मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (दुसरा माळ) – १५६३२ फुट उंच पहाडावरची पहिली हिमदुर्गा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

सियाचिन….जगाचं जणू छतच. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली युद्धभूमी आहे ही. आणि ह्या बर्फाच्या साम्राज्यावर आपले पाय रोवून उभे राहण्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आपल्या सैनिकांना. शून्याच्या खाली साठ सत्तर अंश तापमानापर्यंत खाली घसरणारा पारा जगणं हीच मोठी लढाई बनवून टाकतो. एवढं असूनही आपले जवान इथे रात्रंदिवस पहा-यावर सज्ज असतात. यासाठी गरजेची असणारी शारीरिक, मानसिक क्षमता केवळ पुरूषांमध्येच असू शकते, असं वाटणं अगदी साहजिकच आहे. परंतू या समजुतीला खरा छेद दिला तो राजस्थानच्या उष्ण प्रदेशात जन्मलेल्या एका दुर्गेनं…  तिचं नाव शिवा चौहान…अर्थात आताच्या कॅप्टन शिवा चौहान मॅडम. 

१८ जुलै १९९७ रोजी राजस्थानच्या उदयपूरमध्ये जन्मलेल्या शिवाचे तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पितृछत्र हरपले.  राजेंदसिंह चौहान हे त्यांचं नाव. आईने, अंजली चौहान यांनी मग तिच्या आयुष्याची दोरी आपल्या हाती घेतली. घरात त्या तिघी. तिची मोठी बहिण कायद्याचं शिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आणि शिवा मात्र चक्क सैन्यात जाण्याच्या जिद्दीने पेटून उठलेली. पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचा विचारच मुळात मोठ्या हिंमतीचा म्हणावा लागतो. शिवाने सिविल इंजिनियरींगमधली पदवी मिळवली ती केवळ सैन्यात जाण्यासाठीच.

सैन्यात भरती होण्याच्या कठीण मुलाखतीच्या दिव्यातून शिवा प्रथम क्रमांकाने पार पडल्या, यातूनच त्यांच्या मनातली प्रखर जिद्द दिसून यावी. २०२० मध्ये त्यांनी चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवला आणि पुरुषांच्या बरोबरीने कठीण शारीरिक परीक्षा उत्तीर्ण झाल्या. पुढच्याच वर्षी त्यांना भारतीय सैन्याच्या अभियांत्रिकी रेजिमेंटमध्ये नेमणूक मिळाली. 

त्यांच्या विभागाचं नावच आहे ‘ फायर अ‍ॅन्ड फ्यूरी सॅपर्स ‘ ….अर्थात ‘ अग्नि-प्रक्षोप पथक.’ .हरत-हेच्या वातावरणात सैन्यासाठी अहोरात्र कार्यरत असणारा विभाग. मागील दोन वर्षांपूर्वी चीनी सीमेवर गलवान खो-यात झालेल्या रक्तरंजित संघर्षात भीष्मपराक्रम गाजवलेले कर्नल संतोष बाबू याच विभागाचे शूर अधिकारी होते…त्यांना मरणोत्तर महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते. सैन्य म्हणजे केवळ हाती बंदूक घेऊन गोळीबार करणे नव्हे…सैन्याला अनेक विभाग मदत करीत असतात…अभियांत्रिकी विभाग यात खूप महत्वाचा असतो. आपल्या कथानायिका कॅप्टन शिवा चौहान याच फायर अ‍ॅन्ड फ्यूरीच्या अधिकारी.   

Spade म्हणजे फावडे. याचेच फ्रेंच भाषेतील अपभ्रंशित नाव आहे Sappe…सॅपं ! त्या काळातील युद्धात किल्ले महत्त्वाचे होते. किल्ल्यांवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्या भिंतींच्या अधिकाधिक जवळ जाणे गरजेचे असे. अशा वेळी त्यावेळचे अभियंते वरून झाकले जातील असे खंदक खणत आणि मग सैन्य त्या खंदकांतून पुढे पुढे सरकत जाऊन किल्ल्याच्या समीप जाई. यावरून सैन्यात सॅपर ही संज्ञा रूढ झाली ती आजपर्यंत. 

आधुनिक काळात या सॅपर्सचं अर्थात अभियांत्रिकी सैनिकांचं मुख्य काम असतं ते सैन्याला पुढे जाता यावं म्हणून रस्ते बांधणे, पूल बांधणं, भूसुरुंग पेरणं आणि शत्रूने पेरलेले भूसुरुंग शोधून ते नष्ट करणं. या कामांमध्ये अतिशय उच्च दर्जाची तांत्रिक क्षमता आणि अनुभव गरजेचा असतो. आपल्या सैन्यात बॉम्बे सॅपर्स, मद्रास सॅपर्स असे अन्य अभियांत्रिकी विभाग कार्यरत आहेत. 

कॅप्टन शिवा चौहान यांनी अगदी कमी कालावधीत अतिशय कर्तव्यतत्पर आणि शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम अधिकारी म्हणून लौकिक प्राप्त केला. उंच बर्फाळ पहाड चढून जाणे, इतक्या उंचीवर अभियांत्रिकी कामांना अंतिम स्वरूप देणे, इत्यादी कामांत त्या वाकबगार झाल्या. त्यांच्या आधी महिला अधिका-यांना सियाचिन मधल्या १५६३२ फुटांवरील युद्धभूमीच्या खालील ९००० हजार फूट उंचीवर असलेल्या बेस कॅम्पपर्यंतच नेमणूक दिली जाई. उरलेली ६६३२ फूट उंची पार करणं तोपर्यंत एकाही महिलेला शक्य झालं नव्हतं…..  पण शिवा चौहान यांनी खडतर प्रशिक्षणं लीलया पार पाडली. सियाचिन भागात सायकल चालवणारी महिला हे दृश्यच अनेकांना कौतुकाने तोंडात बोट घालायला भाग पाडणारे होते. शिवा चौहान यांनी चक्क ५०८ किलोमीटर अंतर कापणारी सायकल मोहीम हाती घेतली आणि पूर्णही करून दाखवली. कारगिल विजय दिनानिमित्त त्यांनी ही अनोखी मोहिम यशस्वी केली. सियाचिन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक, अशी ही सायकल यात्रा कॅप्टन शिवा चौहान यांनी इतर पुरूष अधिकारी, सैनिक यांचे नेतृत्व करून पूर्ण केली, त्यामुळे त्यांच्या क्षमतेबद्द्ल कुणाच्याही मनात शंका उरली नाही. 

आणि यानंतर मात्र शिवा चौहान यांनी आणखी ६६६३२ फूट उंचीवर जाण्याचा चंग बांधला…प्रचंड कष्ट घेऊन आवश्यक ती सर्व प्रशिक्षणं पूर्ण केली आणि जानेवारी २०२३ मध्ये त्यांना भारतीय सैन्यातील पहिली महिला अधिकारी म्हणून सियाचिनवर प्रत्यक्ष कामावर नेमण्यात आले…एका महिलेसाठी हा एक प्रचंड मोठा सन्मान मानला जावा! 

सैनिक हिमवीरांच्या मधोमध मोठ्या अभिमानाने बसलेल्या कॅप्टन शिवा चौहान ह्या नारीशक्तीच्या प्रतीकच आहेत. त्यांच्यापासून समस्त तरुण वर्ग निश्चितच प्रेरणा घेईल. भगवान शिवाचं वास्तव्य असलेल्या हिमाच्छादित पर्वत शिखरांवर शिवा नावाची पार्वतीच जणू भारतमातेच्या रक्षणासाठी बर्फात पाय रोवून उभी आहे ! 

नवरात्राच्या दुस-या माळेच्या निमित्ताने …..  कॅप्टन शिवा चौहान आपणांस अभिमानाने सल्यूट…जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया ! — पहिली माळ ☆ श्री संभाजी बबन गायके  

मला पाहून ती थबकली….जागच्या जागी खिळून राहिली जणू ! अजून अंगाची हळदही न निघालेली ती….दोन्ही हातातील हिरव्या बांगड्या सुमधूर किणकिणताहेत. केसांमध्ये कुंकू अजूनही ताजंच दिसतं आहे. तळहातावरील मेहंदी जणू आज सकाळीच तर रेखली आहे…तळहातांचा वास घेतला तर मेहंदीच्या पानावर अजूनही झुलणारं तिचं मन दिसू लागेल… तिनं केसांत गजराही माळलेला आहे….तिच्या भोवती सुगंधाची पखरण करीत जाणारा. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिचं लक्ष आधी माझ्या कपाळाकडे आणि नंतर आपसूकच गळ्याकडे गेलं….बांगड्या फोडल्या गेल्या त्यावेळी हातांवर झालेल्या जखमांचे व्रण तिच्या नजरेतून सुटले नाहीत….आणि तिच्या चेह-यावरच्या रेषा सैरावैरा होऊन धावू लागल्या….एकमेकींत मिसळून गेल्या….एक अनामिक कल्लोळ माजला तिच्या चेह-यावर ! 

ती शब्दांतून काहीही बोलली नसली तरी तिची नजर उच्चरवाने विचारत होती….. ही अशी कशी माझ्या वाटेत येऊ शकते? खरं तर हिने असं माझ्यासारखीच्या समोर येऊच नये….उगाच अपशकुन होतो. मी सौभाग्यकांक्षिणी होते आणि आता सौभाग्यवती….सौभाग्याची अखंडित कांक्षा मनात बाळगून असणारी! सौभाग्याची सगळी लक्षणं अंगावर ल्यायलेली. कपाळी कुंकू, नाकात नथ, कानांत कुड्या, दोन्ही हातांत हिरवा चुडा, बांगड्यांच्या मध्ये सोन्याच्या बांगड्या, बोटांत अंगठ्या, केसांमध्ये कुंकवाची रेघ, पायांत जोडवी आणि गळ्यात मंगळसूत्र….त्याचा आणि माझा जीव एका सूत्रात बांधून ठेवणारं मंगळसूत्र. आज घटस्थापनेचा मुहूर्त….आणि त्यात हिचं येणं…काहीच मेळ लागत नाही ! 

मी म्हणाले…तुझ्या कपाळाचं कुंकू माझ्या कुंकवानं राखलंय…माझ्या कपाळीचं पुसून. तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कायम रहावं म्हणून तो माझं मंगळसूत्र तोडून निघून गेलाय मला शेवटचही न भेटता. कडेवर खेळणा-या लेकात आणि माझ्या पोटात वाढणा-या बाळात त्याचा जीव अडकला नसेल का?  बहिणींच्या राख्या त्याला खुणावत नसतील का? दिवसभर कमाई करून दिवस मावळताच पाखरांसारखं घरट्यात येऊन सुखानं चार घास खाणं त्याला अशक्य थोडंच होतं..पण त्यानं निराळा मार्ग निवडला…हा मार्ग बरेचदा मरणाशी थांबतो. 

पण मीच कशी पांढ-या कपाळाची आणि पांढ-या पायांची? माझं कपाळ म्हणजे जणू माळरान आहे जन्म-मरणातील संघर्षाचं. इथं मैलोन्मैल काहीही नजरेस पडत नाही. रस्त्यात चिटपाखरू नाही आणि सावलीही. झळा आणि विरहाच्या कळा. मनाचं रमणं आणि मरणं….एका अक्षराचा तर फेरफार ! मन थोडावेळ रमतं आणि बराच वेळ मरतं.

मी सुद्धा अशीच जात होते की सुवासिनींच्या मेळ्यांमध्ये. एकमेकींची सौभाग्यं अखंडित रहावीत  म्हणून प्रत्येकीच्या कपाळी हरिद्रम-कुंकुम रेखीत होतेच की. मग आताच असं काय झालं? कपाळावरचा कुंकुम सूर्य मावळला म्हणून माझ्या वाटेला हा अंधार का? माझ्या कपाळी कुंकू नाही म्हणून का मी दुसरीला कुंकू लावायचं नाही? माझ्याही पोटी कान्हा जन्मलाय की….माझ्या पोटी त्यांची ही एक कायमची आठवण! मी कुणा गर्भार सुवासिनीची ओटी भरू शकत नाही. 

कुणाच्या मरणावर माझा काय जोरा? मरणारा कुणाचा तरी मुलगा,भाऊ,मामा,काका इत्यादी इत्यादी असतोच ना? मग त्याच्या मरणानं मी एकटीच कशी विधवा होते? नव-याच्या आईचा धनी जगात असेल तर तिला कुंकवाचा अधिकार आणि जिने आपले कुंकू देशासाठी उधळले तिच्या कपाळावर फारतर काळ्या अबीराचा टिपका? 

मूळात हा विचार कदाचित आपण बायकांनीच एकमेकींच्या माथी चिकटवलेला असावा, असं वाटतं. आता हा विचार खरवडून काढायची वेळ आलेली आहे…कपाळं रक्तबंबाळ होतील तरीही. मातृभूमीच्या रक्षणासाठी मरण पत्करणा-यांच्या आत्म्यांना अंतिमत: स्वर्ग देईन असं आश्वासन दिलंय भगवान श्रीकृष्णांनी. मग या आत्म्याच्या जीवलगांना देव अप्रतिष्ठेच्या,अपशकूनांच्या नरकात कसं ठेवील…विशेषत: त्याच्या पत्नीला? त्याच्या इतर नातलगांना हा शाप नाही बाधत मग जिने त्याचा संसार त्याच्या अनुपस्थितीत सांभाळला तिला वैधव्याच्या वेदना का? का जाणिव करून देतोय समाज तिला की तु सौभाग्याची नाहीस? सबंध समाजाचं सौभाग्य अबाधित राखण्यासाठी ज्याने सर्वोच्च बलिदान दिले त्याच्या सौभाग्याचं कुंकू असं मातीमोल करून टाकण्याचा अधिकार कुणी का घ्यावा आपल्या हाती?

उद्या पहिली माळ….जगदंबा उद्या युद्धाला आरंभ करेल…दानवांच्या रुधिराच्या थेंबांनी तिचं अवघं शरीर माखून जाईल आणि कपाळ रक्तिम..लाल दिसू लागेल. जगदंबा अखंड सौभाग्यवती आहे…कारण देवांना मृत्यूचा स्पर्श नसतो होत. मग तिच्या लेकींना तरी या पिवळ्या-लाल रंगाच्या रेखाटनाविना कशी ठेवेल ती? 

जगदंबेची लढाई तर केंव्हाच संपून गेली….दानव धुळीस मिळवले तिने. तिच्या देहावरील रक्त केंव्हाच ओघळून जमिनीत मुरून गेलंय. आता आपण अनुभवतो तो स्मरणाचा आणि राक्षसांच्या मरणाचा सोहळा. नवरात्र हे प्रतीक आहे त्या रणाचं. आया-बायांनो,बहिणींनो,सौभाग्यवतींनो..आजच्या पहिल्या माळेला तुम्ही किमान माझ्यासारखीच्या भाळावर तरी हळदी-कुंकवाची दोन बोटं उठवलीत ना तर हुतात्म्यांचे आत्मे तृप्त होतील, सीमेवर लढणारी इतरांची सौभाग्यं आणखी प्राणपणानं झुंजतील. कारण आपल्या माघारी आपल्या  नावाचं सौभाग्य पुसलं जाणार नाही ही जाणीव त्यांना प्रेरणा देत राहील.

स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवरायांनी जिजाऊ मांसाहेबांना शहाजीराजेसाहेबांच्या मागोमाग सती नाही जाऊ दिलं….त्यांच्या चितेच्या समोर हात पसरून उभं राहून त्यांनी आईसाहेबांना रोखून धरलं. राज्याभिषेकातल्या होमातील रक्षा जिजाऊंनी आपल्या कपाळी लावली. जिजाऊ राहिल्या म्हणूनच स्वराज्याच्या कपाळावर स्वातंत्र्याचा कुंकुमतिलक सजू शकला.शूर धुरंधराची स्वाभिमानी पत्नी आणि लाखो कपाळांवरील कुंकू टिकावं म्हणून जीवाचं रान करणा-या शूर सुपुत्राची माता म्हणून जिजाऊसाहेबांचा मान उभ्या महाराष्ट्राने राखला. असाच मान आजही हुतात्म्यांच्या पत्नींना,मातांना,लेकींना मिळावा हे मागणं फार नाही !  

आज मी निर्धारानेच आले आहे आईच्या गाभा-यात…तुम्हां भरल्या कपाळांच्या पावलांवर पाऊल टाकून. .. पण आज मी ठरवलं….देवीसमोर जाऊन तिच्याकडे आणखी काहीतरी मागायचं….एक आठवण आहे सौभाग्याची माझ्या पदरात..त्यांचा लेक….त्यालाही मातृभूमीच्या सेवेत धाडायचं ! 

*************************************  

रास्ते मे विधवा वीर-वधू को देख; 

एक नववधु ठिठक गई !

यह विधवा मेरे रस्ते में; 

क्यों आकर ऐसे अटक गई?

तुम यहां कहां चली ;आई हो भोली !

यह नववधुओं की तीज सखी; 

यह नहीं अभागन की टोली !

यह सुनकर वह वीर पत्नी बोली

मुझको अपशकुनी मत समझो 

मैं सहयोगिनी उसे सैनिक की; 

जो मातृभूमि को चूम गया !

तुम सब का सावन बना रहे; 

वो मेरा सावन भूल गया!

तुम सब की राखी और सुहाग; 

वो मंगलसूत्र से जोड़ गया !

तुम सब की चूड़ी खनकाने; 

वो मेरी चूड़ी तोड़ गया !

मेरी चुनरी के लाल रंग; 

वो ऐसे चुरा गया!

उनकी सारी लालिमा को; 

तुम्हारी चुनरी में सजा गया !

उनकी यादों की मंदिर में; 

मैं आज सजने आई हूं !

मेरा बेटा भी सैनिक हो; 

भगवान को मनाने आई हूं !

विधवा प्रथेला मूठमाती देण्याचा स्तुत्य उपक्रम काही सामाजिक संस्थांनी हाती घेतला आहे. सैनिक आणि त्यांच्या परिवारांसाठी कार्यरत असणा-या जयहिंद फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने हुतात्मा सैनिकांच्या शूर सौभाग्यवतींसाठी आणि इतर भगिनींसाठी विधवा प्रथेला मूठमाती देऊन वीरपत्नींना सन्मानित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यातीलच एका वीर सैनिक – वीर पत्नीची कहाणी वाचून हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. उपरोल्लेखित हिंदी कविता त्यांच्याच लेखात आहे. आज नवरात्रातली पहिली माळ….चला उजाड कपाळांवर सौभाग्याचा सूर्य रेखूया….जयहिंद ! 🇮🇳

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर 

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलाच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे.

भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे—

।।नभ: स्पृशं दीप्तम्।।

हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आलेले आहे. (भगवद्गीता ११.२४)

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन्  यांनी हे वाक्य सुचविले. त्याचा अर्थ असा आहे “हे! विष्णो, आकाशस्पर्शी ज्योती सारखा आणि अनेक वर्णयुक्त, उघड्या मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्राच्या तुला पाहून भयभीत झालेल्या माझ्यामध्ये धैर्य आणि शांती नाहीशी झाली आहे.”

थोडक्यात ज्या भयभीत झालेल्या अर्जुनातली वीरश्री जागृत करण्याचं काम भगवंताने केले त्याप्रमाणे वायुसैनिकांना हे घोषवाक्य लढण्यास प्रवृत्त करते.

८ ऑक्टोबर १९३२  रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली म्हणून ८ ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिन समजला जातो. सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. 

ब्रिटिशकालीन वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स असे होते (१२ मार्च १९४५). मात्र स्वातंत्र्यानंतर त्यातले रॉयल जाऊन भारतीय वायुसेना दल असे त्याचे नामकरण केले गेले. 

१९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. नंतर वेगवान जेट विमाने आली. नेट, हंटर कॅनबेरा यासारखे ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी झाली. परराष्ट्रीय धोरणानंतर रशियन हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल झाली. सध्याच्या काळात रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वाॅरफेअर सी —४—आय संगणकीय सुविधा वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूरस्थ शत्रूच्या विमानाची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरच्या शत्रूंच्या तळाचा शोध घेणारी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय वायुसेनेत सहभागी आहेत. येत्या काही वर्षात हवाई दलाच्या यादीत २२० एलसीए चा(L C A) ताफा असेल.त्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख मिग२९या लढाऊ विमानाचे पायलट  विवेक राम चौधरी हे  आहेत. ते  २७वे एअर चीफ मार्शल आहेत.(३० सप्टेंबर २०२१) ते नांदेडवासी आहेत.महाराष्ट्रासाठी ही गौरवशाली बाब आहे. 

वायुसेना दिनाच्या वेळी भारतीय हवाई दलाचे धाडसी वैमानिक लष्कराच्या विविध विमानांसह एक अप्रतिम एअर शो करतात. विशेष पराक्रम गाजवण्यार्‍या हवाईदल सैनिकांना सन्मानचिह्ने दिली जातात. यावर्षीचा हा ९१ वा वायुसेना वर्धापन दिन आहे. यावर्षीचा फ्लाय पास्ट उत्तर प्रदेश मधील सांस्कृतिक नगरी प्रयागराज इथे होणार आहे.

भारतीय वायुसेना म्हणजे भारताचा अभिमान आणि शान आहे. 

प्राणपणाने भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या या वायुसैनिकांना मानाचा मुजरा !!

वंदे भारत ! 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘सीडी’ देशमुख !– रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण पहिले भारतीय गव्हर्नर… लेखक : श्री संकेत कुलकर्णी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

सीडी’ देशमुख !– रिझर्व्ह बॅंकेचे सर्वात तरुण पहिले भारतीय गव्हर्नर… लेखक : श्री संकेत कुलकर्णी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

२ ऑक्टोबर. आज पुण्यतिथी आहे एका थोर माणसाची. ह्या माणसाचा जन्म १४ जानेवारी १८९६ चा – महाडजवळ ‘नाते’ गावात – हा माणूस १९१२ साली मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिक परिक्षेत पहिला आला (तीपण संस्कृतची ‘जगन्नाथ शंकरशेट’ शिष्यवृत्ती मिळवून!) – पुढे उच्च शिक्षणासाठी हा माणूस शिष्यवृत्ती घेऊन केंब्रिजला गेला – १९१५ साली त्याने वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आणि भूगर्भशास्त्र ह्या तिन्ही विषयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याची पदवी पूर्ण केली – १९१८ मध्ये वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी तो आयसीएस परिक्षेत चक्क पहिला आला – लोकमान्य टिळकांना भेटून त्यांच्याकडे ह्या माणसाने इच्छा व्यक्त केली की सरकारी नोकरी न करता त्याला देशकार्य करायची इच्छा आहे – पण लोकमान्यांनी त्याला सांगितले की ह्या नोकरीचा अनुभव स्वराज्यात कामी येईल – लोकमान्यांची ही विनंती शिरसावंद्य मानून ह्या माणसाने ही सरकारी नोकरी करायचे ठरवले – मध्य प्रांतात महसूल सचिव, वित्त सचिव अशी पदं भूषवली (ह्या पदांवर काम करणारा हा सर्वात तरूण आयसीएस अधिकारी होता!) – 

सुमारे २१ वर्ष ह्या माणसाने सरकारी नोकरी केली – १९३१ मध्ये गांधीजींबरोबर गोलमेज परिषदेला हा माणूस सचिव म्हणून गेला होता – १९४१ मध्ये तो रिझर्व्ह बॅंकेचा डेप्युटी गव्हर्नर बनला – ११ ऑगस्ट १९४३ रोजी बॅंकेचा गव्हर्नर जेम्स टेलरच्या मृत्यूनंतर हा माणूस रिझर्व्ह बॅंकेचा सर्वात तरूण आणि पहिला भारतीय गव्हर्नर बनला – दुसऱ्या महायुद्धाचे चटके जागतिक अर्थव्यवस्थेला बसत होते त्यावेळेस ह्या माणसाने योग्य उपाययोजना करून अर्थव्यवस्थेला योग्य प्रकारे हाताळले – ह्या कामाबद्दल २१ मार्च १९४४ रोजी ह्याला ब्रिटीश सरकारने ‘सर’ पदवीचा बहुमान दिला – बॅंकेच्या नोकरीत असतानाच भारतीय स्वातंत्र्याच्या संक्रमणकाळात हा माणूस व्हाईसरॉयज कौन्सिलवर वित्तप्रमुख म्हणून नेमला गेला – १९४९ मध्ये ह्या माणसाने बॅंकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा इंग्लंडमध्ये जायची तयारी केली होती (कारण १९२० मध्येच त्याने रोझिना विलकॉक्सशी लग्न केले होते आणि त्यांना १९२२ साली मुलगीही झाली होती – तिचं नाव प्रिमरोझ) – पण नेहरूंनी पुन्हा विनंती केल्याने ह्या माणसाने रिझर्व्ह बॅंकेची धुरा पुन्हा सांभाळली – 

१९५२ साली हा माणूस कुलाबा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढला आणि जिंकलाही (कारण तो ‘कॉंग्रेस’चा सदस्य कधीच नव्हता!) – ह्या माणसाला नेहरूंनी अर्थमंत्री बनवलं – भाषावार प्रांतरचनेच्या मुद्द्यावरून नाराज होऊन ह्या माणसाने पुढे राजीनामा दिला – त्यानंतरही ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ (युजीसी) चा पहिला अध्यक्ष म्हणून ह्याची नेमणूक झाली – शिक्षणक्षेत्रातही ह्या माणसाने भरपूर योगदान दिलं – आयुष्याच्या उत्तरार्धात हा माणूस हैदराबादला स्थायिक झाला आणि २ ऑक्टोबर १९८२ रोजी ह्याचं निधन झालं – हा माणूस म्हणजे सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख – उपाख्य ‘सीडी’ देशमुख !

त्यांच्या मृत्यूची फारशी दखलही भारतीय सरकारदरबारी घेतली गेली नाही. इतकी पदं भूषवलेल्या सीडींना साधी सरकारी मानवंदनाही मिळाली नाही. सीडींचे देशप्रेम मात्र निर्विवाद होते. आयुष्यभर देशासाठी ते झटले होते. आपली मूळ पाळंमुळं ते कधीच विसरले नव्हते. ह्याचं उदाहरण म्हणजे – सीडींनी इंग्लंडमध्ये एसेक्स परगण्यामध्ये ‘साऊथऐंड ऑन सी’ गावाजवळच्या ‘वेस्टक्लिफ ऑन सी’ गावात एक टुमदार बंगला बांधला होता आणि त्याचं नाव ठेवलं होतं ‘रोहा’ – कारण रायगड तालुक्यातलं रोहा हे सीडींचं मूळ गाव! रोह्याचं नाव इंग्लंडमध्ये ठेवणाऱ्या सीडींच्या जन्मगावात – महाडजवळ ‘नाते’ गावात – जिथे सीडींचा जन्म झाला होता – ते घर आजही बंद आणि पडझड झालेल्या अवस्थेत कसंबसं उभं आहे. देशभक्तांची आणि त्यांच्याशी निगडीत वास्तूंची अशी अनास्था करण्याची आपली सवयही तशी जुनीच आहे. हे चालायचंच !

आज ४१ व्या स्मृतीदिनी सर चिंतामणराव देशमुखांना सादर मानवंदना !

लेखक : श्री संकेत कुलकर्णी (लंडन)

(पहिला फोटो:  १९५२ साली एलिझाबेथ राणीच्या राज्यारोहणास गेलेल्या पाहुण्यात सीडी (सर्वात उजवीकडचे), इंग्रजी राजमुद्रा असणाऱ्या नोटेवर सीडींची गव्हर्नर म्हणून सही.) 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहिला – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग पहिला – (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।

न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे৷৷३१৷৷

न काङ्‍क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।

किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥

येषामर्थे काङक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।

त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ৷৷३३৷৷

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।

मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः संबंधिनस्तथा ॥३४॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।

अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ৷৷३५৷৷

निहत्य धार्तराष्ट्रान्न का प्रीतिः स्याज्जनार्दन ।

पापमेवाश्रयेदस्मान्‌ हत्वैतानाततायिनः৷৷३६৷৷

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान्‌ ।

स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥३७॥

यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।

कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे य पातकम् ॥३८॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम्‌ ।

कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ৷৷३९৷৷

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।

धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥

मराठी भावानुवाद !!!!!

सगे सोयरे माझे वधुनी काय व्हायचे कल्याण

मना माझिया खचित जाणवे कृष्णा हे अवलक्षण ॥३१॥

इच्छा नाही विजयाची नको भोगण्या राज्यसुख

स्वजनांचा करूनी निःपात नको राज्य ना आयुख ॥३२॥

ज्यांच्याकरिता राज्याकांक्षा आशा सुख भोगायाची

प्राण-धनाची इच्छा सोडुन उर्मी त्यांना लढण्याची ॥३३॥

गुरुजन पुत्र पितरांसह अमुचे पितामह

मातुल  श्वशुर पौत्र मेहुणे  सगे सोयरे सकल ॥३४॥

शस्त्र तयांनी जरी मारले यांना ना वधिन

त्रैलोक्याचे राज्य नको मज पृथ्वीचे शासन ॥३५॥

हत्या करुनी कौरवांची या काय भले होइल

स्वजना वधुनी अविवेकाने पाप मला लागेल ॥३६॥

नच वधीन मी या स्वजनांना कदापि हे माधवा

कुटिल जरी ते तयासि वधणे दुरापास्त तेधवा ॥३७॥

धार्तराष्ट्र्यांची बुद्धी नष्ट झाली मोहाने

कुलक्षयाचे द्रोहाचे पाप न त्यांच्या दृष्टीने ॥३८॥

कुलक्षयाचा दोष जाणतो आम्ही अंतर्यामी

विन्मुख खचित व्हावे ऐश्या पापापासुन आम्ही ॥३९॥

कुलक्षयाच्या नाशाने कुलधर्माचा हो अस्त

नाशाने धर्माच्या बुडते समस्त कुल अधर्मात ॥४०॥

– क्रमशः भाग पहिला 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘भाषांतर दिन’… लेखक – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘भाषांतरदिन…’ – अज्ञात ☆ सौ. गौरी गाडेकर

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून भारतातून फारसी भाषेचं महत्त्व कमी होत गेलं. पण त्यापूर्वीच भारतातील असंख्य ग्रंथांची भाषांतरं फारसीत झालेली होती. हीच भाषा होती जिच्यामुळे भारतीय भाषेतल्या साहित्याची मौलिकता पाश्चिमात्त्यांना कळली. ‘सिरीं-ए-अकबर’ या नावानं दारा शिकोहनं पासष्ट उपनिषदांचं फारसीत भाषांतर केलं होतं. त्याच्या प्रस्तावनेत तो म्हणतो, ” ही उपनिषदं म्हणजे अद्वैताची भांडारं होत. मी त्यात काहीही फेरबदल न करता शब्दशः भाषांतर केलं आहे.” 

‘सिरीं ए अकबर’ एका फ्रेंच प्रवाश्याच्या हातात पडलं. त्याचं नाव होतं आंकतिल द्युपेरां. त्यानं ते फ्रेंचमध्ये आणि लॅटिनमध्ये केलं. ते आर्थर शॉपेनहॉअरसारख्या लेखकाच्या हातात पडल्यावर तो आनंदानं वेडा झाला. 

दारा शिकोहनं बरीच पुस्तकं लिहिली. सूफी आणि हिंदू तत्त्वज्ञानातील सामायिकतेचा तो शोध होता. त्यानंच योगवसिष्ठ आणि प्रबोधचंद्रिकेचं भाषांतर केलं. तसेच भगवतगीतेचं भाषांतर ‘मज्मुअल बहरैन’ या नावानं केलं होतं. 

अकबरानं तर भाषांतरासाठी खातंच सुरु केलं होतं. त्याच्या काळात रामायणाची बरीच भाषांतरं झाली. अब्दुल कादर बदायुनी आणि नकीबखाननं केलेल्या भाषांतरांत चक्क मध्यपूर्वेतल्या दंतकथा आणि संदर्भही आले होते. ही भाषांतरं म्हणजे मूळ संहितेची पुनर्कथनं होती. याच काळात मुल्ला मसीह कैरानवीनं स्वतंत्रपणे रामायणाचं भाषांतर केलं. मुल्ला शेरी आणि नकीबखाननं महाभारताचं ‘रज्मनामा’ या शीर्षकानं भाषांतर केलं. ते जयपूरच्या संग्रहालयात पाहता येतं. बदायुनीनंनं सिंहासनबत्तिशी ‘नामां-ए-खिरद अफ़जा’ या नावानं फारसीत नेलं (१५७५). मुल्ला शेरीनं हरिवंशाचंही भाषांतर केलं होतं. बदायुनी, हाजी इब्राहिम आणि फैजी या तिघांनी मिळून अथर्ववेदाचं भाषांतर १५७६ साली केलं होतं. सगळ्यात रोचक म्हणजे यातला फैजी हा सर्जक कवी होता. त्याला नलदमयंती आख्यान अतिशय आवडलं होतं. सोळाव्या शतकाच्या अखेरीला (१५९५) त्यानं ते ‘नलदमयंती’ या नावानं भाषांतरित केलं. 

दक्षिणेत गोवळकोंड्याचा अकबरशहा (१६७२-८७) हा साहित्यप्रेमी होता. (तो गुलबर्ग्याचे संत बंदेनवाज गेसूदराज यांचा वंशज). त्याला तेलुगू, हिंदी, संस्कृत, पर्शिअन, दखनी या भाषा येत. त्यानं ‘शृंगारमंजिरी’ हा ग्रंथ लिहिला. त्यासाठी त्यानं रसमंजिरी, आमोद, परिमल, शृंगारतिलक, रसिकप्रिय, रसार्णव, प्रतापरुदीय, सुंदरशृंगार, दशरूपक या हिंदी-संस्कृत ग्रंथांचा आधार घेतला होता. मूळ ग्रंथ तेलुगूत लिहून त्यानं तो संस्कृतमध्ये नेला. त्याची प्रत तंजावरच्या म्युझियममध्ये पाहता येते. 

भारतात सोळाव्या-सतराव्या शतकांत हजारो फारसी ग्रंथ लिहिले गेले. त्यातल्या काही बखरी आहेत, राज्यकारभाराचे वृत्तांत आहेत. बादशहांची चरित्रं आहेत. प्रवासवर्णनं आहेत. पर्यावरण, औषधीविज्ञान, इतिहास, दास्तां असा त्यांचा विस्तार आहे. 

त्या सगळ्या भाषांतरकर्त्यांचंही आजच्या दिवशी स्मरण….. 

.

शहाजहान आणि दाराशिकोहचं रेम्ब्रांनं केलेलं ड्रॉईंग खाली दिलेले आहे. 

 सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एकमेव ‘वामन‘ मंदिर… लेखक : साकेत नितीन देव ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

एकमेव वामन मंदिर !!!… लेखक : साकेत नितीन देव ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

श्री विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार हा ‘वामन’ अवतार मानला जातो. हातात कमंडलू , डोक्यावर छत्र अणि एक पाय बळीराजाच्या माथ्यावर ठेवलेल्या वामनांचे चित्र अनेकदा बघितलेलं, मात्र वामनांची मूर्ती कुठेच दिसली नाही. ती इच्छा आपल्याच पुण्यात पूर्ण झाली.

पुराणांतील एका कथेनुसार, असुरांचे गुरू ‘शुक्राचार्य’ यांनी संजीवनी विद्या अवगत केली. त्याच्यामुळे मेलेले असुर पुन्हा जिवंत होऊ लागले. शुक्राचार्य हे असुरांचा राजा ‘बळीराजा’ साठी एक मोठा यज्ञ करतात. असुरांची शक्ती अनेकपटीने वाढते अणि ते इंद्रावर हल्ला करण्याची तयारी करतात. जर बळीराजाचे शंभर यज्ञ पूर्ण झाले, तर त्याला इंद्रपद मिळेल या भीतीने इंद्रदेव श्रीविष्णूंना शरण जातात. श्रीविष्णू त्यांना मदत करण्याचे वचन देतात.

महर्षी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी श्रीविष्णू बालकाच्या रुपात जन्म घेतात. त्या बाळाचे नामकरण ‘वामन’ असे करण्यात येते. ऋषिमुनींकडून मृगचर्म, पलाश दंड, वस्त्र, छत्र, खडावा, कमंडळु वस्तू मिळाल्यावर वामन यज्ञास्थळी पोहोचतात. बटू रूपातील श्री वामन बळीराजाकडे भिक्षा मागण्यासाठी दाखल होतात अणि भिक्षेमध्ये तीन पावले भूमी मागतात, बळीराजा वचन देतात.

वामन विशाल रूप घेतात अणि एक पाय पृथ्वीवर आणि दुसरा पाय स्वर्गात ठेवुन दोन पावले घेतात. आणि मग बळीराजाला विचारतात “आता तिसरे पाऊल कुठे ठेवु?” आपला पराभव मान्य करत, पण दिलेले वचन पाळत शेवटी बळीराजा वामनासमोर नतमस्तक होतात व आपल्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवावे, अशी विनंती करतात. वामन तसेच करतात अणि बळीराजाला पाताळात ढकलतात. (ज्या दिवशी हे घडले तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा !). पुढे वामन पृथ्वी मानवांना अणि स्वर्ग देवांना देऊन टाकतो.

तर, अशा या वामनांचे एक मंदिर आपल्या पुण्यात आहे. डावा हात हृदयाशी, उजवा हात मोकळा सोडलेला, गळ्यात माळ, अंगात जानवे अणि चेहर्‍यावर प्रसन्न भाव अशी वामनांची मूर्ती आहे. विशेष म्हणजे शेजारी वामनांची आई ‘अदिती ‘ उभी आहे. माता अदितीच्या डाव्या हातात कमलपुष्प तर उजवा हात वामनांच्या खांद्यावर अभय मुद्रेत आहे. या दोन्ही मूर्तींना प्रभावळ असून, हे संपूर्ण शिल्प संगमरवरी दगडात घडवलेले आहे. 

अशा प्रकारचे हे कदाचित भारतातील एकमेव मंदिर असावे. सदर मंदिर शुक्रवार पेठेत, राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या शेजारी आहे. पूर्वी मंदिराला सभामंडप व गाभारा होता. तिथे असलेल्या ‘धर्म चैतन्य’ संस्थेत वासुदेवशास्त्री कोल्हटकर यांचे कीर्तन होत असे. एक शाळा ही भारत असत. आज ‘आल्हाद’ नवाच्या इमारतीच्या तळघरात हे मंदिर आहे. मंदिर खाजगी असून श्री कोल्हटकर त्याची व्यवस्था बघतात. 

लेखक : साकेत नितीन देव

(वामन जयंती, शके १९४५)

संग्रहिका : प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी निमसे पाटील होते. १८४० साली  महात्मा ज्योतिराव फुले या थोर समाजसुधारकांसोबत, सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय नऊ वर्ष तर, ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाज सुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावसआत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.     सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.    तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. (यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. 

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी –  ” धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. पण असे अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत… जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या भयंकर साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. आणि दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेगमुळेच  दि. १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

(फोटो मोठा करून पाहिल्यास त्यातील सौंदर्य स्पष्ट दिसू शकेल.)

☆ नाग वासुकी मंदिर, प्रयाग… ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

वरील चित्रातली ही मूर्ती एकाच दगडात कोरून बनवलेली आहे असे सांगितले तर कदाचित खरे वाटणार नाही. ती कशी बनवली गेली हे एक तो देव, नाहीतर तो मूर्तिकारच जाणे असे आश्चर्याने म्हटले जाते.

हे आहे “ नाग वासुकी मंदिर ” प्रयाग. 

पाहिल्यापाहिल्या हा एक वटवृक्ष आहे असेच वाटते. पण नाही. हे सर्व नक्षीकाम भल्यामोठ्या दगडावर कोरून केले गेलेले आहे. 

आपल्या भारतात प्राचीन काळातल्या अशा अनेक सुंदर आणि आश्चर्यकारक वाटणाऱ्या गोष्टी अजूनही बघायला मिळतात, ज्या पाहून, त्या कशा बनवल्या असतील याचे आश्चर्यमिश्रित कौतुक बघणाऱ्या प्रत्येकालाच वाटल्याशिवाय रहात नाही. पण त्या कशा बनवल्या असतील हा प्रश्न एखाद्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा वाटत रहातो. 

अशी अविश्वसनिय कलाकारी बघायची असेल तर अशा स्थळांना आवर्जून भेट द्यायला हवी. 

लेखक : अज्ञात 

माहिती संकलन : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्याचे वैभव महात्मा फुले मंडई…” – ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

पुण्याचे वैभव समजली जाणारी ‘ महात्मा फुले मंडई ‘ ही १४२ वर्षे पूर्ण होऊन १४३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. 

इ. स. १८८० साली पुण्याची लोकसंख्या ९०,००० होती.  पुण्यात बंदिस्त जागेत एक मोठी मंडई उभी झाली पाहिजे, म्हणून सन १८८२ साली पुणे नगर पालिकेत एक ठराव झाला.  त्याला महात्मा फुले व चिपळूणकरांनी विरोध केला होता. पण बहुमताच्या जोरावर तो ठराव पास झाला. 

सरदार खासगीवाले यांची बाग-वजा ४ एकर जागा ही ४०,०००रुपयांना खरेदी केली गेली होती  व त्यावेळेचे बांधकाम अभियंते वासुदेव बापूजी कानिटकर यांनी केले होते. या कामासाठी ३ लक्ष रुपये खर्च आला होता. 

या कामासाठीचा  वाहतूक खर्च कमी व्हावा म्हणून पिंपरी चिंचवड येथून सिमेंट, चुना, बेसॉल्ट दगड आणले गेले होते. ह्यावरील खांबांवर ग्रीक पानांची नक्षी आहे. रोमन शैलीमध्ये हे बांधकाम केले गेले. ते अष्टकोनी असून मध्यभागी कळस आहे, जो ८० फूट उंचीचा आहे. 

१ ऑक्टोबर १८८६ रोजी  मुंबईचे गव्हर्नर जनरल रे यांच्या हस्ते या मंडईचे उद्घाटन झाले होते. त्यांच्याच नावावरून या मंडईला तेव्हा “ रे मार्केट “ हे नाव दिले गेले होते. पुढे सन १९३९/४० मध्ये आचार्य अत्रे यांनी तिचे “ महात्मा फुले मंडई “  असे नामकरण केले.

मंडईला ‘ मंडई विद्यापीठ ‘ हे नाव काकासाहेब गाडगीळ यांनी दिले,  कारण इथे खरेदी करायला येणारा असो की व्यवसाय करणारा असो,  कुणीच कधीच व्यवहारात चुकत नाही, अशी तेव्हा या मंडईची ख्याती होती. नंतर बऱ्याच वर्षांनी ही इमारत अपुरी पडायला लागल्याने या मूळ इमारतीच्या शेजारीच आणखी एक मोठी जागा घेऊन तिथेही भाजी बाजार भरायला सुरुवात झाली, ज्याला सुरुवातीला ‘ नवी मंडई ‘ असे म्हटले जात असे. 

या जागेला लागूनच असलेल्या एका प्रशस्त जागेत गेली अनेक वर्षे सार्वजनिक मंडई मंडळाचा गणपती ठेवला जातो. आणि श्री शारदेसह झोपाळ्यावर बसलेली ही मोठी गणेश मूर्ती हे अनेक पुणेकरांचे एक श्रद्धास्थान आहे, जिथे गणेशोत्सवात दर्शनासाठी पुणेकर प्रचंड गर्दी करतात. 

संग्राहक : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print