सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ०८ ऑक्टोबर २०२३ – “भारतीय वायुसेना दिन” ☆ सौ राधिका भांडारकर 

भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलाच्या पाच मुख्य विभागांपैकी एक असून तिच्यावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे.

भारतीय हवाई दल जगातल्या पहिल्या पाच उत्कृष्ट दलातील एक मानले जाते.

भारतीय वायुसेनेचे ध्येय वाक्य आहे—

।।नभ: स्पृशं दीप्तम्।।

हे वाक्य गीतेतल्या एका श्लोकात आलेले आहे. (भगवद्गीता ११.२४)

भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन्  यांनी हे वाक्य सुचविले. त्याचा अर्थ असा आहे “हे! विष्णो, आकाशस्पर्शी ज्योती सारखा आणि अनेक वर्णयुक्त, उघड्या मुखाच्या आणि प्रज्वलित विशाल नेत्राच्या तुला पाहून भयभीत झालेल्या माझ्यामध्ये धैर्य आणि शांती नाहीशी झाली आहे.”

थोडक्यात ज्या भयभीत झालेल्या अर्जुनातली वीरश्री जागृत करण्याचं काम भगवंताने केले त्याप्रमाणे वायुसैनिकांना हे घोषवाक्य लढण्यास प्रवृत्त करते.

८ ऑक्टोबर १९३२  रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली म्हणून ८ ऑक्टोबर हा भारतीय वायुसेना दिन समजला जातो. सुब्रतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते. 

ब्रिटिशकालीन वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअर फोर्स असे होते (१२ मार्च १९४५). मात्र स्वातंत्र्यानंतर त्यातले रॉयल जाऊन भारतीय वायुसेना दल असे त्याचे नामकरण केले गेले. 

१९४७ मध्ये विमानांना पिस्टन वर चालणारी इंजिने बसवलेली असत. नंतर वेगवान जेट विमाने आली. नेट, हंटर कॅनबेरा यासारखे ब्रिटिश बनावटीची विमाने वायुसेनेत सहभागी झाली. परराष्ट्रीय धोरणानंतर रशियन हेलिकॉप्टर्स वायुसेनेत दाखल झाली. सध्याच्या काळात रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, दळणवळण यंत्रणा, नेटवर्क सेंट्रिक वाॅरफेअर सी —४—आय संगणकीय सुविधा वायुसेनेकडे आहे. हवेतल्या हवेत इंधन पुरवठा करणारी विमाने, विमानातून रडार वापरून दूरस्थ शत्रूच्या विमानाची टेहळणी करणारी यंत्रणा, कक्षेबाहेरच्या शत्रूंच्या तळाचा शोध घेणारी अत्यंत आधुनिक शस्त्रास्त्रे भारतीय वायुसेनेत सहभागी आहेत. येत्या काही वर्षात हवाई दलाच्या यादीत २२० एलसीए चा(L C A) ताफा असेल.त्यामुळे भारतीय वायुसेना जगातील सर्वोच्च वायुदल आहे.

भारतीय वायुसेनेचे प्रमुख मिग२९या लढाऊ विमानाचे पायलट  विवेक राम चौधरी हे  आहेत. ते  २७वे एअर चीफ मार्शल आहेत.(३० सप्टेंबर २०२१) ते नांदेडवासी आहेत.महाराष्ट्रासाठी ही गौरवशाली बाब आहे. 

वायुसेना दिनाच्या वेळी भारतीय हवाई दलाचे धाडसी वैमानिक लष्कराच्या विविध विमानांसह एक अप्रतिम एअर शो करतात. विशेष पराक्रम गाजवण्यार्‍या हवाईदल सैनिकांना सन्मानचिह्ने दिली जातात. यावर्षीचा हा ९१ वा वायुसेना वर्धापन दिन आहे. यावर्षीचा फ्लाय पास्ट उत्तर प्रदेश मधील सांस्कृतिक नगरी प्रयागराज इथे होणार आहे.

भारतीय वायुसेना म्हणजे भारताचा अभिमान आणि शान आहे. 

प्राणपणाने भारतीय सीमांचे रक्षण करणाऱ्या या वायुसैनिकांना मानाचा मुजरा !!

वंदे भारत ! 🇮🇳

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments