श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ मुन्नी आणि झेंडा…भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे 

(तो तिचा उत्साह निवळला —-इथून पुढे ) 

ती रडत रडतच मारूकडे गेली. मारूने तिला समजाविले, ” मुन्नी रडायचे नाही. आपण रोडवर राहतोय ना. आपल्याला घर नाही. आपल्याला रडायचा अजिबात हक्क नाही. जे व्यवस्थित घरात रहातात त्यांनाच फक्त रडायचा अधिकार असतो. आपण आपल्या वाटेला आलेल्या परिस्थितीला न घाबरता सामोरे जायचे असते. कुठच्याही आलेल्या कठीण परिस्थितीत आपण रडत न बसता, कोणाकडेही मदत न मागता त्यातून मार्ग काढायचा असतो आणि मला खात्री आहे यातूनही काहीतरी मार्ग निघेल. उद्या १५ ऑगस्ट आहे तू सकाळी लवकर उठून झेंडे घेऊन सिग्नलवर परत उभी रहा”. परिस्थितीने मारूला खूप लवकर समज दिली होती. मारूच्या त्या बोलण्याने मुन्नीलाही धीर मिळाला. संध्याकाळी मारूने एक छोटा बॅनर बनवून त्याला एक काठी लावून मुन्नीला दिला आणि काही कामाच्या गोष्टी तिला सांगून उद्या तो बॅनर घेऊन सिग्नलवर जायला सांगितले. 

१५ ऑगस्टचा दिवस उजाडला. मुन्नी सकाळी लवकर उठली. तीन हात नाक्यावरच मेट्रो रेल्वेचे काम चालू असल्याने पाण्याची कमतरता नव्हती. तिने काळोखातच तिची आंघोळ आटपली. ठेवणीतला धुतलेला एक स्वच्छ असा फ्रॉक घातला. मारूकडून दोन वेण्या घालून घेतल्या. त्या तिच्या केसांच्या शेपटाना तिरंगाच्या रंगाच्या रिबीन लावल्या. तोंडाला जरा पावडर लावून कपाळावर एक लाल रंगाची छोटी टिकली लावली. मुन्नीच्या नेहमीच्या उन्हाने रापलेल्या चेहऱ्यावर आज एक वेगळया प्रकारचे तेज दिसत होते. जरा उजाडताच मुन्नी, मारूने बनविलेला बॅनर आणि सगळे झेंडे घेऊन तीन हात नाक्याच्या सिग्नलवर उभी राहिली. 

मुन्नीच्या हातातला तो बॅनर सगळ्यांचे लक्ष वेधत होता. त्यावर लिहिले होते,

“मेरा भारत महान”

“झेंडा उंचा रहे हमारा”

ते वाचून एका गाडीतल्या माणसाने तिला जवळ बॊलवून एक झेंडा द्यायला सांगितला. मुन्नीने तो दिला. त्याने त्याचे पैसे किती विचारले. “साहब मैं तो फ्री में दे रही हूँ.  इसकी किंमत करना मुझे अच्छा नही लगता. अगर आप कुछ देना चाहते हो तो आपके हिसाबसे ये झेंडे की किंमत समझकर दे देना.  लेकिन इसको संभालके रखना. कचरेमें मत फेकना.”  मुन्नीने झेंड्याची किंमत न सांगता त्याच्या हातात तो झेंडा दिला आणि एक सॅल्यूट मारला. मुन्नीचे ते शब्द ऐकून आणि तिने मारलेल्या सॅल्यूटने तो माणूस खूप भारावला आणि जो झेंडा मुन्नी पाच रुपयाला विकत होती त्याचे तो दहा रुपये देऊन गेला. मुन्नी प्रत्येकाला असेच सांगत होती आणि प्रत्येकवेळी सॅल्यूट मारत होती, त्यामुळे प्रत्येकजण तिच्याकडून झेंडा घेत तिला जास्तच पैसे देऊन जात होते. कोणी दहा, कोणी वीस– काही जणांनी पन्नास, शंभरही दिले. प्रत्येकाला त्या झेंड्याचे मोल वेगळे होते. प्रत्येकाला त्या झेंडयाबद्दल आदर होता आणि विशेष म्हणजे मुन्नी तो सांभाळून ठेवायला सांगत होती. आणि त्याचे वेगळेपण प्रत्येकाला जाणवत होते. पंधरा ऑगस्टचा दिवस– आणि तो तीन हात नाका सिग्नल मुन्नीने गाजवला. आदल्या दिवशी प्लॅस्टिकचे झेंडे घेऊन आलेली ती तीन मुले मुन्नीच्या फुकट झेंडे वाटण्याकडे दिवसभर बघत बसली. 

माणूस जन्मतःच हुशार असतो,  पण कायम कोणावर तरी अवलंबून राहिला की कठीण परिस्थितीत माणसाला मार्ग मिळणे मुश्किल होते. मुन्नी आणि मारूसारखे अनेकजण आहेत,  जे आहे त्या परिस्थितीत आलेल्या कठीण वेळेला तोंड देऊन त्यातून नवीन मार्ग शोधतात,  आणि आपल्या  नशिबाचे दरवाजे हे उत्कर्षासाठी उघडे करतात. उत्कर्षाच्या गुहेचे दरवाजे उघडण्यासाठी ‘खुल जा सिम सिम’ हा मंत्र नव्हे, तर धीर आणि स्वतःवरचा विश्वास कामी येतो. 

दुसऱ्या दिवशी मुन्नी परत लवकर उठली आणि तिचा परिसर पूर्णपणे फिरून आली. असे ती दरवर्षी करत असे . रस्त्यावर पडलेले झेंडे ती उचलून गोळा करत असे. ह्यावर्षी तिला वेगळा अनुभव आला. खूप कमी झेंडे तिला रस्त्यावर कचऱ्यात मिळाले. एखाद दुसरा झेंडा रस्त्यावर पडलेला तिला मिळाला.  तो तिने उचलून स्वतःकडे ठेवला. तिने सांगितलेले ‘ झेंडे को संभालके रखना ‘ ह्याचा लोकांच्या मनावर खूप परिणाम झाला होता. 

आजही तुम्हांला ही मुन्नी फक्त ठाण्याच्या तीन हात नाका ह्या  सिग्नलवर नव्हे,  तर सगळ्याच सिग्नलवर दिसेल,  फक्त तिचे नाव वेगळे असेल. अशा असंख्य मुन्नी, छोटी किंवा मुन्ना, छोटू ह्यांना आपल्या मदतीची अजिबात गरज नाही. त्यांच्या हिकमतीवर, त्यांच्या मेहनतीने ते त्यांच्या आयुष्यात १००% सफल होतील. बदल आपल्यात करायला लागणार आहेत. 

त्यांच्याकडे वरवर न बघता किंवा त्यांना नजरेआड न करता  आपली डोळस नजर त्यांच्यावर जायला हवी. ७४ वर्षांपूर्वी  मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याला स्मरून आपल्या  75 व्या स्वातंत्रदिनी आपला ‘झेंडा ऊंचा रहे हमारा’ आणि ‘मेरा भारत महान’ असे अभिमानाने बोलतांना आणि तो साजरा करताना त्यांचाही  विचार आपल्या मनात आला पाहिजे. 

जय हिंद , जय भारत 

—– समाप्त . 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments