सौ. उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ पाय आणि वाटा… श्री सचिन वसंत पाटील ☆ परिचय – सौ. उज्ज्वला केळकर ☆

पुस्तक – पाय आणि वाटा

लेखक – श्री सचिन वसंत पाटील

प्रकाशक – हर्मिस प्रकाशन

पृष्ठे – १०० 

मूल्य – १५० रु.          

‘पाय आणि वाटा’ हा श्री सचिन वसंत पाटील यांचा ललित लेख संग्रह. दुर्दैवाने त्यांना एका अपघातात दोन्ही पाय गमवावे लागले. पाय असताना ज्या वाटा त्यांनी तुडवल्या, त्याच्या हृदयस्थ आठवणी म्हणजे ‘पाय आणि वाटा’. मनोगतात ते लिहितात, ‘माझी कहाणी सुरू होते वर्तमानात, पाय नसलेल्या अवस्थेत. मग ती वीस वर्षामागील एका बिंदूवर स्थिरावते आणि त्यामागील वीस वर्षात फिरून, हुंदडून येते. तेव्हा पाय असलेला मी तुम्हाला भेटत रहातो, तुकड्यातूकड्यातून…कधी निखळ, निरागस, तर कधी रानभैरी, उडाणटप्पू होऊन… शब्दाशब्दातून.

एका दुर्दैवी क्षणी सचीनना अपघात झाला आणि ते अंधाराच्या खोल खाईत भिरकावले गेले. शेतावर चारा आणायला गेलेले असताना, एका अवघड वळणावर बैलगाडी पलटली. वैरणीने भरलेली गाडी त्यांच्या पाठीवर पडली. यामुळे त्यांच्या मज्जारज्जूला जोराचा धक्का बसला. आणि त्यांच्या कमरेखालचा भाग कायमचा लुळा पांगळा झाला. डॉक्टरांनी वस्तुस्थितीची कल्पना दिली. ते यापुढे कधीही चालू शकणार नव्हते. स्वत:च्या पायावर उभे राहू शकणार नव्हते. पण त्या विकल निराशेतही ते स्वप्न बघत, समोरचा वॉकर धरून ते चालताहेत. आयुष्याच्या अंधार्‍या रस्त्यावरून ते कणाकणाने पुढे सरकताहेत. या काळात एकमेव विरंगुळा म्हणजे पुस्तके वाचणे. पुस्तकांनीच त्यांना शिकवलं, संकट माणसाला जगणं शिकवतात. मग त्यांनी ठरवलं, संकटांना भ्यायचं नाही. खंबीर मनाने सामोरं जायचं. ते म्हणतात, ‘पुस्तकं वाचली, म्हणून मी वाचलो.’

श्री सचिन वसंत पाटील

वाचनातून सचिनना लेखनाची प्रेरणा मिळाली. लेखन ही काही सोपी गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी. झोपून, एका कुशीवर वळून लिहावं लागे पण जिद्दीने त्यांनी आपले लेखन चालू ठेवले. त्यातून त्यांचे ‘सांगावा’, ‘अवकळी विळखा’ आणि ‘गावठी गिच्चा’ हे तीन कथासंग्रह प्रकाशित झाले. अनेक साहित्यिक, अभ्यासक, समीक्षक यांनी त्यावर लिहिलय. या पुस्तकांवरील समीक्षेची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. या तीनही पुस्तकांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अलिकडेच त्यांचे ‘पाय आणि वाटा’ हे ललित संग्रहाचे चौथे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.  अलिकडे लेखन करणं त्यांना पहिल्यापेक्षा सोपं झालय. आता ते लेखनासाठी लॅपटॉपचा उपयोग कारतात, पण तेही सोपं नाही. आताही त्यांना झोपूनच लेखन करावं लागतं. पोटावर झोपायचं. पुढे लॅपटॉप ठेवायचा. आणि टाईप करायचं. हीदेखील मोठी कसरत आहे. दिवसभरात ते जास्तीत जास्त दोन पाने लिहू शकतात. या लेखन मर्यादेमुळे पुष्कळसं सुचत असलं, तरी ते कागदावर उतरत नाही. मात्र त्यांनी जे काही लिहीलंय, ते उत्तम लिहीलंय.

‘पाय आणि वाटा’ या ललित लेखसंग्रहातील वातावरण अस्सल ग्रामीण आहे. अस्सल ग्रामीण जीवन, अस्सल ग्रामीण भाषेतून यात व्यक्त झाले आहे. खानदानी ग्रामसुंदरीचा डौल, रुबाब आणि ठसका यात आहे. त्यांची शब्दकळा लावण्यामयी आहे. ‘राखण’ या पाहिल्याच लेखात त्यांनी वर्णन केलय, ‘जमिनीच्या पोटातला गर्भ दिसामासांनी वाढायचा’. …. ‘शाळवाच्या धाटातून, केळीच्या कोक्यागत कणसं बाहेर पडायची. कणसांची राखण करणार्‍यांना पाखरं लांब गेली, असं वाटायचं. पण कुठलं? म्हवाच्या माशा उठल्यागत पुन्हा थवा यायचा. हळू हळू मोठा होत रानावर उतरायचा. एकेका थव्यात दोन-अडीचशे पाखरं असायची. असे असंख्य थवे.’ प्रत्यक्ष दृश्य डोळ्यापुढे उभं करण्याचं सामर्थ्य त्यांच्या वर्णनात आहे.

‘राखण’ हा पुस्तकातला पहिला लेख.  यात राखणीचं निमित्त काढून हुंदडायला गेलेल्या मुलांसोबत आपणही फिरतो. डोळ्यांनी सारं सारं पहातो. पंचेंद्रियांनी अनुभवतो. लेखाच्या शेवटी ते आठवणीतून वास्तवात येतात. लिहितात – ‘जनावरांच्या कालव्यानं मी जागा होतो. भोवतीच्या पडक्या भिंती मला भानावर आणतात. पण मनात हिरवं रान नाचत असतं. डोळ्यात हिरवी साय. मला आजही आशा आहे, मी माझ्या पायावर परत उभा राहीन. पुन्हा हातात गोफण घेऊन शाळवानं पिकलेलं रान राखीन.’ हा आशावादच त्यांना जगण्याचे बळ देतो.

‘करडईची भाजी’ हा लेख कथेलाच गळामिठी घालतो. हाच लेख नव्हे, तर अनेक लेख कथेच्या जवळपास जाणारे आहेत. या संदर्भात त्यांच्याशी बोलले, तेव्हा ते म्हणाले, ‘ललित लेखांमध्ये ‘मी’ आहे. माझे अस्तित्व आहे. माझे अनुभव आहेत. कथा विविध पात्रांच्या आहेत. त्यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे अनुभव, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यात आहेत. तिथे मी असेन, तर केवळ साक्षीभावानेच.’ ‘करडईची भाजी’ या लेखात, एक दहा-बारा वर्षाचा मुलगा बुट्टीत करडईची भाजी घेऊन विकायला निघालेला लेखकाला भेटतो. लेखक त्याला दहा रुपये देऊन दोन पेंडया विकत घेतो. त्यामुळे तो खूश होतो. त्याचे हास्य पाहून लेखकाला त्याचं बालपण आठवलं. ‘पाय हरवलेल्या अंधेर नगरीतून आठवणींच्या नितळ विहीरीच्या खोल पायर्‍या मी उतरू लागलो.’ असे ते लिहितात. त्यावेळी ते सहावीत होते. परीक्षेची फी भरायला घरात पैसे नव्हते. शेवटी आई म्हणते, ‘रानात करडा खूप उगवलाय. त्यो काढून पेंडया बांधून वीक जा’ आणि  त्याचे काम सुरू होते. चार आण्याला पेंडी. फी होती आठरा रुपये. एक दिवस गोठा साफ करातांना एक कालवड लाथ मारते. वेदना होतात. मांडीवर बॉलगत लालभडक टण्णू उठतो. दु:ख असतंच पण भाजी विकायला जाता येणार नाही, याचं जास्त दु:ख होतं. अखेर पाय सुधारतो. पंध्रा दिवसात फीचे पैसे जमा होतात. लेखाचा शेवट करताना त्यांनी लिहिलय, ‘आज वीस-बावीस वर्षांनंतर त्या भाजी विकणार्‍या मुलाला पाहून ते सगळं आठवलं. आज विकण्यासारखी भाजी माझ्या शेतात भरपूर आहे पण ती गवभर फिरून विकायला माझ्याकडं पाय नाहीत.‘

‘झुक झुक आगीनगाडी’मध्ये मध्ये मामाच्या गावाचे वर्णन येते. कुरूंदवाड मामाचं गाव. तीन बाजूने पाण्याने वेढलेलं गाव. बेटासारखं गाव. उशाशी कृष्णा आणि पायथ्याशी पंचगंगा घेऊन वसलेलं गाव. गावातील रमणीय निसर्गाचं वर्णन यात येतं. मामाचंही वर्णन यात येतं. ’तो आभाळाएवढा उंच वाटायचा. आपल्या मामाइतका मोठा माणूस जगात कोणी नाही, असा वाटायचं. आपण मागेल ती वस्तू देणारा. म्हंटलं तर जादूगार म्हंटलं तर सांताक्लॉज . मनातली वस्तू न मागता देणारा …’ असं मामाचं वर्णन यात येतं. गावाच्या रमणीय निसर्गाचं वर्णनही यात येतं आणि कालमानाने झालेल्या बदलाचंही. आपलंही गाव कसं बदललं आहे, याचंही वर्णन पुढे एका स्वतंत्र लेखात त्यांनी केलय.

‘पोस्टाचं पत्र हरवलं’मध्ये बदलत्या काळानुसार पत्रलेखन कमी झाल्याची खंत ते व्यक्त करतात. अक्षर चांगलं असल्यामुळे गल्लीतील लोक त्यांच्याकडून पत्र लिहून घेत.त्यांनी सांगितल्या मुद्याला कल्पनेचा मालमसाला लावून ते पत्र लिहित. ते म्हणतात, ‘माझ्या लेखनाची सुरुवात या दरम्यान कुठे तरी झाली असावी.’ यात पायाचा आंगठा आणि तर्जनीत खडू घरून काढलेल्या नाचर्‍या मोराची आठवण येते आणि आता ते पाय कुठे गेले, या बिंदुशी येऊन स्थिरावते.

‘ती बैलगाडी’, ‘घोडी’, ‘पाठीराखा’ अशी सुरेख शब्दचित्रे यात आहेत. ‘पाठीराखा’मध्ये आपल्या मोठ्या भावाबद्दल त्यांनी अतीव उमाळ्याने लिहिले आहे. लहानपणी रस्त्यावर पळतो, म्हणून अडवणारा भाऊ, अपघातानंतार चालता यावं म्हणून धडपडणारा भाऊ, ऑपरेशन चालू असताना रकतासाठी डोनर शोधणारा भाऊ, हॉस्पिटलचे बील भागवण्यासाठी पैशाची जुळणी करणारा भाऊ, अशी त्याची अनेक रूपे त्यांनी यात वर्णन केली आहेत. तो जवळ असेल, तर कशाचीच भीती नाही, असा ठाम विश्वास आणि तो जवळ नसल्यामुळेच अपघात झाला, असं त्यांना वाटत रहातं. आजही पाय नसल्याचं दु:ख एकीकडे वागवतानाच आपला भाऊ आपल्याजवळ आहे, हे सुख आपल्यापाशी आहे, याचा आनंद ते व्यक्त करतात.

‘कोरडे डोळे ‘ मध्ये आपल्याला भेटतो, एक कंजारभाटाचा मुलगा. त्यांची पाच-सात झोपड्यांची वस्ती कुणी जाळून टाकलीय. बायका- मुले, बापये तेवढे वाचलेत. बाकी सारं सामान जाळून गेलय. त्यातच त्या मुलाचे दप्तरही जळून गेलय. तो रोज शाळेत येतो. कोरड्या डोळ्यांनी काळ्या फळ्याकडे पहातो. जमेल तसं मनात उतरवून घेतो. नंतर कधी तरी तो शाळेत येइनासा होतो. लेखक देवाकडे मागणं मागतो,  शिकायची इच्छा असलेल्या कुठल्याही मुलाला शाळा सोडायला लागू नये. बाकी काही नुकसान झालं, तरी त्याची पुस्तकं तेवढी जळू देऊ नकोस.’

‘झाड आणि वाट’ मध्ये भेटतात, भुंडा माळ, त्यातून गेलेली वाट, वाटेवरच्या वाळणावरचं डौलदार आंब्याचं गच्च हिरवंगार झाड आणि त्या झाडाचा म्हातारा मालक. तो रोज त्या झाडाच्या बुंधयाशी पाण्याचा डेरा भरून ठेवतोय. उन्हाच्या रखरखीतून वाट तुडवत येणारा तृषार्त ते पाणी पिऊन तृप्त होतोय. पुढे कालमानाने जग बदललं. इरिगेशनचं पाणी आलं आणि भुंड्या माळाचं भाग्य बदललं. तो हिरवागार झाला. तिथे द्राक्षाची लागवड झाली. वाट डांबरी झाली. बाकी सारं चांगलं झालं. या सार्‍यात आंब्याचं झाड गेलं, एवढंच वाईट झालं.

‘पाय आणि वाटा’ हा संग्रहातला शेवटचा लेख. आपल्या पायांनी चाललेल्या वाटांच्या आठवणी यात आहेत. त्यात कुरणाची वाट आहे. बुधगावची वाट आहे. वाडीवाट आहे. रानाची वाट आहे. गावाकडून साखर कारखान्याकडे बेंद भागातून जाणारी मधली वाट आहे. त्या त्या वाटेवरचे प्रसंग, व्यक्ती यांच्या आठवणी यात आहेत आणि सगळ्यात विदारक आठवण म्हणजे एकदा त्या वाटेवरून जाताना त्यांना झालेला अपघात, जो त्यांचे पायच घेऊन गेला. ते लिहितात, ‘आता कधी गाडीवरून त्या वाटेवर जायची वेळ आली, तर दिसतात, त्या वाटेवर हरवलेल्या पावलांचे ठसे….’

‘पाय आणि वाटा’ या पुस्तकात गतिमानता आहे. दृश्यात्मकता आहे, भावनोत्कटता आहे. कुठे कुठे कथात्मकताही आहे. शब्दकळा लावण्यमयी आहे. एक चांगले पुस्तक वाचल्याचा आनंद हे पुस्तक नक्कीच देते.

पुस्तक लेखक –  श्री सचिन वसंत पाटील

विजय भारत चौक, कर्नाळ, ता. मिरज, जि. सांगली. पिन- ४१६४१६. भ्रमणध्वणी – 8275377049, ईमेल – [email protected]

पुस्तक परिचय – सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments