मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चांदणे हे डहुळेल… ☆ – वा.रा.कांत ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ चांदणे हे डहुळेल… ☆ – वा.रा.कांत ☆

ऊन रेशमी पडता

डोळे फुलांचे दिपले

बिंब दवाच्या दर्पणी 

सात जन्मांचे पाहिले

 

सात जन्मांचे संचित

तुझ्या हास्यात माळले

जपतात दुःखे पोटी

काळी डोळ्यांची वर्तुळे

 

साहिल्यास सा-या व्यथा

ज्योतीपरी तू कापत

तेवलीस रात्रभर

माझ्या मातीच्या घरात

 

झोप आता बोलू नको

फुलमिटू झाले डोळे

अर्थ जागविता ओठी

शब्द माझे पेंगुळले

 

आता बोलू नको काही

निळाई ती  गढूळेल

नि:श्वासही नको खिन्न

चांदणे हे डहुळेल.

  – वा.रा.कांत

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #125 – पान…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

इस संवेदनशील मराठी कविता का हिन्दी भावानुवाद “एक पत्ता” आप आज के अंक में पढ़ सकते हैं । 

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 125 – पान…! 🍃 

मी अंगणातल्या झाडाचं

एक पान…

वहीत जपून ठेवलंय

भविष्यात लेकरांन  

झाड़ म्हणजे काय…

विचारलं

तर निदान

झाडाचं पान तरी

दाखवता येईल…!

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

अल्प परिचय

वैद्यकी व्यवसाय, पुणे.

कथा, कादंबरी, एकांकिका, काव्य,अशा सर्वप्रकारच्या साहित्य प्रकारातील व वैद्यकीय लेखन. सुमारे पन्नास पुस्तके प्रकाशित. शिवाय ध्वनिफिती /सी.डीं। चे ही प्रकाशन झाले आहे.

आकाशवाणी व दूरदर्शनचे मान्ताप्राप्त भावगीतकार व अभिनेता.

? इंद्रधनुष्य ?

☆ मंत्र पुष्पांजली — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री  ☆

— संस्कृत श्लोक

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान: सचंत यत्र पूर्वे साध्या: संति देवा: ॥

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय।
महाराजाय नम: ॥

ॐ स्वस्ति, साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं ।
समन्तपर्यायीस्यात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् ।
पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति ॥

ॐ तदप्येषः श्लोकोभिगीतो।
मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ॥

॥ मंत्रपुष्पांजली समर्पयामि ॥

— मराठी भावानुवाद —

यूट्यूब लिंक >> मंत्रपुष्पांजली मराठी / Mantrapushpanjali Marathi – YouTube

ॐ यज्ञासहित करुन आद्य विधी उपासनेचे

पूजन केले देवे यागरूपी त्या प्रजापतीचे

यज्ञाचरणे देवताधामा केले त्यांनी प्राप्त

याची कर्मे महानता झाली त्यांना अर्जित

 

अनुकूल सकला असे तुझे कर्म

मनीच्या कामनांची पूर्ती तुझा धर्म

अमुच्या इच्छा समस्त पूर्ण करा

नमन राजाधिराजा वैश्रवणा कुबेरा

 

कल्याणकारक असावे राज्य

भोग्य परिपूर्ण असे साम्राज्य

लोभमोहविरहित लोकराज्य

अधिपत्य अमुचे असो महाराज्य

 

क्षितीजसीमेपर्यंत अमुचे राज्य सुखरूप असो

सागरमर्यादेचे अमुचे राज्य दीर्घ आयुचे असो

राज्य आमुचे सृष्टी आहे तोवर संरक्षित असो

आयु या राज्याची परार्ध वर्षे सुरक्षित असो

 

असे राज्य कीर्तीमानसे व्हावे

म्हणोनी या  श्लोकास आम्ही गावे

अविक्षीत पुत्रांनी मरुद्गणांनी

परिवेष्टिले राज्य आम्हासि लाभो—-

भावानुवादकर्ता— ©️ डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – अजुनी रूसुन आहे – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? – अजुनी रूसुन आहे   ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के 

😊

अजुनी रूसुन आहे

खुलता कळी खुलेना

विनवून  पाहीले मी

इकडे मानही वळेना

😊

चुकले कशात  माझे

हे काही  आकळेनी

😊

किती किडे,अळ्या मी

हुडकून  आणल्या हो

त्यातील चव कुणाची

प्रियेस का रूचेना

😊

रानावनात फिरलो

गवतातूनी हुडकलो

पण वेगळ्या चवीची

हिस भूल का पडेना!

😊

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणपतीची आरती… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ गणपतीची आरती… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

जयदेव जयदेव जय मयुरेश्वरा

गणेश उत्सव तुमचा करूया साजरा॥धृ॥

 

भाद्रपद चतूर्थी गौरीसुत आला

लहान थोरांना आनंद झाला

सुखकर्ता दुखहर्ता बाप्पा तू देवा

तुजला नमुनी करती कार्यारंभाला

उत्सव मोठा चाले बल्लाळेश्वरा

गणेश उत्सव तुमचा करूया साजरा ॥१॥

 

स्थापुनी तव मूर्तीला सुंदर मखरात

कोणी पूजिती तुज देव्हार्‍यात

दुर्वा शमीपत्रे वाहुनी जास्वंदी

दिसते तवमुख आम्हा भारी आनंदी

लाडू मोदकांचा प्रसाद स्वीकारा

गणेश उत्सव तुमचा करूया साजरा॥२॥

 

ब्रम्हमूहूर्ती अभ्यंगस्नान

वक्रतुंड महाकाय मंत्र जपून

जमले गोत सारे भजन पूजन

बाप्पा भक्तांचे करिती रक्षण

मनोभावे प्रार्थिती तुज विघ्नेश्वरा

गणेश उत्सव तुमचा करूया साजरा॥३॥

 

आरती करूनी आता भोजन करावे

प्रसन्नवदने चित्त शुद्ध ठेवावे

बाप्पा ठेविल मग तो कृपाहस्त शिरा

गणेशउत्सव तुमचा करूया साजरा॥४॥

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 148 ☆ गणेश स्तुती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 148 ?

☆ गणेश स्तुती ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(वृत्त– शुद्धसती) (८+४)

वाजत गाजत आले

गणपती देव येथे

घरकुले छान सजली

 दार ही गीत गाते

 

जास्वंद फुले आता

दरवळे मोगराही

बनलीय जुडी दुर्वा

छानसा केवडाही

 

कुणाला सांग सांगू

हेरंब घरी आल्याचे

उघडले दार आता

माझ्याही सौख्याचे

 

बाप्पास गंध शोभे

सुवासी चंदनाचे

गूळ अन खोबरे ते

नैवेद्य मोदकाचे

 

करावी आरती की

 सुखाने गणेशाची

 असावी रोज पूजा

 शुद्धच या भावांची

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सांज… ☆ कवी बी.रघुनाथ ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ सांज… ☆ कवी बी.रघुनाथ ☆

गाउलीच्या पावलांत

सांज घरा आली

तुंबलेल्या आंचळांत

सांज भरा आली

आतुरल्या हंबराचा

सांज कान झाली

शिणलेल्या डोळुल्यांचा

सांज प्राण झाली

माउलीच्या वातींतून

सांज तेज ल्याली

माउलीच्या गीतांतून

सांज भाव प्याली  

माउलीच्या अंकावर

सांज फूल झाली

फुलासाठी निदसुरी

सांज भूल झाली

वहिनीच्या हातांतून

सांज सुधा झाली

वहिनीच्या हातासाठी

सांज क्षुधा झाली

वहिनीच्या मुखासाठी

सांज चंद्र झाली

वहिनीच्या सुखासाठी

सांज मंद्र झाली.

   – कवी बी.रघुनाथ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके ☆

? विविधा ?

☆ जीवना… ☆ सुश्री निलिमा ताटके☆ 

जीवना, खरंच, इतकं  भरभरुन दिलं आहेस मला.

छोट्या कुरबुरी, आता उगा करु कशाला?

अगणित आनंदाचे क्षण, मोजता भासती तोकडे.

अन् दुःखाच्या हळव्या क्षणांचा, तो बोलबाला केवढा?

जरतारी किनारीचे वस्र ल्याले मी, झगमगते.

तरी त्याची कलाबूत, कुठेतरी का टोचते?

सुंदर सकाळ, फुलांचा मोहवतो दरवळ.

तरी द्दृष्टीस माझ्या का खुपते ही पानगळ ?

बालकाचे निरागस हास्य, त्यावीण सुंदर असे काय?

जीवन सरतानाही, पेला पुन्हा भरुन जाय.

सर्वगुणसंपन्न जरी या जगी नसे कुणी.

जगमगता एक गुण, असतो,प्रत्येकाचे ठायी.

गुणविशेष हेरावा, अन् मारावी पाठीवर थाप.

भोक दिसता, बोटे घालून, वाढवण्यात मतलब काय?

शांत आणि प्रसन्नचित्त,रहावे सदासर्वदा.

जीवन फार छोटे आहे, आज आहोत,

उद्याचे काय ठाऊक असते कुणाला?

हसण्यातून उधळा फुले, गा आनंदगाणी छानशी.

आज घ्या आनंदे जगून, विसरून उद्याची काळजी.

© निलिमा ताटके

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मंदिर… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? कवितेचा उत्सव ?

☆ मंदिर … ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

गणरायाच्या आगमनाने

घर बनले एक मंदिर

अंगणी रांगोळ्या रेखून

स्वागता उत्सुक आतुर !

 

बालचमूंच्या हाती टाळ

घंटांचे नाद किणकिणती

नातीसवेआजोबा बसती

बांधत दुर्वांकुंरांच्या जुडी !

 

स्वयंपाकघरात आजीची

गडबड पंचखाद्य करण्याची

आईची सुरु  असते तयारी

तयारी उकडीच्या मोदकाची !

 

लहानथोर अवघेच असती

आपल्या  आपल्या कामात

प्रत्येकाच्या मुखावर दिसतो

गणरायाच्या येण्याचा आनंद !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लाडका बाप्पा… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? कवितेचा उत्सव ?

☆ लाडका बाप्पा… ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

चौदा विद्या ,चौसष्ट कलांचा अधिपती

सुखकर्ता विघ्नहर्ता ,तू बाप्पा गणपती

 स्वागतास दारी, तोरणे सजती

अंगणी सुरेख रांगोळी रेखिती..||१||

 

घरोघरी सुरू होई लगबग

मखरात विराजमान मूर्ती

निरागस ,गोंडस साजिरे रूप

मनोभावे भक्तगण पूजा करती..||२||

 

गणापाठोपाठ येई गौराई, मने हर्षती

दारी येताच, भाकर तुकडा ओवाळती

घरी दारी नानापरीने आरास करती

एकवीस मोदकांचा नैवेद्य अर्पिती..||३||

 

बाप्पा मोरयाच्या गजरात होते आरती

भक्तीभावे सारे तुजला पुजती

गजानन , हेरंब, विनायक नावे तुला किती

परि तू आमचा लाडका,बाप्पा गणपती

 

बाप्पा माझा मार्गदर्शक ,दिशादर्शक

त्रिखंडात निनादते, नित्य तव कीर्ती

मनमोहक ,निरागस ,गोड गोंडस तुझी मूर्ती

अवघ्या विश्वाचा तू मंगल मूर्ती….||५||

©  सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares