सुश्री सुनिता गद्रे

? जीवनरंग ❤️

 ☆ भैरुची गोष्ट !… लेखक – श्री मिलिंद पाध्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता गद्रे ☆

पहाट झाली. भैरू उठला. 

बैल सोडले. औत जोडले. 

शेतात गेला. शेत नांगरले. 

दुपार झाली. औत सोडले. 

बैलांना वैरण घातली. जवळ ओढा होता. बैलांना पाणी पाजले. आपली भाकरी सोडली. 

चटणी, भाकरी, कैरीचे लोणचे. 

झाडाखाली बसला. आवडीने जेवला.

पन्नासेक वर्षांपूर्वी शाळेच्या पाठ्यपुस्तकातून भेटणारा हा जुना भैरू. काळाच्या ओघात तो भेटेनासा झाला. त्याची जागा आता नव्या भैरूनं घेतली. तो भैरू शेतकरी होता. हा भैरू कुठल्यातरी ऑफिसमधील सेवानिवृत्त कारकून आहे. हा भैरूही त्या भैरू सारखाच पहाटे उठतो…

पहाट झाली. भैरू उठला…

नाईटलॅम्पच्या अंधुक उजेडात उशापाशी ठेवलेला चष्मा त्याने चाचपडत शोधला आणि मोबाईल हातात घेतला – “गुड मॉर्निंग … सुप्रभात” चे मेसेजेस पाठवायला. कॅलेंडरकडे नजर टाकून त्याने वार बघितला. “आज शनिवार, म्हणजे “जय हनुमान, जय बजरंगबली” चे मेसेजेस टाकायला हवेत, भैरूच्या मनात आलं. शाळा-कॉलेजमधल्या मित्रांचे ग्रुप्स, सोसायटीचा ग्रुप, बँकेतल्या रिटायर्ड मंडळींचा ग्रुप, नातेवाईकांचे ग्रुप्स, सगळीकडे “गुड मॉर्निंग…सुप्रभात” चे मेसेजेस टाकल्यावर एक काम हातावेगळं केल्याचं समाधान भैरूला वाटलं. “आता या सगळ्यांची मॉर्निंग गुड जावो की बॅड, आपल्याला काय त्याचं” या भावनेनं तो पुन्हा बेडवर आडवा झाला. आता तास-दीड तासाने उठल्यावर तो पुढच्या कामाला लागणार होता.

चहा-नाश्ता संपवून भैरूनं मोबाईल पुन्हा हातात घेतला. या ग्रुप मधले मेसेजेस त्या ग्रुपमध्ये टाकायचं काम आता त्याला करायचं होतं. इकडची “बाबाजींची प्रवचनं” तिकडे, तिकडचं “रोज सकाळी एक गाणे” इकडे, अमुक ग्रुप मधलं “दिनविशेष” तमुक ग्रुप मध्ये, तमुक ग्रुपमधल्या “हेल्थ टिप्स” अमुक ग्रुपमध्ये… एक तासानंतर इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे करून झाल्यावर एक मोठं काम झाल्याचा सुस्कारा भैरूनं सोडला. “हे सगळं आपण स्वतः वाचत बसत नाही हे किती बरंय”, आंघोळीला जाताजाता भैरुच्या मनात आलं.

आंघोळ, त्यानंतर देवपूजा घाईघाईनं उरकून त्याहूनही अधिक घाईघाईनं भैरूनं पुन्हा मोबाईल हातात घेतला. बँकेच्या ग्रुपमध्ये कुणाचातरी वाढदिवस होता. या बर्थडे बॉयशी आपली तोंडओळखही नाही, भैरुच्या लक्षात आलं आणि पाठोपाठ “आपण विश केलं नाही तर बरं दिसणार नाही. लोक काय म्हणतील” असं मनात आलं. लगोलग त्यानं त्याच्या स्टॉकमधल्या केकचा फोटो टाकून त्याला शुभेच्छा दिल्या आणि पाठोपाठ दुसऱ्या एका ग्रुपमध्ये कुणीतरी गचकल्याच्या पोस्टवर RIP लिहून गेलेल्याच्या आत्म्याला शांतीही मिळवून दिली. मोबाईल खाली ठेवायच्या आधी भैरूनं सकाळपासून आलेल्या सगळ्या गाण्यांना, अभंगांना “वा छान”, “मस्तच” अशी दाद देऊन टाकली आणि मग ती गाणी, ते अभंग डिलीटही करून टाकले. “दाद देण्यासाठी हे सगळं ऐकलंच पाहिजे असं अजिबात नाही” असं भैरूचं मत होतं.

कुणाची वामकुक्षी संपलेली असो वा नसो, आपण आपलं काम उरकून मोकळं व्हावं या भावनेनं दुपारी दोनच्या सुमारासच भैरूनं झाडून साऱ्या ग्रुप्सना, व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट्सना चहा-बिस्किटांचे फोटो असलेले “गुड आफ्टरनून” चे मेसेजेस टाकून दिले. मग सोसायटीच्या ग्रुपमध्ये एका मेंबरने “सोसायटीची रिडेव्हलपमेंट लवकरात लवकर करावी” अशी पोस्ट टाकली होती त्याला सहमतीचा अंगठा दाखवला आणि त्याच्याच खाली चार पोस्ट नंतर आलेल्या, “रिडेव्हलपमेंटची तूर्तास गरज नाही’ या पोस्टलाही पाठिंबा दर्शवणारा अंगठा दाखवला. “सर्व-पोस्ट-समभाव” आपल्या अंगी आहे याचा अभिमान भैरूला पुन्हा एकदा वाटला. भैरूनं मग काही ग्रुप्समध्ये “युती”च्या बाजूने आलेली पोस्ट फॉरवर्ड केली तर काही ग्रुप्समध्ये “आघाडी” च्या बाजूनं आलेली. “कुणी का येईना सत्तेवर, आपलं काम पोस्ट्स फॉरवर्ड करायचं,” भैरुच्या मनात आलं.

“डॉलरच्या तुलनेत रुपया” या सकाळीच फॉरवर्ड केलेल्या पोस्टवर एका ग्रुपमध्ये दोन-चार जणांनी शंका उपस्थित केल्या होत्या तर दुसऱ्या एका ग्रुपमध्ये एक-दोन जणांनी प्रतिप्रश्न केले होते. “आपल्याला यातलं XX काही समजत नाही” हे पक्कं माहीत असल्याने “पुढचे दोन दिवस या दोन्ही ग्रुप्सवर फिरकायचं नाही अशी खूणगाठ बांधत भैरू एका तिसऱ्याच ग्रुपकडे वळला तर तिथे त्यानं फॉरवर्ड केलेल्या “ऐका मालकंसची गाणी” वर हा “मालकंस नाही, कलावती आहे” अशी टिप्पणी कुणीतरी केली होती. त्यावर शेक्सपिअरच्या थाटात “नांवात काय आहे?” असं उत्तर देऊन भैरूनं विषय संपवला. 

“काय मागवू रे तुझ्यासाठी – पिझ्झा की बर्गर?” या सौ च्या प्रश्नाला, “दोन्ही” असं थोडक्यात उत्तर देऊन भैरू “जंकफूड – एक शाप” ही पोस्ट फॉरवर्ड करण्यात बिझी झाला. 

रात्रीचे नऊ वाजल्याचे बघून भैरूनं त्याच्या पोतडीतून चंद्र-चांदण्यांची चित्र असलेले “गुड नाईट – शुभरात्री” चे मेसेजेस बाहेर काढले, पाठवलेही. आता मोबाईल बंद करणार तोच त्याच्या शाळासोबत्यानं पाठवलेलं “मालवून टाक दीप….” गाणं त्याच्या व्हॉट्सअपवर दिसू लागलं. “मालवून टाक दीप….” चे पुढचे शब्द “चेतवून अंग-अंग! राजसा किती दिसांत लाभला निवांत संग!” हे आहेत हे ध्यानीमनीही नसलेल्या भैरूनं ते “गुड नाईट… स्वीट ड्रीम्स” अशी जोड देत शेजारच्या आजोबांना तत्परतेनं फॉरवर्ड केलं आणि मोबाईल बंद करून तो झोपायच्या तयारीला लागला…. उद्या पहाटे त्याला उठायचं होतं… उद्या रविवार म्हणजे “सूर्याचे फोटो असलेले गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवायचे होते… मग प्रवचनं, गाणी… इकडचं तिकडे अन् तिकडचं इकडे. 

तो भैरू पहाटे उठून कष्ट करून शेतमळा फुलवत असे. हा भैरू पहाटे उठून बिनकष्टाचा वायफळाचा मळा फुलवतो.

लिहिलेलं बायकोला वाचून दाखवल्यावर, “मी ओळखते बरं का या भैरूला” असं ती आपल्याकडे बघत डोळे मिचकावत मिश्किलपणे का म्हणाली हे न उमगल्यानं बुचकळ्यात पडलेला मिलिंद.

— समाप्त —

लेखक :  मिलिंद पाध्ये, ठाणे 

प्रस्तुती : सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments