? जीवनरंग ❤️

☆ संचारबंदी..भाग – 5 ☆ श्री आनंदहरी ☆

संचारबंदी उठवण्यात आली होती.

जमावबंदी शिथिल करण्यात आली होती.

जाळपोळ करण्यात आलेल्या ठिकाणी धूर ही विरून गेला होता.

दंगलीच्या खुणा काहीशा पुसट झाल्या होत्या.. काही ठिकाणी विखरून पडलेले काचांचे तुकडे, दगड, विटांचे तुकडे दंगलीच्या इतिहासाची साक्ष देत होते.

बंद झालेले व्यवहार सुरळीत चालू होऊ लागले होते.

मोर्च्या तर आठवणीतून कधीच पुसला गेला होता.

……  तरीही .. तरीही सर्वत्र पोलीस बंदोबस्त दिसत होता. वातावरणात नाही म्हणलं तरी तणाव जाणवत होताच.

कुणीतरी एखादं-दुसरा दबकत दबकत, अंदाज घेत घराबाहेर पडू लागला होता.

मारुती झोकांड्या देतच घरी परतत होता. गल्लीच्या तोंडाशीच एक कुत्रं मुटकुळ मारून झोपलं होतं. मारुतीने ते पाहिलं आणि  शिव्या घालत त्या कुत्र्याला लाथ मारली. कुत्रं केकाटत धडपडत उठलं आणि गल्लीत आतल्या बाजूला पळालं. अजूनही गल्लीला जाग आलेली दिसत नव्हती. मारुती घराच्या दारासमोर आला. दार बंद आहे हे पाहून चिडला.

” च्यायला हिच्या… आजून पासललिया..! “

बायकोला शिव्या देतच त्याने दारावर लाथ मारली. दार उघडलं नाही तसे त्याने दारालाही दोन-चार शिव्या हासडल्या. दात-ओठ खात त्याने पुन्हा दारावर लाथा हाणल्या. एकदाचं दार उघडलं आणि काही क्षण झुलत, थरथरत राहिलं. ‘ आयला , दारानबी वाईच घेतल्याली दिस्तीया..’ झुलत्या दाराकडे पाहत तो म्हणाला आणि हसला.

झुलत्या दाराला धरण्याचा प्रयत्न करीत तो झुलतच घरात आला. समोर चुलीजवळ, स्टोव्हजवळ त्याला बायको दिसली नाही.

” ए ss ! कुटं उलतलीस ? “

म्हणत तो घरात इकडं तिकडं पाहू लागला. समोर खाली पाहताच थबकला. क्षणात त्याची दारू उतरली.

समोर चार पावलावरच सखू पडली होती.  तिच्या शरीरावर माश्या घोंगावत होत्या. तिच्या छातीशी रडून झोपल्यासारखं पोरगं गाढ झोपलं होतं. झोपेतही त्या पोराच्या चेहऱ्यावरील भीती कमी झाली नव्हती.

 ….’ संचारबंदी ‘ उठल्याची जाणीव त्या ‘ तिघांनाही ‘ झाली नव्हती.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments