सौ राधिका भांडारकर

??

☆ “जगा आणि जगू द्या…” ☆ सौ राधिका भांडारकर 

खरं म्हणजे संकल्प ही संकल्पना माझ्या स्वभावाशी कधीच जुळली नाही. संकल्प वगैरे करण्याच्या भानगडीत मी फारशी पडतच नाही. मूळात कुठलाही संकल्प ,योजना, काही ठरवणं हे आजपासून नसतच..ते असतं ऊद्यापासून…म्हणजे असं.”आता ऊद्यापासून मी हे नक्की करणार हं..!!”आणि तो ‘उद्या” कधीच ऊगवत नाही.Tomorrow has no end-Tomorrow never comes.

असो,तर तमाम संकल्प कर्त्यांचा आदर ठेऊन मी खात्रीपूर्वक  म्हणेन,संकल्प करुन मनाची फसवणुक करून घेण्यापेक्षा,रोज रोज हाती येण्यार्‍या पत्त्यांचाच चांगला डाव मांडावा. वर्ष संपले म्हणजे नक्की काय होते. कॅलेंडरचे शेवटचे पान उलगडते. आणि नव्या वर्षाचा नवा आकडा समोर येतो. बाकी कालचा दिवस संपला आणि आजचा दिवस सुरु झाला. नेहमीप्रमाणेच.

संकल्प ही एक सकारात्मक संज्ञा आहे खरी.पण नव्या वर्षासाठी माझा हा असा व्यापक संकल्प आहे.

एक तणावमुक्त आयुष्य जगायचं. ठरवून केलेल्या संकल्पाचंही दडपण नको. माझा हाच संकल्प असतो की संकल्पच करायचा नाही .मुक्त मनाने मस्त जगायचं. अटकलेल्या वृत्तीलाच निवृत्त करायचं.

जाग आली की सकाळ आणि झोप आली की रात्र.

इतकं साधं सुबक सुलभ !या ऊतरंडीवरच्या आयुष्याचं  हेच गणित.

कुणाचा त्रास करुन घ्यायचा नाही अन् ज्यात त्यात

लुडबुड करुन कुणाला त्रास द्यायचा नाही. *जगा आणि जगू द्या*हेच मूलतत्व.

भूतकाळात जास्त रमायचं नाही. विशेषत: मनाला टोचणार्‍या, वेदना देणार्‍या ,कष्टी करणार्‍या आठवणीत रेंगाळायचं नाही. फक्त क्षण आनंदाचे जपायचे.

शक्यतो सगळ्यांना माफच करुन टाकायचं. मनात नको राग..नको वैर नको सूडबुद्धी..एक माफीनामा आपणही सादर करायचा. त्यासाठी ऊशीर नको.

सांगायचं राहूनच गेलं ही रूखरूख नको.

नव्या पालवीला बहरु द्यायचं. जुनं थापत नाही बसायचं. जे अपुरं, तुटलेलं,ते यथाशक्ती सांधण्याचा प्रयत्न करायचा. मनापासून, अगदी झोकून.

असे दिगंताला भिडणारे पण तरीही बद्ध नसलेले

स्वैर संकल्प माझे. वर्तमानात जगायचं. आनंदाचे दवबिंदु वेचायचे.

आनंद द्यायचा. आनंद घ्यायचा.

येणारे हे नवे वर्ष तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि आनंदाचे जावो!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments