मराठी साहित्य – काव्यानंद ☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

काव्यानंद:

शृंगार हा रसांचा राजा आहे, रसपती आहे.  प्रेम— रती हा शृंगाराचा स्थायीभाव.  शृंगार उत्तान असेल, सात्विक असेल अथवा वियोगातला विप्रलंभ शृंगार असेल  पण मानवी जीवनातच नव्हे तर अवघ्या निसर्गातच या रसराजाचं दर्शन होत असतं.  गीतकार आणि कवी मंडळींचा तर हा लाडका विषय.  मग त्यात प्रेम, संध्याकाळ, नदीकाठ, समुद्रकिनारा तर असतातच पण अग्रभागी असतो तो चंद्र!  प्रियतमेच्या नजरेतला प्रियकर. चित्तवृत्ती फुलवणारी चंद्र, चांदणं, यामिनी यांची शेकडो गीत आज पर्यंत रचली गेली आहेत.  अगदी  महान कवी कालीदासांचे मेघदूत हे काव्य विप्रलंभ शृंगारचे एक अप्रतिम उदाहरण आहे.  असंच एक सुंदर शृंगार गीत घेऊन येत आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री.  या गीताचं शीर्षक आहे निशाशृंगार ( निशिगंध काव्यसंग्रह)

☆ – निशाशृंगार – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

असुन रंग काळा रुपेरी हा साज सजली निशा

नटूनी थटूनि घेऊनि येई धुंदी नशा।।ध्रु।

 

हिर्‍यांची कटी मेखला दिव्य शोभे

आकाशगंगा सजविण्यास लाभे

शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या ।१।।

 

जरी रात्र काळी निशानाथ भाळी

किती कौतुकाने मिरवी झळाळी

रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

लपेटूनिया भवती दाही दिशा ।।२।।

 

रजनीकांत प्रणये निशा तृप्त झाली

धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

तृप्त शशांक धन्य ती रजनी

संपन्न हो प्रीतीचा हा वसा ।।३।।

डाॅ. निशिकान्त श्रोत्री.

हे गीत वाचत असताना अक्षरशः अंगावर मोरपीस फिरतं. इतकं नाजूक, इतकं कोमल आणि तरल शब्दातले हे गीत सहजपणे एका धुंद लहरीत तरंगायला लावतं.

असून रंग काळा रुपेरी

हा साज सजली निशा

 नटूनी थटूनि  घेऊनि

 येईल धुंदी नशा …

यात प्रत्यक्ष निशा— रात्रच प्रियतमेच्या भूमिकेत आहे. ही निशा कशी? तर कृष्णवर्णी काळी.  पण तिनेही रुपेरी साज चढवलेला आहे. नटलेली, थटलेली चंदेरी चांदण्याचा पेहराव घातलेली निशा प्रणय भावनेने धुंद झालेली भासत आहे.

 *हिऱ्यांची कटी मेखला दिव्य शोभे

 आकाशगंगा सजविण्यास लाभे

 शेल्यावरी कृष्ण नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या …

 

प्रथम याओळींचा अन्वयार्थ लावूया.

कटी, हिर्‍यांची मेखला दिव्य शोभे

सजविण्यास आकाशगंगा लाभे

कृष्ण शेल्यावरी नक्षत्र शोभे

अलंकार सजवीत रजनीस या…

खरोखरच ही चार चरणे  वाचल्यानंतर प्रथम मनात येतं ते

जे न देखे रवी ते देखे कवी

 किती सुंदर कल्पनांची ही शब्दसरी!

 निशेच्या साज शृंगारकडे पाहताना कवी म्हणतात, या निशेच्या कमनीय कटीवर— कमरेवर जणूं काही आकाशगंगारूपी हिऱ्यांची  साखळी आहे. आकाशगंगा म्हणजे तारका समूहाचा डोळ्यांना लुब्ध करणारा नभातला एक लांबलचक पट्टाच. आज कवीच्या नजरेत मात्र ही आकाशगंगा  काळ्या निशेचा  हिऱ्यांचा कमररपट्टाच आहे. आकाशातलं चमचमणारं चांदणं, निशेच्या काळ्या शेल्यावर कसं चंदेरी बुट्ट्यांसारखं शोभिवंत वाटत आहे.  खरोखरच या कृष्णवर्णी रजनीने हेच अलंकार चढवून स्वतःला नटवले आहे, सजवले आहे. ते कुणासाठी बरे? पाहूया पुढच्या कडव्यात.

 जरी रात्र काळी निशानाथ भाळी

 किती कौतुकाने मिरवी झळाळी

 रिझविण्यास कांता निशा सज्ज झाली

 लपेटुनिया भवती दाही दिशा…

ही प्रियतमा रात्रीच्या रूपात आहे. ती काळी आहे. पण तिच्या भाळावर —कपाळावर मात्र चमचमणारा, लखलखीत, प्रकाशमय असा शशांक आहे. किती कौतुकाने, अगदी मालकी हक्कानेच ती तिच्या निशानाथाची झळाळी मिरवत आहे!  तिच्या संपूर्ण काळ्या रंगालाच त्याने उजळवून टाकलेले आहे.

 रिझविण्यास कांता या ओळीतला कांता हा शब्द खूपच रसभरीत आहे. प्रणयात किंवा प्रणय भावनेत धुंद झालेली स्त्री ही कांता असतेच. पण या ठिकाणी कांता याचा अर्थ प्रियकर हा आहे आणि या प्रियकराला रमविण्यासाठी ही रजनी पहा कशी  दाही दिशांचं वस्त्र लपेटून तयार झाली आहे.  ही ओळ इतकी तरल आहे की ती वाचताना असे वाटते की प्रणयोत्सुक प्रियतमा जणू कुठल्याशा पारदर्शक वस्त्रातून तिचं कायिक सौंदर्यच प्रियकराला दाखवत आहे.

  रजनीकांत प्रणये  निशा तृप्तझाली

  धुंदीस बघुनी हवा कुंद झाली

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा…

वा! क्या बात है कविराज?  या काव्यपंक्ती वाचताना मला क्षणभर खजुराहोची कामोत्सुक, शंकर-पार्वतीच्या कामक्रीडेची शिल्पच पाहते आहे की काय असेच वाटले. किती नाजूक! किती तरल हा प्रणय! आणि प्रणय क्रीडेचा हलकेच गाठलेला तो शिखरबिंदू! एक तृप्तीचा क्षण जो रजनीकांताशी झालेल्या काम क्रीडेनंतर निशेने अनुभवलेला. आणि निसर्गातलं हे धुंद प्रणयमग्न युगुल पाहून वातावरणातल्या हवेलाही कशी नशा चढली आहे. तीही कुंद—धुंद झाली  आहे.

ये राते ये मोसम ये चंचल हवा…जणू काही कुठल्यातरी अज्ञात अस्तित्वाच्या अंतरातूनच अस्फूटपणे उद्गार उमटतात,

 तृप्त शशांक धन्य ती रजनी

 संपन्न हो प्रीतीचा हा वसा ..

हा चंद्र ही तृप्त आणि ही रजनीही धन्य!

समागमातला आनंद,मीलनाची आकंठ तृप्ती!

खरोखरच एका दिव्य, रसमय, तरल शृंगाराचा हा सोहळाच जणू काही संपन्न झालेला आहे!

अहाहा! कविराज, खुदा की कसम लाजवाब है।

निशाशृंगार हे गीत म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकाराचं एक मूर्तीमंत सुंदर उदाहरणच. चेतनागुणोक्ती हा अगदी भावयुक्त अलंकार आहे.  अचेतन गोष्टीला चेतनामय मानून तिला सचेतनाचे गुणधर्म जोडणे हे या अलंकाराचे वैशिष्ट्य आहे.  याकरिता परानुभूती कौशल्याची गरज असते. या अलंकारामुळे कवीच्या कल्पनेला खूप वाव मिळतो आणि कविता अंगोपांगी बहरते.

डॉ. श्रोत्री यांच्या प्रस्तुत निशाशृंगार या गीतात हे प्रकर्षाने जाणवते.  निशा म्हणजे रात्र. एक काळाचा प्रहर खरंतर. पण कवीने या कृष्णकाळ्या रात्रीलाच प्रियतमेच्या रूपात पाहिले आहे.  इथे निशा ही प्रणय धुंद प्रियतमा आणि रजनीनाथ हाच प्रियकर आहे आणि त्यांच्या रुपेरी प्रणायाला गुंफणारं हे अप्रतिम काव्य.  इथे हवेला सुद्धा चैतन्य रूप दिलेले आहे. वास्तविक चेतनागुणोक्ती अलंकार आणि रूपक हे तसे एकमेकात गुंतलेलेच असतात असे का म्हणू नये?  निशाशृंगार या गीतात चेतनागुणोक्ती अलंकार साधणारी निशा, निशानाथ, आकाशगंगा, मेखला, कृष्ण शेला, दिशा ही सारी रूपकेच आहेत आणि ती या गीतात चेतना रूपात आहेत. सचेतन आहेत.

डॉ. श्रोत्रींची ही रजनी जशी निसर्गाने बहाल केलेल्या अलंकाराने झळाळत आहे तसेच हे काव्यही साहित्यालंकाराने सजलेले आहे.

यात आकाशगंगेला निशेच्या कटीवरच्या मेखलेची उपमा दिलेली आहे.किंवा आकाशगंगा म्हणजे जणू काही निशेच्या कटीवरची मेखलाच भासे, असा उत्प्रेक्षा अलंकारही यात आहे.

लपेटूनिया भवती दाही दिशा या काव्यपंक्तीत साधलेला श्लेष अलंकार फारच बहारदार आहे.

एका अर्थी या काळ्या निशेने दाही दिशांचे हे उंची, भरजरी वस्त्र प्रियकराला रिझवण्यासाठी लपेटलेले आहे तर दुसऱ्या अर्थी दाही दिशांचे वस्त्र म्हणजे दिक् + अंबर म्हणजे दिगंबर.  प्रियकराला रिझविण्यासाठी सज्ज झालेली निशा ही दिगंबरावस्थेत आहे.  विवस्त्र आहे आणि या विवस्त्रतेत तिचे समर्पण आहे.   दिशारुपी वस्त्रातला हा श्र्लेष अलंकार थक्क करणारा आहे.  कवीच्या अफाट कल्पनाशक्तीला,दृष्यात्मक प्रतिभेला(visualisation)  दाद द्यावी तितकी थोडीच आहे.

रात्र काळी— निशानाथ भाळी— किती कौतुकाने मिरवी झळाळी या काव्यपंक्तीतला अनुप्रासही अत्यंत लयकारी आहे.  तसेच शोभे— लाभे, भाळी— झळाळी ही स्वरयमके गीताला गेयता देतात.  गीतातल्या ध्रुवपदाशी जुळणारी नशा— दिशा— वसा ही यमकेही सुरेख आणि सहज आहेत. गीताला एक अंगभूत चाल देणारी आहेत. शिवाय या शृंगारिक रात्रीचं एक प्रकारे सुरेख वर्णनच या काव्यात केलेले आहे.  स्वभावोक्तीची ही झलक फारच काव्यात्मक आणि सुंदर आहे.

हे गीत वाचताना सहजच म्हणा अथवा चोरटेपणाने म्हणा उगीचच पर्यायोक्ती अलंकाराचा अविष्कार ही जाणवतो. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे आडवळणाने किंवा मिस्कीलपणे सांगितलेली गोष्ट . यात अशी कुठली दडलेली गोड गोष्ट आहे की जी कवीला सांगायची आहे?  कवी राजांची माफी मागून अथवा परवानगी गृहीत धरूनच लिहिते, न जाणो या रजनी— शशांकची ही प्रणय घटिका म्हणजे कवीचा स्वतःचाच  काव्यात्मक आधार घेऊन व्यक्त केलेला मधुर अनुभव असेल का?  कारण काव्य हे अनुभूतीतून आणि संवेदनशील मनातूनच प्रसवतं. म्हणून या काव्यात परानुभूतीपेक्षा स्वानुभूतीही जाणवते.   कारण निशा, रजनीकांत हे गीतातले शब्द थोडेसे वैयक्तिक वाटले मला.  कवीच्या नावाशी साधर्म्य साधणारे.  असो अतिरंजीतपणा नको आणि उगीच विनोदही नको.

या पलीकडे जाऊन एकच म्हणेन की शृंगार रसाचे सौंदर्य खुलवणारं, अलंकारिक पण बोजड नसलेलं हे काव्य आहे. उत्तान आणि सात्विक शृंगाराची ही सुरेख सरमिसळ आहे. म्हणून अश्लीलता अजिबात नाही. वाचक अगदी त्रयस्थपणे  कोमल, अत्यंत हळुवार, अलवार, सुंदर प्रणय भावनेच्या प्रवाहात सहजपणे तरंगत राहतो आणि हेच या काव्याचे परमोच्च यश आहे.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जेजुरीच्या खंडेराया… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

जेजुरीच्या खंडेराया… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

सूडाचा अग्नी कसा विझवायाचा सांग रे

मत्सराचा कंद कसा उपटायाचा सांग रे

आनंदाने जगायची रीत भली दाव रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

‘येळकोट येळकोट’ व्हावा सदा गजर

श्रद्धेचा अन् मुक्तीचा मनी व्हावा जागर

‘मी’पणाचा छंद आता मोडूनी काढ रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

बिल्वपत्र वाहूनी , भंडाराही उधळू रे

षड् रिपूतून मुक्ती होता जगणे सोने होई रे

सोनेरी या जगण्याची गोडी तूच दाव रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

मणीमल्लांपासूनी तारिशी तू अवनी

सत्यधर्मारक्षण्या तू अधर्मा संहारीले

भक्तांसाठी नाना रूपे तूची साकारीले

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

 

नरजन्मा सार्थककरण्या मार्ग मला दाव रे

चरणी तुझ्या आले आता तूची मज उद्धार रे

हे जेजुरीच्या खंडेराया दर्शनाला पाव रे ||

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सा  ध  ना ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ सा  ध  ना ! 🩷 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

करा आसनस्थ होऊनी

ॐकाराची ध्यानधारणा,

आजार जाती पळूनी

म्हणती त्या योग साधना !

राहून गुरुकुलात चेले

करती तपश्चर्या रागांची,

गुरुविण कोण दावी वाट

तयांना गान साधनेची ?

वेचून आपले आयुष्य

देती ज्ञान यज्ञा चेतना,

होऊन गेले ज्ञानमहर्षी

ती होती ज्ञान साधना !

वनात करूनी वसती

देवांची करती आराधना,

ऋषि मुनी शिकवून गेले

जी होती तप साधना !

अखंड करूनी वाचन

सोसून कधी आलोचना,

लेखक, कवी करी लेखन

तीच त्याची शब्द साधना !

तीच त्याची शब्द साधना !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “अस्तित्वाचा जागर…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “अस्तित्वाचा जागर…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

अथांग सागर भवताली

त्यात झोपडी इवली इवली

वाटेवरूनी चालत जावे

वाटे आत्ता याच पाऊली

मन आवरू कशास अवखळ

मिठीत घ्यावे सागर वादळ

आधाराला असेल ना तो 

सागरात एखादा कातळ

 पाय रोवूनी कातळावरी

 विश्वासाने उभे रहावे

 गाजेच्या संगीतासह अन 

 अंगावरती मुरवून  घ्यावे

  संगीतासह गाजचैतन्य

  मुरता देही..  देहच सागर

  चैतन्यमय त्या लाटा ,पाणी,  

  अस्तिवाचा पुरता जागर

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माऊली… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ माऊली… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

ज्ञानियांचा राजा | चैतन्याची पूजा |

कैवल्याच्या तेजा | प्रकाशितो ||१||

रेड्याच्या  मुखात | वेद वदवित |

तम उजळीत | अज्ञानाचा ||२||

ज्ञानेशाची ओवी | अनुभव घ्यावी |

भक्तिमार्ग दावी | संसारात ||३||

गीता सांगे लोका | ज्ञानयज्ञ करी |

सांगे ज्ञानेश्वरी | प्राकृतात ||४||

संतांचा प्रेरक | एकच साधक |

ज्ञानाचा दीपक | ज्ञानदेव ||५||

विश्वकल्याणास | मानियले खास |

पसायदानास | मागितले ||६||

ज्ञानोबा माऊली | महान उपाधी |

घेतली समाधी | संजीवन ||७||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 180 – विद्याधन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 180 – विद्याधन ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

जगी तरण्या साधन

असे एक विद्याधन।

कण कण जमवू या

अहंकार विसरून ।

सारे सोडून विकार

करू गुरूचा आदर।

सान थोर चराचर।

रूपं गुरूचे हजार ।

चिकाटीने धावे गाडी

आळसाची फोडू कोंडी।

सादा जिभेवर गोडी।

बरी नसे मनी आडी।

घरू ज्ञानीयांचा संग

सारे होऊन निःसंग।

दंग चिंतन मननी

भरू जीवनात रंग ।

ग्रंथ भांडार आपार

लुटू ज्ञानाचे कोठार।

चर्चा संवाद घडता

येई विचारांना धार।

वृद्धी होईल वाटता

अशी ज्ञानाची शिदोरी।

नका लपवू हो विद्या

वृत्ती असे ही अघोरी।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ घर असावे घरासारखे… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे. 

असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना? 

मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?

तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो. 

मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते. 

तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची

☆ ते माझे घर…. ☆

ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।

आजी आजोबा वडील आई

लेकरांसवे कुशीत घेई

आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।

कुठेहि जावे हृदयी असते

ओढ लावते, वाट पाहते,

प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।

भिंती खिडक्या दारे नच घर

छप्पर सुंदर तेही नच घर

माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।

परस्परांना जाणत जाणत

मी माझे हे विसरत, विसरत

समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।

मन मुरडावे, जुळते घ्यावे

सुख दुःखाना वाटुन घ्यावे

भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।

ज्योत दिव्याची मंद तेवते

शुभं करोति संथ चालते

श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।

बलसंपादन गुणसंवर्धन

धार्मिकतेची सोपी शिकवण

अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।

– श्रीराम बाळकृष्ण आठवले

आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती. 

याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा. 

तिने घरासाठी लागणार्‍या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला. 

घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील  राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे. 

त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.

आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे. 

घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.

मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते. 

दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?

आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते. 

मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून? 

मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?

घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?

शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी  नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्‍याला त्याची बाधा होणारच ना?

उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड,  असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?

आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?

प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली. 

घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची  वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 200 ☆ कैवल्याचे निजधाम ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 200 – विजय साहित्य ?

कैवल्याचे निजधाम ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

संजीवन समाधीचा

अनुपम्य हा‌ सोहळा

माउलींच्या भेटीसाठी

सजलासे भक्त मळा. १

 

बाबा हैबत पायरी

आद्य पूजनाचा‌ मान

महा नैवेद्य प्रसाद

पुण्य‌ संचिताची खाण. २

 

पंच उपचार पूजा

पुष्पवृष्टी रथोत्सव

चल पादुकांची पूजा

संजीवक महोत्सव. ३

 

पवमान अभिषेक

महापूजा दुधारती

दिंडी, काकडा भजन

घंटानाद धुपारती. ४

 

नित्य पालखी छबिना

होई माऊलींचा भास

प्रवचन कीर्तनाला

साथ भारुडाची खास. ५

 

विठू‌ येई भेटायला

भक्तराज ज्ञानियासी

गहिवरे इंद्रायणी

शब्द नाही वर्णायासी. ६

 

छाया अजान वृक्षाची

संजीवन‌ समाधीला

साक्ष सुवर्ण पिंपळ

बीज प्रसार घडीला. ७

 

ज्ञानवृक्ष देववृक्ष

येई भक्तांचिया काजा

करी सेवा संवर्धन

ज्ञानियांचा ज्ञानराजा .८

 

कार्तिकाची एकादशी 

होई आळंदीची वारी

संजीवन समाधीचा

महोत्सव मनोहारी.९

 

संजीवन सोहळ्यात

टाळ लागती टाळाला

संकीर्तंनी भजनात

नाद भिडे आभाळाला. १०

 

आळंदीत कार्तिकात

सप्त‌ शतकांची चाल

आला विठ्ठल भेटीला

त्रयोदशी पुण्यकाल. ११

 

माउलींचा साक्षात्कार

काया‌ वाचा जपनाम

माउलींचा जयघोष

कैवल्याचे निजधाम.१२

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नर्तकी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ नर्तकी… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

कोण नर्तकी गिरक्या घेत

फिरत राहते युगानुयुगे

तिच्या वरती लुब्ध होऊनी

कितीक लागले तिच्या मागे॥

भान नाही तिजला स्वत:चे

दिनरात्र फिरणे थांबत नाही

ती पण नाचते प्रियकरासाठी

त्याला तिची परी पर्वा नाही॥

प्रियकर तिचा अष्टौप्रहर

काम करितो दुसर्‍यांसाठी

याच गुणामुळे ना रूष्टते ती

पण सदा असते त्याच्या पाठी ॥

त्या नृत्यावर सृष्टी फिदा

तिच्या अंकावरीच नांदे

पृथ्वीच्या या नवख्या नृत्यात

चराचर सारे रंगे

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

अर्जुन उवाच 

ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन । 

तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ १ ॥ 

कथित अर्जुन 

कर्मापेक्षा श्रेष्ठ ज्ञान कथिसी जनार्दना

घोरकर्म आचरण्या उद्युक्त का करिशी कृष्णा ॥१॥

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे । 

तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ २ ॥ 

तुमच्या या वाणीने झाली भ्रमित माझी मती

कल्याणकारक आता सांगा मजला निश्चित युक्ती ॥२॥

श्रीभगवानुवाच

लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ । 

ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३ ॥ 

कथित भगवान

विश्वामध्ये निष्ठा असते दोन प्रकाराची

ज्ञानयोगे सांख्ययोग कर्मयोगे निष्ठा योग्यांची ॥३॥

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते । 

न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ४ ॥ 

ना आचरता कर्म निष्कर्मता ना होई प्राप्त

त्यागाने कर्माच्या केवळ सिद्धी ना होई प्राप्त ॥४॥

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ । 

कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ५ ॥ 

सृष्टीने सकलांना दिधले गुण जीवन जगण्या कर्मी

क्षणमात्र ना जीवनात कोणी राहू शके अकर्मी ॥५॥

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ । 

इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ६ ॥ 

मूढ करितो जरी आपला इंद्रियसंयम

मनी तयाच्या सदैव जागृत विषयचिंतन ॥६॥

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन । 

कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ७ ॥ 

अनासक्त होऊनी मनाने इंद्रिय नियमन

श्रेष्ठ पार्था रे ते निश्चित कर्मयोगआचरण ॥७॥

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः । 

शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥८ ॥ 

शास्त्रविहित तू कर्म करावे राहून अकर्मी मनी 

देहाचा निर्वाह न सिद्ध होतो अकर्मी राहूनी ॥८॥

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । 

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर ॥ ९ ॥ 

यज्ञार्थ व्यतिरिक्त कर्मांने मनुजा कर्मबंधन

सोडुनिया फलाशा तू करी कर्म आचरण ॥९॥

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः । 

अनेन प्रसविष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक्‌ ॥ १० ॥ 

कल्पारंभी प्रजापतीने यज्ञासवे प्रजा निर्मिली

मनोरथांची पूर्ती होईल यज्ञाची महती सांगितली ॥१०॥

– क्रमशः भाग तिसरा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares