मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ आपल्याला असं जगता येईल? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

ऑफीस सुटल्यावर घरी   निघालो , खूप भूक लागली होती. पण आई व बायको दोघींही घरी नव्हत्या म्हणून रस्त्यात पाणी पुरीची गाडी दिसली म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. पाणीपुरीवाल्याकडे गर्दी होती. गपचूप आपला नंबर येईपर्यंत वाट बघण्यापालिकडे काही हातात नव्हते. 

पाणीपुरीवालाच्या बाजूला एक आजोबा त्यांचा नंबर यायची वाट बघत उभे होते. पायात पांढरा शुभ्र पायजमा, वर हाफ शर्ट, चेहऱ्यावर निर्विकार भाव, आणि हसरा चेहरा, वय वर्ष साधारण ६५-७०.

आजोबा मस्त पाणीपुरी च्या पिशवीत हात घालून एक एक कोरडी पुरी तोडांत कोंबत होते.  माझा नंबर आला. पाणीपुरीवाल्यासमोर द्रोण हातात घेऊन उभा राहिलो. व एकामागोमाग एक पाच पाणीपुऱ्या खाल्ल्या. पोटातली आग जरा शांत झाली होती. आजोबांचा मात्र पुऱ्या खाण्याचा कार्यक्रम चालूच होता. पाणीपुरीवाला चांगलाच वैतागला होता.

“बाबूजी प्लेट देता हुँ। बराबरसे खाओ ना” आजोबांनी नुसतेच गालातल्या गालात हसून पुऱ्या खाणे चालूच ठेवले. 

एक प्लेट पाणीपुरी खाऊन माझे तोंड खवळले होते. म्हणून आजून एक पाणीपुरीची प्लेट सुरु केली.

आजोबा मात्र तल्लीन होऊन पिशवीमधल्या पुऱ्या मटकावत होते.

“ओ आजोबा नीट घेऊन खा की?” मी बोललो. आजोबा हू नाही की चू नाही. वाटले काहीतरी गडबड आहे. माझी दुसरी प्लेट संपत आली. आजोबा तिथेच उभे. 

तेवढ्यात  मागून एक माणूस स्कुटीवर  आला. 

“काळजी करू नकोस, बाबा सापडले!!” कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता. गळ्यात ऑफिस बॅग, पायात साधी चप्पल, चाळीशीतला असावा तो, आणि  त्याच्या चेहऱ्यावर त्याचे बाबा सापडल्याचा आनंद दिसत होता.!

त्याने गाडी बाजूला घेवून स्टँडला लावली. 

“काय बाबा आज पाणीपूरी का?         खायची का अजून???”

त्याने आजोबांना विचारले. आजोबांचे त्यावर काहीच उत्तर नाही. त्याने आजोबांना गाडीवर बसवले. व पाणीपुरीवाल्याला नम्रपणे विचारले की, आजोबांनी किती पुऱ्या खाल्ल्या आणि त्याचे पैसे देऊन टाकले. हे सगळे बघून मला नवलच वाटले. 

“हे आजोबा कोण आहेत तुमचे?” मी विचारले.

“वडील आहेत माझे.” त्याचे उत्तर.

“त्यांना काही त्रास आहे का?” माझा पुढचा प्रश्न.

“हो त्यांना अल्झायमर आहे.”

अत्यंत शांतपणे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यात कुठेही दुःख, ताण, त्रास नव्हता. अगदी सहजतेने तो बोलत होता. 

” मग हे आजोबा असे कुठेही जातात का?” 

” हो, आत्ताच बघा ना, पाच किलोमीटर  चालत आलेत.”

मी शॉकच झालो. 

“मग तुम्ही यांना शोधता कसे?”मी विचारले.

“आम्ही यांच्या खिशामध्ये कायम एक मोबाईल ठेवतो आणि त्यात एक GPS ट्रॅकर लावला आहे. त्याच्या साहाय्याने शोधतो ह्यांना  मी.”

“असे वारंवार होत असेल” मी आश्चर्याने विचारले. 

तो स्मितहास्य करून म्हणाला “महिन्याला एक दोन वेळेस”

“काळजी घ्याआजोबांची ! बाप रे काय हा वैताग” मी बोललो. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, “बाबाही मी लहानपणी खेळायला गेलो की मला शोधून आणायचे ,याञेत हरवलो तर शोध शोध शोधायचे. त्यात काय येवढं.”

त्याने त्याच्या वडिलांना व्यवस्थित गाडीवर बसविले आणि निघून गेला.              

खूप काही शिकण्यासारख होतं त्या माणसाकडून. इतका दुर्दम्य आजार वडिलांना असून सुद्धा किती शांत होता तो. बिलकुल चिडचिड नाही की  कुठल्याच प्रकारचा मनस्ताप नाही.

उतारवयात आपल्या वडिलांना लहान बाळाप्रमाणे सांभाळणाऱ्या त्या माणसाला मनोमन सलाम ठोकून मी पुढे निघालो…                 

खरंच आपल्यालाही जगता येईल का हो असं.!!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चीssssssssअsssssर्सssss-…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “चीsssssssssssssर्सssss…”🍾 ☆ श्री सुनील देशपांडे

तो म्हणाला 

“हे बरोबर नाही नववर्षाचं स्वागत करायचं नाही

आपलं वर्ष गुडीपाडव्याचं “त्यां”चं अनुकरण करायचं नाही”

मी म्हणालो

“ आजची तारीख काय?”

“३१ डिसेंबर”

“आजची तिथी काय?’

“माहीत नाही”

“मग आपलं नक्की काय?”

मला रोजची तारीख माहिती

माझं सगळं नियोजन तारखेवर

म्हणून माझं नववर्षही तारखेवर.

मग पाडवा? 

तो ही माझा आहेच.

मी आनंदाचा प्रवासी,

जिथे आनंद तिथं मी.

शादी कीसीकी हो, अपना दिल गाता है.

ही माझी वृत्ती, हा माझा पिंड.

खरं तर प्रत्येक सकाळ ही,

एका नववर्षाची सुरुवात असते.

सवेरेका सूरज हमारे लिये है,

असं म्हणणारा कलंदर मी.

पण रोज साजरा करायला

जमतंय कुठं? जमलं तर ते ही करावं.

कुणाच्याही आनंदात आपला आनंद शोधावा.

आनंदाला ना जात ना धर्म ना देश.

म्हणूनच,

आनंदाचे डोही आनंद तरंग…

असं म्हणत मित्रांनो साजरा करूया

निखळ आनंद, 

मग तो कुणाचा का असेना,

आणि कधीही का असेना !!!

तर चीssssssssअsssssर्सssss

हॅप्पी    न्यू    इयर !!!!!

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ जनाबाई… ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सकाळी साडेसहाची वेळ .

शांत वातावरणात गाण्याचे सूर कानावर पडले.

 

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा……….

कुणीतरी रेडिओ लावलेला असावा. इतक्या सकाळी कधी आवाज ऐकू आला नसल्याने तिकडे लक्ष गेले.

हळूहळू आवाज बंद झाला.

 

दुसरी दिवशी पण

 सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले… ऐकू आले

तिसऱ्या दिवशी फिरायला निघाले तेव्हा आवाज कुठून येतो ते समजले.

 

 एक पंचावन्न.. साठ वर्षाच्या बाई रस्ता झाडत होत्या.

 त्यांनी मोबाईलवर गाणी लावली होती. 

आपल्याच तंद्रीत त्या गाणी ऐकत काम करत होत्या.

 

“ ताई तुम्ही नवीन आलात का? “

“ हो बदलीवर आले आहे आठ दिवसाच्या.. माझी मैत्रिण इथं काम करायची तिला बरं नाही म्हणून मी येत आहे. “

 

“ असं का? तरीच आधी कधी तुम्हाला पाहिलं नव्हतं. नीट झाडलं जातंय ना? “

 “ हो हो त्याचं काही नाही देवाची गाणी ऐकू आली म्हणून विचारलं.”

 

“ अहो मुलीनी मोबाईल मध्ये गाणी  भरून दिली आहेत. कसं लावायचं ते शिकवलं आहे 

 विठुरायाची गाणी ऐकतं.. काम कधी होतंय समजतच नाही बघा …..आणि शीण पण वाटत नाही……”

“ भजनाला जाता का?”

“ कुठलं  हो…..मला खूप आवड आहे पण वेळच भेटत नाही बघा…माझी आई गाणी  म्हणायची..

 आता आमच्या घराजवळ विठ्ठलाचे देऊळ आहे तिथे ही गाणी लावतात ..”

 

“ हो का? तुमच्या लेकीला गाण्याचे हे चांगल  सुचलं….” त्या हसल्या आणि कामाला लागल्या..

मला जनाबाईचा अभंग आठवला

 

झाड लोट करी जनी

केरभरी चक्रपाणी 

पाटी घेऊन या शिरी

नेऊन  टाकी दूरी 

ऐसा भक्तिसी  भुलला

नीच कामे करू लागला 

जनी म्हणे विठोबाला

काय उतराई होऊ तुला

 

विठुराया तु जनीला मदत करत होतास हे तिच्या अभंगातून आम्हाला माहित आहे.

पण खरं सांगू इतकी वर्ष लोटली तरी आजही तू भक्तांच्या  तनामनात आहेसच…

नाम रूपानी…

 

तुझे अभंग आजही मनाला उभारी देत आहेत. 

संकटात साथ देत आहेत. काम करताना भक्तांना कष्ट  जाणवत नाहीत …

तुझ्यावर अलोट प्रेम करणारी जनी आज मला दिसली रे या ताईंमध्ये….

 

खरंच  ….विठुराया जनीची कामे निश्चितच करत असेल..

 

असं होतच असेल…. 

फक्त श्रद्धा आणि दृढ विश्वास हवा ….. जनी इतका…

मग तो येतोच मदतीला…  सगळं सोपं करतो .नीट लक्ष दिल की ध्यानात येते की प्रत्यक्ष जगतानाही अशीच आपल्याला पण पांडुरंगाची साथ असते … त्याची रूपे वेगवेगळी असतात. ती एकदा दिसायला लागली की मग सगळीकडेच तो दिसतो….

….. आता ठरवलं आहे सवयच करून घ्यायची रोजच्या जगण्यात त्याला बघायची…

…. मग  तो विठुराया  दिसेल….. पंढरपूरला न जाता पण…… आपल्या आसपास…

…. आज  कशी मला जनी भेटली तसाच….

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ओंजळीत येईल तितके… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

म्हणता म्हणता चोरपावलांनी २०२३ सरत चालले. काहींची ओंजळ सुखाने भरली तर काहींच्या ओंजळीत कडू गोड अनुभव आले. बघा ना, जेव्हा आपण घर बदलतो त्या वेळी नवीन घरात जाण्याची आतुरता तर असतेच पण जुन्या घरात घालवलेल्या आठवणी त्या वेळेस आठवल्या शिवाय राहत नाही. कारण, त्या घराचा कानाकोपरा आपल्याशी संवाद साधत असतो. तसेच, जेव्हा वर्ष बदलते तेव्हा गत वर्षाच्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात.

व.पुं.नी एक सुरेल विचार मांडला आहे, ” आठवणींचे रम्य नजराणे देण्याचं सामर्थ्य हे भूतकाळातच असते..” शेवटी भुतकाळ म्हणजे काय तर, अनेक अनुभव, आठवणी यांचं कोलाज. असं म्हणतात, पुढे जाण्यासाठी मागे काहीतरी सोडायला लागणं म्हणजेच आयुष्य. वर्ष कोणतेही असो, एक गोष्ट ते प्रत्येकाला शिकवते, ते म्हणजे आपले कोण, परके कोण, ज्यांना आपण आपले समजतो ते कठीण काळात आपल्यासाठी धावून येतात की नाही? एखाद्या नवीन व्यक्तीच्या येण्यामुळे जसे आयुष्य बदलते तसंच काहींच्या आयुष्यातून अचानक निघून जाण्यामुळे तेच आयुष्य आता त्या व्यक्तीशिवाय कसे जगायचे असा प्रश्न पडतो.

नवीन वर्षात आपण अनेक संकल्प करतो, पण काही अडचणींमुळे ते पुर्णत्वास जात नाही, विशेष करून स्त्रियांसाठी. कारण, घरची जबाबदारी, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींमुळे त्या तशाच राहतात. वर्ष बदलले तरी व्यथा संपत नाहीत. मनातली घुसमट व्यक्त करण्यासाठी आपल्याच माणसांची गरज लागते. कारण, पुन्हा व.पु. म्हणतात तसं, ” समजूत घालणारं कुणी भेटलं की हुंदके अधिक वाढतात..” मला असे वाटते, वर्ष कधीच खराब नसते तर त्या वर्षात आपल्याला असे अनुभव मिळतात जे आपण या आधी कधी घेतलेले नाही. म्हणून तर सुखाच्या पाठोपाठ दुःख असतेच.

असो, सुर्याला देखील पुन्हा उगवण्यासाठी मावळावं लागतच, तसंच नवीन संकल्प करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होऊ या.. गुरू ठाकूर यांच्या दोन ओळी फारच सुंदर आहेत,

“आयुष्य वाहते म्हणूनी बेचैन उगा का व्हावे

ओंजळीत येईल तितके आपले धरुनी चालावे…”

लेखक : अज्ञात

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण -…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “३० डिसेंबर : मंगेश पाडगावकर पुण्यस्मरण …” ☆ श्री सुनील देशपांडे

आमचं तारुण्य ज्यांच्या कवितांवर पोसलं गेलं त्यापैकी एक म्हणजे मंगेश पाडगावकर !

आज त्यांची पुण्यतिथी 

त्यानिमित्त त्यांची आठवण येतेच. परंतु माझा एक कवी मित्र दुर्दैवाने जो आज हयात नाही, किशोर पाठक! त्याचीही प्रकर्षाने आज आठवण येते. आम्ही दोघांनी काही नाशिकच्या प्रतिथयश कलावंतांना बरोबर घेऊन एक पाडगावकर स्मृती कार्यक्रम पूर्वी केला होता. त्याचप्रमाणे जनस्थान कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ही सादर केला होता. रसिकांनी त्याचे खूप स्वागत केले होते. परंतु त्यानंतर मी अवयवदानाच्या सामाजिक कार्यामध्ये  गुंतून गेलो आणि दुर्दैवाने किशोर हळूच एक्झिट घेऊन निघून गेला आणि हृदयात येऊन बसला.

आज दोघांच्याही तीव्र स्मृति एकवटून येतात आणि पाडगावकरांच्या  कविता आज अपरिहार्यपणे आठवत राहतात. 

पाडगावकरांची कविता आपल्या दैनंदिन आयुष्याला सरळ जाऊन भिडते म्हणून ती आपलीच वाटते आणि आपल्याला आवडते. आपल्या आयुष्यात समोर  रोज घडत असलेल्या घटनांचा धांडोळा  ‘मी गातोय’ या कवितेत खूप अनोख्या पद्धतीने पाडगावकरांनी घेतला आहे.  

आपलं गाणं या कवितेत पाडगावकरांनी जीवन जगण्याचा गुरुमंत्र दिला आहे, तर ‘जमा-खर्च स्वातंत्र्याचा’ ही कविता कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेली परंतु दुर्दैवाने आजही परिस्थिती बदललेली नाही. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे राजकारणी आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सत्ता आपण सहन केल्या आणि राजकारण्यांनी उपभोगल्या. परंतु आज काय हा प्रश्न आणि उद्या काय हा प्रश्न आपल्याला सतावत आहेच. 

परिस्थितीची भयानकता दर्शवणारी ही ‘मोरूची कविता’ मला खूप वैशिष्ट्यपूर्ण वाटते. रोजच्या घटना आणि प्रसंग पण त्यातील भय अधोरेखित करून आपल्याला सतत जाणवत राहते की ‘भय इथले संपत नाही’  खरंच ते संपेल का ? तो सुदिन कधी उगवेल?

या कवितेच्या भयगंडाला पुढे नेऊन अधोरेखित करणारी आणखी एक माणसांची भययुक्त कविता :माणसांसाठीच…..’

असं असलं तरी आयुष्य जगण्याचे थांबवता तर येत नाही ? या सर्व वातावरणात आनंदाने जगण्याचा मूलमंत्र सांगणारी  म्हातारपण ची कविता अफलातूनच. ती  त्यांच्या स्मृतीनिमित्त सादर ….

म्हातारपणावरचं तरुण गाणं— पाडगावकरांची अप्रतीम लेखणी

“येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

हिरवं पान

कधीतरी पिकणारच,

पिकलं पान

कधीतरी गळणारच,

गळलं पान

मातीला हे मिळणारच. 

झाड कधी कण्हतं का?

कधी काही म्हणतं का?

गिरक्या गिरक्या घेत घेत

नाचत जातं पिकलं पान,

कविता पिवळी पिवळी धमक

वाचत जातं पिकलं पान!

नेतं म्हटलं की नेऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारप

बोरकर एकदा म्हणाले

सिगारेटचा सोडीत धूर 

“सत्तर संपली तरी माझ्या

गळ्यात तरुणताजा सूर!

तीन मजले चढून आलो

असा दम अजून श्वासात

– ओत थोडी व्हिस्की ग्लासात!”

कवितांतून

रंग रंग झरू लागले

प्रत्येक क्षण

आनंदाने भरू लागले!

घेरतं म्हटलं की घेरू लागतं म्हातारपण,

धरतं म्हटलं की धरू लागतं म्हातारपण!

पांढऱ्या शुभ्र केसांचा एक माणूस

पांढऱ्या शुभ्र केसांच्या बायकोसोबत

उभा होता किती वेळ,

रंगून जाऊन बघत होता

बागेमधल्या मुलांचा मजेत खेळ!

रस्त्यावरच उभं राहून दोघांनी

मग खाल्ली जोडीने मस्त भेळ!

मिटक्यांच्या लयीत त्यांचं भेळ खाणं,

जीभ झाली आंबटतिखटगोड गाणं!

खातं म्हटलं की खाऊ लागतं म्हातारपण,

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण! 

आयुष्य हे रंगून जगणं खरं नव्हे?

नीतीमत्ता जपण्यासाठी बरं नव्हे?

अध्यात्माचा हातात ग्रंथ जाडा घ्यावा?

थोडा थोडा रोज कडू काढा प्यावा?

तुम्ही काय घ्यायचं

ते तुम्ही ठरवा,

तुम्ही काय प्यायचं

ते तुम्ही ठरवा!

त्याआधी एवढंच तुमच्या कानात सांगतो:

वय तुमचं साठ असो, सत्तर असो,

तिच्यासाठी फुलांची आणा वेणी;

मोरासारखा अंधार फुलून आल्यावर

मजा आणते थोडीशी काजूफेणी!

तरुण असलो की तरुण असतं म्हातारपण,

रडत बसलो की करुण असतं म्हातारपण!

येतं म्हटलं की येऊ लागतं म्हातारपण,

घेतं म्हटलं की घेऊ लागतं म्हातारपण!

 

आणि आता शेवटी या कवीची स्मृति कायम जागती ठेवणारी पाडगावकरी धाटणीची, त्याच थाटाने आणि नेटाने लिहिलेली माझी कविता  रसिकार्पण.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा

 

डोळे भरत त्यांची आठवण

आपण आज काढतोच ना?

दोन कविता आठवून आठवून

त्यांच्यासाठी म्हणतोच ना ?

डोळे गाळत बसायचं की कविता म्हणत बसायचं

तुम्हीच ठरवा

 

सरत्या वर्षाच्या काळोखात 

अंधार गडद होत असतो

नव्या वर्षाच्या प्रकाशात

त्यांचं काव्य उजळत असतं

अंधारात गडप व्हायचं की काव्यानंदात उजळायचं

तुम्हीच ठरवा

 

पाडगांवकर हयात नाहीत

असंही म्हणता येतं

पाडगांवकर मनात आहेत

असं सुद्धा म्हणता येतं

हयात नाहीत म्हणायचं की मनात आहेत म्हणायचं

तुम्हीच ठरवा.

 

सांगा कसं जगायचं

ते नाहीत म्हणत की त्यांची कविता म्हणत

तुम्हीच ठरवा. 

 

———- श्रद्धापूर्वक  — सुनील देशपांडे.

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ दत्ततत्व आणि मी… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

माझी दत्तोपासना

आपण एखाद्या दैवताची उपासना का करतो याचं कारण प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. पण दत्तगुरूंच्या बाबतीत मला जाणवलेली एक गोष्ट आज दत्त जयंतीच्या निमित्ताने इथे सांगावीशी वाटते. अर्थात प्रत्येकाची  यामागची भूमिका वेगळी असू शकेल आणि तिचे स्वागत आहे. पण मला भावलेलं हे दत्ततत्व या प्रकारचं आहे. 

दत्तगुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं एकत्रित सात्विक रूप. आणि ही तिन्ही दैवतं म्हणजे उत्पत्ति, स्थिती(जतन) आणि विलय या तिन्हीचं प्रतीक.

हे प्रतीक… म्हणजे ह्या तीन अवस्था आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतात. 

आपल्या शरीराची निर्मिती होते, मग आपण त्याचं पालनपोषण करतो आणि नंतर ते शरीर विलीनही होतं. पृथ्वीवरील कुठल्याही सजीव अथवा निर्जीव गोष्टीलादेखील या तीन अवस्थांमधून जावंच लागतं. हे झालं शारीरिक, भौतिक पातळीवर.

विचारांच्या बाबतीतसुद्धा हाच क्रम लागू होतो. बुद्धीने विचार निर्माण होतात. ते आपल्या मनात स्थिरावतात. आणि कालांतराने विशिष्ट कृती करून किंवा न करताही आपोआप नाहीसे होतात, किंवा त्यांचं दुसऱ्या विचारांमध्ये रूपांतर होतं…..  पण विचारांच्या बाबतीत आणखी काही घडतं. एखादा विचार आपल्या मनात निर्माण झाला आणि तो जर चांगला, सद्विचार असेल तर आपली स्थितीही चांगली राहते. आपण त्या विचाराला धरून ठेवल्यावर आपली प्रगतीच होते. आणि आपला तो विचार नष्ट झाला तर सद्विचारांच्या अभावामुळे लवकरच सगळ्याचा नाशही होतो. 

कोणत्याही प्रतिभावान/ कलाकार माणसाचा तर दत्ततत्वाशी अत्यंत जवळचा संबंध आहे. 

त्याच्या मनात कल्पनेची, विचारांची निर्मिती होते. ती धरून ठेवल्यावर उत्तम कलाकृती साकार होते आणि जर ती कल्पना धरून ठेवली नाही तर ती निघून जाते. म्हणजे काहीच घडत नाही. इथं घडण्याची शक्यता असतानासुद्धा काही न घडणं म्हणजेही एक प्रकारे विलयच. किंवा विचारांपासून स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे त्या कलाकृतीचा एक प्रकारे विलयच.

त्यामुळे हे असं दत्ततत्त्व आपला रोजच्या जगण्यात आपण हरेक वेळी अनुभवतो. म्हणून दत्तगुरूंची उपासना सर्वसामान्य माणूस म्हणून मला जास्त जवळची वाटते. 

निर्मिती कशी असली पाहिजे , दृढता, स्थिरता कशी असली पाहिजे आणि योग्य वेळ येताक्षणीच त्या निर्मितीपासून स्वतःला अलिप्त कसे ठेवता यायला पाहिजे…… कारण कधी कधी विलय हासुद्धा नवनिर्मितीसाठी प्रेरणा देणारा असतो. म्हणून तोही महत्त्वाचा. हे सगळं सहजतेने, सरळ सोप्या पद्धतीने आणि सगुण रूपातून सांगणाऱ्या दत्तगुरूंचे महत्त्व, त्यांची उपासना, ही माझ्यासाठी महत्त्वाची…

या दत्ततत्वाचं कायम स्मरण रहावं ही दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना !!! 

तुम्ही एखाद्या दैवताची उपासना करत असाल तर त्यामागे तुमची स्वतःची अशी काय भूमिका आहे ती या निमित्ताने जाणून घेणं मला आवडेल. 

||श्री गुरुदेव दत्त||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे गाव आहे, तेथे देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर राहत होते. नऊ जणांचे कुटुंब चालवणे त्यांना अतिशय अवघड जात होते. मी त्यांचा मुलगा म्हणजे काशिनाथ देवराम महाजन. माझे  प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. हुशार मुलगा म्हणून शाळेत व घरी माझे कौतुक व्हायचे. 

इयत्ता चौथीत असतांना शासकिय विद्यानिकेतन साठी स्पर्धा परीक्षा नव्यानेच सुरू झाली होती. ह्या परीक्षेचे वैशिष्ट्य असे कि त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी सहा-सात जिल्ह्यातून फक्त तीसच मुलांची निवड केली जात असे . त्यांना शासकीय विद्यानिकेतनात प्रवेश मिळायचा. अशी विद्यानिकेतने महाराष्ट्रात फक्त चारच होती. माझा जळगाव जिल्हा तत्कालीन मुंबई विभागात असल्याने या विभागासाठी नाशिक येथे शासकीय विद्यानिकेतन होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने मला नाशिकच्या विद्यानिकेतनात प्रवेश मिळाला. शाळेतील शिक्षण, निवास, भोजन उच्च प्रतीचे होते. कला ,क्रीडा, संगीत व विविध छंद आत्मसात करण्यास येथे वाव होता. 

शासकीय विद्यानिकेतनात आपल्या मुलाला प्रवेश मिळाला याबद्दल देवराम महाजन यांना फारच आनंद झाला होता.गावात व आजूबाजूच्या परिसरात माझा व वडिलांचा सत्कार करण्यात आला होता. 

मी नव्या शाळेत खूपच उत्साहाने अभ्यास करू लागलो. मला इयत्ता सहावीत असतांनाच पहिली कविता सुचली. तिच्या २ओळी प्रस्तुत करत आहे.

त्रिवार वंदन माझे, मधुकरराव चौधरींना

दगडांमधले रत्न शोधले ,त्या रत्नपारखींना

ती वाचून शाळेतील अध्यापकांना व प्राचार्यांना खूपच आनंद झाला. 

नियतीला मात्र माझे वैभव पाहवले नाही. माझी नजर हळूहळू कमी होऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी मला लिहिणे वाचणे अशक्य झाले. तरीही प्राचार्यांनी माझे नाव शाळेतून कमी केले नाही. मुलांनी व अध्यापकांनी मला सहकार्य करावे असे त्यांनी सुचवले. वाचक व लेखनिकाच्या मदतीने माझे शिक्षण सुरू राहीले. 

माझे वडील मात्र मुलगा अंध झाल्यामुळे फारच खचून गेले. त्यातच ते जिथे काम करत होते ती मील बंद पडली. कमाईचे काहीच साधन राहीले नाही. त्यांच्या जीवाची खूपच घालमेल झाली. मी नववीत असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संसार उघडा पडला. तरी आईने धीर सोडला नाही. शेतमजुरी करून ती कसेबसे दोन घास मुलांच्या मुखी घालू लागली. 

मी अंध झालो तरीही कविता करणे सोडले नाही. जो निसर्ग मनात साठला होता त्या आधारे निसर्ग कविता करणे सुरूच होते. त्याबरोबरच देशभक्तिपर, वैचारिक व सामाजिक कविताही करू लागलो. शाळेतील साप्ताहिकात व वार्षिक विशेष अंकात माझ्या कवितांना मानाचे पान मिळू लागले. मी मनाशी ठरवले कि –

जीवनात आला अंधार

तरी सोडणार नाही निर्धार

कविताच देतील मला आधार

आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार 

अध्यापक आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच प्राचार्यांच्या माझ्यावरील कृपादृष्टी मुळे माझे अंधत्व मला फारसे त्रासदायक वाटले नाही. अभ्यास उत्तरोत्तर उत्तम होत गेला. त्यामुळेच तत्कालीन अकरावी म्हणजेच मॅट्रिक च्या परिक्षेत मला नेत्रदीपक यश मिळाले. २४ जून १९७३च्या ‘साप्ताहिक गावकरी’ या नाशिकच्या वर्तमानपत्रात ‘अधुरी ही कहाणी’ या शीर्षकाखाली माझ्या विषयी प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. 

शासकीय विद्यानिकेतनाची सुविधा ११ वी पर्यंतच असल्याने मला गावी परत यावे लागले. 

दुर्दैवाची गोष्ट अशी कि ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. शेते ओसाड पडली होती. भारतातील अन्नसाठा संपला होता. अमेरिकेतून निकृष्ठ प्रकारची लाल ज्वारी आणि मका आयात करण्यात आला होता. जनतेच्या पोटाची जेमतेम व्यवस्था झाली होती. रोजगारासाठी पाझर तलावांचे खोदकाम सरकारने सुरू केले होते. 

मी अंध असूनही आईबरोबर पाझर तलावाच्या कामांना जात असे. मजूरी फक्त आठ आणे मिळायची. अनेकदा ठेच लागून पडायचो ;पण तसाच उठायचो . 

मला पुढे शिकायचे होते. गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या चाळीसगाव कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी मी धडपड सुरू केली. या कामात माझ्या काकांनी मला मदत केली. आजपावेतो त्या कॉलेजात कुणीही अंध शिकला नव्हता. अनेकदा विनंत्या करूनही तिथे प्रवेश मिळत नव्हता. मी मात्र प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर प्रवेश मिळाला. कॉलेजला जाण्यासाठी गाडी भाडे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी रोज ८ किलोमीटर पायीच जाऊ लागलो. दरम्यानच्या काळात चाळीसगावच्या अंध शाळेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यामुळे मला कॉलेजच्या नोट्स काढता येऊ लागल्या. खूप अभ्यास करू लागलो. १९७७ साली राज्यशास्त्र विषयात बी.ए . उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्या काळात अंधांना नोकरी मिळणे अवघड होते. मला कळले की पुण्याला अंधांसाठी एक शेल्टर वर्कशॉप आहे, तेथे अंध लोक खुर्च्या विणतात, खडू तयार करतात, ;त्यासाठी तेथे प्रशिक्षणाची सोय आहे, भोजन व निवास मोफत आहे, शिक्षणाची अट नाही. मी बी ए उत्तीर्ण असूनसुद्धा त्या वर्कशॉप मध्ये प्रवेश घेतला. 

१९७८ साली महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंधांसाठी एक योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातून दरवर्षी एका पदवीधर अंधास अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीने प्रवेश मिळणार होता. त्यावेळेस भारतात फक्त चारच प्रशिक्षण केंद्रे होती. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तीन राज्यांसाठी मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र होते. १९७८ साली अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. या प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या शुभहस्ते मला ‘ मृणालिनी पिंगळे अॅवॉर्ड’ देण्यात आले. 

१९७९ साली शासकीय बहुउद्देशीय संमिश्र केंद्र सोलापूर येथे माझी विशेष शिक्षक पदावर नियुक्ती झाली. माझे काव्यलेखन अखंड चालूच होते. अनेक ब्रेल व डोळस वर्तमानपत्रे, मासिके यातून माझ्या कविता प्रकाशित होत होत्या. त्या शाळेतील  अंध मूकबधिर व अपंग मुलांना पाहून माझ्या मनात आले कि यांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करावे. त्यासाठी छान छान गाणी रचावी. त्यांना सहज सोपी चाल लावावी. मुलांना माझी गाणी आवडली. 

‘नाते प्रगतीशी’ या माझ्या कवितेने सोलापूरमध्ये क्रांती घडवली.तिच्या दोन ओळी प्रस्तुत करत आहे.

विज्ञानाची संगत आम्हा, हेलन केलर पाठीशी

मनामनाला पटवून देऊ,नाते आमचे प्रगतीशी

अनेकवर्तमानपत्रांनी या कविते विषयी लेख लिहिले.सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी या कवितेचे कौतुक केले. १९८१ हे साल जागतिक अपंग वर्ष म्हणून जाहीर झाले होते. गायकवाड साहेबांनी त्यानिमित्त अनेक उपक्रमात मला सहभागी करून घेतले होते. तत्कालीन शिक्षक आमदार प्रकाश एलगुलवार यांनी माझ्या सहकार्याने सोलापूर येथे राष्ट्रीय अंधजन मंडळाची जिल्हा शाखा स्थापन करून माझी नियुक्ती सरचिटणीस पदावर केली. 

अंध व्यक्तीचा विवाह होणे हे त्या काळात जवळजवळ अशक्य होते. अंधही  शासकीय नोकरी करतो हे कुणीही मान्य करत नव्हते. फार खटपट केल्यानंतर मामाच्या मुलीशी माझा विवाह झाला. 

 – क्रमशः भाग पहिला

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ दोन धागे रामासाठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

“मुखी रामनाम गाऊ, मुखी रामनाम!” हे ऐकतच लहानाची मोठी झाले .गोंदवलेकर महाराजांनी रामनामाची उपासना सांगितली होती, ती आमच्या घरात चालू होतीच.. त्यामुळे घरातील वातावरणाचा मनावर प्रभाव असल्याने ‘जेथे राम, तेथे नाम’ अशी श्रद्धायुक्त भावनेने उपासना चालू आहे.

सध्या अवघ्या पुण्याला या रामवस्त्राने ऊब पांघरली आहे  असे म्हणायला हरकत नाही! डेक्कन जिमखान्यावरील फर्ग्युसन रोडला अनघा घैसास यांच्या “सौदामिनी” साडी सेंटर मध्ये राम वस्त्र विणण्याचे आयोजन केले आहे, असे कळल्यावर आपण तिथे जाऊन दोन धागे तरी विणू या असं मनानं ठरवलं होतं! दोन-तीन दिवस या विचारातच गेले. मग माझ्या दोन तरुण मैत्रिणी जान्हवी आणि योगिता यांच्याबरोबर मी ‘सौदामिनी’ दुकानात गेले. तेथील वातावरण पाहून मन भारावून गेले. त्या दिवशी फारशी गर्दी ही सकाळी नव्हती, त्यामुळे आम्हाला आरामात चार धागे विणण्याची, हात मागाजवळ स्वतःचा फोटो काढून घेण्याची, तसेच रामाच्या मूर्तीचा फोटो काढण्याची संधी मिळाली! मनाला खूप समाधान वाटले. त्यानंतर मात्र रोज राम धागा विणायला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आणि त्या भाविक वातावरणाचे वस्त्र सर्वांच्या मनात विणले जाऊ लागले. ‘इतके काय आहे, तिथे बघूया तरी!’ या विचाराने माझ्या मिस्टरांनी मला तिथे जायचंय अशी इच्छा व्यक्त केली. मी काय एका पायावर तयार होते! रामसेवेत आणखी चार धागे विणायला मिळतील म्हणून! आम्ही सकाळी तिथे दहा वाजता पोहोचलो. आता पहिल्यापेक्षा गर्दी खूपच वाढली होती. रांग लावावी लागत होती.

तरीही ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असल्यामुळे आम्ही दोघे लवकरच आत गेलो.रामनामाचे धागे पुन्हा एकदा विणताना मन भरून आले..हे विणलेले वस्त्र आता अयोध्येला जाणार या कल्पनेने!

श्रीराम हे आपल्या देशाचे उपास्य दैवत आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही! राम आणि कृष्ण हे परमेश्वराची दोन्ही रूपे  आपल्यासाठी पूजनीय आहेत.ग. दि. माडगूळकरांच्या गीत रामायणातील वर्णनाने सुद्धा श्रीरामाची नगरी, अयोध्या आपल्या डोळ्यासमोर येते!” श्रीरामाच्या पूजेसाठी आज *अयोध्या सजली…..”हे गीत पुन्हा एकदा 22 जानेवारीला आपल्या ओठावर येणार आहे. श्रीरामांचा आदर्श कायमच आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. अयोध्याचा राजाराम, एक पत्नी व्रत असणारा राम, आपल्या माता-पित्याबद्दल आदर दाखवणारा राम, आपल्या बंधूंबद्दल प्रेम असणारा राम, सर्व प्रकारच्या  नात्यांना जोडणारा हा श्रीराम आपल्यासाठी आदर्श आहे!

रामभूमी मुक्त करून घेण्यासाठी खूप मोठा लढा हिंदूंना द्यावा लागला. पण आता खरोखरच ते रामराज्य थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसू लागले आहे.

दोन धागे रामासाठी विणायचे म्हंटल्यावर गेले काही दिवस हजारोंच्या संख्येने राम धागा विणण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. आपली रामा बद्दलची श्रद्धा येथे रामनामात गुंतली आहे. जी वस्त्रे अयोध्येला जाणार आहेत, त्याचा एक अंश भाग तरी आपल्या हातून विणला जावा , या श्रद्धेने येथे लोक येत आहेत. प्रत्येक जण दोन धागे विणतात, तिथं असणाऱ्या मूर्तीला श्रद्धेने नमस्कार करतात आणि कृतार्थ भावनेने परत जाताना म्हणतात,’ रामराया तुझ्या वस्त्राचे दोन धागे विणण्याचे भाग्य मला मिळाले, ही तुझी माझ्यावर तेवढी कृपा आहे! एका श्रध्देने  समाज एकत्र येतो. आपल्यातील एक विचार वाढीला लागतो, हे केवढे मोठे समाज मन जोडण्याचे काम या रामनामाच्या धाग्यांनी केले  आहे. या एकूणच संकल्पनेला माझा मनापासून नमस्कार ! *जय श्रीराम! 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अनुभव इंग्लंडवारीमधले — ☆ प्रा. डॉ. सतीश शिरसाठ ☆

प्रा. डॉ. सतीश शिरसाठ

??

☆ अनुभव इंग्लंडवारीमधले  — ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

१ ) झोप…

इंग्लंडला  जाण्यासाठी मुंबईच्या  विमानतळावर उभा  होतो. कुठल्याही एस.टी.स्टॅन्डवर  किंवा रेल्वेस्टेशनवर  दिसणारी धावपळ  इथेही  दिसत होती. फरक  इतकाच की, इथे  सगळयाच बाबी चकचकीत होत्या. चेक इन वगैरे प्रक्रिया करून  आपले प्रस्थान  अधिकाधिक सुखकर  आणि  सुलभ कसे  होईल  याचा प्रत्येकजण  प्रयत्न  करत होता. उत्कंठा, आनंद  सगळीकडे भरून  वाहत होता.आम्हीही  या प्रक्रिया  करून  एकदाचे विमानात  बसलो.

एअर  होस्टेलच्या मदतीने  हातातल्या  बॅग्ज  डोक्यावरच्या कपाटांत  बंद  करून विमानाच्या  नियमानुसार सीटबेल्ट  लावून खिडकीतून  बाहेरचे आकाश  निरखत बसलो. मुंबई  ते (इंग्लंडमधील) हिथ्रो  हा जवळपास  नऊ  तासांचा  प्रवास होता. कधी  झोपी गेलो ते कळलंच  नाही.

जीवनाचा  प्रवास साधारणत: असाच असतो…..  जन्मापासून  शिक्षण, उपजिविकेसाठीची धडपड, लहानमोठे आनंदाचे-दुखा:चे, विजय  आणि  पराभवाचे क्षण  या  आवश्यक प्रक्रियांतून  जाताना संसारातून  निवृत्तीचा कालखंड येतो. शरीर आणि  मनही  थकून गेलेले असते.आणि माणूस  झोपी  जातो. मात्र  ती  झोप न उठण्यासाठीची  असते… आणि नंतर असेच काही विचार मनात येऊन गेले 

—–

२ ) ती…

इंग्लंड मुक्कामात अनेकदा आम्ही घराजवळच्या गार्डनमध्ये पाय मोकळे करायला जातो. अशाच एका सायंकाळी गार्डनमधल्या लाकडी बाकड्यावर बसून आजूबाजूचे मखमली सौंदर्य  पहात होतो. अनेक कुटुंबं आपल्या बाहुल्यांसारख्या मुलांबरोबर हसत खेळत होते. दोन तरुण मुली आरामात सिगारेटचे झुरके घेत इकडून तिकडं फिरत होत्या. 

मी पाहिलं; एक सुंदर तरूणी एका झाडाजवळ उभी होती .फिकट निळ्या रंगाचे  जर्कीन तिला उठून दिसत होते. कानातल्या रिंगच्या लोलकातून प्रकाशकिरणे परावर्तित होऊन तिच्या चेहर्‍यावर  पडली  होती.

तिचे  लांबसडक रुपेरी केस  पाठीवरून कमरेवर रूळत होते .बराच वेळ एकाच ठिकाणी ती उभी होती. थोड्या वेळाने तिने सावकाश  हातातला मोबाईल बंद करून पर्समध्ये ठेवला. रूमालाने चष्मा पुसला आणि

झाडाजवळची क्रचेस ( चालताना मदत होणारी काठी)  डाव्या हातात घेऊन  तिच्या आधाराने ती लंगडत लंगडत चालू लागली.

—–

३ ) प्रेम हे प्रेम असतं…

इंग्लंडच्या मुक्कामात एकदा मी सहकुटुंब लंडनला गेलो होतो. सायंकाळी घरी परतताना स्टेशनवर आलो. परतीच्या ट्रेनला थोडा उशीर होता. दिव्यांच्या प्रकाशात झगमगणा-या त्या अलिशान स्टेशनवर एका 

कोपर्‍यातल्या  सिमेंटच्या बाकड्यावर मळकटलेल्या कपड्यातलं एक मध्यमवयीन जोडपं बसलेलं पाहिलं. माझी नजर तिथेच खिळून राहिली. वास्तविक असं कुणाकडं (विशेषत:अनोळखी असतील तर) टक लावून पहात बसणं चुकीचं असतं. पण का कुणास ठाऊक मी पहात राहिलो. तो हमसून हमसून रडत होता. ती त्याला समजावून काहीतरी सांगत होती. शेवटी एखाद्या लहान मुलासारखं तिनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन ती थापटत राहिली. थोड्या वेळानं तो उठला आणि तिच्या हाताचं चुंबन घेतलं. ट्रेनमध्ये प्रवास करतानाही माझ्या डोळ्यापुढून ते दृश्य  जात नव्हतं. मी विचार केला, कोण असतील हे दोघं ?

लंडन ही एक मायानगरी.अनेकजण पोट भरण्यासाठी इथं येतात. अशाचपैकी हे जोडपंही इथं आलं असेल. सारं सुरळीत चालू असताना, कदाचित त्याचं काम बंद पडलं असेल. हतबल होऊन तो रडत असेल. पण 

” काळजी करू नकोस.मी आहे तुझ्यासोबत ” . असा धीर दिल्यावर तो सावरला असेल .

‘टाऊन सेंटर ‘  या हिचीनमधल्या बाजारात एकदा चाललो होतो.सायंकाळची वेळ होती. इथे सायंकाळी दुकाने बंद असतात. उघडी असतात हाॅटेल्स आणि बार. एक  आजोबा पुढून येत होते. दोन्ही हातांनी ढकलत एका व्हीलचेअरवर आपल्या अपंग पत्नीला घेऊन चालले होते. मी त्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.  हे पहाताच ते आजोबा मला म्हणाले,” साॅरी “.

” इट्स ओ.के.”

ते गेल्यावरही मी त्यांच्याकडं पहात राहिलो.

शनिवारचा दिवस होता. उद्या रविवार. सुट्टीचा दिवस. या दिवशी अनेकजण हाॅटेलांत आणि बारमध्ये  येत असतात. अशाच एका हाॅटेलच्या बाहेरच्या बाकावर एक तरूण जोडपं बसलं होतं. समोरच्या पदार्थांकडं त्यांचं लक्ष नव्हतं. एकमेकांच्या डोळ्यांत ते एकटक पहात होते.

लंडनमधील स्टेशनवर दिसलेलं  ते जोडपं ,मगाशी रस्त्यावरून चाललेलं ते वृध्द जोडपं आणि आता मी पहात असलेलं ते तरुण युगूल…या तिघांमध्ये मी प्रेम पाहिलं…. त्यांचे स्वरूप वेगवेगळे  होते .मात्र त्या तिघांतली प्रेमाची तीव्रता उच्च होती, हे मला प्रकर्षाने जाणवलं. 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print