मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 264 ☆ लावणी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 264 ?

लावणी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे. लावणी पारंपरिक, आकर्षक नृत्यप्रकार आहे, नर्तकीचे पदन्यास, हातांच्या हलचाली आणि मुद्राभिनय मोहक असतात, लावणी नृत्यात गीत आणि संगीताला फार महत्त्व आहे! पूर्वीच्या काळी लावणी, तमाशा ही उपेक्षित कला होती, पण नंतरच्या काळात तिला लोकमान्यता व लोकप्रियता मिळाली! सध्या लावणी महिला वर्गातही आवडीने पाहिली ऐकली जाते! )

माझ्या पायात काटा रुतला बाभळीचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥धृ॥

*

पांदी पांदीनं चालले होते

पायी पैंजण घातले होते

नाद छुनुकछुन बाई घुंगरांचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥१॥

*

वय नुकतंच सरलंय सोळा

साऱ्या गावाचा माझ्यावर डोळा

जीव जळतोय साऱ्या पाखरांचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥२॥

*

शेळ्या घेऊन गेले शेतात

चुडा राजवर्खी हातात

किणकिण आवाज झाला कांकणाचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा॥३॥

*

माझी चाहूल त्याला गं लागली

शेरडं रानात साऱ्या पांगली

लांडगा झालाय आता त्यांच्या ओळखीचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा॥४॥

*

माझ्या बांधाला त्याचा बांध

चार एकरात केल्यात कांदं

खिसा भरलाय नोटांनी सदऱ्याचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥५॥

*

त्याच्या बाभळीशी गेले नादात

काटा कचकन रुतला पायात

काटा काढताना डोळा लवला द्वाडाचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥६॥

*

छेडाछेडीत विपरीत घडलं

अन काळीज असं धडधडलं

मी वायदा केलाय रोज भेटण्याचा

त्यानं फायदाच घेतला या संधीचा ॥७॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काही रुचणे काही नडणे… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ काही रुचणे काही नडणे☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

असतो जरी फुकाचा सल्ला कुणा न रुचतो

ऐकेल का बरे तो सल्ला तयास नडतो

*

मौलिक विचार सारे काव्यात शोभणारे

गजरा जसा फुलांचा केसात छान खुलतो

*

शिकलीय आज नारी नूतन विचार आले

कौतुक पगार घेतो खोटा विचार ठरतो

*

बदलेल का युगांती पण माय आणि आजी

देण्यास देव काही ओटी तिचीच भरतो

*

सोडून देत असता मृत्यू इथेच सारे

सौभाग्य दागिन्यांचे का तोच नेत असतो

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होळी… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ होळी… ☆ सुश्री त्रिशला शहा

माघामधली थंडी सरली

फाल्गुनातल्या होळीला

जुने पुराणे हेवेदावे

जाळून टाकू आजमितीला

*

उत्साही अन् आनंदाचा

रंगपंचमी उत्सव रंगाचा

रंग उडविता पिचकारीने

रंगात सारे रंगून गेले

*

नीळा, जांभळा, केशरी, हिरवा

रंगांच्या किती सुंदर छटा

इंद्रधनू जणू अवचित आले

धरणीवरती अलगद उतरले

*

तप्त उन्हाळा शांत झाला

रंगांच्या शिंपणाने अवघा

जाती धर्म विसरुन सारे

एक रंगी रंगून गेले

©  सुश्री त्रिशला शहा

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #276 ☆ अमृतानुभव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 276 ?

☆ अमृतानुभव… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

धमन्यांमधल्या शब्दांसोबत यावी कविता

माझ्यासोबत सात सुरांनी गावी कविता

*

बोलघेवडे शब्द जरासे ठेव बाजुला

या शब्दांची सांग कशाला व्हावी कविता

*

नको नशेचा गंध यायला नकोय धुंदी

अमृतानुभव घेउन आता प्यावी कविता

*

शिशिर पाहून सृष्टी सारी उदासलेली

बाग सुनी ही येथेही बहरावी कविता

*

विद्रोहाचा मलाच पुळका आला होता

माझ्याहातुन झालेली कळलावी कविता

*

छान लिहावे मस्त जगावे ताल धरावा

सरळ असावी नकोच उजवी डावी कविता

*

मज शब्दाचे ध्यान असावे हेच मागणे

माझ्या हातुन सुरेख व्हावी भावी कविता

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्दांजली… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्दांजली… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नित्यच लेखणी बहरते

जोती-सावित्रीच्या ज्ञानाशिर्वादात

अंतर्पटलावर उमटवून ठसे

इतिहासातील सत्कार्य सेवेची

जिथे माणूसकीच्या वनात

अनेक बागडतात पशु-पक्षी

आजही आनंदाने विसरुन

भेदभाव,समर्पित मनाने.

अस्पृश्यता निवारणाचा पहिला

धडा गिरवून अज्ञानाची

कोरी कागदे भरुन निघतात

एकाच प्रेम भावनेने

आणि आम्ही  नित्यच अभिवादन करतो अंतरीतून

शब्दाक्षरांचा हार वाहून

जिथे फक्त नि फक्त दरवळतात

जोती-सावित्रीच्या महान

कार्य ज्ञानमुल्यांची फुले.

नत् होऊन माणूसकीच्या चरणावर

लोकशाहिच्या शिकवणीतून

दुमदुमतात शिक्षणाच्या

प्रज्ञाशील भिंती.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तिची वाट वेगळीच… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ तिची वाट वेगळीच ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

तिची वाट वेगळीच हाती बुकच धरावे

इवल्याशा साऊला त्या स्वप्न बुकाचे पडावे

होता जुना तो जमाना पोरी नव्हत्या शिकत

बुक घेऊन सासरी आली लपत छपत..

 *

होती डोक्याने ती तेज जोतिबाची ती सावली

तिची शिक्षणाची आस जोतिबाने हो जोखली

स्वत: केला शुभारंभ अक्षरांना गिरवत

सावित्रीच्या शिक्षणाची झाली पहा सुरूवात..

 *

जमाना तो आडमुठ्ठा होता अडाण्यांचा गाव

शेणमारा दगडांचा रोज होतसे वर्षाव

आडदांड आडमुठ्ठे रोज अडविती वाट

एक धटिंगण आला साऊ समोरच थेट…

 *

हात उचलता त्याने तिने खोचला पदर

श्रीमुखातच दिली तिथे सर्वांच्या समोर

गेली शाळेत तशीच तिने शिकवला धडा

पण सोडावा लागला तिचे सासर नि वाडा..

 *

नाही हारले हो दोघे, हाडाची ती केली काडे

अनाथ नि निराश्रीत त्यांना उघडले वाडे

झाले पाळणाघर नि शिक्षणाची गंगा सुरू

सावित्री नि जोतिबा हे साऱ्या विश्वाचेच गुरू…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ रंगले तुझ्याच रंगात… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? रंगले तुझ्याच रंगात…  ? श्री आशिष बिवलकर 

रंगूनी रंगले,

तुझ्याच साऱ्या रंगात!

रंगवले हे मन माझे,

प्रेमळ सहवासाच्या ढंगात!

 

डोळ्यांच्या पापण्यांना,

तुझीच लागते रे आस!

उघडता तूच, मिटता तूच,

तुझाच होतोय भास!

 

गंध ही तूच, सुगंधही तूच,

दरवळे तुझाच सुवास!

माझे मी कुठे रे उरली आता,

तुझ्याच साठी घेतेय श्वास!

 

हरवले मी भान,

एकटीच गालात हसते!

गालावरच्या खळीत,

कळी तुझीच खुलते!

 

आरसाही कुठे राहिला माझा,

त्यात तूच मला रे दिसतोस!

माझे प्रतिबिंबही हरवले आता,

दर्पणातही हसतांना भासतोस!

 

लावलेस वेड तुझे तू मला,

देशील ना रे आयुष्यभराची साथ!

तुझ्या प्रेमाच्या समईतील,

प्रकाश देणारी असेल मी रे वात!

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आरसा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आरसा ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

करता उगी कशाला बदनाम आरश्याला

बघण्यास रूप तुमचे त्याचा गुलाम झाला

*

पाहून आरश्याला हुरळू नका गड्यांनो

तुमचेच रूप असली तो दावतो तुम्हाला

*

माणूस माणसाला अंदाज देत नाही

होतो तयार नकली नात्यात बांधण्याला

*

सत्यास शोधण्याची आहेत कारणे ही

बाजार माणसांचा विकतोय माणसाला

*

आनंद वाटताना नव्हता विचार केला

फिरले नशीब उलटे भलताच काळ आला

*

निरखून पाहताना मी आरश्यात थोडे

आत्मा कुठे दिसेना मुखडा मलूल झाला

*

आभार मानताना तो आरसा म्हणाला

तुमच्याच वास्तवाला लपवू उगा कशाला

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री… ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

सुश्री अपर्णा परांजपे

? कवितेचा उत्सव ?

☆ ✍️ स्त्री… 🥀🥀🥀 ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆

बाल्यातील निरागसता मी

तारुण्यातील अवखळता मी…

मीच माझी सखी सख्याचीही सखी

प्रेम समर्पण आदराने होते सुखी…

*

नाजूकातील नाजूक फुल मी

कठोर कठीण पाषाणही मी…

*

प्रेमपान्हा हे अस्तित्वाचे अस्तित्व

मला पाहूनच कवींचे उफाळून येते कवित्व…

*

सावरणे आवरणे कर्तव्य माझे

तेच खरे कारण असतात स्वतंत्र राजे…

*

राणी हे राजाचे कारण असण्याचे

माझ्याशिवाय त्याचे असणे सत्य नसण्याचे…

*

एकमेकांची अस्मिता जपत चाले खेळ

आयुष्याचा असतो असा रंगीबेरंगी मेळ…

*

आहे ते सर्वोत्तम, देणे ईश्वराचे

जीवन सार्थक होते सौभाग्याचे…

*

अवर्णनीय आनंद शब्दांपलिकडचा

कुपीत जपावा असा सुगंध जीवनाचा…

*

शब्द नव्हे हा अनुभव संचय

सार्थकता ही जणू अमृतमय. . .

जणू अमृतमय…

☆ 

🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹

© सुश्री अपर्णा परांजपे

कात्रज, पुणे

मो. 9503045495

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांदणे शिंपित आली… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

चांदणे शिंपित आली… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

चांदणे शिंपित आली जीवनाची ही घडी

उंच गेली आभाळी ती डौलाने फडके गुढी…

*

काय काय नाही केले, काय काय केले हो

कंटकांच्या होत्या राशी फुलझेले कधी हो

चालणे माहित होते.. चाल होती फाकडी…

चांदणे शिंपित आली….

*

चांदणे केले उन्हाचे त्यात केला गारवा

मोती झाले घामाचे नि जग म्हणाले वाह! वा!

कष्टाला येतेच फळ हो.. वेळ जरी ती वाकडी

चांदणे शिंपित आली…

*

चाल ठेवावीच साधी सत्य ठेवावे मुखी

चांदणे होते उन्हाचे दु:खे होती पारखी

शुद्ध गंगा ती मनीची भाषा होती रोकडी

चांदणे शिंपित आली…

*

मार्गावरूनी चाललो ज्या अडथळ्यांची शर्यत

गेलो ओलांडून तरीही टेकड्या नि पर्वत

साथ दैवाची मिळाली मऊमखमली चौघडी

चांदणे शिंपित आली…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares