सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆  बंध रेशमाचे!…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

“कमवता झालास, की कळेल तुला एका एका पैशाची किंमत! कमवता होत नाहीस तोपर्यंत वाचवायला शिक!,” असं आई म्हणायची. मला पटायचं नाही. शाळेत होतो, बंडखोरी नुकतीच शिकत होतो! “हा असला साबण मी वापरणार नाही, मला नवाच साबण पाहिजे!” असा इशारा द्यायचो; पण काही उपयोग व्हायचा नाही. “नको वापरूस साबण. बरंच आहे!” असा बचाव पक्षाचा बचाव असायचा.

पंडित भीमसेन जोशी यांचं कन्नडमधलं ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ कुठंही आणि कधीही ऐकलं, तरी मला बेळगाव-धारवाड रस्त्यावरचा पहाटेचा एक ढाबा आठवतो! एका जवळच्या मित्राबरोबर बेळगावहून मोटारसायकलवर आम्ही भल्या पहाटे धारवाडला निघालो होतो.

 रस्त्यात एका ठिकाणी चहासाठी थांबलो. झुंजूमुंजू झालेली होती. सगळं वातावरणच रम्य. त्या रसिक ढाबेवाल्यानं मोठ्या आवाजात कॅसेटवर “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ लावलं. ते तसलं सुंदर वातावरण, हवेतला सुखकर गारवा, गरम चहाचा घोट आणि पहाटे-पहाटे पंडितजींचा मस्त लागलेला आवाज! कानडी येत नाही, त्यामुळे शब्द समजले नाहीत. अर्थ तर फारच दूर; पण हे काहीतरी पवित्र आहे, सुंदर आहे एवढं मात्र जाणवलं. मनाच्या पार आतवर खोल कोरलं गेलं. अधाशासारखं तीनदा परतपरत ऐकलं, तरी मन भरेना. शेवटी, कानात अतृप्तता घेऊन तिथून निघालो. इतकी वर्षं झाली, आजही हे “भजन’ ऐकलं, की दरवेळी मला माझा मित्र सुधीर आठवतो, तो प्रवास आठवतो, त्याची गाडी आठवते, तो “ढाबेवाला’ शिवा आठवतो. एवढंच काय, हे ऐकताना प्यायलेल्या आलेमिश्रित चहाची चवही आठवते! मेंदू कुठंतरी या सगळ्या गोष्टींची एकत्रित सांगड घालतो!

आजही किशोरकुमारचं, “वो शाम, कुछ अजीब थी’ ऐकलं, की कॉलेज आठवतं, “ती’ आठवते, कॉलेजचं कॅंटीन आठवतं, “ती’चं हॉस्टेल आठवतं. दिवाळीच्या सुट्टीमुळे घरी जावंच लागेल, ही तिची असहायता आठवते—- एवढं सुंदर गीत; पण आजही त्रास देऊन जातं!

आठवणींचं घटनांशी, वस्तूंशी, गंधाशी, सुरांशी अतूट असं नातं असतं. आठवणी कधी सुरांना चिकटून येतात, तर कधी वासाला. कधी एखादा विशिष्ट रंगसुद्धा तुम्हाला पुर्वायुष्यातल्या एखाद्या घटनेची “याद’ देऊन जातो. आठवणी या सगळ्यांशी कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं निगडित असतात. तोडू म्हटलं, तरी ते बंध तोडता येत नाहीत.

मुंबईत बांद्रयाला हिलरोडवर उभा होतो. अचानक सिग्नलवर गर्दी झाली. टाचा उंचावून बघितलं. सिग्नलवर फेरारी! फेरारी पाहायला, एवढी गर्दी कशाला? “काय कळत नाही का या मुंबईकरांना,’ असं म्हणणार होतो. म्हणणारच होतो, की ड्रायव्हर साईडच्या काचा खाली झाल्या, आणि समोर साक्षात गॉगलधारी “सचिन’!

नेहमीसारखा हसतमुख! “अबे, जाने दो ना..’ सगळ्यांना अशी हसतहसत विनंती करणारा! शेवटी, चार वेळा हिरवे होऊन परत लालटलेले सिग्नल, मागच्या शंभर गाड्यांचे हॉर्न, भलामोठा ट्रॅफिक जॅम आणि सहस्त्र फोटो यानंतरच तो जाऊ शकला! “फेरारी’ आणि आपला “सचिन’, हे समीकरण तेव्हापासून डोक्‍यात घट्ट झालं, नंतर त्यानं ती फेरारी विकली, हे माहिती असूनही! देशी-परदेशी फिरत असतो, हजारो प्रकारच्या गाड्या दिसतात. त्यात कधीकधी “फेरारी’ही दिसते; पण “फेरारी’ पाहिली, की आठवतो, तो आपला “तेंडल्या’च! फेरारी चालवणारा कोणी दिसलाच, तर तो चोरीची फेरारी वापरतोय, असंच जणू मनात येतं! फेरारीवर पहिला हक्क आपल्या “तेंडल्या’चाच!

दिवेआगारला गेलो होतो. सकाळी लवकर उठलो. पायीपायी हॉटेलपासून एखादा किलोमीटर आलो असेन, एका चिरपरिचित पण तत्क्षणी ओळखू न आलेल्या वासानं आसमंत व्यापून टाकला होता. ओळखताच येत नव्हता. रस्त्यातल्या चाफ्याचा, पारिजातकाचा, नारळाचा इतकंच काय, झाडांवरच्या पिकलेल्या आंब्यांचा वास, या सगळ्यांवर मात करत, हा वास नाकातून मनात शिरला. काहीतरी सुखद संवेदना होत होती. छान असं वाटत होतं; पण कशामुळे हे उमजत नव्हतं!—–

रस्त्याजवळच्या एका “वाडी’त, बाहेरच पाणी गरम करायचा एक तांब्याचा “बंब’ धडाडून पेटला होता. धूर सगळीकडे पसरवत होता. एक तर अक्षरशः इसवीसनापूर्वीचा तो बंब बघूनच मी व्याकुळ झालो! मधल्या काळ्या लोखंडी पाईपमधून टाकलेल्या शेणाच्या गोवरीच्या, लाकडाच्या ढलप्यांचा जळण्याचा वास मला भूतकाळात घेऊन गेला! शाळेत असताना सुट्टीत मोठ्या काकांकडे जायचो. त्यांच्याकडे, असाच एक “बंब’ होता. त्या धुराच्या वासानं क्षणात, कित्येक वर्षं ओलांडून, वर्तमानकाळाला फोडून भूतकाळात गेलो! त्या सुट्ट्या आठवल्या, काकांचं घर आठवलं, काकू आठवली, तिच्या पुरणपोळ्या आठवल्या. तिचं आम्हा बालबच्च्यांवर असलेलं निरपेक्ष प्रेम आठवलं. दिवेआगारच्या रम्य सकाळी धुराच्या वासानं नाशिकची प्रेमळ शालनकाकू आठवून दिली!

असंच, पिझ्झा पाहिला, की मला पुण्यातल्या जंगली महाराज रोडवरचा एक भिकारी आठवतो! रात्रीचे दहा वाजले असतील. हा माणूस छानपैकी पिझ्झा खात होता! कोणी उरलेला दिला असावा, वा कोणी दानशुरानं अख्खा न खाता दिला असावा. काहीही असो. तो माणूस “उदरम भरणमं’ या भावनेनं मन लावून तो पिझ्झा खात होता. चव वगैरे त्याच्या दृष्टीनं गौण होतं. त्याचं मन लावून ते पिझ्झा खाणं मनात त्या दोन विजोड गोष्टींची सांगड घालून गेलं! अगदी खुद्द इटलीतल्या मिलानला बावीसशे रुपयांचा पिझ्झा खातानाही, मला तो काळा-पांढरा पट्टेरी ठिगळाचा शर्ट घातलेला, तृप्ततेनं पिझ्झा खाणारा पुण्यातला गरीब माणूसच आठवला!

परवा दिल्लीला मित्राकडे मुक्कामाला होतो. त्याच्या बाथरूममध्ये नारंगी रंगाच्या साबणावर पोपटी रंगाचा साबणाचा छोटा तुकडा चिकटवलेला दिसला. हा असला विजोड साबण बघितला, अन्‌ टचकन डोळ्यात पाणी आलं. एकदम्‌ आई आठवली! साबण विरत आला, हातात येईनासा झाला, की आई नवा साबण काढायची, हा जुना तुकडा त्याला चिटकवायची. मला नाही आवडायचे.””हा काय किडेखाऊपणा?” मी चिडायचो. आमची आर्थिक परिस्थिती छानच होती. गरीबी लांबच; उच्च मध्यमवर्गीयांपेक्षाही उच्चच होतो आम्ही. हे असले प्रकार करायची काही एक गरज नसायची; पण आई ऐकायची नाही.

बादली गळायला लागली, की तिच्या बुडाला डांबर लाव. गळली बादली, की लाव डांबर, असं तिचं चालायचं. काही दिवसांनी बादलीपेक्षा डांबराचंच वजन जास्त व्हायचं! मग ती बादली बाजूनंही चिरली, की त्यात माती भरून तिची कुंडी बनव, आमच्या चपला झिजल्या, की त्या दुरुस्त करणाऱ्यांकडून त्याला ट्रकच्या टायरची टाच लाव, जुन्या कपड्यांच्या पिशव्या शिव, त्यांचाही जीव गेला, की त्याचं पायपुसणं बनव, असे माझ्या भाषेतले “उपद्‌व्याप’ आई सदैव करायची. त्याकाळी किराणा सामान कागदी पुड्यांमध्ये यायचं. त्या पुड्यांचा कागद रद्दीच्या गठ्ठ्यात आणि धागा रिळाला! मी दहावीला आलो, तेव्हा तर वाण्याच्या दुकानातल्यापेक्षा मोठा दोराचा रिळ आमच्या घरी बनला होता!

काही वर्षांपूर्वी आई गेली. जेव्हा होती, तेव्हा बऱ्याच वेळा तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं मोल केले नाही, आणि आता गेली आहे, तर तिच्या सगळ्याच गोष्टी अमोल वाटताहेत!

बाथरूममधून बाहेर आलो. डोळे लाल झाले होते. 

मित्रानं विचारलं: “”काय रे, डोळ्यात साबण गेला का?”

मी म्हणालो: “नाही रे, साबणामागची आई!”

लेखक : अज्ञात 

संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments