मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पर्वती चा वर्धापन दिन… श्री रमेश भागवत – संकलन श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ पर्वती चा वर्धापन दिन… श्री रमेश भागवत – संकलन श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

१७ मे — पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या #पर्वती चा वर्धापन दिन.

वैशाख शुध्द पंचमी हा पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराचा स्थापना दिवस.

— मातुश्री काशीबाई बाजीराव पेशवा यांनी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आज्ञेप्रमाणे चिरंजीव श्रीमंत नानासाहेब पेशवा व त्यांच्या पत्नी श्रीमंत गोपीकाबाई पेशवा यांनी सन १७४९ मध्ये या दिवशी श्री देवदेवेश्वराची स्थापना केली. याला आज दिनांक १७ मे २०२३ रोजी २७४ वर्ष पूर्ण होत आहेत. या दिवशी आद्य शंकाराचार्य जयंती सुध्दा साजरी केली जाते. हिंदू धर्मातील विविध पंथाना एकत्र आणण्यासाठी श्री शंकराचार्यानी पंचायतन पूजा पध्दती निर्माण केली अशी मान्यता आहे. त्यांच्या चतुर कल्पकतेचे पर्वतीवरील श्री देवदेवेश्वर शिवपंचायतन हे एक उदाहरण असून या पंचायतनामधे वायव्य कोप-यात मूळ देवी श्रीपर्वताईदेवी या तावरे घराण्याच्या कुलस्वामीनीचाही समावेश करण्यात आला आहे.

पुण्याचाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानचा मानबिंदू असलेले पर्वती हे एक ठिकाण आहे. पेशवाईतील किंबहुना मराठेशाहीतील सर्व चढ-उतार या देवस्थानाने अनुभवलेले आहेत. याची एक मुकी साक्ष पर्वतीवर चाफ्याच्या झाडाच्या रूपाने अजूनही उभी आहे, कारण त्या झाडालाही अंदाजे २५० वर्ष पूर्ण झालेली आहेत. पर्वतीचे आताचे दिसणारे स्वरूप हे विविध पेशव्यांनी त्यांच्या कारकीर्दीतच पूर्ण केलेले आहे.

पर्वती हे पुणेकरांना उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी मदत करणारी व्यायाम शाळा आहे असे म्हणणे उचित ठरेल. असंख्य यु. पी. एस. सी., एम. पी. एस. सी. स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थ्यासह जेष्ठ नागरिक, तरुण मंडळी पर्वतीवर सकाळ संध्याकाळ अंगमेहनत करतांना दिसतात. तसेच गेली कित्येक वर्ष हनुमान व्यायाम मंडळ, पसायदान मंडळ, पर्वती मंडळ आपल्या परीने पर्वतीचे महत्व अबाधित ठेवण्याचा प्रयत्न संस्थान- -बरोबर करत आहेत.

१९५० साली पर्वतीच्या आजूबाजूस काही भागावर वन खात्याने वनीकरण करून वृक्ष जोपासना केली आहे. तसेच मध्यंतरीच्या काळात कै. डॉ. रमेश गोडबोले व श्री देवदेवेश्वर संस्थानने संस्थानच्या जागेत वृक्षारोपण केले आहे. हाच वारसा गेल्या पाच सहा वर्षापासून ‘ पर्वती हरितक्रांती संस्था ‘ यांच्या माध्यमातून पुढे उत्तम प्रकारे सुरू आहे. पर्वतीचे जुने स्वरूप कायम ठेऊन पर्वतीवर सध्या स्थानिक आमदार व नगरसेवक यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत.

पानिपताच्या पराभवाचा धक्का सहन न होऊन श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर देह ठेवला. त्यांचे व पानिपत रण संगामात बलिदान दिले अशा शूर वीरांचे स्मारक पर्वतीवर उभारले जाणार आहे. १४ जानेवारी २०१५ रोजी त्याची प्रतिकात्मक सुरुवात विद्यमान पेशवे कुटुंबियांच्या हस्ते जरीपटका लावून करण्यात आली आहे. या ठिकाणी इतिहास आधारभूत पानिपत युद्धात वीरमरण आलेल्या २६५ योद्ध्यांचा नामनिर्देश करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात येथे युध्द स्मारक करण्याचे काम प्रगतीपथावर असून या ठिकाणी संरक्षणासह इतर सेवा दलातील राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांची नोंद घेण्याचा प्रयत्न आहे.

तसेच इसवी सनाच्या सुरवातीपासून महाराष्ट्रावर राज्य केलेल्या विविध घराण्यांचा त्यांच्या कारकीर्दीच्या कालखंडासह त्यांनी केलेला पराक्रम म्युरलच्या स्वरूपात उभारण्यात येणार आहे.

पर्वतीची महती ही पुणेकरांसह सर्वांनाच आहे हे सांगणारे उत्तम उदाहरण म्हणजे श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत पर्वतीचे तत्कालीन अव्वल कारकून श्री चिंतामण भिकाजी डिके यांनी सन १९१४ साली लिहिलेली पर्वती संस्थानाचे वर्णन ही पुस्तिका.

स्वातंत्र प्राप्तीनंतर १९५० मध्ये श्री देवदेवेश्वर संस्थान सार्वजनिक विश्वस्त निधि (Public Trust) म्हणून नोंदले गेले. मा. जिल्हाधिकारी, पुणे, हे संस्थानचे पदसिध्द विश्वस्त असून यांच्या समवेत इतर प्रतिष्ठित पंच मंडळी संस्थानचा कारभार पहातात.

श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत पर्वतीवरील मंदिरे, वास्तुसह पुण्यातील इतर मंदिरे — 

श्री देवदेवेश्वर मंदिर, श्री विष्णू मंदिर, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर, श्री कार्तिकस्वामी मंदिर, श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा वाडा व निधनस्थान, पेशवेकालीन अनेक सुंदर आणि प्रेक्षणीय वस्तूंचा संग्रह असलेले पेशवा संग्रहालय. इतर मंदिरे– श्री सिध्दिविनायक मंदिर, सारसबाग, श्री दशभुजा गणपती मंदिर, पौड फाटा, श्री मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, श्री रमणा गणपती मंदिर लक्ष्मीनगर, श्री काळी जोगेश्वरी मंदिर बुधवार पेठ, श्री राम मंदिर, ७३४ सदाशिव पेठ, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवा यांची समाधी सासवड.

या व्यतिरिक्त पुण्यातील ऐतिहासिक ३४ देवालयांना संस्थानकडून वर्षासन (अनुदान) दिले जाते. या निमित्ताने या संस्थानशी श्री देवदेवश्वर संस्थानचा ऋणानुबंध आहे.

लेखक : श्री रमेश भागवत 

(संस्थानचे विद्यमान विश्वस्त)

संकलन : श्री संजीव वेलणकर

पुणे

प्रस्तुती : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दमलेल्या बापाची कहाणी ऐक मुला… —” ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

श्री कचरू सूर्यभान चांभारे

? विविधा ?

☆ “दमलेल्या बापाची कहाणी ऐक मुला… —” ☆ श्री कचरू सूर्यभान चांभारे ☆

जून महिन्याचा तिसरा रविवार जागतिक पातळीवर सर्वत्र नव्हे, पण संख्येने सर्वाधिक देशात “पितृदिन “ म्हणून साजरा करण्यात येतो. अमेरिका, इंग्लड, जपान, सिंगापूर, फ्रान्स इत्यादी देशात तो आज आहे. रोमालियात मेचा दुसरा रविवार, तर तैवानमध्ये आठ ऑगस्ट, थायलंड ५ सप्टेंबर, ऑस्ट्रेलिया तर न्यूझीलंडमध्ये सप्टेंबरचा पहिला रविवार पितृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. पित्याप्रती ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या भारतात अनुकरण म्हणून अमेरिका इंग्लडप्रमाणे आपण जूनचा तिसरा रविवारच पितृदिन म्हणून साजरा करतो. सांस्कृतिक व पारंपरिक दृष्टीने भारतातला पिता ‘ बाप ‘ म्हणून सदैव सोबतच असतो. बापाच्या मृत्यूनंतरही पितृपक्षात तो पुन्हा पुन्हा अवतरतो. कुटुंब व्यवस्थेत व सामाजिक व्यवस्थेत माता पिता यांना भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान आहे.पाश्चात्यांचे अनुकरण असले तरी संसारगाड्याने दमविलेल्या बाबाबद्दल ऋण व्यक्त करणं उचितच आहे.

पितृदिन साजरा करण्याचा जन्म कसा झाला याची कथा अत्यंतिक शोकांतिक व दर्दनाक आहे. १९०७ साली अमेरिकेतील पश्चिम वर्जीनिया प्रांतातील फेअरमोंट शहरी एका खाणीत झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३६१ खाण कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी मृत कामगारांपैकी सुमारे २५० कामगार असे  होते की जे लहान लहान मुलांचे बाप होते. नियतीने एकाच फटकाऱ्यात हजारो मुलांना अनाथ व शेकडो माता भगिनींना वैधव्य दिलं होतं. हजारोंच्या आक्रोशाने धरणीलाही कंप फुटावा असं झालं होतं. दुःखाचा हा डोंगर विसरणं फेअरमोंट शहराला कदापिही शक्य नव्हतं. या दुःखद घटनेची स्मृति म्हणून ग्रेस गोल्डन क्लेंटन यांनी दरवर्षी सामुदायिक श्रदांजली कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली. दुर्दैवी पित्यांचे सार्वजनिक श्रदांजली कार्यक्रम प्रांताप्रांतातून अमेरिका खंडात व इंग्रजी राजवटीमुळे जगभरात सुरु झाले.१९३० च्या आसपास या दिनाचे रुपांतर पितृदिनात झाले. श्रद्धांजली सभेत कालओघात वुड्रो विल्सन, लिंडन जॉनसन, कूलिज अशा राष्ट्राध्यक्षांची भाषणे झाली. त्यामुळे राजसत्तेचे अधिष्ठान प्राप्त झाले आणि हा दिन कायद्याने सर्वसंमत झाला. अशी झाली पितृदिनाची निर्मिती.

भारतात मात्र माता पिता यांना देवादिकांच्या बरोबरीचे स्थान आहे. पितृसत्ताक पद्धतीत पित्याचे स्थान वरच्या श्रेणीत असले तरी भावनिक दृष्टीने आईला जेवढं सहज जवळतेचं स्थान आहे, तेवढं वडील नावाच्या पोशिंद्यास मात्र नाही. आजचा पिता व मागील काही पिढ्यातला पिता यांमध्ये खूप फरक पडला आहे. मुलानं तोंड उघडायची जागा म्हणजे आई व मुलाचं तोंड बंद व्हायची जागा म्हणजे बाप – असं समीकरण खूप मोठ्या कालखंडापासून अखंड चालत आलेलं आहे. पिता व वडील ही बापासाठी समानअर्थी शब्द योजना असली तरी ‘ बाप ‘ या शब्दाचा गर्भित अर्थ पिता व वडील या शब्दछटेत सापडत नाहीत. बाप तो बापच. काळाच्या ओघात  खडक विरघळावा तसा बाप हळूहळू विरघळतो आहे. पण पारंपारिक पाषाणखुणा अजून काही जात नाहीत. बाप या भावनेकडे करारीपणाचे पेटंट अजूनही आहे. पूर्वीच्या काळी उदरनिर्वाहासाठी खूप कष्ट उपसावे लागत असत. शेती, कारखानदारी, नोकरी या निमित्तानं पुरुषवर्गास, पर्यायाने बापमंडळीस जास्त काळ बाहेरच राहावं लागत असे. साहजिकच बाळास आईचा सहवास जास्त काळ मिळतो. बाळाचा हा काळ शिकण्याचा ,अनुकरणाचा असल्यामुळे बाळावर साहजिकच आईचा प्रभाव जास्त पडतो. त्यामुळे प्रेमरस पाजणारी व चिऊकाऊच्या नावाने घास भरवणारी आई सर्वांनाच आपोआप प्रिय होते. दिवसभराचं भरवणं, करणं नजरेत असल्यामुळे आई खूप आवडते. पण दिनभराच्या भरवणीसाठीचं पित्याचं महिनोनमहिने वर्षानुवर्ष खपणं दुर्लक्षित होतं. बाळाच्या वाढीच्या काळात खेळताना शिकताना काही चुकलं की थांब येऊ दे बाबाला, या महिला वर्गाकडील पिढ्यानपिढ्याच्या धमकीने आईच्या गळ्यात पडून तिच्या केसांना लाडिवाळपणे खेळणारी मुले पित्याच्या छातीवरील केसासोबत खेळलीच नाहीत. आईच्या कडेवर बसणं हे लेकराचं अढळ धृवीय असल्यामुळे बापाच्या कडेवर लेकरु हे मजबूत आसन उदयास आलेच नाही. पित्याचं करारीपण नेहमीच दिसलं, पण दिसलं नाही कधी काळ्या पाषाणात दडलेलं मायासागराचं तीर्थ.

आजचा बाप कुटुंबासाठी दररोजचा अर्जून होऊन रोजच लढतो आहे. बाप म्हणजे कुटुंबाचा ओझोन वायूच. समाजातील वाईट प्रवृतींना कुटुंबाजवळ तो येऊ देत नाही. पूर्वी बाप म्हणजे सर्वोच्च न्यायालय असे. आजी आजोबांकडे एखाद्या प्रकरणात अपील करता येत असे. पण आता आईला खंडपीठाचा दर्जा असल्यामुळे बापपणाला कात्री लागलीय. आजी आजोबांचे अधिकारही आणीबाणीत गोठीत झाले आहेत अन् अपील करण्याची मुभाच नाही, कारण खंडपीठाच्या न्यायमूर्तीला सर्वोच्च न्यायालयावर भरवसा नाही. पण तरीही बाप काही औरच असतो. 

मुलांचे लाड पुरविण्याचा मक्ता आईकडून वडीलाकडे कधी आला ते आईला कळलेच नाही. मुलांनी बेभान होऊन बापाची वाट पाहणं हे बापजन्माचं सार्थक आहे. घराची सुंदरता जपते ती आई, पण हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी सतत झुंजतो तो बाप. दुःखाच्या कल्पनेने हादरते ती आई, पण दुःख छाताडावर पेलून मनातलं आक्रंदन उरातच जिरवितो तो बाप. लेकीच्या काळजीने रोजच हळवी होते ती आई, पण लेकीच्या कल्याणासाठी संपूर्ण हयात झिजवून विवाह मंडपी सगळं आवरल्यावर धाय मोकलून रडतो तो बाप. भावनिक दृष्ट्या बापाच्या वाट्याला चार क्षण कमी येतात, पण बापाच्या कायम जाण्याने आभाळ कोसळलं म्हणतात. हे एक वाक्य बापाचं स्थान सांगण्यास पुरेसं आहे. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी अपमान गिळण्याची ,कष्ट करण्याची तयारी बाप नावाची असते. लेकराबाळाच्या, बायकोच्या डोळ्यातला अश्रूबिंदू त्याच्यासाठी सागरी तुफान असतो. अश्रूच निर्माण होऊ नये म्हणून तो कायम वादळवाटेने धावत असतो. आणि कधीकधी हेच वादळ त्याला गिळतं. 

पेनाचं झाकण म्हणजे बाप, पाण्याच्या टाकीचं झाकण म्हणजे बाप, डब्यांची झाकणं म्हणजे बाप. ही झाकणं आकाराने छोटी असतात पण उघडंपण येण्यापासून वाचवतात. झाकणं नसतील तर या वस्तू अडगळीत जातात. बाप हे कुटुंबाचं झाकणच. झाकण खराब झालं ,वाकडंतिकडं झालं की त्याची आवरणमूल्यता संपते.  तसंच बाप हे झाकण व्यसनानं, विकृतीनं बिघडलं की कुटुंबाला किडेमुंग्या लागायला वेळ लागत नाही.

विभक्त कुटुंब पद्धती  व अर्थाला लाभलेला उच्चकोटीचा भाव, अर्थकारणावरच आधारलेली शिक्षण पद्धती, जीवनपद्धती यामुळे आजचा बाबा खूप दमलाय. धावपळीमुळे त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नाही. संगोपनाच्या भाराने बाप आता झुकलाय. दमलेल्या बाबाची कहाणी सगळ्यांनी समजून घ्यायला हवी.

… डोंगराएवढ्या आभाळमायेच्या ‘बापभावनेला सलाम करावा वाटतो.

© श्री कचरू सूर्यभान चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तार… लेखक : श्री जयंत कोपर्डेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ तार… लेखक : श्री जयंत कोपर्डेकर ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

अगदी लहानपणापासून हा दोन अक्षरी शब्द जिवाभावाचा वाटत आलाय. नकळत्या वयापासून तो ऐकत आहे. पुढे हळूहळू त्याचा अर्थ कळू लागला. पोस्टमन तार घेऊन यायचा. दारातूनच ” तार आली ” असे ओरडायचा. आणि मग घरातले सगळेच दरवाज्याकडे धावायचे. सगळ्यांच्याच डोळ्यापुढे अनेक प्रश्नचिन्हे उभे राहायची. हृदय जास्तच जोरात धडधडायचे. अनेक उलटसुलट विचार प्रत्येकाच्या डोक्यात पिंगा घालू लागायचे. प्रत्येक जण आपापल्या परीने तारेत काय मजकूर असेल याचा अंदाज बांधू लागे. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर काळजी दिसू लागे. चांगला विचार क्वचितच कोणाला तरी यायचा. पण बाकी सारे गंभीर व्हायचे.

मग घरातले मोठे कोणीतरी हळूच पुढे व्हायचे. प्रश्नार्थक मुद्रेने पोस्टमन कडून तार हातात घ्यायचे. 

त्याच्या कागदावर सही करायचे आणि मग धडधडत्या अंतकरणाने ती तार उघडून वाचायचे. अंतर्देशीय पत्रा प्रमाणे ती तार असे. त्यावर इंग्रजीत टाईप केलेल्या पट्ट्या चिटकवलेले असायच्या. पोस्टमन मात्र तिथेच घुटमळायचा. मग त्याला बक्षीस दिले की तो जायचा. या वेळेपर्यंत सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेली असायची. मग तो मोठा जाणता माणूस ती तार वाचायचा. आणि त्याचा अर्थ मराठीत सर्वांना सांगायचा. आणि मग घरातले वातावरण एकदम बदलून जायचे. 

पूर्वी दोन मुख्य कारणासाठी तार पाठवली जायची एक म्हणजे कोणीतरी परीक्षा पास झाले अथवा कुणाचेतरी लग्न ठरलेले असायचे. आणि दुसरे कारण म्हणजे कुणाच्यातरी मृत्यूची बातमी असायची. आणि मग त्यानुसार घरातले वातावरण बदलायचे.

त्याकाळी फोन फक्त पोस्टातच असायचा. पण संदेश पाठवण्यासाठी तारेचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायचा. प्रत्येक पोस्टात पितळेचे एक छोटे यंत्र बसवलेले असायचे. त्यावर काळा प्लास्टिकच्या गोल गोळा असायचा. तार येताना किंवा पाठवताना त्यावर ऑपरेटर ठराविक पद्धतीने बोटाने दाबून संदेश पाठवला जायचा. कट्ट…….कडकट्ट…….कट्ट…….कडकट्ट . असा काहीसा त्याचा आवाज यायचा. ते बघणे तो आवाज ऐकणे फारच छान वाटायचे. 

तार पाठवायची असल्यास पोस्टाचा एक फॉर्म भरून द्यावा लागे. पाठवणाऱ्याचे नाव पत्ता, ज्याला पाठवायचे त्याचे नाव पत्ता व मजकूर लिहावा लागे.  किती शब्द झाले त्यावर पोस्टमास्तर फी आकारायचे. व एक छोटी पावती द्यायचे. तार केव्हा पोहोचेल हे मात्र सर्व जण आवर्जून विचारायचे.

काही ठराविक मेसेज पोस्टात रेडी असायचे. उदाहरणार्थ, १) दिवाळी शुभेच्छा. २) लग्नाच्या शुभेच्छा. ३) नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ४) मुलगा झाला. वगैरे. मग  मजकूर लिहिण्या ऐवजी फक्त तो नंबर लिहावा लागायचा. त्यामुळे पैसे पण कमी लागायचे.

खरे तर युद्धात संदेश पाठवण्यासाठी तारेचे उपयोग करीत होते. नंतर मात्र तार सर्वांचीच लाडकी झाली. आता संदेश पाठवण्याची अनेक साधने विकसित झाली आहेत. त्यामुळे तार मागे पडली. आणि आता तर ती इतिहासजमा झाली आहे.

पण हसू आणि आसू घेऊन येणारी ती तार त्याकाळी सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय होती.

लेखक : श्री जयंत कोपर्डेकर

पुणे.

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चांगदेव पासष्ठी – भाग-12… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ चांगदेव पासष्ठी – भाग-12…  ☆भावानुवाद-  सुश्री शोभना आगाशे ☆

या आपुल्या भेटीद्वारे अरूप

तुज दाविले तव आत्मस्वरूप

निजप्रकाशे पाही दीप स्वरूप

तैसे पाही तू तव ब्रम्हस्वरूप॥५६॥

 

उघडी तव अंतःचक्षु चांगया

कार्यकारण जाण भेटी या॥५७॥

 

महाप्रलयी पाणी जैसे दावी

सर्वात्म एकरूपता एकार्णवी

उगम, प्रवाह, संगम न उरे

न राहती नामे, रूपे, आकारे

एकरूप होती एकमेकांशी

तसेच हो समरूप अर्णवांशी

तसाच तूही उगम तुझा गिळुनि

तद्रूप हो अज्ञान सर्व सांडुनि॥५८॥

 

नाम रूपा वेगळे आत्मस्वरूप

हो सुखी जाणुनि स्वानंद रूप॥५९॥

 

नश्वर देह, रूप, मन, बुद्धी

सांडुनि, जाण आत्मसिद्धी

अंतःकरणी येता ही ज्ञानसंपत्ती

ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान न राही त्रिपुटी

सच्चिदानंद पदी आरूढ होवा

सांगे ज्ञानया तुजप्रती चांगदेवा॥६०॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-2 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…) 

इतर सेवेबरोबरच धार्मिक सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात गुरव आणि मस्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते.

गाव वाढला की व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. प्राचीन काळी गाव हा स्वयंपूर्ण घटक होता. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे करण्याकरिता आलुतेदार आणि बलुतेदार आले. पारंपरिक कामगार म्हणजे आलुतेदार. ज्यामध्ये जंगम, गोंधळी, कोळी, सुतार, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, वेसकर यांचा समावेश होता. तर बलुतेदार म्हणजे मोबदला घेऊन सेवा देणारे. यात जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणी, न्हावी, परीट, मांग व चांभार. गावची शेती व त्याला एक मानून त्या शेतीचे म्हणजे गायीचे वाटेकरी म्हणजे आलुते-बलुते आले. त्यांच्या दर्जानुसार त्यांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास याप्रमाणे मोबदला मिळायचा. अर्थात त्यांचा मोबदला धान्याच्या स्वरूपात होता. एका नांगरामागे दोन पाचुंदे, तीन पाचुंदे बलुतेदारांना खळ्यावरच द्यावे लागायचे. अर्थात गरिबांना त्याची स्वत:च रास करावी लागायची. आताचे सरकार थेट धान्यच देते. चलनवापर नगण्य होता. परंतु तेही सोन्या-चांदीचे असल्याने त्याची पारख करण्याकरिता सोनार घेण्यात आला. त्याला पोतदार म्हटले गेले.

दहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश आणि मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करण्याचे काम करावे लागे. याचबरोबर आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे. त्यामुळे संरक्षणातून व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. त्यांना इतरही अधिकारी मदतीला आले. वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.

देशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा नाडकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची. परंतु एकदा त्याला खुश केले की, ही मंडळी राजाच. छत्रपती शिवरायांनी या वतनदारावर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे स्वतंत्र अधिकारी नेमून राज्याची व्यवस्था लावली.

पुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही . 

हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत. 

असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.

– समाप्त – 

© प्रा. डॉ. सतीश कदम

इतिहास संशोधक,व्याख्याते

मो.क्र.9422650044 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-1 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आपली आडनाव पडली तरी कशी? – भाग-1 ☆ प्रा. डॉ. सतीश कदम ☆

(पूर्वीपासून आतापर्यंत सर्व इतिहास…) 

माणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती झाली. पुढे माणूस स्थिर स्थावर झाल्यावर नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अशा रीतीने गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा झाली. त्याला वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार या संज्ञा प्राप्त झाल्या.

प्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकारते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.

वतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात. महाराष्ट्रातील वतनदारांचा दर्जा आणि त्यांना करावी लागणारी कर्तव्ये पुढीलप्रमाणे-

पाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. 

१) पोलिस पाटील 

२) मुलकी पाटील. 

गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले… उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा. 

चौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक सनदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत (गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा.

गाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती – त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे याला पण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकर्ण्यांच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले.

–क्रमशः भाग पहिला. 

© प्रा. डॉ. सतीश कदम

इतिहास संशोधक,व्याख्याते

मो.क्र.9422650044 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद : मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते ५ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २६ (अग्निसूक्त) – ऋचा १ ते ५

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – अग्नि

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सव्विसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अग्नी देवतेला आवाहन केलेले  असल्याने हे अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी अग्निदेवतेला उद्देशून रचलेल्या पहिल्या पाच ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद ::

वसि॑ष्वा॒ हि मि॑येध्य॒ वस्त्रा॑ण्यूर्जां पते । सेमं नो॑ अध्व॒रं य॑ज ॥ १ ॥

हे पंचाग्नी समर्थ देवा विभूषित व्हावे

दिव्य लेवुनीया वसनांना सज्ज होउनी यावे

भक्तीभावाने मांडियले आम्ही यज्ञाला 

तुम्हीच आता न्यावे यागा संपन्न सिद्धिला ||१||

नि नो॒ होता॒ वरे॑ण्यः॒ सदा॑ यविष्ठ॒ मन्म॑भिः । अग्ने॑ दि॒वित्म॑ता॒ वचः॑ ॥ २ ॥

अग्निदेवा हे चिरतरुणा दिव्यकांतिदेवा

स्तुतिस्तोत्रांनी अर्पण करितो अमुच्या भक्तीभावा

श्रवण करोनी या स्तोत्रांना यज्ञवेदी धावा

हविर्भाग हे सर्व देवतांना नेउनि पोचवा ||२||

आ हि ष्मा॑ सू॒नवे॑ पि॒तापिर्यज॑त्या॒पये॑ । सखा॒ सख्ये॒ वरे॑ण्यः ॥ ३ ॥

अपत्यासि तू असशी पित्यासम सगा सोयऱ्यांशी

जिवलग स्नेही तू तर असशी सखा होत मित्रांशी

गार्ह्यपत्य हे देवा तू तर अमुचाची असशी

कृपा करोनी यज्ञा अमुच्या सिद्धिप्रद नेशी ||३||

आ नो॑ ब॒र्ही रि॒शाद॑सो॒ वरु॑णो मि॒त्रो अ॑र्य॒मा । सीद॑न्तु॒ मनु॑षो यथा ॥ ४ ॥

यज्ञयाग संपन्न करण्या मनुज होई सिद्ध

आसन घेउनिया दर्भाचे आहुतीस सिद्ध 

मित्रा वरुणा आणि अर्यमा तुम्हासी आवाहन

प्रीतीने येऊनीया स्वीकारावे दर्भासन ||४|| 

पूर्व्य॑ होतर॒स्य नो॒ मन्द॑स्व स॒ख्यस्य॑ च । इ॒मा उ॒ षु श्रु॑धी॒ गिरः॑ ॥ ५ ॥

पुराणपुरुषा देवांच्या प्रति करिसि हवी अर्पण

तुमच्या चरणांवरती केला आम्ही हवी अर्पण

तुम्हासी लाभावा संतोष म्हणून हवी अर्पण

कृपा करावी आम्हांवरती प्रार्थना करा श्रवण ||५|| 

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे..या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/cgy-mZszNew

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 26 Rucha 1 – 5

Rugved Mandal 1 Sukta 26 Rucha 1 – 5

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जोशीमठ’ च्या निमित्ताने… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘जोशीमठ’ च्या निमित्ताने… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

समुद्राच्या लाटांमध्ये पाऊलभर पाण्यात कधी उभे राहिले आहात का हो ? लाट जेव्हा सरसर मागे फिरते, तेव्हा शब्दशः तुम्हारे पैरोतलेसे जमीन खिसक जाती हैं । उत्तराखंडमधील जोशीमठात गेले वर्षभर हीच परिस्थिती आहे.

भौगोलिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेले जोशीमठ हा बद्रीनाथ, हेमकुंड साहेब, अनेक ट्रेकिंगचे मार्ग, आऊली स्किईंग – या आणि हिमालयातील अशा अनेक ठिकाणांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वाभाविकरीत्या, दरवर्षी येथील पर्यटकांचा ओघ वाढत गेला आणि मागणी – पुरवठा नियमानुसार जोशीमठ येथील infrastructure सोयी – रस्ते, इमारती, हॉटेल्स यांच्या संख्या वाढत गेल्या. महामार्ग मोठे होत गेले, जलविद्युत प्रकल्प उभे राहू लागले. 

दुर्दैवाने हा सगळा डोलारा ज्या पायावर उभा होता / आहे, तो पायाच कमकुवत आहे. भूस्खलनातून वाहून आलेल्या दगडमातीवर जोशीमठ वसलेले आहे. त्यामुळे हा पायाच अस्थिर आहे. नव्या जमान्यातील ही हाव भागवण्याचा ताण या भूस्तराला पेलवत नाहीये. रस्ते, इमारतींचे पाये खणताना, बोगदे खोदताना लावलेले सुरुंग, हा आधीच नाजूक असलेला समतोल वेगाने ढासळवत आहेत. शहरीकरणासाठीची जंगलतोड जमिनीला धरून ठेवणाऱ्या मुळांच्या मुळावर उठली. झालेली हानी निसर्ग स्वतःहून भरून काढतो, पण निसर्गाला तेवढा recovery time दिलाच गेला नाही.

… आणि आज अख्खं ‘ जोशीमठ ‘ गावच्या गाव जीव मुठीत धरून आहे. चकाचोंद आणि भरभराटीच्या नादात मूलभूत अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. आपण खूप सहजपणे सरकार, व्यापारी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहोत. 

… पण, आपण क्षणभर थांबून विचार करूया का ? 

… आपल्या सगळ्यांचाच जोशीमठ होतो आहे का ?

टार्गेटस्, डेडलाइन्स, प्रोजेक्ट्स, इंक्रीमेंट्स, प्रमोशन, बदल्या, फिरतीच्या नोकऱ्या – या मागणी पुरवठा चक्रात, या सगळ्या चकाचोंदच्या मागे धावताना आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठिकाणावर राहते आहे का ? आपला समतोल ढासळत आहे का ? झालेली हानी शरीर नैसर्गिकरीत्या भरून काढतं. पण आपण शरीराला तेवढा recovery time देत आहोत का ?

 …. आणि ज्या धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठानासाठी हिंदुस्तान दूनियाभरात नावाजला जातो, तो आपला पाया मजबूत आहे का ? इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या नादात आपण शुभम् करोति, रामरक्षा विसरलो आहोत का ?  टीव्ही वरच्या मालिकांमध्ये, जाहिरातींमध्ये आपल्या धर्माची, संस्कृतीची, पूर्वजांची निराधार खिल्ली उडवली जाते तेव्हा आपणही दात काढून फिदी फिदी हसतो का ? आपल्या रूढी परंपरांची टोपी उडवणारे व्हॉट्सॲप मेसेज आले की आपण ते पाठवणाऱ्यांना कडक शब्दांत समज देतो का आपणही ते मेसेज पुढे ढकलतो ?

… जोशीमठाबाबतीत कदाचित आपल्याला खूप उशीर झाला आहे. Irreversible damage – न भरून येणारे, न सुधारता येणारे नुकसान झाले आहे.

… तुमच्या वैयक्तिक जोशीमठाची काय स्थिती आहे ? पुनर्वसन होऊ शकेल ना ? ऱ्हास थांबवता येईल ना ? …… 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मंदिरांचं विज्ञान — जगन्नाथ मंदिर, पुरी…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “मंदिरांचं विज्ञान — जगन्नाथ मंदिर, पुरी…” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

भारतातील अनेक मंदिरांना खूप मोठा इतिहास आहे. काही मंदिरांचा इतिहास तर त्यांच्या निर्मितीच्याही आधीचा आहे. मंदिर कुठे उभारायचं ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना अनेक बाबींचा सखोल विचार आणि अभ्यास केला गेला. ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं तिथलं वातावरण, तिथल्या नैसर्गिक गोष्टी तसेच पुढे येणाऱ्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींचा अभ्यास केला गेल्यावर ज्या ठिकाणी ह्या गोष्टी जुळून येतील अशा ठिकाणी भव्य दिव्य मंदिरांची निर्मिती केली गेली. ही निर्मिती करताना कळलेल्या तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड देऊन अशा ठिकाणांचं महत्त्व धार्मिक दृष्टीने वाढवलं गेलं. खंत एकच की ह्यातलं तंत्रज्ञान ह्या श्रद्धेमुळे येणाऱ्या पुढच्या काळात लुप्त झालं आणि परकीय आक्रमणांनी भारताच्या अनेक पिढ्यांच्या तंत्रज्ञानातील समृद्धीची वाट लावली. 

श्रीकृष्णाला आणि त्याच्या भावंडांना वाहिलेलं एक मंदिर भारतात गेल्या ९०० वर्षांहून जास्ती काळ उभं आहे. जगन्नाथ, बलराम, सुभद्रा ह्या तीन देवतांना समर्पित असलेलं पुरी, ओरिसा इथलं जगन्नाथ मंदिर ! 

आपल्या रथयात्रेसाठी जगभर प्रसिद्ध असणारं हे मंदिर अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेलं आहे. आत्ता जे मंदिर उभं आहे त्याची निर्मिती साधारण १२ व्या शतकात इ.स. १११२ च्या आसपास झाली असावी असा अंदाज आहे. हे मंदिर आत्तापर्यंत १८ वेळा लुटलं गेलं आहे. इतकं लुटूनसुद्धा आजही ह्याच्या खजिन्यामध्ये जवळपास १२० किलोग्राम सोनं तर २२० किलोग्रॅमपेक्षा जास्त चांदी आहे. ज्याची किंमत कित्येक कोटी रुपयांमध्ये आहे. ह्याशिवाय अनेक अमूल्य रत्नेही त्याच्या खजिन्याचा भाग आहेत. 

ह्या पूर्ण मंदिराचं क्षेत्र जवळपास ४००,००० चौरस फूटात सामावलेलं आहे. मुख्य मंदिर हे कर्व्हीलिनियर आकारात असून त्याची उंची जवळपास २१४ फूट (६५ मीटर ) आहे. ह्याच्या शिखरावर एक चक्र ज्याला नील चक्र असंही बोललं जाते, ते बसवलेलं आहे. हे नील चक्र अष्टधातूंनी बनवलेलं आहे. ११ मीटर चा घेर आणि ३.५ मीटरची उंची असलेलं हे चक्र जवळपास वजनाने १००० किलोग्रॅमपेक्षा जास्त आहे. हे चक्र ९०० वर्षांपूर्वी ६५ मीटर उंचीवर कसं नेलं गेलं असेल हे अजूनही एक रहस्य आहे. 

आधी म्हटलं त्याप्रमाणे मंदिराची जागा निवडताना अनेक गोष्टींचा अभ्यास त्या काळी केला गेला होता. भारताच्या ज्या भागात पुरी मधलं जगन्नाथ मंदिर आहे तो भाग शंखाच्या आकाराचा आहे. शंख आणि चक्र ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी विष्णूच्या मूर्तीत आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. म्हणूनच ह्या भागाला शंख क्षेत्र म्हटलं जातं. ह्याशिवाय ह्या जागेची निवड करताना इथल्या काही नैसर्गिक गोष्टींवर खूप अभ्यास केला गेला आहे. जगात कुठेही दिवसा हवा समुद्रावरून जमिनीच्या दिशेने वाहते तर रात्री ह्याविरुद्ध म्हणजे जमिनीवरून समुद्राकडे वहाते. पण ज्या ठिकाणी हे मंदिर आहे तिकडे नेमकं उलट घडतं. जगन्नाथ मंदिराच्या इथे दिवसा हवा जमिनीवरून समुद्राकडे वाहते तर रात्री उलट्या दिशेने म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वाहते. 

जगन्नाथ मंदिराच्या भोवती अनेक रहस्यं गुंफली आहेत. त्यातली काही महत्त्वाची आहेत ती म्हणजे इकडे देवळाचा फडकणारा झेंडा हा वाऱ्याच्या उलट्या दिशेला फडकतो. ज्या दिशेला वारा वाहतो त्या दिशेला झेंडा फडकायला हवा पण इकडे नेमका तो उलट दिशेला फडकतो. तसेच ह्या मंदिरावरून काहीच उडत नाही. ह्या मंदिरावरून कोणतेच पक्षी उडत नाहीत किंवा मंदिराच्या शिखराचा आसरा घेत नाहीत. तसेच ह्या मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही. दिवसाची कोणतीही वेळ घेतली तरी ह्याच्या शिखराची सावली जमिनीवर पडत नाही. ह्यामागे श्रद्धा आणि चमत्कार लोकांनी म्हटलं असलं तरी मंदिराच्या जागेची निवड आणि मंदिर बांधण्यामागील तंत्रज्ञान ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. 

भारतातल्या मंदिरांची शिखरं ही वर निमुळती होतं जाणारी आणि साधारण चपटी असलेली बांधली जातात. पण जगन्नाथ मंदिर ह्याला अपवाद आहे. हे मंदिराचं शिखर थोडफार गोलाकार स्वरूपात बनवलं गेलं आहे. देवळाच्या शिखरावर फडकणारा झेंडा उलट दिशेला फडकण्यामागे ह्या मंदिराचा आकार कारणीभूत आहे. ह्या मंदिराच्या आकारामुळे इथे ‘कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट’ बघायला मिळतो. एकसंध वाहणाऱ्या एखाद्या गोष्टीच्या प्रवाहात जर आपण टोकेरी नसलेली साधारण गोलाकार एखादी गोष्ट आणली तर त्याच्या प्रवाहात त्या वस्तूमुळे बदल होतो आणि हा बदल अगदी विरुद्ध दिशेने असतो. त्यामुळे हवा वाहताना मंदिराच्या साधारण गोलाकार असणाऱ्या शिखराला आदळून ‘कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्ट’ तयार करते. ज्यामुळे काही भागात हवा उलट्या दिशेचा प्रवाह निर्माण करते. हाच विरुद्ध दिशेचा प्रवाह झेंड्याला हवेच्या अगदी विरुद्ध दिशेला फडकवतो. 

a Kármán vortex street (or a vonKármán vortex street) is a repeating pattern of swirling vortices, caused by a process known as vortex shedding, which is responsible for the unsteady separation of flow of a fluid around blunt bodies. Vortex shedding happens when wind hits a structure, causing alternating vorticies to form at a certain frequency. This in turn causes the system to excite and produce a vibrational load.

ह्या मंदिरामुळे निर्माण होणाऱ्या कर्मन व्हॉर्टेक्स्ट इफेक्टमुळे कदाचित पक्षी सुद्धा उडण्यास कचरत असावेत असा एक अंदाज आहे. कारण प्रत्येक पक्षी हा हवेच्या प्रवाहाच्या बदलांबाबत अतिशय ज्ञानी असतो. कदाचित ह्या शिखराच्या आजूबाजूला हवेत होणाऱ्या बदलांमुळे उडण्याची क्रिया करण्यासाठी त्यांना अडचण येत असावी. त्यामुळेच ह्या शिखराच्या आसपास पक्षी उडताना दिसत नाहीत. ह्या मंदिराच्या शिखरावर जे नील चक्र आहे ते पूर्ण पुरी मधून बघताना कुठूनही तुम्हाला ते समोरून बघत आहात असेच दिसून येते. ह्या मागे कारण आहे ते पुरी शहराची रचना आणि त्याला अनुसरून मंदिराचं केलेलं बांधकाम. ज्या भागातून ह्या चक्राचा बाजूचा भाग दिसण्याची शक्यता आहे. त्या सर्व भागात एकतर तुरळक वस्ती आहे किंवा मंदिराच्या आसपास असणाऱ्या इतर इमारतींमुळे मंदिराचं शिखर दिसत नाही. त्यामुळेच जिथे लोकवस्ती अथवा जिथून मंदिराच्या शिखराचं दर्शन होतं त्या सर्व भागातून चक्र आपण समोर बघत आहोत असा भास होतो. 

नील चक्र जे मंदिराच्या शिखरावर बसवलं गेलं आहे, ते अष्टधातूंच्या संयुगातून बनवलं गेलं आहे. त्यामुळे आज ९०० वर्षांनंतरही समुद्रावरून येणाऱ्या खाऱ्या हवेला मात देत टिकून आहे. मंदिराच्या सिंघ दारातून प्रवेश करताच कानावर आदळणारा लाटांचा आवाज अचानक नाहीसा होतो. जेव्हा आपण पुन्हा बाहेर पडू तेव्हा लाटांचा आवाज आपल्या कानावर पडतो. असं होण्यामागे मंदिराच्या निर्माणात वापर केलेल्या दगडी तंत्रज्ञानांचा समावेश आहे. इकडे दगड असे वापरले गेले आहेत की ज्यामुळे बाहेरून येणाऱ्या ध्वनीलहरी आतमध्ये शिरत नाहीत. त्यामुळे मंदिराच्या आत शिरताच आपल्याला अचानक आवाज नाहीसा झाल्याचा अनुभव येतो. 

कर्मन व्हॉरटेक्स्ट इफेक्ट असो वा पुरीच्या कोणत्याही भागातून दर्शनी दिसणारं नील चक्र असो. ह्या मंदिराची निर्मिती करताना त्याच्या बांधकामाची सावली ही त्याच्या बांधकामावर पडते. त्यामुळे जमिनीवर सावली  दिसणार नाही अश्या पद्धतीने केलेलं बांधकाम. प्रत्येक गोष्टीची निवड ही पूर्ण विचारांती मंदिर निर्माण करताना केली गेली आहे. ह्या गोष्टींना जगन्नाथाच्या शक्तीचं रूप दिलं असलं तरी मंदिर उभारताना वापरल्या गेलेल्या उच्च तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालेलं आहे. जागेची निवड ते मंदिराचा आकार आणि ते उभारताना वापरल्या गेलेल्या विज्ञानामुळे आजही इतके वर्षांनंतर हे मंदिर आपल्या सोबत अनेक रहस्यं घेऊन दिमाखात उभं आहे. रथयात्रेसारखी जवळपास १८०० वर्षांची परंपरा असलेली यात्रा जितकी जगभरात ‘जगन्नाथ पुरी’ ची शान आहे, तितकंच ह्या मंदिराच्या निर्मितीमागचं विज्ञान आणि तंत्रज्ञान !!! 

शब्दांकन : विनीत वर्तक 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिया जलाना कहाँ मना है?… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

दिया जलाना कहाँ मना है ?… ☆ श्री संभाजी बबन गायके 

—’हा अग्निदाहो न संभवे !‘ 

कफी तिचं नाव….तिच्या वडीलांचं त्या तिघांशी काही कारणांनी भांडण झालं होतं. ती अवघ्या तीन वर्षांची होती तेंव्हा. ते तिघे तिच्या घरापाशी आले….ती अंगणात खेळत होती आपल्या मैत्रिणींसोबत..होळीचा सण होता…रंगांची उधळण सुरू होती….या रंगांमध्ये अचानक रक्ताचा लाल भडक रंग मिसळला गेला….त्या तिघांपैकी कुणीतरी एकानं तिच्या चेह-यावर कसला तरी द्र्वपदार्थ फेकला आणि ते पळून गेले…अ‍ॅसिड होतं ते! एखाद्या सुंदर गुलाबपुष्पावर निखारे पडावेत तसं झालं क्षणार्धात. या नाजूक फुलावरच्या दोन नेत्रपाकळ्या जळून गेल्या. मुखकमल काळवंडून गेले होतेच. जीव मात्र बचावला. पण हे असं जिवंत राहणं किती वेदनादायी असतं हे ज्याचं जळतं त्यालाच कळतं! 

सामान्य दुकानदार असणा-या तिच्या बापानं कंबर कसली. भारतातल्या सर्व मोठ्या इस्पितळांत तिला उपचारांसाठी दाखल करताना त्याच्याजवळची होती नव्हती ती सर्व पुंजी समाप्त झाली. त्यानं मग तिला जिल्ह्याच्या गावी आणलं….पोटाची खळगी भरण्यासाठी तिथल्या न्यायालयात झाडू मारण्याचं काम स्विकारलं. न्यायालयाचं आवार साफ करणा-या या बापाला त्या न्यायालयात न्याय मात्र मिळू शकला नाही. पोलिसी यंत्रणांच्या मर्यादांमुळे आणि कायद्यातील नागमोडी पळवाटांमुळे तिचे दुश्मन दोनच वर्षांत तुरूंगाबाहेर आले…..ती मात्र अंधाराच्या कोठडीत जेरबंद होऊन खितपत पडली. जिंदगी थांबत नाही. या धावपळीत ती आठ वर्षांची झाली. तिला पहिलीच्या वर्गात  शाळेत दाखल केलं गेलं तिला पण अभ्यासाचं गणित काही जमेना. कारण ती बघू शकणा-या मुलांची शाळा होती. तोपर्यंत बापाचे वीस लाख खर्च झाले होते. कफी आठ वर्षांची झाली होती. राक्षसी दुनियेत काही देवदूतही लपून बसलेले आहेत….त्यांनी साहाय्य केले त्यांच्यापरीने. बापाने मग तिला मोठ्या शहरात आणलं. डोळ्यांविनाही तिचं काळीज जगण्याची आशा घट्ट धरून होतं! तिची स्मरणशक्ती पाहून तिला थेट सहावीच्या वर्गात दाखल केलं गेलं. लुई ब्रेलचे उपकार तिच्याही कामी आले….तिची बोटं शाबूत होती…हात जळाला होता तरी. तिची बोटं एखाद्या निष्णात संवादिनी वादकाच्या सराईत बोटांसारखी ब्रेल लिपीच्या कागदावर उठावाने उमटवलेल्या खडबडीत अक्षरांवरून भराभर फिरू लागली…बोटांतून स्पर्श शब्दरूप घेऊन मेंदूत विसावू लागले. तिथल्या अंधांसाठीच्या डोळस शाळेने सर्व सहकार्य केलं….अंधांनाही वापरता येऊ  शकेल असा संगणक उपलब्ध करून दिला. आधुनिक काळात उपलब्ध असलेली काही साधनं तिच्या मदतीला आली. सीबीएसईचा अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत काहीसा अवघड मानला जातो. भाषेचं ठीक  आहे, पण विज्ञान,गणितातल्या संकल्पना समजून घेणं किती जिकीरीचे झाले असेल कफीला! पण तिने हार मानली  नाही…दिवसरात्र अभ्यास केला….आईबाप, शिक्षक पाठीशी होते….तिचे गुणांचे शतक अवघ्या पाच टक्क्यांनी हुकले! ९५.०६ टक्के दहावी बोर्ड परीक्षेत! अवघे पाच टक्के मिळवले असते या पोरीने तरी ते शंभर टक्क्यांच्या तोडीचे  ठरले असते! 

‘ नैनं दहति पावक:’ अर्थात ‘ हा अग्निदाहो न संभवे ’ असं ज्ञानोबाराय म्हणून गेलेत….आत्मा अग्निने जाळला जाऊ शकत नाही…कफीचा अंतरात्मा अ‍ॅसिडनेही जाळला जाऊ शकला नाही. मी निरूपयोगी नाही, दृष्टी नसली तरी माझ्याकडे दृष्टीकोन आहे हे दाखवून देणा-या कफीने मिळवलेलं हे यश म्हणूनच अलौकिक ठरते. तिला आय.ए.एस. व्हायचं आहे भविष्यात. खरं तर ती आताच झाली आहे आय.ए.एस (I.A.S….I AM STRONG!). तिच्या मुख्याध्यापिका म्हणाल्या….माना की अंधेरा घना है…लेकीन दिया जलाना कहाँ मना है? कफी ! तू प्रज्वलीत केलेली ही ज्योत अनेकांच्या अंधा-या मनात उजेड प्रक्षेपित करेल….हे सूर्यप्रकाशाएवढं ठळक आहे. 

चला…कफीला शुभेच्छा,आशीर्वाद देऊयात…तिच्या चेह-यावर नसलेल्या डोळ्यांतील आशा आणखी पल्लवीत करुयात….तिच्यासाठी प्रार्थना करूयात ! तू देखणी आहेस कफी….लव यू कफी ! 💐

(दैनिक सकाळ,पुणे, इंटरनेटवरील बातम्या यांवर हे लिखाण बेतलेले आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print