मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 87 – आई..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #87 ☆ 

☆ आई..!☆

माझ्यासाठी किती राबते माझी आई

जगण्याचे मज धडे शिकवते माझी आई

तिची कविता मला कधी ही जमली नाही

अक्षरांची ही ओळख बनते माझी आई…!

 

अंधाराचा उजेड बनते माझी आई

दु:खाला ही सुखात ठेवे माझी आई

कित्तेक आले वादळ वारे हरली नाही

सूर्या चा ही प्रकाश बनते माझी आई…!

 

देवा समान मला भासते माझी आई

स्वप्नांना ही पंख लावते माझी आई

किती लिहते किती पुसते आयुष्याला

परिस्थिती ला सहज हरवते माझी आई…!

 

ठेच लागता धावत येते माझी आई

जखमेवरची हळवी फुंकर माझी आई

तिच्या मनाचे दुःख कुणाला दिसले नाही

सहजच हसते कधी न रडते माझी आई…!

 

अथांग सागर अथांग ममता माझी आई

मंदिरातली आहे समई माझी आई

माझी आई मज अजूनही कळली नाही

रोज नव्याने मला भेटते माझी आई…!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ समान समांतर ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ समान समांतर…… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

तिच्याकडे बघताना

तिच्या डोळ्यात उतरलेली

माझी प्रतिमा मला

नेहमी सांगत होती

सावधान.

 

ही तळी गुढगहिरी

पडलास बुडलास तर  ?

पुन्हा सापडणार नाहीस

मग काठावर येऊन

अस्तित्व दाखवण

तर दूरच.

 

काय चमत्कार झाला

नाही कळलं मला

पोहतोय तळ्यात बिनधास्त

अस्तित्वा सोबत.

 

अगुढ गुढ उलगडलं

तळ झालं माझं

माझ्याकरता जीव देणार

पाठीशी उभं राहून

मार्ग दाखवणारं

प्रगतीचा.

अजोड , एकरूप

समान आणि

समांतर सुद्धा .

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 109 ☆ मला भेटलेली दुर्गा ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 109 ?

☆ मला भेटलेली दुर्गा ☆

आजचा विषय खूपच चांगला आहे, मी खूप विचार केला आणि माझी दुर्गा मला माझ्या घरातच सापडली, होय मला भेटलेली दुर्गा  म्हणजे माझी सून सुप्रिया !

माझा मुलगा अभिजित चोवीस वर्षाचा झाल्यावर आम्ही त्याच्यासाठी मुली पहायला सुरूवात केली.

कारण त्याची बदली अहमदाबाद ला झाली होती आणि त्याच्या पत्रिकेत मंगळ असल्यामुळे आम्ही पत्रिका पाहून  लग्न करायचं ठरवलं होतं, म्हणजे आमचा थोडा फार ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे. सुप्रिया तशी नात्यातलीच, माझ्या चुलत बहिणीने तिला पाहिले होते आणि ती म्हणाली होती, ती मुलगी इतकी सुंदर आहे की तुम्ही नाकारूच शकत नाही. पण ती अवघी एकोणीस वीस वर्षांची होती आणि इंजिनिअरींगला होती, तिचं शिक्षण, करिअर… तिचे आईवडील इतक्या लवकर तिचं लग्न करतील असं वाटलं नाही!

पण सगळेच योग जुळून आले आणि खूप थाटामाटात लग्न झालं!पण सुरूवातीला अभिजित अहमदाबादला आणि ती पुण्यात आमच्या जवळ रहात होती कारण तिचं काॅलेज पुण्यात… ती लग्नानंतर बी.ई.झाली फर्स्ट क्लास मध्ये! काही दिवस जाॅब केला. अभिजितची अहमदाबादहून मुंबई ला आणि नंतर पुण्यात बदली झाली, दोघेही जाॅब करत होते नंतर प्रेग्नंट राहिल्यावर तिने सातव्या महिन्यात जाॅब  सोडला. नातू झाला. तिने तिच्या मुलाला खूप छान वाढवलं आहे, पाचव्या महिन्यात बाळाला घेऊन ती माहेरहून आल्यानंतर बाळाला पायावर अंघोळ घालण्यापासून सर्वच!थोडा मोठा झाल्यावर पुस्तक वाचायची सवय तिने त्याला लावली, तो आता तेरा वर्षाचा आहे सार्थक नाव त्याचं तो खूप वाचतो आणि लिहितो ही,अकरा वर्षाचा असताना त्याने एक कादंबरी लिहिली (फॅन्टसी) ती प्रकाशितही झाली आहे, अमेझाॅनवर! ते सर्व सोपस्कार त्याने स्वतः केले! नातू लेखक आहे, कविताही केल्यात त्याने, त्याचे श्रेय लोक मला देतात पण सार्थक ला वाचनाची गोडी सुप्रिया ने लावली आणि तिच्या स्वतःमध्ये ही लेखनगुण आहेत, तिच्या फेसबुकवरच्या पोस्ट (अर्थात इंग्रजी) वाचून कविमित्र लेखक श्रीनिवास शारंगपाणी म्हणाले होते, “तुमची सून चांगली लेखिका होईल पुढे”! खरंतर मी लग्नात तिचं सुप्रिया नाव बदलून अरुंधती  ठेवलं ते बुकर पुरस्कार विजेत्या अरुंधती राॅय च्या प्रभावानेच ! असो !

सुप्रिया (माझ्यासाठी अरुंधती) काॅन्व्हेन्ट मध्ये शिकलेली तरीही मराठीचा अभिमान असलेली,फर्डा इंग्लिश बोलणारी तरीही उगाचच इंग्रजीचा वापर न करणारी चांगली, स्वच्छ मराठी बोलणारी! सर्व प्रकारचा स्वयंपाक उत्कृष्ट करणारी, खूप चांगलं,सफाईदार ड्रायव्हिंग करणारी !

माझे आणि तिचे संबंध सार्वत्रिक सासू सूनांचे असतात तसेच आहेत, कुरबुरी, भांडण ही आमच्यातही झालेली आहेत, मुळात माझ्या सूनेने माझ्या अधिपत्याखाली रहावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती, तिने तिच्या आवडी निवडी जपाव्या, स्वतःतल्या क्षमता ओळखून स्वतःचा उत्कर्ष करून घ्यावा अशीच माझी सूनेबद्दल भावना, अपेक्षा कुठलीही नाही!

मला ती दुर्गा भासली तो काळ म्हणजे कोरोना चा लाॅकडाऊन काळ! त्या काळात अभिजित सिंगापूर ला गेलेला, आम्ही सोमवार पेठेत आणि सुप्रिया सार्थक पिंपळेसौदागर येथे पण लाॅकडाऊन च्या काळात ती सार्थक ला घेऊन सोमवार पेठेत आली, कामवाली बंद केली होती, घरकामाचा बराचसा भार तिने घेतला, त्या काळात सार्थकनेही न सांगता भांडी घासली, खूपच सुसह्य झालं ती आल्यामुळे!

नंतर माझं मणक्याचं ऑपरेशन, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेली कोरोनाची लागण…. घरी गेल्यावर एका पाठोपाठ एक पाॅझीटीव्ह होत जाणं…. आम्हाला दोघांनाही तिनं हाॅस्पिटल मध्ये अॅडमीट करणं…. त्या काळातलं तिचं धीरोदात्त वागणं आठवलं की अजूनही डोळे भरून येतात, हे टाईप करतानाही अश्रू ओघळत आहेत, आमच्या नंतर, आम्ही हाॅस्पिटल मध्ये असताना,  ती आणि सार्थक पाॅझीटिव आले, काही दिवस ती घरीच क्वारंटाईन राहिली, दोन तीन दिवस तिचा ताप उतरेना मग ती सार्थकला  बरोबर घेऊन मंत्री हॉस्पिटल मध्ये अॅडमीट झाली तेव्हा तर ती झाशीची राणीच भासली, काही दिवस आगोदरच आम्ही मणिकर्णिका पाहिला होता ऑनलाईन, खूपजण म्हणतात ती “कंगना राणावत” सारखी दिसते! पण कंगना पेक्षा ती खूपच सुंदर आहे सूरत और सिरतमे!

लेख जरा जास्तच लांबला आहे. पण माझ्या कोरोना योद्धा सूनेबद्दल एवढं तरी लिहायलाच हवं ना अर्थात या लढाईत तिला तिच्या बहिणी आणि मेहुण्यांची महत्वाची साथ होती हे ही कृतज्ञतापूर्वक नमूद करते!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दसखी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दसखी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

रमले तुझ्यात आणि

झाला जीवास आधार

संवाद तुझ्याशी होता

तू शब्दसखी साकार ||

 

लागला तुझाच ध्यास

मन नित्य गुंतलेले

साथ तुझी लाभताना

शब्दहार गुंफलेले ||

 

मोठी शक्ती तुझ्याठायी

आनंद प्रसवतेस

शब्दफुले फुलताना

चांदणे फुलवतेस ||

 

तुझी साथ लाभल्याने

भाग्य माझे उजळले

तुझ्या संगतीत आता 

सृजनात मी गुंतले ||

 

शब्दांचे प्रेम म्हणजे

सरस्वती वरदान

त्याच्या संगतीने घडो

नित्य लेखणी पूजन ||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन ☆ सौ. योगिता काळे

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन ☆ सौ. योगिता काळे ☆ 

(वृत्त – सरल)

जगणे अवघड कळले

मरणे अवघड कळले

 

प्रेमासाठी अपुल्या

हरणे अवघड कळले

 

न्यायासाठी जगती

लढणे अवघड कळले

 

आई बाबा दुसरे

मिळणे अवघड कळले

 

कोणी नाही अपुले

पचणे अवघड कळले

 

काटे असता भवती

फुलणे अवघड कळले

 

बाई… बनुनी पणती

जळणे अवघड कळले

 

दुःखामध्ये सहसा

हसणे अवघड कळले

 

जीवन चंदन बनता

झिजणे अवघड कळले

 

© सौ. योगिता काळे

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 112 ☆ चंदन जळले ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 112 ?

☆ चंदन जळले

आयुष्याची झाली माझ्या बघ रांगोळी

चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी

 

सारा सागर होता माझ्या रे बापाचा

फेरा चुकला कुणास आहे हा नशिबाचा

जाळ्यामधली आज जाहले मी मासोळी

चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी

 

ग्रीष्म ऋतूचा कंटाळा ना कधीच केला

घामाचे हे अत्तर पुसले या देहाला

मेघ बरसले कधीतरी मग संध्याकाळी

चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी

 

वर्षा झाली आज निघाले पुरती न्हाउन

दुःखांचे गाठोडे नेले त्याने वाहुन

जीव जाळला तेव्हा तेव्हा झाली होळी

चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी

 

दिशा उजळल्या घरात माझ्या सूर्य न आला

सोबत केली कशी सोडु मी काळोखाला

मिठी मारली अंधाराने कातरवेळी

चंदन जळले प्रेताखाली कुठे दिवाळी

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नभीचा चंद्रमा ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ नभीचा चंद्रमा ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

नभीचा चंद्रमा ग सखे घरामंदी आला

कसं सांगू सये जीव येडापिसा झाला …धृ

 

उतरल्या चांदण्या , घर गेले उजळून

मंद मंद हसे चांदवा, गेले मी लाजून

अमृताचा स्पर्श त्याच्या ग नजरेला

कसं सांगू …..

 

गूज मनीचे सांगण्या, तो कानाशी लागला

शांत शांत समईही  हसे आज त्याला

चूर चूर मी गाली,लालीमा ग आला

कसं सांगू….

 

थांबली आता कुजबुज रातव्याची

वाढली गती अशी कशी श्वासांची

असा कसा चांदणसाज देऊनी तो गेला?

कसं सांगू सये…

 

रातराणी बहरली येता मला जाग

जादू कशी ही घडे सये तू मज सांग

नयनी त्याचे रूप ,चांदणं हृदयी गोंदून गेला

कसं सांगू सये…

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 56 ☆ माझे बालपण… ☆ महंत कवी राज शास्त्री

महंत कवी राज शास्त्री

?  साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 56 ? 

☆ माझे बालपण… ☆

(काव्यप्रकार… अंत्य ओळ-आष्टाक्षरी…)

माझे बालपण आता

नाही येणार हो पुन्हा

पुन्हा रडतांना मग

नाही फुटणार पान्हा…

 

नाही फुटणार पान्हा

आई आता नाही आहे

सर्व दिसते डोळ्याला

तरी मन दुःखी राहे…

 

तरी मन दुःखी राहे

बाप सुद्धा माती-आड

बोटं धरून चालावे

प्रेम केले जीवापाड…

 

प्रेम केले जीवापाड

त्याची सय आता येते

छत हे कोसळतांना

मज पोरके भासते…

 

मज पोरके भासते

आई-बाप नसतांना

त्यांचे छत्र शीत शुद्ध

त्यांची स्मृती लिहितांना…

 

त्यांची स्मृती लिहितांना

शब्द हे अडखळती

कवी राज साठवतो

अशी निर्मळ ही प्रीती…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री.

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 21 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 21 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१०१]

कभिन्न ढगांमधून

साकळलेल्या

विक्राळ अंधकाराचे

प्रकाशाच्या ओठांनी

चुंबन घेतले

आणि

ढगांची फुलं झाली

स्वर्गीय रंगांनी

ओसंडणारी

 

[१०२]

अमर्याद सत्तेच्या मातीत

असत्याचं रोप वाढवलं

म्हणून काही त्याला  

सत्याचं फळ नाही येत …..

 

[१०३]

तलवारीच्या पात्यानं

आपल्याचा मुठीला

बोथट म्हणून चिडवावं?

 

[१०४]

जीवनाच्या

या प्रकाशमय बेटाभोवती

चारी बाजूंनी

उसळत आहे अहोरात्र

मृत्यूचे दर्यागीत

अखंड…. अनंत ….

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ||श्रावण गीत|| ☆ सौ. विद्या वसंत पराडकर

सौ. विद्या वसंत पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ||श्रावण गीत|| ☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆

चल चल ग सखी,जाऊ अंगणात

श्रावणाचे ऐकाया  गीत     

 

मोत्यासम  या जलबि॑दूतुनी

हिरव्या हिरव्या तरूपर्णातुनी

खळखळणाऱ्या सरितांमधूनी

दाही दिशातुनी गर्जे गीत

 

वनश्रीचा चुडा हिरवा

दाट धुक्यातून गंधित मरवा

सुमंगलाची सुंदर प्रभात

चैतन्याचे गाई गीत

 

तेज आगळे प्रसन्नतेचे

वसुंधरेच्या नवयौवनाचे

दिव्य प्रभेच्या  लावण्याचे

इंद्रधनुही गाई गीत

 

अमृतमय या जलधारांनी

राणी वसुधा चिंब भिजोनी

जणू न्हालेली ही सुंदर रमणी

वीज तेजस्वी ‌गाई गीत

 

अशी रूपसंपन्न धरा सुंदर

अंबर धरती मीलन मनोहर

नाचे गाई मुरली मनोहर

विश्र्व कल्याणाचे‌ गाई गीत

 

© सौ. विद्या वसंत पराडकर

पुणे.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print