मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ सखी ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘पुन्हा कधी भेटशील गं? नक्की ये, खूप कंटाळा येतोय गं हॉस्पिटलमध्ये !’ हेच तिचं माझ्याशी शेवटचं बोलणं ठरलं! माझी जिवाभावाची मैत्रीण, कॉलेजमध्ये एकत्र एका डिपार्टमेंटला शिकलो. अतिशय हळुवार, कवी मनाची होती ती!

माझं एम ए पूर्ण झाल्यावर  लगेचच माझे लग्न झाले आणि मी संसारात गुरफटले ! एम ए पूर्ण करून ती तिच्या गावी एका कॉलेजला प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली . ती कॉलेजमध्ये आणि मी माझ्या संसारात रमून गेले. दिवस पळत होते. प्रत्येक जण आपापल्या विश्वात बिझी होतो. प्रथम काही काळ पत्रव्यवहार होई. हळूहळू त्याचाही वेग मंदावला.तेव्हा फोन फारसे कुठे नव्हते आणि मोबाईल तर नव्हताच! तिचे लेख, कविता वाचायला मिळतं. त्यातून तिचे निराश, दु:खी मन प्रकट होई. तिच्या मनात काहीतरी खोलवर दुःख होतं ते जाणवत राही! पण त्यावर फारसे कधी बोलणे झालेच नाही !

अशीच वर्षे जात होती. अधून मधून भेटी होत असत. ती साहित्य संमेलनं, वाड्मय चर्चा मंडळ, कॉलेजचे इतर कार्यक्रम यात गुंतलेली होती, तर मी संसारात मिस्टरांच्या बदली निमित्ताने वेगवेगळ्या गावी फिरत होते. परत पाच सहा वर्षानंतर आम्ही आमच्या मूळ गावी परत आलो. यांची नोकरीही तिथेच स्थिरावली. घर बांधलं. मुलगी मोठी झाली आणि अचानकपणे मुलीच्या गायन स्पर्धा निमित्ताने सखीच्या गावी जाणे झाले.  त्यादिवशी गायन स्पर्धेपेक्षा मला जिची ओढ होती ती सखी नेमकी परगावी गेली होती.

त्यानंतरच्या बातम्या ज्या कळल्या त्या फारशा चांगल्या नव्हत्या. तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आणि एका ब्रेस्टचे ऑपरेशनही झाले. या सगळ्यावर मात करून तिचे आयुष्य पुढे चालले होते. युनिव्हर्सिटीतील  प्रोफेसर वर्गाशी तिचा चांगला संपर्क होता. लेखनामुळे चांगली प्रसिद्धी मिळाली होती. अशाच एका कार्यक्रमासाठी ती आमच्या गावात आली असता माझी तिची भेट झाली. तिलाही खूप आनंद झाला. मी तिला घरी बोलावले, त्याप्रमाणे ती घरी आली. खूप आनंद झाला मला ! ‘काय देऊ भेट तुला मी?’ प्रथमच भेटतेस इतक्या वर्षांनी ! डोळ्यात टचकन पाणी आले तिच्या ! ‘ माझं काय गं, किती आयुष्य आहे देव जाणे! आपण भेटलो हीच मोठी भेट !’असं म्हणून रडली.  तेव्हा मी तिला ड्रेसवर घालायचे जॅकीट दिले. ती खुश झाली.

एक दिवस अचानक तिचा कोणाबरोबर तरी दिलेला निरोप मला मिळाला. निरोप होता की, ‘ मी  हॉस्पिटल मध्ये आहे, मला भेटून जा.’ मी तेव्हा मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होते, तरीपण एक दिवस दुपारच्या वेळात आम्ही दवाखान्यात गेलो. आजारपणामुळे ती खूप थकली होती. कॅन्सरने पुन्हा आपले अस्तित्व दाखवले होते. अगदी बघवत नव्हते  तिच्याकडे! त्यातूनही हसून तिने मला जवळ बोलावले. तिच्या कवितांचे पुस्तक माझ्यासाठी तिने आणून ठेवले होते. त्या हळव्या कविता वाचून मन आणखीच दुःखी झालं ! तिथून पाय निघत नव्हता. ‘ पुन्हा वेळ काढून नक्की 

येते ‘ असं तिला म्हंटलं खरं, पण मला पुन्हा लग्नाच्या गडबडीत जायला झाले नाही. साधारण महिन्याभरातच ती गेल्याचे कळले. खूप खूप हळहळ वाटली. आपण तिला परत नाही भेटू शकलो, ही रुखरुख कायम मनाशी राहिली. तेव्हापासून मनाशी ठरवलं की, अशा भेटी पुढे ढकलायच्या नाहीत. त्या आवर्जून वेळेत करायच्या ! तिच्या ‘सारंगा तेरी याद में….’ गाण्याचे स्वर ते गाणं लागलं की अजूनही कानात घुमत राहतात !  सखीची बाॅबकट केलेली, काळीसावळी, हसतमुख मूर्ती डोळ्यासमोर येते. काळाने हे सुकुमार पुष्प आपल्यातून फार लवकर खुडून नेले, नाहीतर तिच्याकडून आणखी खूप काही चांगले लेखन आपल्याला मिळाले असते. तिच्या दु:खासह ती अकाली गेली. पण अजूनही जून महिन्याच्या दरम्यान ती गेली ही आठवण मनात रहाते .वीस वर्ष झाली. आठवणींच्या माळेतील हा सुंदर मणी आज गुंफला गेला !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग – 3 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

आनंद म्हणजे झुळूक! सहज अलगद स्पर्शून जातो पण पकडून ठेवता येत नाही मुठीत! काही क्षणच किंचित बरं वाटतं… आणि भुर्रकन उडून जातो तो. पुन्हा आपलं जैसे थे! 

कशामुळे सुखावते मी? सगळ्यात जास्त वेळा… कुणी माझ्याबद्दल चांगलं  बोललं की… तोंड देखली स्तुती किंवा भारावून जाऊन केलेली स्तुती समजते, त्याबद्दल नाही बोलत मी पण माझ्या प्रयत्नांचे आवर्जून कुणीतरी कौतुक केले, खरंतर दखल घेतली गेली माझ्या असण्याची, कामाची की बरं वाटतं. 

त्यातही हे कौतुक किती मनापासून आहे, कितपत  खरं आहे, नेमकं आहे का अशा अनेक बाबींवर त्या आनंदाची तीव्रता अवलंबून असते.

याचा अर्थ इतरांवर अवलंबून आहे का माझा आनंद? माझ्या हातात नाही का? नाही नाही अगदी असं नाही म्हणता येणार! त्या वेळची माझी मनस्थितीदेखील पूरक असायला हवी ना? तर घेता येईल मला ते कौतुक! पण काहीही म्हणा, appreciation हा बऱ्यापैकी खात्रीचा मार्ग आनंदापर्यंत पोचण्याचा हे मात्र मानावे लागेल. 

अनेकदा सोशल मेडियामध्ये मी तुम्हाला चांगले म्हणते, तुम्ही मला म्हणा असा खेळ चाललेला जाणवतो. हे म्हणजे ‘fishing for the compliments’ झाले.

असला ओढून ताणून आनंद नको बाबा आपल्याला!

माझ्या मनात जर सभोवतालच्या लोकांबद्दल प्रेमाची आणि आस्थेची ज्योत तेवत असेल तर आपसूकच माझ्या असण्यातून, वागण्यातून आनंदाची सुखद झुळूक लोकांना अनुभवायला मिळते नि साहजिकच ती परतून माझ्यापर्यंतही पोचते. खरंतर ती आपली आपल्याला देखील जाणवत रहाते…   

हृदयातली प्रेमाची ज्योत जेव्हा अलगद सुलगते…त्यात कोणतीही अपेक्षा नसते, संपूर्ण स्वीकार असतो, आपलं मानलेलं असते. कुणासाठी तरी खूप आस्था, प्रेम वाटतं, काही तरी करावसं वाटतं… अगदी स्वतः त्रास सोसून देखील… ही भावना किती सुरेल असते! 

मनातल्या अस्वस्थतेला, असाहायतेला, निराशेला पार करण्याचं बळ लाभतं त्यातून… मात्र तिथवर  पोचण्यात किती अडचणी? निखळ प्रेम आणि स्वीकार येतच नाही अनुभवाला. किती तरी ‘पण…’ असतात मध्ये. तक्रारी, जुने अपेक्षाभंग, आरोप अशा अनेक गोष्टी त्या प्रेमाच्या ज्योतीला जीवच धरू देत नाहीत. त्यासाठी भूतकाळात त्या त्या क्षणात शिरून गोष्टी resolve कराव्या लागतात, पाहिल्यांदा स्वतःच्या मनात आणि नंतर त्या व्यक्तीपर्यंत पोचून देखील! आपला दृष्टिकोन बदलला असेल तर सकारात्मक प्रतिसाद निश्चित मिळणार… 

अगदी जवळच्या आणि प्राथमिक – जैविक नात्यातल्या माणसांबरोबर जगताना आजवर झालेल्या जखमा, ओरखडे आपण जर वागवत राहिलो बरोबर तर ते नाते आणखी आणखी कडवट बनत जाते. ते नाते heal व्हायला हवे तर त्यासाठी जखमा बऱ्या व्हायला हव्यात. ही वाट चालून जाण्यासाठी आपल्याला उर्मी आणि बळ लाभो.

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ आवरा ही प्रदर्शने… ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

खरं तर, कार्यक्रम, सभा, संमेलने या खेरीज ध्वनिप्रदूषण करणा-या कर्णे, भोंगे आदि गोष्टींचा वापर सगळ्यांनीच शहाणपणाने टाळायला हवा. आरत्या, नमाज, बांग हे ईशस्तवन असेल, तर ते ठाणठाण बोंबलल्याशिवाय देवाला कळत नाही, असा गैरसमज आहे का? की, आपली भक्ति ही प्रदर्शनाची बाब आहे, असा समज आहे?                                               

मला दुसरी शक्यता जास्त बरोबर वाटते. ही सगळी प्रदर्शने ओंगळ व्हायला लागली आहेत आणि धूर्त राजकारण्यांची शक्ति-प्रदर्शने ठरू लागली आहेत. गोंगाट, गलका हे किती त्रासदायक होतात, हे एखाद्या शांत, निरव ठिकाणी जाऊन आल्यावर कळतं. सांगीतिक श्रेणीतील किती तरी नादमधुर आवाजांना आपण मुकतो – पक्ष्यांच्या शीळा, झाडांची सळसळ, ही तर उदाहरणे आहेतच, पण वा-याच्या झुळकेला किंवा झोतालाही नाद असतो, समुद्राची गाजेची रात्रीची जाणीव थरारक असते, रातकिड्यांची किरकिर, बेडकांचं डरांव डरांव हे रात्रीच्या झोपेसाठी पार्श्वसंगीताचं काम करतं. निसर्गाची चाहूल असते ती. हे सगळं आपण गोंगाटांत हरवून चाललो आहोत, असं नाही का वाटत?                                               

मला आठवतंय ->                                                          

मी अगदी पाऊल न वाजवता पाळण्याशी जाऊन उभी राहिले तरी माझ्या दिशेला वळलेले तान्हुल्याचे डोळे!

लोणावळ्याला रायवुड पार्क हा जंगलसदृश भाग होता. त्या दिशेने जात असतांना दिवसाउजेडी तिथं रातकिड्यांची चाललेली सामूहिक कर्कश्श किरकिर – त्या झाडांच्या समूहाच्या मध्यभागी जाऊन उभं राहिल्यावर क्षणांत थांबली. आपला श्वास आपल्याला ऐकू येईल, इतकी शांतता क्षणात पसरली. असं वाटत होतं की लक्षावधी अदृश्य डोळे आपला वेध घेताहेत, आपल्याला जाणून घेताहेत. तो परिसर सोडला मात्र, ताबडतोब त्यांचं समूहगान सुरू झालं.                                                                               

झाडावर खारीचं कर्कश्श चिरकणं सुरू झालं की समजायचं, आपली मांजर घराकडे यायला निघालीय.

लिलीचं फूल उमलतांना अतिकोमल असा फट् आवाज करतं आणि सगळ्या पाकळ्या बाहेर फेकल्यासारख्या एकदम  उलगडतात.                                          

परदेशांत जन्मलेल्या आणि वाढलेल्या आपल्या भारतीय मुलांचे इथं – भारतात पाय ठेवताक्षणी इथल्या असह्य आवाजांनी गांगरलेले चेहरे, झाकून घेतलेले कान, हे न सांगता काही सुचवत असतं, जे आपल्याला ऐकू येत नाही, समजत नाही.                                                                                      

मोठमोठ्या आवाजातील बोलणं, गाड्यांचे कर्णकटु भोंगे, दुचाक्यांचे फर्रर्र आवाज, गजबज ह्या अनैसर्गिक – मानवनिर्मित प्रदूषणात आता भर पडली आहे ही या डीजे, डॉल्बीवर वाजणा-या ठणाण गाण्यांची ! आश्चर्य वाटतं, हे सगळं चवीने उपभोगणा-यांचे!                                                                                                                     

सगळेच काही जंगलात वा हिमालयात जाऊ शकत नाहीत. गंमत म्हणजे तिथला निसर्गही आता या ध्वनिप्रदूषणापासून स्वतःला वाचवू शकत नाही. बहिरं असण्याचं दुःख मला माहीत आहे, पण आता बहिरं होण्यात आनंद शोधावा लागेल का?  ——

© सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ देवाचे लेकरू— ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

माझ्या हॉस्पिटलमध्ये अनेक  प्रकारच्या रुग्ण मी बघत असायची. काहीवेळा, श्रीमंत लोक अत्यंत  विचित्र वागताना मी बघितलेत. तर काहीवेळा,अत्यंत निम्न स्तरातले लोक फार मोठ्या मनाचे आढळून आलेलेही बघितले.

माझ्याकडे सरला बाळंतपणासाठी आली. त्याकाळी सोनोग्राफी भारतात आलेली नव्हती. तेव्हाची ही गोष्ट.

आधीच्या दोन मुलीच होत्या सरलाला. यावेळी मुलाच्या आशेने तिसरा चान्स घेतला होता खरा. 

पण मग मात्र operation नक्की करायचे ठरवले होते तिने. योग्य वेळी सरला प्रसूत झाली. मी  प्रसूती पार पाडून बाळाकडे वळले. मुलगी होती ती. पण दुर्दैवाची गोष्ट, मुलीला डावा हात कोपरापासून नव्हता.

कोपरालाच बोटासारखे दोन विचित्र कोंब होते. मला, आमच्या सर्व स्टाफला अतिशय वाईट वाटले.

सरलाने उत्सुकतेने विचारले, “ बाई काय झाले मला,सांगा ना “

मी म्हटले, “ सरला, सगळे उत्तम आहे. तू आता छान विश्रांती घे हं.उद्या बाळ देणारच आहोत तुझ्या जवळ. “ 

सरलाने निराशेने मान फिरवली.

दुसऱ्या दिवशी राऊंड घेत असताना सरलाच्या कॉटजवळ गेले तर ती धाय मोकलून रडत होती.

“ अहो डॉक्टर,आता मी काय करू. ही असली अपंग मुलगी कशी सांभाळू मी. देव तरी बघा कसा. देऊन द्यायची ती मुलगी,आणि वर असली अपंग.” 

मी तिची खूप समजूत काढली. “ सरला,देवाचीच इच्छा म्हणायचे ग. तू हिलाच आता नीट वाढवायला हवेस.

नशीब समज, ती बाकी ठीक आहे. आणखी कोणते व्यंग नाहीये नशिबाने. अग, फारसे नाही अडणार ग तिचे.

शिकव ना तू तिला सगळे. “ 

सरला गप्प बसली आणि पाचव्या दिवशी घरी निघून गेली. तिचा नवरा बिचारा खरच समजूतदार होता.

म्हणाला, “ बाई,देवाचे लेकरू म्हणून आम्ही  सांभाळू हिला.काय करणार.” 

सरलाने मुलीला खंबीरपणे वाढवायचे ठरवले. 

तिचे  ना कोणी बारसे केले, ना  कसला समारंभ. पहिल्या दोघी रुपाली दीपाली म्हणून ही वैशाली. हेही बहिणीच म्हणू लागल्याम्हणून पडले नाव. बहिणी  म्हणाल्या,” आई हिला आमच्या शाळेत नको हं घालू . सगळ्या चेष्टा करतील आमची.” 

सरलाने चौकशी केली आणि तिला मिशनच्या फुकट असलेल्या शाळेत घातले. निदान तिथे तरी तिला कोणी हसणार नाही, तिच्या व्यंगावर बोट ठेवणार नाही,अशी आशा वाटली सरलाला.

 मुलगी चांगली वाढत होती. बुद्धी सुद्धा छान होती तिची. मिशन स्कूलमध्ये उलट ती छान शिकत होती.

इंग्लिश माध्यम असल्याने तिला फायदाच होत होता. 

सरला घेऊन  यायची तिला माझ्याकडे–कधी औषधासाठी, कधी काही विचारायचे असेल तर–

एकदा मला म्हणाली,” बाई हिला कृत्रिम हात नाही का बसवता येणार हो ?”

 मी तिला आमच्या बालरोग तज्ञांकडे पाठवले. ते म्हणाले, “अजून ही खूप लहान आहे. जरा मोठी झाली की करूया आपण प्रयत्न.” 

दिवस भरभर पळत होते. मोठ्या बहिणी  डिग्री घेऊन लग्न करून गेल्या. त्यांचीही माया होतीच वैशालीवर. 

तिला कोणी हसू नये, कुचेष्टा करू नये म्हणून त्याही दक्ष असायच्या. वैशाली समजूतदार होती. आपल्यात काहीतरी कमी आहे, हे त्या लेकराला जणू जन्मापासून माहीत होते.

वैशालीचे त्या हातामुळे कुठेही अडत नव्हते. ती लाटणे हातात धरून छान पोळ्या करायची. त्या बोटासारख्या कोंबाचा उपयोग करून शिवणसुद्धा शिवायची. खरे तर मोठ्या बहिणींपेक्षा वैशाली दिसायलाही खरंच चांगली होती.

वैशाली 10 वी झाली, तेव्हा सरला म्हणाली,” आपण तुला कृत्रिम हात बसवूया का “. 

 वैशाली म्हणाली, “ नको आई. मी आहे ही अशी आहे। माझे काहीही अडत नाही ग. नको मला तो हात.” 

वैशाली बी.कॉम. झाली. सरकारच्या अनुकम्पा तत्वावर तिला सरकारी बँकेत नोकरीही लागली.  छान साडी  नेसून,डाव्या हातावर पदर घेतलेली वैशाली बघितली की मला कौतुक वाटे तिचे. लक्षात सुद्धा येत नसे की हिला डावा हात पुरा नाहीये. ती भराभर बँकेत काम करत असायची. 

नंतर  बँकेत कॉम्प्युटर आले. वैशालीला बँकेने training साठी पाठवले. हसतमुख वैशाली,सगळ्या बँकेची लाडकी झाली. क्लायंट पण ती नसली की विचारायचे,`आज वैशाली ताई दिसत नाहीत. मग उद्याच येतो,त्या आल्या की.`

सरलाने वैशालीचे नाव विवाह मंडळात घातले. वैशाली म्हणाली, “ आई मला निर्व्यंग मुलगा नको. व्यंग असलेलाच नवरा बघ, जो मला समजून घेईल, स्वतः जो या भोगातून गेलाय, त्याच्याशीच मी लग्न करीन. नाही मिळाला तर राहीन की अशीच. आई, तुला सांगितले नाही ग कधी, पण शाळेतही खूप भोगलय मी. डबा खायला मुले बोलवायची नाहीत

मला उजव्याच हाताने पाण्याचा ग्लास उचलावा लागतो म्हणून चेष्टा करायची मुले. खरकटे हात लावते मी म्हणून.

माझे पाठांतर किती छान आहे. पण टीचरने मला स्पर्धेत कधीही निवडले नाही. .म्हणूनच जो या सर्वातून गेलाय,असाच जोडीदार मला हवा। “ 

सरलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 

“ किती ग सोसलस माझ्या बाळा. पण मिळेल हो असा समजूतदार मुलगा तुला. देव असतो ग  वैशू.” 

वैशू खिन्न हसली. म्हणाली, “असता तर त्याला माझा  पूर्ण हात का नाही देता आला त्याला “. सरला निरुत्तर झाली.

बँकेत एक दिवस एक आजोबा आले. या मुलीला ते खूप दिवस बघत होते. तिला म्हणाले,” जरा बोलायचे आहे तुझ्याशी. येतेस का लंचअवर मध्ये ? हे बघ,मी तुला गेले खूप महिने बघतोय. तुला अवघड वाटणार नसेल तर

एक विचारू का? माझा नातू खूप हुशार आहे. इंजिनीअर आहे, छान नोकरी आहे त्याला. तो तुला  बँकेत येऊन बघून गेलाय. त्याला तू मनापासून आवडली आहेस. हे बघ, या गुणी मुलाला लहान असताना पोलिओ झाला दुर्दैवाने.

वेळीच उपचार केले म्हणून सावरला, पण तरीही, तो एका पायाने लंगडतो. त्याचे काहीही अडत नाही. कार चालवतो, चांगली नोकरीही आहे त्याला. आमची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. बघ भेट त्याला. तुमच्यावर कोणतीही बळजबरी नाही.” 

वैशालीने आईला हे सांगितले. सरलाला तर स्वर्ग ठेंगणा झाला. पुढच्या आठवड्यात आजोबा आणि नातू मनीष वैशालीच्या घरी आले. दोघे अनेक वेळा भेटले बोलले. सहा महिने एकमेकांना भेटल्यावर मगच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. अगदी साधे, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत वैशाली मनीषचे लग्न झाले.

आज वैशाली एका गोंडस मुलीची आई आहे. एकाच मुलीवर तिने ऑपरेशन करून घेतलंय.  मुलगी एकदम 

अव्यंग, हुशार आणि छान आहे.

आता सांगा,—

 देव लग्नगाठी स्वर्गात बांधतो , आणि एक दार बंद असेल तर तो दुसरे उघडतो हे किती खरे आहे न..

©️ डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरगांव… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ गिरगांव… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

बदलले सर्व काही, बदलले सारे गिरगांव

उरल्या त्या आठवणी, बदलले आमचे गांव 

 

जुनी प्रेमळ माणसे, अजूनही मनात घोळतात

बालपणाच्या आठवणी, आजही मनात रुळतात

 

पूर्वीचे आपले गिरगांव, हे आपलेसे वाटायचे

एकमेकांशी सगळे कसे, जिव्हाळ्याने वागायचे

 

घराचे दरवाजे, कायम उघडेच असायचे

घरात खास बनले की, शेजाऱ्यांकडे जायचे

 

शेजारधर्म, आचारधर्म, काय तो तेथेच रुजला

लहानपणीच तो प्रत्येकाच्या, मनावर बिंबला

 

पाण्यावरून भांडणे, चाळीत कायम असायची

पण मनात दुस्वासाला, कधी जागा नसायची

 

प्रेमासाठी लांबच्या पल्ल्याची, गरज नसायची

चाळीतच प्रेमाच्या नजरेची, ओळख व्हायची

 

जापनीज गार्डन मुलांसाठी, हक्काचे असायचे

लाल धक्का जोड्यांसाठी, मात्र प्रेमाचे वाटायचे

 

भाड्याची सायकल चालवणे, चैन असायची

बच्चूचा बर्फ गोळा हीच मोठी, ट्रीट वाटायची

 

कुल्फीवाल्याची रविवारी रात्री, वाट बघायची

पत्त्यांच्या डावाशिवाय कधी, झोप नाही यायची 

 

वाड्यावाड्यांमधून टेनिस क्रिकेटच्या, मॅचेस व्हायच्या

मित्र असले तरीही, खुन्नशीने त्या खेळल्या जायच्या

 

हम दो हमारे चार असले तरी, अडचण नसायची

पाहुण्यांसाठीही रहायला घरात, जागा असायची

 

मराठी माणसांनीच भरलेले, आपले  गिरगांव असायचे

मराठी भाषेचाच अभिमान, उराशी बाळगून जगायचे

 

बदलले सर्व काही, बदलले सारे गिरगांव— 

उरल्या त्या आठवणी, बदलले आमचे गांव — 

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

१२-०६- २०२२

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ते रवी, मी साधा चंद्र… ☆ श्री सुरेश नावडकर ☆

श्री सुरेश नावडकर

? मनमंजुषेतून ?

☆ ते रवी, मी साधा चंद्र.. ☆ प्रस्तुती – श्री सुरेश नावडकर ☆

(दिग्गज ज्येष्ठ आणि श्रेष्ठ चित्रकार श्री. रवी परांजपे यांचे दि. ११/६/२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांना वाहिलेली ही शब्द – सुमनांजली) 

साहित्य, कला, संस्कृतीचं माहेरघर असलेल्या महाराष्ट्राला, अनेक थोर चित्रकार लाभले आहेत.. एस.एम. पंडित, रघुवीर मुळगावकर, दीनानाथ दलाल, एम.आर. आचरेकर, इत्यादींनी सप्तरंगांवर हुकूमत गाजवून कलाजगतात प्रसिद्धी मिळविली.. या थोर चित्रकारांच्याच पिढीतील ज्येष्ठ चित्रकार, रवी परांजपे यांनी काल आपले ‘ब्रश मायलेज’ गाठले..

मला लहानपणापासूनच चित्रकलेचे आकर्षण आहे. किराणा मालाच्या दुकानातून आणलेल्या सामानाच्या कागदी पिशवीवर एखादे चांगले चित्र दिसले, तर ती पिशवी पाण्यात बुडवून खळ निघून गेल्यावर तो कागद सुकवून जपून ठेवलेली चित्रं, अजूनही माझ्या संग्रही आहेत.. अशाच छंदातून मुळगावकर व दलाल यांची चित्रे, कॅलेंडर्स जमविली. त्याकाळी टाईम्स ऑफ इंडियाच्या धर्मयुग, इलस्ट्रेटेड विकली अशा पाक्षिकात रवी परांजपे सरांची रंगीत कथाचित्रे, पाहिल्याची आठवतात.. 

काही वर्षांनंतर त्यांची चित्रे असलेली ग्रिटींग्ज कार्ड्स पाहिली. काही कॅलेंडर्स, सरांच्या वेगळ्या शैलीमुळे लगेच ओळखू यायची.. वर्तमानपत्रातील व रीडर्स डायजेस्ट या इंग्रजी मासिकातील सरांच्या जाहिराती पाहिल्या की, सरांच्या शैलीचं कौतुक वाटायचं.. अशा ज्येष्ठ चित्रकाराशी कधी संपर्क येईल, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.. तरीही, तो आला…

माझ्या मोठ्या भावाने, रमेशने अभिनव कला महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राध्यापक मारुती पाटील सरांच्या शिफारशीवरुन, मुंबईला रवी परांजपे सरांकडे कलाक्षेत्राचा अनुभव घेण्यासाठी जाण्याचे ठरविले.. 

सरांचा स्टुडिओ दादर येथील काॅलेज गल्लीतील, मनाली बिल्डींगमध्ये होता. त्यावेळी सर बिल्डर्सना लागणारी माऊंट साईजमधील बिल्डींगची कलरफुल पर्स्पेक्टिव्ह ड्राॅईंग्ज काढून देत असत. सरांकडे रमेशसारखेच चार असिस्टंट काम करीत असत. 

त्यावेळी परांजपे सरांना भेटायला कधी अभिनेत्री स्मिता पाटील तर कधी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे येत असत. मी दोन वेळा रमेशला भेटायला म्हणून, स्टुडिओत गेलो होतो. सर मितभाषी होते. याच दरम्यान सरांकडे काम करणाऱ्या, दिपक गावडे या चित्रकार मित्राशी मैत्री झाली.. जी आजही अबाधित आहे.. 

सहा महिन्यांनंतर रमेशने, सरांकडचा अनुभव घेऊन मुंबई सोडली. १९९० साली, सर पुण्यात आल्यानंतर आम्ही दोघेही सरांना भेटत होतो. सरांची अनेक प्रदर्शने पाहिली. कधी सरांचं प्रदर्शन मुंबईत जहांगीरला असेल तर तेही जाऊन पाहिलं..

वर्तमानपत्रातून आलेले सरांचे लेख वाचत होतो. मोठमोठ्या सांस्कृतिक समारंभांना  सरांची उपस्थिती हमखास असायची. तिथे भेट होत असे..

आठवड्यापूर्वी ज्येष्ठ चित्रकार अनिल उपळेकर यांचा मेसेज आला.. ‘काही दिवसांपूर्वी सर घरात पडले, घोले रस्त्यावरील हाॅस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं आहे. आयसीयू मध्ये आहेत..’ हे वाचून मला धक्काच बसला.. 

..काल दुपारी परांजपे सरांच्या कलाप्रवासाने पूर्णविराम गाठला.. दिग्गज चित्रकारांमधील जो एक शेवटचा दुवा होता, तोही निखळला.. दीनानाथ दलालांना, केतकर सर गुरुस्थानी होते.. रघुवीर मुळगावकरांनी, एस.एम. पंडितांना गुरुस्थानी मानलं होतं.. एम.आर. आचरेकरांकडे शिकलेले विद्यार्थी आज यशस्वी चित्रकार झालेले आहेत.. रवी परांजपे सरांची चित्रशैली ही इतरांपेक्षा खूप वेगळी होती.. अशी ही चालती बोलती विद्यापीठं काळाच्या ओघात नाहीशी झाली.. वास्तव चित्रशैली जपणारी पिढी, हळूहळू नामशेष होत आहे.. नवीन पिढीचा कल, हा वास्तव पेक्षा अमूर्त कलेकडे अधिक आहे.. यातूनही वास्तव कला टिकवायची असेल तर, जुन्या पिढीतल्या पंडित, दलाल, मुळगावकर, परांजपे सरांना कदापिही विसरुन चालणार नाही..

सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे.. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत.. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला.. मीही असाच एक…

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे सरांना, ही शब्दफुलांची भावपूर्ण श्रद्धांजली!!! 

© सुरेश नावडकर

१२-६-२२

मोबाईल ९७३००३४२८४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“कमवता झालास, की कळेल तुला एका एका पैशाची किंमत! कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक!,” असं आई म्हणायची. मला पटायचं नाही. शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो! “हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे!” असा इशारा द्यायचो; पण काही उपयोग व्हायचा नाही. “नको वापरूस साबण. बरंच आहे!” असा बचाव पक्षाचा बचाव असायचा.

पंडित भीमसेन जोशी यांचं कन्नडमधलं ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ कुठंही आणि कधीही ऐकलं, तरी मला बेळगाव-धारवाड रस्त्यावरचा पहाटेचा एक ढाबा आठवतो! एका जवळच्या मित्राबरोबर बेळगावहून मोटारसायकलवर आम्ही भल्या पहाटे धारवाडला निघालो होतो.

 रस्त्यात एका ठिकाणी चहासाठी थांबलो. झुंजूमुंजू झालेली होती. सगळं वातावरणच रम्य. त्या रसिक ढाबेवाल्यानं मोठ्या आवाजात कॅसेटवर “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ लावलं. ते तसलं सुंदर वातावरण, हवेतला सुखकर गारवा, गरम चहाचा घोट आणि पहाटे-पहाटे पंडितजींचा मस्त लागलेला आवाज! कानडी येत नाही, त्यामुळे शब्द समजले नाहीत. अर्थ तर फारच दूर; पण हे काहीतरी पवित्र आहे, सुंदर आहे एवढं मात्र जाणवलं. मनाच्या पार आतवर खोल कोरलं गेलं. अधाशासारखं तीनदा परतपरत ऐकलं, तरी मन भरेना. शेवटी, कानात अतृप्तता घेऊन तिथून निघालो. इतकी वर्षं झाली, आजही हे “भजन’ ऐकलं, की दरवेळी मला माझा मित्र सुधीर आठवतो, तो प्रवास आठवतो, त्याची गाडी आठवते, तो “ढाबेवाला’ शिवा आठवतो. एवढंच काय, हे ऐकताना प्यायलेल्या आलेमिश्रित चहाची चवही आठवते! मेंदू कुठंतरी या सगळ्या गोष्टींची एकत्रित सांगड घालतो!

आजही किशोरकुमारचं, “वो शाम, कुछ अजीब थी’ ऐकलं, की कॉलेज आठवतं, “ती’ आठवते, कॉलेजचं कॅंटीन आठवतं, “ती’चं हॉस्टेल आठवतं. दिवाळीच्या सुट्टीमुळे घरी जावंच लागेल, ही तिची असहायता आठवते—- एवढं सुंदर गीत; पण आजही त्रास देऊन जातं!

आठवणींचं घटनांशी, वस्तूंशी, गंधाशी, सुरांशी अतूट असं नातं असतं. आठवणी कधी सुरांना चिकटून येतात, तर कधी वासाला. कधी एखादा विशिष्ट रंगसुद्धा तुम्हाला पुर्वायुष्यातल्या एखाद्या घटनेची “याद’ देऊन जातो. आठवणी या सगळ्यांशी कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं निगडित असतात. तोडू म्हटलं, तरी ते बंध तोडता येत नाहीत.

मुंबईत बांद्रयाला हिलरोडवर उभा होतो. अचानक सिग्नलवर गर्दी झाली. टाचा उंचावून बघितलं. सिग्नलवर फेरारी! फेरारी पाहायला, एवढी गर्दी कशाला? “काय कळत नाही का या मुंबईकरांना,’ असं म्हणणार होतो. म्हणणारच होतो, की ड्रायव्हर साईडच्या काचा खाली झाल्या, आणि समोर साक्षात गॉगलधारी “सचिन’!

नेहमीसारखा हसतमुख! “अबे, जाने दो ना..’ सगळ्यांना अशी हसतहसत विनंती करणारा! शेवटी, चार वेळा हिरवे होऊन परत लालटलेले सिग्नल, मागच्या शंभर गाड्यांचे हॉर्न, भलामोठा ट्रॅफिक जॅम आणि सहस्त्र फोटो यानंतरच तो जाऊ शकला! “फेरारी’ आणि आपला “सचिन’, हे समीकरण तेव्हापासून डोक्‍यात घट्ट झालं, नंतर त्यानं ती फेरारी विकली, हे माहिती असूनही! देशी-परदेशी फिरत असतो, हजारो प्रकारच्या गाड्या दिसतात. त्यात कधीकधी “फेरारी’ही दिसते; पण “फेरारी’ पाहिली, की आठवतो, तो आपला “तेंडल्या’च! फेरारी चालवणारा कोणी दिसलाच, तर तो चोरीची फेरारी वापरतोय, असंच जणू मनात येतं! फेरारीवर पहिला हक्क आपल्या “तेंडल्या’चाच!

दिवेआगारला गेलो होतो. सकाळी लवकर उठलो. पायीपायी हॉटेलपासून एखादा किलोमीटर आलो असेन, एका चिरपरिचित पण तत्क्षणी ओळखू न आलेल्या वासानं आसमंत व्यापून टाकला होता. ओळखताच येत नव्हता. रस्त्यातल्या चाफ्याचा, पारिजातकाचा, नारळाचा इतकंच काय, झाडांवरच्या पिकलेल्या आंब्यांचा वास, या सगळ्यांवर मात करत, हा वास नाकातून मनात शिरला. काहीतरी सुखद संवेदना होत होती. छान असं वाटत होतं; पण कशामुळे हे उमजत नव्हतं!—–

रस्त्याजवळच्या एका “वाडी’त, बाहेरच पाणी गरम करायचा एक तांब्याचा “बंब’ धडाडून पेटला होता. धूर सगळीकडे पसरवत होता. एक तर अक्षरशः इसवीसनापूर्वीचा तो बंब बघूनच मी व्याकुळ झालो! मधल्या काळ्या लोखंडी पाईपमधून टाकलेल्या शेणाच्या गोवरीच्या, लाकडाच्या ढलप्यांचा जळण्याचा वास मला भूतकाळात घेऊन गेला! शाळेत असताना सुट्टीत मोठ्या काकांकडे जायचो. त्यांच्याकडे, असाच एक “बंब’ होता. त्या धुराच्या वासानं क्षणात, कित्येक वर्षं ओलांडून, वर्तमानकाळाला फोडून भूतकाळात गेलो! त्या सुट्ट्या आठवल्या, काकांचं घर आठवलं, काकू आठवली, तिच्या पुरणपोळ्या आठवल्या. तिचं आम्हा बालबच्च्यांवर असलेलं निरपेक्ष प्रेम आठवलं. दिवेआगारच्या रम्य सकाळी धुराच्या वासानं नाशिकची प्रेमळ शालनकाकू आठवून दिली!

असंच, पिझ्झा पाहिला, की मला पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरचा एक भिकारी आठवतो! रात्रीचे दहा वाजले असतील. हा माणूस छानपैकी पिझ्झा खात होता! कोणी उरलेला दिला असावा, वा कोणी दानशुरानं अख्खा न खाता दिला असावा. काहीही असो. तो माणूस “उदरम भरणमं’ या भावनेनं मन लावून तो पिझ्झा खात होता. चव वगैरे त्याच्या दृष्टीनं गौण होतं. त्याचं मन लावून ते पिझ्झा खाणं मनात त्या दोन विजोड गोष्टींची सांगड घालून गेलं! अगदी खुद्द इटलीतल्या मिलानला बावीसशे रुपयांचा पिझ्झा खातानाही, मला तो काळा-पांढरा पट्टेरी ठिगळाचा शर्ट घातलेला, तृप्ततेनं पिझ्झा खाणारा पुण्यातला गरीब माणूसच आठवला!

परवा दिल्लीला मित्राकडे मुक्कामाला होतो. त्याच्या बाथरूममध्ये नारंगी रंगाच्या साबणावर पोपटी रंगाचा साबणाचा छोटा तुकडा चिकटवलेला दिसला. हा असला विजोड साबण बघितला, अन्‌ टचकन डोळ्यात पाणी आलं. एकदम्‌ आई आठवली! साबण विरत आला, हातात येईनासा झाला, की आई नवा साबण काढायची, हा जुना तुकडा त्याला चिटकवायची. मला नाही आवडायचे.””हा काय किडेखाऊपणा?” मी चिडायचो. आमची आर्थिक परिस्थिती छानच होती. गरीबी लांबच; उच्च मध्यमवर्गीयांपेक्षाही उच्चच होतो आम्ही. हे असले प्रकार करायची काही एक गरज नसायची; पण आई ऐकायची नाही.

बादली गळायला लागली, की तिच्या बुडाला डांबर लाव. गळली बादली, की लाव डांबर, असं तिचं चालायचं. काही दिवसांनी बादलीपेक्षा डांबराचंच वजन जास्त व्हायचं! मग ती बादली बाजूनंही चिरली, की त्यात माती भरून तिची कुंडी बनव, आमच्या चपला झिजल्या, की त्या दुरुस्त करणाऱ्यांकडून त्याला ट्रकच्या टायरची टाच लाव, जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिव, त्यांचाही जीव गेला, की त्याचं पायपुसणं बनव, असे माझ्या भाषेतले “उपद्‌व्याप’ आई सदैव करायची. त्याकाळी किराणा सामान कागदी पुड्यांमध्ये यायचं. त्या पुड्यांचा कागद रद्दीच्या गठ्ठ्यात आणि धागा रिळाला! मी दहावीला आलो, तेव्हा तर वाण्याच्या दुकानातल्यापेक्षा मोठा दोराचा रिळ आमच्या घरी बनला होता!

काही वर्षांपूर्वी आई गेली. जेव्हा होती, तेव्हा बऱ्याच वेळा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मोल केले नाही, आणि आता गेली आहे, तर तिच्या सगळ्याच गोष्टी अमोल वाटताहेत!

बाथरूममधून बाहेर आलो. डोळे लाल झाले होते. 

मित्रानं विचारलं: “”काय रे, डोळ्यात साबण गेला का?”

मी म्हणालो: “नाही रे, साबणामागची आई!”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा — ’फुगेवाला’ ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा —फुगेवाला ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

मी नेहमीच असं गंमतीत म्हणते, ‘पुणेकर सगळं टाळू शकतील पण एक गोष्ट मात्र ते कधीच टाळू शकत नाहीत आणि ते म्हणजे ट्रॅफिक… ते जर कुणी टाळू शकत असेल किंवा आत्तापर्यंत एखाद्याला ते लागलं नसेल तर त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येच  करायला हवी’, इतकं ते आपल्या जगण्याचा भाग आहे. म्हणजे कुठंतरी आपण थांबणं आवश्यक असल्यामुळे, कुठंतरी जाम झाल्यामुळे… काहीतरी चुकतंय याची जी जाणीव आपल्याला होते ती सुधारण्याचा जो आपण प्रयत्न करतो तो फार  महत्त्वाचा असतो. म्हणून सगळ्याच गोष्टी सुरळीत होण्यापेक्षा कधी कधी अडथळे येणं हे आपल्यासाठी आवश्यक असतं, फक्त ते आपल्याला जाणता आलं पाहिजे.  

मी जेव्हा ट्रॅफिकमध्ये अडकते तेव्हा मी आजूबाजूला बघते तर जाणवतं, अरे हे नवीन ठिकाण आहे.  हे पूर्वी कधी आपण या निवांतपणे पाहिलं नव्हतं. आपण स्वतःहून कधी इकडे पाहिलंच नसतं. धावत्या गाडीतून एखादी गोष्ट बघणं आणि तिथे रेंगाळून ती गोष्ट बघणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गाडीच्या वेगाबरोबर आपल्या मनाचा वेग इतका जबरदस्त असतो की आपण त्या क्षणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची दखलसुद्धा घेत नाही.  पण ज्यावेळी आपल्याला तिथं थांबण्याची वेळ येते तेव्हा जे आपल्याला दिसतं…  जे अनुभवतो… ते एरवी आपण कधीच मुद्दाम पाहिलं, अनुभवलं नसतं. 

त्यादिवशी असंच ट्रॅफिक लागलं. सिग्नल काही केल्या लवकर सुटेना. बहुदा काहीतरी घोळ झाला होता. आणि सगळेजण वैतागले होते. जो तो आपापलं मन रिझवण्याचा पयत्न करत होता… कुणी मध्येच रस्त्यात उतरून हातवारे करत वाहनांना मार्गदर्शन करत होतं. कुणी फोनवर मोठ्याने बोलत होतं, कुणी हॉर्न वाजवत होतं, कुणी गाडी साईडला घ्यायला सांगतंय, कुणी फूटपाथवरून गाडी घुसवण्याचा प्रयत्न करत होतं, असे सगळेच आपापल्यापरीनं प्रयत्न करत होते. सरतेशेवटी त्यांच्या लक्षात आलं की आता मूळ  कोंडी सुटल्याशिवाय जाता येणार नाही. आणि मग सगळेच एकदम शांत झाले. मला जाणवलं की ही वेळ माझ्यासाठीचा खास निवांतपणा घेऊन येणारी आहे. डोक्यात चाललेल्या विचारांना पण या सिग्नलमुळे ब्रेक लागला होता. आणि आता काहीतरी नवीन बघायला मिळेल असं वाटत असतानाच अचानक तो दिसला…  इतक्या शांतपणे आकाशाकडे नजर लावून उभा होता की जणू काही घडलंच नाहीये. फक्त त्या त्याच्या दणकट सायकलच्या हॅन्डलवर मागेपुढे दोऱ्याने घट्ट बांधेलेले रंगीबेरंगी आणि निरनिराळ्या आकाराचे फुगे तेवढे वाऱ्यावर उडत होते.

सगळ्यांनाच सक्तीनं स्थिर व्हायला लावलेलं असताना वाऱ्यावर उडणारे ते फुगे मला फारच लक्षवेधक वाटले. मला या परिस्थितीत काहीतरी विरोधाभास… विसंगती दिसली. सुदैवाने माझी रिक्षा त्याच्या बऱ्यापैकी जवळ आली होती. त्याच्या कॅरिअरला बांधलेले फुगे माझ्या रिक्षेत डोकावून त्या वातावरणात एक हलकेपणा आणण्याचा प्रयत्न करतायत असं मला वाटलं. आणि मी नकळतच त्याच्याकडे निरखून पाहू लागले. तसा तो पाठमोरा होता. मध्यम उंचीचा, रापलेला रंग, काटकुळा… विचार आला, आजपर्यंत आपण कधी जाडजूड फुगेवाला पाहिलाय का? मी आठवू लागले पण आठवेना… पांढराच पण मळलेला शर्ट, खाली मळकी पोटरीपर्यंत दुमडलेली पँट… राकट हात, त्यांनी पकडलेल्या हॅन्डलला लटकवलेल्या पिशव्या, त्यातून बाहेर येऊ पाहणारे फुगे. एका साध्याशा पिशवीत पाण्याची बाटली दिसली आणि अजूनही त्यात काहीबाही होतं पण त्याचा मला अंदाज लावता येईना…. आणि माझं मन फुगेवालाच्या आयुष्याचं अनॅलिसिस करू लागलं.   

किती उत्पन्न असेल, त्यात सगळ्यांचं  कसं भागवत असतील… याची स्वप्नं काय असतील… तो समाधानी असेल का… रोजच्या कामात तो कसा मन रमवत असेल… इतक्यात कसलातरी आवाज आला म्हणून त्यानं मागे फुग्यांकडे वळून पाहिलं, त्यावेळी मला त्याच्या डोळ्यात फुग्यांविषयी ममत्व दिसलं. एक मन म्हणालं, छ्या! असं काही नाही. तुला तसं वाटतंय… दुसरं मन म्हणालं का नाही तसं ? अरे माणूस आहे तो… माणसं चांगली असतात. या द्वंद्वात मी सापडले असताना  पटकन काहीतरी हालचाल झाली मी दचकले. बघते तो इतक्या गोंधळात, गोंगाटात त्या फुगेवाल्याला एका लहान मुलाचा आवाज आला आणि त्यानं पटकन फुगा काढून त्याला दाखवला . मी बघू लागले याला कुठे दिसतोय मुलगा… मला काही दिसेना. आता रिक्षेवालाही बघू लागला. त्यालाही तो दिसेना. हा इकडून खाणाखुणा करून काहीतरी सांगत होता… त्याच्या चेहऱ्यावरून तरी तो फुगा विकला जाणार आहे असं वाटत होतं.  या धामधुमीत सिग्नल सुटला… सगळेजण आता पुढे सरकू लागले. आणि आम्ही पुढे निघून आलो.   

पूर्ण प्रवासभर माझ्या मनात प्रश्नच प्रश्न…

जाड फुगेवाला कुणी पाहिलाय का? 

यांची स्वप्नं काय असतात? 

फक्त फुगे विकणाऱ्याचं एखादं शानदार दुकान असू शकतं का ?….

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शोध आनंदाचा…भाग -2 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆

सुश्री शुभदा जोशी

? मनमंजुषेतून ?

 ☆ शोध आनंदाचा…भाग -2 ☆ सुश्री शुभदा जोशी ☆ 

माझा स्वभाव कृतीशील आहे. सतत काही ना काही करण्यासाठी माझं मन प्रवृत्त होत असतं. एकेकदा फरपट व्हावी एवढी ही कृतिशीलता! माझ्या समवेतच्या लोकांनादेखील ती अस्वस्थ बनवते. त्याच्या जोडीला मला सगळ्याचीच खूप घाई असते. ही घाई मला थांबू देत नाही, रमू देत नाही कशातही.

‘ चला …’ अशी हाक माझ्या आतून वारंवार उचल खात असते. कुठे जायचंय? कुठे पोचायचंय? आणि तिथे पोचल्यावर तरी मिळणार आहे का आनंद? की पुन्हा, चला…? माझ्या आनंदाला माझ्याच स्वभावातल्या अशा काही गोष्टी ग्रहण लावतात.

कसा बनला असेल हा स्वभाव?

मला स्वतःवर काम करायला आवडते. मानसशास्त्र हा काही माझा विषय नाही. पण मला जर आनंदाचा शोध घ्यायचा झाला तर मला माझ्या मनाबद्दल समजून घ्यायला हवे ना?

प्रश्न पडायला लागल्यापासून या संदर्भात काहीही ऐकू आलं तर मी कान टवकारते. पुस्तकं, लेक्चर्स, वर्कशॉप्स, अभ्यास गट अशा मिळेल त्या मार्गाने मी शोध घेत रहाते. जिवंत रहाण्यासाठी मला ते आवश्यक वाटते. कुठून कुठून काही काही समजत जातं आणि पावलापुरता प्रकाश मिळतो.

आपल्या स्वभावातल्या गमती जमती समजतात आणि त्यातून मार्ग काढायच्या युक्त्याही समजतात.

लहानाचं मोठं होत असताना, आपल्या काही गरजा पूर्ण होत नाहीत, मनाजोगे घडत नाही. त्या वेळी आपल्या हातात काहीच नसतं. या प्रकारच्या भावनांच्या वादळांतून वाट काढताना, जाणता अजाणता काही मार्ग शोधले जातात.

जसं की संतापी अभिव्यक्ती, स्वतःला दोष देत राहणं, मनाला लावूनच न घेणं अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण स्वतःला वाचवतो. आजूबाजूच्या इतर माणसांचे अनुकरण आणि प्रभाव देखील असतात या निवडीवर. त्या त्या वेळी आपण काढलेल्या मार्गांची, patterns ची नंतर सवयच होऊन जाते.  

खरं तर आज तसं वागायची गरज नसते. पण ते patterns अगदी पक्के भिनलेले असतात आपल्यात. स्वभावच बनून गेलेला असतो तो!  पण स्वभाव बदलता येतो हे मी अनुभवातून सांगते.

शालेय वयात विविध कारणानी जोपासल्या गेलेल्या माझ्यातल्या न्युनगंडावर मात करण्यासाठी शोधलेला हा मार्ग असू शकतो, हे आता समजते. आता वयाच्या या टप्प्यावर गरज नाहीये या ‘घाईची’ आणि स्वतःची फरपट करणा-या ‘कृतीशीलतेची’ देखील! उलट ह्या दोन्ही गोष्टी, एकाग्र होऊन माझे आकलन, समज एकत्र बांधण्याच्यामध्ये, आनंदाच्या वाटेवर अडथळाच बनत आहेत.

हे लक्षात येणं खूप भारी आहे! आता मी सांगू शकते माझ्या मनाला…

माझिया मना…

जरा थांब ना

धावणे तुझे 

अन मला वेदना…

©  सुश्री शुभदा जोशी  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं की मला एक निवांतपणा मिळाल्यासारखा वाटतो. जणू काही एखाद्या वेगाच्या घट्ट पकडीतून काही क्षणांनी निसटून जावं आणि हव्या त्या ठिकाणी रेंगाळावं तसं. या क्षणांचं आणि माझं एक वेगळ नातं तयार होतं. जे मला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतं. 

सगळ्यात प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे रस्ता विलक्षण ताकदवान आणि सहनशील होतो, कारण वाहनं थांबलेली असतात. पळणाऱ्या वाहनांचं ओझं रस्त्याला कमी जाणवत असावं असं मला कायम वाटतं. शिवाय अशा अडचणीच्या प्रसंगी थांबलेल्या वाहनांना जास्त वेगाची ओढ असते. त्यांचा वेग सहन करत त्यांना थोपवणं हे काही सोपं काम नाही. वाहनांच्या कचाट्यात सापडलेला हा रस्ता मला धीरोदात्त वाटतो. 

त्याची एक विलक्षण संयत, स्थिर आणि तटस्थ नजर सगळ्यांवर फिरताना दिसते. आणि तोच एक धागा माझ्याही आत तटस्थता निर्माण करायला पुरेसा ठरतो. त्याच्या नजरेतून मग मीही तो रस्ता न्याहाळायला लागते. मी बसलेल्या रिक्षेकडे माझं आधी लक्ष जातं. रिक्षाचालकाचा वैताग त्याच्या वेड्यावाकड्या हातावाऱ्यांतून, आक्रसलेल्या पाठीतून  व्यक्त होत असतो. रागाने नाकावरचा मास्क खाली काढत, विनाकारण स्पीड वाढवत तो उगाच रिक्षा जागच्या जागीच पण मागेपुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतो. इकडे इतका वेळ वेगाने पळणारं मीटर मात्र त्याचा धपापलेला श्वास सोडत बसलेलं दिसतं. आजूबाजूच्या इतर वाहनांचे हॉर्न तर कमालीचे उत्तेजित झालेले दिसतात. वाहनांचे दिवे देखील शेवटचा श्वास लागल्यागत उघडझाप करत राहतात. मधेच एखादा दुचाकीस्वार चिंचोळ्या जागेत स्वतःला माववण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यात तो आणि त्याची दुचाकी यांची युती पारच फसलेली दिसते. थकलेल्या शरीराने उसन्या तरुणाईचा जोश आणावा तशी दुचाकीची स्थिती असते. इकडे ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्ट्या वातावरणात कृत्रिम ऑक्सिजन भरण्याचा प्रयत्न करतात. गोंधळेलेल्या सिग्नलचे दिवेही भरकटलेले वाटतात. मध्येच एखादं कुत्र किंवा मांजर सगळ्यांना वाकुल्या दाखवत मिळेल त्या जागेतून निसटत जातं, तेव्हा समस्त वाहनचालकांच्या चेहऱ्यावरचा हेवा त्या मुक्या प्राण्यालासुद्धा जाणवण्यासारखा असतो. रस्त्याकडेची झाडं या कृत्रिम प्रकाशानं जास्त काळवंडल्यासारखी वाटतात.  आकाश मात्र संथपणे मार्गक्रमण करत असतं.   

गुंता सुटण्याची वाट पहात असतानाच गुंता वाढत जातो. तसंतसं माणसांचे चेहरे विलक्षण बोलके होतात. आता स्वतःचा आवेग सहन करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. मग ते आपसांत धुमसू लागतात. दिवसभराचा सगळा ताण बाहेर येतो. प्रत्येकाची ठेवण वेगळी पण भाव एकसारखेच वाटतात. तणावाची एकलय साधली जाते. ही लय माझ्यातल्या ‘ मी ‘ ला जाणवते. कुठेतरी वातावरणातला ताण माझ्या मनातल्या ताणाशी सम पावतो. आत ताण… बाहेर ताण… आता ताणाशिवाय दुसरं काहीच नाही… ना लपवण्यासारखं ना दाखवण्यासारखं. ताणातून बाहेर पडायलाही पुन्हा ताणच. 

माझ्यातला तटस्थ हे सारं निरखत असतो. पण तो या कशालाच प्रतिसाद देत नाही. ना तो हे नाकारतो  ना स्वीकारतो.  हा ताण मला मग हळूहळू स्थिरता देतो.  मी त्याच्या सहवासात  मोकळी होते. माझं मोकळेपण तो स्वीकारतो. आणि हळूहळू सगळ्या वातावरणात तो मोकळेपणा फैलावतो.  मग ताणाचं रूप बदलतं. आणि माझं मन शांत, समंजस होत जातं.  ट्रॅफीक सुटतं. 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print