सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ ट्रॅफिक… एकांताशी गप्पा… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं की मला एक निवांतपणा मिळाल्यासारखा वाटतो. जणू काही एखाद्या वेगाच्या घट्ट पकडीतून काही क्षणांनी निसटून जावं आणि हव्या त्या ठिकाणी रेंगाळावं तसं. या क्षणांचं आणि माझं एक वेगळ नातं तयार होतं. जे मला काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतं. 

सगळ्यात प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे रस्ता विलक्षण ताकदवान आणि सहनशील होतो, कारण वाहनं थांबलेली असतात. पळणाऱ्या वाहनांचं ओझं रस्त्याला कमी जाणवत असावं असं मला कायम वाटतं. शिवाय अशा अडचणीच्या प्रसंगी थांबलेल्या वाहनांना जास्त वेगाची ओढ असते. त्यांचा वेग सहन करत त्यांना थोपवणं हे काही सोपं काम नाही. वाहनांच्या कचाट्यात सापडलेला हा रस्ता मला धीरोदात्त वाटतो. 

त्याची एक विलक्षण संयत, स्थिर आणि तटस्थ नजर सगळ्यांवर फिरताना दिसते. आणि तोच एक धागा माझ्याही आत तटस्थता निर्माण करायला पुरेसा ठरतो. त्याच्या नजरेतून मग मीही तो रस्ता न्याहाळायला लागते. मी बसलेल्या रिक्षेकडे माझं आधी लक्ष जातं. रिक्षाचालकाचा वैताग त्याच्या वेड्यावाकड्या हातावाऱ्यांतून, आक्रसलेल्या पाठीतून  व्यक्त होत असतो. रागाने नाकावरचा मास्क खाली काढत, विनाकारण स्पीड वाढवत तो उगाच रिक्षा जागच्या जागीच पण मागेपुढे रेटण्याचा प्रयत्न करत राहतो. इकडे इतका वेळ वेगाने पळणारं मीटर मात्र त्याचा धपापलेला श्वास सोडत बसलेलं दिसतं. आजूबाजूच्या इतर वाहनांचे हॉर्न तर कमालीचे उत्तेजित झालेले दिसतात. वाहनांचे दिवे देखील शेवटचा श्वास लागल्यागत उघडझाप करत राहतात. मधेच एखादा दुचाकीस्वार चिंचोळ्या जागेत स्वतःला माववण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्यात तो आणि त्याची दुचाकी यांची युती पारच फसलेली दिसते. थकलेल्या शरीराने उसन्या तरुणाईचा जोश आणावा तशी दुचाकीची स्थिती असते. इकडे ट्रॅफिक पोलिसाच्या शिट्ट्या वातावरणात कृत्रिम ऑक्सिजन भरण्याचा प्रयत्न करतात. गोंधळेलेल्या सिग्नलचे दिवेही भरकटलेले वाटतात. मध्येच एखादं कुत्र किंवा मांजर सगळ्यांना वाकुल्या दाखवत मिळेल त्या जागेतून निसटत जातं, तेव्हा समस्त वाहनचालकांच्या चेहऱ्यावरचा हेवा त्या मुक्या प्राण्यालासुद्धा जाणवण्यासारखा असतो. रस्त्याकडेची झाडं या कृत्रिम प्रकाशानं जास्त काळवंडल्यासारखी वाटतात.  आकाश मात्र संथपणे मार्गक्रमण करत असतं.   

गुंता सुटण्याची वाट पहात असतानाच गुंता वाढत जातो. तसंतसं माणसांचे चेहरे विलक्षण बोलके होतात. आता स्वतःचा आवेग सहन करणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. मग ते आपसांत धुमसू लागतात. दिवसभराचा सगळा ताण बाहेर येतो. प्रत्येकाची ठेवण वेगळी पण भाव एकसारखेच वाटतात. तणावाची एकलय साधली जाते. ही लय माझ्यातल्या ‘ मी ‘ ला जाणवते. कुठेतरी वातावरणातला ताण माझ्या मनातल्या ताणाशी सम पावतो. आत ताण… बाहेर ताण… आता ताणाशिवाय दुसरं काहीच नाही… ना लपवण्यासारखं ना दाखवण्यासारखं. ताणातून बाहेर पडायलाही पुन्हा ताणच. 

माझ्यातला तटस्थ हे सारं निरखत असतो. पण तो या कशालाच प्रतिसाद देत नाही. ना तो हे नाकारतो  ना स्वीकारतो.  हा ताण मला मग हळूहळू स्थिरता देतो.  मी त्याच्या सहवासात  मोकळी होते. माझं मोकळेपण तो स्वीकारतो. आणि हळूहळू सगळ्या वातावरणात तो मोकळेपणा फैलावतो.  मग ताणाचं रूप बदलतं. आणि माझं मन शांत, समंजस होत जातं.  ट्रॅफीक सुटतं. 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments