मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सावित्रीबाई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

☆ सावित्रीबाई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

ज्योती ‘बा’ समान झाले

माय ही सावित्रीबाई

ज्योती झाली शिक्षणाची

जगी मोठी क्रांती होई ||

पद शिक्षण पथीचे

सोपे नव्हते कदापि

पद क्रांतीचे गायिले

महिलांनी हो तथापि ||

पुसा प्रश्न कोणालाही

तिचा त्याग धैर्य कळे

पुसा अज्ञानाचा शाप

चाखा स्त्री कर्तृत्व फळे ||

ठेव वर्तन संयमी

होईल ईप्सीत साध्य

ठेव मनात सावित्री

साई समान आराध्य ||

सावित्री ही ज्ञानगंगा

सर्व जगात वहाते

सावित्री नाव हे सार्थ

कृतीतूनच बोलते ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ शब्दांचा… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ शब्दांचा☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

शब्दांचाच खेळ शब्दांच्याच संगे

शब्दांच्या प्रवाही जीव हा तरंगे

शब्दांच्या अंगणी शब्दांचे चांदणे

शब्दांचा बहर मनात फुलणे

शब्दरुपी धन शब्द  हे जीवन

शब्दांचेच मग मिळो मज दान

शब्दांचा संसार शब्दांचा व्यापार

शब्दांचा आचार शब्दांचा विकार

निःशब्द  का झाले जर माझे शब्द

होईल हे माझे जीवन ही स्तब्ध

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 203 ☆ दिव्य मात्रा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 203 – विजय साहित्य ?

☆ दिव्य मात्रा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

(काव्यप्रकार = अष्टाक्षरी रचना)

केले नारीला‌ साक्षर

दिली हाती धुळपाटी

ज्योतिबाची साऊ लढे

महिलांच्या हक्कांसाठी..! १

साऊ साक्षर होऊनी

शोधू लागे निरक्षर

कर्मठांच्या विरोधात

करी महिला साक्षर…! २

विधवांच्या बंधनांचा

दूर केला अभिशाप

समतेची चळवळ

दूर करी भवताप..! ३

रूढी जाचक अन्यायी

दिला जोरदार लढा

व्हावी‌ सक्षम अबला

गिरविला नवा धडा..! ४

ध्येयवादी पुरोगामी

सावित्रीची चळवळ

आंदोलन प्रबोधन

व्यक्त झाली कळकळ..! ५

क्रांती ज्योत शिक्षणाची

ध्येय बंधुता समता

काव्य फुले गृहिणीची

नारी विकास क्षमता…! ६

साऊ अशी, साऊ तशी

ज्योतिबांची क्रांती यात्रा

देण्या प्रकाश झिजली

ज्ञानदायी दिव्य मात्रा…! ७

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्षाचे स्वागत ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

? कवितेचा उत्सव ?

🍁 नववर्षाचे स्वागत🍁 सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

ऋतू मागूनी ऋतू हे येतील

रोज नव्याची ओळख देती

नववर्षाच्या प्रथम दिनाची

हर्षभराने महती गातीला ||

   

पूर्व दिशेला क्षितिजा वरती

केशर रंगी शिंपण होईल

नव्या दिशेसह नव आशेची

सूर्यकिरणे देतील चाहूल ||

 

मनामनांच्या तिमिरामधले

दूर सारुनी सगळे वादळ

आज सुंदर आणि शुभंकर

आपण सारे उचलू पाऊल ||

 

मिळूनी आपण एक दिलाने

नववर्षाचे स्वागत करूया

आयुष्याच्या या वळणावरती

कला गुणांचा आस्वाद घेऊया ||

 

हास्यांची जमवू मैफिल

निरामय हे जीवन होईल

स्मरण ठेवू या परमेशाचे

नववर्ष हे सुखमय होईल ||

प्रस्तुती – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य # 183 ☆ आठवण… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 183 ☆ आठवण☆ श्री सुजित कदम ☆

किती सांभाळावे स्वतःला कळत नाही

तुला आठवण हल्ली माझी येत नाही…!

तू येशील असे मला रोज वाटते बस्

तुला भेटण्याची ओढ जगू ही देत नाही…!

मी लपवून ठेवतो तुझ्या आठवणींचा पसारा

हे हसणे ही वरवरचे कितीदा रडू देत नाही…!

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ विठू भेट… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?️?  चित्रकाव्य  ?️?

? विठू भेट… ? सुश्री वर्षा बालगोपाल 

सगळ्या वीटा गोळा केल्या

उचलूनी त्या डोई घेतल्या

जाहला असेल पदस्पर्श ज्याला

खुणा तयाच्या का पुसोनी गेल्या ||

नाही जमत येणे पंढरपूरी

सल हीच होती माझ्या उरी

तुझ्या भेटीची आस अधूरी

वीट रूपाने होईल पुरी ||

विठुराया नाही खेद उरला

माझ्या भेटीला तू वीट रूपे आला

सेवा कुटुंबा साठी जनता जनार्दनाची

हा पुंडलिक भाव तुला भावला ||

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 211 ☆ आनंदी आनंद गडे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 211 ?

आनंदी आनंद गडे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

या वर्षाअखेर ठरवलं आम्ही भावंडांनी

थर्टी फर्स्टला भेटायचं,

 

गेली काही वर्षे,

एका वेगळ्याच मैत्रीणींच्या

ग्रुप मधे,

करायचे साजरा हा आनंदोत्सव!

 

तेवीस साल सरता सरता,

 नात्यातले,

“अनिल- सुनील”

अचानक निघून गेले,

आणि मन धसकलं,

आपल्याहून लहान असलेले निघून गेले !

 

पुढील वर्षा अखेर आपण

असू ,नसू!

 

ए जिंदगी के मेले,

दुनिया में कम न होंगे….

अफसोस हम न होंगे

 

हे तर अंतिम सत्य…..

सत्तरी जवळ आली आणि,

तब्येतीच्या तक्रारी सुरू……

लागोपाठ दोघांनाही

 थंडीतली दुखणी,

नवरा गावाला आणि

मी दिवसभर दुखण्यानं आडवी !

गावावरून आल्यावर

 “आता माझी पाळी” म्हणत,

नवराही आडवा– अर्थात कुरबुरी किरकोळच!

 

पण बाईचं दुखणं गौण

आणि बाप्याचं मोठंच

असतं नेहमी !

 

दुखणं झटकून बाहेर पडले

 सकाळी,

मैत्रीणींच्या घोळक्यात,

संध्याकाळी ,

तळ्यात मळ्यात करता करता ,

माहेरच्या गोतावळ्यात!

आपल्या आयुष्याच्या

प्रत्येक क्षणावर , लिहिलेलं

असतं जणू….

आज जगायचं….रडे..रडे…..कि

आनंदी आनंद गडे!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवीन हे वर्ष  सुखाचे जावो… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ नवीन हे वर्ष सुखाचे जावो!… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

वर्ष नवे घेऊन येवो,मनीमानसी हर्ष, 

दुःख, काळजी, चिंता, सारी राहावी अस्पर्श!

 जरी हरवले अमूल्य काही, विसरू या ते सर्व,

 हाती गवसले जे जे काही, मानू त्याचा हर्ष!

रूसवे-फुगवे, हेवेदावे, चला फुंकुनी टाकू,

उरले-सुरले जीवन कितीसे? आनंदाने जगू!

पैसा-अडका भोग-साधने, स्पर्धा- ईर्षा विसरू,

माणुसकीचे, आनंदाचे, बीज मनी या पेरू!

स्वागत करूया नववर्षाचे, संकल्प करू उत्कर्षाचे,

एकजुटीने, सहकार्याने, आव्हान पेलू लक्ष्य पूर्तीचे!

असो वर्ष इंग्रजी /मराठी, किंतु मनी ना आणू,

चला मंडळी आयुष्याचे, गीत सुरीले गाऊ!

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जुने आणि नवे… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

जुने आणि नवे… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

जाणारे जुने असते

येणारे नाविन्यानी नटते

तारीख, वार ,महिने

आपल्या क्रमानेच येत असतात

येणाऱ्या दिवसाला मात्र

लेबल काळाचं लावून जातात

पलटलेल्या पानासोबत

काळ पुढे सरकत राहतो

बघता बघता नाही कळत

वर्षाचा शेवट कधी येतो

नव्या वर्षांच्या स्वागताला

एका रात्रीचा जल्लोष होतो

कधी श्वास मुठीत घेऊन

तर कधी कष्टात झिजून

कधी दु:खात, कधी सुखात

वर्षातला प्रत्येक दिवस

दिवसातला क्षण क्षण जगला जातो

आणि किती सहजतेने  त्याला

आपण टाटा ,बाय-बाय करतो

जुनं  कॅलेंडर उतरून ठेवून

भिंतीवरती नवे टांगतो

खरोखर इतके का सोपे असते

जुन्याला सहज घालवणे

नव्याला सहजतेने  स्विकारणे

काळजातला अंधार मिटवून

आणि सुंदर पहाटेला जागवणे

तितकेच सोपे झाले नसते का

आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक

घटका, दिवस, वार,महिने यांना

तितक्याच सुंदरतेने नटविणे

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवीन वर्ष… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ नवीन वर्ष… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नवीन दिवस, नवीन वर्ष ,

कालचक्रातील पुढची आरी !

कितीक गेल्या फिरत फिरत,

आत्ताची ही आहे न्यारी !….१

काळाच्या गतीतील एक वर्ष,

देऊन गेले कितीक गोष्टी ,

जगण्यासाठी समृद्ध अनुभव,

बांधला गेला अपुल्या गाठी !…२

रहाटगाडगे कालचक्राचे,

विश्वामध्ये फिरत रहाते !

प्रत्येक पोहरा भरून येतो,

अनुभव त्याचे करित रिते !….३

कालचक्रावर असतो आपण,

एक अस्तित्व ते बिंदू मात्र ‌!

त्या बिंदू चे नाते असते,

परमात्म्याशी परम पवित्र!….४

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print