॉनमेडीको व्यक्तीच सर्वकाळ समजून घेऊ शकत नाही, तर मग परक्या समाजाकडून तर अपेक्षाच नाही..  

तुम्हाला वाटेल , ‘काय हा सगळं निगेटिव्हच बोलतोय’, पण बाहेरच्या अनेक देशांत देखील  मेडिकल फिल्ड हे least preferred क्षेत्र आहे.. युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई सगळीकडे MBBS करण्यापेक्षा इतर कोर्सेस निवडण्याला जास्त प्राधान्य आहे.. तरी तिथं डॉक्टरला मारहाण शिवीगाळ हा भाग अजिबातच नाहीये!.. पण जिथं ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ला खूपच जपलं जातं, तिथं हे असं अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम शिकण्यात आयुष्याची बारा पंधरा वर्षे घालवायची, प्रत्येक पेशन्ट ट्रीट करताना अथवा ऑपरेशन करताना मरणाचा स्ट्रेस घ्यायचा, ऑन कॉल्स इमर्जन्सीज ह्यात स्वतःचं आयुष्य बेभरवशाचं करून घ्यायचं, कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची वाताहत करायची, आणि personal happiness बाजूला ठेवून मन मारून जगायचं, हे असलं आयुष्य कोणाला आवडणार आहे बरं?  त्यामुळं बऱ्याच प्रगत देशातली मुलं MBBS घेतच नसल्यामुळं भारतातून डॉक्टर्स आणि नर्सेसना अशा ठिकाणी मागणी आहे..

असो..

हॉस्पिटलमधल्या दुःखमय आणि निगेटिव्ह वातावरणात दिवसभर वावरून देखील तिथल्या कुठल्याच स्ट्रेसचं प्रतिबिंब घरात पडू न देणं, आणि घरच्या प्रापंचिक गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊ न देणं यासाठी प्रत्येक डॉक्टर झगडत असतो… डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच आहे.. एक बटन दाबलं आणि ‘मूड चेंज’ केला, असं होत नाही.. आणि ते सोपंही नाही.. मग ‘भावनिक फरफट’ होत राहते.. त्यामुळं हळव्या स्वभावाच्या माणसाचे तर अजूनच हाल होतात.. स्थितप्रज्ञता ही गोष्ट प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि ती प्रत्येकवेळी जमेल असंही नाही.. 

असो..

समाजात ‘रिस्की जॉब्ज’ बरेच आहेत, जसं की वैमानिक, सैनिक, फायर फायटर, वगैरे.. पण आता ते बऱ्यापैकी Predictable आणि safe आहेत, आणि समाजातही त्यांच्याबद्दल इज्जत आहे.. पण डॉक्टरच्या हातात कोणाच्यातरी जीवन-मरणाचा प्रश्न रोजच असतो.. एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे ‘नोबल’ काम आणि त्यातून मिळणारा आनंद कुठलाच नाही.. पण कॉम्प्लिकेशन्स झाले तर मात्र तुमचं काही खरं नाही, अशी परिस्थिती असेल, तर यासारखं discouraging ही काही नाही.. तुम्हाला भयमुक्त वातावरणात काम करता येत नसेल, तर त्या job satisfaction ला ही काहीच अर्थ उरत नाही..  फुटबॉल मॅचमध्ये जसं गोलकीपरने किती गोल वाचवले ह्यापेक्षा त्या मॅचमध्ये किती गोल झाले हेच लक्षात राहतं, तसंच एखाद्या डॉक्टरच्या हातून किती लोक मरणाच्या दारातून बरे होऊन गेले यापेक्षा, दगवलेला एखादा रुग्ण डॉक्टरची आतापर्यंतची सगळी प्रॅक्टिस, मेहनत आणि नाव पाण्यात घालवू शकते.. आणि तेही, ज्या गोष्टी डॉक्टरच्या हातात नाहीत त्यासाठी!! 

कॉम्प्लिकेशन्स हे कधीही होऊ शकतात, बऱ्याचदा ते डॉक्टरच्याही हातात नसते. फारतर त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे एवढंच ते करू शकतात.. याची समज हळूहळू कमी होत चालली आहे.. कितीही मेहनत घेऊन देखील रुग्णाला काही कमीजास्त झालं तर, डॉक्टरांना बोलणी ऐकून घ्यावी लागतात, बदनामी सहन करावी लागते, प्रसंगी तोडफोड आणि मारहाणीलाही सामोरं जावं लागतं.. आणि कुठल्याही डॉक्टरसाठी ते खूपच humiliating आहे.. असो..

एकीकडे हॉस्पिटल टाकण्यासाठी लागणारी प्रचंड इन्व्हेस्टमेंट, सरकारी परवानग्या व अटी, इन्श्युरन्स कंपन्यांचे Eligibility criteria, ग्राहक सुरक्षा कायद्याचा (CPA चा) जाच, हे असतानाच वर समाजात वाढत असलेली असुरक्षा, सरकारी अनास्था,  मारहाणीची किंवा बदनामीची सतत टांगती तलवार, रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष, समाजाचा असंतोष, त्यात पुढाऱ्यांचा अन् गुंडांचा उपद्रव.. आणि वर हॉस्पिटलमधले वाढते ताणतणाव, यातून स्वतःच्या कौटुंबिक सुखाची वाताहत, अशा निराशाजनक वातावरणात आयुष्याची ऐन तारुण्यातली बारा पंधरा वर्षे होळी करून डॉक्टर नेमकं कशासाठी व्हायचंय? याचा विचार इथून पुढे MBBS ला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नक्कीच करावा..  सध्याची परिस्थिती थोडीतरी बरी आहे, आणि अजूनही हे क्षेत्र डिमांड मध्ये आहे.. आणि आमच्या पिढीपर्यंत तरी आम्हाला नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून डॉक्टर असल्याचा ‘Proud’ वाटावा अशी परिस्थिती होती.. पण पंधरा वीस वर्षांनंतरचा काळ देखील असाच ‘Proud’ वाटावा असा असेल, की हे क्षेत्र फक्त कॉर्पोरेट जॉबसारखंच फक्त एक प्रोफेशन उरलेलं असेल, ते सांगता येत नाही.. टिकून राहण्यासाठीचा संघर्ष तर समाजात सगळ्यांनाच करावा लागतोय, मग तो शेतकरी असो की इंजिनिअर.. मला तेच म्हणायचंय की डॉक्टर झाल्यावर आपलं लाईफ सेट होईल, पैशांचा पाऊस वगैरे पडेल अशा विचारातून जर कोणी इकडं येणार असेल तर मात्र परिस्थिती आता पूर्वीइतकी गालिचामय उरलेली नाहीये..  बाहेरून कदाचित लक्षात नाही येणार, पण इथंही तुम्हाला संघर्ष अटळ आहे..

कोणीही एखादा जर Highly educated आणि Well qualified असून देखील एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकणारच नसेल, तर त्याला, “हा एवढा अट्टाहास आपण कशासाठी केला?”, हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा सुरुवातीलाच त्याचा विचार केलेला बरा!

शेवटी एकच सांगतो, मुलं खूप संघर्ष करून डॉक्टर होतात खरं.. पण नंतर त्यांना कळतं की खरा संघर्ष तर डॉक्टर झाल्यावरच करावा लागतोय..

— समाप्त  —

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 1  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनो,  मग त्यासाठी पहिलं टीव्ही/खेळ/छंद/टाईमपास सगळं बाजूला ठेऊन खूप खूप अभ्यास करून NEET टॉप करा,  मग MBBS ला ऍडमिशन मिळवा. ऍडमिशन झाल्यावर साडेचार वर्षे पुन्हा पंचवीसेक विषयांचा अभ्यास करा.. (पहिले सहा महिने तर सगळं डोक्यावरूनच् जातं, काय चाललंय काहीच कळत नाही)..

लेक्चर्स, LCD, प्रॅक्टिकल्स, क्लिनिक्स, केसेस, एकाच विषयाचे अनेक उपविषय, प्रत्येकाची पाच सहा ‘ऑथर्स’ची पुस्तके, बरेच रेफरन्स बुक्स, जर्नल्स, ट्युटोरियल्स, सबमिशन्स, सारख्या सारख्या इंटर्नल एक्झाम, त्यात Viva सारखा टॉक्सिक प्रकार.. मानसिक खच्चीकरण करणारी बोलणी अन झापाझापी… 

गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या हॉस्टेल्सची दयनीय अवस्था, मेसचं जेवण, आमटीच्या नावाखाली ‘सजा-ए-कालापाणी’.. मग महिनाभर चालणाऱ्या फायनल्स.. सतत जागरणं.. ऍसिडीटी..  आणि एवढं सगळं करून पण पासिंग पुरतेच मार्क्स..!! 

पूर्वी फायनल परीक्षा पास झालं की हुश्श वाटायचं.. पण आता तसं नाहीये.. PG Entrance exam ची टांगती तलवार डोक्यावर असते.. त्यात मध्येच इंटर्नशीप, त्यातली काही महिने खेड्यात..  मग दोन वर्षांचा बॉण्ड करायचा..  त्या दरम्यानच्या काळात PG Entrance चा अभ्यास (वय 25-26 वर्षे)..  पुन्हा साडेचार वर्षांची सगळी पुस्तके एकाच वर्षात वाचायची.. आणि लक्षात पण ठेवायची..  तुम्हाला कल्पना नसेल, पण ही जी एन्ट्रन्स असते, त्यात देखील पैकीच्या पैकी मार्क कोणाला पडू शकत नाहीत.. कारण, paper set करणाऱ्यांनी काढलेली गोल्ड स्टॅण्डर्ड answers ही कोणत्या रेफरन्स बुकमधून काढलेत, यावर बरंच अवलंबून असतं.. मेडिकलच्या विषयांमध्ये एकच टेक्स्टबुक असा प्रकार नसतो, म्हणून, एकाच प्रश्नाची दोन उत्तरे देखील बरोबर असू शकतात, आणि एखाद्या प्रश्नाचं ‘कुठलंच उत्तर नेमकं बरोबर नाही’ असं देखील असू शकतं..  वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच गोष्टी probability वर अवलंबून असतात.. म्हणून अमुक एक डॉक्टर चूकच, असं ठामपणे सांगता येत नाही.. सायन्सच्या इतर शाखांपेक्षा वैद्यकीय क्षेत्रात ‘वैविध्य’ खूप आहे, त्यामुळे एकाच वेळी एकाच situation चे खूप Permutations – Combinations संभवत असतात..  असो..

पुन्हा PG ची तीन वर्षे.. संपूर्ण आयुष्यातला सगळ्यात भयानक काळ.. अक्षरशः सक्तमजुरी.. कामाचे तास, वेळा आणि स्वरूप या तीनही गोष्टी अजिबातच निश्चित नाहीत..  पुन्हा पेशंट्स, जागरणं, इमर्जन्सीज् , काम, काम आणि काम.. त्यातून वेळ मिळाला की झोप अन् जेवण..  अंघोळ बऱ्याचदा ऑप्शनला..! आणि अजूनच् अडचणीत पडायचं असेल तर लग्नाचा विचार.. (वय वर्षे 28-29)

PG संपली.. चला, आता ‘सरकारी बॉण्ड’ कंप्लिट करा.. का? तर सरकारने तुमच्या शिक्षणावर पैसे खर्च केलेत..!  मग IIT , IIM किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात सरकारचं हे बंधन का नाही? असले प्रश्न पडू न देता बॉण्ड पूर्ण करायचा.. सुपर स्पेशालिस्ट व्हायचं असेल तर अजून एक entrance exam, आणि अजून तीन वर्षे, मग पुन्हा बॉण्ड, आणि वय पस्तीस वर्षे.. पण सध्यातरी आपण ते बाजूला ठेऊ..

स्पेशालिस्ट डॉक्टर झालात..! वा.. वा.. वा.. वय वर्षे 30-31 च्या आसपास, तेही तुम्ही पूर्ण curriculum सलग पास झालात आणि पहिल्याच attempt मध्ये तुमचा entrance ला नंबर लागत गेला तरच! असो..

मग आता कुठंतरी मोठ्या हॉस्पिटलला जॉईन व्हायचं? की स्वतःचं हॉस्पिटल टाकायचं? की लग्न करायचं? की सगळंच करायचं? ..काही कळत नाही.. आधीच लग्न केलं असेल अन बायको डॉक्टरच असेल तर ती अजून दुसरीकडेच PG करत असते, अन मुलाला तिसरीकडेच (बहुधा तिच्या आईवडिलांकडे) ठेवलेलं असतं.. काहीही सेव्हिंग नसते, आणि मोठा डॉक्टर झाल्यामुळे घरच्यांना तर वाटत असतं,  बघा आता हा भाराभर पैसे कमावणार बरं का..

मग लक्षात येतं की, हॉस्पिटलसाठीच्या जागेच्या किमती आपल्या आवाक्यातल्या नाहीत.. मोक्याच्या जागेवरच्या हॉस्पिटलसाठी भाडं देखील झेपेल की नाही शंका आहे..   हॉस्पिटल चालू करण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या.. हॉस्पिटलमध्ये लागणाऱ्या मशिनरींच्या किमती.. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या इतर सोयींच्या किमती.. हॉस्पिटल चालू झाल्यावर त्याची मॅनेजमेंट..  हाऊसमन, नर्सिंग स्टाफ, त्यांचे पगार, त्यांची भांडणं, त्यांच्या सुट्ट्या.. अटेंडन्ट, वार्डबॉय, गेटकीपर, सेक्युरिटी, फायर कंट्रोल, पोल्युशन कंट्रोल, बायोमेडिकल वेस्ट.. इ इ.. तुम्ही हॉस्पिटल नावाची एक ‘स्मॉल स्केल इंडस्ट्री’ चालवत असता, तेही मॅनेजमेंटचा कसलाही अनुभव नसताना..

पूर्वी दीड-दोन गुंठे जागेत देखील टुमदार दवाखाना चालू करता यायचा. दोनतीन हुशार सिस्टर्स आणि दोन सफाई कर्मचारी ठेवले तरी काम भागायचं.. पण आता मात्र तसं नाहीये.. असलं काही केलं तर बॉम्बे नर्सिंगची परमिशनच मिळत नाही.. NABH च्या नियमाप्रमाणे जर बांधायला गेलं तर दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी पाच गुंठ्याच्या आसपास जागा लागते,  GNM आणि ANM धरून चोवीस तासाच्या अकरा सिस्टर्स लागतात, एकतरी फुल टाइम OT असिस्टंट लागतो, सफाई/ कचरा विल्हेवाट यासाठी चोवीस तासाचे कमीतकमी सहा कर्मचारी लागतात. मॅनेजर, रिसेप्शनिस्ट आणि अकाऊंटंट लागतात आणि तुमच्याकडे MPJAY (योजना) असेल तर ते सांभाळणारा वेगळा व्यक्ती लागतो. ह्या सगळ्यांचे पगार सरकारी नियमांनुसार द्यावे लागतात, त्यांचा PF काढावा लागतो. स्टाफचे कामाचे तास, आठवड्याच्या सुट्टया, आजारपणाच्या सुट्टया, बाळंतपणाच्या सुट्टया याचा हिशोब ठेवावा लागतो. त्याचं ऑडिट करायला येणाऱ्यांना ‘व्यवस्थित’ सांभाळावं लागतं!  पालिकेतून विविध परवानग्या मिळविण्यासाठी हात सैल सोडावे लागतात.. (बरेच सैल सोडावे लागतात).. दरवर्षी किंवा ठराविक काळाने त्याचं नूतनीकरण करावं लागतं.. डाॅक्टरांसाठी सरकारी करात कोणतीही सवलत नाही, उपकरणं महाग, मशिनरींच्या किंमती लाखोंच्या घरात, सगळ्या mandatory मशीनरी घ्याव्याच् हे सरकारी नियमांचं बंधन..  तुमच्याकडे सोनोग्राफी मशीन असेल तर ‘तुम्ही गुन्हेगार नाहीये’ हे आधी सिद्ध करण्यासाठी अनेक फॉर्म आणि रजिस्टरे भरायची, तेही खाडाखोड न करता एकदम बिनचूक भरावी लागतात.. रजिस्टर मधली एक चूक तुम्हाला डायरेक्ट अटक करू शकते.. असो..

मग दुनियादारीचा सिलसिला सुरू होतो.. टिनपाट सरपंच/नगरसेवक खुश करावे लागतात, उपद्रवी गावगुंड ‘फ्री’ तपासावे लागतात.. ‘डॉक्टर पैसे पुढच्यावेळी देतो’ म्हणणाऱ्यांना शक्य तितक्या मधाळ आवाजात ‘चालेल चालेल’ म्हणावं लागतं.  उत्सवांच्या, जयंती-पुण्यतिथीच्या वर्गण्या गपगुमान द्याव्या लागतात.. वर बत्तीस दात दाखवत तुपाळ हसावंही लागतं..  निवडणुकीसाठी खंडणी (त्याला ‘मदत’ म्हणतात) द्यावी लागते.. दादा, भाऊ, भैया यांच्या एका फोनवर पेशंट्सची बिलं कमी करावी लागतात.. बिलं सेटलमेंट करणारा कोणीही सोम्यागोम्या आला तर त्याला शक्य तितक्या नम्र भाषेत आपण बिल अवाजवी लावलेलं नाहीये, यापेक्षाही जास्त बिल होऊ शकतं आणि याची कल्पना नातेवाईकांना आधीच दिली होती, वगैरे पोटतिडकीने सांगावं लागतं, आणि तरीसुद्धा ‘मी म्हणतोय म्हणून कमी करा की डॉक्टर’ असल्या धमकीवजा विनंतीला मान द्यावा लागतो.. 

तुम्ही म्हणाल, ‘व्यवसाय करायचा म्हटलं की एवढी मगजमारी तर करावीच लागणार की!, समाजात प्रत्येक व्यवसायात असं असतंच की!’  ..  ते खरंय, पण लहानपणापासून खाली मान घालून अभ्यास एके अभ्यास केलेल्या ह्या नवख्या डॉक्टर मुलांना जड जातं हे..  आणि ‘समाजसेवा करायचीये’ वगैरे दिव्य स्वप्नं उराशी घेऊन आलेल्यांना तर पहिला शॉक इथंच बसतो.. अन कितीही संवेदनशील राहायचं ठरवलं तरी ‘पैसा’ हीच या जगाची भाषा आहे, हे लवकरच कळून येतं..

माझ्या दहावी बारावीच्या काळात, बोर्डात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती मी रेडिओवर ऐकायचो. बहुतांश मुलामुलींचं “डॉक्टर व्हायचंय” हे ठरलेलं असायचं..  कारण आजूबाजूला दिसायचं की एकतर  डॉक्टरला समाजात इज्जत असते.. पैसाही चांगला मिळतो.. आणि job satisfaction असते आणि वरून व्यवसायातूनच समाजसेवा करण्याचे पुण्य देखील मिळते वगैरे वगैरे..

पण आता मात्र हे चित्र बदललंय..आणि, ते दिवसेंदिवस खूपच बदलतही चाललंय.. डॉक्टरचं आत्ता ना समाजातील स्थान अबाधित आहे, ना लोकांच्या मनातली इज्जत खात्रीशीर आहे, ना खोऱ्यानं मिळणारा पैसा आहे.. ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ खरंच का फक्त भाव महत्वाचा? –– डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

” हे बघा आई , मी बिझी आहे , उद्या मला मिटींग्स आहेत . एवढा काही वेळ नाही मला , मी कुमारिकेच्या घरी 

अथर्वबरोबर बांगड्या , फ्रॉक पाठवून देईल ” सायली म्हणाली .

“अगं संध्याकाळी बोलवू ना पण मग तिला . नीट पूजा करू , तुझ्या वेळेनुसार बोलवू ” सासूबाई म्हणाल्या .

“आई , अहो भाव महत्वाचा !  पूजा केली काय आणि नाही केली काय….संध्याकाळी कंटाळा येतो खूप ” सायलीने चप्पल घालता घालता म्हंटलं .

“सायली , दोन मिनिटं बोलू ? वेळ आहे आता ? ” 

कपाळावर आठ्या आणत सायलीने होकार दिला . सासूबाई म्हणाल्या , ” शिरीष तू पण ऐक रे . भावच सगळ्यात महत्वाचा ह्यात दुमत नाहीच. पण भाव भाव ह्या गोंडस नावाखाली आपण आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य विसरतोय असं नाही वाटत का तुला ? तू सून आहेस म्हणून नाही , शिरिषलासुद्धा मी हेच विचारते आहे . देवधर्म म्हणजे अंधश्रद्धा नाही, पण वेळेचा अपव्यय असं तुम्हाला वाटतं ना ? गणपतीत रोज रात्री वेगवेगळ्या स्पर्धा असतात तेव्हा उत्साहाने भाग घेता तुम्ही. पण गणपतीला दुर्वा तोडून आणा म्हंटलं की तुम्हाला वेळ नसतो, थकलेले असतात . घरच्या आरतीलाही चार वेळा या रे म्हणावं लागतं . कुठलाही उपास म्हंटलं की मला झेपत नाही , माझा विश्वास नाही असं म्हणून मोकळे होता, पण ते कोणतं किटो डाएट का काय त्याला तयार होता…” 

 सायली म्हणाली , ” आई , तुम्ही दोन वेगळ्या गोष्टी compare करताय “

” नाही , माझं ऐकून घे पूर्ण . अरे उपास तापास, देव धर्म म्हणजे स्वतःच्या मनाला, शरीराला लावून घेतलेलं बंधन. हे unproductive आहे असा तुम्ही गैरसमज करून घेतलाय. आहेत, बऱ्याच प्रथा अशाही आहेत की त्यात तथ्य नाही , मग त्या सोडून द्या किंवा थोड्या बदला. आता सायली तुला म्हंटलं आजेपाडव्याला तुझ्या बाबांचं श्राद्ध घाल, तू म्हणालीस भाव महत्वाचा. मी त्यांच्या नावाने दान देईन. अगं दे ना तू दान, पण त्यांच्या फोटोला हार घालून त्यांच्या आठवणीत त्यांच्या आवडीचे पदार्थ करशील, अथर्वला सांगशील आजोबांना नमस्कार कर, तुझ्या कळत नकळत त्यांच्या आठवणी त्याला सांगशील, तर त्यालाही कळेल की आईला घडवण्यासाठी त्या आजोबांनी कष्ट घेतलेत , त्यांचाही आदर करावा. पण तुम्हाला ‘भाव महत्वाचा’ ह्या पांघरुणाखाली लपत कामं करायचा कंटाळा असतो. उद्या अथर्व तुला, मला, शिरीषला कुमारिकेची पूजा करताना बघेल तर स्रियांबद्दलचा आदर त्याला वेगळा शिकवावा लागेल का ? गिफ्ट तर काय देतच असतो गं आपण तिला. परवाचंच घे, घरी भजन आहे म्हंटल्यावर तू नाक मुरडलं , वेळ नाही म्हणालीस. पण घरी परत आलीस तेव्हा आमचं भजन सुरू होतं त्यात रंगून गेलीस . फेरदेखील धरलास आमच्याबरोबर , हो की नाही ? ” सासूबाईंनी विचारलं .

” हो, हे मात्र खरं आई . इतकं प्रसन्न वाटलं त्या दिवशी आणि मी ठरवून टाकलं की दरवर्षी वेळ काढून भजनाला उपस्थित रहायचंच ! ” सायली म्हणाली .

” हो ना ? तू रे शिरीष, नाही सोवळं पण निदान आंघोळ करून आरती कर म्हंटलं की हेच– भाव महत्वाचा. अरे त्या निमित्ताने शरीराबरोबर मनाचीही शुद्धी होते, आंघोळ करून मनही प्रसन्न होतं आणि मग आरतीच काय कुठलंही काम करायला फ्रेश वाटतं. एरवी मित्रांची पार्टी असली की जागताच ना तुम्ही, मग गोंधळ घालायचा का विचारलं की आई, ‘भाव महत्वाचा’ , ‘देवी म्हणते का गोंधळ घाला’ म्हणून उडवून लावलं मला. अरे देव-देवी काहीच म्हणत नाही, हे सगळं आपल्या आनंदासाठी, आरोग्यासाठी आहे. एखादेवेळी नाही जमलं तर काहीच हरकत नाही. पण कालानुरूप बदल करून का होईना प्रथा जपा रे . हे बघ नेहेमीच मागची पिढी जेवढं करते तेवढं पुढची पिढी करतच नाही . मी देखील माझ्या सासूबाई करत होत्या तेवढं नाही करू शकले आणि सायली तू पण नाही माझ्याएवढं करणार हे मलाही मान्य आहे. तरीही सारासार विचार करून जे शक्य आहे ते ते करायला काय हरकत?  भाव महत्वाचा– पण कृती नसेल तर तो भाव निष्फळ होईल ना ? मी खूप बलवान आहे किंवा हुशार आहे हे सांगून होत नाही, त्यालाही काहीतरी कृतीची जोड द्यावीच लागते . हे सणवार मनाला वेसण घालायला शिकवतात. मनाचे डाएट म्हणा ना. ते किती जास्त प्रमाणात करायचं ते ज्याचं त्याने ठरवावं पण करावं असं मला वाटतं. असं म्हणजे असंच ह्या आपल्या कोषातून बाहेर पडून इतर गोष्टीतला आनंद दाखवतं . आपण आपली पाळंमुळं विसरून इतरांचं अनुकरण करतोय आणि ते आपल्या लक्षात येत नाहीये. भोंडला खेळायला आपल्याकडे वेळ नसतो, पण दांडिया खेळायला मात्र अगदी आवरून, मेकप करून आपण जातो. दांडिया खेळू नये असं नाही. पण आपलीही संस्कृती , परंपरा आपणच जपल्या, त्यासाठी खास वेळ काढला तर काय हरकत ? आणि अर्थातच ते करण्यासाठी भाव आणि कृती दोघांची सांगड घालणं महत्वाचं, तरच पुढची पिढीही ह्या परंपरा पुढे नेईल. तुम्ही जाणते आहात , काय खरं खोटं किंवा योग्य अयोग्य तुम्हाला चांगलंच कळतं ना? मग श्रद्धा, अंधश्रद्धा हेही तुम्हाला कळेलच की. जे चुकीचं वाटेल ते नका करू. सारखं ‘भाव महत्वाचा’ म्हणत विशेषतः धार्मिक कर्तव्यांपासून पळू नका . बाकी तुमची मर्जी…. उद्या असेन मी, नसेन मी …..” गुडघ्यावर हात टेकत सासूबाई आत गेल्या .

शिरीष आणि सायली स्तब्ध झाले होते. असे शिरीष सायली प्रत्येक घरात आहेत . पटत असलं तरी त्यांचा इगो आणि peer pressure आड येतं .

—— असो , माझा संस्कृती रक्षणाचा भाव तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून मी त्याला लेखन कृतीची जोड दिली , एवढंच !

लेखिका : डॉ शिल्पा जोशी क्षीरसागर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दुसरी आई….अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दुसरी आई….अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर  ☆

एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले:- 

“आपल्याला काय होईल, काय अपेक्षा आहे तुमची, मुलगा की मुलगी–तुम्हाला काय वाटतं ?”

त्यावर पती म्हणाला:- ” जर आपल्याला मुलगा झाला तर, मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणितं शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला, पळायला पण जाईन, पोहायला शिकवीन– अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन “

हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला:- “आणि मुलगी झाली तर?”

यावर पतीने खूप छान उत्तर दिले.! ” जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही “

पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले:-  “का असे का.?” 

पती म्हणाला, ” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे, आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. थोडक्यात जणू ती माझी ” दुसरी आई ” होऊन माझी काळजी घेईल. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन. एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तो ही आनंदाने समजून घेईल.”

पति पुढे म्हणाला.! ” तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे. माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले: ” म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल, आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:- “अगं तसं नव्हे गं, कदाचित हे सगळं माझा  मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं शिकावं लागेल. मुलींचं तसं नाही. मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात. एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल . “

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली, ” पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे.? “

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणला:- ” हो तू म्हणतीयेस ते खरंय, ती आपल्या सोबत नसेल. पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही, कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू, ” तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे !! अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण,  मुली ह्या परीसारख्या असतात. त्या जन्मभरासाठी आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !! !” 

खरोखर मुली ह्या परीसारख्याच असतात !

ज्यांना मुलगी आहे…  अशा माझ्या सर्व मित्रांना व मैत्रिणींना, बहिणींना व भावांना, समर्पित !!

लेखक : अज्ञात

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तक्रारपेटी… प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ तक्रारपेटी… प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

( सुखी व्हायचे असेल तर ! )

समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर जर तुमचा आनंद अवलंबून असेल तर तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही

आपलं सुख , आपला आनंद समोरचा व्यक्ती कसा वागतो यावर depend असणं हेच माणसाच्या दुःखाचं मूळ कारण असतं

त्यामुळे आपला आनंद दुसऱ्याच्या हातात देऊ नका !

आपल्या आनंदाची , सुखाची , समाधानाची सांगड ज्यांना स्वतःच्या कृतीशी निगडित ठेवता येते तीच माणसं थोड्या फार प्रमाणात खुश राहू शकतात !

 

किती दिवस झाले मला त्यांनी फोनच केला नाही , अरे मग तू फोन कर !

मी त्यांच्याकडे गेलो तर मला ते बोललेच नाहीत , अरे मग तू बोल !

त्यांनी मला फोटो काढतांना बोलावलंच नाही ,  मग तू त्यांना बोलव !

खरं सांगू का अशा तक्रार करण्याच्या स्वभावातून तात्काळ बाहेर पडा !

 

आयुष्य म्हणजे तक्रारपेटी नाही !

नियतीने आपल्याला जीवन हे जगण्यासाठी दिलेले आहे , तक्रार करत सुटण्यासाठी नाही !

हा माणूस किंवा ही बाई नेहमी कुणाची न कुणाची तक्रार करत राहते असा शिक्का जर तुमच्यावर बसला तर तुम्हाला कोणीही जवळ करणार नाही !

म्हणून सुखी व्हायचं असेल , आनंदी रहायचं असेल तर Complain box होऊ नका !

आपले विचार दुसऱ्यावर लादायचे नाहीत आणि दुसऱ्याचे विचार लादून घेऊन आपल्या मनाविरुद्ध वागायचं नाही हे साधं सूत्र ज्याला अंमलात आणता येतं तोच व्यक्ती आनंदी , हसतमुख राहू शकतो !

आनंद किंवा सुख ही काही वस्तू नाही , त्यामुळे आपण त्याची खरेदी करू शकत नाही !

जी गोष्ट बाजारात उपलब्धच नाही , त्या गोष्टीचा खरेदीविक्रीशी काही संबंधच नसतो !

 

याचाच अर्थ आनंद , सुख , समाधान , शांती या गोष्टींचा आणि आपण गरीब श्रीमंत असण्याचा काहीही संबंध नाही !

 

दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टीने disturb होऊन दुःखी होऊ नका !

 

एखाद्या वेळेस ऑफिस मधली तुमच्या हाताखालची माणसं तुमचं ऐकतील , कारण तुम्ही त्यांचे ” साहेब ” असता !

ऐकणाऱ्याचं भलं किंवा नुकसान करण्याची क्षमता तुमच्या हुद्याने तुम्हाला दिलेली असते , हे ही एक कारण असू शकते !

Where as घरातली माणसं तुमचं ऐकतीलच असं नाही , कारण घरी आपण एकमेकांचे नातेवाईक असतो , साहेब किंवा चपराशी नाही !

त्यामुळे घराचे ऑफिस आणि ऑफिसचे घर करण्याचा प्रयत्न करू नका !

जीवन खूप सोप्प आहे , जगणं खूप सुंदर आहे 

फक्त दुःखाचा पाढा वाचायचा नाही आणि सुखाचा पेढा नेहमी अपेक्षित करायचा नाही , एवढंच  !

 

लेखक : प्रा.विजय पोहनेरकर, औरंगाबाद

9420929389

संग्राहक – अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ भाड्याची सायकल… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

एक आणा तासवाली भाड्याची सायकल घेऊन, तिच्या दांड्यांच्या त्रिकोणाच्यामधून पलिकडच्या पॅडलवर पाय टाकून सायकल चालवतांना कितिदा पडलो असू त्याला काही गणतीच नाही. पडतांना शाळेच्या गणवेशाची खाकी अर्धी चड्डी चेनमध्ये अडकून किती वेळा टरकली होती, ते आता आठवतसुद्धा नाही. पण चड्डी वीतभर फाटल्याचं आईच्या लक्षात आलं की आपली हातभर फाटायची हे बरोब्बर लक्षांत आहे !! शिवाय सायकलीत अडकून वाकडं-तिकडं पडायला व्हायचं. त्या अष्टवक्रावस्थेतले सुरुवातीचे काही क्षण भ्रमिष्टावस्थेत जायचे. नेमकं काय घडलंय हेच कळत नसे. जरा भान आल्यावर आपल्या हातापायांवर खरचटलंय्, ओरखडे आलेत, डोकं आपटलंय् याचा सुगावा लागायचा !! चेनवर आणि तिच्या कांटेवाल्या चाकावर तेलाच्या बुदलीतून ओतलेल्या लिटरभर मशिन ऑइलचे रांगोळीछाप ठसे हातापायावर, कपड्यांवर उमटायचे. आणि खरंच सांगतो, त्या सगळ्याची गंमतच वाटायची आणि पडायची हौस वाढायची.

पुन्हा पुन्हा पडून सुद्धा त्या लहान वयातली सायकल शिकायची जिद्द, चिकाटी वाखाणण्यासारखी होती. पुढे पुढे टांग टाकून शिटेवर बसता यायला लागलं की दिग्विजयी आनंद व्हायचा. वेळेचं भान सुटायचं. दोन दोन तास सायकल चालवली हे भाड्याचे दोन आणे देतांना समजायचं. सुरुवातीला सायकल शिकवणारा शीट धरून मागेमागे धावत यायचा, त्याचा केवढा मोठा आधार वाटायचा. नंतर नंतर तो मधेमधे शीट सोडतो हे लक्षात यायचं आणि आपण आता आदळणार या भीतीने सायकल लटपटं लटपटं धावायला लागायची.

आणि एकदा सायकलवर प्रभुत्व मिळवलं की हात सोडून सायकल चालवणं, दांडीवर एक, शिटेवर एक आणि स्प्रिंगच्या चापामुळे बोचणार्‍या कॅरियरवर एक, असे तिब्बलशिटचे तीन तीन भिडू एकदम बसून, सर्कशीतले धाडसी प्रयोग करण्याचा आत्मविश्वास वाढीला लागायचा. त्या काळी बहुतेक सगळ्यांकडे हर्क्यूलसची सायकल असायची. काळ्या नाही तर हिरव्या रंगाची. ती विकत घेतांना तिच्यासोबत, धोतरवाल्यांसाठी धोतर पोटरीवर बांधून ठेवणार्‍या स्टेनलेस् स्टीलच्या नाही तर पितळेच्या क्लिपा मोफ़त मिळायच्या. काही तरी मोफत मिळतंय याचं आकर्षण तेव्हाही होतं ! त्या काळी, म्हणजेच १९५५-६० च्या दरम्यान , माझ्या अटकळीप्रमाणे सायकलची किंमत ३५/४० रुपयांच्या आसपास होती. सायकलला दरमहा आठ आणे – म्हणजे वर्षाचे सहा रुपये म्युनसिपाल्टीचा टॅक्स् होता. तो वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच महिन्यात भरावा लागायचा. त्याचा एक अल्युमिनियमचा बिल्ला मिळायचा. तो हॅंडलजवळच्या ब्रेकच्या ताड्यांना नटबोल्ट असायचे, त्यातल्या एका बोल्टवर फिक्स् केला जायचा. पोलिसांचं लक्ष बिल्ल्यावर असायचं. खरं म्हणजे पोलिस हे काही म्युन्सिपालटीचे नोकर नव्हेत. पण नसलेल्या बिल्ल्यात त्यांना संधी दिसायची. टॅक्स् भरायला उशीर झाला तर तीन रुपये दंड भरून तेवढ्याच पैशात – म्हणजे त्या तीन रुपयात बिल्ला मिळायचा. हे काय गणित होतं ते मला अद्यापही सुटलेलं नाही !! लोक टॅक्स् न भरता दंडच भरायचे ! त्यांना दंडात संधी दिसायची !!

संग्राहक – सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ अजूनही वेळ गेलेली नाही… लेखक – डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्यासमोर तिची गरोदर आई घरातील जिन्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. — या तीन वर्षांच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला, 

आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला—- ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती. तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजर झाली होती—–जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्येसुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 

संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोनकॉलमुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या—–

—–प्रश्न हा नाही की त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटरबरोबर बोलता कसे आले. तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असतो हे कसे समजले? ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?——- या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात…..!!!  

ब्रिटनमध्ये मूल तीन वर्षाचे झाले की त्याला शाळेत प्रवेश मिळतो. आई वडील दोन्ही नोकरीला असतील तर सहा तास रोज मूल शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात, ना ABCD शिकवतात, ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही, अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते—-  फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात, ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील. आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही, तर आपल्या रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, एलेक्टरिशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात, त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 

असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते. त्या बालमनांना त्यादिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आईवडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 

आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 

पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून ते अधिकाधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले—- यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेकॅनिकपासून, ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून, ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टरपर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 

“आम्ही कुठेय….? “ हा प्रश्न आम्हाला कधी पडतो का? 

मुलांवर ओझे अपेक्षांचे—- 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याची चर्चा करत राहिलोय —- पण या बालकांच्या मनावरील ओझ्याचे काय?—- फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाठाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? —-

याला पालकपण जबाबदार नाहीत का? 

माझ्या मुलाला शाळेत गेले की आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत. मुलांना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत. याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे, एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे— असा सगळा अट्टाहास का? 

ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहिरीत पोहले पाहिजे, रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत, त्या वयात इतरांच्या मुलांसारखे स्टेजवर नाचायला लावतोय, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंगमध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताच्या- इंग्लिशच्या क्लासला पण जबरदस्तीने बसवतोय —–

—–आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळ्या जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा– उद्या चित्रकलेचा– परवा कॉम्पुटरचा– असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत—– त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही ? सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 

मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाठाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय —– 

—-आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? हे दोनच विषय आयुष्यात सर्व काही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याच मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 

—-स्पर्धांची खरंच गरज आहे का ? 

—-मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?

—-गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो?—  तो आई वडिलांबरोबर, आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 

—-वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यापकांना त्याचे का टेन्शन येते? 

ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 

—-माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात इतर शाळांमधील मुलांच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 

याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 

शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 

एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोकांना विचारून खात्री करून घेतायत की खरंच आज गृहपाठ नाही ना.—- आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? —- खरंच  या बालमानांना एवढ्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 

माझे मूल सर्वच विषयात– सर्वच खेळात – सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास, आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा, दोन्ही या कोवळ्या बालमनांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ….. 

लेखक :  डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ,  मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print