मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ होलिकोत्सव विशेष – होलीकोत्सव…दोलोत्सव…. ☆ प्रस्तुति – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆ 

वाचताना वेचलेले:

अरुणा ढेरे यांच्या ‘अर्ध्या वाटेवर’ या विविध ललित लेखांच्या संग्रहातील जीवन – मृत्यूचा दोलोत्सव —

वसंत यायचा आहे आणि शिशिर सरलेला आहे. काळाच्या लयबद्ध गतीतून अगदी स्पष्ट जाणवतो आहे हा सांधा!जणू एक पाऊल उचलले आहे, दुसरं टेकायचं आहे- यांच्यामधला एक अधांतरी तरी क्षण!

अरुणा ढेरे यांनी या होळीच्या सणाची सांगड मातीशी जोडली आहे. हा काळ गर्भाधानाचा! एका वर्षातून दुसऱ्या वर्षाचा जन्म!

आपल्यातून नव्हे तर आपली नाळ जिच्याशी जोडली आहे त्या त्या मातीतून बीज रुजते. शिशिराच्या विनाशातून पुन्हा वसंतात फुलून उठणार आहे ही माती! गर्भिणी होणार आहे! सृष्टीची वासनाच जणू पेटलेली! तिचा प्रतीक सरळ उभ्या सोटासारखं झाड आणि वर धान्याची पुरचुंडी, आणि आंब्याचे तोरण!होळीच्या सणाचा संबंध सुफलनाशी आहे! विधीपूर्वक होळी पेटवून तिची पूजा करणे म्हणजे सृष्टीतल्या कामाग्नीचीच  पूजा करणे होय. कारण या अग्नीतून सृष्टीची नवनिर्मिती आहे. होळीतील स्त्री-पुरुषांचा एकत्र वावर थोडा  सैलावलेला असतो. कोळीणी डोक्यावरच्या मडक्या मध्ये दिवा पेटवून मिरवणुकीने होळी कडे जातात आणि त्या मडक्यांचा आहेर होळीला देतात माहेरवाशीण म्हणून! जणू ते आत दिवा असलेलं मडकं म्हणजे आपलंच गर्भाशय! होळी फाल्गुनात येते. सूर्य पौरुषाचे प्रतीक! हा काळ सृष्टीच्या बीजधारणेचा काळ! हा बीज धारणे चा उत्सव म्हणजे होळीचा उत्सव असतो!

सृष्टीची ही मिलनोत्सुक काम मोहित अवस्था संस्कृतीच्या विकासात आपोआप स्वीकारली गेली. पुढे स्त्रियांच्या वर्चस्वातून  पुरुषांच्या वर्चस्वाकडे संस्कृतीचा प्रवास झाला आणि प्रतीकात्मक विधि उरले!

एकीकडे होळीत मिसळत गेला राधा कृष्णाच्या प्रीतीचा एक रंग! कृष्ण विष्णु रूप आहे आणि विष्णू हाच स्वयम् काम आहे! म्हणून प्रणयाचा खेळ कृष्ण खेळतो. तो आमचा लोकसखा आहे. नाना रूपांनी तो प्रकट होतो. सगळे प्रापंचिक सुखदुःख विसरून प्रेमाच्या एका विराट रंगपंचमीत कृष्णानं सर्वांना भिजवून टाकलं! राधेला भिजवलं पण मनोमन राधा होणाऱ्या प्रत्येकाला  भिजवलं! व्यक्तिगत आणि सामूहिक प्रेमाचा एक अद्भुत रंग कृष्ण सहजतेने खेळला! बालपणीच दुष्ट पूतना राक्षसीचा त्याने प्राण घेतला, त्या प्रसंगाची आठवण म्हणजेच होळी! अभद्रावर भद्रा ने केलेली मात म्हणजे होळी!

होळी हा अमंगलाच्या मरणाचा उत्सव आहे. जीवनाच्या जयाचा उत्सव आहे. बंगाल मध्ये झोपाळ्यावर झुलतो कृष्ण आणि होळीचा ‘दोलोत्सव’ होतो हे जीवनाचं आंदोलणं आहे. उत्तर भारतातील रंगाची होळी राधा कृष्णाच्या प्रेम रंगाची आठवण म्हणून खेळली जाते.

जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जीवनाने घेतलेला  एक  सुंदर झोका म्हणजे होळी! शिशिर आणि वसंताच्या मध्ये काळाने घेतलेला झोका म्हणजे होळी! वासना आणि प्रीती यांच्यामध्ये संस्कृतीने घेतलेला झोका म्हणजे होळी!

अरुणा ढेरे यांनी होलिकोत्सवाच्या संदर्भात लिहिलेले  ‘होळी’ सणाचे रूप मनोमन पटले! म्हणून  त्यांच्या लेखाचा  हा संक्षिप्त शब्दरूप भाग!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता-दिवस सेलचे सुरु जाहले… ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – विडंबन कविता – दिवस सेलचे सुरु जाहले – बायांचे मन प्रसन्न झाले ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

मूळ कविता –    दिवस सुगीचे सुरु जाहले – शेतकरी मन प्रसन्न झाले–

                                खळखळ ,छमछम,डुमडुम,पटडुम लेझीम चाले जोरात।

                                                                                      कवी- ग.ह. पाटील.

——-                  दिवस सेलचे सुरु जाहले

——-                  जिकडे तिकडे बोर्ड झळकले

——-                  बायांचे मन प्रसन्न झाले

——                   पटकन, झटकन, भर्कन, सर्कन

——                    विक्री होतसे जोरात   ।।

——                    नऊ वाजता शटर उघडुनी,

——                    गाद्या, गिरद्या साफ करोनी

——                    सुंदर साड्या बाहेर टांगुनी

——                    सेल्सगर्ल्स बसल्या थाटात।।

——                    नाश्ता, सैपाक धुंदीत उरकुन

——                   ‘त्या’च्या कडुनी रक्कम उकळुनी

——                    मैत्रीणीना कॉल करूनी

——                    भरभर, तरतर, लवकर, गरगर

——                    फिरति सख्या बाजारात ।।

——                    इथे हकोबा, तिथे बांधणी,

——                    गर्भरेशमी किंवा चिकणी,

——                    वस्त्रांची राणि ही पैठणी

——                    सुळुसुळु, झुळुझुळु, हळुहळु, भुळुभुळु

——                    ढीग संपतो तासात  ।।

——                    विटकि,फाटकी, कुठेकुठे-

——                    घरि आल्यानंतर कळते

——                    कपाट जरि भरभरुन वाहते

——                    भुलवी, झुलवी, खुळावणारा

——                    सेल अखेरी महागात  ।।

 

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – अशी ही होळी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – अशी ही होळी… ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

आतंकवादा ची लाकडे

जातीयवादा च्या गोवऱ्या

धर्मांधतेचा घालून नारळ

तिरस्काराची टाकून गोळी

पेटवाहो जागोजागी होळी

 

अर्पण करू तिला द्वेषाची माळ

सदभावनेची घालून त्यात राळ

मोठा होउ द्या एकात्मतेचा जाळ

रुजवू संयमाने माणुसकीची नाळ

 

पारिवारिक स्नेहा ची पुरणपोळी

वर आत्मियतेेच्या तुपाची धार

कर्तव्य परायणतेचा कडकं वडा

वर आपुलकीची थंडाई गारेगार

 

परंपरा संस्कृतीचा तो वरणभात

संगीत ,नृत्य,विनोदाची ती चटणी

आग्रहाचा पापड ,स्नेहाचे लोणचे

मग रंगेल होळीची ती मेजवानी

 

संतांच्या शिकवणीचा तो गुलाल

लावून रंगू ,धरू ताष्यावर ताल

भिजूनचिंब पिऊ हो प्रेमाची भांग

आनंदात होळीच्या होऊ सारे दंग

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – एकदा एक सज्जन माझ्या घरी आले ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ होलिकोत्सव विशेष – एकदा एक सज्जन माझ्या घरी आले ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

एकदा एक सज्जन माझ्या घरी आले

कविसंमेलनाला चला, टी.ए. डी ए. देईन म्हणाले.

मी म्हणाले, ‘छान छान कवितेचे भाग्य उजळले

कवी मंडळींनाही आता बरे दिवस आले.’

माळ्यावर चढले, ट्रंक उघडली.

बाड काढले, धूळ झटकली.

टाळीच्या कविता शोधत, निवडत संमेलन स्थळी आले. …

एकदा एक सज्जन…

 

दारात होते किती रसिक आणि दर्दी

मागाहून कळले, ती सारी कवींचीच गर्दी

कवींनी घेरले, मंडपात नेले

रिकाम्या खुर्चीत नेऊन बसवले. ….

एकदा एक सज्जन…

 

इतक्यात ते सज्जन आले आतून

म्हणाले, ‘खुर्चीला यांना टाका खिळवून

शंभर  कविता ऐकवा मोजून

शंभर रुपये , टी.ए. डी ए.चे यांना उगीच नाही दिले.’ ….

एकदा एक सज्जन…

 

सज्जन मग कवींकडे वळून

म्हणाले, ‘आता माझे दहा -दहा रुपये, टाका बर देऊन’

शंभर कवींकडून दहा -दहा रुपये घेऊन

हजार रुपये खिशात टाकून, सज्जन गेले निघून

शंभर कवी आणि मीच तेवढी बापडी श्रोती तिथे उरले ….

एकदा एक सज्जन…

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 64 – होलिकोत्सव विशेष – नकोस देऊ आज साजना ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 64 –  होलिकोत्सव विशेष – नकोस देऊ आज साजना  ☆

 

नकोस देऊ आज साजणा भास नव्याने सारे।

आठवणींच्या मोर पिसांचे  रंग उधळती तारे।

 

मऊ मुलायम कुरणावरती प्रीत पाखरू येई।

साद घालता ओढ लाविते नित्य  जिवाला कारे।

 

शब्दतार तव नाद छेडती   धुंद जणू हे गाणे।

मुग्ध जाहला देह स्वरांनी भाव अनामिक न्यारे।

 

गुंजन करितो भ्रमर कळीशी गूज तयांचे चाले।

अधर थरथरे अवचित जुळता नयन राजसा घारे।

 

तव स्पर्शाची किमया न्यारी  गाली येई लाली।

स्पर्श फुलांचा  गंध दरवळे दाही दिशांत  वारे।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कोरोना: काही बाही ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ कवितेचा उत्सव ☆ कोरोना: काही बाही ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

(मूळ हिन्दी लेखन- घनश्याम अग्रवाल : मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर)

 

[1]

करोनामुळे कविसंमेलने रद्द झाली.

(कवींसाठी वाईट बातमी)

आता हे कवी कविता लिहू लागले.

(कवितांसाठी चांगली बातमी.)

 

[2]

कविसंमेलने रद्द झाली

जगता जगता कवी मेला.

रद्द नाही, पुढे ढकलली.

मरता मरता कवी जिवंत झाला.

 

[3]

संयम आणि सावधानीची

लक्ष्मणरेषा

तुम्ही उल्लंघू नका.

कोरोना रावण

स्वत:च लंघून येईल

आणि भस्म होऊन जाईल.

 

[4]

लग्नाच्या रात्री नवी नवरी

नवर्‍याला सोडून घरातून पळाली.

कारण?

साबणाने हात न धुता

नवर्‍याने नवरीचा  घुंघट

उचलण्याचं साहस केलं होतं.

 

[5]

एक मीटरचं अंतर

नहमीच ठेवा दोघात.

एक दुसर्‍याचा स्पर्श नको.

म्हणजे आपण कोरोनापासून

आणि देश लोकसंख्या-विस्फोटापासून

दोघेही वाचाल.

 

मूळ रचना – श्री घनश्याम अग्रवाल 

अनुवाद  –    श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवित्व ☆ सुश्री पूजा दिवाण

☆ कवितेचा उत्सव ☆ कवित्व ☆ सुश्री पूजा दिवाण ☆

कवित्व

मध्यरात्री गाढ झोपेत

स्वप्नांच्या मार्गाने

कवितेचं लखलखत झुंबर

शत- दलांनी पेटतऺ

आणि

झोपेची पार वाट लागते…..

 

बरं उठायचं नाही असं ठरवलं तर ते बिलोरी काचांचे

शब्दांचे लोभस महाल

सकाळ पर्यंत पार  विरून जातात.

अगदी दरीतल्या धुक्या सारखे

किंवा

चहातल्या बिस्कीटा सारखे……….

 

शेवटी प्रतिभेचे गुणगान गात उठणे भागच असतं

शब्दांना आंजारून गोंजारून

चाल चाल माते करत,

काटे आपल्या पायात मोडून घेत,

कागदावर उतरवावंच लागतऺ………

 

कवितेच्या कुठला फॉर्म मध्ये शब्दांना बसवायचे ?

तेही आपल्या हातात नसतं!

त्यांचे तेच घेतात हवा तो आकार.

आपण फक्त बघत राहायचं

व अर्थाची सोबत करायची……..

 

एवढे कष्ट घेतल्यानंतर

हाती आलेलं ते साजरे बाळ

मग आपल्याकडून हक्काने नावाची

अंगडी टोपडी लेऊन

कवितेच्या वहीच्या

पुढच्या पानावर बसतं

कवित्व सार्थकी लागतऺ……….

 

© सुश्री पूजा दिवाण

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवितेचे झाड… ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

☆ कवितेचा उत्सव ☆ कवितेचे झाड… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

माझ्या कवितेच्या झाडाला

विचारांच्या शाखा

शब्दांचे गुच्छ बहरती सहज

 

माझ्या कवितेच्या झाडाला

विविध रंगी फुले

रसिकतेची फुलपाखरे

बागडती सभोवती

 

माझ्या कवितेच्या झाडाची मुळे

पसरती रानोमाळ

शोषण्या अनुभवपाणी

 

माझ्या कवितेच्या झाडाचे खोड

प्रतिभेची ओल

साठली तेथे

 

माझ्या कवितेचे झाड

मनाच्या अंगणी

होते निगराणी नकळत

 

असे माझे काव्यझाड

बहरावे सदोदित

हीच माझी प्रार्थना

शारदा मातेला!

 

© श्रीमती अनुराधा फाटक

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 80 – विजय साहित्य – चाहूल ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 80 – विजय साहित्य  ✒ चाहूल ✒ ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

मी सताड उघडे ठेवले आहे

माझ्या घराचे दार.

माझ्यातले अवगुण

दिले आहेत हाकलून.

मी उघडल्यात

घराच्या सर्वच खिडक्या

पहातोय डोकावून

आणि देतोय

घालवून

वळचणीला

थांबलेले

माझ्यातलेच

काही हट्टी

चुकार दोष.

मी करतोय स्वागत

येणाऱ्या पाहुण्यांचे.

संस्कारीत , आणि

संवेदनशील

आचार विचारांचे.

घेतोय चाहूल

माझ्याच…

कलागुणांची ..

प्रसंगी हरवत

चाललेल्या

माणसातल्या

माणुसकीची….!

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जर….तर… ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ जर….तर… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

धीर धर साधना कर

किती राबतोस मरमर

जिवंत आहेस तेथ वर

सांड,मांड, पुन्हा भर

 

चढतो जैव्हा दंभ ज्वर

पिसाट होती नारी नर

छाटून टाक त्यांचे पर

तू सत्याची कास धर

 

नको बाळगू कसले डर

करून उंच आपला स्वर

विरोध करण्या बळ धर

न्याया साठी लढून मर

 

नको विसंबू कोणा वर

उचल पाऊल तुझे तर

येणाराला नक्की स्मर

बुजवून टाक सगळे चर

 

ठरव  तुझा तुच दर

खुर्ची साठी वापर जर

गादीवर अंथर फर

सत्ते साठी पुण्य कर

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print