श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

दोन लघुकथा – बक्षिसी… / चांगला पर्याय – A better option श्री मकरंद पिंपुटकर

(१) बक्षिसी…

सकाळची वेळ. सुषमा आपली गावातल्या घराच्या व्हरांड्यात नुकती कुठे बसत होती.

तिचे गेले दोन चार दिवस खूपच धावपळीचे गेले होते. अगदी घोटभर चहाही गळ्याखाली उतरला नव्हता दोन दिवसांत.

पण आता सगळीच धावपळ संपली होती, शांत झाली होती.

सकाळची वेळ होती. दिवसाचा पहिला चहा करून सुषमाने आपल्या सासूला दिला, आणि व्हरांड्यात बसून, स्वतः पहिला घोट घेणार, एवढ्यात दारासमोर रिक्षा थांबली. आणि त्यातून उतरणारी शम्मो, कम्मो, राजो, राणी आदि तृतीयपंथींना बघून सुषमाला पुढे काय होणार ते तिला उमगलं.

साठ एक वर्षांची राणी त्यांची म्होरक्या – सगळ्यात पुढे होती.

“कुठं आहे आमची नवी सून ? हाय दैय्या, अजून बेडरूममध्येच आहे का ? आणा, आणा तिला बाहेर. तिला आशिर्वाद द्यायचे आहेत आणि आमची बक्षिसी घ्यायची आहे, ” घुंगरू मागवत राणीची वटवट सुरू झाली.

“सूनबाई नाहीये इथे, ” तिला मध्येच थांबवत सुषमा शांतपणे म्हणाली.

“ओ हो, हनीमूनला गेले का ? कुठे गेले – गोवा का काश्मीर का लक्षद्वीपला ? आणि परत कधी येणार ? आम्हाला सांगा, आम्ही तेव्हा परत येऊ, ” राणीची टकळी लगेच नव्या ट्रॅकवर सुरू झाली.

“नाही, ते परत येण्यासाठी नाही गेले. ते वेगळे झाले. ते दुसऱ्या नव्या घरात राहायला गेले. ” सुषमा.

“आं, ते का बुवा ?” 

कधी नव्हे ते राणीला पुढं काय बोलावं ते सुचेना.

“तू यांना ओळखतेस ना ?” व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या सासूकडे बोट दाखवत सुषमाने विचारलं.

“म्हणजे काय ? तू लग्न होऊन इथे आलीस तेव्हा तुझी बक्षिसी घ्यायला मीच आले होते की. त्याच्या आधीपासून ओळखते मी तुझ्या सासूला. ” राणी म्हणाली, पण काय चालले आहे याचा तिला अजून उलगडा होत नव्हता.

“आमच्या नव्या सूनेला माझ्या या सासूबाईंची अडचण होत होती. तिला घरात ही अशी dustbins नको होती. तिचं माझ्या लेकाशी आधीच बोलणं झालं होतं म्हणे. त्याला तिचं म्हणणं मान्य होतं, पण आम्हा दोघींना सांगायची हिंमत झाली नव्हती.

लग्नाचे विधी पार पाडून वरात घरी आली, पाहुणेरावणे काल गेले आणि संध्याकाळीच हे दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले.

मला म्हणत होती तूही ये म्हणून. पण मी काही सासूबाईंना सोडून गेले नाही. ते त्यांच्या घरात सुखी आहेत, मी माझ्या घरी. “

मंद हसत राणीने घुंगरू पायात बांधायला सुरुवात केली, सुषमा हैराण झाली.

“अग, हे एवढं रामायण ऐकूनही तू नाचणार आहेस ?”

“हो तर. बक्षिसी घ्यायला आली आहे, बक्षिसी घेऊनच जाणार. वर्षानुवर्षे नव्या सुनेसाठी बक्षिसी घेते, आज पहिल्यांदाच, सासूला जपणाऱ्या अशा सुनेबद्दल तिच्या सासूकडून बक्षिसी घेईन. काय आज्जी ?” व्हीलचेअरवरच्या आजींकडे सहेतुकपणे पहात राणी म्हणाली.

दिलखुलास हसत, आजीबाईंनी आपल्या बटव्यातून पाचशेची नोट काढली, राणीला दिली.

राणीने सुषमावरून ती नोट ओवाळली, तिची अलबला काढली. ते पाचशे रुपये कम्मोला दिले. आपल्या पर्समधून एकशे एक रुपये काढून तिनं सुषमाला दिले, म्हणाली, “हे माझ्याकडून बक्षीस तुला. तू नेक काम करते आहेस. सुखी रहा. “

आणि मग मंडळींनी घुंगरू बांधले, ढोल वाजू लागले, आणि राणी, शब्बो, कम्मो, राजो – सगळ्याच जणी बेभान होऊन नाचल्या, नाचतच राहिल्या.

लेखक : श्री मकरंद पिंपुटकर 

= = = = = =

(२) चांगला पर्याय – a better option

नोकरीतील कामासाठी मला दर आठवड्याला एकेकदा पुण्याहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जावे लागायचे, रात्री घरी परत.

खेड शिवापूरच्या ठरलेल्या धाब्यावर जेवण व्हायचं. इतक्या वर्षांच्या वेगवेगळ्या trial and error नंतर आता जेवणाचा मेनू ठरलेला आहे. पापड, ३ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, आणि गोड म्हणून श्रीखंड वाटी.

सवयीने टेबलही ठरलेले आहे, “काय हवं ?” विचारायला येणारा वेटरही ठरलेला आहे. आताशा तर तो काय हवं हे विचारतही नाही. मी आलो की पापड आणून ठेवतो, आणि मग बाकीचं जेवण.

कालही तसंच झालं. मी माझ्या नेहमीच्या टेबलावर बसलो, पण माझा नेहमीचा वेटर दिसत नव्हता, पण दोन मिनिटात एक तरुण पोरगं आलं, “ते शंकरभाऊंना बरं नाहीये, आज रजेवर आहेत ते. “

अच्छा, म्हणजे, माझ्या अन्नदात्याचं नाव शंकर होतं तर. “बरं मग, तुझं नाव काय आहे ?” 

“सचिन, सर. “

काळा सावळा, तरतरीत, चापून चोपून पाडलेला भांग, कॉलरशी झिजलेला, थोडा चुरगळलेला पण स्वच्छ हाफ शर्ट, पायात चपला.

“बरं, सचिन, असं कर, मला एक पापड… ” मी सांगायला सुरुवात करत होतो, तेवढ्यात मला हाताने थांबवत तो म्हणाला, “माहिती आहे, सर. २ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, श्रीखंड. ” 

“अरे व्वा, गृहपाठ झाला आहे तर. ठाऊक आहे तर मग आण लवकर, मित्रा, पोटात कावळे कोकलत आहेत. “

तो थबकला, म्हणाला, “सर, हरकत नसेल तर एक better option सुचवू ?”

“बोला, काय better option सांगताय ?” मला रूटीन बदलायला आवडत नाही. आणि एका वेटरच्या सांगण्यावरून तर नाहीच नाही. पण एकदम काहीतरी खवचटपणे बोलणं योग्य वाटलं नाही मला.

“सर, तुम्ही त्यापेक्षा आमची veg थाळी घेता का ? दोन पोळ्या, दोन भाज्या, दाल तडका, भात, रायता, दही, खीर, पापड अशी थाळी असते. तुम्हाला भात नको असेल तर त्या ऐवजी एक पोळी extra घेता येईल सर, किंवा एक भाजी कमी करून extra पोळी घेता येईल आणि तुमच्या नेहमीच्या बिलापेक्षा २०% कमी बिल होईल, सर. ” त्यानं सांगितलं.

मी मेनू कार्ड पाहिलं. तो बरोबर सांगत होता.

मला आश्चर्याचे एका पाठोपाठ एक धक्के बसत होते.

एकतर तो माझ्या टेबलवर कधीच आला नव्हता, तरीही मला काय हवं ते त्याला ठाऊक होतं. Better option म्हणण्याइतकं त्याला इंग्रजी येत होतं, बोलताना नम्रपणे बोलत होता, भाताऐवजी अथवा भाजीऐवजी पोळी देण्याची मॅनेजमेंट त्याला उमगत होती, आणि तो टक्केवारीची गणितं तोंडी करू शकत होता.

“तू काय करतोस ?” मी त्याला विचारता झालो.

“सर, इथे वेटर आहे, ” काहीसं गोंधळून तो म्हणाला.

“नाही, नाही. त्याव्यतिरिक्त काय करतोस ?”

“दिवसा एमपीएससी ची तयारी करतो, सर. रात्रपाळीच्या नोकरीचे दोन पैसे जास्त मिळतात, आणि निवांतपणा असला तर दोन पुस्तकंही वाचता येतात. ” आत्मविश्वासानं तो म्हणाला.

“मित्रा, better option च घेऊन ये. “

जेवण झालं, छान होतं. बिल घेऊन सचिन आला. मी बिल दिलं, पण आज मी टिप नाही ठेवली.

याच्यासाठी पैश्यांची टिप महत्त्वाची नव्हती.

माझ्या खिशाला पार्करचं चांगलं पेन होतं. मी ते खिशातून काढलं, आणि त्याच्या खिशात ते ठेवलं. “तुला सह्या करण्यासाठी, ” मी म्हटलं.

त्याचे डोळे लकाकले.

सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही बहाणेबाजी करणारी एक जमात आहे, आणि गरीबी पाचवीला पूजली असताना, पोट हातावर असताना, नशिबाला दोष न देता, मेहनतीने better option शोधणारा एक वर्ग आहे.

सचिन या दुसऱ्या वर्गातला आहे. दिवसा अभ्यासाने स्वप्नांची दुनिया सजवत आहे, रात्री मेहनत करून सध्याच्या दुनियेत जगण्याची तजवीज करत आहे.

आणि सचिन नक्की जिंकणार, कारण याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये, आणि जिंकण्यासाठी अख्खी दुनिया.

मी उद्याच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला एक पेन भेट म्हणून दिलं आले.

परिस्थितीबद्दल रडगाणं गाण्यापेक्षा, ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हाच better option आहे.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments