आजी नातवांचा पहिला वाढदिवस डोळे भरून पाहत होती. घर सगळं छान सजवले होते. सगळे नातेवाईक न चुकता आले होते. तशी सुनबाई नाती जपून ठेवायची. अगदी पारंपरिक पद्धतीने पाच सवाष्णीने ओवाळणी केली. आजीने आशीर्वादासाठी हात पुढे केला—
रात्रीचे अकरा वाजले होते. विश्रामबाग रेल्वे स्टेशन वरचा प्रसंग. प्रवाशांची गडबड, हमालांची लगबग, उतारुंची घाई, फेरीवाल्यांची बडबड,सगळ्या गोंगाटात राधा मात्र छोट्याशा बॅगेचे ओझे वागवत स्टेशनवर उभी होती. रात्री साडे अकरा च्या रेल्वेने ती कायमची सांगली सोडून जाणार होती तिचं प्रेम टिकवण्यासाठी तिने हे धाडस केलं होतं तिच्यासोबत केशवही हे गाव सोडून जाणार होता त्याच्या विश्वासावरच तिने हा धाडसी निर्णय घेतला होता.त्याची वाट पाहत बसली होती.त्याने वचन दिले होते, “तू स्टेशन वर ये.मी तुझ्या आधीच तिथे असेन.आपण दोघेही दुसरीकडे जाऊन आपला सुखी संसार थाटू “.ती विचारात गढून गेली होती. हातातील घड्याळाकडे लक्ष गेले 11:25 झाले. केव्हाही रेल्वे येईल.केशवचाअजून पत्ताच नाही. “कुठे अडकला असेल?”
इतक्यात साडेअकराची ट्रेन आली.पण केशव काही आला नाही.ती त्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होती. मन नाना शंकांनी घेरलं होतं.नको ते विचार येत होते. ट्रेन निघून गेली. ती त्याची वाट पाहत तिथेच बसून राहिली. मन भूतकाळात धावू लागलं.चित्रपटाप्रमाणे सगळ्या आठवणी नजरेसमोर फेर धरू लागल्या.
राधा “शांतिनिकेतन “कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती.दिसायला सुंदर आणि हुशार.अशी राधा स्वभावाने समंजस आणि गुणी मुलगी होती. तिथेच असलेल्या छोट्या वस्तीवर ती राहत होती. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले होते.घरी आई,मोठा भाऊ आणि ती. एवढेच त्यांचे कुटुंब. भाऊ काही शिकत नव्हता.पण ती हुशार आहे म्हणून आईने तिला खूप शिकवायचं ठरवलं होतं.दिवसभर मजुरी करून आई तिच्या शिक्षणाचा खर्च भागवत होती. भावाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्याच्यावर कशाचीच जबाबदारी नव्हती.तिने ठरवले होते की खूप शिकून चांगल्या पगाराची नोकरी करायची आणि आईलाही सांभाळायचं. सर्व काही सुरळीत चालू असताना तिच्या आयुष्यात आला “केशव”.
तोसुद्धा त्यांच्याच वस्तीवर राहायला आला होता. नव्याने तिथे राहायला आले होते त्यांचे कुटुंब. त्याला आई-वडील आणि एक बहीण होती.त्याची परिस्थिती जेमतेमच होती.त्याने त्याच कॉलेजमध्ये ATD कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. चित्रकलेत त्याची खूप आवड होती म्हणून त्याने ही शाखा निवडली.चित्र ही खूप सुंदर काढायचा.दिसायला देखणा, सालस,आणि हुशार मुलगा होता तो.
बघता बघता दोघांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.तो तासंतास तिची चित्र काढायचा.हळूहळू दोघांच्या घरात ही गोष्ट कळाली. तिच्या भावाने तर तिला खूप मारले.तिला बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली.फक्त बारावीची परीक्षा होईपर्यंत तिला बाहेर जाण्याची परवानगी मिळाली. निकाल लागला त्या दिवशी तिची केशवशी भेट झाली आणि त्या दोघांनी हा निर्णय घेतला.
रात्रीचे तीन वाजले होते. ती विचाराच्या तंद्रीतून बाहेर पडली. तिच्या लक्षात आले आपण एकटेच आहोत.केशव तर आलाच नाही.त्याने आपल्याला फसवले.
पण इतक्यात तिला आई आणि भाऊ समोरून येताना दिसले. तिने काही बोलायच्या आतच आईच्या हाताचा जोरदार फटका तिच्या गालावर पडला.या दोघांनी तिला घरीं नेऊन खूप मारले.आणि दोनच दिवसात तिच्याच नात्यातील मुलाशी लग्न लावले. तो मुंबईत बँकेमध्ये शिपाई होता. तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता.
ती हुशार होती.तिला पुढे शिकायचे होते. तिने नवर्याला खूप समजावून सांगितले.आणि म्हणून त्याने तिला परत सांगलीतच डीएड ला ॲडमिशन घेऊन दिले .ती सांगलीत दोन वर्षासाठी राहायला आली.
दिवसभर केशवला शोधायची आणि संध्याकाळी घरी यायची. आठ दिवस तिने त्याचा शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही.सगळ्यांनी सांगितले की तो गाव सोडून गेला पण कुठे गेला कोणालाच कळले नाही.
शेवटी तिने मनाला समजावले,”आता हेच माझ आयुष्य “.त्याच्याशिवाय आयुष्य काढायला लागली. तिने खूप मन लावून अभ्यास केला आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली. तिला नंतर मुंबईमधील कल्याण येथील प्राथमिक शाळेत नोकरी लागली. दोनच वर्षात तिने एक आदर्श शिक्षिका म्हणून मान मिळवला.आता भूतकाळात न रमता वर्तमान काळात जगण्याचा निर्धार केला आणि मनापासून संसारात रमली.एक मुलगा व एक मुलगी आणि नवरा असे चौकोनी कुटुंब ती प्रामाणिकपणे सांभाळू लागली. नवऱ्याची म्हणावी तशी साथ मिळाली नाही.त्यांचे स्वभावही कधी जुळलेच नाहीत. पण” लग्न म्हणजे तडजोड “या उक्तीनुसार तिने वीस वर्ष संसार केला.पण केशव अधून मधून मनात डोकावत होता. त्याला ती विसरू शकली नव्हती.
अचानक एक दिवस तिला व्हाट्सअप वर मेसेज आला,” हाय राधा,ओळखलेस का ?”डीपी पाहिला तर लक्षात आले,” अरे हा तर केशव “तिने पटकन तो नंबर ब्लॉक केला. पण मन काही ब्लॉक होत नव्हते.,”त्याने का मेसेज केला असेल?”,” इतक्या वर्षांनी त्याला काय बोलायचं असेल ?”,”तो कोणत्या संकटात तर नसेल ना ?”अशा नानाविध प्रश्नांनी मन गोंधळून गेले होते.
कोणतीही स्त्री पहिले प्रेम कधीच विसरू शकत नाही.वीस वर्ष आठवणींचं ओझं मनावर घेऊन ती जगत होती. आज वेळ आली होती ते ओझ उतरवण्याची..अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची.”का असं वागलास?” याचा जाब विचारण्याची. दोन दिवस असेच गेले शेवटी. तिने ब्लॉक काढला आणि फोन लावला.तिकडून आवाज आला,” हॅलो मी केशव, राधा,मला तुला भेटायचं आहे.” तिलाही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवायची होती. भेटीचे ठिकाण ठरले आणि दोघे भेटले सुद्धा.
त्यानेच बोलायला सुरुवात केली. वडील आजारी होते.त्या दिवशी रात्रीच वडिलांना ऍडमिट करावे लागले. त्यांना अटॅक आला होता. ते आयसीयूमध्ये ऍडमिट होते. म्हणून मी येऊ शकलो नाही. नंतर तुझ्या भावाने दमदाटी केली. आम्ही गाव सोडून गेलो. वडिलांनी ठरवलेल्या मुलीशी लग्न झाले.आज मी चित्रकलेचा शिक्षक आहे.मला दोन मुले आहेत.पण मी एकही दिवस तुला विसरलो नाही.
केशव म्हणाला,”राधा नको ही घुसमट.”,”आपण पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याला सुरुवात करायची का ?” राधा म्हणाली, “हो करूया की! नक्कीच.” पण त्या आधी माझे ऐक.
केशव,” प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुली बरोबर संसार करता येत नाही.पण ती ?व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तर काय बिघडलं,ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे. खूप छान मैत्रीण म्हणून हे काय कमी ग्रेट फीलिंग आहे.?
(सोहमने सांगितलेलं सकारात्मक विचारांचं महत्त्व पटल्यामुळे सरलाचं टेन्शन नाहीसं झालं. हे पाहून सोहमलाही बरं वाटलं…. आता पुढे )
‘तुला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, आई. तू मघाशी बाबांचं आणि दादाचं कौतुक करत होतीस. म्हणजे ‘बिचारे ‘, ‘कधी सासू -सुनेच्या मध्ये पडले नाहीत ‘वगैरे वगैरे….’
‘खरंच आहे ते.’
‘खरं असेल, पण त्याला गुण नाही म्हणता येणार.’
‘म्हणजे?’
‘म्हणजे बघ हं. समिधा ‘माझी ‘ बायको म्हणून आपल्या घरी येईल. म्हणजे आधी तिचं ‘माझ्याशी’ नातं जुळेल आणि नंतर तुझ्याशी, बाबांशी, आपल्या घराशी.’
सरला काही न बोलता त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत राहिली.
‘तिला या घराशी ऍडजस्ट व्हायला मदत करणं, हे ‘माझं’ काम आहे. त्याचबरोबर तिला तुमच्याविषयी, या घराविषयी आपलेपणा कसा वाटेल, हे बघणं, हे ‘माझं’ काम आहे. हे करत असताना तिला काही अडचणी आल्या, तरी त्या सोडवणं, हे ‘माझं’ काम आहे. उलटपक्षी, ती इथे आल्यावर तुला – बाबांनाही काही बाबतीत प्रॉब्लेम्स येऊ शकतील. तसं झालं, तर तुमचे प्रॉब्लेम्स सोडवणं, हेही ‘माझंच’ काम आहे.’
सोहम बोलत होता. सरला मन लावून ऐकत होती.
‘आता एक सांग आई, सासू-सुनेमध्ये भांडणं का होतात?’
‘कितीतरी कारणं असतात. सासू-सून हे नातंच कुविख्यात आहे. विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेलं. अगदी पिढ्यानपिढ्या, शतकानुशतकं चालत असलेली दुष्मनी आहे ती. त्यांच्यातल्या भांडणांची कारणं तरी अगणित असतील.’
‘पण त्या सगळ्यांचं मूळ कारण, रूट कॉज आहे पझेसिव्हनेस -मालकी हक्काचा हव्यास. सासूला वाटतं -हा माझा मुलगा आहे. सुनेला वाटतं -हा माझा नवरा आहे.’
‘बरोबरच तर आहे.’
‘तसं हे बरोबर आहे. पण आतापर्यंत आपला असलेला हा मुलगा आता आपल्या सुनेचा नवरा लागतोय, तिच्याही त्याच्यापासून काही अपेक्षा असणार, याचं भान सासूने ठेवलं पाहिजे. तसंच सुनेनेही, आपला नवरा हा त्याच्या आईचा मुलगा आहे, हे लक्षात घेऊन लग्न झाल्यानंतर त्याने आपलं हे मूळ उखडून टाकावं, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण प्रत्यक्षात घडतं काय? तर दोघींनाही तो पूर्णपणे आपला असावा, असं वाटतं. आणि या वाटण्याचा फायदा कोण घेतो, माहीत आहे? सासूचा मुलगा आणि सुनेचा नवरा. तो दोघींकडूनही स्वतःचे लाड करून घेतो आणि त्याच्यावरून विवादाचा प्रसंग आला, की बिलंदरपणे ‘मी मध्ये पडणार नाही, तुमचं तुम्ही बघून घ्या’ म्हणून नामानिराळा होतो.’
‘बघूया हं आमचा सोहमबाळ काय करतो ते,’ सरलाने चिडवलं. पण सोहम गंभीरच होता.
‘खरं तर त्याचं काम असतं पुलाचं. सासू आणि सुनेमधला सेतू बनलं पाहिजे त्याने. एकमेकींविषयी एकमेकींना वाटणारा जिव्हाळा, कौतुक, चांगल्या गोष्टी परस्परांपर्यंत ‘त्यानेच’ पोहोचवल्या पाहिजेत. एकीच्या मनात दुसरीविषयी कटुता आली, तर सामंजस्याने सुसंवाद साधून, समाधानकारकरीत्या गैरसमज दूर करण्याचं काम ‘त्याचं’आहे. प्रेमाचा त्रिकोण वगैरे म्हणतात ना? पण मला मात्र हा वेगळाच त्रिकोण दिसतोय.’
‘त्रिकोण?’
‘हो. त्रिकोण. तू, मी, समिधा हे त्या त्रिकोणाचे तीन शिरोबिंदू आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाने आपले दोन्ही हात पसरले आहेत आणि उरलेल्या दोघांचा एकएक हात धरलाय. त्यामुळे तयार झालेल्या त्रिकोणात आपलं विश्व सामावलंय. आपलं सुखीसमाधानी, आनंदी विश्व.’
‘खरोखरच मोठा झाला माझा सोहमराजा.’
‘पण तुझ्यासाठी मात्र सोहमबाळच आहे हं मी,’असं म्हणत त्याने सरलाच्या मांडीवर डोकं ठेवलं.
(होणाऱ्या पत्नीचं मलाही टेन्शन आलंय असं सोहमने म्हटल्यावर सरलाला धक्काच बसला…. आता पुढे )
‘खोटं नाही सांगत. खरंच अगं. मलाही टेन्शन आलंय. आता हेच बघ ना. सध्या घरात आपण इनमिनतीन माणसं. बाबा तसे स्वतःतच असतात. आपल्या दोघांचं कसं मस्त चाललं होतं!दादा बोरिवलीला राहायला गेल्यापासून तर ‘तू फक्त माझीच’ असं मला वाटायचं. एकंदरीत छान चाललं होतं आपलं. पण आता समिधा येणार म्हटल्यावर शांत पाण्यात खडा टाकल्यासारखं वाटतंय. ती आपल्या घराशी कितपत ऍडजेस्ट होईल?’
‘खरं सांगू, सोहम?मलाही तीच भीती वाटतेय. शाल्मलीचं किती कौतुक केलं होतं मी!ऑफिसमधून दमून येणार, भूक लागलेली असेल, म्हणून सगळा
स्वयंपाक तयार ठेवायचे मी. बाकीच्या बायकांसारखी, सून येऊन मदत करील, अशी वाट कधीच बघितली नाही. तर हिचं आपलं भलतंच. भूक नाही म्हणायचं आणि आपल्या खोलीत निघून जायचं. मागचं आवरणं तर सोडाच, पण एवढं शिजवलेलं अन्न -सासू काय करते त्याचं? हेही नाही. रोज फुकट कुठे घालवणार, म्हणून फ्रीझमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी…..’ बोलताबोलता सरलाला रडूच आलं.
‘तू तिला कधी सांगितलं नाहीस, आई, की रात्री जेवायला नसशील तर आधीच फोनवर कर, म्हणून?’
‘सुरुवातीला मी गप्प राहायचे रे -उगीच भांडण नको म्हणून. शेवटी न राहवून म्हटलं तसं. तर म्हणाली -रात्री भूक लागणार की नाही, ते संध्याकाळी कसं कळणार?’
‘आणि दादा?’
‘तो बिचारा कधी मध्ये नाही पडला हं. तो आपला आमच्याबरोबर जेवायला बसायचा. पण बायको जेवत नाही, म्हटल्यावर यालाही जेवण जायचं नाही. एखादी चपाती खाल्ल्यासारखं करायचा आणि ताटावरून उठायचा.’
‘कित्ती गं भोळी माझी आई!’सोहमने तिला जवळ घेतलं- ‘अगं, तोपण तिच्याबरोबर खाऊन येत असणार. पण वाद नको, म्हणून तुमच्याबरोबर थोडंसं जेवायचा.’
‘असेल, असेल. तसंही असेल. माझ्या मात्र हे लक्षात आलं नव्हतं हं कधी. बाकी संकेत हाडाचा गरीबच हं. कधी बायकोच्या बाजूने ‘ब्र’सुद्धा काढला नाही तोंडातून.’
‘आई, एक विचारू? आजीचं आणि तुझं कधी वाजायचं का गं? आणि मग बाबा कोणाची बाजू घ्यायचे?’
‘ते वाजणंबिजणं तुझ्या आजीच्या बाजूनेच व्हायचं. मी आपली गप्प राहून मुळुमुळु रडत बसायचे. कधी एका शब्दाने उलट उत्तर केलं नाही त्यांना.’
‘आणि बाबा?’
‘तेही बिचारे मध्ये पडायचे नाहीत-संकेतसारखेच. सासू-सून काय ते बघून घ्या म्हणायचे.’
‘तू का नाही बोलायचीस काही?’
‘एक म्हणजे त्या मोठया आणि दुसरं म्हणजे मी त्यांच्या घरी आले होते ना? म्हणजे तडजोड मलाच करावी लागणार. तशी बऱ्याच बाबतीत तडजोड केली मी. पण त्या दोघांच्या कधी लक्षातच आलं नाही.’
‘हेच, हेच म्हणतो मी, आई. आपल्या मनात जे असतं, ते आपण बोलून दाखवत नाही. आपण न बोलताच समोरच्याने आपल्या मनात काय आहे, ते समजून घ्यावं, अशी अपेक्षा करतो. हाच मुख्य प्रॉब्लेम आहे. लॅक ऑफ कम्युनिकेशन. सुसंवादाची उणीव. मी तुला आत्ताच सांगून ठेवतो, आई. तुझ्या मनात माझ्याबद्दल, समिधाबद्दल काहीही असलं, तरी तू मोकळेपणाने आम्हाला -निदान मला तरी सांग.’
‘म्हणजे सुनेच्या कागाळ्या….’
‘नाही गं. हा ‘कागाळी’ शब्द आहे ना, तोच बिथरवून टाकतो आपल्याला. त्याऐवजी,’संवाद’ म्हण,’सुसंवाद ‘ म्हण.आता, माझं काही चुकलं, तर तू सांगतेसच ना मला? त्याच मोकळेपणाने नंतरही सांग. आणि हेच मी समिधालाही सांगणार आहे.’
‘नको हं. उगीच एकाचे दोन….’
‘हेच ते. तू असा नकारात्मक विचार का करतेस? नकारात्मक विचारांमुळे आपल्या वागण्यालाही नकारात्मक पदर येतात आणि समोरच्या माणसांचे रिस्पॉन्सेसही नकारात्मक मिळतात.’
‘तू बोलतोयस, त्यात तथ्य वाटतंय हं.’
‘हो ना? मग आतापासून पॉझिटिव्ह विचार कर. म्हणजे तुझं वागणंही पॉझिटिव्ह होईल आणि त्यावरच्या इतरांच्या प्रतिक्रियाही पॉझिटिव्हच असतील.’
सरलाने डोळे मिटले. तिच्या चेहऱ्यावर हास्य उमललं. सोहमचं बोलणं पटल्याचीच खूण होती ती. आईचं टेन्शन नाहीसं झालेलं पाहून सोहमलाही बरं वाटलं.
लिस्टप्रमाणे सगळं व्यवस्थित चेक करून सरलाने सगळ्या पिशव्या कपाटात नीट लावून ठेवल्या. कपाट बंद करून चावी ड्रॉवरमध्ये ठेवली आणि हुश्श करून ती सोफ्यावर बसली.
आताच काय तो निवांतपणा मिळाला होता. उद्या सगळी मंडळी आली की लग्नघर गजबजून जाणार.
सोहमचं -तिच्या धाकट्या मुलाचं लग्न तीन दिवसांवर आलं होतं. आमंत्रणं, खरेदी, केळवणं -सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या होत्या. आता परवा देवकार्याचा घाट.तसं मदतीला म्हणून ताई -भावजी उद्या येतीलच. शिवाय थोरला संकेत आणि त्याची बायको शाल्मलीही उद्यापासून राहायला यायचीयत. संकेत केव्हापासून सांगत होता, राहायला येतो म्हणून. पण शाल्मलीच्या मनात नव्हतं, इकडे राहायला यायचं. खरं तर, घरचं कार्य म्हटल्यावर थोरल्या सुनेने जबाबदारीने काही करायला नको का?
त्यांच्या लग्नाच्या वेळी सरलाने किती स्वप्नं बघितली होती!पहिल्यापासून सरलाला मुलीची हौस आणि झाले मात्र दोन्ही मुलगेच. त्यामुळे संकेतचं लग्न ठरलं, तेव्हा सरला अगदी हरखून गेली होती. सून नव्हे, तर मुलगीच घरी येणार असल्यासारखी, ती त्यांच्या लग्नाची वाट बघत होती.
पण लग्न होऊन शाल्मली घरात आली मात्र…..!जाऊ दे. नकोत त्या आठवणी. आता वेगळ्या घरी का होईना, सुखाने नांदताहेत ना दोघं!मग झालं तर.
सोहमचं लग्न ठरल्यापासून सुरेशराव मात्र सरलाला सारखे डोस पाजत होते -‘मोठीशी पटवून घेता आलं नाही, आता धाकट्या सुनेला तरी सांभाळ.’
नवऱ्याने असं म्हटलं की सरला चिडायची.
‘काय बाकी ठेवलं होतं हो मी पटवून घ्यायचं? सगळं अगदी तिच्या मनासारखं होऊ दिलं. माझ्या मनाला सतत मुरड घातली. सासू असूनही प्रत्येक गोष्टीत मीच तडजोड केली. पण तिलाच नको होतं ना, सासरच्या माणसांत राहायला.’
त्या आठवणीने आताही सरलाचे डोळे भरले. तिने चष्मा काढून डोळ्यांच्या कडांशी जमलेलं पाणी पुसलं.
तेवढ्यात सोहम आला.
‘आई, पुढे सरक ना.’
सरला थोडीशी सरकली.
‘आणखी सरक. सोफ्याच्या टोकाला जाऊन बस.’
‘एवढी जागा लागते तुला बसायला?’
‘अं हं. बसायला नाही, झोपायला.तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय.’
‘अरे सोहम, लहान का आता तू? परवावर लग्न आलंय.’
‘म्हणूनच तर आता झोपतोय. उद्या सगळी पाहुणेमंडळी जमतील.म्हणजे तू बिझी. आणि सुनबाई आल्यावर तर काय? सासूबाई मुलाच्या वाट्याला तरी येतील की नाही,शंकाच आहे. वर्षा -दोन वर्षांनी तर आजीच्या मांडीवर नातवंडांचाच हक्क.’
नेहमीची सरला असती, तर तिने चिडवायलाच सुरुवात केली असती – ‘काय रे सोहम? आतापासूनच….’
पण आज सरला गप्पच होती.
‘काय झालं गं, आई?’
‘काही नाही रे.’
‘तरीपण….’
‘खरंच काही नाही.’
‘खरं सांग, आई. आमच्या एंगेजमेंटपासून बघतोय -तू थोडी गंभीर झाली आहेस. आणि गेले आठ -दहा दिवस तर…..’
‘अरे, आमंत्रणं, खरेदी यांनी दमायला होतं रे.’
‘बस काय, आई! हे सगळं लोकांना खरं वाटेल. मी पहिल्यापासून बघतोय ना तुला. एखादं फंक्शन असलं की किती उत्साहात असतेस!त्या उत्साहामुळे चार माणसांचं बळ येतं तुझ्या अंगात.’
‘वय वाढतंय रे आता…’सोहमच्या केसातून हात फिरवत सरला म्हणाली.
सोहम उठून बसला.
‘आई, एक विचारू? खरंखरं सांगशील?’
‘काय?’
‘खरं सांग. तुला समिधाचं टेन्शन आलंय का?’
‘नाही रे. तिचं कसलं टेन्शन?’
‘अगं, हरकत नाही ‘हो’ म्हणायला. खरं सांगायचं, तर मलाही आलंय टेन्शन.’
‘काssय?’प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखी सरला किंचाळली.
☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
(तो तिचा उत्साह निवळला —-इथून पुढे )
ती रडत रडतच मारूकडे गेली. मारूने तिला समजाविले, ” मुन्नी रडायचे नाही. आपण रोडवर राहतोय ना. आपल्याला घर नाही. आपल्याला रडायचा अजिबात हक्क नाही. जे व्यवस्थित घरात रहातात त्यांनाच फक्त रडायचा अधिकार असतो. आपण आपल्या वाटेला आलेल्या परिस्थितीला न घाबरता सामोरे जायचे असते. कुठच्याही आलेल्या कठीण परिस्थितीत आपण रडत न बसता, कोणाकडेही मदत न मागता त्यातून मार्ग काढायचा असतो आणि मला खात्री आहे यातूनही काहीतरी मार्ग निघेल. उद्या १५ ऑगस्ट आहे तू सकाळी लवकर उठून झेंडे घेऊन सिग्नलवर परत उभी रहा”. परिस्थितीने मारूला खूप लवकर समज दिली होती. मारूच्या त्या बोलण्याने मुन्नीलाही धीर मिळाला. संध्याकाळी मारूने एक छोटा बॅनर बनवून त्याला एक काठी लावून मुन्नीला दिला आणि काही कामाच्या गोष्टी तिला सांगून उद्या तो बॅनर घेऊन सिग्नलवर जायला सांगितले.
१५ ऑगस्टचा दिवस उजाडला. मुन्नी सकाळी लवकर उठली. तीन हात नाक्यावरच मेट्रो रेल्वेचे काम चालू असल्याने पाण्याची कमतरता नव्हती. तिने काळोखातच तिची आंघोळ आटपली. ठेवणीतला धुतलेला एक स्वच्छ असा फ्रॉक घातला. मारूकडून दोन वेण्या घालून घेतल्या. त्या तिच्या केसांच्या शेपटाना तिरंगाच्या रंगाच्या रिबीन लावल्या. तोंडाला जरा पावडर लावून कपाळावर एक लाल रंगाची छोटी टिकली लावली. मुन्नीच्या नेहमीच्या उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावर आज एक वेगळया प्रकारचे तेज दिसत होते. जरा उजाडताच मुन्नी, मारूने बनविलेला बॅनर आणि सगळे झेंडे घेऊन तीन हात नाक्याच्या सिग्नलवर उभी राहिली.
मुन्नीच्या हातातला तो बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधत होता. त्यावर लिहिले होते,
“मेरा भारत महान”
“झेंडा उंचा रहे हमारा”
ते वाचून एका गाडीतल्या माणसाने तिला जवळ बॊलवून एक झेंडा द्यायला सांगितला. मुन्नीने तो दिला. त्याने त्याचे पैसे किती विचारले. “साहब मैं तो फ्री में दे रही हूँ. इसकी किंमत करना मुझे अच्छा नही लगता. अगर आप कुछ देना चाहते हो तो आपके हिसाबसे ये झेंडे की किंमत समझकर दे देना. लेकिन इसको संभालके रखना. कचरेमें मत फेकना.” मुन्नीने झेंड्याची किंमत न सांगता त्याच्या हातात तो झेंडा दिला आणि एक सॅल्यूट मारला. मुन्नीचे ते शब्द ऐकून आणि तिने मारलेल्या सॅल्यूटने तो माणूस खूप भारावला आणि जो झेंडा मुन्नी पाच रुपयाला विकत होती त्याचे तो दहा रुपये देऊन गेला. मुन्नी प्रत्येकाला असेच सांगत होती आणि प्रत्येकवेळी सॅल्यूट मारत होती, त्यामुळे प्रत्येकजण तिच्याकडून झेंडा घेत तिला जास्तच पैसे देऊन जात होते. कोणी दहा, कोणी वीस– काही जणांनी पन्नास, शंभरही दिले. प्रत्येकाला त्या झेंड्याचे मोल वेगळे होते. प्रत्येकाला त्या झेंडयाबद्दल आदर होता आणि विशेष म्हणजे मुन्नी तो सांभाळून ठेवायला सांगत होती. आणि त्याचे वेगळेपण प्रत्येकाला जाणवत होते. पंधरा ऑगस्टचा दिवस– आणि तो तीन हात नाका सिग्नल मुन्नीने गाजवला. आदल्या दिवशी प्लॅस्टिकचे झेंडे घेऊन आलेली ती तीन मुले मुन्नीच्या फुकट झेंडे वाटण्याकडे दिवसभर बघत बसली.
माणूस जन्मतःच हुशार असतो, पण कायम कोणावर तरी अवलंबून राहिला की कठीण परिस्थितीत माणसाला मार्ग मिळणे मुश्किल होते. मुन्नी आणि मारूसारखे अनेकजण आहेत, जे आहे त्या परिस्थितीत आलेल्या कठीण वेळेला तोंड देऊन त्यातून नवीन मार्ग शोधतात, आणि आपल्या नशिबाचे दरवाजे हे उत्कर्षासाठी उघडे करतात. उत्कर्षाच्या गुहेचे दरवाजे उघडण्यासाठी ‘खुल जा सिम सिम’ हा मंत्र नव्हे, तर धीर आणि स्वतःवरचा विश्वास कामी येतो.
दुसऱ्या दिवशी मुन्नी परत लवकर उठली आणि तिचा परिसर पूर्णपणे फिरून आली. असे ती दरवर्षी करत असे . रस्त्यावर पडलेले झेंडे ती उचलून गोळा करत असे. ह्यावर्षी तिला वेगळा अनुभव आला. खूप कमी झेंडे तिला रस्त्यावर कचऱ्यात मिळाले. एखाद दुसरा झेंडा रस्त्यावर पडलेला तिला मिळाला. तो तिने उचलून स्वतःकडे ठेवला. तिने सांगितलेले ‘ झेंडे को संभालके रखना ‘ ह्याचा लोकांच्या मनावर खूप परिणाम झाला होता.
आजही तुम्हांला ही मुन्नी फक्त ठाण्याच्या तीन हात नाका ह्या सिग्नलवर नव्हे, तर सगळ्याच सिग्नलवर दिसेल, फक्त तिचे नाव वेगळे असेल. अशा असंख्य मुन्नी, छोटी किंवा मुन्ना, छोटू ह्यांना आपल्या मदतीची अजिबात गरज नाही. त्यांच्या हिकमतीवर, त्यांच्या मेहनतीने ते त्यांच्या आयुष्यात १००% सफल होतील. बदल आपल्यात करायला लागणार आहेत.
त्यांच्याकडे वरवर न बघता किंवा त्यांना नजरेआड न करता आपली डोळस नजर त्यांच्यावर जायला हवी. ७४ वर्षांपूर्वी मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याला स्मरून आपल्या 75 व्या स्वातंत्रदिनी आपला ‘झेंडा ऊंचा रहे हमारा’ आणि ‘मेरा भारत महान’ असे अभिमानाने बोलतांना आणि तो साजरा करताना त्यांचाही विचार आपल्या मनात आला पाहिजे.
☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
नाव : मुन्नी
संपूर्ण नाव : माहित नाही
वय : सात वर्षे
शिक्षण : १ ते १० आकडे लिहिता येतात
पत्ता : तीन हात नाका, पुलाच्या खाली, ठाणे
मुन्नी गेले चार दिवस रोज सकाळपासून खूप काम करत होती. त्याला कारणही तसेच होते. तीन दिवसांनी तिच्या आयुष्यात दर वर्षांनी येणारा एक मोठा दिवस होता. दिवस कसला तिच्यासाठी तो मोठा सण होता.
१५ ऑगस्ट. दरवर्षी १५ ऑगस्टच्या आधी एक आठवडा तिची मोठी बहीण मारू झेंडा प्रिंट केलेले कागद, बांबूच्या काड्या आणि काही रंगीत कागद आणायची आणि दोघी त्याचे झेंडे बनवायच्या . गेले तीन दिवस दोघींचे तेच काम चालू होते. बांबूच्या काड्यांना एका ठराविक साइजमध्ये कापून त्या पॉलिश पेपरने घासून त्यांना रंगीत चमकता कागद चिकटवून शेवटी छापिल झेंड्याचा कागद लावायचा. त्यांनी बनविलेले झेंडे खूपच आकर्षक दिसायचे. मारूच्या मार्गदर्शनाखाली मुन्नी ते काम शिकली होती. गेले दोन वर्षे त्या असे झेंडे बनवत होत्या , आणि ते हातोहात विकलेही जात होते. त्यामुळे मारू आणि मुन्नीला ह्यावर्षीही खूप हुरूप आला होता ते झेंडे बनवायला.
चार वर्षांपासून मुन्नी आणि मारू तीन हात नाका पुलाच्या खाली रहात आहेत. मुन्नीच्या जन्माच्या वेळी त्यांची आई वारली. नंतरची तीन वर्षे गावाला त्यांच्या बापाने त्यांचा कसाबसा सांभाळ केला आणि नंतर एका बाईच्या नादी लागून ह्या दोघीना वाऱ्यावर सोडून तो ते गाव सोडून गेला. मारू आणि मुन्नीमध्ये पाच वर्षाचे अंतर होते. ८ वर्षाच्या मारूला तेंव्हा काय करावे ते कळत नव्हते पण त्या छोट्या गावात, गावाच्या बाहेर असलेल्या झोपडीत राहणे सुरक्षित नाही, एवढे मात्र कळले आणि दोघी ते गाव सोडून कोण काही खायला देईल ते खात एका रेल्वे स्टेशनला आल्या. आलेल्या गाडीत मारूने मुन्नीसहित प्रवेश केला आणि थेट एका मोठ्या स्टेशनांत त्या दोघी उतरल्या. त्या स्टेशनचे नाव होते ठाणे.
त्याच दिवशी त्यांना एक भला माणूस भेटला. साठी पार केलेला फुगे विकणारा अबूचाचा. अबूचाचा हा भला मराठी माणूस. पण त्याच्या वाढलेल्या दाढीमुळे त्याला सगळे चाचा बोलत आणि त्यामुळेच त्याचा सगळ्यांना जरा वचकही होता. त्याच अबूचाचाने ह्या दोघींना खायला घालून त्यांना झोपायला एक चादर देऊन, त्यांची सोय तो रहात होता त्या तीन हात पुलाच्या खाली केली होती. तिथल्या सगळ्यांना अबूचाचाने ह्या माझ्याच मुली आहेत अशी ओळख करून दिल्याने कोणाचीही वाकडी नजर ह्या दोघींवर कधी पडली नाही. गेल्याच वर्षी एका गर्दुल्ल्याने मुन्नीची काही खोड काढून तिचा हात पकडला, म्हणून आबुचाचाने रागाने त्याला त्याचा हात तुटेपर्यंत मारला. पण त्यानंतर पोलिसांनी त्याला पकडून नेले, आणि तो अबूचाचा आजपर्यंत काही परत आलेला नाही. अबूचाचा गेल्यानंतर मारूने स्वतः जवळ एक चांगला चाकू ठेवायला सुरवात केली आणि आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्यांना तो दाखवला– आणि तेंव्हापासून त्या दोघीही सुरक्षितपणे तेथे रहात आहेत.
ह्याच वर्षापासून सिग्नल शाळा चालू झाल्याने मुन्नीला जरा अक्षरांची आणि आकड्यांची ओळख व्हायला सुरवात झाली आहे. सिग्नल शाळेमुळेच त्यांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे मार्गदर्शन केले जात होते. रोजच्या रोज होलसेल मार्केट मधून काहीना काही वस्तू आणून त्या संपेपर्यंत सिग्नलवर विकायच्या, आणि रोजच काहीना काही खाऊन, वर चार पैसे जमवायचे हे अबूचाचाने त्यांना शिकविले होते. सुरवातीला काही खेळणी आणून विकायला सुरवात केली. पण नंतर लोकांना आवडतील अशा काही खास वस्तू मारू आणून देत असे आणि ते विकायचे काम मुन्नी करायची. त्याच धर्तीवर गेले दोन वर्षे झेंडे बनवून १५ ऑगस्टच्या आदल्या दिवशीपासून ते विकतांना मुन्नी तीन हात नाक्याच्या सिग्नलवर दिसत असे.
पूर्वी ह्या झेंड्याचे महत्व मुन्नीला माहित नव्हते. पण सिग्नल शाळेच्या शिकवणीमुळे, आपला देश, आपला तिरंगा झेंडा, आपल्या झेंड्याला आपले सैनिक कसे मान देतात, ह्या सगळ्या गोष्टी तिला कळायला लागल्या. ते झेंडे आपण बनवून, सगळ्यांना विकून त्यांच्या गाडीत, घरी पाठवतो ह्याचे तिला एक वेगळेच आकर्षण वाटत होते. आपण झेंडे बनवून ते विकतो ह्याचा तिला अभिमान वाटत होता आणि त्यामुळेच गेले चार दिवस ती खूप मेहनत घेऊन झेंडे बनवायचे काम करत होती.
१४ ऑगस्टला मुन्नीने सकाळी लवकर उठून आंघोळ करून झेंडे विकायला सुरवात केली. दरवर्षी त्यांच्या आकर्षक रंगीत कागद लावलेल्या झेंड्याना चांगला प्रतिसाद असायचा, तसाच सुरवातीला तो मुन्नीला मिळाला. सुरवातीच्या दोन तासात तिचे तसे चांगले झेंडे विकले गेले. पण नंतर सिग्नलवर तीन अनोळखी मुले आली आणि त्यांनी प्लास्टिकचे झेंडे विकायला सुरवात केली– तेही मुन्नी विकत होती त्यापेक्षा कमी पैशांमध्ये. त्या झेंड्यांपुढे मुन्नीचे झेंडे फिके दिसत होते आणि त्यामुळे लोक मुन्नीचे झेंडे खरेदी न करता ते प्लास्टिकचे झेंडे विकत घेत होते. दुपारपर्यंत मुन्नी झेंडे घेऊन फिरत होती, पण तिचे झेंडे काही कोणी खरेदी करत नसल्याने ती हिरमुसली. ज्या उत्साहाने तिने झेंडे विकायला सुरवात केली होती तो तिचा उत्साह निवळला—-
जाळपोळ करण्यात आलेल्या ठिकाणी धूर ही विरून गेला होता.
दंगलीच्या खुणा काहीशा पुसट झाल्या होत्या.. काही ठिकाणी विखरून पडलेले काचांचे तुकडे, दगड, विटांचे तुकडे दंगलीच्या इतिहासाची साक्ष देत होते.
बंद झालेले व्यवहार सुरळीत चालू होऊ लागले होते.
मोर्च्या तर आठवणीतून कधीच पुसला गेला होता.
…… तरीही .. तरीही सर्वत्र पोलीस बंदोबस्त दिसत होता. वातावरणात नाही म्हणलं तरी तणाव जाणवत होताच.
कुणीतरी एखादं-दुसरा दबकत दबकत, अंदाज घेत घराबाहेर पडू लागला होता.
मारुती झोकांड्या देतच घरी परतत होता. गल्लीच्या तोंडाशीच एक कुत्रं मुटकुळ मारून झोपलं होतं. मारुतीने ते पाहिलं आणि शिव्या घालत त्या कुत्र्याला लाथ मारली. कुत्रं केकाटत धडपडत उठलं आणि गल्लीत आतल्या बाजूला पळालं. अजूनही गल्लीला जाग आलेली दिसत नव्हती. मारुती घराच्या दारासमोर आला. दार बंद आहे हे पाहून चिडला.
” च्यायला हिच्या… आजून पासललिया..! “
बायकोला शिव्या देतच त्याने दारावर लाथ मारली. दार उघडलं नाही तसे त्याने दारालाही दोन-चार शिव्या हासडल्या. दात-ओठ खात त्याने पुन्हा दारावर लाथा हाणल्या. एकदाचं दार उघडलं आणि काही क्षण झुलत, थरथरत राहिलं. ‘ आयला , दारानबी वाईच घेतल्याली दिस्तीया..’ झुलत्या दाराकडे पाहत तो म्हणाला आणि हसला.
झुलत्या दाराला धरण्याचा प्रयत्न करीत तो झुलतच घरात आला. समोर चुलीजवळ, स्टोव्हजवळ त्याला बायको दिसली नाही.
” ए ss ! कुटं उलतलीस ? “
म्हणत तो घरात इकडं तिकडं पाहू लागला. समोर खाली पाहताच थबकला. क्षणात त्याची दारू उतरली.
समोर चार पावलावरच सखू पडली होती. तिच्या शरीरावर माश्या घोंगावत होत्या. तिच्या छातीशी रडून झोपल्यासारखं पोरगं गाढ झोपलं होतं. झोपेतही त्या पोराच्या चेहऱ्यावरील भीती कमी झाली नव्हती.
….’ संचारबंदी ‘ उठल्याची जाणीव त्या ‘ तिघांनाही ‘ झाली नव्हती.
शेजारची रखमा नवऱ्याला जागे करण्याचा प्रयत्न करत होती.
” गप झोप की..”
नवरा पांघरूण तोंडावर घेत झोपेतच त्रासिकपणे कावदारला.
” अवो, पर सखू आरडल्यावानी वाटली..”
” मंग.. ? “
नवऱ्याने जास्तच त्रासिकपणाने विचारले.
” वाईच बगूया काय… ? “
” तेच्यात काय बगायचं हाय ..? मारत्या आला आसंल ढोसून.. दिलं आस्तील दोन-चार तडाखं ..तुमा बायकांस्नी सवंच आस्ती.. वाईच ब्वाट लागली का बोंबलायची.. गप झोप… आन मलाबी झोपुनदेल..”
रखमा काही क्षण गप्प झाली. नवरा म्हणाला ते संगळंच काही खोटं नव्हतं तरी पण तिला राहवेना..
थोड्या वेळाने ती परत नवऱ्याला जागं करत म्हणाली,
” अवो,पर…”
” गप झोपतीस का आता.. का तुला बी..?”
तो आणखीनच चिडून म्हणाला तशी ती गप्प झाली. तो बोलल्यासारखा दोन तडाखे द्यायला कमी करणार नाही याची तिला खात्री होतीच.. पण रखमाला काही चैन पडेना. नाही म्हणलं तरी इतक्या वर्षाचा शेजार होता. त्यात सखू प्रत्येक वेळेला अडी-नडीला उभा रहात होती. तिला ही सखूबद्दल आपलेंपणा वाटत होताच. थोडा वेळ ती तशीच अस्वस्थशी कानोसा घेत बसून होती. अधून-मधून सखूचा आवाज येतंच होता.
काहीतरी विचार करून ती उठली आणि दाराकडं जाऊ लागली.
नवरा जागाच होता.. त्याला तिची हालचाल जाणवली तसे त्याने चिडक्या आवाजात, जाब विचारावा तसे विचारले,
ती काहीशी चिडून म्हणाली.. लगेच पुढं समजावणीच्या सुरात म्हणाली,
” अवो, सखू पोटुशी हाय..”
तिच्या आवाजातील तिखटपणामुळे त्याच्या स्वरातील पुरुषी कडकपणा काहीसा कमी झाला.
” आगं, मारती आला आसंल ढोसून.. आन करफू हाय ती इसारलीस व्हय ? पोलिसांनी गोळी-बिळी घातली मजी .. ? “
नवऱ्यानं कर्फ्युची आठवण करून दिली तशी ती काहीशी घाबरली आणि थबकली.
” आगं, आन तसंच काय आसतं तर आगुदरच बोलीवलं नसतं का सखूनं तुला ? मारत्याच आला आसंल.. उगा कशापाय जीवाची जोखीम घ्याची ? “
‘ सखूनं बोलावले नसते का ?’ हा नवऱ्याचा मुद्दा तिला पटल्याचे जाणवलं. त्यात सखूचा आवाजही आधी येत होता तसा येत नव्हता. ती थबकली. ती थबकलेली पाहून तिचा नवरा म्हणाला,
” सकाळच्या पारी बगू काय ती.. करफु बी उठायचा हाय. तू बी झोप आता आन मलाबी झोपूदेल.. करफू उठतुया म्हनल्याव कामाव जाया नगं ? “
दाराकडे निघालेली रखमा परत फिरली होती.
‘आगं, सखू काय पयल्यांडाव पोटूशी ऱ्हायलीया व्हय ? तिनं बोलवली नसतं व्हय तुला..? ‘ नवऱ्याचं हे सांगणंही तिला पटलं होतं. नवरा म्हणाला त्यात तथ्य होतंच. ती माघारी येऊन अंथरुणावर आडवी झाली.
अंथरुणावर आडवं झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. तिने झोपेत पोराचे पाय पोटावर लागू नयेत म्हणून मध्ये अंतर ठेवले होते. नाही म्हणलं तरी पोराकडं जरा दुर्लक्षच होतंय हे तिला जाणवत होतंच.. तो विचार मनात येताच तिला आतून भरून आलं. शांत झोपलेल्या पोराकडे तिने मायेने पाहिलं. ती हात लांब करून पोराला उगाचच हळुवार थोपटू लागली. ‘ काहीही न कळण्याचे वय पण बरेच शहाण्यासारखे वागतंय ‘ असं तिच्या मनात आले..
घरात आणखी कुणी असतं तर बरे झाले असते.. आपले काम, त्यात हे दुसऱ्यांदा गरोदर राहणं.. कुणाची, कशाची फिकीर नसणारा बाप यात पोराची फार आबाळ होतेय ती तरी झाली नसती.., तिच्या मनात उगाचच पोराची काळजी दाटून आली. ..पण घरात दुसरं असणार कोण ? जवळच असे कुणी नव्हतंच.. जे कुणी होते त्यांच्याशी तिच्या नवऱ्याने संबंध ठेवले नव्हते.. आणि तिला मनातून कितीही वाटत असले तरी तिला ठेवू दिले नव्हते.. त्याच्या दारू पिऊन धिंगाणा घालण्याच्या सवयीमुळे शेजारी-पाजारीही तिच्याशी नसले तरी त्याच्याशी तुटूनच होते.. पण तरीही तिने मात्र शेजारधर्म पाळला होता.. शेजार राखला होता.
तिला जरा आराम वाटत असला तरी हवी असूनही झोप काही येत नव्हती. उगाचच मनात काहीबाही विचार येत होते. तिला नवऱ्याची आठवण आली. ‘ कुठं असतील ? कसे असतील ? अजून का घरी आले नाहीत ? ‘ अशा प्रश्नांच्या वावटळीत तिचं मन भिरभिरु लागलं होतं, भरकटू लागलं होतं.तिला नवऱ्याची जास्तच आठवण येत होती. तो दारू पिऊन घरात आला की नुस्ता दंगा-धुडगूस घालायचा. तिला शिव्यांची लाखोली वाहायचा, मारहाण करायचा… तिला तो घरात आलाच नाही तर बरे होईल असे तेंव्हा वाटायचं.. पण आत्ता मात्र तो यायला हवा, घरात असायला हवा असे वाटत होतं पण कर्फ्यु लागल्यापासून त्याचा पत्ताच नव्हता. खरंतर त्याच्या विचाराने तिच्या डोळ्यांत दाटून आलेली झोप पाला-पाचोळ्यासारखी उडून गेली होती.
तिला अस्वस्थ वाटू लागले तशी ती हाताला रेटा देत उठून बसली. नकळत तिची नजर पोराकडे गेली. ते कुशी बदलून गाढ झोपलेले होते. आपल्या अवतीभवती काय घडतंय याची त्याला खबतबातही नव्हती. तिची अस्वस्थता वाढू लागली. पोटात कळा येऊ लागल्या. वेदना असह्य होऊ लागली. गात्रागात्रात फक्त वेदनेचीच जाणीव भरून राहिली. तिचा चेहरा कसानुसा होत होता..
” देवा ss माणकुबा ss! “
तशाही स्थितीत तिने हात जोडून देवाची करुणा भाकली.
” चार रोज थांब रं….आरं दिस उजडंस्तवर तरी थांब बाबा ..”
ती पुटपुटली.. त्यावेळी तिची नजर स्वतःच्या पोटाकडे होती.. ती एकाच वेळी देवाला आणि येणाऱ्या जीवाला विनवीत होती.
पोटातील कळा थांबण्याचं चिन्ह दिसेना. ‘ काहीतरी करायला पाहिजे… कुणालातरी बोलवायला हवं..कुणाला बोलावणार ?’ मनात विचार येताच तिची नजर झोपलेल्या पोराकडे गेली.
‘त्येला हाळी मारून उठवावं काय ? तर येवडंसं प्वार.. ती काय करंल ? उलटं भेदरून जायाचं … त्येला नगंच ..’ ती उठून उभारायचा प्रयत्न करू लागली. असह्य कळांमुळे तिला जमेना.. ती तशीच खुरडत, सरकत दाराकडे निघाली.. पुढेही सरकवेना.. ती शेजारणीला हाका मारू लागली पण समोरची काहीच चाहूल लागेना… जीव घाबराघूबरा झाला होता.. साऱ्या अंगातून त्राण निघून गेल्यासारखे वाटत होते. वेदनेचा आगडोंब साऱ्या शरीरात पसरला होता. ती ओरडू लागली..किंचाळू लागली.. आक्रन्दू लागली. तिचा जीव गुदमरू लागला. वेदना वाढतच प्राणांतिक वेदनेने ती धडपडत राहिली.. तिचा आवाज, ओरडणे, किंचाळणे कमी झालं… थांबले…. रात्रीची असह्य शांतता पुन्हा भवतालात भरून राहिली.