मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नाती वांझ होताना… कवयित्री मनिषा पाटील ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? पुस्तकावर बोलू काही?

☆ नाती वांझ होताना… कवयित्री मनिषा पाटील ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

कविता संग्रह –नाती वांझ होताना

कवयित्री—मनीषा पाटील- हरोलीकर

प्रकाशक–संस्कृती प्रकाशन. पुणे

पृष्ठ संख्या–९५

किंमत–१५० रू

‘अस्वस्थ नात्यांचा आरसाःनाती वांझ होताना’

“नाती वांझ होताना” हा मनीषा पाटील-हरोलीकर यांचा कविता संग्रह हाती आला.कविता संग्रहाच्या शीर्षकाने मनाला आधीच गोठवून टाकले.किती समर्पक नाव!!!खरं तर मानवी जीवन समृध्द करण्याचा महामार्ग म्हणजे नात्यांची गुंफण.नात्यातला ओलावा जगायला शिकवतो.पण आज मात्र याच नात्यांचा ओलावा आटत जाताना दिसत आहे. सर्वत्र नात्यांत वांझोटेपण येताना दिसत आहे.कोरडेपणाचे एक वादळ सर्वत्र घोंगावत आहे.म्हणूनच कवयित्री मनीषा या अस्वस्थ होत आहेत.ग्रामीण भागातील बाई आज ही मोकळेपणाने वागू शकत नाही.बोलू शकत नाही .तिची नेहमी घुसमट होते.हे सारे कवयित्रीने जवळून अनुभवले आहे.बदलत जाणारे ग्रामीण जीवन ही अस्वस्थ करणारे आहे.हे सगळे भाव कवयित्रीने कवितेतून व्यक्त केले आहेत.नाती वांझ होताना या कविता संग्रहातील प्रत्येक कविता म्हणजे एक शब्द शिल्प आहे.शब्द लेणं आहे.पुन्हा पुन्हा कविता वाचली की नवा आशय सापडतो.नवा भाव सापडतो.प्रत्येक कविता बाईच्या मनाचा एक एक भावपदर उलगडून दाखवते.प्रत्येक कविता बाईच्या मनाचा आरसा आहे,असे मला वाटते.बाईचं सोसणं,घडणं, असणं,दिसणं, सारं या कवितेतून व्यक्त होतं.सगळ्याच कविता मनात विचाराचं वादळ उठवून जातात.आजच्या वर्तमानाला चेहरा नाही.कोणता मार्ग सापडत नाही तेव्हा कवयित्री म्हणते,

कोणतेच प्रहर नसलेले

हे कसले वर्तमान

जगतेय मी

बाईचं विश्व घर असते.घर तिचा श्वास असतो. आज घडीला तिच्या श्वासावर कुऱ्हाड घातली जात आहे. तिचं जगणंच हिरावून घेतलं जातं आहे. तेव्हा  ‘मी बंद केलेय ‘या कवितेत कणखरपणे  कवयित्री म्हणते,

माझ्या वाळवंटात वारा बनून ही येऊ नकोस मी बंद केलेय आता नात्यांचे वृक्षारोपण खोट्या सहानुभूती ची तिला आता गरज नाही.

किती संकटे आली, तरी बाई हिंमत सोडत नाही. तेवढी ती चिकट,चिवट असते.पण सहनशीलतेला ही मर्यादा असते.सहनशीलतेचा कडेलोट होतो तेव्हा बाई विहीर जवळ करते.त्या विहीरीची कणव कवयित्रीला येते.तिला विहीर शापित आई वाटते. गावातल्या किती लेकी -बाळींची  दुःखे तिने पाहिली. त्यांना पदरात घेता घेता या आईचा पदर शापित झाला.ही भावना ‘शापित आईपण ‘या कवितेत त्यांनी मांडली

ज्यांच्यासाठी भूमी

दुभंगलीच नाही

अशा किती सीतांना

घेतले असेल सामावून

या विहिरींनी

आणि थंडावली असेल

तडफड

त्यांच्या रोजच्या मरणाची

आज ही विधवा बाईला समाजात मान नाही.प्रत्येक वेळी शरीरानेच सती कशाला जायला पाहिजे?बाईच्या जगण्याचा अधिकारच नवऱ्या मागे काढून घेतला जातो. तिचे जगणे उध्वस्त होऊन जाते. ‘आज ही बाई सती जातेच की’ या कवितेत कवयित्री समाजाचा एक विद्रुप चेहरा समोर आणतात.

पांढऱ्या कपाळाच्या बाईला

कुठे असतो अधिकार

मनासारखे जगण्याचा

देहावर इंद्रधनू सजविण्याचा

आज गाव आपला चेहरा बदलत आहे.नात्यात निबरपणा वाढला आहे.कोणाचे सोयरसुतक कोणाला नाही. हा आशय ‘काय झालंय माझ्या गावाला?’ या कवितेत मांडला आहे.

कुणी पेटता ठेवलाय

ज्याच्या त्याच्या मनात

हा द्वेषाचा अंगार

एकाच बांधावरच्या बोरी- बाभळी

फाडत सुटल्यात

प्रत्येक फांदीचं पानन् पान

त्याच कवितेत कवयित्री म्हणते,

कोरड्या विहिरीसारखा

विद्रुप झालाय गावाचा चेहरा

मलाही, सांभाळावेत ऋतू, बायका टाळतात बायकांना,शोधायला हवे,बायका प्रत्येक कविता मनात ठसणारी, विचार मांडणारी आहे.

‘हवाय नवा जन्म’ मधून नवी आशा,स्वप्न,नवी उमेद व्यक्त केली आहे.तिला वनवास संपवून फुलपाखरू व्हायचंय.तिला आपल्या वाटणीचा सूर्यप्रकाश हवा आहे.ही आशा कवितेतून मांडली आहे.

कवितेतून कवयित्री संवाद साधते आपलं मन मोकळं करते.कवयित्रीचे अनुभव विश्व संपन्न आहे.निरीक्षण उत्तम आहे हे कवितेतून आलेल्या प्रतिमा आणि प्रतिभेतून कळते. मनिषाच्या कविता मला खूप आवडतात.ती माझी मैत्रीण आहे.तिचा कवितासंग्रह अतिशय देखणा झाला आहे.या पुढे ही तिच्या हातून उत्तम साहित्य सेवा घडावी.तिला अनेक शुभेच्छा.

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अवकाळी विळखा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – श्री महादेव बी. बुरुटे ☆

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अवकाळी विळखा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – श्री महादेव बी. बुरुटे ☆

कथासंग्रह: अवकाळी विळखा

लेखक: सचिन वसंत पाटील.

प्रकाशक: गवळी प्रकाशन, इस्लामपूर

पाने: २०४

किमंत: ३१० रुपये

श्री सचिन वसंत पाटील

शेतकऱ्यांच्या काळीज व्यथा : अवकाळी विळखा

विळखा म्हणजे मिठी ! या मिठीचे अनेक प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या कंबरेभोवती पडलेला अनेक संकटांचा विळखा म्हणजे जणू मगरमिठीच ! कितीही धडपड केली तरी सैल न होणारा अजगराचा विळखाच तो . हाडं खिळखिळी करुन त्यांचा भुगा केल्याशिवाय तृप्त न होणारा अक्राळविक्राळ…!! असाच प्रकर्षाने अनुभव येतो तो कथाकार सचिन वसंत पाटील यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला “अवकाळी विळखा” हा कथासंग्रह वाचताना. शेती, माती आणि शेतकरी यांची जीवा – शिवाची नाळ जन्मताच जुळलेली असते. कुठल्या ना कुठल्या  विळख्यात ती आवळत जाते. बळीराजा या उपाधीने गौरवलेला बळीराजा नवीन अर्थव्यवस्थेत भरडला जातो, चिरडला जातो. आतल्या आत झुरत राहतो. त्यामुळे बळीराजा ही उपाधीच हास्यास्पद ठरली आहे कि काय, असे वाटू लागते.

या संग्रहातील सर्वच कथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर लटकणाऱ्या टांगत्या तलवारीची भिषण सत्य वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. या अवकाळी विळख्यात ‘घुसमट’ कथेत आपणास परिस्थितीचे चटके सोसत द्विधा अवस्थेत होरपळणारा विलास भेटतो. शेती मातीवर आईप्रमाणे श्रद्धा असणारा विलास शेत विकण्याच्या सल्ल्याने काळजात फाटत जातो. पैसेवाल्यांच्या त्याच्या दारिद्र्याच्या जखमांवर मिठ चोळणारे उग्र शब्द आणि व्यवहाराने अंतरबाह्य घुसमटून जातो. कथा वाचताना तो विलास म्हणजे आपण कधी होतो हे कळतच नाही.

शेतीत पीक पेरुन त्याचं उत्पन्न हातात येईपर्यंत कोणकोणत्या दिव्व्यातून शेतकऱ्यांना जावे लागते. डोक्यावरील अनेक समस्यारुपी टांगत्या तलवारींचा प्राणपणाने सामना करावा लागतो. त्यातून तावून सुलाखून निघालं तर कुठे चार पैसे हातात पडतात, . मजुरांची टंचाई हाही अलिकडे भेडसावणारा प्रश्न, अर्थात विळखाच झाला आहे. निसर्गाचे तांडव आणि मजूर समस्या यात हवालदिल झालेला नामा ‘टांगती तलवार’ या कथेत बरंच काही सांगून जातो.

मातीत जन्मलेला आणि मातीतच विलीन होणारा एक सच्चा शेतकरी नारुकाका ‘सुर्यास्त’ या कथेत भेटतो.  एक सच्च्या भुमिपुत्र असलेल्या नारुकाकाच्या भयानक वास्तववादी जगण्याची ही शोकांतिका आहे. पिढीतील अंतर आणि काळानुसार होणाऱ्या बदलात, निसर्ग बदलात त्या त्या पिढीतील लोकांची होणारी घुसमट या कथेत वाचून मन हेलावते. शेती-मातीवर नितांत श्रद्धा असलेल्या शेतकरी जीवनाचा अचूक वेध घेणारी ही कथा साहित्यिक मुल्ल्याच्या दृष्टीने अतिशय उच्च दर्जाची आहे.

कृत्रिम टंचाई आणि काळा बाजार  ही तर नेहमीचीच समस्या ! ‘उद्रेक’ या कथेत रासायनिक खताची ऐन मोक्याच्या वेळी कृत्रिम टंचाई होते. शासकीय भ्रष्टाचारावर वैतागलेल्या शेतकऱ्यांच्या मनात कसा संताप येतो आणि त्यातून होणारा त्यांचा उद्रेक  कसा व्यक्त होतो हे दाखविले आहे.

तसेच शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करुन पिकवलेल्या मालाचा फायदा दलाल उठवतात हे ‘तुपातली वांगी ‘ या कथेत दिसून येते. कर्ता धर्ता बळीराजा भिकेकंगाल राहतो हे सांगत असतानाच सचिन पाटील यांनी जर शेतकऱ्यांनी ही मधली दलालांची फळी मोडून काढली आणि आपला माल आपणच विकला तर शेतकरी व ग्राहक या दोघांनाही ते फायद्याचे ठरणार असल्याचा भविष्यकालिन दृष्टिकोण कथन केला आहे. आणि महत्वाचे म्हणजे तसा शेतकऱ्यांचा दृष्टिकोणही आज उदयास येताना दिसतो आहे.

या कथासंग्रहात ‘वाट’ कथेत ऊस शेतीची परिस्थिती आणि इतरांनी त्यात जाणून-बुजून नाडलेला हतबल पांडबा भेटतो. त्याची घरसंसाराचा मेळ घालण्यासाठी होणारी घुसमट पाहून मन द्रवते. ‘दिवसमान’ कथेत  राबराब राबून मुलांच्या जवानीत आपल्याला सुख मिळेल या आशेवर वाटचाल केलेला महादेवबापु भेटतो. उतारवयातही पोरांच्या अविचारी कर्तव्याने त्याची पोटासाठी चाललेली धडपड पाहून अंतःकरण व्यथीत होते. ‘कष्टाची भाकरी’ कथेत द्राक्ष बागेतील नुकसानीने वैफल्यग्रस्त होवून व्यसनात बुडालेल्या विनायकला जेंव्हा शिक्षणाची खोटी प्रतिष्ठा सोडून कोणतेही काम करुन कष्टाची भाकरी मिळवण्यातली गोडी लागते हे वाचून मनाला दिलासा मिळतो.

नानाची कुस्तीतली ‘लढत’ ही खरी कुस्तीतली लढत नसून संसाररुपी कुस्ती जिंकण्याचा त्याचा प्राणपणाने चाललेला लढा असल्याचे जाणवते. घर फिरले की घराचे वासेही फिरतात याची प्रकर्षाने प्रचिती येते. तर ‘मैत्री’ कथेत अलिकडे फोफावलेल्या फसव्या स्किमा, त्यात होणारी फसगत, व्यसनाधिनता, नामदेवसारख्या स्वच्छ मनाच्या माणसाची मित्राने केलेली फसवणूक पहायला मिळते. ‘बुजगावणं’ कथेमध्ये झटपट मिळणाऱ्या पैशासाठी शेत एम. आय. डी. सी. ला देणारा अधुनिक पोरगा आणि या धक्क्याने वेडा झालेला वृद्ध शामूतात्या आहे.

‘सांभाळ रे… ‘  कथेत पंढरीच्या विठ्ठलाला भेटायला गेलेल्या विकाची विठ्ठलाभोवती पडलेल्या संधीसाधुंच्या गराड्यात होणारी घोर निराशा पहायला मिळते. पवित्र चंद्रभागेची केलेली गटारगंगा, श्रद्धा- अंधश्रद्धांच्यात अजूनही अडकलेला समाज वाचून मन उद्वीघ्न होते. याउलट ‘रान’ कथेत रानमातीच्या सुगंधासाठी असुसलेला सखाराम भेटला की मन आनंदते. शिर्षक कथेत अवकाळी विळख्यात बेचीराख झालेली शेती पाहिली की अंतःकरण करपल्याशिवाय राहत नाही. पण या अवकाळीला वृक्ष तोड हीच कारणीभूत असून आता झाडे लावली पाहिजेत हा विचार ऐकला की दिलासाही मिळतो.

या पुस्तकातील प्रसंग वाचताना लेखकाच्या सुक्ष्म निरीक्षण आणि वर्णन करण्याची खुबी वाचकाला खिळवून ठेवते. काही कथा पुन्हा पुन्हा वाचाव्यात अशा आहेत. त्यातला आशय पुन्हा पुन्हा गडद होत वास्तवता अधोरेखित करत वाचकांना विचार करायला लावतो.

असा हा अतिशय बोलके आणि समर्पक मुखपृष्ठ असलेला कथासंग्रह ‘अवकाळी विळखा’. यातील शेतकरी अनेक संकटात अडकुन सुद्धा शेती माती व शेतकरी यांची नाळ तुटू न देता सुखेनैव वाटचालीची बीजे रुजवणारा आहे. हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाला आहे हे मला अभिमानपुर्वक नमूद करावेसे वाटते.

©  श्री महादेव बी. बुरुटे

संपर्क – ६५०, जे. मार्ग, शेगांव, ता., जि. सांगली  Pin – 416404 Mob- 9765374805, Email: burutemahadev@gmail

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ महा-सम्राट… श्री विश्वास पाटील ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ महा-सम्राट…  श्री विश्वास पाटील ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकाचे नाव – महा-सम्राट

लेखक -विश्वास पाटील

खंड पहिला – झंझावात (छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी माला)

प्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस प्रा.लि., १९४१, सदाशिव पेठ, माडीवाले काॅलनी. पुणे ४११०३०

प्रकाशन काल -१ आॅगस्ट २०२२

किंमत – रू.५७५/-

या पुस्तकाचा पहिला भाग आपल्याला शहाजी महाराजांच्या काळातील बऱ्याच गोष्टी सांगून जातो शहाजीराजे मंदिर निजामशाही, आदिलशाही या दोन्ही ठिकाणी कामगिरी गाजवलेले एक मातब्बर सरदार म्हणून माहीत होते. परंतु या पुस्तकात सुरुवातीलाच त्यांनी लढलेल्या अनेक लढाया, गाजवलेले शौर्य आणि त्यांची मनातून असणारी स्वातंत्र्याची ओढ याविषयी अगदी परिपूर्ण माहिती मिळते. शिवराय आपल्या पिताजींबरोबर बंगळूर येथे फक्त सहा वर्षापर्यंत होते. त्यानंतर राजमाता जिजाऊ सह ते पुनवडी म्हणजेच पुणे येथे आले. आणि खरा स्वराज्याचा इतिहास सुरू झाला. पण त्यासाठी त्यांच्या आधीच्या काळात शहाजीराजे किती झगडले हे या पुस्तकात वाचायला मिळते. पुरंदर, जावळी, प्रबळगड, पेमगिरी अशा विविध ठिकाणी त्यांनी युध्दे खेळली.तसेच जे राजकारण केले ते या पुस्तकातून कळते. गुलामगिरी विरुद्ध पहिला एल्गार त्यांनी केला. शिवरायांना स्फूर्ती देणारे हे त्यांचे पिताजी! परक्यांची चाकरी करताना त्यांच्या मनात केवढी मोठी खंत होती हे वाचताना जाणवते.

जिजाऊंच्या माहेरच्या माणसांची त्यांना वैर घ्यावे लागले पण ज्या मुस्लिम राज्यांची त्यांनी सरदारकी पत्करली होती त्यासाठी कर्तव्य म्हणून त्यांनीही युद्ध केली.

शहाजीराजांना घोड्यांची चांगली पारख होती सारंगखेड्याच्या घोड्यांचा बाजार भरत असेल तेथे “दिल पाक” नावाचा अश्व  शहाजीराजांनी खरेदी केला होता.

आदिलशाही, निजामशाही आणि मुगल शाही या तीनही मुसलमानी शाह्यांना तोंड देत 30-40 वर्षे शहाजीराजांनी कार्य केले होते. शिवबांना लहानपणीच स्वराज्याचे बाळकडू जिजामातेकडून कसे मिळाले त्याचेही वर्णन या कादंबरीत खूप छोट्या छोट्या प्रसंगातून दिसून येते.

या पुस्तकाचा शेवटचा भाग राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी कशी घडली. तसेच शिवरायांनी छोटे-मोठे किल्ले घेत घेत स्वराज्याची पायाभरणी कशी केली हे सांगतो. अफजल खान महाराजांच्या भेटीसाठी येण्याच्या प्रसंगाचे वर्णन या पुस्तकात शेवटच्या भागात आहे शिवरायांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी चांगले विचार स्वराज्य स्थापनेसाठी दिले. अफजलखानाच्या वधा नंतर ‘देहाचे शत्रुत्व संपले’ या विचाराने त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्यासाठी वेगळी जागा शिवरायांनी दिली.

शिवरायांच्या जीवनावरील कादंबरी मालेतील या पहिल्याच झंजावातात आपल्याला शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा नव्याने वाचण्याचा आनंद मिळतो!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ आर्ट अफेअर – डाॅ.मिलिंद विनोद ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆

सौ. प्रभा हर्षे

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  आर्ट अफेअर – डाॅ.मिलिंद विनोद ☆ परिचय – सौ. प्रभा हर्षे ☆ 

पुस्तक   – “आर्ट अफेअर”

(कथासंग्रह/स्फुट लेखन संग्रह)

लेखक    – डॉ मिलिंद विनोद

प्रकाशक – नवचैतन्य प्रकाशन, मुंबई.

डॉ. मिलिंद विनोद यांचा ‘आर्ट अफेअर’ हा कथासंग्रह वाचण्याआधी त्यांचा परिचय व श्री लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचली. उत्साहात मी पण पुस्तक वाचले आणि खूप आनंद झाला.

आनंद अशासाठी की डॉ. विनोद हे C.A.; C PA; P.HD; या पदव्या प्राप्त केलेले  प्रथितयश अर्थतज्ञ असूनही, अत्यंत सोप्या साध्या भाषेत त्यांनी सर्व लेखन केले आहे. कुठेही लटांबर वाक्ये नाहीत, बोजड शब्दरचना नाही, तरीही मूद्देसूद लेखन, आर्थिक विषयांवर असलेली पकड, रुक्ष माहितीही रंजकपणे सांगण्याची हातोटी, ही वैशिष्ट्ये कथांमध्ये तर दिसतातच, पण स्फुट लेखनात जास्त दिसतात. काही गोष्टींना दुबई / गल्फ कंट्रीची पार्श्वभूमी लाभली आहे. श्री विनोद यांच्या दुबईच्या वास्तव्याशी  जोडलेल्या कथा या संग्रहात आहेत, उदाहरणार्थ अँब्सेंट, Emirates अर्थात emi@rates या कथा.

ह्यातील ‘ अँब्सेंट ‘ ही कथा फार वेगळी आहे आणि मनाला चटका लावून जाते.  परिक्षेच्या हॉलमध्ये एका मुलाचे आईवडील येतात.  ते का बरं आले असावेत असा विचार करत असेपर्यंतच ते एका टेबलापाशी उभे रहातात.  त्या विद्यार्थ्याचे आय-कार्ड, हॉल टिकेट व एक गुलाबाचे फूल त्या जागेवर ठेवतात. एक मिनिट शांतता पाळून ते तिथून निघता निघता सांगतात, की दोन दिवसापूर्वी अपघातात निधन पावलेल्या विद्यार्थ्यांचे ते पालक आहेत. सर्व मुले आणि परिक्षक चित्रासारखे स्तब्ध होतात. हा मुलगा फक्त परिक्षेला अँब्सेंट नाही, तर आता तो त्यांच्या आयुष्यातूनच अँब्सेंट झाला आहे ह्या विचाराने लेखक खिन्न होतो.   १८-१९ वर्षाच्या मुलाचा मृत्यु सहन करणे कोणत्याही आईवडिलांना फार कठीण ! ही भावना आपल्यापर्यंत ही जशीच्या तशी पोहोचते.

अशीच ‘ Emirates ‘ ही रमेशच्या आयुष्याची  गोष्ट वाचण्यासारखी आहे. १२-१५ वर्षे  दुबईत राहिल्यानंतर

१९९८ च्या आर्थिक संकटात रमेशची नोकरी जाते. एक वर्ष तो तेथे कुटुंबाला घेऊन कसेबसे काढतो.  पण नाईलाजास्तव त्याला बायको व मुलांना मुंबईला पाठवावे  लागते. दोन वर्षानंतर तो सुट्टी घेऊन येतो तेव्हाची बदललेली बायकामुले पाहून तो खंतावून जातो. आर्थिक बदलांबरोबर नीतीमत्तेतीलही बदल तो परिस्थितीप्राप्त म्हणून मान्य करतो. ही खूप कठीण गोष्ट बाजूला सारून तो आयुष्य सावरण्यासाठीची धडपड परत करू लागतो…..  श्री. विनोदांच्या भाषेचे वैशिष्ट्य असे की जणू काही  घटनास्थळी आपणही प्रत्यक्ष हजर आहोत की काय असे वाटायला लागते. रमेशची सुखदुःखं आपलीच आहेत ही भावना बेचैन करते.

कथासंग्रहात  एकूण ८ कथा व ११ स्फुट लेख आहेत. 

सगळ्याच कथांचे विषयही  वेचक व वेधक आहेत. या सर्व मधमाश्याच्या पोळ्याची राणी आहे ‘आर्ट अफेअर’ ही कथा. एखाद्या वेगवान इंग्रजी थ्रिलरप्रमाणे कथा पुढे सरकत रहाते. खिस्तीजच्या ऑक्शनमध्ये एकाच कॅनव्हासवर मागे/पुढे काढलेले भगवान कृष्ण आणि गौतम बुद्ध  यांचे अतिशय वेगळ्या शैलीत काढलेले चित्र  विकावयास येते. अतर्क्य किमतीला हे पेंटिंग विकले जाणार, एवढ्यात सेलर ऐनवेळी चित्र ऑक्शन मधून विथड्रॉ  करतो. आणि एक जगप्रसिध्द चित्रकार उभ्या करत असलेल्या इन्स्टिट्यूटला, एका खाजगी कार्यक्रमात, भेट म्हणून देतो. हे सगळे का आणि कशासाठी हे प्रत्यक्ष गोष्टीतच वाचण्यासारखे आहे. माणसाच्या आयुष्याचा गुंता  लेखक सोडवत असताना वाचकही त्यात गुंततच जातो, आणि हीच त्या गोष्टीची जादू.

मिलिंद विनोद यांना माणसाच्या स्वभावाचा अभ्यास करायला आवडते. माणसाच्या वागण्याचे/कृतींचे ते निरीक्षण करतात, त्याचा विचार करतात, पर्यायांचाही विचार करतात, व त्यातून त्या पात्रांची  कथाबीजाला पोषक अशी वर्तनशैली बनते . मग कथा आश्चर्यकारकपणे पुढे सरकते व शेवटी वाचकाला चकित करून सोडते.  ‘Flagship of the group’ अशा या कथेचं नाव संग्रहाला दिले यातच सर्व काही आले. 

आर्ट अफेअरच्या बरीच जवळ जाणारी अजून एक रहस्यकथा म्हणजे ‘ फोटोप्लॉटर’ . लग्नाचा अल्बम वेळेवर येत नाही म्हणून फोटोग्राफरची शोधाशोध सुरू होते आणि त्यातून एक हाय टेक फायनान्शियल स्कॅमचा गुंता हातात येतो. पुढची गोष्ट लेखकाच्या शब्दातच वाचण्यात मजा आहे.

डॉ. विनोद यांचे स्फुट लेखनही स्वतंत्र विचारांचे आहे. देश सोडून जायचे असल्याने इतक्या वर्षांच्या सवयीच्या असलेल्या आयकिया स्टोअरच्या आठवणी, विमानतळावरील करोनाचा धमाका, द्वयर्थी इंग्रजी न समजल्यामुळे काहीही सांगणारी महिला, हिंदी गाण्यांवरचे प्रेम, अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी स्फुट लेखन केले आहे. ‘ अंकुर ‘ हा लेख अगदी तरल व भावस्पर्शी आहे. एक छोटे झाड जागा बदलताना हलले  जाते. लहान मुलासारखे तेही घाबरते. पण मायेचा स्पर्श, ऊब मिळाल्यावर त्याला छोटा अंकुर फुटतो…  सर्वच कल्पनारम्य आहे. दहा एक वाक्यात अतिशय संवेदनशील असा हा लेख आहे. असाच अजून एक लेख म्हणजे ‘ व्यथा बाबांची’ . सर्व आधुनिक बाबा ही अति बिझी माणसं !  मनात इच्छा असूनही त्यांना मुलांजवळ रहाता येत नाही. आता ते आजोबा झालेत तरी त्यांची मुले दूर आहेत, आणि त्यांच्या छोट्या नातवंडात ते आपलं मूल शोधताहेत. परिस्थिती कोणीही बदलू शकत नाही. आपल्या आठवणी मागे ठेवून मुले दूर जातात. त्या आठवणींच्या सोबत आयुष्य काढणे म्हणजे मनावर मोठा दगड ठेवणे, हे सर्व बाबाला करावे लागते. अपरिहार्य अशा ताटातुटीचे वर्णन वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही.

वेगळ्या विषयावरील कथा आणि दर्जेदार स्फुट लेखन ह्यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल याबद्दल मला अजिबात शंका नाही. डॉ. मिलिंद विनोद यांच्या पुढच्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा !

परिचय : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆

सौ. वीणा आशुतोष रारावीकर

 

 

 

☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ 

☆  क्लिक ट्रिक – अर्चना देशपांडे जोशी ☆ परिचय – सौ. वीणा आशुतोष रारावीकर ☆ 

लेखिका : अर्चना देशपांडे जोशी. 

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन 

पृष्ठसंख्या : १२६ 

किंमत : रु. १७५/-  

सध्याच्या मोबाईलच्या जगात सर्वच जण फोटो काढत असतात आणि लाईक मिळवत असतात. “फोटो काढणे” हा एक खेळ झाला आहे. अशावेळी मनात शंका येते,  “फोटोग्राफी” ही कला म्हणून आता अस्तित्वात आहे का? याचे उत्तर आपल्याला अर्चना देशपांडे जोशी यांच्या ‘क्लिक ट्रिक’ या पुस्तकात मिळते. खरी फोटोग्राफी, मोबाईल फोटोग्राफी आणि आपले आयुष्य यांचा मेळ घालत, बत्तीस ललित लेखांची मालिका असलेले हे पुस्तक. ‘छायाचित्र कलेवरच सोप्पं भाष्य’ असे सांगत प्रस्तावनेलाच सुधीर गाडगीळसरांनी पुस्तकाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. तर विनायक पुराणिक सरांनी या पुस्तकाचे योग्य शब्दात वर्णन केले आहे. फोटो काढण्याची एक वेगळी नजर या पुस्तकातून मिळते, असे ते सांगतात. तर यापुढे जाऊन मला वाटते, फक्त फोटोच नाही, तर जीवनातील विविध प्रसंगाना वेगळ्या नजरेने बघण्याची दृष्टी यातून मिळते. ‘मनाला मुग्ध करणाऱ्या फोटोंचे मंत्र’ सांगतानाच लेखिकेने ‘आपल्या लक्षात न येणारे सध्याच्या मोबाईल फोटोग्राफीचे तोटे’ यावरही खरपूस भाष्य केले आहे.

हल्ली क्लिक करणे खूप सोप्पे झाले आहे. हवे तेवढे, हवे तसे दशसहस्र क्लिक सारेच सतत करत असतात. पण त्यातील उत्तम क्लिक कोणता झाला? या एका क्लिकचे महत्व आणि तो कसा घ्यायचा, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे .. प्रत्येक लेखातून याचा परिचय होत जातो.

सावली, प्रतिछाया, आपली प्रतिमा. एकच शब्द. अनेक वळणे घेत आपल्या समोर येतो. ‘आधीच उल्हास’ या लेखात फोटोच्या विषयाएवढेच, त्याच्या सीमारेखेचे महत्व सांगितले आहे. फोटोत जिवंतपणा आणण्यासाठी गरज असते थोडा विचार करण्याची आणि शोधक नजरेची. फोटो कंपोझीशनप्रमाणेच त्याच्या बॅकग्राऊंडचा देखील विचार केला पाहिजे. ट्रॅंगल कंपोझिशनची युक्ती स्टील लाईफ फोटोग्राफीप्रमाणे फूड फोटोग्राफीत देखील वापरली जाते. ‘झाले मोकळे आकाश’ या लेखातून वाईल्ड आणि टेली लेन्स मधला फरक सांगताना, लेखिका चिवड्याचे गंमतीशीर उदाहरण देते. कॅमेरा हा कॅनव्हास आणि लेन्स हा ब्रश आहे, हे जर लक्षात आले तर आपले आपणच कलात्मक, सुबक देखणे फोटो काढू शकतो. फोटो एकतर चांगला असतो किंवा नसतो. हल्ली बऱ्यापैकी फोटो सगळेच काढत असतात. फोटो तिथे आधीपासून असतो. तो काढण्यासाठी  नजरेबरोबर आपल्या बुध्दीला श्रम घ्यावे लागतात. म्हणजे नेमका फोटो काढल्याचा आनंद आपल्याला मिळतो, असे ‘तो तिथे आहे’ यामधून समजते. ‘जाड्या-रड्या’ तून फोटोग्राफीमधील वेट बॅलन्स म्हणजे काय? हे लेखिकेने नमूद केले आहे. निसर्गात चौकट जागोजागी असते. त्याचा योग्य उपयोग फोटोची चौकट ठरवताना केला पाहिजे. ‘प्रत्येक फोटो काढताना आधी विचार करावा लागतो. हल्ली फोटो काढून झाल्यावर विचार करत बसतात.’ ‘आखीव रेखीव’ मधील लेखिकेचे हे वाक्य आपल्याला विचार करायला लावते. नियम बनवावे लागतात कारण कोणीतरी नियमबाह्य वर्तन केलेले असते म्हणून. ब्रेकींग रूल्स फक्त कुठे आणि किती करायचे असतात, हे सत्य फक्त फोटोग्राफीत नाही तर जीवनात देखील शिकणे आवश्यक आहे. याची जाणीव ‘नियमातील अनियम’ यातून होते. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे, तिथला गृहपाठ करणे जरुरीचे आहे. आपल्याला ट्रिपला जायचे असेल तर हे जितके आवश्यक, तितकेच फोटोप्रवासासाठी कोणती सावधगिरी बाळगायाची हे लक्षात घेतले पाहिजे. पावसाळयात फोटोग्राफी करताना कोणती काळजी घ्यायची, याबद्दल लेखिकेने टिप्स दिल्या आहेत. स्ट्रीट फोटोग्राफी म्हणजे घटनेपलिकडे बघण्याची दृष्टि. ॲग्रीकल्चरल, आर्किटेक्चर आणि इंटीरीयर, मॉडेल, कल्चरल फोटोग्राफी आणि टुरिझम, ऐतिहासिक वास्तू, शिल्प व जंगल असे फोटोग्राफीतील विविध प्रकार आहेत. फोटोक्राफ्ट व कॅन्डीड फोटोग्राफी वाचून आपल्याला आश्चर्य वाटते.

फोटो येण्यासाठी प्रकाशयोजना, कंपोझीशन, ॲंगल, लेन्स, उत्तम गृहपाठ, आपली बुध्दी, विचार, कल्पनाशक्ती आणि नशीबाची साथ लागते. तरीही सर्वोत्तम फोटोसाठी उत्तम कॅमेरा हाच फोटोग्राफरचा उजवा हात असतो, असे लेखिका नमूद करते.

काळ नेहमी पुढे धावत असतो, पण फोटोग्राफीच्या कलेमध्ये काळाला पकडून ठेवायची कला आहे. कलेने ‘आपल्याला श्रीमंत व्हायचे आहे की समृध्द’ असा विचार आपल्याला करायला लावत, लेखिका समेवर येते. प्रत्येक कलेचा मान राखायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे.

मोबईलला ठेवलेले फोटोबाईल हे नाव, योग्यच वाटते. नवीन तंत्रज्ञानाच्या युगात कलेतील सौंदर्य लोप पावत आहे, याची खंत लेखिकेला आहे. यासाठी तिने कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढलेल्या फोटोंसाठी ‘फोटोफ्राय’ स्पर्धा सुरू केलेली आहे.

एखाद्या विस्तृत कुरणावर ससा मनसोक्त बागडत असतो तशी लेखिका आपल्या लेखात सर्वत्र पळताना दिसते. प्रत्येक लेखात एकेका शब्दांचे अर्थ लिहिताना अनेक अर्थ सहजपणे उलगडले आहेत. आणि त्यातून लेखिका अगदी नकळतपणे आयुष्यातील सत्य सांगून जाते. म्हणूनच फक्त फोटोग्राफी शिकणाऱ्या लोकांनी नव्हे तर आपण सर्व जण हे पुस्तक वाचू शकतो. 

फोटोग्राफी इतकाच लेखिकेचा मराठी कविता, चित्रकला याविषयांवर भरपूर अभ्यास झालेला दिसतो.

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ तर मी का नाही ?… डाॅ. बिंदुमाधव पुजारी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ तर मी का नाही ?… डाॅ. बिंदुमाधव पुजारी ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तकाचे नाव – तर मी का नाही?

लेखक – डॉ. बिंदुमाधव पुजारी

पृष्ठे – ३२४ मूल्य – ४५० रु.

नुकतेच एक चांगले पुसताक वाचनात आले. ‘…. तर मी का नाही?’ मिरजेतील ख्यातनाम सर्जन डॉ. बिंदुमाधव पुजारी यांचे हे आत्मचरित्र. वेगळे वाटणारे हे शीर्षक पाहिले आणि मनात कुतुहल निर्माण झाले.

सुरूवातीला त्यांनी लिहिलय, ‘माझा डॉक्टर आणि त्यानंतर सर्जन होण्याचा प्रवास हा योगायोग, दैव, आणि खूप खडतर वाटचाल इत्यादींचे मिश्रण होते. मी वैद्यकीयशास्त्र हे आवडीने घेतले नाही किंवा नाकारले पण नाही. जे नशिबी आले, ते जिद्दीने स्वीकारले. एक गोष्ट मात्र नक्की. कोणताही विषय स्वीकारला की मी त्यात स्वत:ला संपूर्ण झोकून देत असे. मग कितीही कष्ट करावे लागले आणि यातना सोसाव्या लागल्या तरीही माझी तयारी असे.  एखादी गोष्ट जर दुसर्‍याला करता येत असेल, तर ती  मला का करता येणार नाही? मी ती करणारच.’ ते पुढे लिहितात, ज्यावेळी इंग्रजी चौथीत इंग्रजीत ते नापास झाले होते, तेव्हा त्यांचे गुरुजी म्हणाले होते, ‘तुझ्या वर्गातील अठ्ठावीस मुले पास झाली आहेत. तर तू का पास होणार नाहीस? अभ्यास कर म्हणजे तूही पास होशील.’ त्यांनी भरपूर अभ्यास केला. ते नुसतेच पास झाले नाहीत, तर चांगले  गुण त्यांनी मिळवले. त्यावेळी  गुरुवाणीतून स्फूर्ती घेऊन त्यांनी जीवन प्रवास सुरू केला आणि ते उत्तम गुण मिळवत राहिले. अव्वल येत राहिले. त्यांच्या सार्‍या जीवनाचे सूत्र, ‘हे इतर करू शकतात, तर मी का नाही? (करू शकणार?) हे राहिले. ते त्यांनी हृदयस्थ केले  म्हणून मग आत्मचरित्राचे नावही नक्की झाले,   ‘…. तर मी का नाही?  

नरसोबाची वाडी (नृसिंहवाडी) इथे वेदशास्त्र पारंगत, पौरोहित्य करणार्‍या अशा पुजारी घराण्यात २४ एप्रील १९३५ मध्ये डॉक्टर बिंदुमाधव यांचा जन्म झाला. सुरूवातीला ते नरसोबाची वाडी हे गाव कसं वसलं आणि पुजारी हे आडनाव कसं अस्तित्वात आलं, त्याचा इतिहास देतात. श्रीनृसिंहसरस्वती १४२२साली या स्थानी तपश्चर्येला आले. तेथून जवळच असलेल्या आलास या गावातून भैरव जेरे त्यांचे दर्शन घेऊन पुढे शिरोळ येथे जोसकी करण्यासाठी जात. श्रीनृसिंहसरस्वती जेव्हा गाणगापूरला जायला निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या पादुकांचे ठसे तिथे ठेवले आणि त्यांनी भैरव जेरे यांना तुम्ही वंशपरांपरागत या पादुकांची पूजा करावी, असे सांगितले. पुढे त्यांना एक मुलगा, नंतर त्या मुलाला चार मुले झाली. त्यांचा वंशवेल वाढत गेला. श्रींच्या पादुकांची पूजा करणारे म्हणून जेरे घराणे पुजारी या नावाने ओळखले जाऊ लागले. भैरंभट हा त्यांचा मूळ पुरुष. त्याप्रमाणेच गावाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, लोकजीवन, श्रींची पूजा-अर्चा, सण- उत्सव, इत्यादिंची माहितीही सुरूवातीला सांगितली आहे. त्यावेळच्या समस्या- दुष्काळ, साथीचे रोग, वैद्यकीय (अ)सुविधा, शिक्षणाच्या सोयी, गांधीवधांनंतर गावात झालेले जळीत प्रकरण, त्याचा लोकजीवनावर झालेला परिणाम या सगळ्याचे वर्णन सुरूवातीला येते. ही सगळी माहिती वेधक आणि मनोरंजक पद्धतीने यात येते.

गावातील धार्मिक वातावरण, घरातील जुने वळण, एकत्र कुटुंब, यामुळे, ‘सहनशीलता, समानता, समजूतदारपणा, खिलाडू वृत्ती, सांघिक भावना, कष्टाची तयारी इ. गोष्टी लहानपणीच आमच्या अंगात मुरल्या होत्या. त्याचा पुढील आयुष्यात आम्हाला फार उपयोग झाला’, असे ते सांगतात.  त्या काळात, सोयी-सुविधांच्या अभावी, जीवन, विशेषत: ग्रामीण जीवन कष्टप्रद होते. लहान मुलांनाही त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे कष्टाची कामे करावी लागत. डॉक्टर म्हणतात, त्यांचे लहानपण कष्टात, तरीही आनंदात मजेत गेले.

माध्यमिक शिक्षणाची सोय गावात नव्हती. त्यासाठी कुरूंदवाडला जावे लागे. वर्षातले नऊ महीने, प्रथम नावेतून पंचगंगा नदीच्या पलिकडे जावे लागे. नंतर कुरूंदवाडच्या वेशीपर्यंत चालत जाऊन पुढे तीन मैल अनवाणी चालत जावे लागे. पावसाळ्यात, भरपूर पाऊस, प्रचंड वेगाने वहाणारे पाणी, घोंगावणारे वारे, यातून नाव बाहेर काढणे बिकट असे. प्रवास भीतीदायक, धोकादायक वाटायचा. असा सारा त्रास, कष्ट सहन करत वाडीतील अन्य मुलांप्रमाणे डॉक्टरांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. ७८% गुण मिळवून ते शाळांत परीक्षा पास झाले.

पुढे कॉलेज ते एम.बी.बी.एस.पर्यंतच्या खडतर शैक्षणिक प्रवासाची माहिती येते. आर्थिक विवंचनेमुळे हा शैक्षणिक प्रवास खडतर झाला होता. शिष्यवृत्ती होती, पण जेवणाचा प्रश्न होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कधी मेसच्या सेक्रेटरीचे काम केले, कधी एका मुलाला तासभर अ‍ॅनाटॉमी शिकवून त्याच्या डब्यात जेवणाची सोय करून घेतली.

बिंदुमाधव मुळात मेडिकलकडे कसे गेले, याचाही एक किस्सा आहे. एफ. वाय. ला ते सायन्स विभागात व गणितात विद्यापीठात पहिले आले. इंजींनियारिंगला जायचा त्यांचा विचार होता, पण रिझल्टच्या वेळी काही प्रतिष्ठित मंडळी त्यांना भेटायला आली. त्यांनी सुचवले, त्याने डॉक्टर व्हावे. पंचक्रोशीत कुरूंदवाडच्या डॉ. वाटव्यांशिवाय कुणी एम.बी.बी.एस. डॉक्टर नाही. बिंदू उत्तम डॉक्टर होऊ शकेल. त्यांच्या वडलांनाही ती कल्पना पसंत पडली. त्या सर्वांचा आग्रह पाहून ते मेडिकलला जायला तयार झाले.  

या पुस्तकात त्यांनी आपल्या लहानपणाच्या, शिक्षण घेत असतानाच्या, नोकरी करत असतानाच्या, स्वतंत्र व्यवसाय सुरू केल्यानंतरच्या, कॉन्फरन्स काळातल्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. पुस्तकात शेवटी व्यवसाय काळातल्या निवडाक बारा आठवणी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे लेखन, व्याख्याने, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्या त्या वेळचे फोटो असा सगळा भाग पारिशिष्टात दिलेला आहे

डॉक्टर१९५९ आली एम.बी.बी.एस. झाले व १९६३ साली एम.एस. झाले. सुरवातीला चार वर्षे त्यांनी सरकारी नोकरी केली. १९६५पासून त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. १९६८साली त्यांचे ‘श्री हॉस्पिटल’ स्वत:च्या वास्तूत गेले.

१९६४साली त्यांचा विवाह बंगलोरयेथील डॉ. इंदुमती कुलकर्णी यांच्याशी झाला. त्या माधवी कुलकर्णी बनून डॉक्टरांच्या घरात आल्या आणि दुधात साखर विरघळावी, तशा त्यांच्या जीवनात विरघळून गेल्या.

प्रत्येक वर्षी ते वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस ला जाऊ लागले. तिथे होणारी भाषणे, चर्चा यातून त्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले आणि आपल्या ज्ञानाचाही इतरांनाही  फायदा करून दिला.

पुस्तक वाचत असताना डॉक्टरांची खास गुणवैशिष्ट्ये लाक्षत येतात, ती अशी— प्रखर बुद्धिमत्ता, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, अभ्यास आणि संशोधनाची वृत्ती, सौजन्यशील-मृदू स्वभाव, अफाट लोकसंग्रह. नीटनेटकेपणा हा त्यांचा आणखी एक विशेष. आपल्या सगळ्या पेशंटसचे व्यवास्थित रेकॉर्ड त्यांनी ठेवले. ओपरेशन्सच्या वेळचे फोटो घेऊन तयार केलेल्या पारदर्शिका (स्लाईडस), प्रबंध-व्याख्यानांची तयारी या सगळ्यात त्यांचा नीटनेटकेपणा जाणवतो.

‘… तर मी का नाही?’ हे आत्मचरित्र जितके माहितीपूर्ण आहे, तितकेच ते रसाळही झालेले आहे. त्याचे श्रेय उत्तम शब्दांकन करणार्‍या प्रा. डॉ. मुकुंद पुजारी यांनाही द्यावे लागेल. साधी प्रासादिक, ओघवती, उत्सुकता वाढवणार्‍या भाषेत पुस्तकाचे लेखन झाले आहे. डॉ.चा मोठेपणा सांगणारा त्यांचा स्वत:चा लेखही यात आहेच. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ.(श्रीमती) स्नेहलता देशमुख यांची प्रस्तावना पुस्तकाचे सार आणि महत्व मोजक्या शब्दात सांगणारी, लक्षवेधी अशी आहे. एका कृतार्थ जीवनाची वेधक कहाणी यात आपल्याला वाचायला मिळते.

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ पाय आणि वाटा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर☆

सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ पाय आणि वाटा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तक – पाय आणि वाटा

लेखक – श्री सचिन वसंत पाटील

प्रकाशक – हर्मिस प्रकाशन

पृष्ठे – १०० 

मूल्य – १५० रु.          

‘पाय आणि वाटा’ हा श्री सचिन वसंत पाटील यांचा ललित लेख संग्रह. दुर्दैवाने त्यांना एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले. पाय असताना ज्या वाटा त्यांनी तुडवल्या, त्याच्या हृदयस्थ आठवणी म्हणजे ‘पाय आणि वाटा’. मनोगतात ते लिहितात, ‘माझी कहाणी सुरू होते वर्तमानात, पाय नसलेल्या अवस्थेत. मग ती वीस वर्षामागील एका बिंदूवर स्थिरावते आणि त्यामागील वीस वर्षात फिरून, हुंदडून येते. तेव्हा पाय असलेला मी तुम्हाला भेटत रहातो, तुकड्यातूकड्यातून…कधी निखळ, निरागस, तर कधी रानभैरी, उडाणटप्पू होऊन… शब्दाशब्दातून.

एका दुर्दैवी क्षणी सचीनना अपघात झाला आणि ते अंधाराच्या खोल खाईत भिरकावले गेले. शेतावर चारा आणायला गेलेले असताना, एका अवघड वळणावर बैलगाडी पलटली. वैरणीने भरलेली गाडी त्यांच्या पाठीवर पडली. यामुळे त्यांच्या मज्जारज्जूला जोराचा धक्का बसला. आणि त्यांच्या कमरेखालचा भाग कायमचा लुळा पांगळा झाला. डॉक्टरांनी वस्तुस्थितीची कल्पना दिली. ते यापुढे कधीही चालू शकणार नव्हते. स्वत:च्या पायावर उभे राहू शकणार नव्हते. पण त्या विकल निराशेतही ते स्वप्न बघत, समोरचा वॉकर धरून ते चालताहेत. आयुष्याच्या अंधार्‍या रस्त्यावरून ते कणाकणाने पुढे सरकताहेत. या काळात एकमेव विरंगुळा म्हणजे पुस्तके वाचणे. पुस्तकांनीच त्यांना शिकवलं, संकट माणसाला जगणं शिकवतात. मग त्यांनी ठरवलं, संकटांना भ्यायचं नाही. खंबीर मनाने सामोरं जायचं. ते म्हणतात, ‘पुस्तकं वाचली, म्हणून मी वाचलो.’

श्री सचिन वसंत पाटील

वाचनातून सचिनना लेखनाची प्रेरणा मिळाली. लेखन ही काही सोपी गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी. झोपून, एका कुशीवर वळून लिहावं लागे पण जिद्दीने त्यांनी आपले लेखन चालू ठेवले. त्यातून त्यांचे ‘सांगावा’, ‘अवकळी विळखा’ आणि ‘गावठी गिच्चा’ हे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. अनेक साहित्यिक, अभ्यासक, समीक्षक यांनी त्यावर लिहिलय. या पुस्तकांवरील समीक्षेची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या तीनही पुस्तकांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अलिकडेच त्यांचे ‘पाय आणि वाटा’ हे ललित संग्रहाचे चौथे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.  अलिकडे लेखन करणं त्यांना पहिल्यापेक्षा सोपं झालय. आता ते लेखनासाठी लॅपटॉपचा उपयोग कारतात, पण तेही सोपं नाही. आताही त्यांना झोपूनच लेखन करावं लागतं. पोटावर झोपायचं. पुढे लॅपटॉप ठेवायचा. आणि टाईप करायचं. हीदेखील मोठी कसरत आहे. दिवसभरात ते जास्तीत जास्त दोन पाने लिहू शकतात. या लेखन मर्यादेमुळे पुष्कळसं सुचत असलं, तरी ते कागदावर उतरत नाही. मात्र त्यांनी जे काही लिहीलंय, ते उत्तम लिहीलंय.

‘पाय आणि वाटा’ या ललित लेखसंग्रहातील वातावरण अस्सल ग्रामीण आहे. अस्सल ग्रामीण जीवन, अस्सल ग्रामीण भाषेतून यात व्यक्त झाले आहे. खानदानी ग्रामसुंदरीचा डौल, रुबाब आणि ठसका यात आहे. त्यांची शब्दकळा लावण्यामयी आहे. ‘राखण’ या पाहिल्याच लेखात त्यांनी वर्णन केलय, ‘जमिनीच्या पोटातला गर्भ दिसामासांनी वाढायचा’. …. ‘शाळवाच्या धाटातून, केळीच्या कोक्यागत कणसं बाहेर पडायची. कणसांची राखण करणार्‍यांना पाखरं लांब गेली, असं वाटायचं. पण कुठलं? म्हवाच्या माशा उठल्यागत पुन्हा थवा यायचा. हळू हळू मोठा होत रानावर उतरायचा. एकेका थव्यात दोन-अडीचशे पाखरं असायची. असे असंख्य थवे.’ प्रत्यक्ष दृश्य डोळ्यापुढे उभं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या वर्णनात आहे.

‘राखण’ हा पुस्तकातला पहिला लेख.  यात राखणीचं निमित्त काढून हुंदडायला गेलेल्या मुलांसोबत आपणही फिरतो. डोळ्यांनी सारं सारं पहातो. पंचेंद्रियांनी अनुभवतो. लेखाच्या शेवटी ते आठवणीतून वास्तवात येतात. लिहितात – ‘जनावरांच्या कालव्यानं मी जागा होतो. भोवतीच्या पडक्या भिंती मला भानावर आणतात. पण मनात हिरवं रान नाचत असतं. डोळ्यात हिरवी साय. मला आजही आशा आहे, मी माझ्या पायावर परत उभा राहीन. पुन्हा हातात गोफण घेऊन शाळवानं पिकलेलं रान राखीन.’ हा आशावादच त्यांना जगण्याचे बळ देतो.

‘करडईची भाजी’ हा लेख कथेलाच गळामिठी घालतो. हाच लेख नव्हे, तर अनेक लेख कथेच्या जवळपास जाणारे आहेत. या संदर्भात त्यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले, ‘ललित लेखांमध्ये ‘मी’ आहे. माझे अस्तित्व आहे. माझे अनुभव आहेत. कथा विविध पात्रांच्या आहेत. त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे अनुभव, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यात आहेत. तिथे मी असेन, तर केवळ साक्षीभावानेच.’ ‘करडईची भाजी’ या लेखात, एक दहा-बारा वर्षाचा मुलगा बुट्टीत करडईची भाजी घेऊन विकायला निघालेला लेखकाला भेटतो. लेखक त्याला दहा रुपये देऊन दोन पेंडया विकत घेतो. त्यामुळे तो खूश होतो. त्याचे हास्य पाहून लेखकाला त्याचं बालपण आठवलं. ‘पाय हरवलेल्या अंधेर नगरीतून आठवणींच्या नितळ विहीरीच्या खोल पायर्‍या मी उतरू लागलो.’ असे ते लिहितात. त्यावेळी ते सहावीत होते. परीक्षेची फी भरायला घरात पैसे नव्हते. शेवटी आई म्हणते, ‘रानात करडा खूप उगवलाय. त्यो काढून पेंडया बांधून वीक जा’ आणि  त्याचे काम सुरू होते. चार आण्याला पेंडी. फी होती आठरा रुपये. एक दिवस गोठा साफ करातांना एक कालवड लाथ मारते. वेदना होतात. मांडीवर बॉलगत लालभडक टण्णू उठतो. दु:ख असतंच पण भाजी विकायला जाता येणार नाही, याचं जास्त दु:ख होतं. अखेर पाय सुधारतो. पंध्रा दिवसात फीचे पैसे जमा होतात. लेखाचा शेवट करताना त्यांनी लिहिलय, ‘आज वीस-बावीस वर्षांनंतर त्या भाजी विकणार्‍या मुलाला पाहून ते सगळं आठवलं. आज विकण्यासारखी भाजी माझ्या शेतात भरपूर आहे पण ती गवभर फिरून विकायला माझ्याकडं पाय नाहीत.‘

‘झुक झुक आगीनगाडी’मध्ये मध्ये मामाच्या गावाचे वर्णन येते. कुरूंदवाड मामाचं गाव. तीन बाजूने पाण्याने वेढलेलं गाव. बेटासारखं गाव. उशाशी कृष्णा आणि पायथ्याशी पंचगंगा घेऊन वसलेलं गाव. गावातील रमणीय निसर्गाचं वर्णन यात येतं. मामाचंही वर्णन यात येतं. ’तो आभाळाएवढा उंच वाटायचा. आपल्या मामाइतका मोठा माणूस जगात कोणी नाही, असा वाटायचं. आपण मागेल ती वस्तू देणारा. म्हंटलं तर जादूगार म्हंटलं तर सांताक्लॉज . मनातली वस्तू न मागता देणारा …’ असं मामाचं वर्णन यात येतं. गावाच्या रमणीय निसर्गाचं वर्णनही यात येतं आणि कालमानाने झालेल्या बदलाचंही. आपलंही गाव कसं बदललं आहे, याचंही वर्णन पुढे एका स्वतंत्र लेखात त्यांनी केलय.

‘पोस्टाचं पत्र हरवलं’मध्ये बदलत्या काळानुसार पत्रलेखन कमी झाल्याची खंत ते व्यक्त करतात. अक्षर चांगलं असल्यामुळे गल्लीतील लोक त्यांच्याकडून पत्र लिहून घेत.त्यांनी सांगितल्या मुद्याला कल्पनेचा मालमसाला लावून ते पत्र लिहित. ते म्हणतात, ‘माझ्या लेखनाची सुरुवात या दरम्यान कुठे तरी झाली असावी.’ यात पायाचा आंगठा आणि तर्जनीत खडू घरून काढलेल्या नाचर्‍या मोराची आठवण येते आणि आता ते पाय कुठे गेले, या बिंदुशी येऊन स्थिरावते.

‘ती बैलगाडी’, ‘घोडी’, ‘पाठीराखा’ अशी सुरेख शब्दचित्रे यात आहेत. ‘पाठीराखा’मध्ये आपल्या मोठ्या भावाबद्दल त्यांनी अतीव उमाळ्याने लिहिले आहे. लहानपणी रस्त्यावर पळतो, म्हणून अडवणारा भाऊ, अपघातानंतार चालता यावं म्हणून धडपडणारा भाऊ, ऑपरेशन चालू असताना रकतासाठी डोनर शोधणारा भाऊ, हॉस्पिटलचे बील भागवण्यासाठी पैशाची जुळणी करणारा भाऊ, अशी त्याची अनेक रूपे त्यांनी यात वर्णन केली आहेत. तो जवळ असेल, तर कशाचीच भीती नाही, असा ठाम विश्वास आणि तो जवळ नसल्यामुळेच अपघात झाला, असं त्यांना वाटत रहातं. आजही पाय नसल्याचं दु:ख एकीकडे वागवतानाच आपला भाऊ आपल्याजवळ आहे, हे सुख आपल्यापाशी आहे, याचा आनंद ते व्यक्त करतात.

‘कोरडे डोळे ‘ मध्ये आपल्याला भेटतो, एक कंजारभाटाचा मुलगा. त्यांची पाच-सात झोपड्यांची वस्ती कुणी जाळून टाकलीय. बायका- मुले, बापये तेवढे वाचलेत. बाकी सारं सामान जाळून गेलय. त्यातच त्या मुलाचे दप्तरही जळून गेलय. तो रोज शाळेत येतो. कोरड्या डोळ्यांनी काळ्या फळ्याकडे पहातो. जमेल तसं मनात उतरवून घेतो. नंतर कधी तरी तो शाळेत येइनासा होतो. लेखक देवाकडे मागणं मागतो,  शिकायची इच्छा असलेल्या कुठल्याही मुलाला शाळा सोडायला लागू नये. बाकी काही नुकसान झालं, तरी त्याची पुस्तकं तेवढी जळू देऊ नकोस.’

‘झाड आणि वाट’ मध्ये भेटतात, भुंडा माळ, त्यातून गेलेली वाट, वाटेवरच्या वाळणावरचं डौलदार आंब्याचं गच्च हिरवंगार झाड आणि त्या झाडाचा म्हातारा मालक. तो रोज त्या झाडाच्या बुंधयाशी पाण्याचा डेरा भरून ठेवतोय. उन्हाच्या रखरखीतून वाट तुडवत येणारा तृषार्त ते पाणी पिऊन तृप्त होतोय. पुढे कालमानाने जग बदललं. इरिगेशनचं पाणी आलं आणि भुंड्या माळाचं भाग्य बदललं. तो हिरवागार झाला. तिथे द्राक्षाची लागवड झाली. वाट डांबरी झाली. बाकी सारं चांगलं झालं. या सार्‍यात आंब्याचं झाड गेलं, एवढंच वाईट झालं.

‘पाय आणि वाटा’ हा संग्रहातला शेवटचा लेख. आपल्या पायांनी चाललेल्या वाटांच्या आठवणी यात आहेत. त्यात कुरणाची वाट आहे. बुधगावची वाट आहे. वाडीवाट आहे. रानाची वाट आहे. गावाकडून साखर कारखान्याकडे बेंद भागातून जाणारी मधली वाट आहे. त्या त्या वाटेवरचे प्रसंग, व्यक्ती यांच्या आठवणी यात आहेत आणि सगळ्यात विदारक आठवण म्हणजे एकदा त्या वाटेवरून जाताना त्यांना झालेला अपघात, जो त्यांचे पायच घेऊन गेला. ते लिहितात, ‘आता कधी गाडीवरून त्या वाटेवर जायची वेळ आली, तर दिसतात, त्या वाटेवर हरवलेल्या पावलांचे ठसे….’

‘पाय आणि वाटा’ या पुस्तकात गतिमानता आहे. दृश्यात्मकता आहे, भावनोत्कटता आहे. कुठे कुठे कथात्मकताही आहे. शब्दकळा लावण्यमयी आहे. एक चांगले पुस्तक वाचल्याचा आनंद हे पुस्तक नक्कीच देते.

पुस्तक लेखक –  श्री सचिन वसंत पाटील

विजय भारत चौक, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली. पिन- ४१६४१६. भ्रमणध्वणी – 8275377049, ईमेल – [email protected]

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “समर्पण” – संकल्पना – श्री अरूण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “समर्पण” – संकल्पना – श्री अरूण पुराणिक ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव: समर्पण

लेखक:श्री.अरुण पुराणिक

प्रकाशक :आर्या पब्लिकेशन अँड डिस्ट्रीब्यूटर.

प्रथम आवृत्ती:६ऑक्टोबर २०२२

किंमत :१००/—

श्री.अरुण पुराणिक यांचे, ” समर्पण “ हे नुकतेच प्रकाशित झालेले छोटेखानी पुस्तक  मी वाचले आणि अक्षरशः मन गहिवरलं.  

समर्पण ही, अरुण पुराणिक यांच्या स्वतःच्या सहजीवनाची कहाणी आहे. ती वाचत असताना, पती-पत्नीचं नातं कसं असावं, याचा पावलोपावली बोध होतो. 

या कहाणीची सुरुवातच ,” आज जो काही मी आहे तो तिच्यामुळे ” या वाक्याने  ते करतात. पत्नीने आयुष्यातल्या चढउतारात, सुखात, दुःखात, अडचणीत, अत्यंत प्रेमाने केलेल्या सोबतीविषयी व्यक्त केलेली कृतज्ञता, त्यांच्या या पहिल्या वाक्यातच वाचकाला जाणवते. एका सुंदर नात्याचीच ही कहाणी आहे.  ही कहाणी परस्परावरील प्रेमाची, विश्वासाची, आधाराची, आहे. 

समर्पण हे पुस्तक वाचताना, वाचक या कथेत मनोमनी गुंतून जातो.  लेखकाबरोबरच तोही भावनिक होतो, हळहळतो. हे सारं यांच्याच बाबतीत का घडावं? असं सतत वाटत राहतं.  दोघांच्याही हिम्मतीला आणि गाढ प्रेमाला, भरभरून दाद द्यावीशी वाटते. 

एका सामान्य शिक्षकी पेशापासून आयुष्याची सुरुवात झालेल्या एका युवकाची ही कथा. तसं पाहिलं तर सर्वसाधारणपणे, मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याची ही एक साधी कहाणी.  नोकरी, लग्न, संसार, मुलंबाळं, जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी, बेरजा वजाबाक्या, प्रियजनांचे मृत्यू, घटित अघटित, या साऱ्यांचा एक कडू गोड जीवनपट. तरीही हे पुस्तक वाचत रहावसं वाटतं. रटाळ ,कंटाळवाणं वाटत नाही. कारण अत्यंत प्रामाणिकपणे, सहज, सोप्या, ओघवत्या आणि भावभऱ्या शब्दातून व्यक्त झालेलं हे लेखन. आणि त्यातून झिरपणारं, दवबिंदूसारखं निर्मळ, मनाला भिडत जात असलेलं प्रेम, प्रेमभाव, विश्वासाचं देणं!!

अत्यंत क्लेषदायक परिस्थितीतही पतीचा वाढदिवस प्रेमाने साजरी करणारी पत्नी असो, किंवा पत्नीच्या अगतिक अवस्थेत तिला स्नानासाठी वात्सल्याने मदत करणारा पती असो…हे प्रसंग वाचताना अंग शहारतं. मी वात्सल्य हा शब्द वापरला कारण, प्रीत, प्रेम, माया हे समानार्थी शब्द असले तरी वात्सल्य या शब्दातला ओलावा या द्वयीत मला जाणवला. शारिरिक प्रेमाच्या पलीकडे गेलेला हा अनुभव होता.

समर्पण ही एक विविध रंगी प्रेमकथा आहे असंच मी म्हणेन. संसारात पती-पत्नीचं एकमेकांशी असलेलं घट्ट नातं काट्याकुट्याची वाटही आनंदाने पार पाडू शकतं, याचाच वस्तुपाठ  आहे.

एकाच माणसाच्या आयुष्यात इतके वेदनादायक वियोग का असावेत आणि त्यांनी ते कसे सहन केले याचेही धक्के बसतात वाचकाला. पण जेव्हा लेखक म्हणतो की, “आज जो काही मी आहे तो तिच्यामुळेच…” यातली सकारात्मकता ही खूप महत्त्वाची आहे. ही कथा निराशावादी नाही. यात दु:खाला कुरवाळून बसणं नाही. रडगाणं नाही. कसलीही तक्रार नाही. आहे ती फक्त स्वीकृती. हेच नक्षत्राचे देणे, असे समजून केलेला स्वीकार.आणि हाच या कथेचा खरा आत्मा आहे.  गीता वाचणे आणि प्रत्यक्ष गीता जगणे यात खूप फरक आहे . समर्पण  कथेत गीतेतलं जगणं जाणवतं.

एवढंच म्हणेन की ही एका  जिद्दी, चिवट, संस्कारित, चारित्र्यशील, स्थिर, अशा मानसिकतेची सुंदर कथा आहे. जरुर वाचावी अशीच.

श्री.अरुण पुराणिक यांच्या साहित्य प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा !! आणि त्यांचे उर्वरित आयुष्य, सुखासमाधानाचे व निरामय आरोग्याचे जावो !!– हीच प्रभू चरणी प्रार्थना !! 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ कृतार्थ वार्धक्य… डाॅ.विनिता पटवर्धन ☆ परिचय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ कृतार्थ वार्धक्य… डाॅ.विनिता पटवर्धन ☆ परिचय  – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

लेखिका : डॉ. वनिता पटवर्धन 

प्रकाशक : समीर आनंद वाचासुंदर, गोवा 

– हे पुस्तक पाहिलं, आणि नकळतच मनात प्रश्न उभा राहिला की… ‘‘वार्धक्य… आणि कृतार्थ…?” … आणि तेही आत्ता आजूबाजूला सातत्याने दिसणा-या परिस्थितीत? उत्सुकता स्वस्थ बसू देईना… मग लगेचच हे पुस्तक वाचायला सुरुवात केली. आणि अगदी प्रस्तावनेपासूनच पानागणिक मिळणारी वेगवेगळी शास्त्रीय माहिती वाचतांना, वृध्दत्त्वाशी निगडित असणा-या अनेक प्रश्नांचे वेगवेगळे आकृतीबंध डोळ्यासमोर उभे राहिले. 

माणसाचे सर्वसाधारण आयुष्यमान ७५ ते ८० वयापर्यंत वाढले आहे हे तर जाहीरच आहे… त्यामुळे या वयोगटातील माणसांची संख्याही वाढली आहे. आणि अर्थातच् वृध्दांसमोरची आव्हानेही वाढली आहेत. इथे वृध्दांसमोरच्या ‘समस्या’ न म्हणता ‘आव्हाने’ म्हणणे, इथेच लेखिकेचा या विषयाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. आणि मग टप्याटप्याने पुढे जात, ही आव्हाने यशस्वीपणे कशी पेलता येतात, याचे लेखिकेने सोदाहरण विवेचन केले आहे… अगदी पटलेच पाहिजे… आणि आचरणातही आणले पाहिजे असे. 

‘एखादी व्यक्ती वृध्द होते, म्हणजे नेमके काय होते? ’ हा पहिलाच प्रश्न… इथूनच या पुस्तकाला सुरुवात झालेली आहे. उमलणे… उभरणे… कोमेजणे… थोडक्यात उत्पत्ती-स्थिती-लय… यापैकी ‘ कोमेजत जाणे ’… हा तिसरा टप्पा वृद्धत्वाचा. हे जरी सत्य असले, तरी माणसाचे कोमेजत जाणे कसे असते, हे त्याच्या शारिरिक व मानसिक स्वास्थ्यानुसार, त्याच्या कार्यरत रहाण्याच्या क्षमतेनुसार, अंगभूत कौशल्यानुसार, आणि या अनुषंगानेच, त्याने आयुष्यभर केलेल्या व्यवसायानुसार, प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असते. म्हणूनच वय आणि कार्यमग्न रहाण्याची क्षमता, याचे कुठचेही ठाम गणित मांडता येत नाही, मांडले जाऊही नये, हा विचार नकळत वाचकाच्या मनात भुंग्यासारखा गुणगुणायला लागतो, याचे श्रेय लेखिकेला द्यायलाच हवे. इथेही…१)‘नववृध्द, म्हणजे तरूण जेष्ठ’, २)‘वृध्द किंवा ज्येष्ठ’ , ३) ‘अतिवृध्द किंवा अति ज्येष्ठ’, हे वृध्दत्त्वाचे तीन टप्पे असतात हे सांगतांना लेखिकेने… १ ला टप्पा म्हणणे शिशिरातील चांदणे, २ रा टप्पा म्हणजे हेमंत ऋतूतील पानगळती, आणि ३ रा टप्पा म्हणजे शिशिरातील गूढ शांतता… अशी अगदी सुंदर… सहजपणे पटणारी उपमा दिलेली आहे. आणि अशाच अनेक चपखल उपमा, प्रसिध्द लेखकांच्या साहित्यातले या विषयाला अचूक लागू होतील असे वेचे, काही सुंदर कविता, यांचा अगदी यथायोग्य उपयोग सहजपणे या पुस्तकात केलेला आहे. 

याच्याच जोडीने, आत्तापर्यंत विकसित झालेल्या ‘ वृध्दशास्त्राच्या ’ वेगवेगळ्या शाखांचा उहापोहही केलेला आहे, आणि त्याला सहाय्यभूत असणारे कितीतरी आलेख, लहान लहान तक्त्यांच्या माध्यमातून दिलेली प्रत्यक्षदर्शी माहिती, पूरक चित्रे, याद्वारे या विषयाची परिपूर्ण माहिती देण्याचा लेखिकेचा हेतू स्पष्टपणे जाणवतो. 

वृद्धत्वाचे स्वरूप, वृध्दांची मनोधारणा, बौध्दिक स्थिती, सामाजिक स्थिती, अशा अनेक गोष्टींचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतांना, वृध्दांनी ‘स्वयंशोध’ घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर लेखिकेने आवर्जून भर दिला आहे, आणि त्यादृष्टीने मांडलेला प्रत्येक मुद्दा कोणत्याही ‘सजग’ वृध्दाला पटलाच पाहिजे असा आहे. कोणाचेही वय विचारायचे असेल तर ‘How old are you?’ असे विचारले जाते. पण वृध्दांच्या बाबतीत मात्र, त्याऐवजी ‘How young are you?’ हा प्रश्न विचारायला हवा, हे लेखिकेचे म्हणणे मला अतिशय आवडले… मनापासून पटले. कारण या प्रश्नाच्या उत्तरातच, माणूस स्वत:च्या वृध्दत्त्वाकडे कशाप्रकारे बघतो… किंवा स्वत:ची निराशेकडे झुकणारी मानसिकता बदलू इच्छितो की नाही, याचे उत्तर दडलेले आहे… वृध्द असणे आणि सारखे वृध्द असल्यासारखे वाटत रहाणे यातला फरक यामुळे आपोआपच ठळकपणे अधोरेखित होतो. 

याच अनुषंगाने पुढे वृद्धत्वाच्या गरजा आणि अपेक्षा, नकळतपणेच पण महत्त्वाची ठरणारी मानसिक निवृत्ती, अटळ असे शारीरिक आणि आर्थिक परावलंबन, हे सगळे निरोगी मनाने स्वीकारून, ते आपल्या परीने जास्तीत जास्त नियंत्रणात ठेवण्याची मानसिकता जोपासण्याची गरज, अशा अनेक अतिशय महत्त्वाच्या मुद्यांवर लेखिकेने परिपक्व म्हणावे असे भाष्य केले आहे. खरं तर ते फक्त भाष्य नसून, वाचकांच्या विचारांना अगदी योग्य आणि आवश्यक दिशा देणारे मार्गदर्शन आहे, ज्यातून प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखे, प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखे आहे. 

भूतकाळाच्या तुलनेत आत्ताच्या काळात वृध्दांच्या समस्या बदलल्याही आहेत आणि वाढल्याही आहेत हे तर खरेच. लेखिका स्वत: मानसशास्त्र तज्ञ आणि ख्यातनाम समुपदेशक असल्याने, वृद्धत्व या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातली मानसिकता, झेपतील की नाही अशा वाटणा-या या वयातल्या समस्या, याबद्दल फक्त शास्त्रीय माहिती देऊन न थांबता, त्यावरच्या प्रत्यक्षात करता येणा-या उपाययोजनाही त्यांनी सहजपणे समजतील, आणि तितक्याच सहजपणे प्रत्यक्ष आचरणातही कशा आणता येतील, हे अगदी उत्तमपणे, गप्पा मारता मारता महत्त्वाचे काही आवर्जून सांगावे, अशा पध्दतीने अगदी सहजसोप्या भाषेत सांगितले आहे, असे मी ठामपणे म्हणू शकते. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात असलेले उत्तम समुपदेशनपर  लेखही पुस्तकातील मार्गदर्शनाला अतिशय पूरक असेच आहेत.   

मीही आता “ 72 years young “ आहे, आणि हे पुस्तक वाचल्यानंतर आता  ‘ मीच माझा दिवा आहे ’ हे मला पूर्णपणे आणि मनापासून पटले आहे. अर्थात याचे सर्व श्रेय मी लेखिकेला द्यायलाच हवे. हे पुस्तक वाचल्यानंतर, त्यात केलेले समुपदेशन मनापासून आचरणात आणण्याचा निश्चय मी तरी नक्कीच केला आहे. आता माझे वार्धक्य नक्कीच “ कृतार्थ “ होईल हा विश्वास या पुस्तकाने मला दिला आहे, आणि तोच विश्वास या पुस्तकातून सर्वांना मिळेल, याची मला खात्री आहे. 

या अतिशय वाचनीय, आणि त्याहूनही मननीय अशा पुस्तकाबद्दल लेखिका डॉ.वनिता पटवर्धन यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार !!! 

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आयुष्याचं गणित’ (कवितासंग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ ‘आयुष्याचं गणित’ (कवितासंग्रह)  – डाॅ. मिलिंद विनोद ☆ परिचय – श्री अरविंद लिमये ☆

कवी : डॉ. मिलिंद विनोद. 

प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन, बोरिवली. 

अर्थवित्त क्षेत्रासारख्या रुक्ष कार्यक्षेत्रात प्रदीर्घ काळ वाटचाल करतानाही जगण्याकडे पहाण्याची सजगदृष्टी अतिशय जाणीवपूर्वक जपणाऱ्या डाॅ .मिलिंद विनोद यांचा  ‘आयुष्याचं गणित ‘ हा विविध बाजाच्या, शैलीतल्या,

कधी मिष्किल तर कधी उपरोधिक भाष्य करत अंतर्मुख करणाऱ्या कवितांचा संग्रह.       

डाॅ. विनोद यांची कविता आजवर ‘कविता’ या साहित्यप्रकाराला अपेक्षित असणाऱ्या मापदंडांच्या बंधनात अडकून न पडता मोकळेपणाने व्यक्त होऊ पहाणारी कविता आहे. प्रत्येकीचा आशय, विषय, रुप, शैली सगळं वेगळं तरीही तिचं स्वरूप मात्र हे वैशिष्ट्य ल्यालेलंच.

आयुष्यात सहज जाताजाताही खुपणाऱ्या बोचणाऱ्या विसंगती कवितांच्या रूपात व्यक्त करतानाही मिष्किलता जपणाऱ्या, तरीही ती बोच बोथट होऊ न देणाऱ्या यातील कविता मनात रेंगाळत रहाणाऱ्या आहेत.

खुमासदार, गंमतीशीर, विषय-आशयाचे थेट अधोरेखन न करणाऱ्या, चटकन् अर्थबोधही न होणाऱ्या  शीर्षकांमागचं रहस्य जाणून घेण्यासाठी ती कविता वाचायला रसिकांना उद्युक्त करते, हे या काव्यसंग्रहाचं मला प्रथमदर्शनी जाणवलेलं खास वैशिष्ट्य ! ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड ‘, ‘ बत्ती गुल’, ‘शेखचिल्ली’,’आर आर आर चा पाढा ‘, ‘रम आणि राम’  ही अशा खुमासदार शीर्षकांची कांही प्रातिनिधिक उदाहरणे !

या संग्रहात मराठी आणि हिंदी अशा दोन विभागात एकूण सत्तर+ कविता आहेत. काही अल्पाक्षरी तर काही दीर्घ.

प्रारंभ होतो ‘हेरंब’ आणि ‘गणराया’ या गणेश-वंदनेच्या रूपातल्या श्री गणेशाला अर्पण केलेल्या दोन काव्यरूपी भावफुलांनी !

त्यानंतरचा एखाददुसरा अपवाद वगळता बाकी कविता मात्रांच्या हिशोबात स्वतःची ओढाताण करुन न घेणाऱ्या, तरीही आपली अंगभूत लय अलगदपणे जपणाऱ्या आहेत. अत्यावश्यक तिथेच आणि तेवढेच इंग्रजाळलेले शब्द पण तेही कवितेला आवश्यक म्हणून आलेले आणि तिला वेगळंच रुप बहाल करुन जाणारे. इतर सर्वच कविता न् शायरींमधे अनुक्रमे मराठी आणि हिंदी/उर्दू  भाषांवरील प्रभुत्त्व खास जाणवणारे ! प्रदीर्घकाळ परदेशात व्यतीत करूनही त्या वातावरणाचा कणभरही परिणाम होऊ न देता मराठी भाषेवरील प्रभुत्व अबाधित राखणं आवर्जून कौतुक करावं असंच आहे. याचं प्रत्यंतर सुरुवातीच्याच ‘ मापट्याच्या अल्याड मापट्याच्या पल्याड’ ही कविता देते. मीठमोहरीचं पंचपाळं, मोहरीसारखं तडतडणं,नवऱ्याला कणकेसारखं तिंबणं, पोळीला सुटणारा छानसा पापुद्रा यासारख्या या कवितेला अभिप्रेत असणारं मराठमोळं वातावरण जपणाऱ्या  प्रतिमा, तसेच चपखल म्हणी आणि वाक्प्रचार यांचा या कवितेतील वापर हे सगळं आवर्जून दखल घ्यावी असंच.

यात  रेखाटलेले सासूसुनेचे नाते आणि त्या नात्यातले संबंध न् संघर्ष, ही कविता टोकदार होऊ  देत नाही तर ती त्यातील सामंजस्य जपू पहाते हे तिचे वेगळेपण !

‘माझ्या पोटच्या गोळ्याला कणकेसारखा तिंबून, पोळीला छानशा सुटलेल्या पापुद्रयाप्रमाणे

अलगद वेगळीही झालीस ‘ असं म्हणणाऱ्या सासूला ‘मायेच्या उबेत सतत जपलंत त्याला, आता सळो की पळो करून सोडलंय त्यानं मला’ असं म्हणत नवऱ्याच्या वागण्याचा दोष सासूलाच देणारी सून. या दोघींचे पुढचे सगळेच खरपूस संवाद मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ‘ मापट्याच्या पलीकडची तू सुपातली अन् मापट्याच्या अलीकडची मी– जात्यातली. भरडणं चुकलं नाहीये ते दोघींच्या कपाळी..’ हे सासूचे  शब्द सुनेला स्त्री म्हणून समजून घेताना तिला स्त्री जन्माच्या वास्तवाची वेळीच ओळख करून देतात. दोघींनीही नेहमीच फणा न काढता मायेचा गोफही  विणावा हे सांगणारी ही कविता आशयाला वेगळेच परिमाण देते.

यानंतर लगेचच येणारी ‘कार्टं ऑफ हॅविंग टू आर्ट ऑफ लव्हिंग ‘ ही कविता परस्परभिन्न जातकुळीतली.

‘आमच्या वेळी सर्रास होते मराठी माध्यम, कळलेच नाही केव्हा झाले त्याचे मराठी मिडियम ‘ अशी विषयाची थेट सुरुवात असणारी ही कविता.ती त्या विषयास आवश्यक अशा इ़ंग्राजळेल्या मराठी भाषेतली प्रदीर्घ कविता आहे.ही एकच कविताही कवीच्या अनुभवविश्वाच्या विस्तृत परिघाचा प्रत्यय देण्यास पुरेशी ठरावी.

बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत आणि एकंदरीत जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे होत गेलेली सर्वदूर पडझड ‘जनरेशन नेक्स्ट’, ‘आजचा सुविचार-मिली भगत’, ‘बत्तीगुल’ अशा अनेक कवितांमधून दृश्यरुप होते.

निसर्ग उद्ध्वस्त करीत विकासाची स्वप्ने पहाणाऱ्या माणसामुळे अस्वस्थ झालेल्या प्राण्यांच्या मनातली घुसमट त्यांना असह्य होते तेव्हा ते प्राणी माणसाला कसा धडा शिकवतात याचे प्रत्यंतर देणाऱ्या भयप्रद स्वप्नातून जाग येताच माणूस खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याचे अस्वस्थ कल्पनाचित्र रेखाटणारी ‘आर आर आर चा पाढा ‘ ही कविता या शीर्षकाचा अर्थ समजून घ्यायला मुळातूनच वाचायला हवी.

‘अक्कलखाते’ मधील माणसांचे विविध नमुनेही आवर्जून पहाण्यासारखे आहेत. ‘प्रिप्रे ते प्रप्र तत पप ते तप्त- प्रवास तीन तपांचा’ ही गंमतीशीर लांबलचक आणि चटकन् अर्थबोध न होणाऱ्या शीर्षकाची  मिष्किल,विनोदी शैलीतली कविता म्हणजे तीन तपातील प्रचंड बदल आणि पडझडी पचवलेल्या प्रदीर्घ प्रवासातील विविध स्क्रिनशाॅटस् म्हणता येतील.वाचताना हसवणारे न् हसवता हसवता नकळत फसवत वाचकांना स्वत:चं जगणंही एकदा तपासून पहायला प्रवृत्त करणारे! यातील ‘तोंडसुख’ या शब्दातील  श्लेषार्थ, तसेच इतरही अनेक शब्दांत लपलेल्या विविध छटांचा वेध हे सगळं वेगळ्या, अनोख्या शैलीने अधिकच सजलेलं!

‘पॉलिटिशिअन स्पीक्स् ‘ मधे माणसाची होत गेलेली अधोगती ‘स्फटिकासारखा स्वच्छ होता पांढरा माझा पैसा, कळलंच नाही कधी झाला काळा त्याचा कोळसा ‘ अशा थेट वास्तवाला भिडणाऱ्या कथनाद्वारे ठळकपणे अधोरेखित होते.

‘मिस्टर पर्सेंटेज’ ही कविता व्यवस्थेला लागलेली कीड रोखठोकपणे चव्हाट्यावर आणते.यातील भ्रष्टाचाराला लावलेली ‘एजन्सी हँडलिंग चार्जेस’ , ‘फास्टट्रॅक प्रोसेसिंग फीज ‘, यासारखी नवीन शिष्टसंमत लेबल्स त्या किडीचं पोखरणं किती सर्रास सराईतपणे सुरु आहे हे सांगण्यास पुरेशी आहेत.

आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो ‘ सल ‘या कवितेचा! या संग्रहातील स्वतःच्या वेगळेपणामुळे उठून दिसणारी ही कविता मला विशेष भावली.

समुद्रकिनारा, लाटा, पायाखालची सरकणारी.. पावलाना गुदगुल्या करणारी वाळू, विशाल विस्तीर्ण क्षितिज, अशा प्रतिमांच्या विविध रंगांच्या शिडकाव्यांनी  धुंद होत गेलेल्या वातावरणाचाच एक भाग बनून गेलेली ‘ती’ आणि ‘तो’ यांच्या मनासारख्या कधीच न फुललेल्या नात्याची ‘सल’ ही अनोखी कविता! एखादी रूपक कथा अलगद उलगडत जावी तशी ही कविता उमलत जाते.त्याच्या विशीपासून जीर्ण, जर्जर,  विकारग्रस्त वृद्धापकाळपर्यंत त्याला सतत अस्वस्थ करीत राहिलेल्या तिच्या अलवार आठवणींनी व्याकुळ झालेला तो !आणि त्याच्या मनातील भावनांचा कोंडमारा व्यक्त करणाऱ्या या कवितेचा उलगडत गेलेला पट!

‘तो’ म्हणजे कवी पण ‘ती’ म्हणजे नेमकी कोण या प्रश्नाचं कवितेच्या आस्वादकांना गवसणारं उत्तर प्रत्येकाच्या विचारांच्या दिशेनुसार वेगवेगळे असू शकेल कदाचित, पण कवीच्या शब्दातून स्पष्टपणे व्यक्त न केलेली तिची ओळख मला अंधूक का होईना जाणवली ती ‘कवीची प्रतिभा’ या रुपातली! ही ओळख मनात जपत कविता पुन्हा वाचताना तिच्या पाऊलखुणा याच रुपात अधिक स्पष्ट होत गेल्या एवढं खरं!

‘शायरी’ विभागातील उर्दू मिश्रित हिंदी काव्यरचनाही आवर्जून दखल घ्याव्यात अशा आहेत. विषयवैविध्य, व्यंगात्मक शैली, थेट, रोखठोक आणि सुलभ रचनाकौशल्य ही वैशिष्ट्ये इथेही दिसून येतात.

प्रेम, विरह, सहजीवन या विषयांवरील बहुतांशी कवितांचा विषय तोच असला तरी त्या रचनांमधल्या वैविध्यामुळे त्या लक्ष वेधून घेतात.या दृष्टीने परायी काया,एहसास-ए-रुह, गुस्ताखी माफ,शबनबी थी सारी राते, कब्र, जुनून-ए -मजनूॅं, खुदकुशी, जले शोले राख तले, अशा अनेक कवितांचे उल्लेख करता येतील.हिंदी-उर्दूच्या लहेजामुळे तर यातील आशय अधिक तीव्रतेने भिडतो.

वेगळ्या आशय- विषयांमुळे उठून दिसणाऱ्या काही खास कवितांचा इथे आवर्जून उल्लेख करायला हवा.        पाण्याच्या एका थेंबाची पाऊस,अश्रू,घाम अशी विविध रुपांमधली भावना व्यक्त करणारी ‘बूॅंद’ ही कविता हे एक प्रातिनिधिक उदाहरण.

‘सत्ता संपत्ती संततीने बदले तेरे नूर,बनकर मगरूर तू हुआ अपनोंसे दूर’ हे ‘बुराई अच्छाई का राही ‘ या कवितेतील भरकटलेल्या माणसाचे वर्णन असो, की ‘मुजरा आणि मुशायरा’ मधे कवी आणि अदाकारा या शायरीच्या एकाच नाण्याच्या दोन बाजूंची तुलना करताना ‘जवानी का ढलना मुजरेका मुरझाना, जवानी पलभर शब्द निरंतर’ हे वास्तव अधोरेखित करणारा निष्कर्ष असो, दोन्हीही त्या त्या कविता लक्षवेधी बनवतात.

जीवनाचं अस्वस्थ करणारं बोचरं सत्य व्यक्त करणाऱ्या ‘दो गज जमीन’, ‘शहादत की कुर्बानी’, ‘चादर ए आसमान’ या कविताही दीर्घकाळ मनात रेंगाळतील अशाच!

सहज जाणवलेला एक योगायोग म्हणजे यातील मराठी व हिंदी या दोन्ही विभागात असलेल्या ‘जनरेशन नेक्स्ट’ या एकाच शीर्षकाच्या दोन कविता ! विशेष हे की या दोन्ही कवितांचा आशय आणि विषय एकच असला तरी त्यांची मांडणी मात्र सर्वस्वी भिन्न तरीही भावणारी !

या कवितासंग्रहाचं मला जाणवलेलं वेगळपण ध्वनित करण्यापुरता वानगीदाखल घेतलेला त्यातील काही मोजक्या कवितांचा हा प्रातिनिधिक आढावा आहे.         

मा.लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे यातील बहुतेक सर्व दीर्घ कविता वाचनापेक्षाही त्यांचे मंचीय सादरीकरण अधिक परिणामकारक ठरेल अशा आहेत.

‘आयुष्याचं गणित’ या संग्रहातील कविता आयुष्याच्या गणितांची मांडणी, ती गणिते सोडवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी रीत, आणि हाती लागलेल्या उत्तरांची अचूकता ताळा करून पहाण्याची प्रेरणा, या तीनही अंगांनी आकाराला येताना आशय-विषयांनुरुप आपापले वेगळे रूप घेऊन व्यक्त होताना दिसतात. आणि त्यामुळेच त्या रसिकांना काव्यानंद देतानाच विचारप्रवृत्त करणाऱ्याही ठरतील असा विश्वास वाटतो.

पुस्तक परिचय – श्री अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print