सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

 वाचताना वेचलेले 

☆ – रक्तामध्ये ओढ मातीची– कवयित्री : श्रीमती इंदिरा संत ☆ संग्रहिका : सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

(काल साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने ..कवयित्री इंदिरा संत यांची एक सुंदर कविता. सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी या कवितेला सुरेख स्वरसाज चढवून ती सादर केलेली आहे)

५ जून, जागतिक पर्यावरण दिन…… आपला सभोवताल नयनरम्य करणार्‍या पर्यावरणातून आपण अनेक गोष्टी शिकतो, मनमुराद आनंद घेतो, आणि त्यावर मनापासून प्रेमही करतो….या पर्यावरणाशिवाय आपलं अस्तित्त्व नाही.. 

याच पर्यावरणाबद्दल वाटणारी कृतज्ञता जेष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी त्यांच्या खालील कवितेतून व्यक्त केली आहे… त्या मातीचा एक भाग आपणही आहोत, याचं भान आपल्याला सतत असायला हवं आणि म्हणून पर्यावरणाचं संवर्धन आपण करायला हवं, हो ना !

रक्तामध्ये ओढ मातीची, 

मनास मातीचें ताजेपण,

मातींतुन मी आलें वरती, 

मातीचे मम अधुरें जीवन…..  

कोसळतांना वर्षा अविरत, 

स्नान समाधीमधे डुबावें; 

दंवात भिजल्या प्राजक्तापरी

ओल्या शरदामधि निथळावें; ….. 

हेमंताचा ओढुन शेला 

हळूच ओलें अंग टिपावें;

वसंतातले फुलाफुलांचें, 

छापिल उंची पातळ ल्यावें;….. 

ग्रीष्माची नाजूक टोपली,

उदवावा कचभार तिच्यावर;

जर्द विजेचा मत्त केवडा

तिरकस माळावा वेणीवर; ….. 

आणिक तुझिया लाख स्मृतींचे

खेळवीत पदरांत काजवे, 

उभें राहुनी असें अधांतरिं

तुजला ध्यावें, तुजला ध्यावें….

कवयित्री : श्रीमती इंदिरा संत

संग्रहिका : पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments