? मनमंजुषेतून ?

तुम्हाला डॉक्टर व्हायचंय..?  – भाग – 2  लेखक – डॉ. सचिन लांडगे  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

(ही आताची 10वी 12वी ची मुलं डॉक्टर होऊन तब्बल 13 वर्षांनी जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा परिस्थिती आणखीच बदललेली असेल..) इथून पुढे —–

सगळ्या डॉक्टरांनी खोऱ्यानं पैसा ओढण्याचा जमाना गेलाय.. खोऱ्या घेऊन बसलेले फक्त पाच-दहा टक्के डॉक्टर उरलेत, आणि समाजाला तेवढेच दिसतात..  अलीकडं नवीन बाहेर पडलेल्या बहुतांश डॉक्टर्ससाठी खोऱ्या तर नाहीच आहे, उलट पेशंट्स मिळणं मुश्किल झालंय.. त्यात तुम्ही स्पेशालिस्ट / सुपर स्पेशालिस्ट असाल तर आणखी अवघड आहे.  पिताजींचा पैसा असेल तरच निभावून नेता येतं, नाहीतर मग कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन होण्याशिवाय पर्याय नाही.. 

सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सना तर कॉर्पोरेट हॉस्पिटलला जॉईन व्हावंच लागतं, कारण त्यांना लागणाऱ्या मशिनरीज ची कोटीतली इन्व्हेस्टमेंट ते सुरुवातीला करूच शकत नाहीत..  मग हेच कॉर्पोरेट हॉस्पिटल्स डॉक्टरांना नोकरीवर ठेऊन खोऱ्यानं ओढताहेत..  खोऱ्या आता तिकडे शिफ्ट झालाय, असं आपण म्हणू शकतो.. म्हणून तर बडे उद्योगपती आणि उद्योगसमूह आता हेल्थकेअर सेक्टर मध्ये उतरू लागलेत. फार्मा कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांची चलती सुरू आहे..  गेल्या दहा वर्षात हा बदल इतक्या झपाट्यानं झालाय की पुढच्या दहा वर्षात परिस्थिती काय असू शकते हे आपण इमॅजिनच नाही करू शकत !!

ह्या व्यवसायातून मिळणाऱ्या Job satisfaction चं गणित देखील बिघडलंय..  ‘डॉक्टर तुमच्या हातात आमचा पेशन्ट दिलाय, तुम्ही प्रयत्न करा, बाकीचं आमचं नशीब ‘ असं म्हणणारे नातेवाईक आता उरले नाहीत..  एखादी केस हँडल करत असताना तुम्हाला होणारा स्ट्रेस, आणि तो पेशन्ट बरा झाल्यावर तुम्हाला मिळणारं समाधान, याचं गुणोत्तर व्यस्त झालंय.  त्यातच  ‘ मग डॉक्टरनं काय फुकट केलं काय? ‘ अशा पद्धतीची सर्टिफिकेटस् तुमचा सगळा उत्साह पहिल्या एक दोन वर्षातच घालवतात..

आता, जरी वैद्यकीय तपासण्या आणि उपकरणं अद्ययावत झाली असली तरी प्रत्येक केसमधली “सोशल रिस्क” खूपच वाढलीये.. त्यामुळं कितीतरी डॉक्टर्सना कमी वयातच ब्लड प्रेशर , डायबेटीस, हृदयरोग, arthritis, spondylosis अशा आजारांचा सामना करावा लागतोय. Quality of life आणि सरासरी आयुर्मान घटतेय.. क्रिटिकल केअर मधल्या डॉक्टर्सचं morbidity आणि mortality चं प्रमाण तर लक्षणीयरित्या वाढलंय..  हे इमर्जन्सी हँडल करणारे डॉक्टर्स तर रोज खूप मानसिक थकतात.. किंवा मग लवकर त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, किंवा काही दिवसांनी क्रिटिकल पेशंट्स घेणे बंद करतात, किंवा खूप साऱ्या व्याधी स्वतःला घेऊन लवकर मरतात.. “प्रोफेशनल हझार्ड” आहे हा.. सर्वसामान्य लोकांना त्याची कल्पना येणं शक्यच नाही..  खूप प्रयत्न चालू असलेल्या पेशंटच्या साधं लॅब टेस्टस जरी आपल्या मनासारख्या आल्या नाहीत तरी मन बेचैन होतं..  बेडवर शांत झोपलेल्या पेशंटची दोन सेकंद पल्स जरी लागली नाही , तर अंगात जी भयाची वीज चमकून जाते त्याची काय किंमत पैशात होईल का? साईडरूम मध्ये गाढ झोपलेलं असतानाही मॉनिटरच्या अगदी छोट्याश्या अलार्मने पण जाग येते, आणि दिवसभरात जो थोडा थोडा “ऍड्रेनॅलीन सर्ज” होत राहतो, आणि शरीरावर विपरीत परिणाम करत राहतो, त्याची भरपाई पैशांत होऊच शकत नाही..

डॉक्टर स्त्रिया तर जास्तच भावनिक असतात. नवरा पण डॉक्टर असेल तर तो तिचे ताण समजू तरी शकतो, पण नॉनमेडीको व्यक्तीला तिचे ऑन-कॉल त्रास देतात, इमर्जन्सीज नकोसे वाटतात, मूड स्विंगज् टॉलरेट होत नाहीत.. हॉस्पिटल मधून एक फोन आला अन हिचा मूड एवढा का गेला, हे सांगितलं तरी कळू शकत नाही.. आपली जवळची नॉनमेडीको व्यक्तीच सर्वकाळ समजून घेऊ शकत नाही, तर मग परक्या समाजाकडून तर अपेक्षाच नाही..  

तुम्हाला वाटेल , ‘काय हा सगळं निगेटिव्हच बोलतोय’, पण बाहेरच्या अनेक देशांत देखील  मेडिकल फिल्ड हे least preferred क्षेत्र आहे.. युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई सगळीकडे MBBS करण्यापेक्षा इतर कोर्सेस निवडण्याला जास्त प्राधान्य आहे.. तरी तिथं डॉक्टरला मारहाण शिवीगाळ हा भाग अजिबातच नाहीये!.. पण जिथं ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ला खूपच जपलं जातं, तिथं हे असं अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचा अभ्यासक्रम शिकण्यात आयुष्याची बारा पंधरा वर्षे घालवायची, प्रत्येक पेशन्ट ट्रीट करताना अथवा ऑपरेशन करताना मरणाचा स्ट्रेस घ्यायचा, ऑन कॉल्स इमर्जन्सीज ह्यात स्वतःचं आयुष्य बेभरवशाचं करून घ्यायचं, कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाची वाताहत करायची, आणि personal happiness बाजूला ठेवून मन मारून जगायचं, हे असलं आयुष्य कोणाला आवडणार आहे बरं?  त्यामुळं बऱ्याच प्रगत देशातली मुलं MBBS घेतच नसल्यामुळं भारतातून डॉक्टर्स आणि नर्सेसना अशा ठिकाणी मागणी आहे..

असो..

हॉस्पिटलमधल्या दुःखमय आणि निगेटिव्ह वातावरणात दिवसभर वावरून देखील तिथल्या कुठल्याच स्ट्रेसचं प्रतिबिंब घरात पडू न देणं, आणि घरच्या प्रापंचिक गोष्टी हॉस्पिटलमध्ये येऊ न देणं यासाठी प्रत्येक डॉक्टर झगडत असतो… डॉक्टर हा सुद्धा एक माणूसच आहे.. एक बटन दाबलं आणि ‘मूड चेंज’ केला, असं होत नाही.. आणि ते सोपंही नाही.. मग ‘भावनिक फरफट’ होत राहते.. त्यामुळं हळव्या स्वभावाच्या माणसाचे तर अजूनच हाल होतात.. स्थितप्रज्ञता ही गोष्ट प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि ती प्रत्येकवेळी जमेल असंही नाही.. 

असो..

समाजात ‘रिस्की जॉब्ज’ बरेच आहेत, जसं की वैमानिक, सैनिक, फायर फायटर, वगैरे.. पण आता ते बऱ्यापैकी Predictable आणि safe आहेत, आणि समाजातही त्यांच्याबद्दल इज्जत आहे.. पण डॉक्टरच्या हातात कोणाच्यातरी जीवन-मरणाचा प्रश्न रोजच असतो.. एखाद्याचा जीव वाचवणे यासारखे ‘नोबल’ काम आणि त्यातून मिळणारा आनंद कुठलाच नाही.. पण कॉम्प्लिकेशन्स झाले तर मात्र तुमचं काही खरं नाही, अशी परिस्थिती असेल, तर यासारखं discouraging ही काही नाही.. तुम्हाला भयमुक्त वातावरणात काम करता येत नसेल, तर त्या job satisfaction ला ही काहीच अर्थ उरत नाही..  फुटबॉल मॅचमध्ये जसं गोलकीपरने किती गोल वाचवले ह्यापेक्षा त्या मॅचमध्ये किती गोल झाले हेच लक्षात राहतं, तसंच एखाद्या डॉक्टरच्या हातून किती लोक मरणाच्या दारातून बरे होऊन गेले यापेक्षा, दगवलेला एखादा रुग्ण डॉक्टरची आतापर्यंतची सगळी प्रॅक्टिस, मेहनत आणि नाव पाण्यात घालवू शकते.. आणि तेही, ज्या गोष्टी डॉक्टरच्या हातात नाहीत त्यासाठी!! 

कॉम्प्लिकेशन्स हे कधीही होऊ शकतात, बऱ्याचदा ते डॉक्टरच्याही हातात नसते. फारतर त्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे एवढंच ते करू शकतात.. याची समज हळूहळू कमी होत चालली आहे.. कितीही मेहनत घेऊन देखील रुग्णाला काही कमीजास्त झालं तर, डॉक्टरांना बोलणी ऐकून घ्यावी लागतात, बदनामी सहन करावी लागते, प्रसंगी तोडफोड आणि मारहाणीलाही सामोरं जावं लागतं.. आणि कुठल्याही डॉक्टरसाठी ते खूपच humiliating आहे.. असो..

एकीकडे हॉस्पिटल टाकण्यासाठी लागणारी प्रचंड इन्व्हेस्टमेंट, सरकारी परवानग्या व अटी, इन्श्युरन्स कंपन्यांचे Eligibility criteria, ग्राहक सुरक्षा कायद्याचा (CPA चा) जाच, हे असतानाच वर समाजात वाढत असलेली असुरक्षा, सरकारी अनास्था,  मारहाणीची किंवा बदनामीची सतत टांगती तलवार, रुग्णाच्या नातेवाईकांचा रोष, समाजाचा असंतोष, त्यात पुढाऱ्यांचा अन् गुंडांचा उपद्रव.. आणि वर हॉस्पिटलमधले वाढते ताणतणाव, यातून स्वतःच्या कौटुंबिक सुखाची वाताहत, अशा निराशाजनक वातावरणात आयुष्याची ऐन तारुण्यातली बारा पंधरा वर्षे होळी करून डॉक्टर नेमकं कशासाठी व्हायचंय? याचा विचार इथून पुढे MBBS ला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी नक्कीच करावा..  सध्याची परिस्थिती थोडीतरी बरी आहे, आणि अजूनही हे क्षेत्र डिमांड मध्ये आहे.. आणि आमच्या पिढीपर्यंत तरी आम्हाला नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून डॉक्टर असल्याचा ‘Proud’ वाटावा अशी परिस्थिती होती.. पण पंधरा वीस वर्षांनंतरचा काळ देखील असाच ‘Proud’ वाटावा असा असेल, की हे क्षेत्र फक्त कॉर्पोरेट जॉबसारखंच फक्त एक प्रोफेशन उरलेलं असेल, ते सांगता येत नाही.. टिकून राहण्यासाठीचा संघर्ष तर समाजात सगळ्यांनाच करावा लागतोय, मग तो शेतकरी असो की इंजिनिअर.. मला तेच म्हणायचंय की डॉक्टर झाल्यावर आपलं लाईफ सेट होईल, पैशांचा पाऊस वगैरे पडेल अशा विचारातून जर कोणी इकडं येणार असेल तर मात्र परिस्थिती आता पूर्वीइतकी गालिचामय उरलेली नाहीये..  बाहेरून कदाचित लक्षात नाही येणार, पण इथंही तुम्हाला संघर्ष अटळ आहे..

कोणीही एखादा जर Highly educated आणि Well qualified असून देखील एक सुखी समाधानी आयुष्य जगू शकणारच नसेल, तर त्याला, “हा एवढा अट्टाहास आपण कशासाठी केला?”, हा प्रश्न आयुष्याच्या शेवटी पडण्यापेक्षा सुरुवातीलाच त्याचा विचार केलेला बरा!

शेवटी एकच सांगतो, मुलं खूप संघर्ष करून डॉक्टर होतात खरं.. पण नंतर त्यांना कळतं की खरा संघर्ष तर डॉक्टर झाल्यावरच करावा लागतोय..

— समाप्त  —

लेखक : डॉ. सचिन लांडगे 

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments