मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाले कसे निखारे ?… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ झाले कसे निखारे ?… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

गालावर तव ओघळला ,

दव वेलीच्या फुलांचा.

मी चकोर अधीर टिपण्या ,

कणकण साैंदर्याचा.

सुखदुःखाच्या लाटांची,

तू कालप्रवाही सरिता .

मी हरवल्या काठाची,

निर्बंध मूक कविता.

साक्षात काैमुदी तू,

तू चाँद पूनवेचा.

मी नाममात्र उरलो,

ऋतू शरद चांदण्याचा.

झाले कसे निखारे,

ओंजळीतल्या फुलांचे.

अरण्यरुदन ठरले,

अप्राप्य चांदण्याचे.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

डॉ निशिकांत श्रोत्री

? काव्यानंद ?

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

☆ दावा परमार्थ… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

तुमच्या पायी आलो मजला दावा परमार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ   ||ध्रु||

 

जीवन सारे व्यतीत केले मानव सेवेत

नव्हती कसली जाण काय आहे अध्यात्म

परउपकार न मजला ठावे अथवा ना स्वार्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||१||

 

दारी आले त्यांच्या ठायी तुम्हांस देखियले

नाही आले त्यांच्यातुनिया तुम्हांस जाणीले

तुम्हाविना ना काहीच भासे जीवनात अर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ||२||

 

जाणीव आता पैलतिराची शिरी असो हात

नाही कसली आंस असो द्या तुमचीच साथ

कृपा असावी उजळावे हो जीवन न हो व्यर्थ

जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ    ॥३॥

©️ डॉ. निशिकांत श्रोत्री, ९८९०११७७५४

☆ दावा परमार्थ – डाॅ. निशिकान्त श्रोत्री यांच्या कवितेचा रसास्वाद – श्री श्रीकांत पुंडलिक ☆

कविवर्य डॉ निशिकांत यांची ही एक भावपूर्ण कविता आहे. ही कविता म्हणजे कविवर्यानी आपल्या आयुष्याकडे वळून बघताना केलेले आत्मपरीक्षण आहे.जणू काही आयुष्याचा लेखाजोखाच मांडला आहे.

माणसाचं जीवनच प्रश्नमय आहे. जन्मल्याबरोबर माणसाला प्रश्न पडतो, “कोsहं?” या प्रश्नापासून सुरू झालेलं आयुष्य ‘”सोहं” या उत्तराप्रत येईपर्यंत अनेक प्रश्नांनी भारलेलं असतं. आणि माणूस त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. या जीवन प्रवासात पुष्कळ वेळा आत्मकेंद्री बनत जातो आणि तो फक्त स्वतःपुरता जगायला लागतो. मी, माझं कुटुंब, माझा उदरनिर्वाह, माझी समृद्धी याचा विचार करताना स्वार्थ काय परमार्थ काय या संबंधी तो विचार देखील करत नाही. पण जो ज्ञानी मनुष्य असतो तो मात्र या सर्व क्रियाकलापापासून अलिप्त होत स्वार्थ, परमार्थ, जीवन याचा, साकल्याने विचार करितो. प्रस्तुत  कविता म्हणजे याच विचाराचं भावपूर्ण प्रकटीकरण आहे.

कविवर्य आपल्या कवितेच्या पहिल्या कडव्यात अतिशय नम्रपणे, त्याच्या जीवनाचं अधिष्ठान असलेल्या सद्गुरू स्वामी समर्थाच्या चरणी लीन होतात आणि त्यांना आपल्या आयुष्यात केलेल्या जीवन प्रवासाची माहिती देतात.

कविवर्य स्वतः आयुःशल्य विज्ञान  स्नातक आहेत. त्यांना शारीरिक व्याधी आणि त्यातून सुटकेचा मार्ग माहिती आहे. या ज्ञानाच्या आधारे त्यांनी अनेकांना व्याधीमुक्त केलेलं आहे. त्यात त्यानी कुठलाही स्वार्थ जोपासला नाही. त्यामुळे स्वतच्याही नकळत कविवर्य अध्यात्मच जगले आहेत.

दुसऱ्या  कडव्यामध्ये कवींनी आपल्या कामागची प्रेरणा स्पष्ट केली आहे. कवींचा व्यवसाय जरी वैद्यकीचा असला तरी त्यामागची प्रेरणा मात्र, “शिव भावे जीव सेवा” हीच होती.  जीवनाच्या प्रत्येक अंगामध्ये कवींनी आपल्या आराध्य देवतेलाच पाहिले. व्यवसाय आणि जीवनातील यशाचं श्रेय मात्र विनम्रपणे कवी  स्वामी समर्थाना देतात.

मी कर्ता म्हणशी तेणे तू कष्टी होसी।

परा कर्ता म्हणस। तेणे तू पावसी। यश कीर्ती प्रताप॥”

ही समर्थ रासमदास स्वामी याची उक्ती कवी आचरणात आणतात. स्वामी समर्थाविना जीवन निरर्थक आहे हीच भावना या कडव्यात कवींनी मांडली आहे.

तिसऱ्या कडव्यात मात्र कविवर्याची भावना मात्र व्याकुळ झाली आहे. “संध्या छाया भिवविती हृदया” अशी भावना या कडव्यातून व्यक्त होते आहे. व्यासाच्या या वळणावर फक्त स्वामी समर्थाची साथ असावी आणि जीवन उजळून निघावे हीच भावना प्रकट होते आहे. आयुष्य हेच स्वामी समर्थाची पूजा, आणि आता उत्तरपूजा सुरू झाली आहे

न्यूनं संपुर्णतांयाती सद्यो वंदेतमच्युतं

ही कविता वाचत असताना शब्दांचा साधेपणा, प्रासादिकता, यामुळे कवितेमध्ये अंगभूत नादमाधुर्य निर्माण झाले आहे. कवितेतील आर्तता थेट  जगद्गुरू संत तुकारामाच्या, “तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता” या भावनेशी नाते सांगणारी आहे.

© श्री श्रीकांत पुंडलिक

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ च म त्का र ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? 💓 च म त्का र ! 💃 ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

☆ 

गोड गुलाबी दोन जीवांचा

मूक संवाद नजरेत भरला

पाहून प्रेमाची मुग्ध भाषा

मम हृदयी पीळ तो पडला

बघता निरखून प्रेमिकांना

  ठोका काळजाचा चुकला

अनोख्या फुलांचा चमत्कार

निसर्गाने होता घडवला

छायाचित्र  – मोहन कारगांवकर, ठाणे.

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

०६-११-२०२२

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साद… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ साद… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आम्ही सेक्युलॅरिझमच्या

घोषणा देत होतो

तेव्हा, त्यांनी

शस्त्रास्त्रे जुळवली.

आम्ही शांततेचा माहोल

निर्माण करत होतो

तेव्हा यांनी जिहाद पुकारला.

आम्ही धाडले

निषेधाचे खलिते

त्यांच्याकडे.

त्यांनी खलित्यांचेच 

बोळे पेटवून

आमच्याच घरात टाकले.

आता अनिकेत झाल्यावर तरी

जागू द्या आत्मभान

अभ्युत्थानार्थ संभावणारा युगपुरूष

आपल्याच आत्मगर्भात

वाट पाहत आसेल

आपल्या आर्त कळांची

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 128 – नको साजणी तू ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 128 – नको साजणी तू ☆

नको साजणी तू ।अशी दूर आता।

मनी आसवांचा । नको पूर आता।

 

तुझा छंद माझ्या। जिवाला जडे हा।

तुझ्या दर्शनाने । टळे धूर आता।

 

अशा शांत वेळी । नको हा दुरावा।

तुझा हात हाती ।असे नूर आता।

 

किती भाव नेत्री। तुझ्या दाटलेले।

इशारा कशाला । जुळे सूर आता।

 

तुझा स्पर्श भासे जणू चांदण्याचा।

उगी लाजण्याने। अशी चूर आता।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #150 ☆ संवाद… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 150 – विजय साहित्य ?

☆ संवाद… ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

आज पाहिल

टेबलावरचा बहिणीचा फोटो

जरा जास्तच हसत होता.

तेरा वर्षापासून भाऊबीजेला

याच फोटोशी संवाद व्हायचा.

भावा बहिणीचं नातं

जणू दिवस रात्रीच चक्र

एकमेकांना भेटतात

उदयाला किंवा अस्ताला

एरवी प्रवास चालूच असतो.

भाऊ बहिणीची वाट पहात असतो

माहेरच्या मनमंदिरात

भावाचाच मान असतो.

आई नंतर ताई ,बाबांनतर दादा

नात्याच्या शब्दावलीत नाजुकसा धागा.

छायाचित्र बोलके पुन्हा पुन्हा सांगते.

सुखाच्या आठवात परलोकी नांदते.

कसा आहेस दादा..? फूल हळूच टपकते

नात्यातली ऊब तेव्हा नकळत दरवळते.

हीच खरी दिवाळी अंतरात पाझरते ..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ५ (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद– (ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ५  (इंद्र सूक्त)) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र : छंद – गायत्री

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

आ त्वेता॒ नि षी॑द॒तेन्द्र॑म॒भि प्र गा॑यत । सखा॑य॒ स्तोम॑वाहसः ॥ १ ॥

या मित्रांनो या सखयांनो यज्ञवेदीला या

सारे मिळूनी गायन करु या सुस्वर लावू या

गायन अपुले सुरेन्द्रास या प्रसन्न करण्याला  

कृपा तयाची व्हावी म्हणुनी आर्त व्हावयाला ||१||

पु॒रू॒तमं॑ पुरू॒णामीशा॑नं॒ वार्या॑णाम् । इन्द्रं॒ सोमे॒ सचा॑ सु॒ते ॥ २ ॥

सुरेंद्र शीरोमणी श्रेष्ठतम त्यासी वंदन करा

अलोट संपत्तीचा स्वामी त्याचे चरण धरा 

होत्साता तो सिद्ध सोमरस सुरेंद्रस्तोत्र करा

आवर्जुनिया आर्त स्वराने त्या पाचारण करा ||२||

स घा॑ नो॒ योग॒ आ भु॑व॒त्स रा॒ये स पुरं॑ध्याम् । गम॒द्वाजे॑भि॒रा स नः॑ ॥ ३ ॥

या देवेंद्रा सामर्थ्यासह आम्हास दर्शन द्याया

आम्हा देखील तुम्हासारिख्या वैभवास द्याया

लाभ आमुचे सद्भावनिही तुमचा वास असो 

तुमच्या चरणी चित्त आमुचे सदैव लीन असो ||३||

यस्य॑ सं॒स्थे न वृ॒ण्वते॒ हरी॑ स॒मत्सु॒ शत्र॑वः । तस्मा॒ इन्द्रा॑य गायत ॥ ४ ॥

चंडप्रतापी देवेन्द्राशी रणी कोण भिडतो

सज्ज तयाच्या अश्वा पाहुन रिपुही भेदरतो

प्रसन्न करण्या सुरेन्द्रास या आर्त होऊनीया

सारे मिळूनी स्तवन करूया महिमा गाऊया ||४|| 

सु॒त॒पान्वे॑ सु॒ता इ॒मे शुच॑यो यन्ति वी॒तये॑ । सोमा॑सो॒ दध्या॑शिरः ॥ ५ ॥

ताज्या सोमरसात मधुर दह्यास मिसळूनी

पवित्र पावन सोमरसाचा हविर्भाग आणुनी

रुची द्यावया  देवेंद्राला त्यास सवे घेउनी

प्रसन्न करूया या इंद्राला सोमरसा अर्पुनी ||५||

त्वं सु॒तस्य॑ पी॒तये॑ स॒द्यो वृ॒द्धो अ॑जायथाः । इन्द्र॒ ज्यैष्ठ्या॑य सुक्रतो ॥ ६ ॥

राज्य कराया जगतावरती  चंडप्रतापी इंद्रा

सोमाच्या पानास्तव होशी प्रकट सिद्ध देवेंद्रा 

करून सोमाचा स्वीकार आम्हा उपकृत करी

सामर्थ्याने तुझिया देवा वसुंधरे सावरी ||६||

आ त्वा॑ विशन्त्वा॒शवः॒ सोमा॑स इन्द्र गिर्वणः । शं ते॑ सन्तु॒ प्रचे॑तसे ॥ ७ ॥

ज्ञानमंडिता हे शचिनाथा सोमरसा स्वीकारी

पान करुनिया या सोमाचे गात्रा मोद करी

वर्धन करिण्या उत्साहाचे तुझे स्तवन देवेंद्रा 

तव चित्ताला तव देहाला नंद देत हे इंद्रा ||७||

त्वां स्तोमा॑ अवीवृध॒न्त्वामु॒क्था श॑तक्रतो । त्वां व॑र्धन्तु नो॒ गिरः॑ ॥ ८ ॥

स्तवनांनी या तुझीच महती दाहिदिशा पसरली

तुझ्या स्तुतीने तुझीच कीर्ति वृद्धिंगत ती झाली

या स्तोत्रांनी तव महिमा बहु दिगंत तो व्हावा

प्रज्ञाशाली रे देवेन्द्रा सकला प्रसन्न व्हावा ||८||

अक्षि॑तोतिः सनेदि॒मं वाज॒मिन्द्रः॑ सह॒स्रिण॑म् । यस्मि॒न्विश्वा॑नि॒ पौंस्या॑ ॥ ९ ॥

अमोघ वज्रा हाती घेउन इंद्र ज्यास तारी

कोण असे या जगी पूत जो तयासिया मारी

सहस्र ऐरावताच्या बला आम्हासिया देई

सामर्थ्ये ज्या पराक्रमांचे कृत्य हातूनी होई ||९||

मा नो॒ मर्ता॑ अ॒भि द्रु॑हन्त॒नूना॑मिन्द्र गिर्वणः । ईशा॑नो यवया व॒धम् ॥ १० ॥

रक्ष रक्ष इंद्रा स्तवितो तुज तुझ्या चरणी येउनी

देहाला या अमुच्या पीडा देऊ शके ना कोणी

तव सामर्थ्ये राज्य पसरले तुझे त्रिभूवनी

वधू शके ना आम्हा कोणी ठेव अम्हा राखुनी ||१०||

YouTube Link:  https://youtu.be/aeFjHiFyKis

Attachments एरिया 

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 5 Marathi

Rugved Mandal 1 Sukta 5 Marathi

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कैवल्य… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ कैवल्य… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : समुदितमदना) – (मात्रा १६+११)

     कधीकाळचे विझलेले ते

          गगन उजळती दीप

    अथांगातुनी आले वरती

          ते सोन्याचे द्वीप !

 

     दिनरात्रीचे सुखदुःखाचे

          द्वैतचि सारे सरे

     आर्त दिशांचे केवळ नयनी

          करुणामय पाझरे !

 

     दाहमुक्तिच्या पंथी वणवे

          शीत समीरण वनी

     येत परतुनी प्राणपाखरे

          शोधित घरटी जुनी !

 

     कणकण उजळे दिव्य दीप्तिने

          तिमिर युगांचा सरे

     प्राणामधुनी झुळझुळती गा

          नक्षत्रांचे झरे !……

 

     क्षण दीप्तीचा क्षण तृप्तीचा

          आता कसली खंत

     दर्शनव्याकुळ भक्ता दर्शन

          अवचित दे भगवंत !

 

     हाकेसरशी दिगंत एका

          स्वर्ग धरेवर झुके

     ह्रदयनंदनी गर्द निरामय

          कैवल्याचे धुके !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #135 ☆ संत सोपान देव… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 135 ☆ संत सोपान देव … ☆ श्री सुजित कदम ☆

 

ज्ञाना निवृत्ती सोपान

आणि मुक्ताई धाकली

चार वेद अध्यात्माचे

जणू एकात्म आवली…! १

 

सुसंस्कृत जीवनाचा

ठरे सोपान वारसा

अध्यात्मिक उन्नतीचा

संत सोपान आरसा…! २

 

ग्रंथ सोपान देवीत

केल्या अभंग रचना

उरी अपार करूणा

विश्व शांती  संकल्पना…! ३

 

तीर्थाटन माधुकरी

भटकंती समाजात

केली मलिनता दूर

भक्तीभाव अभंगात…! ४

 

ज्ञानगंगा सोपानाची

ठेवा अक्षय अभंग

काळजाला काळजाने

भेटवीला पांडुरंग…! ५

 

पांडुरंग चरणांची

हवी अंतराला ओढ

एका एका अभंगाला

लाभे हरिनाम जोड…! ६

 

भक्तीमय भावनांनी

दिली अलौकिक ठेव

संत सोपान देवाची

सांप्रदायी देवघेव…! ७

 

स्वर्गलोक शब्दांकन

पंढरीचा थाट माट

अभंगात वर्णियेला

प्रपंचाचा हरी घाट…! ८

 

दिला जीवन विचार

अंतर्मुख झाले जन

सोपानाच्या अभंगात

लीन झाले तन मन…! ९

 

समाधिस्थ ज्ञानदेव

गेला जीवन आधार

हरी रूप झाला देह

पंचतत्व उपचार…! १०

 

मार्गशीर्ष वद्य पक्षी

संपविला अवतार

संत सोपान समाधी

सासवडी अंगीकार…! ११

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रेमळ भेट…. ☆ सुश्री जस्मिन रमजान शेख

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? प्रेमळ भेट….  ? ☆ सुश्री जस्मिन रमजान शेख ☆ 

सूर्य चंद्राचा आज

कसा बघा मेळ झाला

राजकारणी महतींचा

जणू खेळ नभी रंगला

का धरणीमाय अलगद

पसरवूनी दोन्ही बाहू

अवखळ पोरांना या

म्हणे बांधुनी पाहू

दोन मित्र जणू काय हे

हितगूज करती लांबून

खूप दिवसांनी भेटलो

सांगी जरा वेळ थांबून

काही का असेना आज

पारणे डोळ्यांचे फिटले

जाणारा अन् येणारा

एकावेळेस आम्हा भेटले

सूर्य चंद्राची ही अनोखी

भेट आम्हा स्मरेल नित्

दोन ध्रुवांची असेल ही

एकमेकांवर प्रेमळ जीत

© सुश्री जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares