श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ‘जोशीमठ’ च्या निमित्ताने… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

समुद्राच्या लाटांमध्ये पाऊलभर पाण्यात कधी उभे राहिले आहात का हो ? लाट जेव्हा सरसर मागे फिरते, तेव्हा शब्दशः तुम्हारे पैरोतलेसे जमीन खिसक जाती हैं । उत्तराखंडमधील जोशीमठात गेले वर्षभर हीच परिस्थिती आहे.

भौगोलिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असलेले जोशीमठ हा बद्रीनाथ, हेमकुंड साहेब, अनेक ट्रेकिंगचे मार्ग, आऊली स्किईंग – या आणि हिमालयातील अशा अनेक ठिकाणांसाठीचा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वाभाविकरीत्या, दरवर्षी येथील पर्यटकांचा ओघ वाढत गेला आणि मागणी – पुरवठा नियमानुसार जोशीमठ येथील infrastructure सोयी – रस्ते, इमारती, हॉटेल्स यांच्या संख्या वाढत गेल्या. महामार्ग मोठे होत गेले, जलविद्युत प्रकल्प उभे राहू लागले. 

दुर्दैवाने हा सगळा डोलारा ज्या पायावर उभा होता / आहे, तो पायाच कमकुवत आहे. भूस्खलनातून वाहून आलेल्या दगडमातीवर जोशीमठ वसलेले आहे. त्यामुळे हा पायाच अस्थिर आहे. नव्या जमान्यातील ही हाव भागवण्याचा ताण या भूस्तराला पेलवत नाहीये. रस्ते, इमारतींचे पाये खणताना, बोगदे खोदताना लावलेले सुरुंग, हा आधीच नाजूक असलेला समतोल वेगाने ढासळवत आहेत. शहरीकरणासाठीची जंगलतोड जमिनीला धरून ठेवणाऱ्या मुळांच्या मुळावर उठली. झालेली हानी निसर्ग स्वतःहून भरून काढतो, पण निसर्गाला तेवढा recovery time दिलाच गेला नाही.

… आणि आज अख्खं ‘ जोशीमठ ‘ गावच्या गाव जीव मुठीत धरून आहे. चकाचोंद आणि भरभराटीच्या नादात मूलभूत अस्तित्वाचाच प्रश्न उभा ठाकला आहे. आपण खूप सहजपणे सरकार, व्यापारी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत आहोत. 

… पण, आपण क्षणभर थांबून विचार करूया का ? 

… आपल्या सगळ्यांचाच जोशीमठ होतो आहे का ?

टार्गेटस्, डेडलाइन्स, प्रोजेक्ट्स, इंक्रीमेंट्स, प्रमोशन, बदल्या, फिरतीच्या नोकऱ्या – या मागणी पुरवठा चक्रात, या सगळ्या चकाचोंदच्या मागे धावताना आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ठिकाणावर राहते आहे का ? आपला समतोल ढासळत आहे का ? झालेली हानी शरीर नैसर्गिकरीत्या भरून काढतं. पण आपण शरीराला तेवढा recovery time देत आहोत का ?

 …. आणि ज्या धार्मिक आध्यात्मिक अधिष्ठानासाठी हिंदुस्तान दूनियाभरात नावाजला जातो, तो आपला पाया मजबूत आहे का ? इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या नादात आपण शुभम् करोति, रामरक्षा विसरलो आहोत का ?  टीव्ही वरच्या मालिकांमध्ये, जाहिरातींमध्ये आपल्या धर्माची, संस्कृतीची, पूर्वजांची निराधार खिल्ली उडवली जाते तेव्हा आपणही दात काढून फिदी फिदी हसतो का ? आपल्या रूढी परंपरांची टोपी उडवणारे व्हॉट्सॲप मेसेज आले की आपण ते पाठवणाऱ्यांना कडक शब्दांत समज देतो का आपणही ते मेसेज पुढे ढकलतो ?

… जोशीमठाबाबतीत कदाचित आपल्याला खूप उशीर झाला आहे. Irreversible damage – न भरून येणारे, न सुधारता येणारे नुकसान झाले आहे.

… तुमच्या वैयक्तिक जोशीमठाची काय स्थिती आहे ? पुनर्वसन होऊ शकेल ना ? ऱ्हास थांबवता येईल ना ? …… 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments