श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ व्हॅलेंटाईन डे आणि वासुदेवाची गीताश्री मकरंद पिंपुटकर

तारीख १४ फेब्रुवारी. संध्याकाळचे सहा वाजत होते आणि त्याला, त्याच्या प्राथमिक शाळेच्या (त्याला तेव्हा शिकवायला असलेल्या) मुख्याध्यापिका बाईंचा फोन आला. 

“काय रे, मोकळा आहेस का ?” बाईंचा प्रश्न. 

“म्हणजे काय ? अहो बाई, तुमचा फोन आला की बाकी सर्व कामं बाजूलाच ठेवणार की. बोला, आज कशी आठवण काढलीत ?” तो.

“नाही रे, आज तुमचा व्हॅलेंटाईन डे आहे ना ! मग ? आम्हा म्हाताऱ्यांची लुडबुड नको, म्हणून विचारलं हो.” बाई साळसूदपणे पृच्छा करत होत्या. 

बाई आणि त्यांचे विद्यार्थी – विद्यार्थिनी हे एक अजब रसायन आणि त्याहून गजब समीकरण होतं. आज कदाचित तो स्वतःच्या आईसमोर, त्याची स्वत:ची पन्नाशी उलटून गेली होती तरी, “व्हॅलेंटाईन डे” असा शब्दही उच्चारायला धजला नसता, पण बाईंशी बोलताना असले काही विधिनिषेध नसत.

“अहो बाई, लग्नाला पंचवीस वर्षे होत आली माझ्या. आता कसला व्हॅलेंटाईन डे ? आज रात्री जेवायला भाकरी, भोपळ्याचं भरीत आणि सकाळची उरलेली वांग्याची भाजी आहे. व्हॅलेंटाईन डे कसला कप्पाळ !” तो काहीसा उदास होऊन आणि वैतागून म्हणाला.

“कसले रे तुम्ही असे रडे ?” बाईंनी त्याला फैलावर घेतलं. असंही बाई आपल्या विद्यार्थ्यांच्या बायका आणि विद्यार्थिनींचे नवरे यांना “माझ्या लेकी आणि लेक आहेत ते” असं म्हणत जास्त झुकतं माप द्यायच्या. (“हो, आणि आम्ही भाकरीच्या तुकड्याच्या मोलावर विकत घेतलेले” असं बाईंचे विद्यार्थी कृतककोपाने म्हणायचे.)

“व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय फक्त गुलाब अन् चॉकलेटं, इतकंच का ? लग्नाला दोन पाच वर्षे उलटली म्हणजे संपतं कसं रे तुमचं प्रेम ?  हॉटेलात जाऊन वारेमाप पैसे उधळले म्हणजेच तुमचं प्रेम सिद्ध होतं का आणि त्याहीपलीकडे जाऊन, प्रेम म्हणजे फक्त नवरा बायकोचंच का ? आणि एवढ्या तेवढ्याश्या गोष्टींनी कसले रे तुम्ही लगेच ढेपाळता आणि उदास होता ?”

बाईंनी सरबत्ती सुरू केली आणि तो निरुत्तरही झाला आणि अंतर्मुखही.

बाई निवृत्त होऊन दहा वर्षे होऊन गेली होती. इतक्या वर्षांत नखातही रोग नसणाऱ्या बाईंना गेल्या वर्षी अचानक कर्करोगाचे निदान झालं होतं. पण बाई त्या सगळ्याच अनुभवाला – त्या केमोथेरपी, शस्त्रक्रिया आणि लांबसडक केसांच्या त्या गळण्याला – या सगळ्यालाच असामान्य धीराने आणि हसतमुखाने सामोऱ्या गेल्या होत्या. ना कपाळावर एकही आठी, ना माझ्याच नशिबात हे का म्हणत नशिबाला दोष देणं. 

“अरे, माझ्यावर जगावेगळं प्रेम केलं ते माझ्या नवऱ्यानं,” हा इकडे भूतकाळात हरवलेला, आणि बाई तिकडे बोलत होत्या, “लग्न झाले तेव्हा मी फक्त अकरावीपर्यंत शिकले होते. त्या काळात, माझ्या नवऱ्यानं, मी शिकावं म्हणून जिद्द धरली नसती – हट्ट धरला नसता, इथून तिथून पैसे उभे करून माझ्या शिक्षणाच्या फीया भरल्या नसत्या,  तर मी शिक्षिकाच झाले नसते. आणि पुढचं हे सगळं इतकं छान घडलंच नसतं. 

आपली सून शिकलेली आहे आणि शिक्षिका आहे म्हणून माझ्या सासूनं माझ्यावर निर्व्याज प्रेम केलं. कधी गावातल्या घरात जमीन सारवू दिली नाही, की धुणीभांडी करू दिली नाही. ‘तू चार बुकं शिकलेली आहेस, तू न्हायी अशी कामं करायची’ सासूबाई म्हणायच्या.”

आणि खरंच होतं ते. 

त्याला आठवू लागलं. ‘माणसं जोडा रे’ हे अगदी बाईंचं ब्रीदवाक्य होतं. त्या बोलून दाखवायच्या नाहीत असं कधी, त्यांच्या कृतीतून पदोपदी दिसायचं ते.

आणि म्हणूनच मग प्राथमिक शाळेतले एवढुस्से विद्यार्थीही प्रचंड विश्वासाने आपल्या अडीअडचणी बाईंना सांगायचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे खांद्यावर बाळगणारे पालकही त्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी विश्वासाने बाईंकडे यायचे. 

याच प्रेमाने एखाद्या विद्यार्थ्याची आई तिच्या दोन भावजयींसह आणि त्या तिघींच्या चार पाच मुलांसह, दिवाळीच्या सुट्टीत, खुशाल बाईंच्या पुण्यातल्या घरी दोन दिवस राहायला यायच्या आणि ऐन थंडीत, संध्याकाळच्या वेळी आलेल्या, बायकोच्या या विद्यार्थ्याच्या आई, काकू आणि मुलांना थंडी बाधू नये म्हणून हातपाय धुण्यासाठी बाईंचे यजमान पाणी तापवून द्यायचे. 

आजही बाईंच्या मुलाचा मित्र अगदी हक्काने बाई, त्यांचे यजमान, बाईंची मुलगी या सगळ्यांना गाडीत घालून आपल्या घरी घेऊन जातो आणि भरपेट जेवण झाल्याशिवाय आणि त्याहूनही भरपेट गप्पा झाल्याशिवाय त्यांना सोडत नाही. 

आज बाईंचे विद्यार्थी वयाने – मानाने मोठे झालेत, पण अजूनही बाईंचा वाढदिवस असला की बाईंच्याच मुलीला विश्वासात घेत, त्यांना थांगपत्ता न लागू देता, त्यांच्याच घरी कार्यक्रम आयोजित करतात आणि बाईंना मोठ्ठं सरप्राईज देतात. 

बाईंच्या आजारपणात, त्यांच्या डॉक्टर – हॉस्पिटलच्या वाऱ्यांत शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांची बाईंना सोबत करण्यासाठी, त्यांना नेण्या – आणण्यासाठी चढाओढ लागलेली असे. 

बाईंची प्रकृती सुधारावी म्हणून बाईंच्या विद्यार्थ्यांनी, शेजाऱ्यापाजाऱ्यांनी नवस बोलले होते, अनुष्ठानं केली होती, आणि  बाई बऱ्या झाल्यावर, नवस फेडण्यासाठी बाईंची ठाण्याची विद्यार्थिनी अश्विनी तर  पार ठाण्याहून प्रभादेवीच्या सिद्धीविनायकापर्यंत ३५ किलोमीटर अंतर चालत आली होती. 

“प्रेम म्हणजे नुसती शारीरिक भावना, धांगडधिंगा आणि महागाच्या भेटवस्तू असं नसतं रे. परवाचीच गोष्ट. दिवसभराचं रहाटगाडगं आटोपलेलं, मी आपली स्वामी समर्थांना नमस्कार करून झोपायच्या खोलीत आले, तर आमचे हे टक्क जागे, झोप येत नाही म्हणाले.

मग काय, त्या रात्री अडीच वाजेपर्यंत आमच्या गप्पा चालल्या. लग्न झालं तेव्हा अक्षरश: भांडीकुंडीही नव्हती रे, कागदाच्या पुड्यांमध्ये डाळ तांदूळ बांधून ठेवायचे, तिथपासून संसाराची सुरुवात झाली, एकमेकांना सांभाळून घेत मस्त संसार झाला. परवा त्या सगळ्या प्रवासाची मस्त उजळणी झाली. 

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काही फार जगावेगळं नसतं रे. ते तुमच्या कॉलेजमध्ये NSS राष्ट्रीय सेवा योजनेचे घोषवाक्य आहे ना – ‘not me, but you’ ते म्हणजेच प्रेम, नाही का? 

स्वतःच्या आवडीनिवडींपेक्षा तुमच्या विद्यार्थ्याला, त्याच्या पालकांना, शेजाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, आईवडिलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जोडीदाराला काय हवं आहे याचा विचार आधी करणं, आणि त्याप्रमाणे वागणं, म्हणजेच प्रेम, नाही का ? 

आणि एकदा हा विचार रुजला की मग भाजी भाकरीही गोड लागते, ती एन्जॉय करायची. याहून बेश्ट व्हॅलेंटाईन तो काय वेगळा असणार आहे ?”

बाईंनी नेहमीप्रमाणे संदर्भासहित स्पष्टीकरण देत निरगाठ उकल तंत्राने विषय सोप्पा करून सांगितला. 

“बाई, कमाल आहे हां तुमची. प्रेम या विषयात मास्टरी आहे अगदी !” तो.

“आहे म्हणजे काय, असलीच पाहिजे. अरे, माहेरचं नावच मुळी प्रेमा आहे माझं !” बाईंनी हसत हसत फोन ठेवला.

आजही त्यांनी पाडगावकरांसारखं ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असं स्पष्ट सांगितलं नव्हतं, पण नेहमीप्रमाणे आपल्या उदाहरणांतून – आपल्या कृतीने समोरच्याला पटवून दिलं होतं. 

तो छान हसला, मगाचची त्याची मरगळ केव्हाच दूर पळाली होती. तो उठला, आणि त्याच्या ‘व्हॅलेंटाईन’बरोबर भाजी भाकरी एन्जॉय करण्यासाठी स्वयंपाकघराकडे वळला.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments