मराठी साहित्य – जीवनरंग  ☆ सांगड… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ सांगड… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

“अंजलीताई येऊ का? ” दारावर टकटक करीत निर्मलाताईंनी आवाज दिला. ” आज इकडे कुठे अशा दुपारच्या वेळी? ” ” सहजच! एकाच सोसायटीत राहतो पण भेटीगाठी होत नाहीत,म्हणून विचार केला आज जावं झालं.” ” या! या! बसा.” अंजलीताईंनी निर्मला ताईंचं स्वागत केलं.

या निर्मलाताई ढमढेरे, शेलाट्या, सावळ्या वर्णाच्या, असतील साधारण ५५च्या पुढे, पण मुख्य म्हणजे भारीच उचापत्या. कोणाकडे भांडण झालं, कोणाची मुलगी पळून गेली,कोणी कंपनीत फ्रॉड केला अशा प्रकारच्या बातम्या सोसायटीभर पसरतात त्या निर्मलाताईंकडूनच! निर्मलाताई म्हणजे वृंदावन सोसायटीतलं चालतं बोलतं बातमी पत्र!

शेजारच्या बिल्डिंग नंबर चार मध्ये राहणाऱ्या निर्मलाताई आज इतक्या दिवसांनी सौ.अंजलीताई माने यांच्याकडे आल्या, म्हणजे नक्कीच काहीतरी खबर काढण्यासाठी आल्या असाव्यात.

श्री.व सौ.माने, उच्च विद्या विभूषित.अंजलीताई रूपारेल कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. दोन वर्षे झाली त्यांना सेवानिवृत्त होऊन.   डॉ.विद्याधर माने (पीएच.डी.) आय. आय.टी. मुंबई, येथे प्राध्यापक. मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख. आता सेवानिवृत्त असले तरी त्यांचे विद्यापीठात जाणे- येणे, पुस्तके लिहिणे ही कामे चालूच असतात. त्यांनी लिहिलेली कितीतरी पुस्तके संदर्भ पुस्तके म्हणून प्रसिद्ध आहेत.

नीलिमा आणि नीरज ही त्यांची दोन अपत्ये. नीलिमा,एम्.डी. ऑन्कॉलॉजिस्ट ( कॅन्सर स्पेशालिस्ट) म्हणून अंधेरीतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि नीरज कम्प्युटर्स सायन्स इंजिनीयर होऊन, अमेरिकेतील मॅसेच्यूसेट्स या विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं हे चौकोनी कुटुंब! त्यांच्या घरात प्रवेश केल्यावर कोणत्याही प्रकारचा श्रीमंती देखावा नाही,परंतु सरस्वतीचा वास आहे, सकारात्मक  ऊर्जा आहे असे काहीसे जाणवते आणि मन प्रसन्न होते.

दिवाणखान्यातील सोफ्यावर बसून निर्मलाताईंची काकदृष्टी अगदी घरभर फिरत असल्याचे अंजली ताईंच्या नजरेतून सुटले नाही.

“काही हवं आहे का निर्मलाताई तुम्हाला? हे घ्या थंड पाणी प्या, दुपारच्या वेळी फार गरम होतं.” काहीतरी संवाद घडावा या हेतूने अंजलीताई त्यांच्याशी बोलू लागल्या.

इकडच्या तिकडच्या जुजबी गोष्टी केल्यानंतर गायकाने जसे समेवर येऊन धडकावे त्याप्रमाणे निर्मलाताईंनी भात्यातला बाण बाहेर काढला.” बऱ्याच दिवसात तुमची नीलिमा कुठे दिसली नाही येता जाता? बाहेरगावी गेली आहे का? ती डॉक्टर झाल्याचे पेढे खाल्ले होते, त्यानंतर पुढे काहीच कळले नाही.”

माने कुटुंब काळा सोबत राहणारं.नित्य देवपूजा,

सणवार,गौरी,गणपती,संक्रांतीचे,  चैत्रगौरीचे हळदी-कुंकू,श्रावणातले उपास-तापास या गोष्टी त्यांच्या घरात अगदी रूढी,परंपरेप्रमाणे चालू होत्या, पण म्हणून त्याचे फार स्तोम  नाही. देव धर्माचा कोणताही दिखावा नाही. सद्यपरिस्थितीनुसार जुन्या चालीरीतीत योग्य ते बदल करण्याची त्यांची नेहमीच तयारी. प्रत्येक  चालीरीतीचा अभ्यास करून, त्यामागील शास्त्र समजून घेऊन त्यांच्या घरी परंपरेचे जतन होत असते. थोडक्यात हे माने कुटुंब परंपरा जपणारे सुधारक कुटुंब आहे, त्यामुळे निर्मलाताईंच्या प्रश्नाला खरे उत्तर देण्यास मागेपुढे पाहण्याची अंजलीताईंना काहीच गरज वाटली नाही.त्यांनी सत्य परिस्थिती अगदी खुल्या दिलाने निवेदन केली.

“अहो निर्मलाताई, नीलिमा आता इथे आमच्या सोबत राहत नाही. रोज अंधेरीला अपडाऊन करणे फार त्रासाचे असल्यामुळे, तसेच रात्री-बेरात्री जावे यावे लागत असल्यामुळे तिने कोकिळाबेन हॉस्पिटल जवळच टू बीएचके फ्लॅट घेतला आहे आणि ती व तिचा पार्टनर दोघे तिथेच राहतात.”

निर्मलाताईंना आश्चर्याचा धक्का बसल्याचे अंजलीताईंच्या तात्काळ लक्षात आले.” म्हणजे लग्न कधी झालं? आम्हाला काहीच माहित नाही!” ” लग्न नाही झालं अद्याप,परंतु गेले वर्षभर दोघे एकत्रच राहत आहेत. एकत्र राहून त्यांची पार्टनरशिप परस्पर पूरक आहे की नाही,दोघांचे स्वभाव,दोघांच्या आवडीनिवडी,एकमेकांना समजून घेणे या आणि अशा गोष्टी व्यवस्थित जुळल्या तर लग्न बंधन स्वीकारायचे असे त्या दोघांनी ठरविले आहे. “

अंजलीताईंनी निर्मलाताईंच्या शंकेचं निरसन केलं.

“हे तुम्हा दोघांना मान्य आहे?”

“अहो,आमच्या मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे? मुलं चांगली जाणती आहेत, आपल्याहून त्यांना सर्वच बाबतीत अधिक ज्ञान आहे. नीलिमाने आमची पंकजशी ओळख करून दिली आहे.तोही हार्ट सर्जन आहे,चांगला देखणा रुबाबदार आहे. त्याचे वडील नाशिकमध्ये एक नामांकित डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. एकंदरीत सर्वच चांगलं आहे.  मग तुम्हीच सांगा आम्ही काय फक्त विरोधासाठीच विरोध करायचा का?”  अंजलीताई नीलिमाताईंना त्यांची परखड मते सांगत होत्या.

आपल्या संस्कृतीप्रमाणे लग्न  संस्थेवर त्यांचा विश्वास आहे परंतु  जुन्या रुढीला चिकटून बसणे त्या दोघांनाही मान्य नाही. नुसत्या पत्रिका जुळवून आणि एक दोन भेटीत मुला मुलींची खरी ओळख आणि स्वभावाची पारख कधीच होत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्या निर्मलाताईंना सांगत होत्या,  “आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. कितीही शिकलो सवरलो तरी आपण बायकाच नेहमी पडती बाजू घेऊन संसार सांभाळत होतो,पण आता तसं नाही.मुलगा आणि मुलगी दोघेही समान पातळीवर कामं करतात. अशा परिस्थितीत त्यांची मतं जुळली नाहीत,त्यांच्यातील वाद सतत वाढत राहिले तर त्याची परिणती काय? तर दोघातील फारकत! तशात एखाद दुसरं मूल असलं तर त्या निरपराध बालकाची अवस्था फारच केविलवाणी! ही परिस्थिती लक्षात घेता काही काळ एकत्र राहून एकमेकांना नीट ओळखूनच लग्न केलेलं चांगलं असं आता आमचंही मत आहे.”

मान्यांची डाॅक्टर कन्या नीलिमा ही तिच्या boy friend बरोबर लिव्ह इन मध्ये राहत आहे ही बातमी आता वार्‍यासारखी संपूर्ण सोसायटीत पसरणार याची अंजलीताईंना पक्की खात्री आहे.

नवा जमाना, नवे विचार! ते दोघे लग्न करणारच आहेत यातच श्री व सौ माने यांना समाधान आहे.

लोक काय म्हणतील याची त्या दोघांना पर्वा नाही. त्यांच्या मुलीवर आणि तिच्यावर झालेल्या संस्कारांवर दोघांचाही पूर्ण विश्वास आहे.

जुन्या नव्याची सांगड घालून  ते दोघे आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत…

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जत्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ जत्रा…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तीन वरसात एकडाव भरणारी म्हसोबची जत्रा अगदी तोंडावर येऊनश्यान ठेपल्याली. तस गावच पोलीस पाटील मल्लप्पा काळजीत हुतच ! त्यांनी गजू ला ताबडतोब बोलवून घेतला अन लगोलग  गजुला, गावच सरपंच शिवगोंडा पाटील कड निरोप धाडला. गजू पटलांच्या वाड्यावर लै जुना गडी. पन कामात इमानदार ! त्यानं कैक वर्स वाड्याव काम केल्याल. तडक  चावडीवर पंचांना निरोप द्याय गेला.

मल्लप्पा पाटील अंकली गावचं लै बडी असामी, मोठं जंक्शन  परस्थ ! गडी सहा फूट उंच आडदांड बांधा, गव्हाळ रंग दुटंगी धोतार, बाराबंदी, डोईस मोठा फेटा, फेट्याचा शेमला लांबलचक मागून डाव्या खांद्यावर म्होर आलेला, नाक फेंदारलेलं, नाकाखाली ह्ये लफ्फेदर मिश्या, मिश्याना पीळ, कानां म्होर कल्ले, गडी निबार, खर कडक शिस्तीचा ! घरी नोकर चाकर, जमीन जुमला, ऐसपैस टोलेजंग वाडा, गाई म्हसरांची  मोठी दावण, अस सगळं मोठं काम हुत.

गजु सरपंचांना पाटलांचा निरोप देऊन आला, अन म्हणाला ” तुम्हाला सरपंचांनी टकोटक बोलावलं ” तस पाटील बी लगेच उठलं, पटका गुंडाळून शेमला पुढं टाकला व सुपारी कातरुन दाढत धरली, पान पण चुना लावुन तोंडात टाकलं वर अब्दार तामकुची चिमट टाकली घोड्यावर मांड टाकून चावडी जवळ केलीच.

चावडीत गेल्या गेल्या समदी लोक उभारून पाटलासनी नमस्कार केली. आतल्या खोलीत पाटील गेलं, शिवगोंडा पुढं येऊन अदबीने नमस्कार केला व बैठक बसली. तस सरपंचांनी चहाची ऑर्डर सोडली, डायरेक्ट मुद्द्याला हात घालत सरपंच म्हणलं ” काय बी काळजी करू नगा पाटील साहेब !

म्या आजच  मिटिंग बोलावतो व जतरची समदी तयारी करून घेतो. अस म्हणल्याव पाटलांचा जीव भांड्यात पडला. चहापाणी झालं तस सरपंच म्हणलं फकस्त तुम्ही बळी द्यायचा रेडा तयार ठेवा. जत्रा भन्नाट भरवितो. पाटील आलं तस घोड्यावरन गेलं.

सांच्याला समद्या पंचांना अवतांण दिल तशी लगोलग समदी जमा झाली.

समद्याना विषय माहीत हुताच ! फकस्त कामाची वाटणी तेवडी शिल्लक हुती.

चहा पाणी झालं तस, सरपंचांनी समद्या कामाची वाटणी बी आधीच करून ठेवल्याली हुती.  फकस्त त्यांना ते काम सांगायचं हुत.

तस त्यांनी प्रत्येक पंचाला  ते ते काम सोपवलं व मिटिंग सम्पली.

गण्या उठला अन म्हनला पंच रेड्याच काय ? त्यावर शिवगोंडा म्हनले रेड्याचा मान खायम पाटलांच्याकडे अस्तुया नव्ह ? तस न्हाय म्हणायचं मला  गणू विनाकारण खाकरत म्हनला, एक रेडा माझ्या बी घरी हाय नव्ह ! मुद्दाम त्याला मी बाजार दाखवला न्हाय.

शिवगोंडा- मग तस जाऊन पाटलासनी सांग की. हाय काय न्हाय काय.

गणू – तस नव्ह पंच तुम्ही संगीतल्याल जरा येगल पडतंय ! पंच हसत म्हनलं जा जा सांगतु मी त्यांना !

त्यावर गणू म्हनलं न्हाई म्हंजी त्यांना तसा सांगावा द्या की, म्हंजी दुसरीकडं बाजार हिंडाय नगो त्यासनी.

ते बी खरच म्हणा ! अस पंच म्हटले अन समदीजन उठून जतरच्या कामाला  लागली.

गावच्या गटारी साफ करायला यल्लप्पा, मल्लपा रुजू झाले. रस्ता साफ कराया गावकुसाबाहेरच्या बायका कामाला लागल्या.

इजेच्या डांबवर नवीन बलब घालण्यात आले.

गावात डांगरा पेटवून, समद्याना कळवण्यात आलं.

म्हसोबाच्या देवळा म्होर स्वच्छता करण्यात आली. आजूबाजूला मंडप घालून कनाती बांधण्यात आल्या.

बैलगाडीत हौद घालून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. जवळपासच्या गावात आवतान धाडण्यात आलं. माहेरवाशिणी अन पै पाव्हन जमलं तस वाहनांन येऊ लागली ! गावात समदीकडे फरफर्या लावण्यात आल्या म्हसोबाच्या देवळाला बाहेरून आतून रंगरंगोटी करण्यात आली. गावात कस निस्ता  उत्साह संचारला व्हतंच ! पोर बाळ रस्त्यावर हिंदडू लागली. दिवस जवळ येईल तस. प्रत्येकानं मागून घेतलेला नवस फेडीत व्हता.

म्हसोबाचा पुजारी रात अन दिस भर बसू लागला !  त्याला मदत घरच्याची बी मिळू लागली !  भानुदास पुजारी वयान तस म्हातर पन तस त्यांच्या अंगाकड बघितलं तर जाणवत नव्हतं! धोतर अन गळ्यात मुंडीछाट कपाळावर भंडारा ! त्याची कैक डोई म्हसोबाच्या सेवा करण्यात गेल्याली ! चेहऱ्यावर कायम हसत बोलणं. त्याला देवस्थानची दहा एकर जमीन बी कसून खात व्हता. तस त्याला काय बी कमी नव्हतंच !

देवा म्होर रोज वाजत गाजत लोक येत अन आपला बोलेला नवस पुरा करत ! मग कोण देवाच्या नावं गाय सोडीत कोण वासरू ! कोण बैल ! अस हे रोज चाल्याल हुतच!

रस्त्याच्या दोन्ही बाजून  जागा मिळेल तस दुकान सजत व्हतीच ! त्यात देवा म्होर नारळ, कपूर, उदबत्त्या, प्रसाद म्हणून बेंड बत्तास, पेढे चिरमुर ! त्याला लागून देवाच्या मूर्तीच अन टाक असल्याला दुकान ! त्यांच्या खालत देवच फोटू असल्याला फ्रेमच दुकान ! मग  ओळींन बांगड्यांची दुकान त्याच्या खालोखाल भांड्याची दुकान, मग शेवटी मुलांच्या खेळण्याची दुकान.

बाजूला मोठं पटांगण त्यात मुलांना बसायला पाळण ! गोल फिरत्याल घोड खुर्च्या. अन घसरगुंडी !

अस समदी जत्रा भरल्याली !

लागून पाच सात होटेल चहाच गाडे, भेळ, वडा पाव, त्यातच गारेगारची सायकल, रंगीबेरंगी बर्फाचा गोळा, उसाचा रस, सोडालेमनच दुकान ! अस हे समद वरश्या परमान झ्याक जुळून आल्याली जत्रा.

त्यात हावसे नवसे गवसे लोक हिंडत व्हतीच ! बाया बापड्या लेकरं चिल्ल पिल्लं समदी  जण मजा घेत व्हते.

शाळेच्या माग तमाश्या पण आलेला, येक टुरिंग टाकीज पण बसकण मारल्याली व्हतीच की ! जे जे पाहिजे ते ते वरसा प्रमान झाल्याल व्हत ! आता फकस्त भंडारा उधळयाच व्हता, रेड्याचा बळी दिला की झालं ! जतरा पार पडणार व्हती.

घरोघरी  पक्वांन्न शिजत व्हती, त्याचा वास गल्लीतन फिरत व्हता. जत्रेचा मुख्य दिवस उजाडला. जो तो आनंदात व्हता, ठेवणीतील कपड घालुनश्यान जो तो घरातील निवद देऊन येत व्हता. गर्दी ज्याम वाढल्याली, भंडारा जो तो उधळत व्हता, समदी रस्ते, गल्ल्या पिवळधमक झाल्याल !

देवळा म्होर तर नारळाच्या भकलाचा खच पडलेला ! भानुदास पूजऱ्याच्या कणग्या निवदान

काठोकाठ भरलेल्या व्हत्या ! हाताखाली घरची समदीजन मदत करत  व्हतीच. तरी बी लोकांना आवरण जिकिरीचं झालं व्हत ! आवंदा तर गर्दी इपरित जमल्याली. समदिकड भांडऱ्यांन पिवळा चिखल झाल्याला ! भंडारा अन नारळाचं पाणी घ्या की !

सांच्याला रेड्याचा बळी बरुबरीन सहा वाजता द्यायचा व्हता ! चालरीतच तशी व्हती. हिकडं गण्याचा रेडा गावच्या पाटलांनी चांगली बोली देऊन इकत घेतला हुता ! त्यापायी गण्याबी लै खुषीत हुता !

त्या रेड्याला स्वच्छ धुवून श्यान पाठीवर झुल घाटलेली ! गळ्यात मोठा झडूंच्या फुलांचा हार ! घातला. डोईला भंडारा फासलेला गळ्यात दोन्ही बाजूला दोरखंड बांधलेलं.

दोघा रामोश्यानी त्याला गच्च धरलेल् ! त्याला गावातून मिरवत नन्तर मग देवीम्होर बळी द्यायचा व्हता !

शेवटचा घास म्हणून पाटलीनबाई आल्या, त्याला पाच पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या ! बादलीभर पाणी पाजलं अन त्याला पाच सवाष्णीन ओवाळल !

दुपारचं 3 वाजता पाटलांचा रेडा वाड्या भैर पडला ! म्होर ढोल ताशा, अन सुंदरी वाजवणार कोर्वी लोक हुतच ! त्याच्या म्होर धनगराच् ढोल पथक ! त्याच्या म्होर गावठी बँड वाजवणंर  लोक ! मध्येच कोणतरी नाचत हुता, त्याच्या अंगावर चिरमुर अन चिल्लर टाकली जात हुती !

भंडारा तर पोत्यानी फेकला जात व्हता !

मिरवणूक एकेक गल्ली तुन भैर पडत हुती मध्येच काही घरातल्या बायका रेड्याला पुरण पोळी चारवत हुत ! अशी ही जंत्री कसबस गावातून मिरवत देवाम्होर आली तवा सांच्याला दिवस मावळतीला कलला व्हता.

सांच्याला सहाला काही अवधी हुता, तस म्हसोबा म्होर रेड्याला उभं केलं !  सगळी कडे शांतता पसरली ! वाद्य बँड ढोल समद बंद पडल !  भानुदास पुजारी लगबगीनं म्होर झाला. त्यानं रेड्याच्या पायावर पाणी घातलं. म्हसोबच्या अंगावरील हार रेड्याच्या गळ्यात घातला ! बुट्टी भरून ठेवलेल्या निवदाच्या पुरण पोळ्या रेड्याला खायला दिल्या. त्याच्या अंगावरची झुल काढून त्याच्या वर समदिकड भंडारा उधळला !  तस इतर जमलेल्या लोकांनी बी  इतका भंडारा उधळला की, रेडा बिथरला ! अन एकदम मानेला जोरात हिसका दिला ! तस त्याला दोरखंडानी धरलेलं रामोशी उत्तान पडलं ! त्यांच्या डोळ्यात भंडारा गेल्यान त्यांना बी काय झालं ते कळलं न्हाय ! जनावर बिथरल्याल त्यांनी जी मुसंडी मारली ती दहापाच जणांना तुडवून अंगात वार शिरल्यावनी पळून गेल ! — त्याच्या माग गावाची लोक काही पैलवान पळत व्हत पण —- ते कुठं पळून गेल ते शेवट पत्तर कळलं नाही !  पूजाऱ्याला तर भोवळ आली अन ते एका कोपऱ्यात पडलं !

झालं जो त्यो गण्याचा नावानं बोंब मारत व्हता ! एवढमातूर खर !

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “डिंपी” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “डिंपी” ☆ श्री मंगेश मधुकर 

रुटीनपेक्षा वेगळं म्हणून मैत्रिणीच्या आग्रहावरुन सामाजिक संस्थेतल्या कार्यक्रमाला गेले.तिथं एका सोशल क्लबच्या श्रीमंत सभासदांकडून संस्थेतील मुलांना खाऊ,कपडे,भेटवस्तूंचं वाटप सोबत फोटोसेशन चालू होतं.सुशिक्षित अडाण्यांच्या एकेक तऱ्हा गमतीशीर होत्या. सामाजिक कार्याचा दिखाऊपणा पाहून वाईटही वाटलं.त्या लोकांमध्ये साधारण उंची,स्थूल वजनदार शरीर,कपाळावर भलं मोठं कुंकू,डोक्यावर पदर,हातात मोबाईल,कमरेला चाव्यांचा जुडगा असा अवतारातल्या एकीनं लक्ष वेधलं.सतत बोलत असलेल्या तिच्या वागण्यात नाटकी विनम्रपणा होता.ती प्रत्येकासोबत फोटो काढत होती.चेहरा ओळखीचा वाटला.उत्सुकतेपोटी जवळ गेले.नमस्कार करताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव सरसर बदलले.एकदम ती ओरडली “सुमे,तू!! इकडं कुठं”

“सॉरी,मी ओळखलं नाही”

“अगं मी डिंपल,डिंपी” नाव ऐकून जबरदस्त धक्का बसला.एकटक पहातच राहिले.मन थेट कॉलेजच्या दिवसात जाऊन पोचले.डिंपी,माझी कॉलेजमधली बेस्टी!!बोल्ड,बिनधास्त,टॉमबॉय,उत्साही,आक्रमक स्वभावाची,बडबडी,भांडणाला न घाबरणारी,कायम जीन्स-टॉपमध्ये पाहिलेल्या डिंपीचा बदललेला अवतार सहज पचनी पडला नाही.

“ओळखलंच नाही गं”

“काकूबाई दिसतेय ना”

“तर काय?कुठं ती मॉडर्न डिंपी आणि कुठं ही टिपिकल..”

“वो भी एक दौर था,ये भी एक दौर है. हालात ने लिबास के साथ साथ मुझेभी बदल डाला.”

“अरे वा,डायलॉग मारायची सवय अजूनही आहे.”

“कुछ पुराना साथ हो तो जिंदगी आसान हो जाती है”इतरांशी मराठीत बोलणारी डिंपी माझ्याशी मात्र बऱ्याचदा हिंदीतून बोलायची.

“ये भी सही है” मीपण हिंदीतून प्रतिक्रिया दिली

“ये डायलॉगही तो अपना स्पेशलिटी था.इसी वजह से कॉलेज मे फेमस थे”

“निवांत कधी भेटतेस.”

“फोन नंबर दे.आज बिझी आहे.उद्या कॉल करते.” निरोप घेऊन निघताना पाहिलं तर डिंपी पुन्हा नमस्कार आणि फोटो मध्ये हरवलेली.

—-

दुसऱ्याच दिवशी सकाळीच डिंपीचा फोन.खूप वेळ बोललो.त्यानंतर रोजच फोनवर बोलणं व्हायचं तरी समाधान होत नव्हतं.खूप दिवसांचा बॅकलॉग होता.शहराजवळच्या तिच्या फार्म हाऊसवर जायचं ठरलं.डिंपी गाडी घेऊन आली.फार्म हाऊसला पोचल्यावर “संध्याकाळी न्यायला ये.फोन करते” ड्रायव्हरला सांगून डिंपीनं गाडी परत पाठवली.

“कशाला उगीच ये-जा करायला लावतेस.त्याला इथंच थांबू दे की..”

“आज का दिन अपना है.कोई डिस्टर्ब नही चाहिये” ड्रायव्हर गेल्यावर डिंपीनं कडकडून मिठी मारली.वीस वर्षांचा दुरावा क्षणार्धात नाहीसा झाला.डोळे भरून आले.दोघी खूप भावुक झालो.

“आयुष्य पण कसय ना.त्यावेळी एक दिवस भेटलो नाही तरी करमायचं नाही आणि आता थेट वीस वर्षांनी भेटतोय.”

“वक्त सबकुछ बदल देता है.तुम रहे ना तुम,हम रहे ना हम!, डिंपी.

“तुझ्याकडे बघून शंभर टक्के पटलं”

“हा वो तो है,पर तू ज्यादा कुछ नही बदली.”

“थॅंक्स,आम्हां मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात फार मोठे असे बदल होत नसतात.सरधोपट आयुष्य!!”

“मेरा बिलकुल उलटा है.पिढीजात श्रीमंती असलेल्या घरात जन्म,पहिली बेटी धनाची पेटी म्हणून खूप लाडात वाढले.जे मागितलं ते मिळालं परंतु घरात जुन्या चालीरीती,रूढी,परंपरा यांची घट्ट साखळी पायात बांधलेली होतीच.कॉलेजमध्ये कितीही बिनधास्त असले तरी घरात अनेक बंधनं होती.मुलगी म्हणजे परक्याचं धन असं समजणारी टिपिकल फॅमिली. बाकी सर्व गोष्टी मॉडर्न असल्यातरी विचार मात्र..”डिंपी एकदम बोलायचं थांबली.

“ते तर बाईच्या जातीला नवं नाही.सगळ्याच घरात कमी जास्त प्रमाणात हे असतचं.”

“पण आमच्यासारख्यांच्या घरात जरा जास्त असतं.पुढं शिकायचं होतं.लॉ करायची खूप इच्छा होती.ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच घरच्यांनी मुलं शोधायला सुरवात झाली.माझी इच्छा कोणीच विचारली नाही.पहायला आलेल्या पहिल्याच मुलानं पसंत केल्यावर मीसुद्धा ताबडतोब होकार द्यावा यासाठी प्रेमानं,धाक दाखवून, समजावून हरप्रकारे दबाव आणला गेला.विनाकारण वाद घालून हाती काही पडणार नव्हतं म्हणून मी होकार दिला.जीन्स,टॉप,फॅशनेबल ड्रेसेस यांच्यासोबत स्वप्नं,इच्छा,अपेक्षा यांचं गाठोडं बांधून माळ्यावर फेकून दिलं. आणि आयुष्यातली सर्वात मोठी तडजोड करून बोहल्यावर चढले.नवरासुद्धा टिपीकलच निघाला.स्वभावानं वाईट नाहीये पण त्याला कधी बायकोचं मन समजलं नाही.कायम गृहीत धरतो.सुरवातीला त्रास झाला नंतर सवय झाल्यावर आयुष्याबरोबर वाहत राहिले.दोन मुलं जन्माला घातली.वारस मिळाल्यानं सासरी आनंदी आनंद,अजून एक टेंशन दूर झालं.जसं माहेर तसंच सासर.. जागा आणि माणसं बदलली बाकी सगळं तेच……..”

“डिंपे…”

“सुमे,आज बोलू दे.मनात खूप साचलयं”

“सासरी काही त्रास?”

“अजिबात नाही.सगळी सुखं हात जोडून सेवेला उभी आहेत.माझी दोन्ही लेकरं हाच काय तो मोठा आधार.

नवरा चोवीस तास धंद्याच्या विचारात.सासू देवधर्मांत तर सासरे धंदा आणि समाजसेवा यात गुंतलेले या तिघांच्या सेवेशी मी..” डिंपी भकास हसली.

“मग प्रॉब्लेम काय आहे”

“साडी,सर के उपर पल्लू,बार बार हात जोडना और पैर छू लेना इससे आप बहोत संस्कारी दिखाई देते हो.शादी के बाद यही तो सब कर रही हू.दम घुटता है.समय बदल गया.बच्चे बडे हो गये पर अभी भी मै वही के वही…”

“म्हणजे हे सगळं मनाविरुद्ध करतेस”

“मेरी जान,करना पडता है.एवढं शिकले पण काही उपयोग नाही.आमच्यात बायकांनी नोकरी करणं मान्य नाही.धंद्यात लक्ष घालायची गरज नाही.बाईनं फक्त घर,मुलं सांभाळावी एवढीच अपेक्षा आणि तोच अलिखित नियम”

“सगळं व्यवस्थित होईल.”

“सुमे,उगीच खोटी आशा दाखवू नकोस.चांगलं माहितेय की मरेपर्यंत हे असंच चालू राहणार.बोलल्यामुळं छान वाटलं.अगदी देवासारखी भेटलीस.इसीलिये लाईफ मे पुराने दोस्त होने चाहिये..थँक्स डियर” भरल्या डोळ्यांनी डिंपी बिलगली.लौकिक अर्थानं सर्वसुखी आयुष्य असलेल्या डिंपीच्या वेदनेचा ठणका माझ्यापर्यंत पोचला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महाभोजन तेराव्याचे… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ महाभोजन तेराव्याचे… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(गण्याने त्याला आपल्या हॉटेलात नेऊन पाहिले, पण आपा पैसे लंपास करू लागला,गिर्हाईक बरोबर हुज्जत घालू लागला.) –इथून पुढे 

शेवटी एकदाचा आपा दोन पैसे कमावू लागला म्हणून गण्या आणि त्याची बायको खूष झाली. पण ते गवंडी पण व्यसनी, मटका खेळणारे, त्याच्या नादाला लागून आपा दारू सोबत मटका लावायला आणि गुटखा खायला लागला.

अधूनमधून दारू पिऊन गण्याला मारू लागला, जमीन आपल्या नावावर करून दे म्हणून भांडू लागला.

मी निवृत्त झालो आणि मी आणि पत्नी पुण्याला आलो, पुण्याला आमची लग्न झालेली कन्या होती, तिच्या जवळच मी आम्ही दोघासाठी ब्लॉक घेऊन ठेवला होता.

मी पुण्याला आलो तरी मला गावातील बातम्या कळत होत्या, माझा शेजारी अतुल मला वाडीतील सर्व बातम्या कळवत होता,.

अचानक एक दिवस मला गण्याचा फोन आला.

गण्या -काकानू, झिलाचा लगीन ठरवलंय. कट्ट्याची मुलगी असा

मी -अरे पण तो बरो आसा मा, नायतर दारू मटको..

गण्या -माऊली  शप्पत सगळा सोडल्यानं, आत रोज घराक येता आणि घरात काय तरी हाडता. काकानू, मी हाटेल बंद केलंय, माका आणि बायलेक झेपणा नाय हो. तुमका म्हाईत आसा मा माका दमो आसा आणि बायलेक चलाक जमणा नाय.

मी – ता माका माहित आसा, तुझो दमो चळवलॊ काय तुका रातदिस झोप लागणा नाय.

गण्या -होय हो, म्हणान हाटील बंद केलव आत आपाचा लगीन झाला की नातवाक खेळवीन रवान.

शेवटी आपाचे लग्न झाले, बायको होती कलिसावळी पण धड धाकट होती. आम्ही दोघे आणि अर्पिता लग्नाला गेलो, मोठा आहेर केला, दोघांना आशीर्वाद दिला आणि चार दिवस राहून परत आलो.

पंधरा दिवस झाले आणि वेगळ्याच बातम्या ऐकू येऊ लागल्या, आपाची बायको भलतीच आगाऊ होती, ती आपाच्या खिशातून पैसे काढू लागली आणि आपल्या भावाला पाठवू लागली. त्यावरून त्यांची भांडणे सुरु झाली, आपा परत भरपूर दारू पिऊ लागला आणि घरातील सर्वाना शिव्या देऊ लागला.

एवढे दिवस त्याचे आईबाबा गुमान ऐकायचे पण आत त्याची बायको त्याच्याशी वाद घालायची, त्यामुळे तो तिला मारायचा. एकदा आपा असाच दारू पिऊन आला आणि बायको बरोबर भांडण, मग तिचे मोठ्याने ओरडणे यातून आपाने कोयत्याने बायको वर वार केले. ती रक्तबंबाल झाली. तिला सरकारी हॉस्पिटल मध्ये नेऊन तिची जखमेवर उपचार झाले.

आपावर पोलीस केस झाली, पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारले. मला कळले तसें इस्पेक्टर माझ्या ओळखीचा असल्याने त्याला सांगून जामीन मिळवून दिला, आपा जमिनावर सुटला पण केस सुरु झाली.

या घटनेमुळे त्याची बायको माहेरी निघून गेली. रोज पोलीस स्टेशन ला जावे लागत असल्याने आपा काही दिवस गप्प होता, पण हळूहळू त्याचे पिणे सुरु झाले.

मी गणपती ला गावी गेलो तेंव्हा माझ्या लक्षात आले गण्या आत पार थकला आहें. एक तर त्याचा दमा आणि मुलाने उधलेले हे गुण.गण्याची बायको पण खूपच म्हातारी दिसू लागली. गण्या मला भेटायला आला आणि रडायला लागला.

“काकानू, तुमी माका वर काढलात, मी हाटेलात गडी होतय तो हाटीलचो मालक बनवलात, ही तुमच्या पावन्याची जागा घेऊन दिलात, माज्या लग्नात खर्च केलत. पण माझ्या झिलान माजो सगळो संवसार मातीत घालवल्यानं ‘

गण्या रडू लागला. माझी बायको त्याची समजूत घालू लागली

“तुम्ही तरी काय करणार, तुम्ही त्याचे लग्न करून दिलात, घर बांधून दिलात, पण त्यालाच ही व्यसने लागली आणि…

गण्या रडतरडत गेला. मी बायकोला म्हणालो “गण्या फार दिवस काढेल असे वाटतं नाही ‘.

बायको म्हणाली “तसे झाले तर गण्याच्या बायकोचे फार हाल होतील. पण एक करता येईल तिला आपल्याबरोबर नेता येईल. पण आत ती येणार नाही ‘

आम्ही पुण्याला परतलो आणि तीन महिन्यात गण्या गेल्याची बातमी समजली.मला फार वाईट वाटले. ऑफिस मध्ये चहा भजी घेऊन येणारा गण्या, मग स्वतः चें हॉटेल काढणारा गण्या, लग्न केलेला आणि बायको सह बिऱ्हाड केलेला गण्या, मग गावात जमीन घेऊन घर बांधणारा गण्या आणि मागच्या वेळी गावी गेलेलो तेंव्हा मुलाच्या व्यसनाने थकलेला गण्या डोळ्यसमोर येत राहिले.

गण्याच्या आठव्या दिवशी आम्ही दोघे गावी आलो, घर उघडून झाडू मारत असताना आमचे घर उघडे पाहून मोठमोठ्याने रडत आपा आला आणि माझ्या पायावर पडून डोकं आपटू लागला “काकानू, माजो बाबा गेलो हो…., तेका सुखात ठेवतालाय असतंय… पण म्हदीच गेलो हो..माजी बाईल माहेरक जाऊन रवली तेंच त्यांना टेन्शन घेतला हो..

मी त्याला उठवून गप्प केला. माजी बायको त्याला म्हणाली

“झाले ते झाले, आत बाबा येणार आहें का, तूझ्या व्यसनाला कंटाळला तो, त्यात रोज तूझ्या शिव्या आणि आईबाबांना मारहाण.. कसा जगेल तो..

त्याबरोबर माज्या बायकोच्या पायावर पडून भोकाड पसरून तो आपल्या तोंडात मारून घेऊन लागला.

“होय गे काकी, माजा चुकला गे.. माज्या बायलेन तेका टेन्शन दिल्यानं..

माज्य्वार केस घातल्यानं..माका पोलिसांनाकडसून मारुक लावलायन.. आणि तो त्याच्या बायकोला शिव्या देऊ लागला.

थोडया वेळाने आपा गेला, माझा शेजारी मनोहर मला भेटायला आला. तो मला म्हणाला ” अरे ह्याच्या रडण्यावर जाऊ नकोस, हा आपा बाबाचे तेरावे घालतो आहें, विजू भटजीला विचारून आला आहें. तेरावे लहान सहन नाही, अख्या गावाला आमंत्रण देणार आहें.

मी म्हणालो “अख्ख्या गावाला तेराव्याला जेवणाचे आमंत्रण, म्हणजे हे महाभोजन झाले.

” होय, महाभोजन तेराव्याचे ‘

“अरे पण एवढा खर्च कोण करणार?

“खर्च? खर्च गाव करणार.

“पण ह्याच्या बापाच्या तेराव्याचा जेवणाचा खर्च गाव कशाला करेल?

“अरे बाबा, आत तुझ्याकडे भोकाड पसरून रडू लागला ना, तसा गावात सगळीकडे भोकाड पसरतो, थांबायचे नाव घेत नाही मग कोण दोनशे कोण पाचशे कोण दहा किलो तांदूळ कोण नारळ असे गेलय चार दिवसात भरपूर जमा केले आहें त्याने, आहेस कुठे तू /

मी डोक्याला हात लावला, पुढील दोन दिवस असेच भोकाड पसरून आपाने अजून पैसे, तांदूळ, डाळ, नारळ जमा केले.

तेराव्या दिवशी सकाळ पासून लाऊड स्पीकर लावला आणि ओळखीच्या लोकांना बोलावून मोठया चुली पेटवलंय आणि सकाळपासून मोठमोठी जेवणाची शिजवलेली भांडी उतरवाली.

भटजीनी त्यांचे काम आटोपले, कावळा पिंडला शिवला नाही म्हणून दर्भाचा कावळा शिववला आणि मग सुरु झाले, “महाभोजन तेराव्याचे ‘.

कुठून कुठून माणसे येत होती, आपाला येऊन मिठी मारत होती मग आपा भोकाट पसरून रडत होता, येणारा बिचारा त्याच्या रडण्याने गहिवरून जात होता, जेवण जेवत होता, जाताना आपाच्या खिशात नोट सरकावत होता.

गण्याचे तेरावे करून आम्ही दोघे पुण्याला जाताना गण्याच्या बायकोला भेटायला गेलो. तिथे अजून काही लोक भेटायला आली होती, त्यातील एक बाई गण्याच्या बायकोला म्हणाली “कसय असो पण आपाने बापाशीच्या तेराव्याक गावक जेवणं घातल्यानं अगदी महाभोजनच.’

गण्याची बायको रागाने बोलली “महाभोजन घालीत तर काय, माज्या नवऱ्याने दोन तोळ्याचा मंगळसूत्र घातलेल्यानं, ता भांडण करून नेल्यानं आणि विकल्यानं, त्या पैशाचा जेवणं गावक घातल्यानं ‘

एव्हड्यात माझी पत्नी बोलली “मग तेराव्यासाठी गावातील अनेकांनी पैसे, धान्य दिले ते? आम्ही पण दोन हजार दिले?

“ते याच्यासाठी ‘गण्याच्या बायकोने उजव्या हाताचा अंगठा ओठाला लावला आणि डोक्याला हात लावला.

– समाप्त – 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ महाभोजन तेराव्याचे… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ महाभोजन तेराव्याचे… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

पाठीमागच्या घरातून खूपच आरडा ओरड ऐकू येऊ लागला, म्हणून मी बायकोला विचारले “काय चालले आहें शेजारी, तिन्ही संजेला एवढा आवाज?’

“हे नेहेमीचे आहें, तुम्ही या वेळेला घरी नसता, आज घरी आहात म्हणून नवीन, आपा रोज दारू पिऊन येतो आणि मग म्हाताऱ्या म्हातारी बरोबर भांडण, शिव्या, मारझोड.. नेहेमीचंच.’

“पण काय घाणेरड्या शिव्या देतो हा आपा, आपल्याच आईला आणि बाबाला?

“कर्मभोग आहेत म्हाताऱ्यांचे, आणि काय?

एवढ्यात आपाची म्हातारी आई लंगडत लंगडत आमच्या घराच्या मागच्या बाजूला आली आणि मला हाका मारू लागली

“काकानू, तुमी तरी तेका सांगा कायतरी, कोयतो घेऊन मारुक इलोवा बापाशिक,खून चढलोवा तेच्या अंगात, कोयतो घेऊन मागसून धावता, काय तरी तेका सांगा ‘ अस म्हणून ती रडू लागली.

माझ्या बायकोने तिला घरात घेतले आणि पाणी आणून दिले.

मी बाहेर आलो आणि आपाच्या आईला म्हणालो ” काय कशासाठी कोयतो दाखवता?’

“काय सांगा काकानू, होयती दहा गुंठे जमीन आसा, ती आपल्या नावावर करून द्या, म्हणून भांडता..’.

मधेच माझी पत्नी बोलली “आपाच्या आई, जमीन तेच्या नावावर करून देव नको हा,तेचा नावावर जमीन केलास की तो विकतालो आणि पैसे दारूत उडवातलो.’

“होय गे बाये, म्हणूनच काय झाला तरी हेच्या नावावर जमीन करू नकात आसा हेन्का सांगलंय, म्हणून हो गाळी घालता आणि मारुक येता, आत आमी म्हातारी झालेव मा. काकानू, तुमी तेका जरा दम देवा, तुमका तो भियता ‘.

सर्वाना शिव्या देणारा आणि कोयता दाखवणारा आपा मला मात्र घाबरून असायचा, एक तर माझ्या शिक्षणाला तो घाबरत असायचा किंवा मी पोलीस  डिपार्टमेंट मध्ये नोकरीस असल्याने आणि माझी गाडी रोज पोलीसस्टेशन बाहेर उभी असते, हे त्याला माहित असल्याने असेल, पण माझ्या शब्दावर तो उत्तर दयायचा नाही.

मी आपाच्या आई पाठोपाठ बाहेर आलो आणि एक मोठी काठी घेऊन त्याच्या घराकडे आलो..

मी त्याच्या घराजवळ येऊन “कोणाची गडबड सुरु असा रे ‘ अस म्हणून काठी जमिनीवर आपटल्यावर घरातला आवाज बंद झाला. मी त्याच्यसमोर उभा राहिलो आणि त्याला बजावले ” पुन्हा जर कोयतो दाखवलंस तर पोलिसाक बोलावून लोकअप मध्ये टाकतालाय लक्षात ठेव,’.

असा मी दम भरताच आपा मागील दराने गुल झाला.

मी आपाच्या घरात आलो आणि आपाच्या बाबा म्हणजे गणपती समोर येऊन बसलो. गण्या मला पहाताच रडू लागला. “काकानू, काय हो माजा नशीब, नवसान झील झालो तो असो दारुडो, रोज रातिचो दारू पिऊन तयार. गवंडी काम करता ते सगळे सोऱ्यात. पाच पैशे घरात देना नाय. मी तरी खायसून हेका जेवूक घालू. आत धा गुंठे जागा तुमी घेऊन दिलात, ती आपल्या नावावर करून देऊक सांगता.’

अस म्हणून गण्या रडू लागला.मी त्याला पोलिसाला पाठवून दम देण्यास सांगतो, अस म्हणून घरी आलो.

माझ्या डोळ्यासमोर पंचवीस वर्षांपूर्वीचा गण्या आला. आमच्या पोलीस डिपार्टमेंट च्या समोर छोट्याश्या चहा हॉटेल मध्ये भजी, वडे तळणारा. अतिशय प्रामाणिक. आमच्या ऑफिस मध्ये चहा दयायला मालक यालाच पाठवायचा. कधीमधी त्याची नवीन लग्न झालेली बायको पण हॉटेल मध्ये दिसायची. त्याच शहरात छोटी खोली घेऊन राहत होते. हॉटेल मालकाने दुसरीकडे मोठे हॉटेल काढले आणि हे हॉटेल तो बंद करणार होता, आम्ही सर्व डिपार्टमेंट मधील लोकांनी मध्यस्थी केली आणि हॉटेल गण्या ला चालवायला सांगितले.

मग गण्या आणि त्याच्या बायकोने चहा भजी सोबत जेवण करायला सुरवात केली आणि आमच्या सारख्या बॅचलर लोकांची सोय झाली. त्याची बायको म्हणजे सुगरण होती, ती माशाचे कालवण खासच बनवायची शिवाय अधूनमधून कोंबडीवडे पण.

आमच्या डिपार्टमेंट च्या पार्ट्या असायच्या, त्याची जेवणं मला त्यांना मिळू लागली.

त्याच काळात माझं लग्न झाल आणि मी रोज गावाहून स्कूटर ने येऊ जाऊ लागलो.

आत गण्या कडे थोडे पैसे जमा झाले, त्यामुळे त्याला थोडी जमीन घेऊन घर बांधायची ईच्छा झाली. तो मला कुठे जागा असेल तर सांगा, लहानस झोपड बांधतो, अस म्हणु लागला.आमच्या घरात सण समारंभ असेल त्यावेळी गण्याची बायको माझ्या आईला आणि बायकोला मदत करायला येत असे, त्यामुळे त्या दोघींची पण जवळीक होती.

माझ्या काकांची दहा गुंठे जमीन पडून होती, त्यावर काही लागवड नव्हती, काका कायम मुंबईत, त्याना पण ती विकून टाकायची होती, काकांना सांगून कमी किमतीत ती दहा गुंठे जमीन गण्याला विकत दयायला सांगितली.

गण्याने आणि त्याच्या बायकोने मेहनत करून करून छोटेसे घर बांधले आणि मग सरकारी मदत घेऊन  मोठं घर केल, मग मुलगा झाला, त्याच नाव त्याच्या आजोबाच म्हणजे सहदेव आणि म्हणायला आपा.

माझी मुलगी अर्पिता आपा पेक्षा दोन वर्षांनी मोठी. लहानपणी अर्पिता अभ्यासाला बसली की आपा त्याच्या शेजारी येऊन बसायचा. तिची पाटी धुवून दयायचा, अभ्यास झाला की तीच दप्तर भरून ठेवायचा, कायम तिच्या मागे मागे असायचा.

अर्पिता त्याचा अभ्यास घयायची, पण अभ्यासाचे नाव काढले की तो पळून जायचा. तो नाईलाजाने शाळेत जायचा पण त्याचे अभ्यासात लक्ष नसायचे.

गण्याचे आणि त्याच्या बायको चें पण त्याच्या शिक्षणाकडे लक्ष नसायचे, ती दोघ शहरातील हॉटेल मध्ये. मुलगा शाळेत कधी जायचा कधी नाही, अर्पिता आणि माझी बायको त्याच्याकडे लक्ष द्यायची पण त्याने अभ्यास केलाच नाही आणि त्याने सातवी तुन शाळा सोडली.

शाळा सोडल्यावर त्याला सर्वच मोकळे, मग ती उनाड व्यसनी मुलांच्या संगतीत गेला आणि तेरा चवदा वर्षाचा होता, त्यावेळी पासून विड्या ओढू लागला, मटका खेळू लागला आणि दारू पिऊ लागला.

माझी बायको गण्याच्या बायकोला त्याच्या व्यसनाची कल्पना देत होती पण त्याच्या आईचे आणि बाबाचे पण तो ऐकेना.

आपा वीस वर्षाचा झाला आणि रिकामा राहू लागला आणि पैसे मिळाले तर चोरून दारू पिऊ लागला. माझ्या ओळखीच्या एका गवंडी होता, मी त्याला सांगून आपाला त्याच्याकडे कामाला पाठविले, तेथे तो चिरे उचलणे, चिरे तासणे आदि कामे करू लागला.

गण्याने त्याला आपल्या हॉटेलात नेऊन पाहिले, पण आपा पैसे लंपास करू लागला,गिर्हाईक बरोबर हुज्जत घालू लागला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ भैरूची गोष्ट… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ भैरुची गोष्ट !… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

पहाट झाली. भैरू उठला. 

बैल सोडले. औत जोडले. 

शेतात गेला. शेत नांगरले. 

दुपार झाली. औत सोडले. 

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली. 

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे. 

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. तो भैरू शेतकरी होता. हा भैरू कुठल्यातरी ऑफिसमधील सेवानिवृत्त कारकून आहे. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – “गुड मॉर्निंग … सुप्रभात” चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. “आज शनिवार, म्हणजे “जय हनुमान, जय बजरंगबली” चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे “गुड मॉर्निंग…सुप्रभात” चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. “आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं” या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुप मधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची “बाबाजींची प्रवचनं” तिकडे, तिकडचं “रोज सकाळी एक गाणे” इकडे, अमुक ग्रुप मधलं “दिनविशेष” तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या “हेल्थ टिप्स” अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. “हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय”, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ “आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील” असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना “वा छान”, “मस्तच” अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. “दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे असं अजिबात नाही” असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले “गुड आफ्टरनून” चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने “सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी” अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, “रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. “सर्व-पोस्ट-समभाव” आपल्या अंगी आहे याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये “युती”च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये “आघाडी” च्या बाजूनं आलेली. “कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,” भैरुच्या मनात आलं.

“डॉलरच्या तुलनेत रुपया” या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. “आपल्याला यातलं XX काही समजत नाही” हे पक्कं माहीत असल्याने “पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या “ऐका मालकंसची गाणी” वर हा “मालकंस नाही, कलावती आहे” अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात “नांवात काय आहे?” असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला. 

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू “जंकफूड – एक शाप” ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला. 

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले “गुड नाईट – शुभरात्री” चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं “मालवून टाक दीप….” गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. “मालवून टाक दीप….” चे पुढचे शब्द “चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!” हे आहेत हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते “गुड नाईट… स्वीट ड्रीम्स” अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला…. उद्या पहाटे त्याला उठायचं होतं… उद्या रविवार म्हणजे “सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे. 

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मिलिंद.

— समाप्त —

लेखक :  मिलिंद पाध्ये, ठाणे 

प्रस्तुती : सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायगुण – भाग- 2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ पायगुण – भाग-2 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही. मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते! उगीच नको रडत बसू आई.”) – इथून पुढे 

अजिता हॉस्पिटलमध्ये गेली पण तिलाही चैन पडेना.हे काय झालं आणि यातून आता पुढे काय होणार याची तिलाही काळजी वाटायला लागली.लग्न ठरवून सहा महिने झाले,आपण दोघे सर्वस्वीअनुरूप आहोत, आपले स्वभाव जुळतातआवडीनिवडीसारख्याआहेत.आता हे काय  विघ्न मधेच?अजिताने दुपारी योगेशला फोन करायचे ठरवले.  शांतपणे ती आपल्या कामात गुंतून गेली.दुपारी योगेशचा तिला  फोनआला.  तिला म्हणाला, जरा बाहेर जाऊया जेवायला !अजिताला तो कारने न्यायला आला.हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन झाल्यावर म्हणाला,’अजिता!माझी आई तुमच्या घरी आली होती आणि काय काय बोलली ते तिनंच सांगितलं मला.

मला तर हे अनपेक्षितच आहे सगळं! माझ्या असं कधी मनात तरी येईल का?मला तू खूप आवडतेस आणि मी  मला भाग्यवान समजतो की अशी हुशार गुणी मुलगी मला मिळतेय.आईचं सोड तू!मी कधीही हे होऊ देणारनाही.आपलं लग्न होणार म्हणजे होणार.तुझ्यासारखी मुलगी टाकून दुसरी बघत बसायला मी मूर्ख नाही.तू क्षमा कर मला.तुम्हाला सगळ्याना खूप त्रास झाला असेल ना?माफ कर अजू मला!

योगेशच्या डोळ्यात पाणी आलं. शरमेने त्याचा चेहरा लाल झाला.

अजिता शांतपणे म्हणाली, “ थँक्स योगेश. आपण या सहा महिन्यात एकमेकांत खूप गुंतलो आहोत.हो ना?तू जर साथ देणारअसलास तर आपलं लग्न कसं मोडेल?शांत राहूया आपण.मला खूप धीर आला रे तुला भेटून.किती शहाणा आहेस तू. थँक्स योगेश.पण एक सांग, तुझ्या आईचा तू एकुलता एक मुलगा आहेस.त्यांच्या मनाविरुद्ध मी तुमच्या घरात आले तर माझं स्वागत कसं होणार? मला सतत जाणवत रहाणार की मी यांना नको असतानाही इथे आलेय!अजिता रडायला लागली.’मला काही सुचत नाही योगेश .मला तुला तुझ्या आईपासून तोडायचं नाहीये आणि तुला गमवायचंही नाहीये.” 

योगेश विचारात पडला. ‘ अजिता,आपण जरा वाट बघूया. आपली साथ घट्ट असणार हे कायम लक्षात ठेव. मीआणि तू कधीही वेगळे होणार नाही’. योगेश अजिताला  हॉस्पिटलला सोडून घरी गेला. अजिताने हे आईबाबांना सांगितलं. त्यांनाही आता हायसं वाटलं.

पण तरीही मनात धाकधूक होतीच की हे जे सुषमा बाई बोलल्या ते ठीक नाही झालं.

असा किंतु मनातअसताना आपल्या मुलीला तिथे सुख लाभेल का?काय कमी आहे अजितामधे?आता होईल ते बघत बसण्याशिवाय त्यांच्याही हातात काही नव्हते. अनपेक्षितपणे संध्याकाळी योगेशचे आजीआजोबा आणि बाबा अजिताच्या घरी आले.तिचे आईबाबा गडबडूनच गेले यांना असं अचानक बघून!या ना,म्हणत त्यांचे स्वागत केले दोघांनी. आजी म्हणाल्या’,मी पहिल्यांदा बोलते हं.हे बघा कुंटे, काल सुषमा तुमच्या घरी आली आणि जे बोलली ते आम्हाला अजिबात माहीत नव्हतं. आम्हाला तिचे विचार मान्य नाहीत.अहो, कसला पायगुण आणि कसले शुभ अशुभ हो? याच मुलीनं योगेशचे बाबा हॉस्पिटल मध्ये असताना रात्रंदिवस कष्ट घेऊन त्यांची सेवा केलेली आम्ही बघितली नाही का?उलट कौतुकच वाटले तिचे आम्हाला.ती या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणूनच सगळ्या गोष्टी किती सुलभ झाल्या आम्हाला. ही अशी गुणी मुलगी आम्ही नाकारणे म्हणजे दारी आलेली लक्ष्मी नाकारण्यासारखे होईल.

“ कुंटे,तुम्ही आता हे लग्न लवकरात लवकर करून टाका.कशाला उगीच लांबवायचं ?योगेश आणि अजिता एकमेकांना अनुरूप  अनुगुणीही आहेत आणि त्यांचं प्रेमही जडलंय एकमेकांवर.तर लवकरचा मुहूर्त बघून आपण हे लग्न पार  पाडूया.अगदी हौसेने !”  अजिताच्या आईवडिलांना अतिशय आनंद झाला हे ऐकून.पण मग जरा  संकोचून बाबांनी विचारलं,पण सुषमाबाईना काय वाटेल?’

“ त्यांचं काय? ते  योगेश बघून घेईल.’आजोबा म्हणाले, लग्नानंतर योगेश आणि अजिता इथे आमच्याजवळ बंगल्यात रहाणार नाहीत. आमचा दुसरा मोठा फ्लॅट आहे,तिकडे ते राहिलेले उत्तम! म्हणजे कोणालाच कानकोंडे होणार नाही. नवीन लग्न होऊन येणाऱ्या अजिताला कोणाच्या मनाविरुद्ध आपण घरात आलोय, असं वाटता कामा नये. आणि हीही सूचना योगेशची आहे. हुशार आहे हो आमचा नातू.”  

आता योगेशचे बाबा म्हणाले, ‘ सुषमा जरा मागासलेल्या विचारांची आहे . आमचे आईबाबाच किती पुढारलेल्या विचारांचे आहेत तिच्यापुढे तुम्ही बघता आहातच. खरं सांगायचं तर तिला एवढी शिकलेली डॉक्टर सून नकोच होती. तिच्या मैत्रिणीची मुलगी फार मनात होती तिच्या सून म्हणून .पण योगेशने ठाम नकार दिला.मी माझ्याच व्यवसायातली मुलगीच माझी बायको म्हणून पसंत करणार हे त्याचे निश्चित होते.आम्हालाही ते मान्यच होते.पण घटना अशा घडल्या की बिचारी अजिता घरात येऊ घातली आणि दुर्दैवाने हे दोन अपघात म्हणा, प्रसंग घडले. मग तर सीमा आणि सुषमा हे लग्न नकोच व्हायला या निर्णयावर आल्या. त्या मायलेकी स्वभावाने अगदी सारख्या आहेत. पण माझा योगेश फार  गुणी आणि  मॅच्युअर्ड आहे .सुषमा तुमच्या घरी येईल आणि हे असं सगळं बोलेल हे आम्हाला कोणालाच माहीत नव्हते. तुम्ही प्लीज हे मनावर घेऊ नका.आम्हाला अजिता अतिशय आवडली आहे. मुख्य म्हणजे योगेश तिच्यावर मनापासून प्रेम करतो.  आपण मुलांची मनं नको का जाणून घ्यायला?काय कमी आहेतुमच्या अजितामध्ये?आम्ही तिलाआदराने  आणि प्रेमाने आमच्या घरी सन्मानाने आणणार सून म्हणून ! ‘ योगेशचे वडील  म्हणाले. अजिता आणि तिच्या आई बाबांच्या डोळ्यात पाणी आले.आईबाबांची खात्रीच पटली,आपली अजिता योगेशच्या घरी सुखी होईलच.या मंडळींचं मनापासून कौतुक वाटलं  अजिताच्या आईबाबांना. अजिता तर थक्क झाली आजी आजोबांचे आधुनिक विचार बघून.  इतक्यात योगेशही आला अजिताच्या घरी.  झाली का मीटिंग आणि चाय पे चर्चा?आमच्या माँ साहेब नाही का आल्या?’ 

‘नाही बाबा ! त्यांना न सांगताच ही सभा भरलीय. काय करणार बाबा?आम्हाला तुमचं लग्न लावून द्यायचंय. त्यात बाधा नाही आणायचीय.’ 

योगेश म्हणाला, ‘आजी होईल ग सगळं  नीट. अजिता घेईल सगळं  सांभाळून.इतके पेशंट लीलया जिंकून घेणाऱ्या अजिताला आपल्या आईला आपलंसं करायला नक्की जमेल.थोडा वेळ देऊ या आपण सगळ्यांना. मला खात्री आहे,अजिता लाडकी सून होईल आपल्या आईची !’ कौतुकाने अजिताकडे बघत योगेश म्हणाला.  सगळी मंडळी गेल्यावर आईबाबांनी कौतुकच केले आपटे लोकांचे.आपली मुलगी चांगल्या कुटुंबात आणि मुख्य म्हणजे  अतिशय चांगल्या मुलाच्या हातात पडलीय  याची खात्री  पटली सगळ्यांना.आणि खूप  उत्साहाने अजिताचे आईवडील लाडक्या लेकीच्या लग्नाच्या तयारीला लागले.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पायगुण – भाग- 1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ पायगुण – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

पावसाची झुम्मड लागली होती.अजिता अगदी पूर्ण भिजून गेली.घरून निघताना अजिबात चिन्हनव्हतेपावसाचे आणि अचानकच कोसळायलाच लागला अजिता पूर्ण भिजून गेली. जवळच्या दुकानात शिरली आणि  मग तिला आठवलं, बऱ्याच गोष्टी  संपल्या आहेत की आपल्या. तिने दुकानातून बरीच खरेदी केली. तोपर्यंत पाऊस थांबला आणि अजिता आता हॉस्पिटल मध्ये न जाता तिच्या  क्वार्टर्स वरच गेली. पारुबाईने सांगितलेलेसामान तिने ओट्यावर ठेवले आणि छान चहा करून घ्यावा म्हणून गॅस  जवळ गेली.तेवढ्यात शेजारची मीता आली. अजिता,मला पण टाक हं आल्याचा चहा.कॉटवर बसत मितानेफर्मावले.थांब मी माझ्या रूम मधून चिवडा घेऊन येते.कालच आईने मामा बरोबर पाठवला.मीता चिवडा आणि बर्फी घेऊन आली आणि तिने अजिताच्या कॉटवर बैठक मारली.मस्त झालाय ग चहा अजिता.  चिवडा खा ना!,आईनं तुझ्यासाठी पण  दिलाय. उद्या काय लागलंय ग तुझं शेड्यूल? मला उद्यापासून पूर्ण आठ दिवस  नाईट  इमर्जन्सी आहे.

कठीण आहे रे बाबा.त्या डॉ अभय समोर बोलायची सोय नसते.त्यांनी लावल्या ड्यूट्या की करायच्या. अजिता म्हणाली मला तशी खूप ड्यूटी नाहीये पण मी ऑन कॉल आहे.म्हणजे आलं की नाही इथेच बसणं?चांगली जाणार होते ती बाबांकडे तर आता कुठलं जमायला?कुठून ही  डॉक्टरकी हौसेने पदरात घेतली असं होतं बघ काही वेळा. बघ की,आपल्या वर्गातल्या मुली बीएस्सी एमेस्सी झाल्या आणि मस्त कपडे घालतात, लग्न मुंजी सिनेमे एन्जॉय करतात आणि आपण!

बसलोय  बाळंतपण नाही तर कसल्या कसल्या सर्जऱ्या करत शिकत, सिनियर ची बोलणी खात!’

अजिता वैतागून म्हणाली.मीता हसली आणि म्हणाली,अजू, खरंच असं वाटतंतुला?’अजिता म्हणाली, नाही ग मीता!पण काहीवेळा अति काम पडलं की होते चिडचिड!

मला तर अभिमान आहेच की एवढी  धडपड करून मरमर करून झालोय डॉक्टर,ते काय उगीच? आता हे एमडी धड पदरात पडलं की सुटलो बघ. कालच बघ ना, रात्रभर उभीच्या उभी होते मी! सगळ्या अवघड केसेस!वर त्या  डॉ अभयला  फॉरसेप्स लावताना बोलावलं तर म्हणाले”,एमडी होणार ना?दर वेळी लोकाला बोलावणार का स्वतःच्या हॉस्पिटल मध्ये? लावा बघू!मी आहे मागे उभा.पोरी  बाकी बावळट आणि घाबरटच.’इतका राग आला होता ना!पण शिकवलं मस्त बाकी!किती हुशार रजिस्टार आहे ग तो! मला नाही वाटत तो इथेच थांबेल.नक्की जाणार बघ कुठल्या कुठे!’तोंड मात्र आहे   फाटकं.   कद्धीही चांगलं म्हणत नाही की शाबासकी देत नाही!’दोघी हसल्या आणि मीता गेली.  अजिताची लास्ट टर्म होती एमडी ची. मीता आणि अजिता  अगदी घट्ट मैत्रिणी. दोघीही  डॉक्टर झाल्या आणि सुदैवाने एमडीलाही ऍडमिशन मिळाली ती एकाच हॉस्पिटल मध्ये. मीता म्हणाली मी  नाशिकला जाणार आणि तिकडे माझ्या मावशीच्या हॉस्पिटलला अनुभव घेईन.तिचं मोठं  हॉस्पिटल आहे आणि खूप गर्दी असते .मला खूप मिळेल तिकडे शिकायला’ अजिता म्हणाली,माझं काहीच नक्की नाही.आमच्या घरात डॉक्टरची बॅक ग्राउंड पण नाही.आधी मी कुठेतरी नोकरी करीन, मग बघूया .एमडी झाल्याबरोबर अजिताला लगेच मोठ्या हॉस्पिटल मध्ये नोकरीही मिळाली आणि तिचं पॅकेज सुद्धा छान होतं. अजिता, आता लग्नाचं बघूयाना?घालूया ना नाव एखाद्या चांगल्या संस्थेत? आई नं अजिताला विचारलं.’हो आईमाझी हरकत नाही ,पण शक्यतो डॉक्टरच बघितला तर ते पूरक होतं एकमेकांना.’ आई नं अजिताचं नाव एका चांगल्या विवाह मंडळात घातलं. थोड्याच दिवसात अजिताला बघायला योगेश  आपटे आला.  छान होता मुलगा. मंडळाकडूनच स्थळ सुचवलं गेलं होतं आणि पत्रिकाही चांगली जुळत होती. योगेश   फिजिशियन होता आणिचांगला जम बसला होता त्याचा. दोघांना एकमेक पसंत पडले आणि अजिताचं योगेशशी लग्न ठरलं.आई बाबांनी छान साखरपुडा करून दिला .सगळे खूष होते अगदी. साखरपुडा झाल्यावर पंधरा दिवसात योगेशच्या वडिलांना  हार्ट अटॅक आला.अजिताने आणि योगेशने धावपळ करून त्यांना ऍडमिट केले आणि अजिता तर त्याच हॉस्पिटल मध्ये नोकरी करत असल्याने तिने खूप  काळजी घेतली  त्यांची. त्यांची बायपास यशस्वी पार पडली आणि ते सुखरूप घरी आले.सगळ्याना  हायसं झालं. योगेशची धाकटी बहीण सीमा दिल्लीला होती.

तिला नुकतेच दिवस गेले होते.त्यातच योगेशचं लग्न  खूप आनंद झाला होता.अचानकच दिल्लीहून फोन आला,सीमाला अचानकच रक्तस्त्राव सुरू झाला आणि तो गर्भ टिकू शकला नाही.  सगळ्याना वाईट वाटलं.

 एक दिवस, योगेशच्याआई सुषमा बाई अजिताच्या घरी अचानकच आल्या.इकडंच तिकडंच बोलून झालं.अजिताच्या आईनं विचारलं,’आता लग्नाची तयारी सुरू करायला हवी ना?आपण कार्यालय कोणते बघायला जाऊया?तुमचा काय विचार आहे?मी इतक्यात तुम्हाला फोन करणारच होते.’ 

योगेशच्या आई म्हणाल्या,’हे बघा ! हे लग्न करू नये असं वाटतं आम्हाला. साखरपुडा झाला आणि लगेचच दोन वाईट घटना घडल्या आमच्या घरात! तुमचा विश्वास नसेल, पण माझा आहे.अजिताचा पायगुण म्हणा हवं तर पण हे घडलं खरं , हो ना?तर आता आणखी नको विषाची परीक्षा घ्यायला.आपण इथंच  थांबवू हे सगळं!  “

अजिताच्या आईला हे ऐकून तर शॉकच बसला.  “ अहो हे काय बोलता? असं कुठं असतं का?होणाऱ्या गोष्टी होत असतात अहो ! इतकी शिकलेली मुलं आपली.त्यांचा तरी विश्वास बसेल का असल्या शकुन अपशकुन आणि  पायगुण असल्या गोष्टीवर?योगेशला विचारलंय का तुम्ही? 

“ नाही ! त्या मुलांना काय समजतंय.पण मलाच आता नको वाटतंय हे लग्न !” त्या निघूनच गेल्या आणि अजिताच्या आईवडिलांच्या डोक्यात प्रश्नाचं  मोहोळ उठलं. आता काय करावं हा यक्षप्रश्न त्यांना पडला आणि अजिता हे सगळं कसं घेईल हे त्यांना समजत नव्हते.रात्रीउशिराअजिता हॉस्पिटल मधून घरीआली.सकाळी बघू  काय ते असं म्हणत आईबाबा झोपायला गेले. सकाळी हा विषय अजिताजवळ त्यांनी काढला.’ हो का?मला हे काहीच माहीत नाही.मला योगेश भेटलाय कुठं दोन दिवसात?आम्ही खूप बिझी आहोत ग आमच्या कामात!पण आज भेटूआम्ही!आई,तू उगीच पॅनिक नको होऊ! बघूया तरी काय होतं ते. तो भेटल्याशिवाय कोणताही उलगडा होणार नाही.मी योगेश भेटला की लगेच तुम्हाला सांगेन काय झालं ते!,उगीच नको रडत बसू आई.” 

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीता… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीताश्री मकरंद पिंपुटकर

तारीख १४ फेब्रुवारी. संध्याकाळचे सहा वाजत होते आणि त्याला, त्याच्या प्राथमिक शाळेच्या (त्याला तेव्हा शिकवायला असलेल्या) मुख्याध्यापिका बाईंचा फोन आला. 

“काय रे, मोकळा आहेस का ?” बाईंचा प्रश्न. 

“म्हणजे काय ? अहो बाई, तुमचा फोन आला की बाकी सर्व कामं बाजूलाच ठेवणार की. बोला, आज कशी आठवण काढलीत ?” तो.

“नाही रे, आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे ना ! मग ? आम्हा म्हाताऱ्यांची लुडबुड नको, म्हणून विचारलं हो.” बाई साळसूदपणे पृच्छा करत होत्या. 

बाई आणि त्यांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी हे एक अजब रसायन आणि त्याहून गजब समीकरण होतं. आज कदाचित तो स्वतःच्या आईसमोर, त्याची स्वत:ची पन्नाशी उलटून गेली होती तरी, “व्हॅलेंटाईन डे” असा शब्दही उच्चारायला धजला नसता, पण बाईंशी बोलताना असले काही विधिनिषेध नसत.

“अहो बाई, लग्नाला पंचवीस वर्षे होत आली माझ्या. आता कसला व्हॅलेंटाईन डे ? आज रात्री जेवायला भाकरी, भोपळ्याचं भरीत आणि सकाळची उरलेली वांग्याची भाजी आहे. व्हॅलेंटाईन डे कसला कप्पाळ !” तो काहीसा उदास होऊन आणि वैतागून म्हणाला.

“कसले रे तुम्ही असे रडे ?” बाईंनी त्याला फैलावर घेतलं. असंही बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या बायका आणि विद्यार्थिनींचे नवरे यांना “माझ्या लेकी आणि लेक आहेत ते” असं म्हणत जास्त झुकतं माप द्यायच्या. (“हो, आणि आम्ही भाकरीच्या तुकड्याच्या मोलावर विकत घेतलेले” असं बाईंचे विद्यार्थी कृतककोपाने म्हणायचे.)

“व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय फक्त गुलाब अन् चॉकलेटं, इतकंच का ? लग्नाला दोन पाच वर्षे उलटली म्हणजे संपतं कसं रे तुमचं प्रेम ?  हॉटेलात जाऊन वारेमाप पैसे उधळले म्हणजेच तुमचं प्रेम सिद्ध होतं का आणि त्याहीपलीकडे जाऊन, प्रेम म्हणजे फक्त नवरा बायकोचंच का ? आणि एवढ्या तेवढ्याश्या गोष्टींनी कसले रे तुम्ही लगेच ढेपाळता आणि उदास होता ?”

बाईंनी सरबत्ती सुरू केली आणि तो निरुत्तरही झाला आणि अंतर्मुखही.

बाई निवृत्त होऊन दहा वर्षे होऊन गेली होती. इतक्या वर्षांत नखातही रोग नसणाऱ्या बाईंना गेल्या वर्षी अचानक कर्करोगाचे निदान झालं होतं. पण बाई त्या सगळ्याच अनुभवाला – त्या केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि लांबसडक केसांच्या त्या गळण्याला – या सगळ्यालाच असामान्य धीराने आणि हसतमुखाने सामोऱ्या गेल्या होत्या. ना कपाळावर एकही आठी, ना माझ्याच नशिबात हे का म्हणत नशिबाला दोष देणं. 

“अरे, माझ्यावर जगावेगळं प्रेम केलं ते माझ्या नवऱ्यानं,” हा इकडे भूतकाळात हरवलेला, आणि बाई तिकडे बोलत होत्या, “लग्न झाले तेव्हा मी फक्त अकरावीपर्यंत शिकले होते. त्या काळात, माझ्या नवऱ्यानं, मी शिकावं म्हणून जिद्द धरली नसती – हट्ट धरला नसता, इथून तिथून पैसे उभे करून माझ्या शिक्षणाच्या फीया भरल्या नसत्या,  तर मी शिक्षिकाच झाले नसते. आणि पुढचं हे सगळं इतकं छान घडलंच नसतं. 

आपली सून शिकलेली आहे आणि शिक्षिका आहे म्हणून माझ्या सासूनं माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं. कधी गावातल्या घरात जमीन सारवू दिली नाही, की धुणीभांडी करू दिली नाही. ‘तू चार बुकं शिकलेली आहेस, तू न्हायी अशी कामं करायची’ सासूबाई म्हणायच्या.”

आणि खरंच होतं ते. 

त्याला आठवू लागलं. ‘माणसं जोडा रे’ हे अगदी बाईंचं ब्रीदवाक्य होतं. त्या बोलून दाखवायच्या नाहीत असं कधी, त्यांच्या कृतीतून पदोपदी दिसायचं ते.

आणि म्हणूनच मग प्राथमिक शाळेतले एवढुस्से विद्यार्थीही प्रचंड विश्वासाने आपल्या अडीअडचणी बाईंना सांगायचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर बाळगणारे पालकही त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी विश्वासाने बाईंकडे यायचे. 

याच प्रेमाने एखाद्या विद्यार्थ्याची आई तिच्या दोन भावजयींसह आणि त्या तिघींच्या चार पाच मुलांसह, दिवाळीच्या सुट्टीत, खुशाल बाईंच्या पुण्यातल्या घरी दोन दिवस राहायला यायच्या आणि ऐन थंडीत, संध्याकाळच्या वेळी आलेल्या, बायकोच्या या विद्यार्थ्याच्या आई, काकू आणि मुलांना थंडी बाधू नये म्हणून हातपाय धुण्यासाठी बाईंचे यजमान पाणी तापवून द्यायचे. 

आजही बाईंच्या मुलाचा मित्र अगदी हक्काने बाई, त्यांचे यजमान, बाईंची मुलगी या सगळ्यांना गाडीत घालून आपल्या घरी घेऊन जातो आणि भरपेट जेवण झाल्याशिवाय आणि त्याहूनही भरपेट गप्पा झाल्याशिवाय त्यांना सोडत नाही. 

आज बाईंचे विद्यार्थी वयाने – मानाने मोठे झालेत, पण अजूनही बाईंचा वाढदिवस असला की बाईंच्याच मुलीला विश्वासात घेत, त्यांना थांगपत्ता न लागू देता, त्यांच्याच घरी कार्यक्रम आयोजित करतात आणि बाईंना मोठ्ठं सरप्राईज देतात. 

बाईंच्या आजारपणात, त्यांच्या डॉक्टर – हॉस्पिटलच्या वाऱ्यांत शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची बाईंना सोबत करण्यासाठी, त्यांना नेण्या – आणण्यासाठी चढाओढ लागलेली असे. 

बाईंची प्रकृती सुधारावी म्हणून बाईंच्या विद्यार्थ्यांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी नवस बोलले होते, अनुष्ठानं केली होती, आणि  बाई बऱ्या झाल्यावर, नवस फेडण्यासाठी बाईंची ठाण्याची विद्यार्थिनी अश्विनी तर  पार ठाण्याहून प्रभादेवीच्या सिद्धीविनायकापर्यंत ३५ किलोमीटर अंतर चालत आली होती. 

“प्रेम म्हणजे नुसती शारीरिक भावना, धांगडधिंगा आणि महागाच्या भेटवस्तू असं नसतं रे. परवाचीच गोष्ट. दिवसभराचं रहाटगाडगं आटोपलेलं, मी आपली स्वामी समर्थांना नमस्कार करून झोपायच्या खोलीत आले, तर आमचे हे टक्क जागे, झोप येत नाही म्हणाले.

मग काय, त्या रात्री अडीच वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या. लग्न झालं तेव्हा अक्षरश: भांडीकुंडीही नव्हती रे, कागदाच्या पुड्यांमध्ये डाळ तांदूळ बांधून ठेवायचे, तिथपासून संसाराची सुरुवात झाली, एकमेकांना सांभाळून घेत मस्त संसार झाला. परवा त्या सगळ्या प्रवासाची मस्त उजळणी झाली. 

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काही फार जगावेगळं नसतं रे. ते तुमच्या कॉलेजमध्ये NSS राष्ट्रीय सेवा योजनेचे घोषवाक्य आहे ना – ‘not me, but you’ ते म्हणजेच प्रेम, नाही का? 

स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा तुमच्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकांना, शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आईवडिलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जोडीदाराला काय हवं आहे याचा विचार आधी करणं, आणि त्याप्रमाणे वागणं, म्हणजेच प्रेम, नाही का ? 

आणि एकदा हा विचार रुजला की मग भाजी भाकरीही गोड लागते, ती एन्जॉय करायची. याहून बेश्ट व्हॅलेंटाईन तो काय वेगळा असणार आहे ?”

बाईंनी नेहमीप्रमाणे संदर्भासहित स्पष्टीकरण देत निरगाठ उकल तंत्राने विषय सोप्पा करून सांगितला. 

“बाई, कमाल आहे हां तुमची. प्रेम या विषयात मास्टरी आहे अगदी !” तो.

“आहे म्हणजे काय, असलीच पाहिजे. अरे, माहेरचं नावच मुळी प्रेमा आहे माझं !” बाईंनी हसत हसत फोन ठेवला.

आजही त्यांनी पाडगावकरांसारखं ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असं स्पष्ट सांगितलं नव्हतं, पण नेहमीप्रमाणे आपल्या उदाहरणांतून – आपल्या कृतीने समोरच्याला पटवून दिलं होतं. 

तो छान हसला, मगाचची त्याची मरगळ केव्हाच दूर पळाली होती. तो उठला, आणि त्याच्या ‘व्हॅलेंटाईन’बरोबर भाजी भाकरी एन्जॉय करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळला.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नणंद माझी लाडाची… ☆ सौ. राधिका माजगावकर पंडित ☆

सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ नणंद माझी लाडाची ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

वऱ्हाड कार्यालयात आलं.. शारदा इकडून तिकडे नुसती धावत होती. कितीतरी कामांची, मोठी सून म्हणून तिच्यावर जबाबदारी होती. कारण तिच्या लाडक्या नणंदेचं समीराचं लग्न होत नां! सहज समीराच्या खोलीमध्ये ती डोकावली, तर हे काय! ती हमसून हमसून रडत होती. तिला जवळ घेत शारदा म्हणाली. “समीरा नको ग रडूस. सासरी परक्या घरी जातांना अशीचं स्थिती होते, प्रत्येक मुलीला वाईट हे वाटतंच. आणि साहजिकच आहे गं तें!एका जागेवरून उपटलेल रोपंट दुसऱ्या जागी लावतांना त्रास हा होणारच. मी नाहीं का माझ माहेर सोडून तुमच्याघरी आले. आणि आतां सासर हेच माहेर असं समजून तुमच्या घरात रुळले पण. सासरच्या अनोळखी माणसांच्या प्रेमाची ओळख मला पटली. आणि तुझ्यासारखी जिवलग, नणंदेच्या रूपांतली मैत्रिणी पण मला मिळाली. हे बघ,. आई आण्णा व ह्या घराची काळजी अजिबात करायची नाही. अग मी आहे नां !. तुझ्या सारखीच काळजी घेईन हॊ मी त्यांची. समीराचे डोळे आपल्या पदरानें पुसत शारदा पूढे म्हणाली “ए समीरा हास ना गं!आतां फक्त एकच गाणं गुणगुणायचं. ‘ ” “साजणी बाई येणार साजण माझा “. आणि हो ! घोड्यावरून येणाऱ्या सागरच रुप आठवतंच मस्त स्वप्ननगरीत जायच. काय?

समीरा गालात हसली आणि खुदकन् लाजली, सागरच्या आठवणीने. तशी शारदा पुढच्या कामासाठी चटकन् उठायला लागली. तर.. तिचा पदर ओढत समीरा म्हणाली. जरा- थांब ना वहिनी. मला तुला काही सांगायचय. “हसतंच शारदेने चिडवलं ” पूरे हं समीरा. आतां मला नाही,. जे काय सांगायच तें सागर रावानाच. सांगायच. चल बाई उठू दे मला “.. “प्लिज थांब ना वहिनी, “ काकुळतीला येऊन समीरा परत मुसमुसायला लागली. थरथर कांपतच होती ती.. शारदाने तिला जवळ घेतल्यावर ती घडाघडा बोलायला लागली.

” वहिनी सागर मला मनापासून आवडलेत. पण. – पण हे लग्न सुखरूपपणे पार पडेल की नाहीं ? ह्या भितीने जीव घाबरा होतोय ग माझा !”

तिला प्रेमानें गोंजारून शारदा म्हणाली “समीरा काही झालय का ? अगदी मोकळे पणी सांग any Problem? ” 

थरथर कापतच समीरा पूढे सांगु लागली. : “ कसं सांगु वहिनी तुला? एक गोष्ट लपवलीय मी तुमच्यापासून.. प्रकरण. तसं गंभीरच आहे “. हे ऐकल्यावर. आता मात्र थरकांपच उडाला शारदाचा. काय सांगणार आहे ही? काही भानगड, प्रेम प्रकरण? की बलात्कार ? असा कांही अत्याचार झालाय का हिच्यावर ?

‘ नाहीं नाहीं माझ्या सासरच्या अब्रुचा प्रश्न आहे हा!’. असंख्य प्रश्नाच्या विचाराने घशाला कोरड पडली कसबसं स्वतःला सावरून ती म्हणाली ”समीरा बोलना ! सांग लौकर. काय झालयं ?सांग गं! पटकन सांग.

“ऐक नां वहिनी. गेले कित्येक दिवस एक मवाली, गुंड मुलगा माझ्या मागे लागलाय. सुरुवातीला, लाडीगोडीनें अघळ पघळ बोलून त्याने मला खूप विनवलं, आमिषे दाखवली. पण मी बधले नाही. कारण माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं. तसं सांगूनही त्यानी माझा पिच्छा सोडला नाही. उलट त्याचा मवाली पणा जास्तच वाढला. खूप त्रास व्हायचा मला त्याचा. कधीकधी भिती वाटायची. हां हात टाकेल की काय माझ्यावर? अतिप्रसंग करेल कां ?या विचाराने घराबाहेर पण पडायची नाही मी. आणि शेवटी त्यानी मला धमकी दिली. ” माझ्याशी लग्न केल नाहीस तर मी दुसऱ्या कुणाशीही तुझ लग्न होऊ देणार नाही. मग सुखाचा संसार तर दूरच राहिला. गुंड आणून पळवीन मी तुला “. मला खूप भिती वाटतेय ग वहिनी. तो लग्नात काही विघ्न तर नाहीं ना आणणार ? तसं झाल तर… तर सगळाच डाव उधळेल. माझ्या स्वप्नांचा, आणि माझ्या आयुष्याचा… आई अण्णांच काय होईल गं ? आणि माझा दादा? केवढया मोठया आजारातून उठलाय तो नुकताच. तुझ्यामूळे तो लौकर बरा झालाय त्याच B. P. वाढून त्याला काही त्रास झाला तर. ?वहिनी रात्र रात्र जागून काढतेय गं मी, हया सगळ्या विचारांनी झोपच उडालीय माझी० आणि काय सांगू वहिनी. काल तो आपल्या घराभोवती घिरट्या घालत होता. आणि कहर म्हणजे खिडकीतून त्याने ही चिठ्ठी फेकलीय. हे बघ यांत त्यांनी लिहीलय –” उद्या बघच तू. गुंड आणून तुझं लग्न मी मोडणारच. लग्न कसं होतयं बघतोच मी. ” 

शारदा क्षणभर गांगरली. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत तिनें समीराचें घळघळ वहाणारे अश्रु पुसले.

तिला खूप किंव आली तिची. किती तरी दिवस मानसिक ताणाचं भलं मोठ्ठ ओझं उरावर बाळगून, आनंदाचे दिवस किती ताण तणावात गेले बिचारीचे. आपल्या आई वडिलांना दादाला त्रास होऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालली होती इतके दिवस समीराची. तिला आधार देत शारदा म्हणाली,

“घाबरू नकोस समीरा मी आहे तूझ्या पाठीशी. आपल्या घराची अब्रू अशी चव्हाट्यावर नाही येऊ देणार मी. तू निर्धास्त रहा. मी बघते काय करायच तें. “ तिचा आधार घेत समीरा म्हणाली “ पण — पण वहिनी दादा ! तो किती संतापी आहे रागाच्या भरात त्यांनी काही केले तर? आणि पण मग त्याला किती त्रास होईल माझ्यामुळे. मला काही काहीचं सुचत नाहीये, काय करू मी?” तिला शांत करुन ठामपणे शारदा म्हणाली, ” नाही समीरा ह्यातलं ह्यांना आई अण्णाना काहीच कळता कामा नये. नाहीतर परिस्थितीला वेगळंच वळण लागेल. तू शान्त रहा.. “

आणि मग खरोखरचं शारदाने आपल्या भावाला मदतीला घेऊन परिस्थितीशी लढा दिला. आणि तिचा पाठीराखा भाऊ अविनाश तिच्या पाठीशी उभा राह्यला.. पोलीसांच्या मदतीने बंदोबस्त करून रंगे हात त्या मवाल्याला पकडून त्याला शिक्षा झाली. आणि नंतर मग ‘.. झाले मोकळे आकाश. ‘….. कार्य निर्वीघ्नपणे पार पडलं होतं. अशी ही बाहेरची व घरांतली आघाडी सौ. शारदानें अविनाशच्या मदतीने खंबीरपणे सांभाळली होती.

 कु. समीरा, चि. सागरची अर्धांगिनी,… सौभाग्यवती समीरा सागर साने झाली.

सासरी निघताना सौ. समीराच्या डोक्यावरून हात फिरवीत शारदा म्हणाली, ” सागर एक गुणी, सुशील, भाबडी मुलगी आम्ही दिलीय तुम्हाला. सांभाळून घ्या हं तिला. ” गम्भीर वातावरण हसरं साजरं करीत सागर म्हणाला ” मंडळी समीराचं नांव आम्ही सरिता ठेवणार आहोत आणि हीं सरिता आता सागराला मिळालीय. तिच्या सुख दुःखात मी तिच्या पाठीशी आहेच… तुम्ही दिलेलं हे खणखणीत नाणं आम्ही केव्हाच पारखून घेतल आहे हं. माझे आई बाबा खूप चांगले आणि सुशिक्षित व समंजस आहेत. त्यांच्या छत्राखाली समीरा आणि मी सुरक्षित राहू. एकमेकांच्या विश्वासावरच आमचा संसार सुखाचा होईल. तेव्हा आता कुठलीही काळजी करायची नाही. आणि हो! आईचे, अण्णांचे आणि दादांचे तुमचेही आशीर्वाद आहेतच कि आमच्या पाठीशी. ” असं म्हणून ती लक्ष्मीनारायणाची जोडी थोरांच्या पायाशी वाकली. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं होतं. कोपर्‍यात उभ्या राहयलेल्या भाऊरायाचे, अविनाशचे शारदेने नजरेनेच आभार मानले.. अगदी कृतज्ञतेने प्रेमळ नजरेने..

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print