डाॅ. मीना श्रीवास्तव

??

कथा संघर्षाची (काळोखातली प्रकाशवाट) – भाग – १ लेखक : श्री काशीनाथ महाजन ☆ प्रस्तुती – डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात पातोंडे गाव आहे, तेथे देवराम महाजन हे अतिशय गरीब मिल मजूर राहत होते. नऊ जणांचे कुटुंब चालवणे त्यांना अतिशय अवघड जात होते. मी त्यांचा मुलगा म्हणजे काशिनाथ देवराम महाजन. माझे  प्राथमिक शिक्षण गावातील शाळेत झाले. हुशार मुलगा म्हणून शाळेत व घरी माझे कौतुक व्हायचे. 

इयत्ता चौथीत असतांना शासकिय विद्यानिकेतन साठी स्पर्धा परीक्षा नव्यानेच सुरू झाली होती. ह्या परीक्षेचे वैशिष्ट्य असे कि त्यात उत्तीर्ण झालेल्या मुलांपैकी सहा-सात जिल्ह्यातून फक्त तीसच मुलांची निवड केली जात असे . त्यांना शासकीय विद्यानिकेतनात प्रवेश मिळायचा. अशी विद्यानिकेतने महाराष्ट्रात फक्त चारच होती. माझा जळगाव जिल्हा तत्कालीन मुंबई विभागात असल्याने या विभागासाठी नाशिक येथे शासकीय विद्यानिकेतन होते. या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने मला नाशिकच्या विद्यानिकेतनात प्रवेश मिळाला. शाळेतील शिक्षण, निवास, भोजन उच्च प्रतीचे होते. कला ,क्रीडा, संगीत व विविध छंद आत्मसात करण्यास येथे वाव होता. 

शासकीय विद्यानिकेतनात आपल्या मुलाला प्रवेश मिळाला याबद्दल देवराम महाजन यांना फारच आनंद झाला होता.गावात व आजूबाजूच्या परिसरात माझा व वडिलांचा सत्कार करण्यात आला होता. 

मी नव्या शाळेत खूपच उत्साहाने अभ्यास करू लागलो. मला इयत्ता सहावीत असतांनाच पहिली कविता सुचली. तिच्या २ओळी प्रस्तुत करत आहे.

त्रिवार वंदन माझे, मधुकरराव चौधरींना

दगडांमधले रत्न शोधले ,त्या रत्नपारखींना

ती वाचून शाळेतील अध्यापकांना व प्राचार्यांना खूपच आनंद झाला. 

नियतीला मात्र माझे वैभव पाहवले नाही. माझी नजर हळूहळू कमी होऊ लागली. वयाच्या बाराव्या वर्षी मला लिहिणे वाचणे अशक्य झाले. तरीही प्राचार्यांनी माझे नाव शाळेतून कमी केले नाही. मुलांनी व अध्यापकांनी मला सहकार्य करावे असे त्यांनी सुचवले. वाचक व लेखनिकाच्या मदतीने माझे शिक्षण सुरू राहीले. 

माझे वडील मात्र मुलगा अंध झाल्यामुळे फारच खचून गेले. त्यातच ते जिथे काम करत होते ती मील बंद पडली. कमाईचे काहीच साधन राहीले नाही. त्यांच्या जीवाची खूपच घालमेल झाली. मी नववीत असतांनाच त्यांचे दुःखद निधन झाले. संसार उघडा पडला. तरी आईने धीर सोडला नाही. शेतमजुरी करून ती कसेबसे दोन घास मुलांच्या मुखी घालू लागली. 

मी अंध झालो तरीही कविता करणे सोडले नाही. जो निसर्ग मनात साठला होता त्या आधारे निसर्ग कविता करणे सुरूच होते. त्याबरोबरच देशभक्तिपर, वैचारिक व सामाजिक कविताही करू लागलो. शाळेतील साप्ताहिकात व वार्षिक विशेष अंकात माझ्या कवितांना मानाचे पान मिळू लागले. मी मनाशी ठरवले कि –

जीवनात आला अंधार

तरी सोडणार नाही निर्धार

कविताच देतील मला आधार

आणि दिव्य प्रेरणांचा साक्षात्कार 

अध्यापक आणि मित्रांच्या सहकार्यामुळे तसेच प्राचार्यांच्या माझ्यावरील कृपादृष्टी मुळे माझे अंधत्व मला फारसे त्रासदायक वाटले नाही. अभ्यास उत्तरोत्तर उत्तम होत गेला. त्यामुळेच तत्कालीन अकरावी म्हणजेच मॅट्रिक च्या परिक्षेत मला नेत्रदीपक यश मिळाले. २४ जून १९७३च्या ‘साप्ताहिक गावकरी’ या नाशिकच्या वर्तमानपत्रात ‘अधुरी ही कहाणी’ या शीर्षकाखाली माझ्या विषयी प्रदीर्घ लेख प्रकाशित झाला. 

शासकीय विद्यानिकेतनाची सुविधा ११ वी पर्यंतच असल्याने मला गावी परत यावे लागले. 

दुर्दैवाची गोष्ट अशी कि ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे १९७१ ते १९७३ अशी सलग तीन वर्षे भारतात भीषण दुष्काळ पडला होता. शेते ओसाड पडली होती. भारतातील अन्नसाठा संपला होता. अमेरिकेतून निकृष्ठ प्रकारची लाल ज्वारी आणि मका आयात करण्यात आला होता. जनतेच्या पोटाची जेमतेम व्यवस्था झाली होती. रोजगारासाठी पाझर तलावांचे खोदकाम सरकारने सुरू केले होते. 

मी अंध असूनही आईबरोबर पाझर तलावाच्या कामांना जात असे. मजूरी फक्त आठ आणे मिळायची. अनेकदा ठेच लागून पडायचो ;पण तसाच उठायचो . 

मला पुढे शिकायचे होते. गावापासून आठ किलोमीटर अंतर असलेल्या चाळीसगाव कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी मी धडपड सुरू केली. या कामात माझ्या काकांनी मला मदत केली. आजपावेतो त्या कॉलेजात कुणीही अंध शिकला नव्हता. अनेकदा विनंत्या करूनही तिथे प्रवेश मिळत नव्हता. मी मात्र प्रयत्न करणे सोडले नाही. अखेर प्रवेश मिळाला. कॉलेजला जाण्यासाठी गाडी भाडे देणे मला शक्य नव्हते. त्यामुळे मी रोज ८ किलोमीटर पायीच जाऊ लागलो. दरम्यानच्या काळात चाळीसगावच्या अंध शाळेत ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यामुळे मला कॉलेजच्या नोट्स काढता येऊ लागल्या. खूप अभ्यास करू लागलो. १९७७ साली राज्यशास्त्र विषयात बी.ए . उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालो. त्या काळात अंधांना नोकरी मिळणे अवघड होते. मला कळले की पुण्याला अंधांसाठी एक शेल्टर वर्कशॉप आहे, तेथे अंध लोक खुर्च्या विणतात, खडू तयार करतात, ;त्यासाठी तेथे प्रशिक्षणाची सोय आहे, भोजन व निवास मोफत आहे, शिक्षणाची अट नाही. मी बी ए उत्तीर्ण असूनसुद्धा त्या वर्कशॉप मध्ये प्रवेश घेतला. 

१९७८ साली महाराष्ट्र शासनाने पदवीधर अंधांसाठी एक योजना सुरू केली होती. महाराष्ट्रातून दरवर्षी एका पदवीधर अंधास अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीने प्रवेश मिळणार होता. त्यावेळेस भारतात फक्त चारच प्रशिक्षण केंद्रे होती. गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश या तीन राज्यांसाठी मुंबई येथे प्रशिक्षण केंद्र होते. १९७८ साली अंध शिक्षक प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. या प्रशिक्षणात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या शुभहस्ते मला ‘ मृणालिनी पिंगळे अॅवॉर्ड’ देण्यात आले. 

१९७९ साली शासकीय बहुउद्देशीय संमिश्र केंद्र सोलापूर येथे माझी विशेष शिक्षक पदावर नियुक्ती झाली. माझे काव्यलेखन अखंड चालूच होते. अनेक ब्रेल व डोळस वर्तमानपत्रे, मासिके यातून माझ्या कविता प्रकाशित होत होत्या. त्या शाळेतील  अंध मूकबधिर व अपंग मुलांना पाहून माझ्या मनात आले कि यांच्या जीवनात नवे चैतन्य निर्माण करावे. त्यासाठी छान छान गाणी रचावी. त्यांना सहज सोपी चाल लावावी. मुलांना माझी गाणी आवडली. 

‘नाते प्रगतीशी’ या माझ्या कवितेने सोलापूरमध्ये क्रांती घडवली.तिच्या दोन ओळी प्रस्तुत करत आहे.

विज्ञानाची संगत आम्हा, हेलन केलर पाठीशी

मनामनाला पटवून देऊ,नाते आमचे प्रगतीशी

अनेकवर्तमानपत्रांनी या कविते विषयी लेख लिहिले.सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी रत्नाकर गायकवाड यांनी या कवितेचे कौतुक केले. १९८१ हे साल जागतिक अपंग वर्ष म्हणून जाहीर झाले होते. गायकवाड साहेबांनी त्यानिमित्त अनेक उपक्रमात मला सहभागी करून घेतले होते. तत्कालीन शिक्षक आमदार प्रकाश एलगुलवार यांनी माझ्या सहकार्याने सोलापूर येथे राष्ट्रीय अंधजन मंडळाची जिल्हा शाखा स्थापन करून माझी नियुक्ती सरचिटणीस पदावर केली. 

अंध व्यक्तीचा विवाह होणे हे त्या काळात जवळजवळ अशक्य होते. अंधही  शासकीय नोकरी करतो हे कुणीही मान्य करत नव्हते. फार खटपट केल्यानंतर मामाच्या मुलीशी माझा विवाह झाला. 

 – क्रमशः भाग पहिला

लेखक : काशीनाथ महाजन

नाशिक 

फोन ९८६०३४३०१९

प्रस्तुती : डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments